मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दुभंग… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दुभंग… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(त्यानंतर बरेच दिवस त्याचा फोनही आला नाही. नंदिनीने प्रयत्न केला पण २-३ वेळा त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याच्या काळजीने ती रोज फोन करायला लागली.) – इथून पुढे – – – 

असाच एक दिवस तिनं हाॅस्पिटलमधून फोन लावला तर तो सूझन नावाच्या एका बाईने उचलला आणि प्रतापला बोलावलं. ही बाई कोण म्हणून नंदिनीनं खडसावून विचारलं. त्यावेळी प्रतापने जे सांगितलं ते ऐकून नंदिनीला गरगरल्यासारखंच झालं. सूझन आणि तो गेली तीन वर्षे एकत्र राहत आहेत. त्यांना दोन वर्षांची एक मुलगी पण आहे. आणि तो आता कॅनडा सोडून भारतात परत येणं शक्य नाही. नंदिनीच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि ती बेशुद्ध झाली. एका पेशंटनेच डाॅक्टरांना केबिनमध्ये जाऊन हे सांगितलं. डॉ. साने ताबडतोब बाहेर आले. त्यांनी दोन नर्सच्या मदतीने नंदिनीला हाॅस्पिटलमधल्या बेडवर झोपवलं. तिचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. डाॅ. नी तिला हलवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण उं उं करून ती परत बेशुद्ध झाली. नर्सला तिला सलाईन लावायला सांगून डॉ. नी एक इंजेक्शनही नंदिनीला दिलं. तिच्या घरी फोन करून निरोप देण्याची व्यवस्था केली. नंदिनीचे सासू-सासरे रिक्षा करून लगेच हाॅस्पिटलला पोचले.

आधीच्या पेशंटला आत पाठवेपर्यंत व्यवस्थित असलेल्या नंदिनीला अचानक काय झालं असावं हे डाॅ. ना ही कळत नव्हतं. त्या पेशंटने सांगितल्याप्रमाणे नंदिनी मोबाईलवर बोलत असताना हे झालं होतं. तिच्या सासऱ्यांनाही कळेना असं फोनवर काय आणि कोणाशी बोलणं झालं असावं? साधारण तासाभराने नंदिनी शुद्धीवर आली. आपण इथे का झोपलो आहोत आणि सासू-सासरे का आले आहेत, याचं तिला आकलन होत नव्हतं. सासऱ्यांनी तिला कोणाचा फोन आला होता विचारलं आणि ती प्रताप, प्रताप असं पुटपुटली. तिला पुन्हा ग्लानी आल्यासारखं झालं. डाॅ. सानेही तिथेच बसलेले होते. त्यांनी नंदिनीला सध्या आराम करू द्या आपण नंतर तिच्याशी बोलू असं सांगितलं.

दोन दिवस नंदिनी हाॅस्पिटलमधेच होती. तिसऱ्या दिवशी जरा बरं वाटल्यावर आठ दिवस पूर्ण आराम करण्याच्या अटीवर डाॅ. नी तिला घरी जायची परवानगी दिली. स्वतः कार घेऊन ते तिला आणि तिच्या सासऱ्यांना घरी सोडून आले.

ते घरी पोचले तेव्हा मुलं शाळेत गेलेली होती. घरी येताच नंदिनीचा बांध फुटला आणि रडत रडतच तिने प्रतापचे प्रताप त्याच्या आई-वडिलांच्या कानावर घातले. दोघेही कोलमडून गेले. काय आणि कशी समजूत घालणार होते ते नंदिनीची! जरा सावरल्यावर मात्र मुलांना यातलं काहीच न सांगण्याची शपथ नंदिनीने त्यांना घातली. मुलांची वयं अर्धवट, त्यांच्या मनावर याचा आघात होऊ नये याची काळजी मोठ्यांनीच घ्यायला हवी होती. त्यामुळे ही गोष्ट आपल्या तिघांमध्ये ठेवायची असं ठरलं.

आठ दिवसांनी बिछान्यावरून उठून बसलेली नंदिनी मात्र कोणी वेगळीच स्त्री होती. तिचा हसरा चेहरा गंभीर आणि दृढनिश्चयी दिसत होता. ती नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली. मुलांना शाळेत पाठवून स्वतः हाॅस्पिटलला कामावर रुजू व्हायला तयार झाली. सासू-सासरे तिला अजून थोडे दिवस आराम कर असं म्हणत होते. पण ती म्हणाली की आता मला असं हातपाय गाळून चालणार नाही. माझी जबाबदारी आता जास्त वाढली आहे आणि ती स्कूटी घेऊन निघालीसुद्धा.

हाॅस्पिटलला ती आल्यावर डॉ. सानेंनी तिच्या तब्येतीची चौकशी केली आणि मग ती आपल्या कामात मग्न राहिली. सर्व पेशंट संपल्यावर मात्र डॉ. सानेंनी तिला केबिनमध्ये बोलावलं. ‘त्या दिवशी नेमकं काय झालं नंदिनी? ‘ 

नंदिनी गप्प बसून राहिली. ‘ठीक आहे तुला सांगायचं नसेल तर. पण एक डाॅक्टर म्हणून मला पेशंटच्या आजाराचं कारण जाणून घेणं आवश्यक आहे ना! परत कधी असा त्रास झाला तर लगेच योग्य उपचार मिळायला हवे. आपण सर्वच पेशंटची केस हिस्टरी समजून, नोंद करून घेतो ना? तू सांगितलं नाहीस तरी मला तुझ्या घरच्या लोकांकडून ही माहिती मिळवावी लागेल. तू माझ्या हाॅस्पिटलमधे काम करतेस, माझ्यावर तुझी जबाबदारी आहे. ‘

‘नाही नाही, तुम्ही आई-बाबांना काही विचारू नका. ‘ नंदिनीच्या डोळ्यात अश्रू होते. मग तिनेच त्यांना सर्व हकिकत सांगितली. डाॅक्टर देखील हे ऐकून चकित झाले. काय बोलावं त्यांना सुचेना. ते एवढंच म्हणाले, ‘नंदिनी, खचून जाऊ नकोस. स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घे. काहीही मदत लागली तर मला नक्की सांग. एक मित्र म्हणून मी नेहमी तुझ्यासोबत असेन. ‘

एक महिना असाच गेला. पगार हातात आला तेव्हा नंदिनी विचारात पडली. आपल्या या तुटपुंज्या पगारात आपण मुलांना कसं वाढवणार? आत्तापर्यंत प्रतापकडून नियमित पैसे येत होते. अकाऊंटमध्ये बऱ्यापैकी रक्कम शिल्लक देखील होती. पण उद्या त्यानं पैसे पाठवणं बंद केलं तर? आणि आता त्याच्या पैशांवर का म्हणून अवलंबून राहायचं? सासऱ्यांना व्यवस्थित पेंशन आहे, त्यामुळे ती दोघं आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी आहेत. पण मुलांचं अजून शिक्षण पार पडायचं आहे. त्यांच्या ट्यूशन फी, वेगवेगळे क्लास आणि इतर दैनंदिन खर्च मी कसा मॅनेज करणार? मला याहून अधिक पैसे कमावण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. दुसरी नोकरी शोधावी का? नचिकेत यावर्षी दहावीला होता. पुढच्या वर्षी काॅलेजला अ‍ॅडमिशन, नंतरचं उच्च शिक्षण हे सारंच खर्चिक होतं.

मग दुसर्‍या दिवशी तिने डाॅक्टरांकडेच हा विषय मांडला. हाॅस्पिटलमध्येच तिला आणखी काही काम करता येईल का? जरावेळ विचार करून डॉ. म्हणाले की आपल्या मॅटर्निटी हाॅस्पिटलच्या अकाउंट्स विभागात एका मदतनिसाची गरज आहे, कारण तिथला व्याप आता फारच वाढला आहे. तू तिथे काम करू शकशील का? तू जर जेवणाचा डबा घेऊन आलीस तर मधल्या वेळात घरी न जाता तिथे दोन अडीच तास काम करणं जमेल का? थोडे दिवस काम शिकून घेतल्यावर मग तुला कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर घरूनसुद्धा काही कामं करता येतील. म्हणजे मग मलाही विश्वासू आणि कुशल माणूस मिळेल कामासाठी आणि दुसरीकडे न जाता तुलाही इथेच जास्त पगार मिळेल. ‘

‘असं झालं तर माझी खूपच सोय होईल. पण मला अकाउंटसचं काही ज्ञान नाही आणि कम्प्युटर, लॅपटॉप वापरायची सवयही नाहिये. मी शिकण्याचा प्रयत्न मनापासून करीन, कितपत जमेल ते नाही सांगता येणार. ‘नंदिनी म्हणाली.

‘तू हुशार आहेस, तुला नक्की जमेल. मी अकाउंटसच्या जोशीबाई आणि मिस्टर सबनिसांशी बोलून घेतो. परवापासून तू सुरूवात कर. ‘

आणि नंदिनीच्या कामाला सुरूवात झाली. शिकण्याची मनापासून तयारी असल्याने तिनं तिथलं काम, कम्प्युटर, लॅपटॉपचा वापर हे थोड्याच दिवसांत आत्मसात केलं. तिथल्या लोकांशीही तिचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. आधीपेक्षा दीडपट पगार मिळू लागल्याने तिची आर्थिक चिंताही कमी झाली. शिवाय अजूनतरी प्रतापकडून दरमहा पैसे बँकेत जमा होत होते. पण शक्यतो त्या पैशांना हात लावायचा नाही असं नंदिनीनं ठरवून टाकलं होतं.

डाॅक्टरांनी केलेल्या मदतीमुळे आणि अकाउंटसच्या कामामुळे वेळोवेळी संपर्कात आल्याने नंदिनी आता डॉ. सानेंबरोबरही थोडं मोकळेपणाने बोलू लागली होती.

असेच सहा महिने निघून गेले. आणि एक दिवस सकाळी हाॅस्पिटलमध्ये गेल्यावर तिला डाॅ. सानेंचा फोन आला. त्यांच्या बायकोची तब्येत सिरियस असल्याने ते दोन-तीन दिवस तरी हाॅस्पिटलमध्ये येऊ शकणार नव्हते. त्यांच्या सगळ्या अपाॅइंटमेंटस रद्द कराव्या लागणार होत्या. मॅटर्निटी हाॅस्पिटलमध्ये आणखी दोन मदतनीस डाॅक्टर असल्यामुळे ते चालू राहणार होतं. काही अडचण आली तर डाॅक्टरांचे पुण्यातील मित्र डाॅक्टर फडणीस किंवा डाॅक्टर देशमुखांशी संपर्क साधायचा होता. नंदिनीने सकाळी अपाॅइंटमेंटस असणाऱ्या पेशंटना आधी येऊ नका म्हणून फोन करून कळवलं आणि मग संध्याकाळच्या. नंतर ती अकाउंटस विभागात गेली.

जोशीबाई बरीच वर्ष तिथे काम करत होत्या. त्यांच्याकडून तिला कळलं की डाॅक्टरांची बायको गेली दहा वर्षे पॅरालिसिसमुळे आजारी आहे. ती पुण्यातील नामांकित काॅलेजात प्रोफेसर होती. दहा वर्षांपूर्वी काॅलेजातून घरी येताना तिच्या स्कूटरला ट्रकने धडक दिल्यामुळे अपघात झाला. तिच्या मेंदूला मार लागला. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस ती कोमात होती. नंतर शुद्धीवर आली पण तिचा चेहरा वाकडा झाला आणि शरिराची उजवी बाजू लुळी पडली. फिजिओथेरपीचा फारसा उपयोग झाला नाही आणि ती बिछान्याला खिळली. मागच्या वर्षीपासून तर तिची नजरही अंधूक झाली होती. तिच्यासाठी घरी कायम एक नर्स ठेवलेली आहे. डाॅक्टरांना सुकन्या नावाची एक मुलगी आहे आणि यंदा ती नववीत आहे. डाॅक्टरांच्या आईने सुकन्याला लहानाचं मोठं केलं. पण दोन वर्षांपूर्वी त्या हार्ट अ‍ॅटॅकने गेल्या. तेव्हापासून डाॅक्टरच तिचे आई आणि बाबा. त्या मुलीला बिचारीला आईचं सुख असं मिळालेलंच नाही. कारण हा अपघात झाला तेव्हा ती जेमतेम तीन किंवा चार वर्षाची असेल. नंदिनीला हे ऐकून खूपच वाईट वाटलं. आणि घरात इतक्या अडचणी आणि वाईट परिस्थिती असतानाही डाॅक्टर किती खंबीरपणे दोन्ही आघाड्यांवर लढत आहेत याचं कौतुकही वाटलं.

दोन दिवसांनी डाॅक्टर आलेच नाहीत. त्यांची बायको निवर्तल्याची बातमी आली. सगळ्या स्टाफसोबत नंदिनीही डाॅक्टरांच्या घरी जाऊन भेटून आली. काय बोलणार अशावेळी? घरी आली तरी सुकन्याचा कोमेजलेला चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून हालत नव्हता. नातेवाईक स्त्रियांपासून काहीशी दूर ती एकटीच एका कोपर्‍यात खुर्चीवर बसलेली होती. डाॅक्टरांचा चेहराही दुःखाने विदीर्ण झालेला. पण पुरूष आणि त्यातून स्वतः डाॅक्टर असल्याने ते संयम राखून होते.

‘तिच्या वेदना बघवत नव्हत्या, त्यातून तिची सुटका झाली, ‘एवढंच ते बोलले.

– क्रमशः भाग दुसरा  

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दुभंग… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दुभंग… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

नंदिनी-प्रतापच्या लेकीचं, नेहाचं लग्न दोन दिवसांपूर्वीच पार पडलं होतं. काल नेहाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा झाली होती. आज नेहा आणि तिचा नवरा पराग नेहाच्या माहेरी आले होते. नेहाचा भाऊ नचिकेत आणि रश्मीवहिनी उद्या दुबईला परतणार होते. प्रताप कॅनडाहून या लग्नासाठीच आला होता. काही कामानिमित्त तो बाहेर गेला होता.

नेहा-पराग, रश्मी, नचिकेत, सुकन्या आणि सलील यांच्या गप्पा छान रंगात आल्या होत्या. हास्य-विनोदाला उधाण आलं होतं. नंदिनीचे सासू-सासरे त्यांच्या खोलीत आराम करत होते. नंदिनीही आपल्या खोलीत आवराआवर करत होती. मधूनच कीचनमध्ये डोकावून शारदाबाईंना जेवायला काय कसं करायचं याच्या सूचना देत होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

नचिकेतनं दार उघडलं तर बाहेर प्रताप दोन मोठ्या अवाढव्य बॅगा घेऊन उभा होता. दार उघडताच त्याने ढकलत त्या बॅगा आत आणल्या. नेहा, नचिकेत आणि रश्मीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचत तो म्हणाला, “तुम्हाला सगळ्यांना सरप्राइज द्यायचं होतं. म्हणून हे सामान शिपिंग कंपनीच्या गोडाऊनमध्येच ठेवलं होतं. आता मी कायमचा इकडे आलो आहे. “

त्याचं हे बोलणं ऐकून कोणाच्याही चेहर्‍यावर आनंद दिसला नाही, सगळ्यांची चलबिचल झालेली दिसली. नेहातर पटकन उठून आतल्या खोलीत निघून गेली. नचिकेत, रश्मी आणि सुकन्या- सलील गोंधळून एकमेकांकडे बघू लागले.

प्रताप आपल्या बॅगा आतमध्ये ठेवण्यासाठी वळाला. त्याला नेहा आणि नंदिनी आपल्या आई- वडिलांच्या खोलीत दिसल्या. बॅगा ठेवून तोही त्या खोलीत आला आणि म्हणाला, ‘आई, बाबा, मी आता भारतात परत आलो आहे, तिकडचं सगळं सोडून! आता इथेच एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी शोधण्याचा विचार आहे. ‘ 

यावर बाबांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आई एवढंच म्हणाली, ‘आता वेळ निघून गेली. ‘ आणि तिने नेहाला तिथून निघून जाण्याचा इशारा केला. ‘नंदिनी, तुझी सगळी तयारी झालीय का? नाहीतर तू ती पूर्ण कर. ‘ मग नंदिनीही तिथे थांबली नाही.

प्रताप काही क्षण आश्चर्यचकित होऊन बाहेर जाणाऱ्या नंदिनीकडे पहात राहिला. नंतर म्हणाला ‘तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आई? ‘ 

‘बस तिथे खुर्चीवर, सांगते. ‘

नेहा बाहेरच्या खोलीत आली. मुलांच्या गप्पांची जागा आता हलक्या आवाजातील कुजबुजीनं घेतली होती. नेहा एकदा आईच्या खोलीपर्यंत जाऊन आली. पण नंदिनीनं दार आतून बंद करून घेतलं होतं. आपल्या बेडवर उशीवर डोकं ठेवून ती पडली होती. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंसोबत आजवरच्या आयुष्याचा चलत चित्रपट तिच्या नजरेसमोरून सरकू लागला.

नागपूरस्थित बेंद्रेची नंदिनी एकुलती एक मुलगी. तिची बी. एस. सी. फायनलची परीक्षा झाली आणि प्रताप रानडेचं स्थळ सांगून आलं. बाबांच्या मित्रानेच सुचवलं. प्रतापनं सिव्हिल इंजिनिअरिंगची डीग्री घेतली होती आणि सहा महिन्यांपूर्वी त्याला एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी लागली होती हैदराबादला. त्याचे आई-वडील पुण्यात होते आणि मोठ्या बहीणीचा नवरा मरीन इंजिनिअर असल्याने देश – विदेशात भ्रमंती करत होता.

त्यांचं कुटुंब मात्र मुंबईत अंधेरीला होतं. तिची नोकरी, मुलांच्या शाळा आणि सासरच्या नातेवाईकांचा मोठा गोतावळा यातच ती व्यग्र असायची. सावळी पण आकर्षक नंदिनी, प्रताप आणि रानडे कुटुंबियांना पसंत पडली. दोन्ही बाजूंनी पसंती झाली आणि तीन महिन्यांनंतर एका शुभमुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला.

प्रतापसोबत नंदिनीही हैदराबादला रवाना झाली. दोघांचा संसार सुरू झाला. यथावकाश नचिकेत आणि त्यानंतर दोन वर्षांनी नेहाचा जन्म झाला. प्रतापला पुण्यातील दुसर्‍या एका कंपनीकडून नोकरीची ऑफर आली आणि मग मंडळी पुण्यात आई-बाबांसोबत राहायला आली. दोन्ही नातवंडांचा सहवास मिळाल्याने आजी-आजोबादेखील खुश होते. दोनच वर्षांनी प्रतापनं कोथरूडमध्ये पाच खोल्यांचा प्रशस्त ब्लाॅक घेतला आणि आई-बाबांसह त्याचं कुटुंब इकडे राहायला आलं. काळ पुढे सरकत होता.

पुण्यातील नोकरी सोडून प्रताप कॅनडाला नोकरीसाठी गेला, तेव्हा नचिकेत चौथीत आणि नेहा दुसरीत होती. सुरुवातीला कॅनडातील कंपनीसोबत दोनच वर्षांचा करार होता. दोन वर्षे पटकन जातील आणि प्रताप परत येईल असाच विचार घरच्यांनी केला आणि त्याच्या कॅनडाला जायला आनंदाने सहमती दर्शवली.

मुलांच्या शाळा, अभ्यास आणि संगोपनात दिवस कसा संपायचा ते नंदिनीला कळतही नसे. शनिवार- रविवारी प्रतापला सुट्टी असल्याने त्याचा व्हिडिओ काॅल किंवा फोन ठरलेलाच. एकंदरीत आनंदात दिवस चालले होते. दोन वर्षांचा काळ संपत आला. आता एक महिन्यानंतर प्रतापचा करार संपेल आणि तो परत येईल, या विचाराने नंदिनी उल्हसित झाली होती. प्रतापही वारंवार आपण परत यायला कसे उत्सुक आहोत, हेच ऐकवत होता. आणि एक दिवस त्याने कंपनीसोबत पुढच्या तीन वर्षांसाठी नवीन करार केल्याचं तिला सांगितलं. नंदिनी नाराज झाली, पण त्याच्या प्रगतीच्या आड कशाला यायचं, तोही आपल्या कुटुंबासाठीच पैसा मिळवतो आहे ना, अशी तिनं स्वतःची समजून घातली. नवीन करारानुसार प्राप्तीही भरपूर होणार होती. मधल्या काळात डिसेंबरमध्ये दहा दिवसांची विश्रांती होती. प्रताप त्यावेळी पुण्यात येऊन गेला. कुटुंबासमवेत कुलु-मनालीची ट्रीप एंजॉय करून गेला.

नंदिनीचे सासू-सासरे चांगले होते. मुलांना शाळेच्या बसपर्यंत सोडणं, परत घेऊन येणं ही जबाबदारी सासऱ्यांनी स्वतःहून स्वीकारली होती. सासुबाईंना थोडा अस्थम्याचा त्रास होता. पण तरीदेखील जमेल तेवढी त्या घरकामात मदत करत होत्या. पण नंदिनीला नवऱ्याचा आणि मुलांना वडिलांचा सहवास मात्र मिळत नव्हता. ही भूक फक्त प्रतापच्या फोन आणि व्हिडिओ काॅलवरच भागवावी लागत होती. कामाचा ताण वाढलाय त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही कामात बिझी असतो, म्हणून त्याचे दर आठवड्याला येणारे काॅलही आता नियमित येत नव्हते.

 मुलं आता मोठी होत होती. सकाळी शाळा, दुपारी आराम, मग पोहणं, कराटेचे क्लास यांत ती गुंतलेली असायची. नंदिनीला मोकळा वेळ खायला उठे. आपणही काही तरी छोटी-मोठी नोकरी करावी असा विचार तिच्या मनात आला. सासू-सासऱ्यांनाही तिची अवस्था कळत होती. तिचं मन रमेल म्हणून त्यांनी तिला नोकरी करायची परवानगी दिली.

पुण्यातल्याच एका हाॅस्पिटलची रिसेप्शनिस्ट पाहिजे अशी जाहिरात नंदिनीच्या पाहण्यात आली. प्रयत्न तर करून बघू म्हणून नंदिनी तिथे भेटायला गेली. डाॅ. जयंत साने या स्त्री-रोग तज्ज्ञांचं ते हाॅस्पिटल तसं जुनं होतं. त्यांची आधीची रिसेप्शनिस्ट घरगुती अडचणीमुळे एक महिन्यानंतर नोकरी सोडून जाणार होती.

नंदिनीचं सौम्य सोज्वळ व्यक्तिमत्त्व, गोड बोलणं, शैक्षणिक योग्यता यामुळे आलेल्या ५-६ जणींमधून तिची निवड सहज झाली. घरापासून हाॅस्पिटल जरा लांब असलं तरी स्कूटी घेऊन जाणं नंदिनीला जमण्यासारखं होतं. दहा ते एक आणि ५ ते ७. ३० ही कामाची वेळही सोयिस्कर होती. संध्याकाळी घरी येऊन मुलांना वेळ देणं, स्वैपाक करणं साधता येणार होतं. मधल्या वेळात घरी येऊन संध्याकाळची थोडी तयारी करून ठेवणं शक्य होतं. शिवाय सासू-सासऱ्यांचा आधार होताच घरी.

अशा रीतीने पुढच्या महिन्यापासून तिची नोकरी सुरू झाली. कामातील तिचा चटपटीतपणा आणि सर्व रेकाॅर्ड व्यवस्थित ठेवण्याची पद्धत यामुळे डॉ. साने तिच्यावर खूष होते. शिवाय आलेल्या पेशंटशी तिचं वागणंही आस्थेवाईक होतं, त्यामुळे तिथे येणाऱ्या स्त्रियाही तिच्यावर खूष असायच्या.

सध्या तरी प्रतापला या नोकरीबद्दल न सांगण्याचं तिनं ठरवलं होतं. समजा आपल्याला नाही जमलं तर सोडून देऊ, असाही विचार तिनं केला होता. प्रतापचे काॅलही हल्ली कमीच झाले होते आणि फोनवरदेखील तो घाईतच असायचा. मोघम चौकशी करून फोन ठेवून द्यायचा. पूर्वीसारखा मुलांशीही फारसं बोलत नसे हल्ली तो. घरापासून तो लांब एकटा आहे, कामाचाही ताण आहे, असा विचार करून नंदिनी त्याला समजून घ्यायची. या दोन वर्षांत तर तो भारतात आलाही नव्हता, कामाचा वाढलेला ताण हे कारण देऊन. पण नचिकेत आणि नेहाच्या वाढदिवसाला फोन करायला तो विसरला, ह्याचं मात्र नंदिनीला खूप वाईट वाटलं. तिनंच बाजारातून अमेरिकन चाॅकलेट आणि काही गिफ्ट विकत घेतलं आणि बाबांनी पाठवलं, म्हणून मुलांची समजूत घातली.

तिसरं वर्षही असंच संपत आलं. दिवसेंदिवस त्याचा संपर्क तुटतच चालला होता. जेव्हा त्याने आपण पुढच्या तीन वर्षांसाठी तिथल्याच दुसर्‍या कंपनीत नोकरी स्वीकारणार असल्याचं सांगितलं, तेव्हा मात्र नंदिनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण भारतात आता आपल्याला एवढ्या पगाराची नोकरी मिळणं शक्य नाही आणि आपल्या गुणवत्तेला इथे कशा संधी उपलब्ध होत आहेत, हे त्यानं आळवून तिच्या गळी उतरवलं. नंदिनीच्या मनाचं समाधान झालं नाही, पण ते मान्य करण्यावाचून तिच्याकडे उपाय तरी काय होता? मुलांनाही बाबांबद्दल काय सांगायचं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणं तिला अवघड जात होतं. प्रतापच्या आई-वडिलांनीही त्याचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो बधला नाही. त्या दोघांच्याही वाढत्या वयानुसार तब्येतीच्या काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या.

त्यानंतर बरेच दिवस त्याचा फोनही आला नाही. नंदिनीने प्रयत्न केला पण २-३ वेळा त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याच्या काळजीने ती रोज फोन करायला लागली.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कलम – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ कलम – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

आश्विन कार्तिक महिन्यात हलकीशी थंडी पडू लागते. पहाडांवर बर्फ पडू लागतो, त्याचा परिणाम सार्‍या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात होतो. या दिवसात मैदानी प्रदेशात हलकासा पाऊस होताच थंडी पडू लागते. याच दिवसात, दसरा, नवरात्र, धनत्रयोदशी, दिवाळी साजरी केली जाते. रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं. दुर्गादेवीची सुंदर मूर्ती मंडपात सजवलेली असते. नवीन भांडी, कंदील, दिवे आणि फटाके यांचा हा मौसम असतो.

… त्यावेळी मी सोळा वर्षाचा होतो आणि बाबा एकोणपन्नास वर्षाचे होते. ते आजारी होते, त्यांना दुसर्‍यांदा हार्ट अ‍ॅटॅक आला होता. काही दिवस हॉस्पिटलमधे राहून ते घरी परतले होते. थोड्याच दिवसात ते बाथरूममध्ये पाय घसरून पडले. कुल्ला दुखावला होता. डॉक्टर येऊन बघून गेले होते. औषधे वाढली होती. मी शेकायच्या रबरी पिशवीत गरम पाणी घालून त्यांच्या दुखर्‍या जागी शेकायचो, तेव्हा ते वेदनेने विव्हळत. जशा लाटा किनार्‍याशी येऊन कमजोर होतात, तसे बाबा अशक्त आणि कमजोर झाले होते. त्यांची मान आणि हात यावरच्या नसा फुगलेल्या स्पष्टपणे दिसत होत्या. त्यांचे हात थरथर कापायचे आणि अनेकदा त्यांना स्मृतिभ्रंश व्हायचा. त्यांना वाटायचं, आम्ही त्यांची मुले नसून, ते ज्या विश्वविद्यालयात शिकवत असत, तिथले विद्यार्थी आहोत.

आणि मी.. आपल्या जीवनात त्यांची जागा रिक्त रहाण्याच्या कल्पनेनेही घाबरतो. मला वाटतं, त्यांनी सदोदित माझ्या सोबत राहावं. त्यांचा मला आधार वाटायचा. आमच्यातील स्नेहबंध आम्हाला एक-दुसर्‍याकडे आकर्षित करायचे. स्नेहात चुंबकीय आकर्षण असतं. त्यांच्या नसण्याच्या कल्पनेनेही मला कापरं भरायचं. एका भयानक पोकळीचा दैत्य मला खायला उठायचा. वाहणार्‍या नदीत एक स्थिर असा द्वीप होते माझे बाबा आणि तो द्वीप म्हणजेच माझी दुनिया होती.

त्या दिवशी बाबांनी मला बोलावलं. त्यांच्या स्मृतीच्या कुलुपावर लागलेला गंज निघून गेला होता. त्यांच्या डोळ्यात ओळखीचा सूर्य झगमगत होता. बाहेर हलकासा पाऊस पडत होता आणि खिडकीतून पावसाचे थेंब आत येत होते. बाबा अगदी मंद आवाजात कवी ‘निराला’चे गीत गुणगुणत होते,

अरे वर्ष के हर्ष, बरस तू बरसबरस रसधार,

पार ले चल तू मुझको… ‘

… आम्ही दोघे खूप मागे मागे भूतकाळात गेलो. मी तेव्हा खूप लहान होतो. पाऊसकाळात ते मला कडेवर घेऊन मुक्त स्वरात हे गीत गायचे.

… नंतर त्यांनी ‘श्री रामचंद्र कृपालु भज मन.. हरण भव भय दारुणं ‘ ही रामस्तुती ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. ही त्यांची अतिशय आवडती प्रार्थना होती. मी त्यांच्या उशाशी बसून ती म्हणू लागलो. त्यांच्या चेहर्‍यावर एक असीम शांती पसरली.

अचानक काय झालं, कुणास ठाऊक? एक वेदनेची गाठ त्यांना शूळाप्रमाणे टोचली. त्यांच्या गळ्यातून एक वेगळाच असा कण्हण्याचा आवाज आला. तो एक असा हृदयद्रावक आवाज होता, की क्षणभर हवा स्तब्ध झाली. बाहेर वाहणाऱ्या नदीचं पाणी थांबलं. देवघरातला दिवा विझल्या विझल्यासारखा झाला. मी घाबरलो. स्फुंदत स्फुंदत रडू लागलो. ‘बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ नका. ’ असह्य वेदना होत असतानाही त्यातच ते हसून म्हणाले, ‘अरे वेड्या, मी कुठे जातोय? जा. समोरच्या भिंतीच्या कोनाड्यातून माझी लेखणी घेऊन ये. ’

लेखणी आपल्या हातात घेऊन ते तिच्याकडे प्रेमाने बघू लागले. मग त्यांनी ती लेखणी माझ्या हातात दिली आणी प्रेमाने माझे गाल कुरवाळत म्हणाले,

‘अरे वेड्या, रडतोस कशाला? जेव्हा मी नसेन, तेव्हाही मी तुझ्या लेखणीतून कथा-कविता बनून असेनच. जसे माझ्यात राहिलेले माझे वडील, आणि आपल्या मुलांच्यात तू रहाशील. तसाच मी गेल्यानंतरसुद्धा तुझ्यात राहीनच. ’ बोलता बोलता त्यांना दम लागला.

त्या रात्री मी सतत त्यांच्या छत्रछायेखाली राहिलो. त्यांचे पाय चेपत, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत राहिलो. ते गप्प बसले होते, पण त्यांचे डोळे जणू बोलत होते, ‘ बेटा, वेळच्या वेळी स्नान कर. वेळच्या वेळी जेवत जा. वेळच्या वेळी झोपत जा आणि खूप, निष्ठापूर्वक, दृढ होऊन अभ्यास कर. ’ 

रात्रीत थंडी वाढली. उंच पहाडांवर बहुधा हिमवृष्टी झाली. बाबांना पांघरूण घालून मी शेजारच्या खोलीत झोपायला गेलो. झोपेत मला अनेक भीतीदायक स्वप्ने पडली.

दुसर्‍या दिवशी पहाटेच घरातल्या लोकांच्या रडण्याचा आवाज आला. मी गडबडून उठलो. सगळे आक्रोश करत होते. बाबा रात्रीच गेले होते. जे हात मला आशीर्वाद देत होते, जे ओठ माझ्या माथ्याचं चुंबन घेत होते, ते थंड पडले होते. निष्प्राण झाले होते. बाबा गेले होते.

… पुढे त्यांनी दिलेल्या लेखणीने पुष्कळ कविता लिहिल्या. कथा लिहिल्या. ती काही केवळ लेखणी नव्हती. विद्यादान होतं. संस्कार होते. पूर्वापार चालत आलेला वारसा होता. संपत्ती होती. एका पित्याने दिलेले प्रोत्साहन होते. एका पित्याने दाखवलेला सन्मार्ग होता. मागच्या पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवलेली मशाल होती ती. लेखणी स्वत: आपल्या जागी काहीच नसते. ज्या हातांनी ती आपल्या बोटात दिलेली असते, ती त्या हातांची निशाणी असते. त्यात त्यांच्या आठवणी वसतात.

… आता जेव्हा माझा मुलगा मोठा होईल, तेव्हा ही लेखणी मी त्याच्याकडे सोपवीन.

मूळ हिन्दी कथा – ‘कलम 

मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धाडस – – भाग – २ ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

🌸 जीवनरंग 🌸

☆ धाडस – – भाग – २ ☆ श्री विश्वास दाते ☆

(स्वत:ची मन:शांति ढळू नये म्हणून, मी सर्व धैर्य एकवटून झालेल्या घटना, कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सुलेखाला सांगायचे ठरविले. विचारांचे मोहोळ चालू असताना गाडी चालवत घरी कसा पोहोचलो ते सांगणे अवघड आहे.) इथून पुढे – –

संध्याकाळचे जेवण होऊन आवरा आवर होईपर्यंत मी मनातल्या मनात काय आणि कसे बोलायचे याची पुन्हा पुन्हा उजळणी केली. अखेरीस सारे धाडस एकवटून, सुलेखाला जवळ बसायची विनंती केली.

माझा चेहरा पाहून ती म्हणाली, “ काय रे, तुझा चेहेरा एवढा गंभीर का? कसला तरी चिंतादायक विचार करत असल्यासारखा दिसतोस. ” आपल्या बायकोपासून आपण काहीही लपवून ठेवू शकत नाही याचा मला पुन्हा एकदा प्रत्यय आला.

खाली मान घालून मी म्हणालो, “सुलू, मी तुला आता जे सांगणार आहे ते प्रथम पूर्णपणे ऐकून घ्यावेस असे मला वाटते. त्यानंतर तू जे म्हणशील आणि करशील ते मला पूर्ण मान्य असेल. ”

सुलेखा “रवी, आता माझी उत्कंठा फार ताणू नकोस. सांग काय जे झाले असेल ते. आणि अपराध्यासारखा खाली बघून बोलू नकोस. माझ्याकडे बघ. ”

पुन्हा एकदा धीर एकवटून मी बोलायचा प्रयत्न केला पण शब्द घशात अडकले. वर बघायचे धाडस काही झाले नाही पण पाण्याचे दोन घोट घेऊन, मी म्हणालो, “सुलू, माझ्या हातून एक घोर अपराध घडला आहे. तुला तो कसा सांगू आणि क्षमा तरी कशी मागू हे मला सुचत नाही आहे. ”

“रवी, मी तुला पूर्ण ओळखते. तुझ्या हातून काही भयंकर होईल असे मला तरी वाटत नाही. खुशाल स्पष्टपणे काय ते सांग.”

मला थोडा धीर आला. “सुलू, माझ्या कंपनीत कामाच्या जागी अंजली नावाची एक तरुण मॅनेजर आहे. मला काय झाले होते हे मला आता कळत नाही आहे पण तिच्या तरुण व्यक्तिमत्वामुळे आणि कामाच्या धडाक्यामुळे मी तिच्याकडे आकर्षित होत गेलो. काही वेळा तिच्याबरोबर संध्याकाळी विरंगुळा म्हणून हॉटेलामध्येसुद्धा गेलो. पण तिला जास्त जवळकीने स्पर्श करण्याचे धाडस कधीही झाले नाही. फार तर कधी हातात हात घेतला असेल तेवढेच. माझ्या मनावर तिचे काय गारूड झाले होते ते कळत नाही आहे पण मी तिला तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त करणाऱ्या एक दोन चिठ्ठ्या पण पाठविल्या.”

सुलेखा स्तंभित होऊन ऐकत होती. ती काही बोलायच्या आधी, मे म्हणालो, “सुलू, आता मी सुरू केले आहे ते मला संपूर्णपणे सांगू दे. मग तू जे काय बोलशील अथवा करशील ते सहन करण्यास मी पूर्णपणे तयार आहे.”

सुलेखाने मानेनेच संमती दिल्यावर, मी झालेल्या सर्व घटना इत्थंभूत विदित केल्या. तसेच मी आता कोणत्या कठीण परिस्थितीत अडकलो आहे याची पण कल्पना दिली. तसेच माझ्यावर आणि आमच्यावर काय गंभीर परिणाम होऊ शकतील हे पण मी तिला समजावून सांगीतले.

“सुलू, मला तर आता काही सुचत नाही आहे. मी तुझा पूर्ण अपराधी आहे. अंजली तिच्या स्वार्थासाठी मला झुलवत होती हे स्पष्ट आहे. मी जर अंजलीच्या धमक्यांना शरण गेलो तर जन्मभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तुझ्या पण डोळ्यात बघू शकणार नाही. शांतपणे झोपूही शकणार नाही.” 

सुरुवातीला साहजिकच सुलेखा माझ्यावर चांगलीच भडकली. अखेरीस तटकन उठून झोपायच्या खोलीकडे जात म्हणाली, “रवी, खरोखरच तू माझा अपराधी आहेस. आत्ता तर मला तुझे तोंड पण बघावेसे वाटत नाही.”

त्यानंतर मी हॉलमधील कोचावर अख्खी रात्र तळमळत काढली कारण झोपायच्या खोलीत जायचे धाडस झाले नाही. घरी आणि कंपनीत यापुढे मला फक्त अंधार दिसत होता.

सकाळी, बऱ्याच वेळाने सुलेखाचा अबोला संपला आणि म्हणाली, “रवी, मलाही रात्रभर झोप नाही लागली. मन सैरभैर झाले होते. पण शेवटी लक्षात आले की मी तुझा स्वभाव पूर्ण ओळखते. तुझ्या हातून जे घडले आहे ते तुझ्यासारख्या सध्याच्या वयात आणि तुझ्या कामाच्या परिस्थितीत अनेक पुरुषांच्या बाबतीत घडत असावे. मोहजाल म्हणतात ते हेच असावे. तू माझ्यापासून काहीही लपविले नाहीस याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे. तुझा माझ्यावरील विश्वास पण स्पष्ट झाला. तुझ्या द्विधा मन:स्थितीची मला पूर्ण कल्पना आली. आता आपण दोघे मिळून जे होईल त्याला तोंड देऊ. काय वाटेल ते होऊ दे, पण अंजलीच्या धमक्यांना यापुढे भीक घालू नकोस. ” 

एकमेकावरील प्रेमाचा आणि विश्वासाचा विजय झाला होता. प्रथमच माझ्या मनावरील दडपण बऱ्याच प्रमाणात उतरले.

त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून अंजलीशी काय बोलायचे हे ठरविले आणि सोमवारी स्थिर मनाने परत कामावर निघालो.

मी अंजलीला माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतले. तिच्या चेहेऱ्यावर विजयी भाव असल्याचे जाणवले. तिला बसायला सांगून मी ठामपणे बोललो, “हे बघ अंजली मी तुझी मागणी कदापि मान्य करू शकत नाही. झालेल्या घटनांबद्दल मी माझ्या बायकोला सर्व माहिती दिली आहे. आणि माझ्या बायकोचा माझ्यावर संपूर्ण विश्वास असल्याने ती मला विनाअट संपूर्ण सहकार्य करणार आहे. ”

अंजली काही काळ दिङ् मूढ होऊन माझ्याकडे बघत राहिली. तिला माझ्या या उत्तराची जराही अपेक्षा नसावी. मग जरा सावरून तिच्या नवीन अवतारात छद्मीपणे म्हणाली, “मला बायकोबद्दल काय सांगताय, तिला तुम्ही पटवले असेल. पण, कंपनीच्या व्यवस्थापनाचे काय? मी आता त्यांच्याकडे तुमच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करायला जाते. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही मला पाठवलेल्या चिठ्ठ्या आणि इमेल्स माझ्याकडे आहेत. मला बढती पाहिजे म्हणजे पाहिजे. मी पुढचे पाऊल उचलण्याआधी, तुम्ही तुमच्या निर्णयाचा फेरविचार करा. ”

अंजली माझ्या उत्तराची वाट बघत, नजरेला नजर देत, उद्दामपणे उभी राहिली.

या अशा धमकीच्या शक्यतेची कल्पना मला आधीच होती आणि त्याप्रमाणे त्याची प्रतिक्रिया पण माझ्याकडे तयार होती. त्या शांततेचा फायदा घेऊन, मी समजावणीच्या स्वरात पुढे म्हणालो, “अंजली, बैस खाली. आणि मी तुला आता जे सांगत आहे ते शांतपणे ऐकून घे. ”

कुतूहल पोटी का होईना, अंजली परत खाली बसली.

मी, “अंजली, तुझ्या तरुण मनाला माझ्या हातून प्रोत्साहन दिले गेले ही माझी घोडचूक होती. झालेल्या घटनांचा मला पूर्ण पश्चाताप होत आहे. तू पुढे काय करणार या बाबतीत मी तुला थांबवू शकत नाही पण सल्ला नक्कीच देऊ इच्छितो. माझ्या मते, माझी इतक्या वर्षांनी निर्माण झालेली कंपनीतील प्रतिमा बऱ्यापैकी उजळ आहे. तुझ्याबद्दल तुझे सहकारी तुझ्यामागे काय बोलतात याची कदाचित तुलाही कल्पना असेल. तुझ्यावर भविष्यात कोणताही दुष्परिणाम व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. एक अनुभवी सहकारी म्हणून मी तुला सांगतो की तुझ्या हातून मला जरी काही त्रास झाला तरी तुझी सध्याची वागणूक तुझ्याच पुढील आयुष्यात तुझ्यासाठी योग्य ठरणार नाही. ”

अंजली तिच्या धमकीवरील ह्या अनपेक्षित प्रतिक्रियेने, नि:शब्द झाली.

“मी तुला स्पष्ट सांगतो की हा विषय येथेच संपवण्याची माझी तयारी असून आपण पूर्वीप्रमाणे फक्त चांगले सहकारी म्हणून काम करू या. आणि हेही स्पष्ट करतो की त्यातूनही तू तुझी धमकी पुढे नेलीस तर मी येणार्‍या परिस्थितीस तोंड देण्यास पूर्णपणे तयार आहे. एक नक्की की सध्या तरी मी तुला हे प्रमोशन देऊ शकत नाही. या उलट कंपनीतील आणि बाहेरही तुझी प्रतिमा कायमची खराब व्हायची शक्यता आहे. माझा हा निर्णय माझ्या स्वत्व आणि मनःशांतीसाठी महत्वाचा आहे. कदाचित काही वर्षांनी तुला माझा हा निर्णय कसा योग्य आहे हे पटेलही. आत्ता तरी तुला सद्‍बुद्धी सुचेल अशी अपेक्षा आहे. आत्ता तू जाऊ शकतेस. ”

एखादी गोष्ट किती ताणायची याची समज हुशार अंजलीला असावी कारण दोघांच्याही सुदैवाने अंजलीने आपले पाऊल मागे घेतले. हे पेल्यातील वादळ तेव्हाच शमले आणि काही महिन्यांनी अंजली राजीनामा देऊन कुठे तरी दुसरीकडे नोकरीसाठी गेली. त्यानंतर आपले उत्तम काम तसेच चालू ठेवून, अतिशय समाधानी आणि यशस्वी आयुष्य व्यतीत करत, मी योग्य वेळी निवृत्त झालो.

– समाप्त – 

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धाडस – – भाग – १ ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

🌸 जीवनरंग 🌸

☆ धाडस – – भाग – १ ☆ श्री विश्वास दाते ☆

शुक्रवारी संध्याकाळची साडेसातची वेळ असावी. सगळे सहकारी केव्हाच घरी गेले होते. मी मात्र ऑफिस मधेच बसून होतो. बाहेर आमचा शिपाई मनोहर मी निघण्याची वाट पहात होता. संध्याकाळ जास्तच काळोखी वाटत होती. ऑफिसमधील एसी जराही जाणवत नव्हता. पुढे काय होणार ह्या विचारांचे मोहळ माझ्या मनात उठले होते. छाती भरून आल्याने श्वास जड झाला होता. मी गळ्याभोवती असलेली टायची गाठ सैल केली पण जराही आराम वाटला नाही. एका मोठ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक संकटाच्या कड्यावर मी उभा होतो.

एका मोठ्या कंपनीच्या मार्केटिंग विभागाचा मी प्रमुख होतो आणि कित्येक मॅनेजर्सची टीम माझ्याबरोबर काम करत होती. ह्या असिस्टन्ट [कनिष्ठ] मॅनेजर्सच्या बरोबर मदतीसाठी अनेक तरूण शिकाऊ मॅनेजर्स पण होते.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी अंजली ह्या कंपनीत शिकाऊ मॅनेजर म्हणून लागली. ती स्वभावाने आक्रमक आणि महत्वाकांक्षी तर होतीच, आणि एका उत्तम संस्थेतून MBA पण झालेली होती. तसेच ती मनमोकळी आणि वागायला मोकळीढाकळी होती. तिच्या ह्या स्वभावामुळे आणि तसेच तिच्यामधील काम तडीस लावण्याच्या क्षमतेमुळे आणि बऱ्यापैकी असलेल्या नैसर्गिक तरुण सौंदर्यामुळे, सुरुवाती पासूनच नकळत माझे लक्ष तिने आकर्षून घेतले होते.

काही काळानंतर तर अधूनमधून, तिच्या थेट अधिकार्‍याला बाजूला ठेवून, मी तिच्याशी थेट संपर्क कधी करू लागलो हे माझे मलाच कळले नाही. आपण काहीतरी चुकीचे करत आहोत ही भावना माझ्या प्रशिक्षित मनाला कुरतडू लागली होती. असे असूनही स्वत:च्या तारुण्याच्या प्रभावाखाली माझ्याकडून तिला पाठवलेल्या कौतुकाच्या चिठ्ठ्या हळूहळू जरा जवळि‍केच्या होत गेल्या होत्या.

माझ्या मनावर अविचाराने केंव्हा कब्जा केला हे माझे मलाच समजले नाही. एका संध्याकाळी मी जरा धाडस करून अंजलीला विचारले, “आज जरा निवांतपणे बाहेर जेवायला जायचे का? ”

जरा लाडिक आढेवेढे घेऊन अंजली म्हणाली, “सर, तुमची एवढी इच्छा आहे तर जाऊया. पण फार उशीर करायला नको हं. ”

माझ्या मनाला झालेल्या गुदगुल्या मलाच ठाऊक. आणि मग, काम संपल्यावर एकत्र बाहेर जेवण घेणेही खूप वेळा होऊ लागले. मधून मधून पुसटसा स्पर्श करणे सुरू झाले व बाहेर गेल्यावर माझी प्रगती हातात हात घेण्यापर्यंत कधी झाली हे मलाच समजले नाही. फारसा विरोध न करता, अंजली पण लटका राग दाखवत असे. काही दिवसांनी, अंजली जरी ऑफिसमध्ये मला ‘सर’ असे संबोधित असे, तरी बाहेर भेटल्यावर सुरुवातीला ‘रवी सर’ आणि नंतर फक्त ‘रवी’ असे संबोधू लागली होती. तरुण अंजलीकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे माझ्या मध्यमवयीन मनातला पुरुष कुठे तरी आतल्या आत सुखावत होता.

माझ्याकडून मिळणाऱ्या ह्या अनुकूल वागणुकीमुळे, अंजलीने त्याचा फायदा घेऊन दुसर्‍याने केलेल्या कामाचे क्रेडिट घेणे आणि स्वत:च्या चुका सहकाऱ्यांवर ढकलणे सुरू केले. माझ्याकडूनही संशयाचा फायदा नेहमीच अंजलीला दिला जात होता. कधी काळी तिच्या चुकांवर मी थोडा रागावलो तरी तो वरवरचा राग आहे हे समजण्या इतकी अंजली नक्कीच चाणाक्ष होती.

कंपनीमध्ये हळूहळू अफवांचे पीक सुरू झाले. मांजरीला डोळे मिटून दूध पितांना कोणी बघत नाही असे जरी वाटत असते तरी खरे नसते. माझ्या आणि अंजलीच्या समोर खुलेपणाने जरी कोणी बोलत नसले तरी दबकून चर्चा आणि अर्थपूर्ण कटाक्ष टाकले जाऊ लागले. माझ्या डोक्यात शिरलेल्या अनामिक भूतामुळे मी आणि चाणाक्ष अंजली दोघेही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिलो.

लवकरच कंपनीमध्ये, एका राजीनाम्यामुळे एक ब्रँड मॅनेजरची जागा रिकामी झाली. माझ्या मनात सुयश देशमुख या एका अतिशय कर्तुत्ववान कनिष्ठ मॅनेजरला त्या जागेवर नेमायचे होते कारण त्याला त्या कामाचा थोडा अनुभव होता तसेच त्याला खरोखरच बढती मिळणे आवश्यक होते. परंतु अतिमहत्वाकांक्षी अंजलीने त्या जागेवर तिला बढती मिळावी असा हट्ट माझ्याकडे सुरू केला.

लाडीकपणे अंजली, “रवी सर, मला वाटते की या ब्रँड मॅनेजरच्या जॉबसाठी मी अगदी योग्य आहे. तुम्ही माझी या जॉबसाठी निवड कराल अशी मला खात्री वाटते. कराल ना प्लीज. ”

“अंजली, या जॉबसाठी खूप जास्त अनुभव लागतो. तू आत्ताच तर आपल्या कंपनीत काम सुरू केले आहेस. अजून अनुभव गोळा कर. तू हुशार आहेस. कर्तुत्ववान आहेस. योग्य वेळी तुलाही बढतीची संधी मिळेल. सब्रका फल मीठा होता है. ”

अंजलीची मागणी लाडीक हावभावात चालूच राहीली. सुरुवातीला मी हा विषय टाळायचा प्रयत्न केला, कारण संपूर्ण विभागातील लोकांचे लक्ष माझ्या निर्णयाकडे लागले होते.

“सर, मी किती दिवस वाट पहायची? ही बढती मलाच द्या. ”

“अग वेडे, तुझा अनुभव अजून कमी आहे. शिवाय सुजय देशमुख खूप जास्त अनुभवी आहे आणि ह्या मोकळ्या झालेल्या जागेवरील लागणार्‍या कामाचा पण जाणकार आहे. मला वाटते की तू थोडा धीर धरून चांगले काम करत रहावे. तुला पण योग्य वेळी बढती मिळेल. तुलाही माहित असेल की ‘योग्य कामासाठी योग्य माणसाची निवड करणे’ ही माझी जबाबदारी आहे. ” 

आज तर फारच शर्थ झाली. अत्यंत खुनशी चेहेऱ्याने अंजलीने तिचे खायचे दात दाखवत, तिची मागणी पुनः लावून धरली.

“ सर, आता फार झाले. मी तुम्हाला स्पष्ट सांगते की बढती मला दिली नाही तर मी तुमच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करायला पुढे मागे पाहणार नाही. तुम्हाला सांगून ठेवते की तुम्ही मला पाठवलेल्या चिठ्ठ्या आणि इमेल्स माझ्याकडे मी जपून ठेवली आहेत. नाइलाजाने मला ही माहिती तुमच्या बायकोकडे पाठवावी लागेल. आता तुम्हीच काय ते ठरवा. ” 

माझ्या उत्तराची वाट न बघता, माझ्याकडे तुच्छ नजरेने बघत अंजली माझ्या केबिनमधून ताडताड बाहेर पडली. अंजलीचे हे रूप मला पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित होते. तिच्या धमकीचा पुनः विचार केल्यावर मला तर आभाळ कोसळल्या सारखेच झाले. एका बाजूला कंपनी मधील चौकशी आणि त्यातून होणार्‍या बदनामीची भीती आणि दुसर्‍या बाजूला सुखाने चाललेले वैवाहिक जीवन संपूर्ण उध्वस्त होण्याची शक्यता.

विचार करून करून मन उद्विग्न झाले आणि डोके भणभणू लागले. मात्र मी जेवढा जास्त विचार करत गेलो तेवढे माझ्या लक्षात आले की जर मूल्यांशी तडजोड करून ह्या दडपणाला बळी पडलो तर यापुढे सहकाऱ्यांच्या डोळ्याला डोळा देऊन पाहू शकणार नाही आणि मनाची टोच मला जन्म भर खात राहील. शांत चित्ताने झोपूही शकणार नाही.

मला ह्याची पण पूर्ण कल्पना होती की एकदा चटक लागली की ब्लॅकमेल करणारी व्यक्ती कधीही थांबत नाही, त्या व्यक्तीच्या मागण्या वाढतच जातात. आपणच केलेल्या घोडचुकीवर नुसता पश्चात्ताप करून काही उपयोग होणार नव्हता.

कंपनीकडून दयेची अपेक्षा करणे चूक ठरले असते कारण कुठल्याही कंपनीमध्ये मत्सरी व्यक्ती असतातच. लैंगिक अत्याचार सिद्ध झाला तर त्याबाबतची कंपनीची धोरणे अगदी स्पष्ट होती. नोकरी संपल्यावर मिळणारे कुठलेही फायदे न मिळता नोकरीतून बडतर्फ व्हावे लागले असते. याशिवाय सामाजिक नाचक्की झाली असती ते वेगळीच.

ह्याशिवाय माझे वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखाचे होते. माझी पत्नी सुलेखावर माझे नितांत प्रेम होते आणि विश्वास पण होता. अखेरीस एक ठाम निर्णय घेऊन मी घरी जायला निघालो. स्वत:ची मन:शांति ढळू नये म्हणून, मी सर्व धैर्य एकवटून झालेल्या घटना, कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सुलेखाला सांगायचे ठरविले. विचारांचे मोहोळ चालू असताना गाडी चालवत घरी कसा पोहोचलो ते सांगणे अवघड आहे.

– क्रमशः भाग पहिला 

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हतबल… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

हतबल… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

चपला काढून जवळजवळ पळतच रेखा स्वयंपाकघरात आली. ‘‘काकू – काकू ऐका ना ’’… मी वळून पाहिलं आणि पहातच राहिले. नवी कोरी झुळझुळीत साडी नेसलेली, व्यवस्थित वेणी घातलेली आणि गोड हसत उभी असलेली रेखा आज खूप आनंदात दिसत होती.

‘‘कशी आहे माझी साडी? ’’…

‘‘मस्तच. अगदी खुलते आहे तुझ्यावर’’… मी मनापासून म्हणाले.

– पण तिच्यापेक्षा तिच्या चेहेऱ्यावरचा आनंदच जास्त सुंदर वाटत होता मला…

‘‘मिश्टरांनी आणलीये माझ्यासाठी. आणि ना आणून रात्री गुपचूप कपाटात ठेवली होती’’….

तिला इतकी खुशीत असलेली मी आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. मी पूजेसाठी ठेवलेला गजरा नकळत तिला दिला. घाईघाईने तो केसात माळून, आरशासमोर उभी राहून, ती वेगवेगळ्या कोनातून स्वतःकडे हसत पहात होती. नंतर काम करतानाही गुणगुणत होती, स्वतःशीच हसत होती.

रेखा… जेमतेम २०-२१ वर्षांची असेल. सुंदर नसली तरी नीटस होती. स्वच्छ आणि नीटनेटकी राहायची. चेहरा शांत. पण डोळे मात्र बोलके होते. दोन वर्षांपूर्वी पासून आमच्याकडे घरकामाला येते आहे. सुरुवातीला सतत बावरलेली, घाबरलेली वाटायची, हळूहळू रुळली. नवरा वयाने बराच मोठा असावा. आईच्या हट्टामुळे हिच्याशी नाईलाजाने लग्न केल्याचं सारखं तिला ऐकवायचा म्हणे. पण हिच्या बोलण्यात कधीच कुठली तक्रार जाणवायची नाही. फारसं न बोलता, शांतपणे काम करायची. हळूहळू मला ती आवडायला लागली होती. पण ही आजची रेखा, याआधी मला कधीच दिसली नव्हती. आज तिच्या अंगोपांगी फुललेला तो निर्मळ आनंद पहाताना मलाच खूप छान वाटत होतं… आज नेहमीपेक्षा पटापट काम संपवून ती निघूनही गेली…

— — आणि आज आता मी सकाळपासूनच तिची वाट पहात होते. दोनच माणसांच्या आमच्या घरात, तिच्यामुळे काल दिवसभर एक वेगळाच आनंद दरवळला होता… नकळत आज मी पुन्हा त्याच आनंदाची वाट पहात होते… ‘अजून का नाही आली ही? ’…. मी अस्वस्थ व्हायला लागले होते….

इतक्यात बेल वाजली. मी घाईघाईने दार उघडलं… माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. रेखाच आली होती… पण ही अशी? … लालबुंद डोळे…विस्कटलेला, सुजलेला चेहरा… अंगावर ठळक दिसणाऱ्या मारल्याच्या खुणा… खूप खूप केविलवाणी दिसत होती. आत आली, आणि ‘आई’… म्हणत एकदम गळ्यात पडून रडायलाच लागली. ‘आई’? … माझ्या मनात प्रचंड कालवाकालव होत होती. त्या क्षणी तिला आईच्या मायेची किती तीव्र गरज होती हे मला जाणवत होतं. मी कसंतरी तिला खुर्चीत बसवलं. पाणी दिलं. आणि नुसतीच तिच्या डोक्यावर, पाठीवर मायेने हात फिरवत राहिले.

जरा वेळाने तिचं रडणं थांबलं, आणि तिने आदल्या रात्री घडलेला सगळा प्रकार मला सांगितला… काल तिने कौतुकाने, हौसेने दिवसभर मिरवलेली ती साडी नवऱ्याने तिच्यासाठी आणलेलीच नव्हती, तर त्याच्या ‘मानलेल्या’ बायकोसाठी आणली होती म्हणे. अशा बाईला ‘मानलेली बायको‘ नाही, तर ‘ठेवलेली बाई‘ म्हणतात हेही त्या बिचारीला माहिती नव्हते.. तर त्याचा अर्थ कुठला माहिती असणार?

… आणि ती साडी हिने नेसलेली पहाताच नवरा प्रचंड भडकला होता. कसलाही विचार न करता त्याने तिला गुरासारखे मारले होते. शिव्यांचा भडीमार करत तुडवले होते. आणि तिच्या अंगावरची साडी फराफरा ओढून, फाडून टाकून घरातून निघून गेला होता. ही पार कोलमडून गेली होती. उपाशीपोटी रात्रभर रडत बसली होती. सकाळी नाईलाजाने उठून लटपटतच घरातली कामं तर उरकली होती. पण तिला घरात थांबावं असं वाटत नव्हतं.

… नवऱ्याची खूप भीती वाटत होती. त्याला आवरू शकेल आणि हिला सावरू शकेल असं हिच्या आयुष्यात कुणीच नव्हतं… म्हणून मग कामाला आली होती… माझ्यात तिच्या आईला शोधत होती…

जन्म देऊन तिची जन्मदात्री आई लगेचच देवाघरी गेली होती. आणि बापाने लगेचच दुसरं लग्न केलं होतं.. मनात हिच्याबद्दल प्रेम- जिव्हाळा फुलण्याआधीच. तेव्हापासून त्या सावत्र आईचा जाच आणि दुस्वास सहन करतच मोठी झालेली ती… तिची ब्याद टाळण्यासाठी त्या बाईने १५-१६ व्या वर्षीच तिशीतल्या एका बिजवराशी हिचं लग्न लावून टाकलं होतं – – तो माणूस ‘हुंडा’ नको म्हणाला एवढ्याच एका कारणाने.. इतर कुठलीच चौकशी न करता… हिच्या पसंती-नापसंतीचा कणभरही विचार न करता. आणि आता इतर कुठलाच आधार नसलेली ती.. त्याला सोडून जावं असं कितीही तीव्रपणे वाटलं तरी कुठे जाणार होती?? लग्न झाल्यापासून तिच्या वडलांनी तर तिच्याशी जणू संबंधच तोडून टाकले होते.. फार फार हतबल होऊन गेली होती ती…

… आणि मी? … मला तिच्यापेक्षा जास्त हतबल झाल्यासारखं वाटत होतं… मला खूप खूप मनापासून वाटत होतं की तिला म्हणावं – “ बाई या असल्या नवऱ्याला दे सोडून आणि आमच्याकडेच रहा कायमची “ म्हणून – – 

— पण त्या “ कायम “ शब्दाला आता काही अर्थ तरी उरला होता का? .. सहस्त्रचंद्र बघूनही २ वर्षं उलटून गेलेले माझे मिस्टर.. आणि त्यांच्या मागोमाग त्याच वाटेने चाललेली मी.. आम्ही किती दिवस पुरणार होतो तिला… तिचे ‘आई-बाप’ म्हणून? म्हणजे थोडे दिवस ‘आगीतून फुफाट्यात’ एवढाच काय तो फरक पडला असता.. आणि आमच्यानंतर पुनः तिची तीच फरपट.. हेच चित्र स्पष्ट दिसत होतं मला..

जनरीतीनुसार आज ना उद्या ती नाईलाजाने वास्तव स्वीकारेलही. पण मी? मला तिच्याबद्दल अगदी अंतःकरणापासून कितीही कणव.. कितीही काळजी वाटत असली तरी मी प्रत्यक्षात किती दिवस आणि काय करू शकणार होते तिच्यासाठी? शहाजोगपणाने मला ‘आई’ म्हणण्याची परवानगी तेवढी देणार होते का? … प्रत्यक्षात जन्मदात्या आईसारखी मनापासून तिची आई होणं जमणार तरी होतं का मला – झेपणार होतं का मला खरंच?

… आता मलाच खूप अगतिक झाल्यासारखं वाटतं होतं… कदाचित रेखापेक्षाही जास्तच.. फार फार हतबल झाल्यासारखं वाटतं होतं मला… खऱ्या अर्थाने पूर्णपणे हतबल होते मी – – –

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “परी…” –  भाग – २ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “परी…” –  भाग – २ ☆ श्री मंगेश मधुकर

(खूप दिवसांनी मायेचा निखळ स्पर्श अनुभवल्यावर भावुक झालेल्या परीनं आलेला हुंदका कसाबसा आवरला. पैसा, प्रतिष्ठा असूनही नियती रूसलेली म्हणूनच वाट्याला आनंदापेक्षा दु:खच जास्त. सगळं काही असूनही रिकामाचं. त्यात नलूबरोबर फुलणारं नातं ही अचानक तुटलं.)

इथून पुढे – – 

परी आणि नलूची पहिली भेट डोळ्यासमोर आली. चाळीतल्या गॅलरीतून गप्पा मारत जाताना परीचा पाय चुकून दारातल्या रांगोळीवर पडला.

“ए, डोळे फुटले का? जरा बघ की.. ”किंचाळत उभी राहिलेली नलू देखण्या परीकडं एकटक पाहतच राहिली.

“आय एम सो सॉरी!! सॉरी”परी.

“नले, जरा दमानं, मुद्दाम केलं नाही. रांगोळीच आहे ना परत काढ. ”मी नलूवर डाफरलो पण फटकळ नलूकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. ती अजूनही भान हरपून परीकडचं पाहत होती. लव्ह ऍट फस्ट साईट.

‘आय एम रियली सॉरी! ”परीचा माफीनामा सुरूच.

“नऱ्या, हे चिकणं चॉकलेट कोण रे!! ”नलूनं विचारलं.

“मित्रयं!! नीट बोल. ”माझ्याकडं पाहत नलूनं नाक मुरडलं आणि परीकडं पाहत लाजली तेव्हा परी हसला. नलूचं लाजणं अन परीचं हसणं हे फार दुर्मिळ अन धक्कादायक होतं. परी मुद्दाम मुलींपासून लांब रहायचा आणि नलू म्हणजे आमच्या चाळीची हिरोईन. दिसायला अतिशय देखणी, रूपवान वगैरे अजिबात नव्हती पण नजरेत भरण्यासाखी होती. गोरी. सुडौल बांधा, बोलके डोळे, सतत चालणारा तोंडाचा पट्टा, वेणीला डाव्या खांद्यांवरून पुढे घेत बोलणाऱ्या नलूनं अनेकांना घायाळ केलेलं पण लगट करायची कोणाची हिम्मत झाली नाही कारण तिचा भांडखोर, आक्रमक स्वभाव, आरडाओरडा, अंगावर धावून जाणं, शिव्या हे रोजचं. याच स्वभावामुळं तिच्याविषयी बऱ्या-वाईट बातम्या पसरलेल्या. एकदोघांबरोबर नावही जोडलं गेलेलं. एकूणच नलू म्हणजे गॉन केस. असं आख्ख्या चाळीचं मत. आमच्याच मजल्यावर दोन घरं सोडून रहायची पण एकदाही धड बोललो नव्हतो. माझं तिच्याशी एक मिनिट पटायचं नाही. (संडे डिश™©)

— 

हळूहळू परीचं आमच्या घरी येणं सवयीचं झालं. सगळी चाळ त्याला ओळखायला लागली. मी घरी नसताना सुद्धा तो येऊ लागला. नेमकं त्याच वेळी नलू आमच्या घरात थांबायला लागली. गप्पांसोबत नजरेचे खेळ सुरू झाले. त्यांच्यातलं विशेष नातं आईच्या लक्षात आलं. तिनं लगेचच मला सांगितलं. काळजीपोटी नलूविषयी सावध केलं परंतु वेगळ्याच विश्वात रमलेल्या परीनं दुर्लक्ष केलं. त्याला नलू मनापासून आवडलेली. पुन्हा परीला समजावयाचा प्रयत्न केला. नलूलासुद्धा परीचा नाद सोडण्याविषयी सांगितलं अन अपेक्षेप्रमाणे अपमान करून घेतला. सगळ्या चाळीला परीविषयी सहानुभूती आणि नलूविषयी तिरस्कार वाटत होता. नलू-परीची जोडी 100% विजोड आहे. स्वभाव विरुद्ध टोकाचे आहेत. आकर्षणाचा भर ओसरल्यावर नातं टिकणार नाही हे स्पष्ट होतं. त्याचा जास्त त्रास परीलाच होणार होता. म्हणूनच ठरवून मी नलूच्या घरच्यांना परीविषयी चुकीची माहिती दिली. त्याच्या बेफाम वागण्याच्या, व्यसनाच्या खोट्या गोष्टी सांगितल्या. परिणाम नलूची रवानगी गावाला मामाकडे झाली आणि काही दिवसातच लग्नही ठरलं. घरच्या दबावापुढे नलूनं माघार घेतली. परीला जबरदस्त धक्का बसला. प्रयत्न करूनही नलूची भेट झाली नाही. पार उद्ध्वस्त झाला. हताश, निराश परी एकदम नाहीसा झाला. काही दिवसांनी कायमस्वरूपी परदेशी गेल्याच समजल्यावर शोध थांबवला आणि घरातून पळून जाऊन नलूनं ठरलेलं लग्न मोडलं. त्यानंतर काही दिवसांनी भेटलेली नलू एकदम निराळी होती. निस्तेज, कोरा चेहरा, अबोल. तिनं मला जाब विचारला आणि माझी बाजू ऐकल्यावर छद्मीपणे हसली “नऱ्या, माठ आहेस. मित्राचं मन ओळखू शकला नाहीस. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. लग्न करणार होतॊ. तुझी समज कमी पडली. नको ते उद्योग करण्यापूर्वी एकदा बोलायला हवं होतं. असो.. जे झालं ते बदलू शकत नाही. फार मोठी चूक केलीस. तुझ्या कृपेनं मिळालेली शिक्षा आयुष्यभर भोगणार. आता परत कधीच भेटू नकोस. ”नलू निघून गेली. परीसाठी जे केलं ते चूक की बरोबर हे आजतागायत कळलेलं नाही परंतु मी दोघांना गमावलं. खूप अपराधी वाटतंय. (संडे डिश™©) 

— 

“परी, आता इथेच रहा. हॉटेलमध्ये नको” मी 

“नॉट पॉसिबल, परवा परत चाललोय. तुम्हांला भेटून छान वाटलं”परी.

“दोन दिवस थांब.. प्लीज”

“नको. आता इथं माझं काही नाही”आग्रह करून मी परीला हॉटेलवर सोडायला गेलो. जाताना जुना विषय काढला पण परी काहीच बोलला नाही.

“परी, सॉरी यार!! फार मोठी चूक केली जमलं तर माफ कर. माझ्यामुळे… ”मी हात जोडले. परी कसंनुसं हसला. त्या हसण्यात वेदना होती. हॉटेलमध्ये पोचल्यावर परी म्हणाला “फेरगेट इट, लाईफनं चान्स दिला तर परत भेटू नाहीतर.. ओके बाय”

“परी, लास्ट टाइम माझ्यासोबत कॉफी” मी विचारल्यावर परी हसला. कॉफीची ऑर्डर दिली आणि मोबाइल वाजला.

“डायरेक्ट आत ये. उजव्या बाजूचे तिसरे टेबल”

“कोण? ”परीनं विचारलं 

“परी, मीट माय सिस्टर.. ”परीनं मान उंचावून वर पाहिलं. सुन्न झाला. समोर नलूला पाहून परीचा पुतळा झाला. दोघांचे डोळे भरले. मी हलकेच तिथून सटकलो. पुन्हा कबाब में हड्डी व्हायचं नव्हतं. आई, मी आणि बायकोनी मिळून दोघांच्या भेटीसाठी प्लान केलेला. माझा फोन घेणार नाही म्हणून बायकोनं नलूला कॉल केला आणि आईला बोलायला लावलं. आईनं नलूला समजावलं. परीविषयी समजल्यावर नलू स्वतःला रोखू शकली नाही.

— 

खूप वर्षानी भेटलेले दोघं हेलावून गेले. खूप बोलायचं होतं, सांगायचं होतं परंतु भावनांना शब्द सापडत नव्हते. डोळे मात्र घळाघळा वाहत होते. काहीक्षण असेच गेले.

“आता पार म्हातारी दिसतेस”

“तू मात्र अजूनही चिकणा चॉकलेट”नलूच्या बोलण्यावर परी खळखळून हसला.

“हो. तुला शेवटचं भेटलो तिथंच माझं वय थांबलयं. ”

“अजूनही प्रेम करतोस”

“पूर्वीइतकंच आणि आयुष्यभर करेन. म्हणून तर एकटा राहिलो. तुझं काय? ”

“सेम टू सेम. तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचारच नाही. लग्नाआधी घरातून पळाले तेव्हापासून पळतेच आहे. ”

“नलू…. आता कुठंही जाऊ नकोस. ”

“आता तुला सोडत नाही. अगदी तू म्हटलास तरी…. आपण लग्न करू. ”

“ताबडतोब.. ”परीनं मला फोन केला. “बोल मित्रा”

“आम्हांला लग्न करायचंयं तेव्हा तयारीला लागा. ”मी हॉटेलमध्ये गेलो तेव्हा दोघं शेजारी बसलेले आणि चेहऱ्यावर 70mm स्माईल होतं.

“नऱ्या, बिघडवलं तूच आणि पुन्हा जुळवलं सुद्धा तूच. आता आमचं लग्न लावून जबाबदारीतून मुक्त हो. ”हसत हसत नलू म्हणाली तेव्हा माझा बांध फुटला. पुन्हा दोघांची माफी मागितली तेव्हा खांद्यावर थोपटत परी म्हणाला “यू आर ट्रू फ्रेंड, ऑलवेज केअर फॉर मी. थॅंकयू मि. नरेश” 

समाप्त  

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “परी…” –  भाग – १☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “परी…” –  भाग – १ ☆ श्री मंगेश मधुकर

सुट्टीचा दिवस आणि काहीही पर्याय नसल्यानं सौंसोबत खरेदीसाठी मॉलमध्ये यावं लागलं. विंडो शॉपिंग सुरु असताना प्रत्येक वस्तू सौ हातात घेऊन पाहत होती आणि त्यातही वैताग म्हणजे हे कसंय, ते कसंय असं विचारत होती. दीड तास फिरत होतॊ तरी तिचा उत्साह कमी झाला नव्हता. मला मात्र प्रचंड कंटाळा आलेला, फिरून फिरून पाय दुखायला लागले तिला सांगून एका ठिकाणी थांबलो. मोबाइल पाहत असताना पाठीमागून आवाज आला. “हॅलो मि. नरेश” मान फिरवून पाहिलं तर पन्नाशीचा उंचापुरा, सडपातळ, गोरगोमटा, मोठाले घारे डोळे, धारदार नाक, काडीचा चश्मा, निळी जीन्स आणि पांढरा टी शर्ट घातलेला प्रसन्न चेहऱ्याचा एकजण हसत समोर उभा.

“येस. ”मी विचारलं खरं पण मनातल्या मनात ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते. (संडे डिश)

“हॅलो, मि नरेश. ओळखलं का? ”त्यानं पुन्हा विचारलं.

“सॉरी!! लक्षात येत नाहीये पण चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय”

“पंचवीस वर्षांनी हा चेहरा पाहताय. इतक्या काळात सगळं काही बदलतं. यू आर ऑल्सो चेंज्ड अ लॉट. ” 

“हे मात्र खरंय”डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्यावर तो मनापासून हसला.

“मि. नरेश, तुम्हांला मघाशीच पाहिलं आणि खात्री झाल्यावर भेटायला आलो. ”सारखं सारखं मि. नरेश ऐकून एकदम डोक्यात ट्यूब पेटली.

“आयला, तू परी, सॉरी म्हणजे तुम्ही….. ”माझ्या ओरडण्यानं मॉलमधल्या काही नजरा आमच्या दिशेनं वळल्या.

“येस, फायनली ओळखलं” अत्यानंदानं कडकडून मिठी मारल्यावर परी अवघडला. त्याच्यासाठी हे अनपेक्षित होतं.

“परी…. आय मीन परिमल, ग्रेट सरप्राइज”

“ कॉल मी परी.. पूर्वीसारखं. फिल गुड् टु हियर.. ”मोहक हसत परीमल म्हणाला. कमालीचा देखणा असलेल्या परीला वाढलेलं वय देखील शोभत होतं. अगदी सिनेमातला हीरोच. त्याच्याशेजारी मी म्हणजे हापूस आंब्यासोबत सुरण. कँटिनमध्ये झालेली आमची पहिली भेट आठवली. (संडे डिश) 

“हॅलो सर, मी परिमल. फस्ट इयरला आहे. एक मदत पाहिजे होती. ”

“बोला” मी 

“आता माझा चहा नाश्ता झाला. “

“मग मी काय करू”

“माझं पाकीट हरवलंय किवा कदाचित घरीच राहीलंय. बिल देण्यासाठी पैसे नाहीत. आय नीड हेल्प.. प्लीज.. उद्या तुमचे पैसे परत करीन. हा माझा पत्ता. ”

“ओके डोन्ट वरी.. मी बिल देतो. ”किमान दहा वेळा परिमल ‘थॅंकयू’ म्हणाला. त्यादिवसानंतर आमची मैत्री झाली. तसं पहायला गेलं तर सगळ्याच बाबतीत. आमच्यात खूप फरक होता. तो श्रीमंत, मी मध्यमवर्गीय. कारमधून कॉलेजला यायचा तर मी बसनं. दिसायला अतिशय देखणा जणूकाही राजपुत्रच. कॉलेजमध्ये मुलींच्या दिलाची धडकन तर मुलं खार खाऊन आणि गंमत म्हणजे यासगळ्यापासून परी मात्र एकदम अलिप्त. फारसं कोणाशीच बोलायचा नाही. अगदीच कोणी बोलायला गेलं तर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा. इतकं असूनही माझ्याशी बोलायचा. आमची घट्ट मैत्री झाली. घरी येणं जाणं सुरू झालं म्हणजे बऱ्याचदा तो माझ्या घरी यायचा. आईशी गप्पा मारायचा. तिच्या हातचं त्याला खूप खूप आवडायचं. मनसोक्त जेवायचा. कुठंतरी तो आपल्या आईला शोधत होता कारण एकुलता एक असूनही सगळं बालपण हॉस्टेलला गेलं. त्यात आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यावर तर परी जास्तच एकटा पडला. पैसा कितीही असला तरी एक सेकंदाचा मायेचा स्पर्श देऊ शकत नाही. हे परखड सत्य परीला फार लवकर समजलं होत. त्याच्या भल्यामोठ्या घरापेक्षा आमच्या चाळीतल्या दोन रूममध्ये जास्त रमायचा. तिथंच त्याला नलू भेटली आणि……

जुन्या आठवणीत हरवून मी परिमलकडे भान हरपून एकटक पाहत होतो. (संडे डिश) 

“व्हॉट हँपन, असं का पाहताय”परीच्या आवाजानं भानावर आलो. एक सांगायचं म्हणजे परी नेहमीच मला ‘मि. नरेश’ अशी हाक मारतो अन आदरयुक्त बोलतो कारण माहिती नाही पण त्यानं एकदाही एकेरी हाक मारली नाही.

“मित्रा, खूप वर्षांनी भेटलास फार भारी वाटतंय. ”

“सेम हीयर”पूर्वीसारखच त्रोटक बोलायची परीची सवय अजूनही तशीच होती.

“कसे आहात. ”परीनं विचारलं.

“संसार, नोकरी आणि जबाबदाऱ्या. रुटीन लाईफ.. तुझं काय? ” 

“जर्मनीला असतो. बिझनेस”

“बायको-मुलं”

“एकटा जीव सदाशिव…. ”

बोलताना परी भकास हसला.

“का रे”

“यू नो एव्हरीथिंग. जी आवडली ती नशिबात नव्हती आणि नंतर कोणी आवडली नाही. म्हणून मग एकटेपणालाच लाईफ पार्टनर केलं. नाहीतरी लहानपणापासून तोच सोबत होता. ”आपली वेदना परीनं सहजपणे व्यक्त केली पण माझ्या अंगावर शहारा आला. त्याचं पहिलं आणि एकमेव प्रेम अयशस्वी होण्यात माझाही सहभाग होताच. पूर्वीच्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या. कसतरीच वाटलं मी त्याच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. दोघंही एकदम गप्प झालो काहीक्षण विलक्षण अवघडल्यासारखे गेले. तितक्यात सौ आल्या. परिमलला बघून तिला प्रचंड आश्चर्य वाटलं.

“परी, माय लाईफ पार्टनर”मी ओळख करून दिली तेव्हा सौ प्रचंड कौतुकानं परिकडे पाहत होत्या. कोणालाही सहज भुरळ पाडेल असंच त्याचं व्यक्तीमत्व होतं. (संडे डिश)

“वहिनी, नमस्कार, मी.. ”

“परिमल भाऊजी.. ह्यांनी तुमच्याविषयी सांगितलं होतं”

“आय होप, चांगलंच बोलले असतील” तिघंही मोठ्यानं हसलो.

“परी, घरी चल. ”

“आज नको. नंतर येतो. ”

“भाऊजी चला ना. आईंना खूप आनंद होईल. ”आईचा उल्लेख झाल्यावर परी भावूक झाला.

“आता आम्ही नवीन घरात राहतो. चाळीतलं घर केव्हाच सोडलं. ”मी 

“पण तिथली माणसं आणि आठवणी सोबत असतीलच ना त्या कधीच साथ सोडणार नाहीत. ”परी कोणाविषयी बोलतोय हे लक्षात आलं. इतक्या वर्षांनंतर सुद्धा तो नलूला विसरला नव्हता.

आयुष्यात कितीही पैसे कमावले तरी पहिली कमाई कधीच विसरली जात नाही. पहिल्या प्रेमाचं सुद्धा असंच काहीसं असतं.

परी नलूला अजिबात विसरला नव्हता हे लक्षात आलं. थेट विचारलं नसलं तरी तिच्याविषयी जाणून घ्यायची तीव्र ईच्छा त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती.

“थॅंकयू मि. नरेश”

आईला भेटण्याची अतीव इच्छा आणि माझ्या बायकोचा अतिआग्रह यामुळे परी घरी आला. घरात पाऊल टाकण्यापूर्वी शूज काढले. चाळीतली सवय. सगळ्यात आधी आईला भेटला. ध्यानीमनी नसताना परीची भेट झाल्यामुळे आईला प्रचंड आनंद झाला. खूप दिवसांनी मायेचा निखळ स्पर्श अनुभवल्यावर भावुक झालेल्या परीनं आलेला हुंदका कसाबसा आवरला. पैसा, प्रतिष्ठा असूनही नियती रूसलेली म्हणूनच वाट्याला आनंदापेक्षा दु:खच जास्त. सगळं काही असूनही रिकामाचं. त्यात नलूबरोबर फुलणारं नातं ही अचानक तुटलं.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बदल – – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ बदल – – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर बसून डॉक्टर प्रभाकर हलकासा झोका काढत होते. झोक्याबरोबर झोपाळ्याच्या कड्यांमधले चकचकीत राघू मैना मोर झुलत होते. त्यांच्या हातातलं वर्तमानपत्र उघडं असलं तरी नजर समोर लागली होती. मनात विचार झोका घेत होते. पूर्वी या झोपाळ्यावर बसलं की चौपाटीपर्यंतचा रस्ता दिसत असे. आता या सगळ्या उंच आणि वेड्यावाकड्या उगवलेल्या इमारतींनी पश्चिमेचा वारा आणि संध्याकाळचा आकाशातला नजारा सारंच गिळून टाकलं आहे. बऱ्याच वेळा पूर्वेकडचे सूर्यकिरण या उंच इमारतींच्या काचांवरून परावर्तित होतात आणि इथे व्हरांड्यात डोळे दिपवणारा प्रकाश पडतो. ऑपेरा हाऊसचा हा आपला भाड्याचा ब्लॉक जुना असला तरी भक्कम आहे. इथेही टॉवर करण्याच्या गोष्टी कानावर येत आहेत. किती भराभर बदलत चाललंय सारं!

तेवढ्यात नाश्ता, कॉफीचे मग आणि दोघांची रोजची औषधं घेऊन धनश्री आली आणि डॉक्टरांचे विचार थांबले. मोतिया रंगाची, जरीच्या जांभळ्या काठांची साडी, मोत्याचे मोजके दागिने आणि मोगऱ्याचा गजरा माळलेली धनश्री पासष्टी उलटून गेली तरी अगदी प्रसन्न टवटवीत दिसत होती.

“अरे वा! छान दिसताय अगदी! आज काय बुवा सगळं माहेर भेटणार तुम्हाला. मजा आहे. ” खुशीत आले की डॉक्टर धनश्रीला- पत्नीला- कौतुकानं ‘अहो-जाहो’ म्हणत. छान हसून प्रतिसाद देत धनश्री म्हणाली “बरं, बरं! आटपा आता लवकर. ”

“आवरतो तर! उगाच माझ्यामुळे माहेरच्या गोतावळ्यात जायला उशीर नको. ”

आज 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन एकत्र आलं होतं. रमाच्या म्हणजे धनश्रीच्या मोठ्या भावाच्या नातीच्या साखरपुड्याला जायचं होतं. त्यांची बेंगळुरूला राहणारी मुलगी केतकी आणि दिल्लीला असलेला मुलगा सुरेंद्र या समारंभाला येऊ शकणार नव्हते.

कॅबमध्ये बसता बसता डॉक्टरांच्या मनात आलं, ‘ठाण्याला जायचं म्हणजे लांब वाटतं आताशा. या कॅबसेवेमुळे बरीच सोय झालीये आपल्यासारख्यांची. ’

गाडीतल्या गार हवेने थोड्याच वेळात डॉक्टरांना डुलकी आली. बाहेरचा रंगीबेरंगी, उत्साहाने नटलेला सणाचा माहोल बघताना धनश्रीला वाटलं, ‘दरवेळी इथून जाताना बघावं तर नव्या इमारती, मॉल्स उभे राहिलेले दिसतात. मेट्रोचं बांधकामही जोरात सुरू आहे. त्यातच अरुंद रस्त्यांवरून, गर्दीतून मार्ग काढत दोन चाकी गाड्यांवरची अख्खी कुटुंबं नटून- सजून पळत आहेत. धन्य आहेत हे मुंबईकर!

पावसाळ्यामुळे पलीकडच्या निळसर डोंगररांगांवरची झाडं आणि रस्ते स्वच्छ दिसत होते. डोंगराला वळसा घालून जाणाऱ्या खाडीचं पाणी चकाकत होतं हिरवं आणि प्रसन्न वातावरण होतं.

हॉलमध्ये नवरा- नवरी, फोटोग्राफर आणि गुरुजी यांचंच स्टेजवर राज्य होतं. बाकी सारे सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्यात रमले होते.. लहान मुलांनी स्टेजपासून सगळा हॉल खेळण्यासाठी काबीज केला होता. सगळ्या भाच्या आणि भाचेसुना उगाचच लगबग करत मिरवत होत्या. कुणीतरी नाश्तापाण्याची चौकशी करून गेलं. दोघी- तिघी भाच्या आवडत्या धनश्रीआत्याला कौतुकानं सांगायला आल्या, “आत्या, आम्ही सगळ्या सासूगर्ल्सनी रमाच्या लग्नासाठी पटोला घ्यायचं ठरवलंय”.

लगेच दुसरी म्हणाली, “पण लग्नानंतर जेवायच्या वेळी मात्र सगळ्याजणी गाऊन्स घालणार आहोत बरं का. ”

अरे वा सासूगर्ल्स! आत्तासुद्धा छान दिसताय सगळ्याजणी. ”

चाळीशी होऊन गेलेल्या या भाच्या आणि सुना आता सासू होणार होत्या. थोडा चिवचिवाट करून त्या चिमण्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. शेजारी बसलेली ताई लगेच धनश्रीला म्हणाली, “त्या गाऊन्स घालायचं म्हणताहेत आणि तू त्यांचं कौतुक कसलं करतेस?”

“ अंगभर कपडे घालणार आहेत ना, ठीक आहे. गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स आणि टी-शर्ट घालणार असं म्हणाल्या असत्या, तर काय करणार होतो आपण? आणि अगं आजकाल फॅशन आहे जमिनीवर लोळणारे गाऊन्स घालायची. फक्त त्यांच्या ब्लाऊजची मागची छोटी पट्टी बघून डोळे मात्र मोठे नाही करायचे! आत्ता येताना बाहेर पाहत होते तर रस्त्यावर चालणाऱ्या, टू व्हीलरवरच्या, बसमधल्या लहान- मोठ्या नव्वद टक्के बायकांचे ब्लाऊज म्हणजे, ‘

कुणीही पाव मीटरपेक्षा जास्त कापड ब्लाऊजसाठी वापरू नये’ अशी कुणाची तरी सक्त ऑर्डर असल्यासारखं वाटावं असे होते. त्यापेक्षा आपल्या चिमण्यांच्या पाठीवर बरीच पिसं आहेत. ”

धनश्रीचा बोलणं ऐकणाऱ्या आजूबाजूच्या सगळ्याजणी हास्यरंगात बुडून गेल्या. “आपण फार कशाचा बाऊ करायचा नाही. ” धनश्रीनं तिचं म्हणणं पूर्ण केलं.

“खरं आहे ग बाई तुझं! छान जमवून घेतेस सगळ्यांबरोबर. म्हणून तर आवडती आहेस सगळ्यांची. ” ताई कौतुकानं धनश्रीला म्हणाली.

समारंभानंतर निघताना धनश्रीनं पुढच्या महिन्यात ठरवलेल्या डॉक्टरांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या समारंभाची सर्वांना आठवण करून दिली आणि येण्याचा आग्रह केला. परतताना गाडीमध्ये धनश्रीचे डोळे मिटत होते आणि ट्रॅफिक वाढल्यामुळे वारंवार थांबणाऱ्या गाडीत बसून डॉक्टर कंटाळले होते. मुंबईच्या गर्दीत दररोज मोठी भर पडत होती. डोंगरांवरसुद्धा वस्त्या झाल्यामुळे रस्त्याकडेला पावसाळ्यात वाहणाऱ्या झऱ्यांचे नाले झाले होते. कचऱ्याचे ढीग डोंगरांशी स्पर्धा करत होते. असाहाय्यपणे बाहेरचा बदल बघताना, डॉक्टरांच्या अधूनमधून मिटणाऱ्या डोळ्यांपुढे भूतकाळ तरळू लागला.

‘बारावीनंतर मेडिसिनला जाणार नाही’ असं अगदी ठामपणे सुरेंद्रनं सांगितलं होतं, तेव्हा त्याला समजावताना आपण म्हटलं, ‘अरे, बापूंनी किती कष्टाने…. ’

‘बाबा प्लीज, बापू आजोबा कोकणातून आले अर्धपोटी राहून, खूप अभ्यास करून यशस्वी डॉक्टर झाले, तुम्हीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकलंत, हे सर्व मला माहितीये. तुम्हा दोघांबद्दल, मेडिसिन प्रोफेशनबद्दल मला आदर आहे पण मला मेडिसिनला जायचं नाहीये. केतकीनं तिच्या ऑफिसमधल्या इंजिनीयर रामनाथनची जोडीदार म्हणून निवड केली, ती आपण सर्वांनी स्वीकारली. मलाही माझ्या आवडीच्या कम्प्युटर क्षेत्रात जायचय. तेव्हा प्लीज यावरून परत चर्चा नको. ’ अगदी शांत स्वरात सुरेंद्रने विषय संपवला होता.

घरातला डॉक्टरकीचा वारसा पुढे चालवला जाणार नाही, हे सत्य पचवायला आपल्याला खूप कठीण गेलं. पण झाली त्याची सवय हळूहळू. आता केतकी बेंगळुरूला नवऱ्याच्या इंजिनिअरिंग फॉर्ममध्ये साथ देते आहे आणि सुरेंद्र दिल्लीला यशस्वी उद्योजक आहे. परंपरेला बाजूला सारून मुलांनी त्यांच्या आवडीप्रमाणे आयुष्याचा मार्ग बदलला म्हणून काऽऽही बिघडलं नाही. या हल्लीच्या पिढीच्या सुस्पष्ट विचारतला मोकळेपणा कौतुक करण्यासारखा आणि थोडासा हेवा वाटण्यासारखासुद्धा आहे. स्पष्टपणे कबूल करायचं तर आता आपल्या प्रोफेशनमध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे. सेवाव्रताचा बिझनेस झाला आहे. शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा ओतल्यानंतर….. आणि अलीकडे पेशंटची वृत्तीसुद्धा बदलली आहे. त्यांना उठसूट महागडे स्पेशालिस्ट लागतात. ’

धनश्रीला सगळ्या गोष्टींमध्ये सुवर्णमध्य साधायची बॅलन्सिग ट्रीक छान जमली आहे. मुलांनी वेगळ्या वाटा निवडल्या. व्यवसायानिमित्त ती दूर राहतात, ही बदलत्या काळाची गरज समजून सगळं समंजसपणे तिनं जमवून घेतलंय. मुलं आता आपल्याला प्रॅक्टिस बंद करण्याचा आग्रह करतात. धनश्रीनही तसं दोन- चारदा सुचवलं, पण आग्रह धरला नाही. तिचं भागवत मंडळ, हास्य क्लब, मैत्रिणी, टीव्ही सगळ्यात तिनं स्वतःला छान गुंतवून घेतलं आहे.

मुलांनी ठरवलेल्या डॉक्टरांच्या पंचाहत्तरीच्या समारंभाला अजून दोन दिवस होते. पण धनश्रीची मागच्या आठवड्यापासून गडबड सुरू होती. मुलं, नातवंडं येणार म्हणून तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ तयार केले जात होते. शिवाय आज संध्याकाळी तीनं तिच्या गुरुजींच्या प्रवचनाचा कार्यक्रम घरी करायचं ठरवलं होतं.

नमस्कार करते काका ॑. मधुरा म्हणजे केतकीच्या मैत्रिणीनं वाकून नमस्कार केला, तेव्हा विचारांच्या तंद्रीतून डॉक्टर बाहेर आले. बऱ्याच दिवसांनी भेटणाऱ्या मैत्रिणींच्या मनसोक्त गप्पा व्हाव्यात म्हणून धनश्रीनं मधुराला दोन दिवस राहायला बोलावलं होतं. मधुराचा योगविद्येचा विशेष अभ्यास होता. कितीतरी वर्ष ती योगविद्येचे विनामूल्य वर्ग घेतेय.

ये बैस इथे तुझ्या आवडत्या झोपाळ्यावर ॔॑. डॉक्टरांनी सरकून मधुराला झोपाळ्यावर जागा करून दिली. मधुरा आणि केतकी लहानपणापासूनच्या मैत्रिणी. त्यांचा खेळ, अभ्यास, गाणी, गोष्टी सारं या झोपाळ्यावर बसूनच चालत असे. मधुराला बघून धनश्री चहा- फराळाचं घेऊन आली. मधुरानं धनश्रीला आधी गळामिठी घालून मग वाकून नमस्कार केला आणि उत्साहाने सांगू लागली,

काका- काकू मी पुढच्या महिन्यात हेलसिंकीला म्हणजे फिनलँडला जातेय दोन महिन्यांसाठी. मागच्या वर्षी मी पुण्यातल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये योगाभ्यासाचा स्पेशल कोर्स केला होता. आता त्या इन्स्टिट्यूटतर्फे मला हेलसिंकीला पाठवत आहेत. मुलंही आता मोठी झाली आहेत. एक नवा अनुभव घ्यायला घरातल्या सगळ्यांनीच प्रोत्साहन दिलं मला. माझी असाइनमेंट संपली, की मनोहर मुलांना घेऊन तिकडे येणार आहे. मग आम्ही आठ-दहा दिवस नॉर्वे, स्वीडनला फिरून यायचं ठरवलं आहे.॔

छान! जाऊन या सगळे. इतकी वर्षं तू योगाभ्यासाचे विनामूल्य वर्ग घेते आहेस, त्याचं हे बक्षीस आहे बरं का! धनश्री कौतुकानं म्हणाली.

काकू, पूर्वी मी गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे योगवर्गात शिकविण्याचे पैसे घेत नसे, पण अलीकडे मी फी घेते बरं का. तरुण पिढीला योगशास्त्र शिकण्यात इंटरेस्ट आहे, पण त्यांना योगवर्गाची जागा चांगली पॉश लागते. अशा जागेचं भाडंही बरंच असतं. शिवाय अनुभवानं माझ्या लक्षात आलंय, की अलीकडच्या काळात आपण फुकट कुणाला काही दिलं, की त्याचं महत्त्व, खरी किंमत कुणाला कळत नाही. उलट जास्त फी घेऊन एसी आणि आधुनिक सोयी देणाऱ्यांकडे जास्त गर्दी होते. या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर आपल्यालाही बदलणं भागच आहे.

अगदी खरं आहे तुझं. काळाचा महिमा! दुसरं काय .॔

 मधुराचा नाश्ता झाला की दोघेही हॉलमध्ये या बरं का गुरुजी येतीलच इतक्यात.॔डॉक्टर आणि मधुरा हॉलमध्ये येऊन बसले तेव्हा प्रवचनाला सुरुवात झाली होती. प्रवचनकार एका कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर होते. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक होता. ते सांगत होते,

विज्ञान क्रांतीमुळे जग फार झपाट्यानं बदलतंय. कपडे, , राहणीमान, विचार, नाती सगळं मागच्या दशकात बदलत गेलं. या नव्या जगाशी जुळवून घेतलं तरच आपला निभाव लागेल. काळाप्रमाणे आपण बदललो नाही, तर इतरांना आपलीच अडगळ वाटायला लागेल. त्यापेक्षा नव्याचं स्वागत करणं केव्हाही श्रेयस्कर. बदल हा फक्त चांगला किंवा फक्त वाईट नसतो. मुख्य म्हणजे बदल अपरिहार्य असतो. बदल नको असं म्हणायची मुभा नियतीनं आपल्याला ठेवली नाहीये. म्हणून तर आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी साठीनंतर वानप्रस्थाश्रमाचा मार्ग सांगितला. हल्लीच्या काळात निदान मनानं तरी आपण या साऱ्या व्यापातून निवृत्त व्हायला हवं.

डॉक्टरांनी नकळत धनश्रीकडे पाहिलं, तर धनश्रीही अर्थपूर्ण नजरेनं त्यांच्याकडेच बघत होती. डॉक्टरांनी हसून संमतीदर्शक मान डोलावली.

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जो दुसऱ्यावरी विसंबला… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ जो दुसऱ्यावरी विसंबला…  ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

“दिलीप, त्या तुझ्या परवाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाची तयारी कुठपर्यंत आली आहे? ” रवीकाका आपल्या मुलाला विचारत होते.

आता इथे आधी हे सांगायला पाहिजे की स्वतः रवीकाका गेली अनेक वर्षं इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात होते, गेले वर्षभर त्यांचा मुलगा दिलीपसुद्धा या क्षेत्रात जम बसवू इच्छित होता आणि आज काका ज्या साखरपुड्याची चौकशी करत होते, ती दिलीपने घेतलेल्या एका कार्यक्रमाची होती, स्वतः दिलीपच्या साखरपुड्याची नव्हती.

“हां, बाबा, मी ते फ्लॉवर डेकोरेशनचं चंदूला सांगितलं आहे, रिया केटरर्स बघती आहे, रमेश खुर्च्या सोफे आणणार आहे, आणि… ” दिलीप सांगू लागला. त्याला मधेच थांबवत काका म्हणाले, “अरे, पण तू काय करणार आहेस? “

“हे काय, मी फोन करून फॉलोअप घेतोय ना, ” दिलीप.

“इकडे ये बेटा, दोन मिनिटं बस माझ्या शेजारी, ” काका त्याला म्हणाले, “मी तुला एक गोष्ट सांगतो. “

थोड्याशा नाखुशीनेच दिलीप काकांजवळ बसला.

“वीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बोईसर MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन)- उद्योगनगरीमध्ये एक छोटा लेबर कॉन्ट्रॅक्टर राहत होता.

वेगाने वाढणाऱ्या या कारखान्यांना खात्रीशीर कामगारांची गरज असायची. कुशल कामगारांना चांगल्या पगारावर कायम स्वरुपी नोकऱ्या मिळायच्या. अडचण आणि चणचण असायची ती अकुशल कामगारांची.

झाडू मारणे, कच्चा माल अथवा तयार प्रॉडक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवणे, ट्रक रिकामा करणे अथवा भरणे – त्या दिवशी, त्या कारखान्यात जे काम सांगितले जाईल ते काम करायला लागणारा कामगारवर्ग – यांना कायमस्वरूपी कामावर घेतलं, तर उगाच भारंभार पगार द्यावा लागायचा, आणि हवे तेव्हा हे कामगार मिळाले नाहीत, तर कामाचा खोळंबा व्हायचा, कंपनीचं नुकसान व्हायचं.

मग मालकांना यावर पर्याय मिळाला तो लेबर कॉन्ट्रॅक्टरचा. येत्या आठवड्यात आपल्या कारखान्यात किती टेम्पररी कामगार हवे आहेत हे त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं जायचं, त्या कामगारांना – जसं ठरलं असेल तसं दर पंधरा दिवसांनी वा दर महिन्याला – वेतन दिलं जायचं, प्रत्येक मजूरामागे कॉन्ट्रॅक्टरला त्याचं कमिशन दिलं जायचं.

माणसांना रोजगार मिळायचा, कंपनीला खात्रीशीर माणसं मिळायची आणि कॉन्ट्रॅक्टरला कमिशन. सगळे खुश!

यात अट एकच असायची, की काय वाट्टेल ते झालं, तरी ठरलेल्या संख्येइतके मजूर कॉन्ट्रॅक्टरने पुरवणं बंधनकारक असायचं. जर तो तितके मजूर पुरवू शकला नाही, तर त्याला दंड व्हायचा किंवा midc मध्ये नाव बदनाम व्हायचं आणि मग त्याला कॉन्ट्रॅक्टस मिळणं कमी होत जायचं.

तर या कॉन्ट्रॅक्टरला एका कंपनीत सहा मजूर देण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, स्थानिक सहा माणसं घेऊन त्याचं कामही छान चाललं होतं.

आता हा कॉन्ट्रॅक्टर आपलं कार्यक्षेत्र विस्तारायच्या विचारात होता, आणि त्याच्या सुदैवाने तशी संधी चालूनही आली. त्याच कंपनीला expansion करायचं होतं, त्यांना पंधरा दिवसांनी पुढच्या वर्षभरासाठी आणखी तीस अकुशल कामगार लागणार होते.

कंपनीने याला विचारलं. हा कॉन्ट्रॅक्टर हरखला, वाढणाऱ्या कमिशनचे आकडे त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले, त्याने तत्क्षणीच होकार देऊन टाकला.

होकार दिला तर खरा, पण आजूबाजूला चौकशी केल्यावर कंपनी देत असलेल्या पगारात इतके मजूर काही मिळेनात. दोन दिवस गेले तरी काही सोय होईना.

हा कॉन्ट्रॅक्टर हवालदिल झाला. इतक्यात त्याची भेट “साहू”शी झाली. साहू दोन चार वर्षांपूर्वी ओरिसा राज्यातून बोईसरला आला होता आणि आता इकडचाच झाला होता. त्याला पहिली नोकरी याच कॉन्ट्रॅक्टरने लावून दिली होती.

“काय जाला, शाब? ” ओरिया मिश्रित मराठीत साहू विचारता झाला. याने त्याचा प्रॉब्लेम सांगितला.

“अरे, बस! इतनीसी बात है, शाब? फिर ये साहू किस दिन काम आयेगा? आपने मुझे पहिला जॉब दिया था. आपका एहसान है मेरेपे. ” तो म्हणाला की त्याच्या ओरिसात पुष्कळ ओळखी आहेत आणि जायचा यायचा खर्च दिला आणि वर थोडे पैसे दिले, तर आठ – दहा दिवसांत तो तीस माणसं सहज आणू शकेल.

कॉन्ट्रॅक्टरचं टेन्शन कमी झालं. असंही त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता आणि साहूला तो गेली काही वर्षं ओळखत होता. त्याने साहूला पैसे दिले आणि दहा दिवसांत – म्हटल्याप्रमाणे, साहू तीस माणसं घेऊन आला.

कॉन्ट्रॅक्टरने दोन खोल्या भाड्याने घेतल्या, त्यात ही सगळी माणसं राहू लागली.

कंपनीत ही नवी माणसे कामाला लागली, त्यांचे पगार, कॉन्ट्रॅक्टरचे कमिशन सगळं छान सुरू झालं. नंतर नंतर या कॉन्ट्रॅक्टरचा साहूवरचा विश्वास वाढत गेला. कोणत्याही नव्या कंपनीत माणसं लागली की तो साहूला फोन लावायचा, साहू ओरिसाहून माणसं आणायचा, कमिशनचा आकडा वाढत जायचा.

आता साहूने नोकरी करणं सोडून दिलं होतं, तो या कॉन्ट्रॅक्टरचा उजवा हात म्हणून काम करत होता. आणि हा कॉन्ट्रॅक्टर साहूच्या जीवावर निर्धास्त होता.

एके दिवशी ज्या कंपनीने अगदी सुरुवातीला तीस नवीन कामगार मागवले होते, त्याच्या मॅनेजरचा या कॉन्ट्रॅक्टरला फोन आला. कंपनीची मॅनेजमेंट बदलली जात होती, एक परदेशी कंपनी या कंपनीला विकत घेत होती त्यामुळे पंधरा दिवस पगार मिळायला उशीर होणार होता. हे कानावर घालण्यासाठी मॅनेजरने फोन केला होता.

कॉन्ट्रॅक्टरने लगेच साहूला फोन केला. तो म्हणाला की कामगारांना त्यांच्या रोजच्या शिध्यासाठी, वरखर्चासाठी काही पैशांची सोय करणे गरजेचं होतं. आणखीनही एक दोन कंपन्यांतील कामगारांसाठी अशी तात्पुरती सोय करायला लागणार होती.

पगार झाला, की कामगारांकडून हे पैसे वळते करून घेता येणार होते.

त्याने एका खाजगी सावकाराचा नंबर कॉन्ट्रॅक्टरला दिला. कॉन्ट्रॅक्टरने लगेच त्या नंबरवर फोन करून पैशांची मागणी केली, महिन्याभरात व्याजासकट पैसे परत करण्याचा वायदा केला. व्याजाची रक्कम पठाणी होती, पण बँकांकडून कर्ज मिळवण्यात वेळ जाणार होता, आयकराची आणि कायदेशीर बाबींची झंझट लागली असती त्यापेक्षा हे सोपे होते.

कॉन्ट्रॅक्टरने पैसे घेऊन साहूला दिले आणि सगळं काही आलबेल झाल्याबद्दल निःश्वास सोडला.

दोन आठवड्यांनंतर मॅनेजरचा कॉन्ट्रॅक्टरला फोन आला, आदल्या दिवशी कामगारांचा पगार झाला होता, पण आज त्यांच्यापैकी कोणीच कामाला आलेले नव्हते. मॅनेजरचा हा फोन चालू असताना दोन तीन इतर फोन येत असल्याचं कॉन्ट्रॅक्टरला लक्षात आलं.

“मी बघतो काय झालंय ते, ” असं म्हणत यानं फोन ठेवला, पाहिलं तर तीन वेगवेगळ्या कंपन्यांतून फोन आलेले. तीनही ठिकाणी फोन करून विचारलं, तर तिथंही कामगार कामावर आले नव्हते.

कॉन्ट्रॅक्टरला दरदरून घाम फुटला. त्याला काहीच सुधरेना. काय झालंय? काय होतंय? काहीच समजेना.

दोन मिनिटांनी भानावर आल्यावर त्याने पहिले छूट साहूला फोन लावला. त्याला ठाऊक असेल, तो काहीतरी मार्ग काढेल – याला आशा होती, याला खात्री होती… पण, पण साहूचा फोन स्विच ऑफ होता.

हा कावराबावरा झाला, भानावर आला, मोटरसायकलला लाथ घातली अन् त्या कामगारांच्या खोलीकडे सुटला. बघतो, तर खोल्या रिकाम्या, सामान नाही, माणसं नाहीत. साहूने नंतर आणलेल्या माणसांच्या खोल्यांवर तो गेला – तिथंही तीच परिस्थिती.

आजूबाजूला चौकशी केली, साहू सगळ्या माणसांना घेऊन गावाला पसार झाला असं कळलं.

हा कपाळाला हात लावून बसला. दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून घेणेकऱ्यांनी तगादा लावायला सुरुवात केली. साहूने अनेक कारखान्यातील कामगारांसाठी या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने पैसे उचलले होते, त्याच्या नावाने मोठ्ठे कर्ज करून ठेवलं होतं आणि आता ते पैसे घेऊन त्यानं पोबारा केला होता.

याची दुनिया उलथीपालथी झाली. पठाणांचा ससेमिरा पाठी लागला. त्यांची देणी देता देता त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तोंडाला फेस आला. घरातले दागदागिने आणि अगदी मोटारसायकलही विकली आणि सावकारांच्या हातापाया पडून त्याने आपली सुटका करून घेतली.”

गोष्ट सांगताना रवीकाका थांबले. आणि दिलीपच्या खांद्यावर हात ठेऊन सांगू लागले, “त्या साहूवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेऊन आपला घात करून घेणारा तो कॉन्ट्रॅक्टर मी होतो. तेव्हा मी बचावलो, पण तुझे आजोबा खूप घाबरले, त्यांना माझी काळजी वाटू लागली. त्यांनी मला बोईसरहून निघून दुसरीकडे जायला सांगितलं, मी या शहरात आलो, कामं करता करता इव्हेंट मॅनेजमेंटच्या दुनियेत पाय रोवले.

कामांची वाटणी करायची, इतरांकडून कामं करवून घ्यायची हे योग्य आहे. पण आळशी व्हायचं नाही, आंधळा विश्वास ठेवायचा नाही.

साहूच्या ओंजळीने पाणी पिताना मी गाफील राहिलो. माझी तीच चूक तू करू नकोस. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला, हे तुला सांगण्यासाठी हा सगळा उद्योग, ” रवीकाका हसत हसत म्हणाले आणि आपली चूक उमगून, ती सुधारण्यासाठी दिलीपही कामाला लागला.

 श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares