मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “बर्म्युडा ट्रँगल…” भाग – २ ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? जीवनरंग ?

☆ “बर्म्युडा ट्रँगल…” भाग – २ ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

(सहज जाणवलं… हा फक्त मुखवटा आहे… खूप काही लपवणारा. काहीतरी जळतंय.. खोल.. आतून. डोळ्याच्या एका कोनातून, ते दुःख सहज रिफ्लेक्ट होणारं. निदान मला तरी तसं जाणवलं. दुसऱ्या क्षणी… त्यांनी हसून स्वागत केलं.) – इथून पुढे —- 

मी बघतच राहिलो. हृदयात गिटार वाजू लागली. वाटलं, मी ओळखतो यांना.. खूप वर्षांपासून. पण आत्ता काहीच आठवत नाहीये… छोडो यार. एखादी व्यक्ती पन्नाशीत इतकी सुंदर दिसू शकते? त्या संतूरवाल्यांना सांगायला हवं. ‘ बाबांनो, या बाईसाहेबांना तुमच्या अॅडमधे घ्या. ’ सचमुच.. उमरका पताही नही चलता…. मला काय वाटलं, शब्दात सांगणं अवघड आहे. एवढं मात्र खरं… मी हरवून गेलेलो.

आपण यांना पाहिलंत का?

बाईसाहेबांनी ड्राॅईंग्ज बघितली. आवडली.

” तुम्ही, आमच्या जुन्या वाड्यात आला होतात का कधी? “

‘नाही कधीच नाही. का? ‘

” काही नाही. सहज विचारलं. तुमची डिझाईन्स खूप ओळखीची वाटली. ” मला काहीच समजलं नाही.

काम सुरू झालं. नंतर वरचेवर बाईसाहेबांशी भेट होवू लागली. दिवसातून एकदा तरी त्यांची साईटवर चक्कर व्हायची. जयंतराव पुन्हा भेटलेच नाहीत. त्यांचं आपलं धंदा एके धंदा. बाईसाहेब येताना, नेहमी काही तरी खायला घेवून येत.. सगळ्यांसाठी. ‘बदामी शिरा मला फार आवडतो हे त्यांना कसं कळलं? ’

मनापासून केलेला आग्रह. पहिला घास तोंडात घेतला. असं वाटलं, ही चव माझ्या खूप ओळखीची आहे..

आणि खरं सांगू? ही बाईही.

मी वेडा झालेलो. घरी सोन्यासारखी बायको.. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी. मी कसा फसवू शकतो तिला? कधीच नाही.. तरीही.. ही बाई समोर आली की.. मी माझा रहातच नाही. काही तरी वेगळंच फीलींग यायला लागतं. खूप ओळखीचं. एखाद दिवस बाईसाहेब आल्या नाहीत तर.. मी अस्वस्थ व्हायचो.

खरं तर आम्ही कामाचंच बोलायचो. पण आमच्या दोघांचे डोळे.. ते काहीतरी वेगळंच करायचे. त्या बाईची ती नजर… हिप्नोटाईज करणारी.. कशाची तरी आठवण करून देणारी.. जुनी ओळख शोधणारी… जुना फ्लॅशबॅक आठवणारी… मला काहीही आठवायचं नाही.

काम जोरात सुरू होतं. मणभर सागवानी लाकूड वापरलेलं. तुळया, महिरपी, पेशवाई बैठक. जुन्या स्टाईलच्या अॅन्टीक काचेच्या हंड्या. झुंबरं. नक्षीदार झोपाळा, भिंतीतली कपाटं. अफलातून दिसत होतं सगळं. जणू नितीन देसाईंनी ऊभारलेला, पेशवाई सेट वाटावा.

.. मला कुठून सुचलं, हे सगळं कुणास ठावूक? कुठंतरी मनाच्या डोळ्यांनी पाहिलेलं. आता प्रत्यक्षात साकारलं गेलं होतं…… का कुणास ठावूक? आत्ता हे सगळं खूप ओळखीचं वाटत होतं.

डेडलाईन जवळ येत चाललेली. पंधरा दिवसांवर वास्तुशांत. कालच जयंतराव येवून गेले. तेही खूष.

बाईसाहेब आलेल्या. काही जुने फोटो घेवून.. त्यांच्या वडिलांबरोबरचे.. जुन्या वाड्याचे.. काही ग्रुप फोटो.

” यांना छान फ्रेम करून घ्या. जिन्यात लावायचेत आपल्याला, स्टेपवाईज. “

‘ओक्के.. ‘

मी कामाला लागलो. सुतार लोकांना सूचना दिल्या. खास सागवानी फ्रेम वापरणार होतो. एका ग्रुपफोटोकडे सहज लक्ष गेले. बाईसाहेबांच्या लहानपणीचा फोटो.. त्यांचे आईवडील.. त्या आणि वाड्यातली बच्चा गँग.

तो फोटो बघितला.. मी प्रचंड अस्वस्थ.. काहीतरी प्रचंड ओळखीचं.. डोक्यात जबरदस्त केमिकल लोचा.

… सहन होईना. घामानं थबथबलो. काम थांबवलं. घरी जावून झोपलो. बरं वाटलं. संध्याकाळी परत साईटवर.

जयंतराव आणि बाईसाहेब आलेल्या. जयंतरावांना बघितलं.. माझा माझ्यावर ताबाच राहिला नाही. डोळे आग ओकू लागले. नुसता संताप. हात शिवशिवू लागले. वाटलं, या हातांनी जयंतरावांचा गळा दाबावा.

हिशोब चुकता करावा…. कुठला हिशोब? ते मात्र आठवत नव्हतं. मी नुसताच थरथरत होतो.

एकदम बाईसाहेबांनी माझा हात धरला. मी भानावर आलो.

” त्यांची तब्येत ठीक नाहीये, जा त्यांना घरी सोडून या. “

माझ्या दोन पोरांनी मला घरी नेवून सोडलं. आठ दिवस सणकून ताप. नवव्या दिवशी सकाळी. आता बरं वाटत होतं. आज साईटवर जायलाच हवं.

माझ्या माणसाचा फोन.

” साहेब, कळलं का? इनामदार साहेबांनी आत्महत्या केली. आठ दिवसांपूर्वीच. आत्ताच बाईसाहेब येवून गेल्या. त्यांनी चिठ्ठी दिलीय. उरलेल्या पेमेंटचा चेकही दिलाय. काम संपत आलंय. तुम्ही साईटवर केव्हा येताय? “

… मी उडालोच ताबडतोब साईटवर पोचलो. चिठ्ठी वाचू लागलो.

” आज ना उद्या, तुम्हाला ओळख पटलीच असती. सहज ओळखू शकाल स्वतःला. तो ग्रुप फोटो.

माझ्याशेजारचा तू.. तेच हिरवे डोळे.. मी पहिल्या दिवशीच ओळखलं तुला.. वाड्यातल्या दिगूकाकांचा मुलगा तू.. ते आमच्याकडेच दिवाणजी.. माझी तुझी काय बरोबरी? तरीही… मला तूच हवा होतास.

तूही जिद्दीला पेटलास. तू शिकायला दिल्लीला गेलास. सरकारी नोकरी मिळवलीस. मला मागणी घालायला म्हणून पुण्याला निघालेला… पुण्याला पोचलास नाहीस. दिगूकाका खंगून खंगून गेले….

जयंता… आपल्या दोघांचा मित्र. चिठ्ठ्या पोचवायचा. तू गेलास दिल्लीला. त्याचा माझ्यावर डोळा. तुझं काही तरी बरं वाईट झालं असणार.. नव्हे त्यानंच केलं असणार.. तू आला नाहीस. खूप वाट बघितली. शेवटी इनामदारांकडनं रीतसर मागणी घातली गेली. माझा नाईलाज झाला. माझी खात्री होती.. जयंतानंच तुझ्याशी दगाफटका केला असणार.. त्यादिवशीची तुझी ती नजर….. जयंतानंही ओळखलं तुला. खरं तर बाकी आयुष्यभर, तो माझ्याशी चांगलाच वागला. पण त्या पापाचं ओझं सहन होईना त्याला. माझ्यापाशी कबूल केलं सगळं. रात्री कधीतरी स्वतःवर गोळी झाडून घेतली. बरं झालं… तू वाचलास. नाहीतर या बर्म्युडा ट्रँगलमधे खेचला गेला असतास.. खोल गर्तेत अडकला असतास.. सोन्यासारखा संसार आहे तुझा. सांभाळ.

गेल्या जन्मीचे हिशोब, या जन्मी चुकते करायला निघाला होतास… विसरून जा सगळं. मी कायमची निघून जातेय लेकीकडे, ऑस्ट्रेलियात. तुझा विश्वास असो वा नसो.. माझ्यासाठी एक कर… धुंडीशास्त्रींशी बोललेय मी. शांती करून घे. तुझ्यातल्या माझ्या विश्वासाला मुक्ती मिळू दे. कायमची. शुभम् भवतु. “

मी शाॅक्ड. चेक घेतला. दोन दिवसांत काम पूर्ण करून घेतलं. चाव्या बाईसाहेबांच्या वकीलाकडे सुपूर्त केल्या. बंगल्याची वास्तुशांत बहुधा कधी होणारच नाही. चॅप्टर क्लोज्ड.

ती आठवण कायमची पुसली गेली. पुन्हा कधीच, काही आठवलं नाही… तो बंगलाही… अन् बाईसाहेबही.

काल सहज, माती गणणपतीशी चक्कर झाली… एक पेशवाईस्टाईल बंगला दिसला. पितळी नावाची पाटी दिसली…..

” बर्म्युडा ट्रॅगल. “

… वाटलं, या जागेशी माझं काही तरी कनेक्शन आहे. जाम आठवण्याचा प्रयत्न केला. नाही आठवलं.

तुम्हाला आठवतंय का काही?

– समाप्त –  

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “बर्म्युडा ट्रँगल…” भाग – १ ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? जीवनरंग ?

☆ “बर्म्युडा ट्रँगल…” भाग – १ ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

असं तुमच्या बाबतीत होतं का कधी?

म्हणजे बघा, आपण एखाद्या जागी, आयुष्यात पहिल्यांदा जातो. आणि तिथं गेल्यावर एकदम वाटायला लागतं… अरे हे सगळं तर माझ्या खुप ओळखीचं आहे. इथल्या खूप आठवणी आहेत… ती जागा एकदम मनात घर करून जाते.

कुठल्या आठवणी? आपण मेंदूला खूप ताण देतो. जाम आठवत नाही. मेंदूचा नुसता बैंगन भरता.. आपण अत्यवस्थ.

डिट्टो तसंच. तसंच झालं माझ्या बाबतीत. माती गणपती मंदिराजवळ उभा होतो. एका क्लायंटची वाट बघत. सहज समोर लक्ष गेलं. कन्स्ट्रक्शन चालू होतं. रस्त्याला लागून भली मोठी जागा. पार पलीकडच्या गल्लीपर्यंत. खरं तर, एखादी मोठी स्कीम सहज झाली असती. पर नही… बंगल्याचं काम चालू होतं.

बंगला कसला? माॅडर्न वाडा. एखाद्या पेशवाई वाड्यासारखा लुक. आर. सी. सी. च. महिरपी खिडक्या, दारं.. पंधरा वीस मोठाल्या खोल्या असतील. सुबक, प्रशस्त. जुन्या नव्याचं अल्टीमेट काॅम्बो. मालक जाम पैसेवाला असणार. अन दर्दीही. मी जाम ईम्प्रेस झालो.

… एकदम आतून जाणवायला लागलं. या जागेशी, माझं खूप जवळचं कनेक्शन आहे. काय संबंध?

माझं मलाच सांगता येईना. गुहागरसारख्या छोट्या गावातला मी. इथं अभिनवला अॅडमिशन मिळाली.

आणि पुण्यात पहिलं पाऊल टाकलं. आता पुण्याचाच झालो. इंटेरियरचा डिप्लोमा केला. एका मोठ्या फर्ममधे चार पाच वर्ष नोकरी केली. अनुभव घेतला. चार ओळखी झाल्या. आता स्वतःच इंटेरियरची कामं घेतो. विशेषतः बंगल्यांची… जास्त करून कोथरूड, बाणेर, औंध या भागात. एकेक साईट सहा सहा महिने चालते. आलात कधी, तर दाखवीन एखादी साईट. क्लायंट खुश असतो माझ्यावर. दहा बारा लोकांची चांगली टीम आहे. हळूहळू जम बसतोय. लग्न झालंय. एक पोरगा आहे. सासुरवाडी कोकणातलीच. चिपळूणातली. स्वतःचा फ्लॅट बुक केलाय. इकडे पेठांमधे फारसं येणं होतच नाही. म्हणून तर म्हणतोय….. या जागेशी माझं काही कनेक्शन असणं, शक्यच नाही. निदान या जन्मात तरी.

माझ्याकडून बघून तुम्हाला काय वाटतं? हा माणूस, पक्का बनेल असणार. चूना लावणार आपल्याला.

नाही हो…. तसा नाहीये मी. चांगला उंच आहे. गोरा आहे. फक्त.. डोळ्यांनी घोटाळा होतो. माझ्या डोळ्यांचा रंग हिरवा आहे… बिल्लोरी… समुद्राचं गहिरं पाणी आणि माझे हिरवे डोळे.. बघणारा वचकतोच क्षणभर. कुणालाही मी आतल्या गाठीचाच वाटतो. शाळेत असताना तर मला बोका म्हणायचे. जाऊ दे.

खूप सहन केलंय या डोळ्यांपायी.

तर मी काय सांगत होतो?

एकदम वाटलं.. इथलं इंटेरियरचं काम मिळालं तर? मजा आयेगा. पैसा तर मिळेलच. पण अशा पेशवाई वाड्याचं इंटेरियर… जुना काळ पुन्हा उभा करीन मी. रिवाईन्ड केल्यासारखा.. मजा आयेगा.

… अवघड आहे. खूप लोकं गळ टाकून बसली असणार. मेरा नंबर कब आयेगा? शायद आयेगाही नही.

ट्राय करायला काय हरकत आहे?

समोरच्या टपरीवर चौकशी केली. इनामदार साहेंबांच्या बंगल्याचं काम चालू आहे.

‘साहेब कुठं भेटतील? ‘

‘शोरूमवर. लक्ष्मी रोडला. ” घाटगे आणि मंडळी ” मोठ्ठं ज्वेलर्स शाॅप आहे. तिथं भेटतील. ‘

.. बहुधा साहेब तिथं जनरल मॅनेजर असणार. बॅगमधे लॅपटाॅप होताच. तिथं जावून धडकलो.

जयंत इनामदार… पंचावन्नच्या आसपास वय. जिभेवर साखर. आदबशीर बोलणं. एसी केबीन.

.. त्याची हैसीयत दाखवणारं. समोरचा मोठा असो वा छोटा.. सगळ्यांना आपलसं करणारं मधाळ बोलणं.

पक्का बिझनेसमन.

मी येण्याचं कारण सांगितलं. लॅपटाॅपवर आधीच्या साईटचे फोटो दाखवले. क्लायंट लिस्ट दिली. एकाशी तो बोलला सुद्धा लगेच. सॅटीस्फाईड. त्यानं लगेच साईटप्लॅन दिला.

“बाकीचं काम पूर्ण होत आलंय. इन्टेरीयरचं काम लगेच सुरू करायचंय. दोन दिवसांत तुम्ही तुमची ड्राॅईंग्ज द्या. कोटेशन द्या. मग पुढचं बोलू. अर्थात ड्राॅईंग्ज आवडायला हवीत. बेस्ट लक”.

मी ढगात पोचलेलो. यकीन नही आता टाईप झालेलं. इतकं सहज काही चांगलं घडू शकतं? माझा विश्वासच बसत नव्हता. दोन दिवस घड्याळ बंद. फक्त कॅलेंडर बघायचं. रात्रीचा दिवस आणि व्हाईस वर्सा.

प्रत्येक रूमचा डीटेल्ड प्लॅन आणि ड्राॅईंग्ज. संपूर्ण घराच्या इन्टेरियरचा, एक अॅनीमेटेड थ्रीडी व्हीडीओ पण केलेला. हे काम प्रचंडच होतं. सत्तर ऐशी लाखाचं.

पुन्हा ‘घाटगे आणि मंडळी’ची वारी. जयंतराव झिंदाबाद. जयंतराव हुशार माणूस. त्यांनी व्यवस्थित क्वेरीज काढल्या. मीही सोल्यूशन देत गेलो. मग वाटाघाटी… दोन तास मी किल्ला लढवत होतो. आॅपरेशन सक्सेसफुल. काम मिळालं. खिशात दहा लाखाचा अॅडव्हान्सचा चेक, घेवून मी बाहेर पडलो.

” अजून काम मिळालंय, असं फायनल समजू नका हं… आमच्या बाईसाहेबांना, तुमची ड्राॅईंग्ज पसंत पडायला हवीत. त्यांनी ग्रीन सिग्नल द्यायला हवा. त्या सांगतील ते चेंजेस करावे लागतील. घरच्या बाॅस त्या आहेत…. तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी इनामदार. आमचा खरं तर डेअरीचा व्यवसाय. जोरात चालायचा. हे दुकान आमच्या सासरेबुवांचं. बाईसाहेबांशी लग्न झालं. त्या एकुलत्या एक. सासरेबुवांनी गळ घातली. आम्ही डेअरीचा धंदा बंद करून, या धंद्यात शिरलो. लक्ष्मीमातेची कृपा… एकाची चार शोरूम झालीयेत आता. ही साईट जिथं आहे, तिथे आमच्या सासरेबुवांचा वाडा होता. दीडशे वर्ष जुना. बाईसाहेबांच्या फार आठवणी आहेत तिथल्या. म्हणूनच तर बंगल्याला वाड्याचा लुक दिलाय. बाईसाहेबांना खूष ठेवा म्हणजे झालं. ” … जयंतराव हसत हसत म्हणाले.

” मी नक्की प्रयत्न करीन ” मी आश्वासन दिलं.

दोन दिवसांनी प्रत्यक्ष साईटवर. जयंतराव आणि बाईसाहेब. बाईसाहेबांशी पहिली भेट. मी हक्काबक्का.

आरस्पानी, नितळ चेहरा. केसांचा बाॅबकट. कानात हिऱ्याचं नाजुक कानातलं. कुठली तरी भारीतली साडी.

हलकासा मेकअप. धुंदी सेंटी सुवासीक वावर. मोठ्ठे बोलके डोळे. खानदानी सौंदर्य. हातचं राखून बोलणं.

तरीही.. सहज जाणवलं… हा फक्त मुखवटा आहे… खूप काही लपवणारा. काहीतरी जळतंय.. खोल.. आतून. डोळ्याच्या एका कोनातून, ते दुःख सहज रिफ्लेक्ट होणारं. निदान मला तरी तसं जाणवलं. दुसऱ्या क्षणी… त्यांनी हसून स्वागत केलं.

– क्रमशः भाग पहिला  

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निर्गुण साक्ष… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ निर्गुण साक्ष… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

श्रीधर मॉर्निंग वॉकला निघाला होता. हिरव्यागार झाडीतून वाहणाऱ्या गार वाऱ्याने मन प्रसन्न झाले.आपोआप ओठावर गाणे आले.पावलाची गती वाढली.पावले झपाझप पडायला लागली.तेवढ्यात ग्यानबा तुकारामाचा गजर कानी पडला.भगव्या पताका डोळ्यात भरल्या.समोरून वारकऱ्यांची दिंडी येताना दिसली.श्रीधरचे पाय जागीच थांबले.किती दिवसांनी जवळून दिंडीचे दर्शन घेत होता.नवी ऊर्जा मनात भरली. चैतन्य जागृत झाले.मन हलकं हलकं झालं.श्रीधरचे मन भूतकाळ गेले.

नात्यापोत्या जवळ माझे गाव होते. घराघरात हरिपाठ होत असे.गाव सात्विक गुणांचे होते.कुणाचे कुणाशी भांडण नव्हते. तंटा नव्हता.सगळे कसे गोडीगुलाबीने रहात.राबुन खात.विठ्ठल नाम ओठांत.आषाढी वारी म्हणजे मोठा सोहळा, मोठा उत्सव.प्रत्येकाच्या गळ्यात माळ. प्रत्येक माणूस सेवाभावीवृत्तीचा.या पेक्षा आमचे घर वेगळे नव्हते. नात्यापोत्याला दिंडी मुक्काला आली की त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था अण्णा, आबा करत. अण्णा म्हणजे माझे बाबा आणि आबा म्हणजे माझे काका. तेव्हा अण्णाची, काकाची गडबड होई.वारी पुढे मार्गी लागे पर्यंत त्यांना चैन पडत नसे.मी त्यांच्या सोबत असे.मी हे सारे जवळून बघत होतो.माझे बाबा नेहमी म्हणत ” वारी म्हणजे चैतन्याचा जागर.वारी म्हणजे अध्यात्मिक जीवाचा मेळा, वारी म्हणजे एकसंघभाव.इथं सगळे भेदभाव मिटतात.इथं खऱ्या भगवंताचे दर्शन होते.ते बघायला आपली तशी दृष्टी हवी.” मी कामानिमित्त शहरात आलो.शहराचा होऊन गेलो. सुट्टी काढून जेव्हा गावी जात असे तेव्हा बाबा नेहमी म्हणत “श्रीधर बाळा काही कर.पण आयुष्यात एकदा तरी पायी वारी कर.म्हणजे जगण्याचा खरा अर्थ तुला उमगेल.देव दगडात नाही तो चैतन्यात आहे.हे वारी तुला शिकवेल ” वारी करण्या एवढी सुट्टी कधी मिळाली नाही.पायी वारी कधी घडली नाही.

आज दिंडी बघून बाबाची आठवण झाली.गावाची आठवण झाली.मी करंटा.एवढं सांगून ही मला काही पायी वारी करणे जमले नाही.पण माणसातील देव शोधण्याचा यत्न मी काही सोडला नाही.माझ्या परीने मी गरजवंताला मदत करत आलो‌.आता मला चैतन्याचा पुजारी व्हायचं आहे.तिथंल्या विठूरायाची भेट घ्यायची आहे.हे माझ्या हातून कधी होईल मला माहित नाही.पण ही भेट झाल्या शिवाय मी डोळे मिटणार नाही हे खरं.

“पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय!! ” गजर झाला.दिंडी पुढे गेली.

श्रीधर सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाला.मुलाबाळाचे शिक्षण, लग्न, घर यासाठी काढलेले कर्ज भागवून काही रक्कम श्रीधरने खास राखीव ठेवली होती.त्याचा कुणाला पत्ता लागू दिला नाही.एक दिवस रमाला म्हणाला “आता मला शांतपणे गावी जाऊन रहायचं आहे.तू बरोबर येशील? “

“आता हे काय नवं खुळ.”

“हे खुळ नाही.हे माझे स्वप्न आहे.”

” तिथं तुम्हाला करमणार नाही.तुमचे सगळे आयुष्य इथं शहरात गेले.इथल्या सुखसाईची सवय लागली आहे.”

“न करमायला काय झाले? माझे बालपण खेड्यातच गेले आहे.”

“मग मला कसली अडचण असणार? पण आपण तिथं करणार काय? “

” तू तयार आहेस ना.मग झालं तर. बघ मी काय काय करतो ते”

श्रीधर, रमा गावी आले.त्यांनी जमीन विकत घेतली.तिथच एक छोट घर बांधले.विठू माऊलीचे नाव घेत घेत जागा स्वच्छ केली.जागा खणली. तिथं वीस सागाची, वीस आंबाची, वीस आवळांची, वीस चिंचेची, झाडे लावली. चिक्कू, पेरू, डाळिंब अशी खुप सारी झाडे लावली.माऊलीचे नाव घेत त्या झाडांची देखभाल केली.दोन चार जनावरे घेतली.घराच्या पुढच्या भागात भाजीपाला लावला.मन निसर्गाच्या सेवेत झोकून दिले.त्यांचे ते श्रम बघून येणाऱ्या जाणारे त्यांना खुळ्यात काढत होते.शहरातील आरामदायी जीवन सोडून, कुठे झाडे लावत बसलीत आहेत ही शहाणी माणसं? यांना काही कळत नाही.

पण जसं जशी झाडे जोमाने वाढू लागली.त्यांना फुले फळे येवू लागली. तशी तिच माणसे त्यांचे कौतुक करू लागली.चहापाण्याला हक्काने घरी जावू लागली.दोघाचे कौतुक करू लागली.

तेव्हा श्रीधर म्हणे ” ही सारी विठू माऊलीची कृपा आहे.मी निमित्तमात्र आहे.”

येणारे लोक रिकाम्या हाताने कधी परत गेले नाहीत.फळे, भाजी पाला काही ना काही त्यांना ते प्रसाद म्हणून देत.

झाडांची वाढ झपाट्याने होत होती. तिथं एक छोट रानच तयार झालं होत.अनेक पक्ष्यांनी झाडावर घरटी बांधली होती.त्यांच्या किलबिलाटाने श्रीधरला जाग येत होती.स्वर्गीय सुख तो अनुभवत होता.निसर्गातील या चैतन्यात माझा विठूराया वसला आहे.हे चैतन्य मला रोज नवी उर्जा देते. झाडाची पाने हलतात तेव्हा श्रीधरला वाटते झाडे टाळ्या वाजवत हरीनाम घेत आहेत. माझा विठूराया इथल्या कणाकणात वसला आहे.तो म्हणतो तू फक्त विश्वासाने हाक मार मी इथेच आहे. झाडाची फळे म्हणजे श्रीधरला विठूरायाची भेट वाटते.तो ती फळे येणाऱ्या जाणाऱ्यांना देतो.निसर्गाच्या चैतन्यात त्याचा विठू त्याला रोज भेटतो.

एके दिवशी रात्री सोसाट्याचा वारा सुटला.बाहेर पाऊस कोसळत होता.लाईट गेली. मेणबत्तीच्या उजेडात जेवण झाले. तेवढ्यात श्रीधरला अस्वस्थ वाटायला लागलं.घाम फुटला.छातीत दुखायला लागले.रमा घाबरली.खिडकी उघडावीत तर पाऊस घरात येईल. काय करावे? मदतीला कोणाला बोलवावे? रात्री गावात डॉक्टर नसतात. मी कुणाला बोलवू? मी काय करू? निश्चय करून तिने ओढणी घेतली. त्यांने श्रीधरला पाठीला बांधले.आता मीच गाडी घेऊन शहरातील दवाखान्यात जाते.ती दाराजवळ आली.दार उघणार एवढ्यात दारावर टकटक झाली.दार उघडले तर एक व्यक्ती पावसात भिजत होती.

” माऊली. आज रात्री पुरता आसरा दे मला.”

” मला शक्य नाही.मी माझ्या पतीला घेऊन दवाखान्यात निघाले आहे.बाबा तू दुसरीकडे आपली सोय बघ.”

” तुम्ही आसरा दिला तर माझी मदत होईल तुम्हाला.”

” “

” विश्वास ठेवा माझ्यावर.ऐक माझ.पतीला बिछानावर ठेव. मेणबत्ती जरा उंच धर.” त्या व्यक्तीच्या सांगण्या प्रमाणे रमा करत गेली.तिने विरोध केला नाही.त्या व्यक्तीने काय केले माहित नाही.पण……

“र..मा….र…मा.”म्हणून हाक ऐकू आली. श्रीधरला सुखरूप बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.हात जोडले. “विठ्ठला….तुझीच रे कृपा सारी” तेवढ्यात लाईट आली.बघते तो काय…..घरात दोघांच्या शिवाय तिसरे कोणीच…नव्हते.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आक्रमण – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ आक्रमण – श्री  सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

बावीसावं शतक. एक दिवस देशात अघटित घडलं. मोठं संकट सर्वांवर आलं. सकाळी लोक उठले आणि बघितलं, तर काय? सगळीकडे फुलपाखरंच फुलपाखरं. खेडी, लहान-मोठी गावं, शहरं, महानगरं कुठेही बघा. फुलपाखरंच फुलपाखरं. शेतात फुलपाखरं, अंगणात फुलपाखरं, घरात फुलपाखरं, गल्ली-बोळात फुलपाखरं, बाजारात फुलपाखरं, रस्त्यात-चौकात फुलपाखरं. करोडो-अब्जांच्या संख्यने फुलपाखरंच फुलपाखरं. ऑफीसमध्ये फुलपाखरं होती. मंत्रालयात फुलपाखरं होती. न्यायालयात फुलपाखरं होती. इस्पितळात फुलपाखरं होती. फुलपाखरं इतक्या मोठ्या संख्येने होती, की माणसं कमी आणि फुलपाखरंच जास्त झाली.

सामान्य जन-जीवन पूर्णपणे अस्ताव्यस्त झालं. असं वाटत होतं की जसं काही फुलपाखरांनी देशावर आक्रमण केलय. दिल्लीत संसदेचं सत्र चालू होतं. फुलपाखरं मोठ्या संख्येने लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये घुसली. प्रेक्षकांच्या गॅलरीत फुलपाखरंच फुलपाखरं भिरभिरू लागली. अध्यक्ष आणि सभापतींच्या आसनांच्या चारी बाजूंनी फुलपाखरंच फुलपाखरं फडफडू लागली. अखेर दोन्ही सदनांची कारवाई दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. राज्यातही विधानसभा आणि विधान-परिषदेची कारवाई दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. सुरक्षा यंत्रणा सावध झाली. फुलपाखरांच्या देशावरील आक्रमणात शेजारी देशाचा तर हात नसेल. हे त्यांचच षडयंत्र तर नसेल? विचार सुरू झाला.

सगळ्या देशात आरडा-ओरडा, रडणं-भेकणं सुरू झालं. रस्त्यातील वाहतूक बंद झाली. न्यायालयातील कारवाई दिवसभरासाठी स्थगित केली गेली. शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आली. मंत्रालयात, ऑफिसात काही काम होत नव्हतं. इस्पितळात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला कारण आपत्कालीन सेवा कक्षात मोठ्या संख्येने फुलपाखरं घुसल्याने नर्सेस आणि डॉक्टर रुग्णांकडे नीट लक्ष देऊ शकत नव्हते. ऑपरेशन-थिएटरमध्ये फुलपाखरं भिरभिरत असल्याने ऑपरेशन्स स्थगित करावी लागली. फुलपाखरं इतक्या मोठ्या संख्येने भिरभिरत होती की त्यांनी सूर्याला झाकून टाकलं होतं. भर दुपारी अंधार पडला. रेडिओ आणि टी. व्ही. यांचं प्रसारण बाधित झालं. टेलीफोन सेवा ठप्प झाली.

सगळे आवाक झाले. कुणालाच समाजत नव्हतं की हे अचानक काय झालं? सरकारवर आपत्ती कोसळली होती. प्रशासन लाचार दिसत होतं.

सुरुवातीला लहान मुलांना मजा वाटली. ती फुलपाखरांशी खेळू लागली, पण जेव्हा परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव लोकांना झाली, तेव्हा त्यांची शुद्ध – बुद्ध हरपली. असं नाही, की त्यांनी या समस्येवर काहीच इलाज केला नाही. बेगॉन स्प्रेपासून ते सगळ्या प्रकाराची कीटक नाशके फुलपाखरांच्या फौजेवर फवारली गेली. पण त्यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. पोलिसांनीही आपल्या परीने स्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. देशात अनेक ठिकाणी फुलपाखरांवर अश्रू धुराचे गोळे फोडले. त्यांच्यावर लाठीमार केला. काही ठिकाणी त्यांच्यावर फायरिंगसुद्धा केलं. पण काही उपयोग झाला नाही. फुलपाखरांची संख्या इतकी अतोनात होती, की गोळ्या कमी पडल्या. विमान आणि रस्त्यावरील वाहतुकीवर फुलपाखरांच्या अस्तित्वाचा खूप वाईट परिणाम झाला. जागोजागी दुर्घटना झाल्या. त्यात अनेक लोक मेले. शेवटी वैज्ञानिकांनी काही फुलपाखरे पकडली आणि ‘ एलेक्ट्रोन माइक्रोस्कोप ‘खाली त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या हैराणीला सीमाच उरली नाही. त्यांना दिसलं की फुलपाखरांच्या पंखांवर बारीक अक्षरात कुठलं ना कुठलं आश्वासन लिहिलय. मग हे कोडं उलगडलं. ही फुलपाखरे म्हणजे करोडो, अब्जावधी आश्वासने आहेत. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यानंतर पुढार्‍यांनी, अधिकार्‍यांनी गेल्या अनेक वर्षात जी आश्वासने दिली होती, पण पूर्ण मात्र केली नव्हती, ती सगळी खोटी आश्वासने, फुलपाखरे बनली होती.

ही बातमी सगळ्या देशात वणव्यासारखी पसरली. लोक चर्चा करू लागले, एक ना एक दिवस हे होणारच होतं. खोटी वचने, पोकळ आश्वासने किती काळ देणार? एक ना एक दिवस पापाचा घडा भरणारच की!

इतिहासकारांनी ताबडतोब एक आपत्कालीन बैठक बोलावली. सरकारला आठवण करून देण्यात आली, की शेकडो वर्षांपूर्वी विश्वातील पहिले गणतंत्र राज्य वैशाली होते. याच प्रकारच्या प्रकोपामुळे ते नष्ट झाले होते. ज्या लोकशाहीत नेते, पुढारी, अधिकारी खोटी वचने आणि पोकळ आश्वासने देतात, त्या लोकशाहीची परिस्थिती वैशाली गणतंत्रासारखीच होते. भविष्यवेत्त्यांनीही इतिहासकारांच्या या बोलण्याचं समर्थन केलं.

हे सगळं ऐकून सरकार सक्रीय झाले. एक सर्व पक्षीय बैठक बोलावली गेली. बैठकीत वैज्ञानिक, इतिहासएचे अभ्यासक आणि भविष्यवेत्ते यांच्या बोलण्यावर चर्चा झाली. पण एक तर चारी बाजूंनी फुलपाखरेच फुलपाखरे भिरभिरत होती. दुसरं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपच्या अशा फैरी झडत होत्या, की त्यातून कोणताच निर्णय होऊ शकला नाही. या अशांत काळातही हे शाबीत करण्याची दोन्ही पक्षात चढाओढ लागली होती, की खोटे वायदे कुणी जास्त केले होते आणि कुणी कमी.

घरा-घरातदेखील असाच परिणाम दिसत होता. पती-पत्नीने एकमेकांना, आई-वडलांनी मुलांना खोटे वायदे केले होते, आश्वासने दिली होती. ते सगळे खोटे वायदे आणि आश्वासने असंख्य फुलपाखरे बनून घरात चारी बाजूंनी भिरभिरत होती आणि घरवाल्यांना सतावत होती.

जे वायदे १९६०च्या दशकाच्या आधी केलेले होते, ते ‘ ब्लैक-अ‍ॅंड-व्हाइट ‘ फुलपाखरांच्या रूपात चारी बाजूंनी फडफडत होते. सिनेमात रंगीत युग आलं, त्यानंतर केलेले वायदे रंगीत फुलपाखरांच्या रूपात चारी बाजूंनी फडफडत होते.

अशा तर्‍हेने पूर्ण दिवस सरला. या समस्येवर कुठलाच उपाय सापडला नाही. रात्रीचे बारा वाजून गेले आणि सगळ्या फुलपाखरांचं रूपांतरण झालं आणि ते टोळ बनून लोकांवर हल्ला करू लागले. त्यांच्या निशाण्यावर विशेष करून मंत्री, राजनेते, आणि अधिकारी होते. ते घरात घुसून झोपलेल्या लोकांवर हल्ले करू लागले. सगळीकडे हाहाकार मजला. स्थिती वाईटापेक्षा वाईट होऊ लागली.

अखेर सकाळी चार वाजता कॅबिनेटची एक आपत्कालीन बैठक झाली. सरकारने निर्णय घेतला, की सगळे अपूरे वायदे आणि आश्वासने एका निश्चित कलावधीत पूर्ण केली जातील. दुसरा कुठला उपायच नव्हता. टोळधाडीचे हल्ले चालूच होते. हे मोठं कठीण काम होतं. अपूरे वायदे आणि आश्वासने यांची संख्या कोटी, अब्जावधी होती. तेवढ्याच संख्येने टोळ होते. जेव्हा एखादा अपुरा वायदा किवा आश्वासन पूर्ण व्हायचं, तेव्हा एक टोळ गायब व्हायचा. पण कोटी – अब्जावधी वायदे आणि आश्वासने पूर्ण व्हायला वर्षे लागली. तेव्हा कुठे देशातील टोळधाडीचा कहर समाप्त झाला आणि देशाची स्थिती सामान्य झाली.

या बातमीचा परिणाम सगळ्या दुंनियेत झाला. बाबीसाव्या शतकाचा इतिहास याला साक्षी आहे, की दुसर्‍या देशातील राजनेते आणि अधिकारी यांनी टोळ्धाडीच्या भयाने आपल्या देशात केलेले सगळे अपुरे वायदे आणि आश्वासने पूर्ण केली.

मूळ हिन्दी कथा – “हमला“

मूळ लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा – ‘सैनिकाची आई‘ / ‘मातीतच संपतो‘ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ दोन लघुकथा – ‘सैनिकाची आई‘ / ‘मातीतच संपतो‘ ☆ श्री मयुरेश देशपांडे

१) सैनिकाची आई…

मी मागे वळून पाहिलं आणि हातातली सतार अलगद खाली ठेवली. शारदा ताईंना झोप लागली होती. मी हळूच खोली बाहेर आले. ओसरीच्या पायऱ्यांवर खांबाला टेकून निवांत बसले. हि रात्र माझ्या आयुष्यात दरवर्षी येते. सकाळपासूनच शारदा ताई अस्वस्थ होतात. मनोसोक्त रडतात. जुन्या आठवणी सांगतात. अगदी रात्री उशिरा पर्यंत त्यांना झोप येत नाही. मग मी देवघरातल्या समईची वात सारखी करते. हातात सतार घेऊन देवापुढे बसते व एकेक अभंग गायला सुरवात करते. शारदा ताईच काय सारा आश्रम तल्लीन होऊन ऐकत असतो. कोणी साथ देतो, कोणी तान देतो तर कोणी नुसतच गुणगुणतो.

पाहता पाहता सारा आश्रम शांत झोपी जातो. चार पाच अभंगांनंतर तर शारदा ताईंनाही झोप लागते. आणि मग मी अशीच बाहेर येऊन खांबाला टेकून ओसरीच्या पायऱ्यांवर बसते. साऱ्या आश्रमाला धीर देणाऱ्या शारदाताई स्वतःला मात्र कधीच धीर देऊ शकल्या नाहीत. सगळ्यांना दुःख विसरायला शिकविणाऱ्या शारदाताई स्वतःचे दुःख कधीच विसरु शकल्या नाहीत.

हेमंतराव शहिद झाले तेव्हा अगदीच सुरवातीचे काही दिवस वगळता, त्या धैर्याने उभ्या राहिल्या. आदित्यला सैनिकी शाळेमध्ये आधीच घातले होते. तिथून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि मग लष्करातला बडा अधिकारी असा आदित्यचा प्रवास झपाट्याने झाला. तो वडिलांची जागा घेईल असे म्हणता म्हणता त्याने ती जागा घेतली सुद्धा. शारदा ताईंनी त्याला फोटोंमध्येच मोठा होताना पाहिले. आपले सर्व शिक्षण व लष्करातले पहिले पोस्टिंग संपवून पहिल्यावहिल्या अधिकृत सुट्टीवर तो घरी आला.

सुरुवातीला दार उघडले तेव्हा शारदाताईंना समोर हेमंतराव असल्याचाच भास झाला. तोच उंचधिप्पाड देह, तीच अधिकाऱ्याची टोपी, तोच कडक इस्त्री केलेला गणवेश, उजव्या खिश्याच्या वरती विविध पदकांची दाटी, पण मान मात्र विनम्रतेने खाली झुकलेली. आई आत घेणार नाहीयेस का? त्याच्या प्रश्नाने शारदाताई भानावर आल्या व समोर हेमंतराव नाही तर जणू त्यांचेच प्रतिरुप असलेला आपला मुलगा आदित्य आहे याची त्यांना जाणीव झाली.

आदित्य घरी आला आणि घराचे पुन्हा गोकूळ झाले. त्याच्या मित्रांचे येणे जाणे, त्यांचा गोंधळ, सारे काही त्या कानांत आणि डोळ्यांत साठवून घेत होत्या. त्याचे लाड पुरवता पुरवता त्याची सुट्टी कधी संपत आली हे कळलेच नाही. एके दिवशी भिंतीवरच्या कालनिर्णयावर फुली मारणाऱ्या आईला पाहून, आई मी सुट्टी वाढवून घेऊ का? तश्या बऱ्याच रजा आहेत बाकी, आदित्यने विचारले. इतर कोणाची आई असते ना, तर पटकन हो म्हणाले असते. पण मी एका सैनिकाची आई आहे, शारदाताईंनी आदित्यला आपले उत्तर सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आदित्यला लवकर उठविले. आई झोपु दे ना, परत अशी झोप नाही मिळणार, आदित्य डोक्यावर गोधडी घेत म्हणाला. चल उठ लवकर, आज आपल्याला एका महत्वाच्या ठिकाणी जायचे आहे, शारदा ताईंनी एवढेच सांगितले. समोरच्या कमानीवर मोठ्या अक्षरांत मातोश्री वृद्धाश्रम असे लिहिले होते. त्याला काहीच कळत नव्हते. ते दोघे कार्यालयात गेले. या शारदा ताई, तुमचा फॉर्म भरुन तयार आहे, निर्मला ताईंनी दोघांचे हसून स्वागत केले.

आई हे काय चालले आहे? आदित्य जवळ जवळ ओरडलाच. शांत हो बाळा. आपण बाहेर पडल्यावर बोलू. हे बघ तुझे बाबा गेले तेव्हाच खरे तर मी एकटी पडले होते पण तुझी जबाबदारी होती म्हणून दिवस कसे गेले कळलेच नाही. आता तुझी जबाबदारी संपली आहे. तु कामावर चालला आहेस. कमीतकमी अकरा महिने तरी घरी परत येणार नाहीस. मग एवढे दिवस घर मला खायला उठेल. इथे माझ्या वयाच्या बायका आहेत, त्यांच्यात मी सहज मिसळून जाईन.

आदित्यला खरे तर आईचा निर्णय पटला नव्हता पण त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला निश्चिंत करत होता. आठवड्याभरात तो सैन्यात आणि शारदाताई आश्रमात परतल्या. इथे सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहता राहता इथल्या कधी झाल्या हेच कळाले नाही. मला तर त्यांनी आपली मुलगीच मानले होते. किंबहुना आश्रमातले सगळेच तसे म्हणतही होते. आम्ही दोघी एकमेकींवर जीवापाड प्रेम करत होतो. माझे संगीत माझे गाणे त्यांना प्रचंड आवडत होते.

तो दिवस आलाच, जो कुठल्याच सैनिकी कुटुंबाच्या जीवनात येऊ नये असे त्या कुटुंबाला कायम वाट असते. दारावरची तार आणि टिव्हीवरची बातमी एकाच वेळी आले. आदित्य नक्षलवाद्यांशी लढता लढता शहीद झाला होता. शारदा बाई कोसळल्याच. आणि यावेळी मात्र उभ्याच नाही राहिल्या. ज्यांनी आयुष्यात अनेकांना उभं केलं त्यांना कोणीच उभं करु शकले नाही. एरवी वर्षभर त्या नॉर्मल असतात. पण हा दिवस आला की कपाटात लपवलेला आदित्यचा फोटो बाहेर काढतात आणि दिवसभर रडत बसतात. अगदी रात्री उशिरा पर्यंत.

काही तरी वाजले आणि माझी तंद्री तुटली. मांजरच असावे बहुतेक. मी पुन्हा आत आले. शारदाताईंना शांत झोप लागली होती. त्यांच्या मानेखालची उशी नीट केली. अंगावर पांघरुण घातले आणि मीही आता बाजूच्याच पलंगावर झोपी गेले.

 – लेखक म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

 +९१ ८९७५३ १२०५९

*  *  *   * 

(२) मातीतच संपतो… 

“ये अंबूजा सिमेंट से बनी दिवार है, तुटेंगी नहीं|”, भिंतीवरती पिवळ्या रंगावर निळ्या रंगाने लिहिलेली अंबूजा सिमेंटची जाहिरात तीने पाहिली आणि इथच घर बांधू असे ती पटकन म्हणाली. माझ्यासाठी ती एक साधी झोपडी असली तरी तिच्यासाठी तीच घर होत. तीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह बघून मी हि तीथेच झोपडी उभारायचे ठरविले. त्याच सोसायटीमध्ये मी सुरक्षारक्षक म्हणून कामाला असल्याने कोणी विरोध करायचाही प्रश्न नव्हता.

तिने हातातली वळकटी खाली ठेवली. मी हि डोक्यावरचे ओझे उतरवले. तीला सामानापाशीच हुशारीने थांबायला सांगून झोपडी उभारण्यासाठीचे सामान शोधायला निघालो. जवळच हे मंडपवाला होता. खूप विनवणी केली तेव्हा त्याने त्याच्याकडचे त्याच्यासाठी टाकाऊ पण माझ्यासाठी उपयुक्त असे काही बांबू दिले. पुढे थोड्याच अंतरावर एका राजकीय पक्षाचे कार्यालय होते. कार्यालयाच्या मागच्या अडगळीत काही जूने फ्लेक्स पडलेले होते. विनंती करुन ते फ्लेक्स उचलून आणले.

सामान ठेवले होते तिथे आलो. वाट पाहून बायकोने रस्त्यावरच अंग टाकले होते. नुकताच डोळा लागला असावा. उठवावे वाटत होते पण नाही उठवले. मी एकट्यानेच झोपडी बांधायला घेतली. एकाला एक बांबू जोडले. बाजूने व वरून फ्लेक्स बांधले. आतली जमीन थोडी सारखी केली. किमान आडोसा होईल असे बांबूचेच एक दार बनविले. मग एकेक करुन सामान आत ठेवले. जेव्हा तिच्या डोक्या खालची वळकटी फक्त आत ठेवायची बाकी राहिली, तेव्हा तिला उठवले.

आपल्याला झोप लागली हे लक्षात आल्यावर तीची तीलाच लाज वाटली. पण मग जेव्हा समोर उभारलेला रंगीबेरंगी महाल बघितला तेव्हा तिच्या आनंदाला सीमा उरली नाही. क्षणाचीही उसंत न घेता तिने आजूबाजूचे आंगण झाडून काढले. दारासमोरल्या मातीवर रेघोट्या ओढत नक्षीदार रांगोळी काढली. मग यलम्मा देवीचे नाव घेत रीतसर उजव्या पायाने तिने झोपडीत प्रवेश केला. माझ्या झोपडीमध्ये आज खऱ्या अर्थाने लक्ष्मी आली.

जुजबी लिहिता वाचता येणाऱ्या तिने झोपडीत प्रवेश करताच ती ओळ पुन्हा वाचली.. ” ये अंबूजा सिमेंट से बनी दिवार है, तुटेंगी नहीं |” आणि स्वतःशीच हसली. तिला चुलीसाठी विटा व लाकडं आणून दिली. पण बनवायच काय? मस्तपैकी काळ्या कोंबड्याचं वशाट आणा. फक्कड तांबडा रस्सा बनविती तुमच्यासाठी. आज आपला पहिला दिवस हाय ना व्ह. यलम्मा देवीला छानपैकी नैवेद दाखवू आणि सुरवात करु. ” तिची भोळी बाबडी श्रद्धा बोलली.

नविनच सोसायटी होती. अजून बांधकाम शंभर टक्के पूर्णभी झाल नव्हतं. काही बिर्हाड राहिला आली होती, काही यायची होती. मला बिल्डरनेच सुरक्षारक्षक म्हणून कामाला लावले. सहा महिने झालं असतील. माझं नवीनच लग्न झालेलं. किती दिस बाहेरच खाणार आणि किती दिसं बायकोपासून लांब राहणार म्हणून या वक्ताला तीलाबी सोबत घेऊन आलो. गाठीशी थोडी दमडी जमली होती त्यातुनच वशाट आणलं आणि थोडी मीठ मिरची. खोटं कशाला सांगा, वाटेत मापट भर लावून आलो होतो. तीला सांगणार नव्हतोच पण चेहऱ्यावरची तरतरी बघून तीला समजलेच. पहिलाच दिवस म्हणून तीहि काय बोलली नाय.

किती दिसांनी जवळ झोपत होतो. रात्रभर दोघांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठायला उशीर झाला. मालक आले तेव्हा गेट उघडायला कोणीच नाही बघून चिडले पण पहिला दिवस म्हणून माफ केले. एकेक दिवस जाऊ लागले. आमचं बस्तान बसलं होतं. मी सुरक्षारक्षकाचं काम करत होतो. तीने पण सोसायटीत दोन कामे मिळवली होती. सगळे कसे छान चालले होते. आमचा संसार फुलला होता, त्याला दोन फळेबी आली होती.

एक दिवस ती काळरात्र आली. खरे तर गेली चार दिवस तुफान पाऊस पडत होता. पण आज जरा पावसाने रौद्ररुप धारण केले होते. कडाडणाऱ्या वीजा काळजात धडकी भरत होत्या. संध्याकाळी मालक गेला तसे मी गेट बंद करुन झोपडीकडे धाव घेतली. घराबाहेर पडता येत नाही म्हणून पोर कंटाळून गेली होती. त्यांच्याशी गप्पागोष्टी करता करता रात्र झाली. पावसाच्या आवाजाने झोप लागणे अशक्य होते, तरी दिवसभराच्या थकव्याने कशीबशी झोप लागली.

मध्यरात्री धडाम् करुन मोठा आवाज झाला. बायकोला पोरांपाशीच ठेवून मी बाहेर धावलो. सोसायटीच्या भिंतीला लागून असलेले मोठे झाड जमिन खचल्याने सोसायटीच्या कंपाउंड वॉलवर कोसळले होते. त्या कंपाउंड वॉलवर जीला लागून माझी झोपडी होती. मी मदतीसाठी धावणार तेवढयात दुसऱ्यांदा मोठा धडाम् आवाज झाला आणि त्या आवाजाबरोबर माझी दातखीळ बसली. कारण तो आवाज कंपाउंड वॉलची भिंत कोसळल्याचा होता. आणि त्या भिंतीखाली माझी संसार वेल तीला आलेली फळे सारे काही दबले गेले होते. त्यांचा आक्रोश त्या मातीखाली दाबला गेला होता कायमचाच.

माणूस मातीतून जन्म घेतो आणि मातीतच संपतो असे म्हणतात. मी आज ते अनुभवत होतो. मला राहून राहून माझ्या भोळ्याभाबड्या बायकोने जे वाक्य वाचले होते ते आठवत होते, ” ये अंबूजा सिमेंट से बनी दिवार है, तुटेंगी नहीं |”.

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

टीप: इथे “अंबुजा सिमेंट” हे नाव एक उदाहरण म्हणून घेतले आहे. प्रत्यक्षात माझा त्या कंपनीशी कोणताही हेवादेवा नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बंद पडलेल्या मोबाईलची कहाणी… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ बंद पडलेल्या मोबाईलची कहाणी… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(मंगळवारी संतोष ऑफिसमधून येताना दारातच सायली त्याची वाट पहात उभी असलेली दिसली. तो मोहरला, त्याला लग्नानंतरचे ते सोनेरी दिवस आठवले, तेव्हाही सायली अशीच त्याची वाट पहात दारात तिष्ठत असायची हे त्याला आठवलं. आणि त्या धुंदीत तो तिला जवळ घेणार इतक्यात ती त्याला म्हणाली, “चला, पटकन सर्व्हिस सेंटरला जाऊन येऊ या, नाहीतर बंद होईल ते.”) – इथून पुढे —- 

ती रोमँटिकली नव्हे, प्रॅक्टिकली दारात उभी राहिली होती.

तो उलट पावली निघाला, आणि ते दोघं सर्विस सेंटरला पोचले.

“साहेब, मी आठवडाभरात पार्ट येईल म्हणून सांगितलं होतं, ” तो टेक्निशियन ठामपणे म्हणाला.

“अहो, नाही हो, मंगळवारी येणार म्हणाला होतात तुम्ही, म्हणून तर मी ऑफिसमधून तडकाफडकी इथे आलो, ” तो काकुळतीला येत म्हणाला.

पण टेक्निशियन त्याच्या (नव्या) वाक्यावर ठाम राहिला. आणि असंही तो पार्ट आलाच नसल्याने, फोन अजूनही बंदच होता. त्याची तपासणी होण्याचा आणि त्यानुसार त्याला दुरुस्त करण्याचा प्रश्नच नव्हता.

“चष्मा दुरुस्तीला टाकल्यावर किंवा नवा करायला टाकल्यावर कसा टेम्पररी दुसरा चष्मा देतात, तशी काही सोय नाही का तुमच्याकडे ?” संतोषने चेष्टेने, पण खरं तर मनापासून विचारलं. टेक्निशियनने अर्थातच नकार दिला.

शनिवारी – फोन दुरुस्तीला दिल्यावर आठवड्याभराने यांना फोन करायचा अशी खुणगाठ बांधून ते दोघं तिथून (रिकाम्या हाताने) घरी परतले.

शनिवार – याचा सुट्टीचा दिवस. हा मुद्दाम दुपारी जेवण होईपर्यंत थांबला, पण सर्व्हिस सेंटरहून काही फोन आला नाही. शेवटी यानेच वाट बघून सर्व्हिस सेंटरला फोन केला. फोन उचलला गेला, तिथल्या माणसाला त्याने आपल्या फोनची डिटेल्स सांगितली, फोन दुरुस्तील कधी दिला होता आणि चार्जिंग सॉकेट आलं का ? हे सगळं विचारलं.

त्या माणसाने तो फोन तसाच चालू ठेवून, आतमध्ये दुसऱ्या कुणाकडे तरी विचारणा केली. आणि बऱ्याच वेळाने सांगू लागला, “नाही, ते काय झालं आहे की आमचा कंपनीला ऑर्डर द्यायचा आयडी ब्लॉक झाला आहे. त्यामुळे तुमची ऑर्डर गेलेली नाही अजून. चार्जिंग सॉकेट अजून आले नाही अजून, पण दोन-चार दिवसांनी येईल. “

इतका वेळेपर्यंत संतोषचा राग धुमसत होता. न राहवून तो शेवटी त्या माणसाला म्हणाला, “पहिल्यांदा तुमच्या माणसाने तीन दिवसात येईल म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर सात दिवसांनी सांगितलं, पण एकदाही तुम्ही स्वतःहून कळवण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि आता मी स्वतः फोन केल्यावरती मग तुम्ही उपकार केल्यासारखं सांगताय, की अजून चार दिवसांनी बघा. हे काही योग्य नाही. ” 

समोरच्याचा या बोलण्याने अपमान झाला बहुतेक, कारण तो सांगू लागला, “आम्ही इथे पाचच टेक्निशियन आहोत, ५००च्यावर फोन आमच्याकडे आहेत. कसं बघायचं आम्ही ? आणि ही उपकार करण्याची वगैरे भाषा करू नका. ” 

संतोष आता मात्र पुरता वैतागला होता. “तुम्ही एक काम करा, तो फोन राहू देत तसाच. काही त्याच्यासाठी सॉकेट मागवायची गरज नाहीये. माझा फोन मी परत घेऊन जातो. “

त्या टेक्निशियनला संतोषच्या या पवित्र्याची कल्पना नव्हती. “नाही, येईल दोन दिवसात तो पार्ट नक्की, ” असं म्हणू लागला.

“नको मला तो पार्ट. आला तर तुमच्याकडेच ठेवून घ्या. मी येतोय आणि फोन घेऊन जातोय. ” असं म्हणून तिरीमिरीत संतोष त्या सर्व्हिस सेंटरला गेला आणि आपला फोन ताब्यात घेतला.

पण असा न दुरुस्त केलेला फोन घेऊन त्याला घरी परतायचं नव्हतं. मग google वरती शोधून त्याने जवळचे दुसरे सर्व्हिस सेंटर शोधले. ते चांगले दहा किलोमीटर दूर होते. पण तरीही संतोष तसाच तो फोन घेऊन त्या सर्व्हिस स्टेशनला गेला.

तिथे काउंटरवर बसलेल्या माणसाला त्याने तो फोन दिला, ‘बंद पडला आहे’ सांगितलं. त्या माणसाने फोन चार्जिंगला लावला आणि काय आश्चर्य ! त्याच्यावरती फोन चार्ज होत असल्याचे चिन्ह आले. तो माणूस म्हणाला, “यात काही प्रॉब्लेम दिसत नाहीये. फोन तर चार्ज होतोय. ” 

संतोषला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. तो माणूस म्हणाला, “पाच मिनिटे थांबा. बॅटरी पूर्ण उतरली आहे. त्यामुळे एवढ्यात हा फोन चालू होणार नाही. आपण पाच मिनिटांनी बघू. ” 

पाच दहा मिनिटांनी बॅटरी साधारण १२ टक्के चार्ज झाली होती. त्या माणसाने फोन चालू केला. फोन चालू झाला. संतोषने व्हाट्सअप उघडून बघितले, युट्युब लावून बघितले आणि फोन व्यवस्थित चालतो आहे हे लक्षात आल्यावर त्याने फोनवरून घरी फोन लावला.

बायकोने फोनकॉल उचलला आणि कॉलर आयडीवर स्वतःच्याच फोनचा नंबर बघून ती आश्चर्यचकित झाली. “अय्या, फोन दुरुस्त झाला ! काय केलं ? किती खर्च झाला ?”

संतोष म्हणाला, “घरी आल्यावर सांगतो. आता चार्जिंग कमी आहे. ” फोनवरील संभाषणसुद्धा एकमेकांना व्यवस्थित ऐकू येत होते. संतोषने व्हिडिओ कॉलसुद्धा करून बघितला.

फोन छान चालू होता.

त्याने प्रश्नार्थक नजरेने या सर्व्हिस सेंटरच्या टेक्निशियनकडे पाहिले,

तोही हसला, म्हणाला, “सर, फोन व्यवस्थित चालू आहे तुमचा. घेऊन जा परत. ” 

संतोषने विचारले, “किती रुपये द्यायचे ?”

तो म्हणाला, “कशाचे पैसे ? मीतर काहीच केलेलं नाही. ” मग संतोषने त्याला आजवरची रामकहाणी सांगितली. त्यावर तो म्हणाला, “कुठेतरी ओला हात लागला असेल फोनला कदाचित, त्यामुळे तत्कालीक बिघाड झाला असेल. गेल्या आठ दिवसात तो ओलावा निघून गेला, ते मॉइश्चर उडून गेलं आणि फोन पुन्हा चालू झाला. ” 

अशा रीतीने एकही पैसा खर्च न करता बिघडलेला फोन दुरुस्त झाला होता आणि साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली होती.

– समाप्त –

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बंद पडलेल्या मोबाईलची कहाणी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ बंद पडलेल्या मोबाईलची कहाणी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

सकाळची वेळ, नेहमीप्रमाणे सायली देवपूजा करत होती. मोबाईलवर यू ट्यूबवर काही भजन लावलेले होते, आणि अचानक सायलीने संतोषला – तिच्या नवऱ्याला हाक मारली, “संतोष, बाबा रे, हा फोन बघ रे. भजन चालू असता अचानक बंद पडला आहे, आणि स्क्रीन बघ कसा झालाय. . . “.

संतोषने तिचा फोन हातात घेतला. जुन्या काळी अँटिनावाले टीव्ही असताना, सेटिंग बिघडलं की टीव्हीवर कसं रंगीबेरंगी वाकडंतिकडं चित्र येऊन ते चित्र तसंच फ्रीज व्हायचं, तसं काहीतरी स्क्रीनवर दिसत होतं.

“मिशन मंगळ” चित्रपट पाहून आणि आजवरच्या अनेक प्रत्यक्ष अनुभवांनी, विशेषतः फोनबाबतीत असं काही बिघडलं की फोन “रिस्टार्ट” करायचा, ९९% वेळा चूक दुरुस्त होते आणि काम पुन्हा सुरळीत सुरू होते, हा त्याचा अनुभव.

त्यानुसार त्याने रिस्टार्टसाठी फोनचे बटण दाबले. पण फोन रिस्टार्ट झालाच नाही.

तो पूर्णच बंद झाला.

“बॅटरी किती टक्के चार्ज होती ग? ” त्याने पृच्छा केली.

“होती, ६०-७०% तरी होती. ” ती.

याने तरी फोन परत चार्जिंगला लावला. तो थोड्या थोड्या वेळाने फोन तपासत होता, पण काहीच धुगधुगी नव्हती.

याने तिच्या भाच्याला फोन केला. तो नव्या जमान्याचा प्रतिनिधी या नात्यानेही आणि तो तिच्या माहेरचा होता या नात्यानेही, अशा दोन्ही कारणांनी, सर्वच गोष्टींमध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं.

आणि कदाचित खाजगीत त्याने कबूलही केलं असतं, की या भाच्याला अशा इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये चांगली गती होती.

तर त्या एवंगुणविशिष्ट भाच्याला फोन लावला गेला. पेशंटची लक्षणं आणि सद्य परिस्थिती सांगितली गेली.

“काका, फोन पाण्यात पडला होता का? ” भाचा विचारता झाला. त्याचं हे संबोधन संतोषला मुळीच आवडायचं नाही. सायली त्याची आत्या, पण भाचा तिला “ताई” म्हणायचा, आणि याला “काका”! झाले असतील थोडे केस कमी, पण म्हणून काय लगेच “काका” म्हणायचं?

पण नेहमीप्रमाणे त्याने आलेला राग गिळला.

“नाही रे, ती म्हणाली नाही तसं काही”. तो विनम्रतेने म्हणाला.

“मग, usually, तुम्ही म्हणता तसा स्क्रीन झाला, तर motherboard चा प्रॉब्लेम असतो. Motherboard बदलायचा म्हणजे पाच दहा हजार रुपयांचा तरीचा खर्च असतो. पण काका, त्यापेक्षा तुम्ही ताईला नवीन फोनच घेऊन द्या ना. दोन वर्षं झाली ती हाच फोन वापरती आहे, ” तिच्या माहेरच्या भाच्याला – नेहमीप्रमाणे – तिचा पुळका आला होता.

“हो का? आणि मग मी पाच वर्षं झाली तोच फोन वापरतोय, ते दिसत नाही का तुला लेका! ” असं जहाल उत्तर त्याच्या तोंडी आलं, पण नेहमीप्रमाणे अत्यंत समजूतदारपणे त्याने ते गिळून टाकलं.

पण पाचेक हजाराची फोडणी बसू शकते, हे ज्ञान त्याला झालं.

त्यापेक्षा फोन सर्व्हिस सेंटरला तपासणीला न्यावा हा एक पर्याय त्याच्या हे लक्षात आला.

पूर्वी परीकथांमध्ये जसा राक्षसाचा जीव कुठल्यातरी डोंगरावरच्या पिंजऱ्यातल्या पोपटात असायचा, तसा हल्ली प्रत्येकाचा प्राण त्याच्या मोबाईलमध्ये अडकलेला असतो. बायकोच्या मोबाईलचे लॉक अगदी नवऱ्यालासुद्धा ओपन करता येत नसते आणि त्याच्या फोनला तिनं हात लावला, तर त्याचा जीव एकाच वेळी घाबराघुबरा आणि कासावीस दोन्ही होतो, अशी परिस्थिती.

तर, तो मृतप्राय झालेला फोन घेऊन या दोघांची वरात सर्व्हिस सेंटरला निघाली. फोनचा वॉरंटी काळ संपला असल्यामुळे आलेला खर्च आपल्यालाच भोगायचा आहे, हे त्याला दिसत होतं. आणि “तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, ” असं स्वतःला बजावत तो सर्व्हिस सेंटरला पोचला.

सायलीचा, संतोषच्या बायकोचा फोन बिघडला होता. म्हणून फोन दुरुस्तीला टाकण्यासाठी ते दोघं सर्व्हिस सेंटरला पोचले. आधी तिच्या भाच्याला याने फोन कसा बंद पडला ते सांगितलं होतं. आता त्याने पुन्हा सगळी रामकथा त्या सर्व्हिस सेंटरला काऊंटरवर जो पोरसवदा इंजिनियर बसला होता, त्याला सांगितली.

“अंकल, फोन भिजला होता का पाण्यात? ” 

या नव्या पिढीचं आपण काय घोडं मारलंय, कोण जाणे. एक जण “दादा” म्हणेल तर शप्पथ. त्याच्या मनात विचार येऊन गेला.

मग पुन्हा कथानकाचा फ्लॅशबॅक देण्यात आला.

जणू हा त्या तिच्या भाच्याचा “मेले मे बिछडा हुवा भाई” असावा तसं त्यानेही motherboard बद्दल शंका व्यक्त केली.

“पण हा चार्ज का होत नाहीये, ते बघायला पाहिजे. कदाचित याचं चार्जिंग सॉकेट बिघडलं असेल, म्हणून हा प्रॉब्लेम आला असेल. “

“बरं, मग आता काय करावं लागेल? ” संतोष विचारता झाला.

“तुम्ही असं करा, हा फोन इथं ठेवून द्या. फोनचा imei नंबर ठाऊक असेल ना तुम्हाला? ” 

प्रत्येक फोनला एक स्वतंत्र imei क्रमांक असतो आणि त्या क्रमांकावरून त्या फोनची इत्थंभूत माहिती मिळते, हे त्याला माहीत होतं, पण बायकोच्या फोनची एवढी कुंडली त्याला पाठ नव्हती.

“बघतो, घरी फोनचा box आहे ठेवलेला, त्यावरून सांगतो, ” संतोष.

“आमच्याकडे या मॉडेलचे चार्जिंग सॉकेट आहे का ते बघतो. नसेल तर मागवून घेतो. आज शनिवार आहे, मंगळवारपर्यंत येईल. मग ते सॉकेट लावतो, फोन चालू करतो, आणि मग काय प्रॉब्लेम आहे ते बघतो. ” वत्सा, तुजप्रत कल्याण असो या थाटात तो टेक्निशियन वदता झाला.

“आणि अंकल, कदाचित काही serious problem नसेलही, ” त्याच्या या आशावादी वाक्याने संतोषचा जीव थोडा भांड्यात पडला, “तुम्ही माझा हा नंबर घ्या, मला संध्याकाळपर्यंत फोन करा, मी तुम्हाला स्टेटस सांगतो. ” असं म्हणत त्याने मोबाईलवर संतोषच्या नाव नंबरची चिठ्ठी लावली आणि यांना निरोप दिला.

मंगळवारी संतोष ऑफिसमधून येताना दारातच सायली त्याची वाट पहात उभी असलेली दिसली. तो मोहरला, त्याला लग्नानंतरचे ते सोनेरी दिवस आठवले, तेव्हाही सायली अशीच त्याची वाट पहात दारात तिष्ठत असायची हे त्याला आठवलं. आणि त्या धुंदीत तो तिला जवळ घेणार इतक्यात ती त्याला म्हणाली, “चला, पटकन सर्व्हिस सेंटरला जाऊन येऊ या, नाहीतर बंद होईल ते. “

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केस आणि नातं…. ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ केस आणि नातं…. ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“केस आणि नातं यामध्ये साम्य आहे. जोपर्यंत बंधनात असतं, तोपर्यंत बांधिलकीच आहे. एकदा का मोकळं सोडलं की दोघांचाही गुंता होतो.”…….

माझ्या लहान बहिणीला, अनघाला बघायला आज देशमुख कुटुंब आले होते. आमच्या सारखाच मध्यमवर्गीय परिवार. घरी आई- वडील, बहीण, भाऊ, आजी -आजोबा आहेत. मुलाला एक बहिण, एक भाऊ आहे हे ऐकून छान वाटलं. आम्ही दोघी बहिणीच व आई-बाबा. आजी आजोबा येऊन जाऊन असतात. आज या कार्यक्रमाला आवर्जून आले आहेत. आणि आता एक नवीन सदस्य परिवारात सामील झालाय, तो म्हणजे माझा नवरा. देशपांड्यांचा मोठा जावई……

आजचा हा कार्यक्रम जरा ‘हटके’ झाला. दोन्ही घरची सर्व मंडळी एकत्र आली होती. तीन पिढ्या एकत्र बसल्या होत्या. आम्ही सात जण, आणि तेही सातच होते.

सकाळ पासून तयारी चालू होती. उगाच दिखावा करणे, जे नाही ते दाखविणे, ही पद्धत आमच्या घरी नाही. जे आहे त्यात ‘The Best’ करायचा प्रयत्न असतो आमचा. अशा परिस्थितीत टेंशन नसते. जमवा जमवी, लपवाछपवी नसते. विचारांचा किंवा वस्तूंचा सरळ, सोपा, साधा हिशोब असतो. दिखावा नसला तर, बोलणेही आरामात होते. काय बोलायचे? ? अन् काय लपवायचे? ? मुद्दाम काय सांगायचे? ? दाखवायचे? ? असे विचार मनात येत नाही. ‘Manipulations’ नसतात. उगीच’ self created tension’ नसते. आणि या अशा कार्यक्रमांत तर अजिबात नकोच. असे संबंध जे नेहमी करिता असतात, तेथे स्पष्टता असणे हे सर्वात आवश्यक, प्रमूख कर्तव्य व मुद्दा असावा…..

अजय देशमुख परिवार, आमच्या देशपांडे परिवारापेक्षा थोडा उजवाच असावा असा आमचा अंदाज होता. दोघे भाऊ नोकरीत, बहिण पण चांगली शिकलेली व लग्नाचीच आहे…..

आमची अनघा पण चांगली शिकलेली. सध्या नोकरीच्या शोधात आहे…..

आज देशमुखांच्या घरी आम्हाला बोलविले आहे. “तुम्ही पण आमचे घर बघावे अशी आमची इच्छा आहे.” असे देशमुख आजोबांनी, आमच्या आजोबांना फोन करून आमंत्रण दिले. बहुतेक ‘हो’ कडे कल असावा, असा आम्ही अंदाज बांधला…..

आता आमचा निर्णयही आम्हाला घ्यायचा होता. ‌आजतर अगदी गोलमेज परिषदच भरली. खूप गोष्टी झाल्या. या भेटीत ज्याने जे बघीतले, त्यावरून अनुमान काढले. त्यासंदर्भात गोष्टी झाल्या. प्रत्त्येक व्यक्तीने आपल्या वयानुसार अवलोकन केले व चर्चेत भाग घेतला. एकंदरीत परिवार चांगला आहे असे फायनल ‘conclusion’ निघाले. अनघा ला पण अजय पसंत पडला असावा असे वाटले…..

ज्या घरी तीन पिढ्या एकत्र राहतात. तेथील बऱ्याच गोष्टी न सांगताच कळतात. त्यांचे आपापसातील संबंध adjustments चांगले असावे. जूनी पिढी घरी म्हणजे बऱ्यापैकी नियम, सणवार असावेत असा आमचा समज झाला.

वर वधू शोधणे किंवा बघणे म्हणजे सूरवात, अंदाज, समज, judgementsच असतात. जे आपण बघतो, त्यावरून काही तरी ठरवतो. खरं काय आहे? ? ? हे कळायला तर आयुष्यही कमी पडतं…..

आज आम्ही श्री देशमुखांच्या घरी गेलो. ही आमची दुसरी भेट. यावेळी वातावरण जास्त सहज होतं. ओळख झाल्यावर थोडं मोकळं वाटतं. आता दोन्ही आजोबा, आजी, आई- वडील आपले जूने प्रसंग, नोकरी बद्दल, आपल्या नातेवाईकांबद्दल बोलत होते. Young generation आपल्या नोकरीच्या, projects, politics, cricket, picture अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात दंग होती. एकंदरीत “every thing was going well.”….

आता मात्र पूढच्या गोष्टी करायची वेळ आली होती. आज आजी -आजोबा, आई- बाबा अनघा शी बोलणार होते. आपल्या अनुभवातून काही गोष्टी सांगणे, समजाविणे गरजेचे असते. 

बाबा म्हणाले, “तूझाच निर्णय महत्त्वाचा आहे अनघा. आपल्याला एकतर घाई नाही. तुझ्यावर काहीही दबाव नाही. फक्त व्यवस्थित विचार कर व निर्णय घे. आज नाही तर उद्या लग्न करायचे आहेच. कोणताही मुलगा आपण शोधला तरी adjustment ही असतेच. ते दोघांना अगदी शेवटपर्यंत करायचे असते. फक्त काही वर्षांनी त्याची सवय होते. सुरवातीला जपून, सांभाळुन, शांत राहून वागायचे असते. बोलण्यापेक्षा ऐकायचे काम जास्त करायचे. सर्व चांगलं, अगदी तूझ्या मनासारखं येथे आपल्या घरी पण नेहमीच होतं असं नाही. आम्ही नेहमीच तुझ्या बरोबर असणार आहोत. पण तुझ्या चूकीचे, चूक वागण्याचे, चूकीच्या गोष्टींचे समर्थन आम्ही कधीच करणार नाही.

लग्न झाल्यावर काही नियम पाळणे अपेक्षित असतेच. घरचे, समाजाचे नियम, शिस्त असते व त्याप्रमाणेच वागणे अपेक्षित असते. याला बंधन समजले तरी चालेल. सूखी संसारासाठी असे नियम, शिस्त पाळलीच पाहिजे.

म्हणतात ना, ‘केस आणि नातं यांत साम्य आहे, जोपर्यंत बंधनात असतं तोपर्यंत बांधिलकीच. एकदा का मोकळे सोडले की दोघांचाही गुंता होतो…..”

बाबा पुढे म्हणाले, “रोज नवीन समस्या समोर येतील. त्या स्वतःच सोडवायचा प्रयत्न करायचा. रोज उठून आईला, आजीला फोन करायचा नाही. तुझ्या घरच्या चांगल्या गोष्टी ऐकायला आम्हाला आनंदच होईल, पण लहान सहान तक्रारींचा पाढा उठसूट वाचायचा नाही. याचा अर्थ काहीही सहन कर असे माझे म्हणणे नाही.

सुरुवातीपासूनच काही नियम पाळायचेच. आम्ही तुझ्या बरोबर नेहमी आहोतच. मित्र मैत्रिणींच्या सल्ल्यापेक्षा घरच्यांचा सल्ला घ्यावा. घरचे घरचेच असतात. बाहेरच्यांना आपल्या घरात शिरायची परवानगी द्यायची नाही. ‘स्पर्धा व तुलना’ या भानगडीत पडायचे नाही. आपल्या नशिबात जे असेल, जेवढं असेल, ते आपल्याला मिळतच. Be patient. Every thing comes to you in the right moment.” 

आज देशपांडे व देशमुख परिवार पुन्हा एकत्र बसले आहेत. अजय अनघाने सर्वांसमोर पसंती दिली आहे. दोन्ही कुटुंबे पुढच्या तयारीला लागली आहेत. लवकरच बार उडणार आहे.

अनघाचा सध्या ‘Training Period ‘सुरू आहे. ज्या प्रमाणे कुंभार ओल्या मातीला हळुवारपणे, प्रेमाने आपला जीव ओतून त्याला आकार देतो, ‘Perfect’ भांडं बनवायचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर, प्रेम, काळजी, जिव्हाळ्यापोटी आई वडील मुलांना सांगत असतात, सावध करत असतात. पूढच्या येणाऱ्या संभाव्य गोष्टी लक्षात घेऊन मुलांना घडवत असतात. ही आई-वडिलांची जबाबदारीच आहे….

बरोबर आहे, 

‘मामुली से कांच के बर्तन का हम कितना ख्याल रखते हैं। ये तो संबंधोंकी बात हैं। संबंध तो अनमोल होते है, उन्हे सदैव संभालकर रखिए ।’

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धोक्याचे वळण… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ धोक्याचे वळण… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(उद्या दुपारी तू काय करणार आहेस? उद्या आमच्या घरी येशील का? निरंजन दोन दिवस दौऱ्यावर चाललाय. कोण जाणे, मला नंतर तुझ्याशी बोलायला सवड मिळेल न मिळेल” नक्की ये ग मी वाट बघते. ” बिल देऊन त्या देवांगीबरोबर बाहेर पडल्या.) इथून पुढे —– 

तेवढ्यात स्वरा आली. झालं बाई माझं काम. म्हणाली आणि तो विषय तिथंच राहिला.

सध्या आईला यातलं काहीच सांगायला नको असं ठरवून देवांगी दुसऱ्या दिवशी दुपारी अमला बाईंच्या घरी गेली.

शांत दुपार, झळा नसलेलं सौम्य ऊन आणि बंगल्यातली हवीहवीशी झाडांची शीतल सावली.

देवांगी घरात शिरली. अमला बाईनी हसून तिचं स्वागत केलं. ”आलीस? ये बस. तिला सरबताचा ग्लास देत त्या म्हणाल्या. निरंजन गेलाय नाटकाच्या दौऱ्यावर. म्हणून मी एकटीच निवांत आहे घरी. युनिव्हर्सिटीला टाकली आज सुट्टी. ”

इकडचं तिकडचं बोलून अमलाबाई म्हणाल्या, ”हे बघ. मी आत्ता बोलतेय ते नीट ऐकून मग तुझा काय तो निर्णय घे. इतकी शिकलेली डॉक्टर मुलगी तू, तुझ्याबद्दल फार वाटतं म्हणून सांगते. तुझ्यात मला हळवी भाबडी अमलाच दिसते. ”

अमलाबाई म्हणाल्या, ” मीही तेव्हा लहानच होते ग. फक्त अठरा वर्षाची. दिसायला सुंदर आणि खूप हुशार. त्या दिवशी कॉलेजमध्ये भय्यासाहेब आले. कॉलेज गॅदरिंगचे नाटक बसवायला. किती रुबाबदार, छान त्यांची पर्सनॅलिटी ग. कोणीही भाळून जावे अशीच. मी नाटकात नायिका होते आणि देवेश हिरो. किती हुशार होता देवेश. आमची जोडी लोकांनी डोक्यावर घेतली. त्या वर्षी नाटयोत्सवातली सगळी बक्षिसं आमच्या नाटकाला मिळाली. देवेशचे पाय जमिनीवर होते. त्याला पुढे खूप शिकून परदेशात जायचे होते. नाटकाचे वारे संपले आणि देवेश झटून अभ्यासाला लागला. मी मात्र अजून त्याच धुंदीत होते. दरम्यान भय्यासाहेब मला सतत भेटत, सांगत, ‘तुझा जन्म फक्त नटी, उत्तम स्टेज आर्टिस्ट म्हणून झालाय अमला. हे लौकिक शिक्षण कसलं घेऊन बसलीस? मला तुझ्यात खूप मोठी भावी नटी दिसते. मी घडवीन तुला ‘लहान कोवळं वय ग ते. कोणी स्तुती केली की हुरळून जाण्याचं. त्यातून मला बाहेर काढलं ते माझ्या वडिलांनी…. ‘ हे बघ अमला. तू अतिशय हुशार जिनिअस मुलगी आहेस. त्या भय्यासाहेबांच्या नादाला लागू नकोस. माझ्या कानावर गोष्टी येत नाहीत असं वाटलं का तुला? आज चलच त्या नाटक्याच्या घरी. ‘…. मला ते भय्यासाहेबांच्या घरी अचानक त्यांना न सांगता घेऊन गेले.

दोन खोल्यातलं चाळीतलं घर. त्यांची अगदी साधीसुधी खेडवळ बायको आणि खेळत असलेली दोन मुलं. फाटका बनियन घालून बसलेले भय्यासाहेब आणि डाय उडल्यामुळे दिसणारे पांढरे केस. आणि त्या घरात जागोजागी दिसणारं दारिद्र्य. आम्हाला अचानक बघून ते हादरलेच आणि विलक्षण खजील झाले.

एक अक्षर न बोलता माझे वडील मला घरी घेऊन आले. मला म्हणाले. ”बघितलंस? बघितलास तो संसार? सांगितलं होतं का त्यांनी की त्यांचं लग्न झालंय दोन पोरं आहेत त्याला. हे? मूर्ख मुली. भानावर ये. “

मी हे सगळं बघून घाबरून गेले. त्याक्षणी मी शपथ घेतली, मी कधीही भय्यासाहेब, ते नाटक यांच्या नादाला लागणार नाही. किती उपकारच केले बाबांनी माझ्यावर.

मी झटून अभ्यासात लक्ष घातले. सतत पहिली येत गेले आणि माझ्या आवडीच्या गणित विषयात पीएचडी केलं. बाबांनी माझं लग्न सरदार नाईकांशी लावून दिलं. अतिशय सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर असलेल्या हेमंत नाईकांशी. अतिशय सुंदर संसार केला आम्ही. हा निरंजन आमचा एकुलता एक मुलगा. लहानपणी खूप हुशार गुणी मुलगा ग. पण पुढे त्याचं अभ्यासातून लक्षच उडलं. एका नाटकात यश मिळतं काय आणि हा वेडा त्यातच करिअर करायचं म्हणतो काय. आम्ही दोघेही त्याला सांगून थकलो पण त्याने ऐकले नाहीये अजूनही.

दोनच वर्षांपूर्वी नाईकसाहेब अचानक कॅन्सरने गेले. सुदैवाने आम्हाला भरपूर पैसा आहे, चार घरं आहेत. पण हा मुलगा नीट शिकला नाही याची खंत होतीच त्यांनाही.

“हा माझा मुलगा बुद्धीने आमच्या दोघांसारखा हुशार नाही. अगदी बेताचा आहे ग. नुसतं रूप उपयोगाचं नसतं ग देवांगी. त्याला हे सांगून कधीही समजलं नाही. तू त्याच्यापेक्षा फार सुपिरिअर आहेस बाळा. नुसत्या त्याच्या देखण्या रूपावर आणि हवेत इमले बांधण्याच्या स्वभावावर जाऊ नकोस. नुसतीच मोठी स्वप्ने बघून आणि चार नाटकात किरकोळ कामे करून, या मुलाचा जगात निभाव लागणार नाही हे स्पष्ट दिसतंय मला.. तू त्याच्याशी लग्न केलंस तर चारच महिन्यात तुला तुमच्या बुद्धीतली तफावत जाणवेल आणि मग तो कायम तुझा अपमान करत राहील. तुला हीन लेखत जाईल. तो हे माझ्याशी करतोच ना. माझा हेवा वाटतो त्याला. मी लक्ष देत नाही ते सोड. देवांगी, मला त्या मोहाच्या क्षणी माझ्या वडिलांनी वाचवलं, म्हणून मी आज आहे अशी सन्मानाने जगताना दिसतेय जगाला. माझ्याच मुलाच्या उणिवा तुला सांगताना मलाआनंद होत नाहीये ग. पण देवांगी, मला तुझ्यात भाबडी अमला दिसली म्हणून मी हे तुला सांगितलं. तुझ्या बुद्धीच्या तोलामोलाचा सुरेख साथीदार तू शोध. या नाटकाच्या दुनियेत पाऊल टाकू नको मुली. ” अमलाबाईनी डोळे पुसले.

देवांगी हे ऐकून हेलावून गेली. तिचे डोळे भरून आले.

“काकू, मी आततायीपणे कोणताही निर्णय घेणार नाही. खूप खूप आभारी आहे मी तुमची. मी नक्की पाऊल पुढे टाकलं असतं आणि जन्मभर नशिबी आली असती ती होरपळ.

देवांगी अमलाबाईंच्या पायाशी वाकली. त्यांनी तिला मिठीत घेतलं.

आज विमानात बसल्याबसल्या देवांगीला हे सगळं आठवलं. किती वर्षे झाली या गोष्टीला.

देवांगी स्कॉलरशिप घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. पेडिएट्रिक डेंटल सर्जरीत मास्टर्स करून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या पदावर होती देवांगी.

तिच्याही आयुष्यात किती घटना घडल्या. तिचाच बॉस असलेल्या हर्ष मराठेने तिला मागणी घातली आणि त्यांचे भारतात येऊन लग्नही झाले. तेव्हा अमलाबाईना भेटणं जमलं नाही पण या भेटीत मात्र आपण अमला बाईना भेटायचेच असं देवांगीने ठरवलं आणि तसं हर्षला बजावून सांगितलं सुद्धा.

हर्षच्या आईवडिलांना भेटून झाल्यावर अचानकच देवांगी हर्षला घेऊन अमला बाईंच्या बंगल्यावर गेली.

बंगला होता तसाच होता. थोडा आणखी वृद्ध झालेला.

बेल वाजवून बाहेर थांबली देवांगी. दार उघडायला आला तो निरंजन. हिला बघून तर धक्का बसलेला स्पष्ट दिसला त्याच्या चेहऱ्यावर. सुंदर, अजूनही तरुण असणारी, दिसणारी, बुद्धीचं तेज आणि संपन्न देशातली संपन्न रहाणी अंगोपांगी दर्शवणारी देवांगी. आणि तिच्या मागे सुंदर, उत्तम पोशाखात उभा असलेला हसतमुख देखणा रुबाबदार पुरुष.

— निरंजनने स्वतःकडे बघितलं. विरळ झालेले केस, सुटलेले पोट डोळ्याखाली वर्तुळं आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या. गबाळा घरी घातलेला पायजमा. या या ना म्हणत निरंजन मागे झाला.

देवांगीने विचारलं, ” कसा आहेस निरंजन? अमलाबाई कुठे आहेत? “

चाहूल ऐकून अमलाबाई बाहेरआल्या. क्षणभर त्यांनी देवांगीला ओळखलेच नाही.

मग मात्र, ” देवांगी, तू? ” म्हणत त्यांनी तिला मिठी मारली.

“अमला काकू, आहात तशाच आहात तुम्ही. “

” बस ग बस त्या म्हणाल्या. ” संकोचून निरांजन शेजारी उभा होता.

” निरंजन, अमला काकू, हे माझे मिस्टर डॉक्टर हर्ष मराठे. अमेरिकेला असतो आम्ही. “

अमला काकूंना देवांगीने आणि हर्षने वाकून नमस्कार केला. त्यांच्या हातात सुंदर स्वेटर, तिकडची चॉकलेट्स आणि निरंजनला एक छान टी शर्ट दिला.

” काकू, तुम्ही म्हणाला होतात तसा हा मिस्टर राईट मला तिकडे मिळाला. माझ्यापेक्षा काकणभर सरसच आहे हा. तुमचे आभार कसे मानू हे समजत नाही मला.

एखाद्या क्षणी देवदूत यावा तशा माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य बदलून गेलं. फक्त तुमच्यामुळे काकू. नाहीतर मी भलता निर्णय घेतलाच असता. “

अमला काकू हसल्या. ” छान आहे ग तुझा जोडीदार. जावईबापू, आवडलात तुम्ही मला खूप.  

निरंजन आत गेल्यावर त्या हळूच म्हणाल्या, “बघ देवांगी. तू घेतलेला निर्णय योग्य ठरला. निरंजनचे काहीही होऊ शकलं नाही ग. घुसमट झाली त्याची आणि आता तर घरीच असतो. उशिरा समजलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागतेच ग. तेव्हा आमचं ऐकलं नाही आणि नाटकात सिनेमात काहीही करिअर होऊ शकलं नाही, की नाही लग्न होऊ शकलं. मला आनंद आहे, तू यातून वाचलीस मुली. ” अमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. “वाईट वाटतं ग त्याचं मला, पण हाताने केलेल्या चुका या. ”

अमला बाईंचा निरोप घेऊन देवांगी आणि हर्ष बाहेर आले.

“हर्ष, तुला मी पूर्वीच हे सगळं सांगितलं आहे रे. आज मी निरंजनशी लग्न करायची घोडचूक केली असती तर माझी अशीच वाईट अवस्था झाली असती. मला वाचवलं ते मोठ्या मनाच्या अमला काकूंनी. किती मोठं मन असेल त्यांचं, की आपल्या मुलाशी तू लग्न करू नकोस हे मला सांगणारं? “

काही न बोलता देवांगीला जवळ घेऊन ती आणि हर्ष बंगल्याच्या पायऱ्या उतरू लागले.

– समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धोक्याचे वळण… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ धोक्याचे वळण… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

 शिकागोहून येणारी फ्लाईट निघतानाच उशिरा सुटली. आता मुंबईला पोचायला उशीरच होणार हे देवांगीच्या लक्षात आलेच. बरोबर हर्ष ही होताच. देवांगीने विमानात हँडबॅग वरच्या कप्प्यात ठेवली आणि स्वस्थ डोळे मिटून बसली. हर्षने पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. देवांगीला नकळत गाढ झोप लागून गेली. एअरहोस्टेसने हळूच तिच्या खांद्याला हलवले आणि डिनर ठेवलंय असं सांगून ती गेली.

हर्ष आणि देवांगीने जेवण संपवलं आणि देवांगी पुन्हा झोपेच्या स्वाधीन झाली. खूप छान झोप लागली तिला. उठल्यावर म्हणाली, चला, निम्मा प्रवास तर झाला. आता आठ नऊ तासात येईलच मुंबई.

आज चारपाच वर्षांनी देवांगी आणि हर्ष मुंबईला येत होते. हर्षच्या आईला बरं नव्हतं आणि तसा दिराचा फोन आला म्हणून दोघेही येत होते मुंबईला.

देवांगीला नकळत मागची आठवण झाली.

किती वेगळं झालं आपलं आयुष्य ना. अचानक आपलं आयुष्य असं वळण घेईल हे तिच्या स्वप्नातही नव्हतं.

देवांगी डेंटल कॉलेजमध्ये होती. कॉलेजच्या गॅदरिंगसाठी नाटक बसवायचं ठरलं आणि मुलं देवांगीला विचारायला आली.

”देवांगी, हिरॉईनचं काम करायला आम्हाला तुझ्याशिवाय कोणीच मिळत नाही ग. प्लीज नाही नको ना म्हणू. ”

” अरे, पण मी जन्मात कधी स्टेजचं तोंड पण नाही बघितलं. मला भीति वाटते रे बाबा. ” पण ऐकतील ती मुलं कसली. त्यांनी तिला तयार तर केलंच आणि वर तिच्या आईबाबांचीही परवानगी घेतली.

नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. नाटकाच्या दिग्दर्शनाला मुलांनी नुकताच प्रसिद्धीला येत असलेला नवीन दिग्दर्शक निरंजन नाईक ला बोलावले होते.

निरंजन अतिशय उत्साही, दिसायला अत्यंत देखणा, अगदी हिरो शोभेल असा होता. त्याची नाटकात सिनेमात जायची धडपड चालू होती आणि तशी छोटी मोठी कामेही मिळत होती त्याला. तालमी सुरू झाल्या आणि देवांगीला त्यात मजा वाटायला लागली.

निरंजन सांगे तसे ती लगेचच करून दाखवी. आकलनशक्ती छानच होती तिची. निरंजनला या हुशार मुलीचं फार कौतुक वाटायचं. इतकी सुंदर हुशार हसरी मुलगी आणि पुन्हा अभिनय पण किती छान करतेय. मी शिकवतो ते सगळं किती पटकन आत्मसात करते ही मुलगी.

नाटक अतिशय उत्कृष्ट झालं. मुलांनी अगदी डोक्यावर घेतलं. निरंजनचा कॉलेजने सत्कार केला. सगळी मुलं थोडयाच दिवसात नाटक विसरून अभ्यासाला जुंपली.

निरंजनच्या मनातून मात्र देवांगी गेली नाही. अतिशय आवडली त्याला ही मुलगी.

त्या दिवशी आपली मोटर बाईक घेऊन तो तिच्या कॉलेजवर आला.

“झाली ना एक्झाम? ”

“ हो बाबा. सुटले. तरी अजून पूर्ण दोन वर्षे जायची आहेत बाबा. कुठून आले मी डेंटिस्ट व्हायला देव जाणे.

तुमची मजा आहे ना? मस्त मनासारखं जगावं, छान स्टेज गाजवावं. मग काय? सिनेमात ऑफर्स आल्या की नाही? ”

“ तेच तर सांगायला आलोय तुला. बस मागे. “

देवांगी त्याच्या बाईकवर बसली आणि निरंजन सुसाट बाईक चालवू लागला. ”, अरे हळू ना. पडेन ना मी. ”मग मला धरून बस की. देवांगीने त्याला कमरेला विळखा घालत हळूच धरले.

शहराबाहेरच्या जरा दूर असलेल्या हॉटेलमध्ये दोघे शिरले.

कॉफी मागवल्यावर निरंजन म्हणाला ” मला एका मराठी सिनेमात ऑफर आलीय. चांगला रोल आहे, पैसेही छान देणार आहेत. ही तर सुरुवात आहे देवांगी. मग बघ मी कुठल्याकुठे जाईन. “

निरंजनचे सुंदर स्वप्नाळू डोळे भविष्याची स्वप्नं बघत होते. देवांगीला फार आनंद झाला आणि ती म्हणाली, ”खरंच. खूप मोठा नट होशील तू. सगळी पोटेंशिअल्स आहेत तुझ्यात निरंजन. ”

देवांगीला निरंजन आवडायला लागला. किती हँडसम आणि रुबाबदार पर्सनॅलिटी होती त्याची. कॉलेजमध्ये आला की उगीच नव्हत्या पोरी त्याच्या भोवती भोवती करत.

निरंजन काहीवेळा देवांगीच्या घरीही यायला लागला. तिच्या आईवडिलांशी बिनधास्त गप्पा मारायचा तो. बाबांना मोठं कौतुक वाटायचं या मुलाचं. ‘ किती ग देखणा आणि नम्र मुलगा आहे हा ‘, म्हणायचे बाबा.

आई मात्र म्हणायची देवांगी, ‘ मित्र म्हणूनच बरा आहे हा मुलगा. उगीच अडकू नकोस हं या उनाड मुलात.

नट म्हणे. तू डॉक्टर होणार आहेस हे विसरू नकोस बरं का. ” 

”नाही ग आई, असं कसं करीन मी? आमची चांगली मैत्री आहे एवढंच. ” देवांगी म्हणायची.

“असं असलं तर मग ठीक आहे. आम्ही मागासलेल्या विचारांचे नाही, पण आई म्हणून माझं कर्तव्य मी करणार, करत रहाणार. ” 

त्या दिवशी देवांगीला निरंजनने आपल्या घरी नेले. किती सुंदर जुन्या पद्धतीचा दगडी बंगला होता तो. जुन्या वैभवाच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. हॉल तर फारच सुरेख होता.

निरंजनने आपल्या आईला बाहेर बोलावले. देवांगी त्यांच्याकडे बघतच राहिली. किती सुंदर होत्या त्या. पन्नाशी ओलांडली तरी त्यांचे रूप लपत नव्हते. निरंजनने रूपाचा वारसा कुठून घेतला हे देवांगीच्या सहज लक्षात आलंच.

“बस ना ग. तू देवांगी ना? आमचा निरंजन सांगत असतो तुझ्याबद्दल. खूप छान काम केलंस ना नाटकात? आणि डेंटिस्ट पण होते आहेस ना? शाब्बास”.. त्या तिच्याजवळ बसल्या. कौतुकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला.

“ निरंजनच्या आई, तुम्ही काय करता? ”

देवांगीने कुतूहलाने विचारलं.

त्या हसल्या आणि म्हणाल्या, “अग मी युनिव्हर्सिटीत मॅथेमॅटिक्स शिकवते. मी गणितात पीएचडी केलंय आणि आता पोस्ट ग्रॅज्युएट्सना शिकवते. “ 

देवांगी थक्क झाली. किती हुशार आणि बुद्धिमान होत्या त्या.

तिने सहज निरंजनला विचारलं, “ तू कशात डिग्री घेतली आहेस रे? मला माहीतच नाही तुझं शिक्षण. ”

निरंजन म्हणाला, “ बाई, तेवढं मात्र विचारू नकोस. ते सगळं आमच्या आईसाहेबांकडे दिलंय. तिच्या आग्रहापायी मी बीएस्सी केलं आणि मग नाटक हेच माझं करिअर मी ठरवलं आहे. मला डिग्र्या आणि त्या मळलेल्या वाटांवरून अजिबात जायचं नाहीये. ”

देवांगीने आईंकडे बघितलं. नापसंतीची सूक्ष्म आठी त्यांच्या कपाळावर उमटलेली दिसली तिला.

त्या किचनमध्ये गेल्या आणि जाताना म्हणाल्या, ” थांब हं. चहा आणते आपल्याला. आज आमच्या स्वयंपाकीणबाई रजेवर आहेत. ”

त्यांनी छान चहा करून आणला आणि बरोबर छानसं खायला देखील. , ”घे ग, आणि येत जा अशीच.

आवडेल मला अशी छोटी तुझ्यासारखी मैत्रीण. ” त्या हसून म्हणाल्या. त्यांच्या लोभस हसण्याच्या तर प्रेमातच पडली देवांगी. “ होहो, नक्की येईन मी काकू. ”

देवांगी घरी आली. आई ही देवांगीची सगळ्यात जवळची मैत्रीण. “ आई मी आज निरंजनच्या घरी गेले होते. काय ग सुंदर बंगला आणि त्याहूनही सुंदर त्याच्या आई. काय भारी बाई आहेत ग. ”

आई हसली. “ झाली का भेट अमला बाईंशी? छानच आहेत हो त्या. किती शिकलेल्या आणि जरा गर्व नाही ग आपल्या रूपाचा, शिक्षणाचा. मला काही फारशी माहिती नाही बाई त्यांची ”. आई म्हणाली.

त्यादिवशी देवांगीच्या मामेबहिणीचं, स्वराचं युनिव्हर्सिटीत काम होतं. “ देवांगी, चल की माझ्याबरोबर. येताना तुला मस्त ट्रीट माझ्याकडून. चल की ”.. स्वरा म्हणाली.

देवांगी हसत तयार झाली. “ चल चल. मस्त मजा करू. कित्ती वर्षात मी युनिव्हर्सिटी बघितलीच नाहीये ग”. दोघीजणी स्वराच्या कारने युनिव्हर्सिटीत पोचल्या. स्वरा कोणत्या तरी डिपार्टमेंटमध्ये गेली आणि देवांगी बाहेर बागेत बसली.

“ देवांगी, इकडे कशी तू? ” सहज वर बघितलं तर अमलाबाई तिला हसून विचारत होत्या.

” आज युनिव्हर्सिटीत कुठं? ”

”अहो, स्वराचं, माझ्या बहिणीचं काहीतरी काम आहे म्हणून आलेय तिच्याबरोबर. ”

“ वेळ आहे ना अजून तिला? चल. आमच्या युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीन मधला झकास चहा नाश्ता देते तुला. ”

हो नाही म्हणायची सवड न देताच अमला बाई पुढे झपाट्याने चालल्या देखील. देवांगी धावत त्यांच्या मागे गेली. दोघीजणी एका टेबलाजवळ बसल्या. बाईंचा बराच दबदबा दिसत होता तिथे. अदबीने वेटरने विचारलं, “ मॅडम, नेहमीचाच ना नाश्ता? ” हसून ‘हो’ म्हणत त्या देवांगीकडे वळल्या.

“ मग? काय म्हणतेस? अजून किती वर्षं राहिली ग तुझी? पुढे काय प्लॅन्स आहेत तुझे? ”

देवांगी म्हणाली, “ एकच वर्ष काकू. मग माझ्या हातात डिग्री येईल. मला परदेशात पोस्ट ग्रॅज्युएशन करायची फार इच्छा आहे. बघूया कसं जमतं. तिकडे फिया मात्र अतिशय आहेत हो. बघू. नाहीतर मी इथे करीन मास्टर्स ” देवांगी म्हणाली.

अमलाबाई म्हणाल्या, “ तू तर नक्की करशीलच. हुशार मुलगी आहेसच तू. मला एकच सांग, स्पष्ट विचारते, निरंजन मध्ये किती गुंतली आहेस तू? त्याने तुला लग्नाचं विचारलंय का”

देवांगी गांगरली. चाचपडत म्हणाली, ”काकू मला खूप आवडतो तो. तो भेटला की मी अगदी भारून जाते त्याच्या बोलण्याने, त्याच्या व्यक्तिमत्वाने. पण तो गेला की मला समजतं की ही वाट माझी नाही. काय करू मी? जादूच होते माझ्यावर त्याच्या वागण्या बोलण्याची. खूप उज्वल भविष्य आहे त्याचं. मोठा नट होईल तो आपल्या डॉ लागूंसारखा. ” स्वप्नाळूपणे देवांगी म्हणाली.

अमलाबाई स्थिर नजरेने तिच्याकडे बघत होत्या.

“इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ती ही अशी”. त्या खिन्नपणे म्हणाल्या.

“ उद्या दुपारी तू काय करणार आहेस? उद्या आमच्या घरी येशील का? निरंजन दोन दिवस दौऱ्यावर चाललाय. कोण जाणे, मला नंतर तुझ्याशी बोलायला सवड मिळेल न मिळेल. नक्की ये ग मी वाट बघते. ”.. बिल देऊन त्या देवांगीबरोबर बाहेर पडल्या.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares