मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ दमलेल्या बाबाची गोष्ट…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

नवरा ऑफिसमध्ये गेला आणि माझी आवराआवर सुरू झाली. आज अंथरुणं पांघरुणं धुवायला काढायची असं मी म्हणत होते, एवढ्यात मोबाईल वाजला म्हणून मी फोन घेतला, कन्येचं नाव दिसलं म्हणून मी खुश झाले. गेल्या महिन्याभरात किमान दहा स्थळांचे फोटो मी पाठवले होते. तिचे एवढे फोन आले पण कुठल्या स्थळाबद्दल तिने होकार कळवला नव्हता. पण माझा अंदाज होता एक दोन दिवसात ती निश्चित कळवेलच, कदाचित त्यासाठीच तिचा अचानक फोन असेल ह्या उत्सुकतेने मी फोन उचलला.

“मग काय, आज सकाळी सकाळीच फोन, म्हणजे भारतात सकाळ गं, नाहीतर तुझा रात्रीचा फोन ठरलेला. हाच फक्त सकाळी आला. आईशीच काही बोलायचे का? कुठला फोटो आणि कुठलं स्थळ तुला पसंत सांग लवकर?”

“अगं आई, त्या करताच मी फोन केला. तू मला एवढ्या स्थळांचे फोटो पाठवू नकोस, माझ्या लग्नाची तयारी पण करू नकोस, आम्ही लग्न ठरवलंय. ‘

लग्न ठरवलं हे ऐकून माझा श्वासच अडकला. “अगं आम्ही म्हणजे कोणी?”

“मी आणि जॉन ने. “

मी घाबरून किंचाळले, “अगं कोण हा जॉन?”

“अग आई, मागे मी तुला फोटो पाठवलेला ना जॉनचा. “

“अगं असे तुझ्या मित्र-मैत्रिणींचे फोटो तू नेहमीच पाठवतेस, माझ्या कसं लक्षात राहील जॉन कोण आणि कोणता ते. “

“अगं जॉन, जॉन विली त्याचं नाव, पॉप गायक आहे तो. “

” केवढा धक्का दिलास तू अमिता, मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती, तुझ्या बाबाला आता केवढा धक्का बसेल माहिती आहे? आणि काकांना मावशी ना काय सांगू गं मी?”

मी रडू लागले. फोन बंद करून खुर्चीत बसले. केवढ्या अपेक्षा या मुलीकडून ठेवल्या होत्या आम्ही? तिच्या लग्नाच्या तयारीसाठी काय काय जमवत होते मी. तिचा बाबा तर तिच्या बाबतीत खूपच सेन्सेटीव्ह, एकुलती एक मुलगी, त्यात पहिल्यापासून हुशार. तिच्या बाबाला गर्व होता की आपल्यासारखी हुशार म्हणून.

नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेली पण आज ना उद्या भारतात परत येईल ही आशा आम्हाला होतीच. तिची आता तिशी जवळ आली तशी आम्हाला आता जास्त काळजी वाटायला लागली. कुठून कुठून तिच्यासाठी स्थळं येत होती, त्यातील चांगल्यात चांगलं स्थळ तिच्यासाठी आम्ही निवडणार होतो पण…

मला माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याची, अरुणची जास्त काळजी वाटायला लागली. मी निदान रडून तरी दाखवीन, तो बाहेरून दाखवायचा नाही पण आतल्या आत कोसळून जाईल. एकुलत्या एक मुलीसाठी आयुष्यभर झटतोय, अजून उमेदीने व्यवसाय वाढवतोय, या वयात आठवड्यातून एकदा तरी दुसऱ्या शहरात व्यवसायासाठी धावतोय, कुणासाठी हे सर्व?

मी दिवसभर कॉटवर झोपून राहिले. काही करायची इच्छाच मला होईना, एवढी एवढी छोटी अमिता, शाळेत जाणारी अमिता, टेनिस खेळायला जाणारी अमिता, इंजिनीरिंग ला जाणारी अमिता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी अमेरिकेत जाणारी अमिता मला आठवत राहिली. अमेरिकेत जायला माझा विरोध होताच पण तिच्या बाबाचा तिला पाठिंबा होता.

सायंकाळी अरुणला कसं सांगायचं याचा मी विचार करत होती, कदाचित तिने बाबाला फोन केला पण असेल, मी तिचा फोन कट केला तसा बाबा फोन कट करणार नाही, तो शांतपणे तिचं म्हणणे ऐकून घेईल, आतून कोसळेल पण बाहेर दाखवणार नाही. मला माझ्या नवऱ्याची अरुणची पद्धत माहिती होती. तॊ जेव्हा जास्त टेन्शनमध्ये असेल तेव्हा जास्त हसेल, गडबड करेल. आपलं टेन्शन दुसऱ्याला दाखवणार नाही. आतल्या आत आपणच ते सहन करील.

आज रोजच्या पेक्षा लवकर अरुण घरी आला. येताना माझ्या आवडीचे गुलाब जामुन घेऊन आला. तेव्हाच मी ओळखले याला सर्व कळले आहे. माझा तणाव घालवण्यासाठी याने मुद्दाम गुलाबजामून आणलेत. हाच तो माझी जास्त चेष्टा करेल, गमती जमती सांगेल. मनातल्या मनात रडत असेल पण बाहेर दाखवायचा नाही.

माझ्या हातात गुलाबजाम देऊन तो म्हणाला, “चल आज कुठेतरी फिरून येऊ”.

“आज एवढा खुशीत का, लाडक्या लेकीचा फोन आलेला दिसतो. “

“हो ना, तिनं लग्न ठरवलंय म्हणे, जॉन बरोबर. “

“मग झापलं नाहीस तिला, का खूप आनंद झाला जॉन बरोबर लग्न ठरवले म्हणून, एवढे गुलाबजामून आणलेस म्हणून विचारले. “

“विरोध करून काही उपयोग नसतो गं, उगाच आपल्या मुलीच्या मनातून आपण उतरतो, ती आता तिशीची झाली, तिचे बरे वाईट तिला कळते. “

“म्हणून काही उघड्या डोळ्यांनी आपण लग्न लावून द्यायचं? मी आई आहे तिची, कोण कुठला तो जॉन, ना ओळखीचा ना पाळखीचा, आपल्या मुलीच्या शरीराचा मनाचा तो मालक होणार, आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं?”

” मग काय करू शकतो आपण? तिने लग्न करू का हे विचारलेले नाही, तिने याआधीच त्याच्याशी लग्न केले आहे ना”

“काय म्हणतोस?” मी किंचाळत विचारले.

“होय, तिने त्याच्याशी रजिस्टर लग्न केले आहे, दोन महिन्यापूर्वी. “

“आणि ती आता आम्हाला सांगते? आपली मुलगी एवढी परकी होते?”

“हे असंच असतं, तिला तिचा साथीदार मिळाला की तिचे आई-वडील पण परके होतात, तेव्हा तिला कसलाही विरोध न करता त्यांना आशीर्वाद देणे हेच योग्य”.

“पण अरुण, मी दुखावले गेले आहे रे, माझ्या मुलीकडून मलाही अपेक्षा नव्हती. मी तिला माफ करू शकणार नाही”.

“काय करू शकतो आपण? आपण तिला मोठ्या मनाने माफ करायला हवे, आपल्याला आपल्या मुलीला गमवायचे नसेल तर आपण तिला माफ करायलाच हवे”.

“पण तिने या आधीच लग्न करून ती मोकळी झाली, आणि ही गधडी आत्ता सांगते लग्न केले म्हणून? आपले संस्कार कुठे कमी पडले का? आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना काय सांगायचे? तिने दोन महिन्यापूर्वी लग्न केले म्हणून? माझी आई काय म्हणेल? माझ्या बहिणी, भाऊजी, तुझे गावचे भाऊ, काय उत्तर द्यायचे त्यांना?”

“उत्तर हे द्यावेच लागेल, लग्न याआधी झाले हे कळवायचे नाही कुणाला, मी अमित शी बोलतो, तिला म्हणतो तुम्ही दोघेही भारतात या, आपण त्यांचे परत इथे लग्न लावूया, एखादे रिसेप्शन ठेवूया, त्याला सर्वांना बोलऊया, आणि एक लक्षात ठेव, people’s memory is always short, कोणाला फारसे आठवणार पण नाही काही दिवसांनी. “

मी जेवण न करता उशीत डोकं खुपसून रडू लागले, अरुण येरझाऱ्या घालत होता. त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजला असेल याची मला कल्पना होती. काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचे मला ऐकू येत होते.. निश्चितच तो अमिताशी बोलत असणार.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाचा कंद… ☆ राधिका माजगावकर पंडित ☆

राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ आनंदाचा कंद… ☆ राधिका माजगावकर पंडित

रिटायर्ड कर्नल सुभाष म्हणजे ग्रेट, शौकीन, हंसी मजाक माणूस. बंदुकीच्या गोळ्या निधड्या छातीवर झेलल्या त्यांनी. अनेक ठिकाणी जखमा झाल्या त्यांना पण त्या जखमांचे व्रण ते कुरवाळत नाही बसले, उलट अभिमानाने ते सांगतात ही माझी गर्वाने मिरवावी अशी प्रशस्तीपत्रकेच आहेत.

सकारात्मक दृष्टिकोनातला हा राजा माणूस मला फार आवडतो माणसांचा संग्रह त्यांच्या जवळ आहेच पण विविध देशातली नाणी, तिकिटे, प्रत्येक देशाची प्रतीके, निशाणे सर्वधर्म एक आहे हा समन्वय साधून त्यांनी संग्रह केला आहे. मी एकेक वस्तू न्याहाळत होतो एका काचेच्या कपाटात व्यवस्थित टांगलेले प्लॅस्टर बघून मी चमकलो आणि तिथेच थबकलो. बँडेज? प्लॅस्टर?आणि इतकं कसं जपून ठेवलेय आणि ते कां बरं? हा कोणता आनंदी छंदाचा प्रकार? 

माझ्या चेहऱ्यावरच्या गोंधळ पहात ते गडगडाटी हंसत म्हणाले, “नवल वाटलं ना हा शोपीस बघून? प्लॅस्टर काढण्यासाठी लोकं कासावीस होतात. काढल्यावर ते फेकून देतात. मी तर ते मौल्यवानपणे जपलय म्हणून, गोंधळालास ना तू? अरे या प्लॅस्टरमुळेच मला संकटात धावून येणारी माणसे भेटली आणि प्रसंगाने माणसांची परीक्षा झाली त्यांच्या सेवाभावाची खूण, मला पटली. त्यांची आठवण म्हणूनच मी हे जपलंय नजरेसमोर ठेवलय.

माझं कुतूहल जागं होऊन मी म्हणालो, ” नक्कीच ह्या मागे काहीतरी इतिहास असणार आहे, होना कर्नल साहेब?

“बरोब्बर ओळखलंस वेळ असेल तर ते गुढरहस्य ऐकवतो तुला. ऐकायचंय?

“हे काय बोलणं झालं का साहेब! तुमच्याकडच्या गुण गौरवकथा ऐकायला आम्ही नेहमीच अग्रेसर असतो. मी त्यांच्या सोफ्यावर मांड ठोकून प्लॅस्टर रहस्य ऐकण्यासाठी उत्साहाने खाली बसलो.

हळूवारपणे एखादं कोडं उलगडावं तसे ते सांगू लागले,

“आयष्यात सुख आले, ते मी अनुभवले दुःखही झेलले यश आल्यावर त्यावर स्वार झालो पण स्वदेशीयांकडून अपयश आल्यावर मात्र मी खचलो, अस्थिर झालो. देशासाठी देशबंधूंसाठी आम्ही आमचं आयुष्य पणाला लावतो पण तेच देशबंधू आमच्याशी गद्दारीने वागले तर मात्र आम्ही उद्विग्न होतो. “

मला रहावलं नाही म्हणून मी विचारले, “परतून मायदेशी आल्यावर काही अनुभवलंत का तुम्ही? काय घडलं असं?”

“काय घडलं?अरे दगडाच्या काळजाची माणसं भेटली मला, पण हो! हो! त्यातही एक माणुसकीचा झरा पण होता. “

कर्नल साहेब तुमचा अनुभव ऐकायला मला आवडेल. सांगा ना काय घडलं असं? माझी उत्सुकता बघून गोष्टीवेल्हाळ कर्नल सांगू लागले, “आतापर्यंत तू माझ्या लढाईवरच्या कथा ऐकल्यास पण त्या घटनेमुळे मात्र माझ्या एकाकी आयुष्याला कलाटणी मिळाली. पाकिटातला फोटो मला दाखवत ते पुढे म्हणाले “त्याआधी हा बंड गुंडाचा, माझ्या नातवाचा फोटो बघ. ” 

फोटोतलं गोडुल, गोबरं गोजिरवाणं पोरगं हंसत होतं. बाजूला गोरीघारी त्याची आई आणि शेजारी बाबा उभे होते. प्रत्येकाच्या फोटोवर बोट ठेवून ते सांगू लागले, ” हा माझा राजबिंडा लेक आनंद, हीमाझी गोरी परी म्हणजे माझी सून आणि हा बघ, हा राजपुत्र माझा नातू आहे. ” 

त्यांना मध्येच आडवत मी म्हणालो, “पण तुम्ही तर.. “

“हो हो खरंय बिनापाश अविवाहीत, ना घरका ना घाटका असा मी सडाफटिंग माजी सैनिक आहे मग मी आजोबा कसा झालो असंचं म्हणायचंय नां तुला?पण मित्रा इथे मात्र मी गुंतत गेलो. माझ्या आईने मला लहानपणी कान मंत्र दिला आहे माणसं जोड. जोडलेल्यांना कधीही तोडू नकोस. तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे, तेव्हा ही जोडलेली गांठ कायम पक्कीच राहू दे. “

“साहेब तुमच्या आईचं प्रत्येक वाक्यनवाक्य मोलाचे आहे म्हणूनच तुम्ही जगमित्र आहात. पण सांगा ना तो प्रसंग. काय घडलं असं?

“अरे नेहमीप्रमाणे मी मस्तीत एका पायाने गाडी चालवत होतो तुला माहीतच आहे एक पाय मी रणांगणावर सोडून आलोय ते !तर काय सांगत होतो वाटेत कुत्र्याचं पिल्लू आलं. त्याला वाचवायला म्हणून मी करकचून ब्रेक दाबला ते पिटुकलं वाचलं रे! पण मागच्या कारवाल्यांनी मला उडवलं. माझा फुटबॉल झाला आणि फुटपाथवर मी आदळलो. मला सांवरायला जवळ यायच्या ऐवजी माझे हे देशबंधू लांब पळाले. मला उठवायला कुणाचाही हात पुढे येईना, रक्तस्राव झाला नव्हता पण कमरेचं हाड कटकन मोडल होतं लढाईत निधड्या छातीने गोळ्या झेलणारा मी इथे मात्र हरलो. कारवाला तर केव्हाच पळाला होता. “

बापरे फारच अवघड प्रसंग. “अहो!ज्यांच्यासाठी अहोरात्र तुम्ही रणांगणावर तळहातावर शीर घेऊन लढलात ती माणसंच माणुसकी विसरली. ही कृतघ्नता आहे”.

“हो ना! पण त्या पळून जाणाऱ्या लोकांतही एक जण देवदूता सारखा थांबला. पेपर विकणारा छोकरा होता तो. त्या छोकऱ्याचा छोटा हात माझ्या मदतीला पुढे झाला. वर्तमानपत्राचा गठ्ठा आणि सायकल मित्राच्या स्वाधीन करून तो माझ्याकडे धावला होता. मी वेदनेने तडफडत होतो कुणीतरी मला सोडलं होतं पण कुणीतरी माझ्या मदतीला धावलं होतं. तब्बल पंधरा दिवस मी हॉस्पिटलला होतो भानावर आलो तेव्हा मला कळलं माझ्या एका पायाला प्लॅस्टर घातलय. ” 

“पण मग कर्नलसाहेब तुमचा हॉस्पिटलचा ऑपरेशनचा खर्च, जेवण खाणं कसं आणि कुणी ?

“अरे तो देवदूत छोकरा म्हणजे आजचा माझा मानसपुत्र आनंद आहे आणि त्याची आई कांताबेन माझी मानस भगिनी आहे. आनंदचे वडील परलोकवासी झाले पण जातांना त्यांनी आठवण म्हणून त्यांच्या नावाचं पदक असलेली चेन कांताबेनच्या गळ्यात घातली होती. तो तिचा अमूल्य ठेवा होता. माझा पहिल्या दिवसापासूनचा खर्च भागवण्यासाठी माऊलीने चेन गहाण ठेवली. मला कुणीच नाही असं कळल्यावर ती माझी धर्माची बहीण झाली. नवऱ्याच्या आठवणीचं पदक काळ्या दोऱ्यात ओऊन गळ्यात बांधलं. मला फारशी दुखापत झाली नव्हती पण पाय फ्रॅक्चर मध्ये होता मी बँडेजचे ओझं वाहात होतो तर खर्चाचा भार त्या मायलेकानी माझ्यासाठी, मागील जन्माचे ऋणानुबंध असल्यासारखा उचलला होता. तुला सांगतो मित्रा त्या काळात डॉ. वैशंपायन, सिस्टर फरीदा, इतर नोकर, सफाई वर्ग अहो रात्र माझ्या सेवेला तत्पर होता. आपल्या देशासाठी सीमेवर लढणारा देशप्रेमी हीच भावना माझ्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात होती आणि तो सेवक वर्ग सेवेला तत्परतेने पुढे झाला. अरे! सख्खे नातेवाईक काय ठेवतील इतकी माझी बडदास्त त्यांनी ठेवली. त्या सेवेची खूण त्या काळातली निस्वार्थी माणुसकी ती सेवाभावी माणसं त्यांच्यामुळेच तर मी लवकर बरा झालो आणि एका पायावर उभा राह्यलो. बंदुकीच्या गोळ्यांच्या खाणाखुणा मी शरीरावर वागवल्या. त्या बघून माझ्या देश प्रेमाच्या आठवणी उफाळून येतात. तशीच आठवण या माझ्या जोडलेल्या माणसांची मनात कायम राहावी त्यांच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या डोळ्यासमोर रहावं म्हणून मी हे प्लॅस्टर काचेच्या कप्प्यात आणि मनाच्या कोपऱ्यात जतन करून ठेवलं आहे. मी बरा झालो तेव्हा कांताबेनची चेन सोडवून आणली तिने जपून ठेवलेल्या आनंदच्या वडिलांच्या प्रेमाचं प्रतीक असलेला बदामी फोटो चेनमध्ये घालून मी तिला वचन दिलं, आज पासून तू माझी वडील बहिण आहेस आणि आनंद माझा मानसपुत्र आहे कांताबेननी ते नातं मानलं आणि शेवटपर्यंत निभावलं. ”

“आनंद मुळातच हुशार होता परिस्थितीमुळे त्याचं अडलेलं शिकायचं स्वप्न मी पूर्ण करण्याचं वचन बेनला दीलं. आज आनंद परदेशात मोठ्या हुद्द्यावर आहे जेनी सारखी गोड सून आणि नातू त्याच्यामुळे मला आणि कांता बेनला मिळालाय. मागच्या जन्मीच्या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत ह्या. दुसऱ्या नातवाची चाहूल आम्हाला लागलीय. तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लवकरच आम्ही अमेरिकेला जाणार आहोत. आणि बरं का मित्रा सामानाच्या पॅकिंग मध्ये हे प्लॅस्टर असणार आहे. तिथे ते मिरवून सगळ्यांना ही प्लॅस्टर कथा मी ऐकवणार आहे कारण अरे, त्याच्यामुळेच तर माझ्यासारख्या भटक्या माणसाला बहिण मिळाली पुत्र, सून, नातू मिळाला आहे ना!आता सांग आहे की नाही माझं संग्रहालय प्रेक्षणीय?”

कर्नल साहेबांची प्लॅस्टर प्रेम कहाणी ऐकून मी अवाक झालो म्हणालो, “मानलं मानलं कर्नल तुम्हाला!असं म्हणत मी त्यांना आणि त्यांच्या प्लॅस्टरला कडक सॅल्यूट ठोकला.

© राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाटणी – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ वाटणी – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

(प्रत्येक करकरणार्‍या भीतीमागे आईची मजबूत नजर होती. त्याच्यावर आजपर्यंत कुणी दृष्टी टाकू शकलं नाही. तिच्या नालायक मुलांनाही ते जमलं नाही. किती वर्षांपासून आईच्या जाण्याची वाट पाहत होते, कुणास ठाऊक? जितकी त्यांची बेचैनी वाढायची, तितकी आईची जीवनेच्छा वाढायची.) 

इथून पुढे – 

तिघे भाऊ अधून मधून घरी यायचे आणि टोमणे मारायचे, ‘दादा रोज फोन करत असेल. रोज गप्पा मारत असेल. ‘

‘सगळे आशीर्वाद त्यालाच देऊन झाले असतील. काही शिल्लक असेल, तर मलाही दे. ’

आईला हे सगळं ऐकायची सवय झाली होती. कधी जर कुणी चक्कर मारली आणि टोमणे नाही मारले, तर ते नातवंडांना हळूच विचाराची, ‘तुझ्या बाबांची तब्बेत ठीक नाहे ना!’ दुसर्‍या दिवशी पुन्हा कनी न कुणी येऊन टोमणे देऊन गेलं की आईला वाटायचं, ‘चला! सगळं ठीक-ठाक आहे. मधला, धाकटा, मुन्ना, सगळे जसे काही एका मातीचे बनले होते.

आईने बिछाना धरलाय, या अपेक्षेने जेव्हा ते बघायला जायचे, तेव्हा स्वाईपाकघरातून शुद्ध तुपातील शिर्‍याचा किंवा आंब्याच्या बर्फीचा वास दरवळत असायचा. खाण्याच्याच आवडीने तिला जीवंत ठेवलं होतं खरं तर! किंवा असंही म्हणता येईल की खाण्याच्या आवडीमुळे आई सक्रीय राहायची. नव्वद वर्षापर्यंत खूप गोड खाऊन ती गोड राहिली. अखेर निघून गेली. किती काळ थांबणार? मुलांचे पांढरे केस म्हणू लागले की आम्ही थकलो पण ही आई काही थकत नाही. आपली भाकरी अजूनही स्वत: बनवून खाते. फिरत फिरत नातवंडं, आजी काय करतेय, बघायला येत. तिच्याकडून काजू, बदाम, बेदाणे घेऊन खात. सुका मेवा किंवा ताजी मिठाई खाण्याची लालसा आजीच्या घरी चक्कर मारायला लावी. त्यांना कळायचं नाही की आजी एकटीच का रहाते. त्यांना तर आजी खूप चांगली वाटायची. आजी देखील त्यांच्याकडून घरातल्या सगळ्या गोष्टी वदवून घ्यायची. ‘तुझी मम्मी काय म्हणाली? मग त्यावर पापा काय म्हणाले? जास्त भांडण तर झाला नाही ना? मिठाई खायची आहे ना? मग सांग लवकर!’ मुलं मग सगळं सांगायची. करपलेली भाकरी खावी लागली किंवा मग मम्मी-पापा दोघेही खूप रागावले. आई हसायची. सीसीटीव्ही कॅमेर्‍याशिवाय घराचं चित्र आईपुढे उभं राहायचं.

सगळच जाणून, समजून असल्यामुळे आई मृत्यूपत्र करून गेली नाही. कदाचित तिला माहेत असावं, ही तिघं मुलं असताना कागदाच्या तुकड्याला काही महत्व नाही. त्यांच्यात इतकी ताकत होती की ते आईकडून काहीही लिहून घेऊ ते प्रमाणित करू शकले असते. किती तरी वर्षांपूर्वीचं जुनं सामान तिचे डोळे मिटताच गायब झालं. उरलं होतं, ते वडिलोपार्जित घर. त्याची किंमत कोटींमधे होती. चार मुळे, सुना, नातवंडे एव्हा परिवार असूनही आई एकटी राहिली होती. सगळ्यात धाकट्या मुलाचं लग्न झालं, तेव्हा तिला वाटलं होतं, हा तरी घरात टिकेल. पण काही दिवसांनी तोही बाहेर पडला. म्हणाला, ‘मी माझ्या भावांचं अनुकरण करतोय. ’

माझ्या डोक्यातून आईचं ते मृत्यूपत्र जात नव्हतं. त्यात मी कुठेच नव्हतो पण माझ्या आईचा मुलगा तर होतो. कदाचित त्या तिघांपेक्षा अधीक जवळचा होतो. माझ्या खुर्चीवरील सेलफाट आईचा फोटो आहे. माझ्या प्रत्येक कामानंतर तिचा हास्य अधिकाधिक रुंद होत जातं. घरात आमच्या क्रमानुसार आमहाच्या नावाने आम्हाला पुकारलं जायचं. मोठा, मधला, धाकटा आणि मुन्ना. मोठा मी होतो. केवळ वयाने मोठा होतो असं नाही, तर प्रत्येक बाबतीत मोठा होतो. आईच्या प्रेमाच्या बाबतीत, घरच्या भिंतीं बाबतीतआणि आकाशाची उंची मोजण्याच्या बाबतीतही. आईलाही मी मोठं केलं होतं. तिच्या इच्छा-आकांक्षांना खूप ऊंची दिली होती मी. एअरपोर्टवरून टॅक्सी घेऊन मी गावात पोचलो, की माझ्या आस-पास खूप गर्दी जमायची. घर असं काही चमकायचं, प्रकाशमान व्हायचं, जशी काही एखादी जत्राच सुरू आहे. परदेशातून मुलगा आलाय. माझ्या स्वागतासाठी घरात उत्सव सुरू व्हायचा. भेटायला येणार्‍यांची चढाओढ लागायची. प्रत्येकाला भेटीची लालसा असायची. आई म्हणायची, ‘थोडं थोडं प्रत्येकाला दे. कुणी या आपल्या इज्ल्हयाच्या बाहेर नाही गेलं आणि तू तर परदेशात जाऊन आला आहेस. आशा असणारच ना सगळ्यांना. माझ्यासाठी काही आणू नकोस पण या सगळ्यांना दे. ’

तिघं भाऊ टोमणे मारायचे, ‘आईचा मोठा मुलगा आलाय. ब्घूयात, काय काय माल बाहेर पडतोय. तू ना आई सगळ्यात जास्त त्याच्यावर प्रेम करतेस आणि तो… तुला सोडून जातो. ’

यावर आईचं उत्तर तयार असे. ‘ मग, तुम्ही आधी यायचात. तुमच्यावर जास्त प्रेम केलं असतं. मीच त्याला पाठवलय… पुढे जाण्यासाठी… तुमचा बाप निघून गेला. तुमच्याकडे लक्षही त्यानेच पुरवलय. तो शिकत होता. तुम्हाला शिकवत होता. ’

‘शिकवत नव्हता. या निमित्ताने सगळ्यांना छड्या मारत होता. त्याला स्वातंत्र्य मिळालं होतं.

मी सगळं ऐकायचो पीएन प्रतिवाद कधी केला नाही. आखडूपानाशी कितीही टक्कर घेतली, तरी जखमा होतातच. आईच्या अतिरिक्त प्रेमाचा खूप फायदा घेतला मी. आईला बरोबर घेऊन जाण्याबद्दल मात्र कधी बोललो नाही. घबराट होतो. हो म्हणाली तर… तिथे राहील कशी? माझी इटालियन पत्नी तिच्याबरोबर काशी राहू शकेल? जिथे आसापासचे लोक एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत, त्या वातावरणात काशी रुळू शकेल ती? मनाची पक्की धारणा करून घेतली होती की आई आपली जमीन-माती कधी सोडणार नाही. कुठल्याही प्रकारे का होईना, मी तिला तिकडे घेऊन जाऊ इच्छित नव्हतो. तिकडे नेऊन तिचं मन दुखवू इच्छित नव्हतो. एकटेपणाचं ओझं उचलणं, तिच्यासाठी सोपं झालं नसतं.

इथे आलो की छोट्या छोट्या गोष्टी तिला किते आनंद देत. हिरवे हरभरे भाजून दाणे काढून द्यायची. ‘शिकला- सावरलेला आहे. सूट बूट खराब व्हायला नको. ’ मक्याच्या कानसतले दाणेदेखील काढून द्यायची. ‘हात घाण करू नको. ’ माझे कपडे धुण्यासाठी धोबिणीला कधी द्यायची नाही. म्हणायची, ‘महागातले कपडे आहेत. हलक्या हाताने धुवीन. ‘ माझे ते कपडे धुताना तिला आमच्या लहानपणाची आठवण येत असावी. तेव्हा ते छोटे छोटे कपडे धुताना तिला अपार आनंद होत असे. तेव्हा तर बाबाही होते. एक सुखी आणि सापन्न असा घर होतं आमचं. आईला आकापाठोपाठ एक मुले होत गी, तिकडे बाबा दूर होत गेले.

‘मोठ्या मुलाला मोठा मान मिळतोच. याने तर सगळ्या गावा मन मिळवून दिलाय. ’ आईचा चेहरा जितका तेजाळायचा, तितका भावांचा चेहरा विझत जायचा. हळू हळू सगळ्यांच्या बायका आल्या. आईला मारले जाणारे टोमणे आता तिप्पट झाले.

मला चांगलं आठवतय, एकदा मधल्याच्या बायकोने भाजीत मिरची जास्त घातली होती. ते घशात अडकली. इकडे मी खोकत होतो, तिकडे आईचा जीव वर खाली होत होता. स्वाईपाकघरात जाऊन सुनेला रागावली. म्हणाली, ‘तुला माहीत आहे नं, त्याला जास्त तिखट चालत नाही. इतक्या दुरून तो येतो, ते तुम्हा लोकांना भेटण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही योग्य असं जेवणही बनवू शकत नाही. ’ असे अनेक क्षण. मोठ्यासाठी ते सगळे सन्मानाचे क्षण असायचे. परंतु तिघे भाऊ आणिक त्यांच्या बायका मात्र कुढत राह्यच्या.

मोठा नावालाच आहे. याने खरं तर सांभाळायला हवं आईला, पण सांभाळतोय आम्ही. धाकटे असून आमचं कर्तव्य पार पडतोय. ‘

‘मोठ्याबद्दल प्रेमाचे उमाळे खूप येताहेत. करून घे माया. आज आहे, उद्या निघून जाईल. ’

अशी अनेक कडवट बोलणी माझ्या मनात गुंजात रहातात. आज प्रत्येकाला एक तृतीयांश वाटणीत सगळा वाटा घेतलाय भावांनी. तो चौथा, जो आईसाठी पाहिला होता, तो कुठेच उरला नाही आता.

आईचा चेहरा डोळ्यापुढे येतोय. ती असताना, तिच्यासमोर कुणी माझा हिस्सा घेतला असता, तर त्याची काय परिस्थिती झाली असती. जेव्हा ती दूध आटवून मावा मिठाई बनवायची, तेव्हा माझ्या वाटणीची कुलपात ठेवली जायची कारण मी अभ्यासात गुंतलेलो असायचो.

गाता काळाच्या आठवणी येता येता अनेकदा हात फोनपाशी गेला. वाटलं, तिघा भावांना विचारावं, या वटणीत मी कुठे आहे?’ पण धीर झाला नाही. वर असलेला आईचा फोटो दिसतो. टी म्हणत असते, ‘ मी तुला खूप दिलाय बेटा. पहिला मायेचा वर्षाव तुझ्यावर केलाय. तूच तर मला मातृत्वाच्या सुखाची जाणीव करून दिलीस. मी तर आहे ना तुझ्याबरोबर!’

‘त्यांना पैशाची गरज आहे. ते फार शिकलेले नाहीत. ’

‘ते शहाणे नाहीत. समजदार नाहीत. तू तुझ्या हुशारीने पैसे कमावशील. ’

‘ते तुझे धाकटे भाऊ आहेत. त्यावेळी वाटणी रोज होत होती. त्यावेळी तुला जास्त प्रेम, माया मिळत होती. त्यावेळी त्यांनीही प्रश्न विचारले होते. त्यांनाही उत्तर देऊ शकले आणि आता तुलाही… एक रत्तीभर, टोला, मासा, काही तरी तुझ्यासाठी जास्तीचं होतंच ना!’ 

आईचा तो हात, जो मोठ्याच्या डोक्यावर आधी ठेवला जायचा, तोच हात विदेश गमनांनंतर हजारो मैलांवरून आशीर्वाद देत असायचा. तिचा तो हात आजदेखील माझ्या डोक्यावर आहे. त्या हाताचा स्पर्श माझ्या केसविरहित, टक्कल पडलेल्या डोक्यावर जाणवतो. मोठ्या मुलाच्या नुसतं नाव घेण्यानेही तिच्या चेहरा दुप्पट प्रकाशमान व्हायचा. ‘आज सगळे भाऊ समान खूश आहेत. तर तू तीनच्या खुशीत साथ दे. आज सगळ्यांना आपला योगी हक्क मिळाला आहे.

वाटणी तर पैशांची झाली होती. माझ्यापाशी गेल्या अनेक वर्षांपासून जे होतं, ते आजही सुरक्षित आहे. माझा हिस्सा पूर्ण. एकास एक. त्यात वाटणी नाहीच. मी वर बघितलं. आईचा चेहरा जरा जास्तच हसरा दिसत होता.

भावांना मी फोन लावलाच.. पण हे सांगण्यासाठी की तुमच्या निर्णयाने मी खूप खूश आहे.

– समाप्त –

मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – hansadeep8@gmail.com

मराठी भावानुवाद : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाटणी – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ वाटणी – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

आज आईच्या संपत्तीची वाटणी झाली.

जमीन-जुमला याची नेहमीच वाटणी होते. त्यात नवीन काही नाही. नवीन गोष्ट ही आहे की वाटणी चौघांच्यात नाही, तिघांच्यात झाली. आईच्या चार मुलांच्या यादीतून माझं नाव कमी करण्यात आलं. कदाचित, जेव्हा मी देश सोडून गेलो, तेव्हाच ते कमी करण्यात आलं असेल, फरक इतकाच की ते मला आज कळलं. विदेशात वास्तव्य असल्याने मी त्या मृत्युपत्रात कुठेच नव्हतो. कदाचित देश सोडल्यानंतर मी आईचा मुलगाच राहिलो नाही. आई असताना मी त्या तिघांपेक्षा अधीक लाडका होतो. ती तिघं माझ्यानंतर जन्माला आली होती. मी लवकरच आकाशात उडी मारली. उडताना आपली मुळं उपटून बरोबर घेऊन आलो होतो. मी माझ्या मुळांशी जोडलेला राहिलो खरा, पण त्या जमिनीपासून मात्र उखडला गेलो, जिथे ती मुळे रूजली होती. तिथे मुळंच जर उरली नाहीत, तर कुठला मुलगा, कुठला भाऊ आणि कुठलं मृत्यूपत्र? म्हणून माझं नाव काढून टाकण्यात आलं होतं॰

खरं तर या बातमीमुळे मला दु:ख व्हायला नको होतं पण खूप दु:ख झालं. पैशासाठी दु:ख झालं की नाही, हा भाग वेगळा! दु:ख यासाठी होतं की आईच्या मुलांच्या यादीतून माझं नाव काढून टाकण्यात आलं होतं. रक्ताचं नातं, दोघांच्यातील अंतराने गिळून टाकलं होतं. आकाशातील उड्डाणानंतर रक्ताचा लाल रंग अशा तर्‍हेने धूसर झाला की आपला रंगच नाही, तर अस्तित्वच हरवून बसला. आपल्या देशातून विदेशात येताना कितीदा तरी डोळे पाणावले असतील पण आज ते भिजले, त्याची जखम आतपर्यंत सलत राहिलीय. ही बातमी मला वेदनादायी व्हायला नको होती पण खूप वेदना झाली.

माझ्या हिश्श्याची वाटणी कशी करायची, याबद्दल माझी काही योजना होती. भाऊ आणि त्यांची मुले यात किती वाटायचे, आईच्या नावाने कुठल्या कुठल्या हॉस्पिटलना देणगी द्यायची, गरिबांसाठी कुठे, किती मदत करायची याचा मी विचार करून ठेवला होता पण धाकट्या भावंडांनी ही जबाबदारी उचलण्याची संधीच मला दिली नाही. त्यांना माहीत असणार, हा लोकांच्यात वाटून दानशूर बनणार. गरिबांचे आशीर्वाद हा एकटाच घेणार, त्यापेक्षा आमचेच आशीर्वाद लाभणं बरं. आम्ही पण गरीबच आहोत की!

माझे विचार एका दिशेकडून द्सर्‍या दिशेकडे लंबकाप्रमाणे फिरत होते. आपल्या लोकांचा परकेपणा दु:ख देतोय. एकाच्या तीन वाटण्या. तीन हा आकडा मला दंशाप्रमाणे टोचतोय. एक कोटी पन्नास लाखाचं घर. सरळ सरळ प्रत्येक भावाच्या खात्यात पन्नास लाख. सरळ साधं गणित.

आईला जाऊन आता सहा महिनेच झालेत. 30 मार्च 2020. कोविदचा काळ. सगळी उड्डाणे रद्द केली होती. भारतात लॉकडाउनचं पालन कुणीच करत नव्हतं. आई गेल्यावर नातेवाईकांची थोडी गर्दी झाली. सगळ्यात मोठा मुलगा दूर विदेशात बसून, आपल्या आईला ऑनलाइन निरोप देत होता. आई इतक्या वर्षात गेली नाही पण करोना येताच निघून गेली. कदाचित तिला माहीत असावं, आणखी काही दिवस थांबली, तर तिच्याजवळ येऊन कुणी उभंही रहाणार नाही. आत्ता कमीत कमी चार खांदे तरी मिळतील. मी जाऊ शकलो नाही. जी आई माझं गुणगान करताना थकत नसे, त्या आईला मी आकाशातील तरंगाद्वारे निरोप दिला. माझ्या आत उठलेले तरंग. ते अग्नीच्या ज्वालेशी एकरूप होऊन गेले आणि त्यांनी आईशी माझा संवाद करून दिला.

आवाज आला, ‘न… न… दु:खी होऊ नकोस बेटा. तू दूर असूनही माझ्या खूप जवळ आहेस. ’ आणि आईच्या या अथांग प्रेमाची खोली लक्षात घेऊन मी स्वत:ची समजूत घालीत असे. माझा नाईलाज असल्याचं संगत असे. आणि ती समजून घेई… नेहमीसारखंच… पुढे जाण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात. तू पुढे जा. आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल कर. तुझी कधी चिंता वाटली नाही मला. चिंता म्हणशील तर या नालयकांची वाटते. ‘

‘तू माझी आजिबात काळजी करू नको. मी इथे मजेत आहे. ’

आपल्या लायक आसलेल्या मुलाच्या लायकीचा तिला अभिमान होता. ‘ज्या कुशीतून तुझ्यासारख्या हिर्‍याला जन्म दिला, त्याच कुशीतून या नालायकांनीसुद्धा जन्म घेतला. ’ या शब्दांची ताकद एवढी होती की मी कधी आईची चिंता केली नाही की भावांची. मी जर कशाची चिंता केली असेल, तर माझ्या करिअरची. पुढे पुढे जात चाललो. घरी येणं कमी होत गेलं. आईला दिलासा देत राहीलो. आईच्या आशीर्वादांचा वर्षाव होताना बघून माझ्या जीवनात रमून गेलो.

धाकट्या भावाच्या जन्मानंतर बाबा आम्हाला सोडून साधू बनले. म्हणाले, ‘मी वैराग्य घेतोय. आत्म्याचं कल्याण करायचय. ’

बोलणारे दहा तोंडांनी बोलले. ‘इतके दिवस पोरांना जन्माला घालताना कधी वैराग्य आड नाही आले. ’

‘चार लहान मुलांना बघून लोकांना वैराग्य आलेलं असलं, तरी पळून जातं. या महाशयांना आता आलय.

वैराग्याच्या नादात कुठे निघून गेले, कुणालाच कळले नाही. आई काय करणार? ती जशी काही जे घडेल त्याला तोंड देण्यासाठीच जन्मली होती. आपल्या विवशतेला स्वीकारलं तिने. तक्रार करायची तरी कुणाकडे? जो साधू बनला त्याच्याकडे, की जो विवाह करून घेऊन आला त्याच्याकडे, की जो चार मुलांची भेट देऊन एकटाच निघून गेला, त्याच्याकडे? एकटा कसा आत्म्याचं कल्याण करेल? साधूंच्या मध्ये राहून काय भूतकाळ विसरू शकेल?

जितकी तोंडे तितकी बोलणी. ‘कुणी तरी काही तरी केलं बहुतेक. ’

‘वरची हवा लागली. त्यामुळेच एकाएकी वैराग्य आलं. ’

वरच्या हवेत अनेक आत्मा दिसायचे. ते बाबांना आपल्याकडे ओढायचे. ‘वाटतय मृत आत्मा बाबूजींना खेचून घेऊन गेले. आम्ही चार मुले आणि त्यांची पत्नी यांना नाही खेचू शकले. बाबांवरील चर्चेच्या शर्यतीत आम्ही हरलो. आई रडत, नशिबाला बोल लावत नाही बसली. स्थिर राहून ठामपणे सामना केला. सगळं सांभाळून मुलांचं पालन – पोषण केलं. मला शिकवलं. सवरलं. माझ्या धाकट्या भावंडांनाही ती शिकवू इछित होती. पण ती नाहीच शिकली. नववी-दहावीपर्यंत कशीबशी कॉपी करून पास झाली. मग त्यांनी शिक्षणच सोडून दिलं. आम्ही सगळे मोठे होत गेलो. आई-बाप नसलेली मुलेही मोठी होतात. आम्हाला निदान आई होती. ती बाप बनून डोक्यावर सावली धरत होती आणि आई बनून पदराची ऊब देत होती.

आमची आर्थिक स्थिती काही वाईट नव्हती. ठीक – ठाक होती. नसती तरी, आईनं स्वत: भुकेलं राहून आम्हाला घास भरवला असता. सुरूवातीला तीन-चार महीने जमा-पुंजीतून काम भागत राहिलं. नंतर तिने मेहेनत करून आमचं दुकान संभाळलं. दुकान पाहिल्यापेक्षा जास्त चांगलं चालू लागलं. रहाण्यासाठी आमच्या पूर्वजांनी बांधलेली हवेली होतीच. रोजच्या खर्चाचीच फक्त व्यवस्था करायला हवी होती.

एक काळ असा होता, की आम्हा चार धडधाकट मुलांना बघून आई खूश होऊन जायची. येणार्‍या भविष्याच्या कल्पनेवर झुलत रहायची. तिला दिसायचं, मुलं, सुना, नातवंडं तिला झुलवताहेत. आसपास नोकर – चाकर आहेत.. शेठाणी झालेल्या आईची सेवा करायला तत्पर असलेले. त्यावेळी मुलांचे पाय पाळण्यात होते. पाळण्यातून काढल्यावर मुले आपआपल्या पायांवर उभी राहिली. डोळे आपली स्वप्ने बघू लागली. त्या स्वप्नात आई कुठेच नव्हती. जर काही असेल, तर आईचं मोठं घर होतं. त्याच्या चार तुकड्यात एक तुकडा खूप आवडायचा. तो आपला वाटायचा. आपलं स्वप्न वाटायचा.

ते जुनं, जर्जर घर गावाचं नागरीकरण होताच, करोडोच्या संपत्तीत बदललं. खरं तर घर नव्हतंच ते. अडगळीची खोली होती. किती वर्षापासूनच्या जुन्या जुन्या बिनकामाच्या वस्तू पडून होत्या. वस्तू एकदा घरात आली, की आली. बस! पडून राहिली. ती टाकून देण्याची किंवा धूळ झाडण्याची गरज नाही वाटली कुणाला. जसं काही वस्तूने एकदा घरात प्रवेश केला, की ती घराचाच हिस्सा बनून राहिली. घरातून बाहेर नाही जाऊ शकणार. न बोलणार्‍या वस्तू घरात राहिल्या पण बोलणारे घर सोडून निघून गेले. ज्यांच्या असण्यामुळे घर, घर होतं, ते बाबा मागेच निघून गेले होते. घरातील मुलेही एक एक करत निघून गेली. त्यांना आई काही रोखू शकत नव्हती, नाही रोखलं. पण वस्तूंना घरात रोखून ठेवलं.

कधी निवांतपणे ती त्यांना कुरवाळत असेल. त्यांच्याशी बोलत असेल. जेव्हा घर समृद्ध होतं, त्या दिवसांची आठवण करत असेल. त्यावेळी वस्तू नाही, घरात माणसं बोलत असतील. आता ती जबाबदारी या वस्तूंनी घेतली आहे. आईच्या आठवणी या वस्तू जाग्या करायच्या. या मोठ्या घरात, छोट्याशा बांध्याच्या आईची एकही खोली नव्हती. जिथे वाटेल तिथे बसायची॰ मनाला वाटेल तिथे दुपारची डुलकी घ्यायची. घरात खोल्या नव्हत्याच. मोठे मोठे हॉल होते. तेव्हा छोट्या छोट्या खोल्यांची बहुदा पद्धत नव्हती. घरात जितके मोठे मोठे हॉल असतील, तितकं घर चांगलं मानलं जायचं. त्या मोठ्या हॉलवजा खोल्यातून अनेक वस्तू अव्यवस्थितपणे ठेवलेल्या असायच्या. म्हणजे, ज्या गोष्टीची गरज भासेल, ती डोळे उघडताच समोर दिसावी. कुणी ते काही बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या गरजेची वस्तू दिसली, आईला विचारून घेतली.

वर्षं उलटली. घराची देखभाल होत नव्हती. पांढर्‍या चुन्याने लिंपलेल्या भिंतीचे पोपडे पडत होते. खिर… खिर… खिरत होते. जिथे तिथे पालींची डाट वस्ती दिसत होती. कधी कधी उंदीर दिसायचे. इतक्या वेगाने ते पळत, तरी खोलीची लांबी इतकी होती की, एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात पोचेपर्यंत, उंदरांचा आकार-प्रकार सगळं दिसत होतं. वरचं छत इतकं कमकुवत झालं होतं, की कधीही खाली पडलं असतं. प्रत्येक करकरणार्‍या भीतीमागे आईची मजबूत नजर होती. त्याच्यावर आजपर्यंत कुणी दृष्टी टाकू शकलं नाही. तिच्या नालायक मुलांनाही ते जमलं नाही. किती वर्षांपासून आईच्या जाण्याची वाट पाहत होते, कुणास ठाऊक? जितकी त्यांची बेचैनी वाढायची, तितकी आईची जीवनेच्छा वाढायची.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – hansadeep8@gmail.com

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ थिंक पॉझिटिव्ह… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ थिंक पॉझिटिव्ह… ☆ स्वप्ना मुळे (मायी)

उशीर झाला म्हणून जीजा लगबगीने आत शिरली,.. बाहेरच्या उकड्यातून ह्या एसी खोलीत शिरल की जीव कसा गारेगार होऊन जातो ना अस मनात म्हणत ओढणी खोचून चपला रॅकमध्ये चढवून,.. हळूच नकली असून अगदी खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या फुलांना तिने लहान मुलीसारखा हात लावला त्या वेलवेट फुलांच तिला उगाच आकर्षण वाटायचं,.. त्याचवेळी तिच्याकडे पाहात पार्लरवालीने उगाच घसा खाकरला,.. तशी जरा घाबरत दबकत ती आत छोट्याशा किचनकडे पळाली,.. टू बी एच के मध्ये आलिशान सजवलेलं हे पार्लर,.. अगदी राजवाड्या सारखंच वाटायचं तिला,.. मोठे मोठे आरसे, चकचकीत भिंती,.. फुलांच्या सुंदर आरास,.. शाही फर्निचर,.. सगळी सुगंधी सौंदर्य प्रसाधन,.. आणि इथे येणाऱ्या बायका त्याही तेवढ्याच सुंदर अगदी राणी सारख्या आणि इथून जाताना तर अगदी महाराणी दिसायच्या,.. तुकतुकीत अंग दिसायचं त्यांचं,.. चमकणारे हात, ओठ आणि सळसळणारे केस,.. ती सुंदर आकर्षक नखं,.. सतत यायच्या अश्या राण्या इथे,.. आपली मालकीण अगदी गोड बोलत हसत त्यांना मस्त, मालिश, केसांच्या स्टाईल, कधी कोरीव भुवया,.. कधी तर पायांना मस्त घासून गोरपान करून द्यायची,… आधी या कशाची माहिती नव्हती आपल्याला,.. लग्नात काय ते बाजूच्या सुमिने बळजबरी तोंडाला काहीतरी लावून दिलं पण त्या लेपाच्या सुगंधाने मनात काय शहारे उठले होते आपल्या,.. इथ तर पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळे महागडे क्रीम लावून ह्या बायका नुसत्या सुगंधी होऊन जातात,.. बायका तर बायका लहान सहान पोरी देखील काय काय करून घेतात ग बाई,.. पण मलाही फार वाटत पर्समध्ये एक गड्डी घ्यावी इथे मॅडमच्या टेबलवर टाकावी आणि म्हणावं फुल बॉडी राणीवाणी करून दे,… आणि माझी अशी सगळी सेवा केल्यावर,.. मॅडमनी किंवा तू,.. मी रोज जशी सगळ्यांना कॉफी देते तशी मला कॉफी आणून द्यावी,.. मी पण मग स्वतःला आरश्यात निरखत कॉफिचे एक एक घोट घ्यावे,.. तिच्या वाक्यावर हसत तिच्या सोबत काम करणाऱ्या शमीने तिला डोक्यात एक टपली मारली,.. “ए वेडे पटापट कप बाहेर नेऊन दे आधीच तुला यायला उशीर झाल्याने मॅडम चिडलेली आहे,.. आणि तू मॅडमनी किंवा मी तुला कॉफी द्यायचे स्वप्न बघतेस होय,.. तिने ऐकल तर काढून टाकेल नोकरीवरून,.. “

शमीच्या वाक्यावर जिजा म्हणाली,.. अग स्वप्न बघायला,.. मोठा विचार करायला काय पैसे लागतात व्हय,.. फुकट आहे तर बघू दे की,.. अन् माझा नवरा म्हणतो,.. असं छान आयुष्य बघत राहायचं,.. त्याला काय म्हणतात बघ आपल्या मॅडम पण सांगतात ना आपल्याला नेहमी,.. थिंक पॉझिटिव्ह,.. तस ग,.. झालं स्वप्न पूर्ण तर झालं नाहीतर तो बघण्याचा आनंद तर मिळतो ना,..

त्यावर चिडून शमी म्हणाली, “आता जातेस का,.. सांगू मॅडमला,.. “तशी जीजा म्हणाली,.. “हो ग बाई जाते. ” म्हणत जीजा कॉफीचे कप घेऊन बाहेर पळाली,..

चार जणींचे वेगवेगळे पार्लर सुरू होते,.. कुणाची हेअर स्टाईल, कुणाची फेस मसाज,.. कुणाचं व्हाक्सिंग आणि कुणाचा मेकअप,.. जीजाने कॉफीचे कप प्रत्येकीला दिले आणि निघाली तेवढ्यात मॅडम म्हणाली, “जीजा जरा इथे मेकअप करताना हे पकड आज ती चिंगी आली नाही त्यामुळे माझी धावपळ होत आहे,.. “मॅडमची अज्ञा ऐकवीच लागली,.. जीजा तिथेच उभी राहिली,.. ती मॅडमची मैत्रीण होती हे जीजाला माहित होत,.. ती मैत्रीण मॅडमला म्हणत होती,.. “जरा फेअर टोन घे माझ्या नवऱ्याला माझ्या काळया रंगाची फार लाज वाटते,.. कारण आज अगदी फॉरेनर येणार आहेत आमच्याकडे. “

समोरची बाई चांगली गव्हाळ गोरी होतीच की अगदी आपल्यासारखी काळी नव्हती तरी तिचा नवरा असा म्हणतो म्हणजे नक्की आंधळा असेल अस उगाच जीजाच्या मनात आलं,..

तेवढ्यात त्या मैत्रिणीला फोन आला,.. तो फोन जीजाने तिच्या कानाशी लावला कारण तिचे हात नेलपेंट लावलेले होते,.. ती फोनवर बोलत होती आणि ती एकदम ओरडलीच,.. “काय,.. अग असं कस तू वेळेवर सांगतेस,.. घरची पार्टी मोठी आहे,.. तू कोणाला तरी ऍडजस्ट कर पण ये ग बाई,.. नाही जमत शीट ठेव फोन,.. एवढं बोलत फोन बाजूला करण्याचा तिने जीजाला इशारा केला,.. आणि ती एकदम पार्लरमॅडमलाच म्हणाली,.. “मधु मला मदत हवी आहे तुझी,.. प्लीज मला काही काळासाठी तुझी जीजा दे ना,.. पैसे तुला देते आणि तिलाही,.. पण अगदी गरज आहे ग आज”

मॅडम म्हणाली, “आधी जरा सांगशील नेमक काय काम आहे आणि काय झालं,.. ?त्यावर ती मैत्रीण म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे फॉरेन क्लायंट येणार आहेत,.. तिघी लेडी आहेत,.. त्यांना दोन तास आमच्या घरी घालवायचे आहेत,.. पण काही पर्सनल गोष्टी असल्याने,.. इंग्रजी न येणारी पण स्मार्ट अशी कामवाली त्यांच्या फक्त अवती भवती हवी आहे आणि मी ठरवलेली कामवाली तिच्या मुलीला अपघात झाला म्हणून ती आता नाही म्हणते,.. आता माझ्याकडे वेळ पण नाही इथूनच मी आता त्यांना घ्यायला विमानतळावर जाणार होते,.. तुला म्हंटले होते ना आणखी एक जणीच पार्लर करून द्यायचे आहे,.. तिला आपण अर्ध्यातासाने बोलवले होते,.. तीच आता नाही म्हणते,.. मधु प्लीज हिला समजवून सांग आणि पाठव दोन तास,.. प्लीज.. “

जीजा ऐकत होती पण जरा घाबरली होती,.. पण मॅडम पुढे काही चालणार नाही हे ही जीजाला माहित होत,.. मॅडमने तिला बाजूला घेतलं आणि समजावल मध्येच ती मैत्रीण खुर्चीवरून उठून जीजाकडे येत म्हणाली, “नाही म्हणू नकोस प्लीज ग,.. आता वेळेवर बाई मिळणार नाही मला,.. मी तुला दोन तासांचे दोन हजार रुपये देईल ग,.. “जीजाने मॅडम कडे बघितलं,.. मॅडम म्हणाल्या, “जा माझी विश्वासाची मैत्रीण आहे,.. “जीजा म्हणाली, “पण ते चहा, कॉफी द्यायचं,.. कोण बघेल,.. “मॅडम हसत म्हणाली, “करेल आज शमी ऍडजस्ट आणि मी आहे मदतीला तू आता पटकन खुर्चीत बस.. म्हणत मॅडमने तिच्याकडे पार्लर गाऊन फेकला,.. तो घालताना जीजा लाजली,.. तिला रोज बायकांना अश्या गाऊन मध्ये बघून लाज वाटायची,.. तिने पडद्याआड जाऊन गाऊन घातला आणि ती त्या सिंहासनासारख्या खुर्चीत रेलली,.. मॅडम तिच्या मैत्रिणीला म्हणाल्या, “फेशियल आणि मेकअप करते,.. त्यावर,.. “मैत्रीण म्हणाली, “हे बघ एकदमच vip गेस्ट आहेत त्या फॉरेनर,.. अगदीच स्मार्ट वाटली पाहिजे,.. ड्रेस तर आहेच बॅगमध्ये पण ते हात, पाय सगळच क्लीन करून घे अजून चार तास आहेत ना आपल्याकडे,..

जीजा मघाच आपल स्वप्न पूर्ण झाल म्हणून आनंदली होती आणि मनातून घाबरली देखील होती,.. दोन तास तसे अवघड जाणार होते,.. ती ह्या विचारात डोळे बंद करून बसली होती आणि तेवढ्यात मॅडमचे गार, मऊ हात तिच्या चेहऱ्यावर फिरायला लागले,.. तो क्रिमचा सुगंध,.. तिला अगदी स्वप्नातल्या परीसारखं वाटायला लागलं,.. तिने हळूच डोळे उघडुन आरश्यात बघण्याचा प्रयत्न केला,.. ती जरा लाजली,.. उघडे पडलेले खांदे,.. तो चमकणारा चेहरा,.. मॅडमने मसाज करताना चेहऱ्यावर प्रेमाने केलेले स्पर्श,.. सगळ सगळ अगदी स्वप्नवत,.. मॅडम मध्येच दुसऱ्या खोलीत गेल्या मस्त गाणी सुरू होती आणि खोलीत मंद प्रकाश,.. जीजाला आवडणारच गाणं सुरू होत,.. “आज मैं उपर आस्मा नीचे,.. “

गाण्याच्या मध्येच तिला हाक आली,.. “कॉफी घ्या बाईसाहेब,.. ए तुझ थिंक पॉझिटिव्ह तर काम करून गेलं ग,.. ” जीजा शमीला बघून एकदम गळ्यात पडत म्हणाली,.. “खरच ना काय मज्जा असते ग हे सगळ सुख आ हा हा,… शमे मला पैसे मिळणार ना त्यातून तुझ क्लीनप तरी माझ्याकडुन करून घेऊ उद्या आपण,.. आणि मी तुला कॉफी घेऊन येईल बघ तुला पण कळेल हे सुख,.. शमीला आपल्या ह्या मैत्रिणीच कौतुक वाटल,.. ही आपला पण विचार करते,.. शमी तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली तू मनाने सुंदर आहेस म्हणून आता आणखी सुंदर दिसशील,.. कारण मी इथे गेल्या कित्येक वर्षापासून काम करते,.. इथे आलेल्या सगळ्याच बायका सुंदर होऊन जातात अस नाही,… कारण आपण चहा, कॉफी देताना बघतो ना,.. ज्या सगळ्यांना प्रेमाने वागणूक देतात, आपली श्रीमंती मिरवत नाही त्या जास्तच सुंदर दिसतात ना,.. तशी तू आता सगळ्यात सुंदर दिसत आहेस.

जीजा म्हणाली, “हे सगळ ठीक आहे ग, पण आता पुढे कठीण आहे,.. ही सगळी आपली हौस होती ग पण आता हे मेकअपचं बेगडीपण मिरवता येईल का.. ?मला त्याची सवय नाही ना,.. शमी म्हणाली, “आपण काही वेगळ केलं आहे ह्याची जाणीवच नको ठेवुस अगदी प्रामाणिक आणि सहजपणे वावरलीस की सोपं जाईल सगळ,.. जीजाने स्वतःच रूप आरश्यात न्यहाळत कॉफी घेतली,.. शमिला आज जास्तच काम पडलं हे मात्र तिला मनोमन जाणवत होत,..

वेळ भरभर पुढे गेली आणि पार्लर मधून बाहेर पडताना जीजा अगदी जोजो दिसायला लागली,.. सावळी असली तरी सगळी त्वचा तुकतुकीत दिसत होती,.. केसांना वॉश करून केलेली हेअर स्टाईल, मेकअप सगळ जीजाच रूप पालटून टाकणार होत,. आणि विशेष म्हणजे तो फ्रॉक अगदी मस्त वेलवेटचा,.. त्या कोपऱ्यातल्या फुलांसारखा ज्याच्या स्पर्शाने जीजा आनंदून जायची,.. आज तर अगदी तसा ड्रेस अंगभर गुदगुल्या करत होता,.. मॅडमनी जीजाला जवळ घेतल,.. तुला चार चौघात वावरता येतं तेवढी तू हुशार आहेस म्हणून मी ही जबाबदारी घेऊ दिली आहे तुला,.. जा नीट काम कर,.. जीजा मॅडमच्या गळ्यातच पडली,.. गावाकडे नवीन लग्न झालेलं हे जोडपं निव्वळ वेळ घालवत आयुष्य जगत होत म्हणून मॅडमने सहा महिन्यापूर्वी जीजा आणि तिच्या नवऱ्याला इथे आणल होत,.. त्याला कंपनीत कामाला लावून दिलं आणि जीजाला इथे आणल,.. पण अगदी चालण्या बोलण्या पासुन सगळ त्यांनी जीजाला शिकवल होत,.. कितीतरी नवे शब्द जीजा शिकली होती,.. कोणी म्हणणार देखील नाही की खेड्यात रिकामी हिंडणारी ही पोरगी असेल,.. इतकं चंट आणि चटपटीत त्यांनी तिला केलं होत,.. खरतर पुढे शिक्षण देऊन तिला चांगली नोकरी लावावी अस मॅडमला वाटत होत,.. जीजा सासरी पैसे पाठवते त्यांना पैसे पुरत नाहीत तरी कुठली तक्रार न करता अगदी उत्साहाने फिरणारी ही जीजा मॅडमची लाडकी होती,.. ती मैत्रिणीच्या गाडीत बसून गेली आणि मॅडम शमीला म्हणाल्या, “हुशार आहे पण नशीब घेऊन नाही आली,.. “त्यावर शमी म्हणाली, “स्वप्न मात्र घेऊन आली आहे ती,.. मॅडम तुम्ही आम्हाला जे थिंक पॉझिटिव्ह शिकवता ते ती पक्क डोक्यात ठेवते,.. कदाचित म्हणून आज तिचं छोटं स्वप्न पूर्ण झालं,.. “

चार तासांनी जीजा आलीच अगदी हवेवर स्वार होऊन,.. ती ते दोन तास जिंकून आली,.. सोबत पैसे, तो अनुभव ती खुश होती,.. पार्लर मध्ये आल्यावर तिने आपला जुना ड्रेस घातला,.. मॅडमला नमस्कार केला,.. मॅडम म्हणाल्या, “जीजा तो मेकअप काढून देते चेहऱ्यावरचा,.. तर जीजा म्हणाली, “नको मॅडम आज माझ्या राजाला ही राणी अशी वेगळी बघू द्या की,… पण,.. एक सांगू मॅडम असं चकचकीत तोंड केलं की भीती असते हो आतले आपण हरवून जाऊ की काय,.. “यावर मॅडम हसून म्हणाल्या, “जीजा अग, असे तर किती तरी प्रसंग असतात की ते आपल्याला हरवू पाहतात नुसता तोंडावर मेकअप लावल्याने अस होइल अस नाही ग,.. आयुष्य जगताना कितीदा तरी तुम्ही हरू शकता, बदलू शकता,.. तेंव्हा एक लक्षात ठेवायचं जीजा,.. थिंक पॉझिटिव्ह,.. जे होईल ते चांगल्यासाठीच ते होईलच,.. “

तेवढ्यात शमी कॉफी घेऊन आली,.. पार्लर बंद करण्याची वेळ होती,.. तीन कप कॉफीचे एकमेकावर किंणकिणले थिंक पॉझिटिव्ह.. “

© स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संस्थापक् संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हे तर ‘जीवनदान’…  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ हे तर ‘जीवनदान’…  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

“मॅडम, फुकटचे पैसे नकोत, गजरा घ्या… आज माझा ‘दुसरा वाढदिवस’ आहे! ” सिग्नलवरच्या पोराचे शब्द ऐकून एसी कारमध्ये बसलेल्या करोडपती आईने थेट रस्त्यावरच हंबरडा फोडला!

पुण्यातील चांदणी चौकातील सिग्नलवर दुपारच्या कडक उन्हात गाड्यांची रांग लागली होती. एका आलिशान ‘ऑडी’ (Audi) कारमध्ये ३५ वर्षांच्या ‘अनुराधा’ डोळ्यांवर गॉगल लावून बसल्या होत्या. पण त्या गॉगलच्या आतून त्यांचे डोळे सतत रडत होते.

आज ‘१५ एप्रिल’. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच दिवशी अनुराधा यांचा ७ वर्षांचा एकुलता एक मुलगा, ‘अंश’ एका भयंकर अपघातात त्यांना सोडून गेला होता. अंश ‘ब्रेन डेड’ (Brain Dead) झाला होता, आणि एका धाडसी निर्णयापोटी अनुराधा आणि त्यांच्या पतीने अंशचे सर्व अवयव (Organs) दान केले होते. आज अंशचा स्मृतिदिन होता. अनुराधा अत्यंत निराश अवस्थेत अनाथाश्रमाला देणगी देऊन घरी परतत होत्या.

– – तो सिग्नलवरचा प्रसंग आणि एक १० वर्षांचा मुलगा :

सिग्नल लाल झाला. उन्हाच्या झळा लागत होत्या. तेवढ्यात एक १०-११ वर्षांचा, घामाने डबडबलेला पण अत्यंत गोड चेहऱ्याचा मुलगा अनुराधा यांच्या कारच्या काचेवर टकटक करू लागला. त्याच्या एका हातात मोगऱ्याचे गजरे होते आणि दुसऱ्या हातात पाण्याचा रिकामा ग्लास.

अनुराधा यांना भयंकर चिडचिड झाली. त्यांनी रागाने काच थोडी खाली केली आणि पर्समधून ‘५० रुपयांची’ नोट काढून त्याच्या अंगावर फेकत म्हणाल्या,

“हे घे पैसे आणि जा इथून! मला कोणताही गजरा नकोय, आणि मला कुणाशीही बोलायचं नाहीये. “

पण त्या मुलाने ती ५० ची नोट उचलली नाही. तो अत्यंत स्वाभिमानाने काचेजवळ आला आणि म्हणाला,

“मॅडम, माझी आई म्हणते की फुकटचे पैसे कधीही घेऊ नयेत, त्याने पाप लागतं. मी भिकारी नाहीये, तुम्ही एक गजरा घ्या, मगच मी हे ५० रुपये घेईन. “

त्याच्या आवाजातील निरागसपणाने अनुराधा यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी डोळ्यांवरचा गॉगल काढला आणि त्या मुलाकडे पाहिले. त्याचा चेहरा खूप शांत आणि हसरा होता.

अनुराधा यांनी विचारले, “एवढ्या उन्हात तू गजरे का विकतोयस? शाळा नाहीये का तुझी? “

– – तो सत्याचा स्फोट आणि अश्रूंचा बांध फुटलेला क्षण :

मुलगा गोड हसून म्हणाला,

“शाळा सकाळची असते मॅडम. पण माझी आई लोकांची धुणी-भांडी करते. माझ्या आईवर खूप मोठं कर्ज आहे, म्हणून मी तिला मदत करतो. आणि तसंही मॅडम… आज माझा ‘दुसरा वाढदिवस’ आहे! “

अनुराधा यांना काहीच समजले नाही. “दुसरा वाढदिवस? म्हणजे काय? “

मुलगा शर्टाची कॉलर थोडी बाजूला करत छातीवरची एक मोठी ‘सर्जरीची खूण’ (Operation Mark) दाखवत म्हणाला,

“मॅडम, तीन वर्षांपूर्वी माझ्या हृदयात भोक होतं. डॉक्टर म्हणाले होते मी मरणार! माझ्या आईने कर्ज काढून मला पुण्याला ‘सह्याद्री हॉस्पिटलमध्ये’ आणलं होतं. पण मला कोणीतरी देवदूत भेटला! बरोबर तीन वर्षांपूर्वी, ‘१५ एप्रिलला’ एका लहान मुलाचा अपघात झाला होता… आणि मॅडम… त्या मुलाचं धडधडणारं ‘हृदय’ (Heart) डॉक्टरांनी माझ्या छातीत बसवलं! त्या देवासारख्या मुलाने मला जीवन दिलं, म्हणून आज माझा दुसरा जन्मदिवस आहे! “

… हे शब्द ऐकताच अनुराधा यांच्या पायाखालची जमीनच सरकली! त्यांचा श्वास अक्षरशः कोंडला गेला! ‘सह्याद्री हॉस्पिटल’, ‘१५ एप्रिल’ आणि ‘हृदय प्रत्यारोपण’…

अनुराधा यांनी थरथरत्या आवाजात विचारले, “बाळा… तुझं नाव काय आहे? “

मुलगा म्हणाला, “माझं नाव कबीर आहे मॅडम. “

– – काळजाला भिडणारा क्लायमॅक्स :

अनुराधा यांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला. तीन वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या अंशचे हृदय ज्या ‘कबीर’ नावाच्या गरीब मुलाला दान केले होते… तोच कबीर आज त्यांच्या गाडीसमोर उभा होता!

अनुराधा वेड्यासारख्या गाडीचा दरवाजा उघडून भररस्त्यात खाली उतरल्या. त्यांनी त्या घामाने डबडबलेल्या कबीरला दोन्ही हातांनी घट्ट धरले. त्यांच्या डोळ्यांतून धाय मोकलून अश्रू वाहत होते.

“कबीर… बाळा, मला फक्त एक गोष्ट करू दे… ” असे म्हणत अनुराधा यांनी आपले कान आणि डोके कबीरच्या छातीवर ठेवले.

धड-धड… धड-धड…

त्या गरीब मुलाच्या छातीत आज अनुराधा यांच्याच पोटच्या गोळ्याचे, त्यांच्या ‘अंशचे’ हृदय धडधडत होते! ज्या हृदयाचे ठोके तीन वर्षांपूर्वी थांबलेत असे त्यांना वाटले होते, ते ठोके आज या रस्त्यावर एका स्वाभिमानी मुलाच्या छातीत जिवंत होते!

… अनुराधा भररस्त्यात गुडघ्यावर बसून ढसाढसा रडू लागल्या. त्यांनी कबीरला घट्ट मिठी मारली. सिग्नल हिरवा झाला होता, गाड्यांचे हॉर्न वाजत होते, पण एका आईला आज तिचा हरवलेला देवदूत परत मिळाला होता!

त्याच दिवशी अनुराधा यांनी कबीरच्या आईला शोधून काढले. त्यांच्या डोक्यावरचे हॉस्पिटलचे संपूर्ण कर्ज एका झटक्यात फेडून टाकले आणि कबीरच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. कारण एका करोडपती आईचा ‘अंश’ आज एका गरीब पण स्वाभिमानी पोराच्या रूपात जिवंत होता!

… *पैशाचा माज विसरायला लावणारी आणि अवयवदानाचे महत्त्व आणि आवश्यकता याबाबतचा (Organ Donation) एक अत्यंत पवित्र संदेश देणारी ही डोळ्यांत पाणी आणणारी घटना*


लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नकुशा — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ नकुशा — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(आशाला नाशिकला आदिवासी वसतिगृहात सहज प्रवेश मिळाला. आशा तिथे राहून कॉलेजला जाऊ लागली. तिला हे शहर अतिशय आवडलं. आशाला सुलभा स्वप्नाचे ड्रेस देई. आशा ते आपल्या मापाचे करून मस्त वापरत असे. जन्मजात या लोकांना सगळ्यांशी आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायची असलेली सवय तिला इथे उपयोगीच पडली. आशा बघता बघता बीकॉम झाली. तेही छान मार्क्स मिळवून.) 

इथून पुढे  

आशाला लगेचच राखीव कोट्यातून बँकेत नोकरी मिळाली….. त्यांच्या आदिवासी समाजातली ही पहिली पदवीधारक मुलगी. आशाने सुलभाच्या घरी येऊन नेमणूक पत्र सगळ्यांना दाखवलं. सुलभाच्या पायावर डोकं ठेवलं. गहिवरून म्हणाली, ” बाई, हे सगळं श्रेय तुम्हाला जातं. कोण कुठली दरिद्री आदिवासी मुलगी. तुम्ही भेटला नसतात तर मी तशीच कुजत पडले असते हो त्या पाड्यात. कसे उपकार फेडू तुमचे? ”

सुलभाच्या घरातल्या लोकांनाही गहिवरून आलं. सुलभाच्या सासू सासऱ्यांनी तिला हजार रुपये बक्षीस दिले. , स्वप्नाने सुंदर पर्स. आणि सुलभाने दहा हजार रुपये.

“अशीच मोठी हो बाळा. आता स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. शाबास तुझी. ”

“बाई, हेच माझं खरं घर आहे. मी तुम्हाला कधीही विसरणार नाही बाई. ” आशा निघून गेली.

आशाला सुलभा बँकेत भेटायची. छानशी साडी नेसलेली, चटपटीतपणे काम करणारी, क्लायंटशी अदबीने बोलणारी आशा बघून सुलभाला फार आनंद व्हायचा.

एक दिवस अचानक आशा सुलभाच्या घरी आली. ” बाई थोडा वेळ आहे का बोलायला? ”

आशा थोडी अस्वस्थ दिसत होती.

“ ये ये ग आशा. बस. आज निवांत आहे बघ मी. कोणी नाहीये घरी. ” सुलभा म्हणाली. आशाच्या हातात पोह्याची डिश देत तिने उत्सुकतेने विचारलं, “ सांग काय काम काढलंस? ”

“ बाई कसं सांगू? ”आशा थोडी थांबली. ” बाई, आमच्या शेजारीच एक कंपनी आहे. तिथला एक मुलगा नेहमी बँकेत येत असतो. खूप छान आहे तो. इंजिनिअर, दिसायला रुबाबदार. मला तो नेहमी भेटायचा बोलायचा. मी गुंतत गेले त्याच्यात. तोही माझ्या प्रेमात पडलाय असं वाटलं मला. तो पण होता माझ्या प्रेमात 

एक दिवस बोलताना मी माझे मागचे दिवस त्याला सांगितले. ”

तो दचकलाच.. “ झोपडीत? तू झोपडीत रहात होतीस? “

मग काहीही न लपवता मी त्याला सगळं सांगितलं… “ मी नकुशा मोरे आहे, आदिवासी आहे. ” 

त्याने हे ऐकलं आणि माझ्याशी सगळे संबंधच तोडून टाकले.

मला म्हणाला “मला वाटलं तू मोरे म्हणजे आमच्यापैकीअसणार.. माफ कर मला आशा. पण आमच्याघरी अशी तुझ्यासारखी आदिवासी मुलगी चालणारच नाही. माझे आजीआजोबा अजून हयात आहेत. या लग्नाला ते जन्मात परवानगी देणार नाहीत. मी त्यांच्या इच्छेविरुद्ध तुझ्याशी लग्न करणार नाही. ”..

… “ आणि असं म्हणून तो सरळ उठून निघून गेला. मी अगदी उध्वस्त झालेय हो. मला काही सुचत नाहीये “ आशा हुंदके देऊन रडायला लागली.

सुलभाने तिला जरा शांत होऊ दिलं. “हे बघ आशा, उत्तम झालं तू त्याला सगळं खरं खरं सांगितलंस.

अग, नंतर काहीतरी वाईट घडण्यापेक्षा हा आधीच नाही म्हणाला हे किती चांगलं झालं. अशी रडू नकोस. वाईट तर मुळीच वाटून घेऊ नकोस. सगळं छान होईल तुझं. देवाने जो कोणी तुझ्यासाठी नेमलेला असेल ना, तो वेळ झाली की समोर येऊन उभा राहील बघ. ” सुलभाने आशाचे डोळे पुसले.

आशा म्हणाली ”बाई, मी आता ती नकुशा म्हणूनही जगत नाहीये आणि आशा म्हणून जगतेय तरी मला माझी जन्माची ओळख असे नवीन आयुष्य जगू देत नाहीये. काय करू मी? ”

“आशा, होईल सगळं नीट. आत्तापर्यंत नाही का सगळं सोसलंस? जिद्दीने शिकलीस, नोकरी मिळवलीस, तसाच छानसा जोडीदार चालत येईल बरं समोर. शांत हो बघू.” 

“ बाई, त्याचं नाही हो वाईट वाटलं मला. माझं लग्न नाही झालं तरीही चालेल पण आता मी ठरवलं आहे.. मी आदिवासी आहे हे कळल्यावर सुद्धा जो मला हो म्हणेल त्यालाच मी स्वीकारीन. ” आणि ती शांतपणे निघून गेली.

– – – त्यानंतर बरेच दिवस गेले.

सुलभाच्या मुलीचं.. स्वप्नाचं लग्न ठरलं. तिच्याच कंपनीत मोठ्या पोस्टवर असलेल्या सागर मुजुमदारशी स्वप्नाने लग्न ठरवलं. अत्यंत आनंदात थाटामाटात स्वप्नाचं लग्न लागलं आणि आता लॉनवर रिसेप्शन चाललं होतं. स्वप्नाच्या आणि सागरच्या ऑफिसमधली बरीच मित्र मैत्रिणी जमून हसत जेवत गप्पा मारत बसले होते. सागरच्या मित्रांखेरीज इतर आणखी बरेच लोकही आले होते. घरचंच लग्न असल्यामुळे आशा सुंदर साडी नेसून, हसतमुखाने वावरत होती. स्वप्नाच्या आजीआजोबांकडे जातीने लक्ष देत होती. त्यांना काय हवं नको बघत होती.

… एक काळासावळा रुबाबदार मुलगा तिच्याकडे सतत बघत होता. आशाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. न राहवून तो शेवटी आशाजवळ येऊन बसला.

“ मी इथं बसलो तर चालेल का? ” त्यानं विचारलं.

“ बसा ना. जेवण झालं का तुमचं? काउंटरवरची गर्दी जरा कमी झालीय. घेऊन या डिश हवं तर. ”आशा म्हणाली.

“ हो हो जातो ना. आणि तुम्हाला गेले दोनतीन दिवस बघतोय मी या लग्नात. मी सागरच्या कंपनीतच आहे. त्याच्याच टीममध्ये. तुम्ही स्वप्नाच्या बहीण आहात का? ”

“ नाही हो मी बहीण नाही पण बहिणीपेक्षा जास्त जवळची आहे या घराच्या ”. एवढं बोलून आशा कोणीतरी हाक मारली म्हणून तिथून निघून गेली.

 दोन दिवसांनी सुलभा आशाच्या बँकेत आली. अचानक बाईना बघून आशाला आश्चर्य आणि खूप आनंद झाला.

“ बाई, आज इकडे कुठे? ”

“ अग जरा तुझ्याकडे काम होतं. कामावरून घरीच ये आज. ” इतकंच बोलून सुलभा निघून गेली.

बँक सुटल्यावर आशा सुलभाच्या घरी गेली. स्वप्ना लग्न होऊन गेल्यामुळे घर कसं उदास वाटत होतं. आजीआजोबा निमूट हॉल मध्ये बसले होते.

“ ये ग बाळा “… सुलभाने तिला बोलावलं. ” अगं तुझ्यासाठी एक मुलगा थांबलाय. त्याला तुझ्याशी बोलायचं आहे… शंकर, बाहेर ये ना. ”

आशाने वळून बघितलं तर स्वप्नाच्या लग्नात तिच्या शेजारी बसलेला तोच तरुण होता.

सुलभाने ओळख करून दिली. ” हा सागरचा मित्र शंकर जाधव. मी जरा बाहेर जातेय. , तुम्ही बोला. ”

शंकरला बघून आशा बुचकळ्यात पडली. याचं आपल्याकडे काय काम असावं असं वाटलं तिला.

तिचा संभ्रम शंकर बघत होता.

“हे बघ आशा. मी तुला सागर स्वप्नाच्या लग्नात दोनतीन वेळा बघितलं. मला तू फार आवडलीस.

… आशाने त्याला मधेच थांबवलं… “ हे बघा. मी आशा मोरे आहे पण मी… “

तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तो म्हणाला.. “ तू आदिवासी आहेस. मला सगळं माहीत आहे. स्वप्नाने सगळं सांगितलं आहे मला. आता मी सांगतो ते ऐक आणि मगच ठरव तुला काय करायचे आहे ते.

.. मी शंकर जाधव आहे खरा पण मलाच माहीत नाही मी कोण आहे ते. मी लहान असताना कोणीतरी मला अनाथाश्रमाच्या पायरीवर आणून सोडलं असं आश्रमाचे चालक म्हणतात. मी तेव्हा दोन वर्षांचा असेन. मी अनाथाश्रमात वाढलो. चालकांनी मला शंकर जाधव असं नाव दिलं. हेही माझं खरं नाव नाहीच ना?

कोण जाणे मी कोण आहे.. कोणाचा आहे? मी धडपड करत शिकलो. आश्रमातून दहावीनंतर फक्त रहाण्यापुरता आसरा मिळाला मला. रात्रंदिवस अपार कष्ट केले, लहान मोठ्या नोकऱ्या केल्या. देवाने बाकी काही नाही तरी तीव्र बुद्धी मात्र दिली होती. त्या जोरावर सगळीकडे यश मिळवत इंजिनिअर झालो.

कसा ते विचारू नकोस. शिकवण्या घेऊन, कुठे मेसचे हिशेब लिहून फी जमवली. मग माझ्या मेरिटवर या कंपनीत ही चांगली नोकरी मिळवली. उत्तम पगार आहे मला. आणि माझ्या गरजाच अत्यंत कमी असल्याने मी फ्लॅट बुक करू शकलो. मिळेल तो येत्या वर्षात….. आशा, तुला निदान आईवडिलांनी नाव तरी दिलं. मग ते नकुशा का असेना. मला नाव देणारी आईच सोडून गेली….. बघ विचार कर. मला तू नाही म्हणालीस तरी वाईट नाही वाटणार. तुला आला तसे अनुभव मलाही आलेच आहेत. मला नकाराचं फारसं काही वाटत नाही हल्ली. तू थोडा वेळ घे.. पण लवकर सांग तुझं उत्तर. हल्ली जीव टांगणीला लागला की त्रास होतो. ” 

शंकर बोलायचा थांबला. त्याच्या काळ्याभोर डोळ्यात अश्रू तरळत होते.

आशा उठली. त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, ” माझं भाग्य म्हणून असा प्रामाणिक हुशार जोडीदार मला मिळतोय. मला तुझ्या जातीशी.. अनाथपणाशी काहीही कर्तव्य नाही शंकर. माणूस म्हणून तू फार खरा आहेस रे. , दुर्मिळ असतात अशी माणसं. बाई मला म्हणाल्याच होत्या. तुला तुझा जोडीदार एक दिवस नक्की मिळेल… शंकर, करूया आपण लग्न. दोन दुःखी जीव एकत्र आले की सुख नक्कीच पायघड्या घालत येईल आपल्याकडे. ” 

– तितक्यात सुलभा परत आली.. आशाने न राहावून एकदम तिला मिठीच मारली…

… ” बाई आजपर्यंत माझं सगळं सगळं भलं तुम्हीच केलंत. “.. आणि आशा खाली वाकली.. आणि स्वतःच्याही नकळत शंकरही. दोघांनी सुलभाला जोडीने नमस्कार केला.

… दोघांना जवळ घेताना सुलभाच्या डोळ्यातून आनंदाश्रू मुक्तपणे वहात होते

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नकुशा — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ नकुशा — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

नेरकर बाईंची बदली झाली तो भाग अगदी दुर्गम खेड्यातला होता.

एक डोंगर चढून दुसरा उतरला की जी वस्ती लागायची तिथे आदिवासी पाड्यातली ही शाळा.

सरकारी नोकरीमुळे त्यांना ही बदली घ्यावीच लागली. तरी एकाच ठिकाणी त्या दहा वर्षे होत्याच.

त्यांना एक तर राजीनामा देणे किंवा बदली स्वीकारणे हे दोनच पर्याय होते. घरची बेताची परिस्थिति, नणंदा सासू दीर एकच मुलगी ही जबाबदारी. नवऱ्याचा बेताचा पगार आणि या एवढ्या जबाबदाऱ्या म्हटल्यावर त्यांना नोकरी करणं प्राप्तच होतं.

नवीन गावात त्या रुजू झाल्या आणि तिथलं सगळं बघून घाबरूनच गेल्या. नवीन बाई आल्या हे समजल्याबरोबर गावातली मंडळी त्यांना भेटायला आली… 

“बाई, काळजी नका करू. आमचं गाव चांगलं आहे. आता आहे आदिवासी वस्ती खरी पण लोक गरीब आहेत. तुम्हाला त्रास नाही होणार. आधीच्या मास्तरांच्या दोन खोल्या रिकाम्या झाल्या आहेत त्या दाखवतो. तिथे रहा तुम्ही ”… पाटील म्हणाले. आग्रहाने त्यांना घरी घेऊन गेले.

पाटलीण बाई म्हणाल्या, “रहा हो बाई इथं. मी हाये की. रोज या इथं जेवायला. ” त्या हसून म्हणाल्या. ” इथं लै माणसं खात्यात पित्यात. त्यात तुम्ही जड न्हाय मला. लेकीवाणी माझ्या तुम्ही. ”

.. बाईंचे निम्मे ओझे त्या हसऱ्या गोड पाटलीण बाईना बघून दूर झाले.

– – अशा रीतीने सुलभा नेरकर लिंब गावच्या आदिवासीवाडीत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. दर शनिवारी रविवारी त्या आपल्या घरी नाशिकला पळत. तिकडे त्यांचा संसार मुलं नवरा वाट बघत असत.

सुलभाला पहिल्यांदा इथे रहाणे अतिशय जड गेले. कसली ती शाळा आणि कसली ती मुलं. बाईंकडे पहिली ते सातवी सगळे वर्ग होते. अजून एक शिक्षिका येणार होती ती अजून तरी रुजू झाली नव्हती.

वर्गात मुलांची उपस्थिती नगण्य असायची. आली तर आली नाहीतर घरून त्यांना पकडून आणावे लागायचे असं मुलं म्हणायची.

बाईंनी एक महिना सगळा आढावा घेतला. मुलाना न ओरडता, गोड बोलून, गोष्टी सांगायला सुरुवात केली.

नवीन बाई मारत नाहीत, गाणी गोष्टी शिकवतात म्हटल्यावर हळूहळू सगळी मुलं शाळेत यायला लागली.

त्या दिवशी हजेरी घेताना नाव समोर आलं.. ‘नकुशा मोरे’.

बाईंनी नाव घेतल्यावर एक काळी सावळी किडकिडीत मुलगी उभी राहिली. फाटके कपडे, केस किती दिवसात तेलाचा थेंबही न बघितलेले. डोळे मात्र चमकदार.

“बाय मीच नकुशा. ”

सुलभा म्हणाली, “ हे कसलं ग नाव तुझं? ”

तर हसत म्हणाली, ” बाई मी माझ्या आयेची पाचवी पोरगी. सगळ्याना नकोच होती. माझं नाव कुनी ठेवलंच न्हाय. आज्जी म्हणायची नकुशी पोरगी आली जलमाला. म्हनून सगळे मला नकुशा म्हणतात. ” 

… सुलभाच्या पोटात कालवलं. पाचवी मुलगी झाली म्हणून नकोशी? आणि तिचं नाव नकुशा?

हजेरी झाली आणि सुलभा शिकवण्यात गढून गेली. तिच रोज नकुशाकडे नीट लक्ष असायचं.

नकुशा रोज नेमाने शाळेत यायची. नाही पुस्तक नाही पाटी.

एक दिवस भावाची फाटकी चड्डी आणि सदरा घालून आली. ” नकुशा, हे कसले कपडे? असं घालून शाळेत यायचं नाही. मला चालणार नाही. ”

नकुशा मान खाली घालून उभी राहिली. ” बाई, एकच झगा आहे मला. तो काल धुतला तर अजून वल्ला हाये. मग हे कुडतं घातलं. शाळा बुडली तर तुम्ही रागाला येता न्हवं? मलाबी शाळा आणि तुम्ही लै आवडता. , म्हनून येते मी. घरी लै काम सांगती माय. इथं मला अब्यास आवडतो कराया. ”

सुलभाला अतिशय वाईट वाटलं. त्या आठवड्यात ती घरी गेली तेव्हा आपल्या मुलीचे, स्वप्नाचे कपडे तिने नकुशासाठी बॅगेत भरले. स्वप्नापेक्षा लहान होती नकुशा. पण होतील तिला. म्हणत सुलभाने तिला तेल कंगवा रिबिनी पण घेतल्या.

बाकीच्या मुलींची परिस्थिती तरी कुठे धड होती? पण नकुशा इतकी वाईट नव्हती. नकुशा खरोखरच नकोशी होती आईबापांना. पाच बहिणी आणि मग झालेला भाऊ. तो जीव की प्राण. नकुशा पाठोपाठच वर्षातच झालेला.

नकुशाला सुलभाने घरी बोलावले. नकुशा घाबरत घाबरत घरी आली.

“नकुशा, हे बघ मी काय आणलं तुला? या परीक्षेत तुला छान मार्क मिळाले ना म्हणून तुला बक्षिस. ”

नकुशाच्या डोळ्यात पाणी आलं. नकुशाने विचारलं, “ हे सगळं मला? एकलीला? बया. लै झ्याक आहेत बाई.. “

“ आता नकुशा, असाच छान अभ्यास करायचा. ”

“ बाई, मी इथं येऊ रातची झोपायला? मला अब्यास करायला जागा न्हाय झोपडीत. बा लै दारू पेतो. आयेला आमाला लै मारतो. मी येऊ का? मी तरास न्हाय देनार तुमाला. ” 

 

 

सुलभाला गहिवरून आलं. “ ये तू नकुशा. पण तुझ्या आईची परवानगी घ्यायला मी उद्या घरी येईन तुझ्या. ”

दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर सुलभा नकुशाबरोबर तिच्या घरी गेली. घर कसलं, नुसती झोपडी होती ती. आत वाकून शिरावं लागत होतं. दारिद्र्य म्हणजे काय हे मूर्तिमंत उभं होतं तिथे.

“आये माज्या बाई आल्यात ग. ”.. आई लगबगीने बाहेर आली.

सुलभा म्हणाली, “ तुमची मुलगी फार गुणी आणि हुशार आहे हो. तिला अभ्यासाला जागा नाहीये.

माझ्याकडे झोपायला आली तर चालेल का? मी तिचा अभ्यासही घेत जाईन. ”

आई म्हणाली ” न्या खुशाल. बाकीच्या या पोरट्या नको म्हणत्यात शाळा. बसल्यात घरी नुसत्या उंडग्या. ही नकुशी लै गुणगान करती तुमचं. येक तरी माजी पोर शिकू दे. काय करावं बाय… नवरा काही कमवत नाही. मीच करती कष्ट. काय सांगू तुमाला. न्या हिला तुमी. ” 

“अहो हिचं नाव मी सरकारी गॅझेटमध्ये बदलून घेऊ का? हे कसलं हो नाव? आपलं लेकरू कोणाला नकोसं होतं का हो? ” सुलभाने खूप विचारांती हे ठरवलं होतं.

“ अहो पाचवी पोरगी कोनाला हवी असनारे? काय ग नकुशे? नाव बदलतीस व्हय? अन काय ठेवती नवं नाव तुझी ही बाई? ” – ती आई गोंधळून गेली होती.

नकुशा लाजली. म्हणाली, “ मला आशा नाव आवडतं. बाई, नकुशी असलेली पोरगी आशा करून टाका तुम्ही. ”

सुलभा मनापासून हसली.. “ आता हिला नकुशा नाही म्हणायचं कोणी. आपण तुझं नाव आशा असं बदलून घेऊ. ”

… दुसऱ्या दिवशी सुलभाने शाळेत सगळ्याना सांगितलं, “ हिला आता नकुशा नाही म्हणायचं. तिचं नाव मी सरकारी गॅझेट मध्ये बदलून घेतलंय. आता ती आपली आशा झालीय हं. ”

आशा रोज बाईंच्या घरी रहायची. सुलभा कसा स्वयंपाक करते ते नीट बघायची. “अग आशा, आता थोडं वेळ घरी जा तुझ्या. ” तर म्हणायची “ नको. इथंच मस्त वाटतं मला बाई. ”

सुलभाच्या घरी राहून आशाची भाषा एकदम सुधारली. आशा झपाट्याने मोठी झाली. तरतरीत आशा आता छान दिसायला लागली. अजूनही सुलभाची बदली काही मूळ गावी होत नव्हती. आशा छान मार्क्स मिळवून दहावी झाली. अचानक सुलभाची बदली नाशिकला झाली.

“ आशा, तुझ्या या खेड्यात दहावी नंतर कॉलेज नाही. तू माझ्याबरोबर नाशिकला येतेस का?

तुझी आपण वसतिगृहात सोय करूया तिथे राहून घेशील का पुढचं शिक्षण? तुम्हाला जातीचे खूप फायदे मिळतात. घे करुन फायदा. शीक चांगली पुढे. मी आहेच ना तुझ्यासाठी. ” सुलभा अगदी मनापासून बोलत होती.

“ हो बाई. आवडेलच मला. मला तुमच्या लोकांसारखं शिकून मोठं व्हायचंय. मी राहीन वसतिगृहात. तुमच्या घरी राहून मी खरं जेवण कसं असतं ते बघितलं बाई. आमच्या घरी भाकरी असली तर भात नाही. भाकरीवर तिखट घालून खायचं. भाकरी वाळवून ठेवायच्या आणि मग पाण्यात कालवून खायच्या. पण वसतिगृहात यापेक्षा नक्की चांगलं असेल जेवण ना? मी राहीन तिथे. ”

आशाला नाशिकला आदिवासी वसतिगृहात सहज प्रवेश मिळाला. आशा तिथे राहून कॉलेजला जाऊ लागली. तिला हे शहर अतिशय आवडलं. आशाला सुलभा स्वप्नाचे ड्रेस देई. आशा ते आपल्या मापाचे करून मस्त वापरत असे. जन्मजात या लोकांना सगळ्यांशी आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायची असलेली सवय तिला इथे उपयोगीच पडली. आशा बघता बघता बीकॉम झाली. तेही छान मार्क्स मिळवून.

 – क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंग… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ रंग… ☆ डॉ. शैलजा करोडे

“होळी दहनावर भद्राचे सावट. भद्रा काळात होळी पेटविण्यासाठी भद्राचा पुच्छ काळ रात्री 12. 50 ते 1. 55 पर्यंत. या कालावधीत होळी पेटवावी. आमच्या सोसायटीच्या समूहावर हा मेसेज झळकला. तसेच दुसर्‍या दिवशी चंद्रग्रहण असल्याने होळी आज रात्रीच पेटवली जाईल. तरी सगळ्यांनी हजर राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे. “

मी whats app बंद केला. आपली सगळी आन्हिकं आटोपून, तयारी करुन मी हास्पिटलला जाण्यास निघाले. सणवार असो कि शुभकार्य माझ्या पेशात याला जागाच नव्हती. रूग्णसेवा यालाच प्राथमिकता होती आणि आजाराला सणावाराशी काय घेणं देणं.

” आई, जाऊन येते गं ” ” निघालीस बाळ, सायंकाळी जरा लवकर येशील, आज होळी आहेना. पुरणाची पोळी, खीर, कटाची आमटी करणार आहे मी. तुझी ड्यूटी संपली कि मला फोन कर. म्हणजे मी पुरणपोळ्या करायला घेईन, तुला गरमगरम खायला वाढेल “. ” आई, कशाला एवढी धडपड करतेस. तू दुपारीच करुन ठेव पोळ्या, मी खाईन सायंकाळी “. ” अगं पुरणपोळी गरमच चांगली लागते. त्यावर तूपाची धार गरम असतांनाच बरी वाटते. तू निघण्यापूर्वी मला फोन कर. बस एवढंच कर. ” ” बरं बाई, निघण्यापूर्वी करीन तुला फोन, आता जाऊ मी “. ” अगं परत चूक. जाऊन येते म्हण “. ” होय, जाऊन येते मी “. हसत हसत आईचा निरोप घेऊन मी निघाले. पार्किंग शेडमधून गाडी काढली. तर चाकातील हवा कमी झालेली. बरं घराजवळच गॅरेज होतं, हवा भरली अन मी निघाले.

” नमस्कार डाॅक्टर, हॅलो डाॅक्टर ” अभिवादन स्विकारत मी माझ्या केबिनमध्ये शिरले. ” सिस्टर, काय पोझिशन? किती पेशंट आहेत? ” ” “डाॅक्टर पंधरा पेशंट आहेत ” “O K, पाठवा एक एक आत “.

” नमस्कार डाॅक्टर ” ” नमस्कार बसा ” एक बाई आपली दहा वर्षांची मुलगी घेऊन आली होती. बोला काय त्रास होतोय. डाॅक्टर माझी ही मुलगी दहा वर्षाचीच आहे. पण कालपासून हिची मासिक पाळी सुरु झालीय. खूप लवकर आहे ताई हे सगळं. मुलगी लहान आहे ताई माझी. बावरली आहे. पाळी अजून दोन वर्ष येणार नाही असं काही करता येईल काय? “

” नाही बाई, असं करू नका. तुमच्या मुलीची पाळी अकाली सुरू झाली ती आजकालची बदललेली जीवनपद्धतीमुळे. मुलांच्या हाती मोबाईल आहे. ज्या गोष्टी कुटुंबात बोलल्या जात नाहीत मुले त्या गोष्टी इंटरनेटवर शोधतात. लैंगिक भावना चाळवल्या जातात. आजची बदललेली खानपान व्यवस्था. चीज, पिझ्झा, बर्गर व इतर फास्ट फूड वजनवाढीस कारणीभूत ठरतात. आनुवांशिकता ही असू शकते. मनावरील ताणतणाव, प्लास्टीक आणि पेस्टीसाईडमधील रसायने, थंड व साखरयुक्त पेय असे अनेक घटक असतात यामागे. शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले कि इंस्ट्रोजन संप्रेरक लवकर सक्रिय होते ज्यामुळे पाळी लवकर येते

तुम्ही आता असं करा. मुलीला पौष्टिक आहार (फळे व भाज्या) द्या. शारीरिक हालचाल, व्यायाम वाढवा. मानसिक ताण टाळण्यासाठी योग्य वातावरण ठेवा

मुलीला मैदानी खेळासाठी. प्रोत्साहन द्या.

यामुळे मुलीची समस्या बर्‍याच अंशी कमी होईल. मी काही औषधे देते. सगळं ठीक होईल. या तुम्ही आता.

Next मी बेल दाबत म्हटले. एक सत्तर वर्षाच्या आजीबाई आत आल्या. ” काय त्रास होतो आजी तुम्हांला ” ” पांढरी धुपणी अचानकच सुरु झालीय ” मी चेकअप केले. “आजी सोनोग्राफी करायला लागेल “.

एक पहिलटकरीण लेबरमध्ये होती. मधून मधून तिकडेही जावे लागत होते.

सगळं काम संपेपर्यंत रात्रीचे आठ वाजलेच होते. चला निघूया घरी, तत्पूर्वी आईला फोन करावा लागेल, नाहीतर नाराज होईल बिचारी.

घरात पाऊल ठेवलं तशी पुरणपोळीचा घमघमाट सर्वत्र भरलेला. ” वन्स, तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी पानं घेतं सगळ्यांसाठी. ” काय गं सुनेत्रा हाॅस्पिटलचा सगळा पेशंटचा ताण तुझ्यावरच का? काही कामे तुझ्या सबआँर्डीनेटवरही सोपवत जा. अतिरिक्त स्टाफचीही मागणी कर “. ” होय दादा, मी सांगितलंय हाॅस्पिटला प्रशासनाला. शिवाय पेशंटचा माझ्यावरच विश्वास असल्याने मलाही नाही म्हणता येत नाही. ” माझा दादा सुशांत बोलत होता.

खेळीमेळीत जेवणे आटोपली. थोडी शतपावली करावी म्हणून मी खाली उतरले. सोसायटीच्या प्रांगणात दहनासाठी होळीची सगळी तयारी झाली होती. रांगोळी, पताका, विविध रंग आणि प्रसादाचीही सिद्धता होती.

” सुनेत्राताई, आज होलीका दहन तुमच्याच शुभहस्ते करायचंय बरं का. बरोबर रात्री 12. 50 ला पेटवूया होळी.

होळी दहनात कसे सर्व चिंता, द्वेष, मत्सर दूर सारून विविध रंगाच्या रंगात रंगणे आणि मनातील कटुता विसरुन पुन्हा नवऊर्जेने, गोडव्याने, बधुभाव जपत जीवनक्रमणा करणे किती गहन संदेश आहे यामागे. मी होलीका दहनाला चूड लावली. मनोभावे नमस्कार केला.

आज धुळवडची सगळीकडे सुट्टी. मी पण जरा निवांत होते कि हाॅस्पिटलच्या इमर्जन्सी मधून फोन आला. ” डाॅक्टर तुम्ही लवकर या ” नर्स शर्वरी बोलत होती. ” काय झालंय शर्वरी “. “डाँक्टर एक सतरा / अठरा वर्षाची पहिलटकरीण मुलगी आहे. तिचं बी पी शूट झालंय. ग्लानीतच आहे. बहुतेक सिझरच करावं लागेल ” ” ठीक आहे, येते मी, तुम्ही आँपरेशन थिएटर सुसज्ज ठेवा. “

” पेशंटसोबत कोण आहे. एक पन्नाशीच्या असपासची बाई समोर आली. तिच्यासोबत दोन/तीन माणसंही होती तुम्ही पेशंटची आई काय? ” नाही, मी आई नाही. ” बरं पेशंटच्या नवर्‍याला बोलवा, या फाॅर्मवर सही लागेल. ” ” नवरा नाही, आमच्या धंद्यात लेकराला फक्त माय असते. ” ” अरे बापरे, म्हणजे ही मुलगी रेड लाईट एरियातील होती. इतक्या लहान वयात अत्याचाराने ग्रस्त होती आणि त्यात हे लादलेलं मातृत्व. Horrible आहे सगळं ” ” मी करते सही म्हणत त्या बाईने आपला अंगठा फार्मवर उठवला.

पेशंटला अँनेस्थेशिया दिला, सलाईन, आँक्सिजन सुरू होतं. दीड तासाच्या अथक प्रयत्नातून सिझर व्यवस्थित होऊन बाळ व बाळंतीण दोघांनाही मी सुखरूप ठेवू शकले. शर्वरीने टाके घातले. पेशंट हळूहळू शुद्धीत येत होती. ” अं, पाणी, पाणी द्या मला. कुठे आहे मी, माझं बाळ कोठे आहे. ” ” हे बघ, शर्वरीने मऊसूत कपड्यात गुंडाळलेलं लालसर, बदामी रंगाचं ते नवजात बाळ तिच्यासमोर धरलं तशी ती मोठ्याने रडू लागली. ” अगं, मुलगा झाला आहे तुला. आनंद नाही झाला? का रडतेस? ” ” रडू नाहीतर काय करू डाॅक्टर. मी काय घडवू शकणार काय त्याला. या धद्यात पुढे तो दलालीच करेल. मुलगी असती तर पुन्हा ते नरकातलं जिणं ” ” नाही होणार आता असं. ” ” काय! खरंच तसं नाही होणार. डाॅक्टर माझ्या बाळाला चांगलं जीवन मिळेल? ” होय, मिळू शकतं? पण तुलाही हिंमत दाखवावी लागेल. पण मला सांग तू या धद्यात आली कशी? आली नाही मॅडम आणली गेली. तेही माझ्या बापानेच. एक नंबरचा दारूड्या. आई होती तोपर्यंत ती कष्ट करुन त्याच्या दारुला पुरे पडत होती. ती गेली, आणि याने दारूसाठी मला विकलं. ” इथे तुला खायला मिळेल. चांगले कपडे मिळतील, सांगत सोडून गेला मला इथे. पुन्हा आलाच नाही “

” बरं, मी उद्या पोलीस सबइन्सपेक्टरना इथे बोलावून घेईन. तुझ्या मनाविरूद्ध आता कोणीही तुला त्या नरकात ढकलणार नाही. शिवाय पोलीस संरक्षण राहिल. त्यांच्या मार्फतच तुला शासकिय वसतिगृहात प्रवेश मिळेल. तुझी व तुझ्या बाळाची योग्य काळजी घेतली जाईल. तुझी तब्येत बरी झाली कि तुला शिक्षण घ्यायचं असलं तर शिकू शकतेस. नंतर नोकरीसाठीही प्रयत्न केले जातील. ” ” मॅडम, खरंच असं होईल. तसं झालं तर जीवाचं रान करीन मी माझ्या बाळासाठी, त्याला शिकवीन, खूप मोठा करीन आणि एक जवाबदार नागरिक बनवीन “. ” होय, हे सगळं होईल. त्यामुळे आता रडायचं नाही. हस बघू. ” तशी जुई प्रसन्नपणे हसली, फुललेल्या जुईसारखी. ” आता पोटभर जेवयाच. बाळाला दूध हवं ना ” जुईने होकारार्थी मान हलविली.

आज धुळवडच्या दिवशी जुईच्या जीवनातील काळा रंग मिटवून सप्तरंग मी तिच्या आयुष्यात आणले होते.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी…” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी…” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर

(अशी दुसऱ्यांनी दिलेली धडक मला आवडेल का? नक्कीच नाही. मग, मी दिलेली धडक इतर कुणाला आवडेल का? तर नाही.

‘इस हाथ दे – उस हाथ ले’. व्हेरी सिम्पल. म्हणून गाडी चालवतांना ‘नो मोबाईल’.) 

इथून पुढे — 

आम्ही रस्त्यावर नजर टाकली, तर, खरोखरच हेल्मेट, सीटबेल्ट वापरतांना सगळेच दिसत होते. आम्ही दोघींनी एकमेकीला चिमटा काढून शुद्धीवर असल्याची खात्री करून घेतली.

मेघना : इथे चौकात कुठेच ट्रॅफिक पोलीस दिसत नाहीत. स्पीड लिमिट न पाळणे, झेब्रा क्रॉसिंग वर गाडी उभी करणे, नो एंट्रीतून येणे, वगैरे कोण बघतं? , कोण पकडतो?

परदेशी माणूस : इथे सगळेच लोक सुशिक्षित आहेत, सगळ्यांना वाचता येतं. रस्त्यावर स्पीड लिमिटचे बोर्ड कां लावले आहेत? रस्त्यावर लेन कां मार्क केल्या आहेत? झेब्रा क्रॉसिंग कां मार्क केले आहेत? याचा अर्थ सगळ्यांना समजतो. इथे फक्त वाहतूक आणि सुरक्षितता यांच्याशी संबंध असलेलेच बोर्ड रस्त्यावर लावता येतात.

मेघना : अहो आमच्या कडे पण सगळ्यांना वाचता येतं, आमच्याकडे पण रस्त्यावर असे बोर्ड असतात. पण जास्त बोर्ड चा भरणा वाढदिवसांचे बोर्ड आणि जाहिराती यांचा असतो. त्यामुळे सुरक्षितता संबंधी बोर्ड कुणालाच दिसत नाहीत, आणि कुणी बघितले – तरी ते पाळत नाहीत. याला आम्ही, ‘कळतं पण वळत नाही’ असं म्हणतो.

मनवानी मेघनाला हळूच चिमटा काढला, अगं, मराठी माणसांनाच ही सवय आहे, म्हणूनच ही म्हण फक्त मराठीत आहे. इंग्रजीत तू ‘अंडरस्टॅण्डिंग बट नॉट टर्निंग’ अशी म्हण कधी ऐकली आहेस का?

मनवा : अहो, इथे स्पीड ब्रेकर दिसत नाहीत, जिथे फोर व्हीलर ला एंट्री नाही, तिथे खांब दिसत नाहीत, फुटपाथवर टू व्हीलर नेऊ नये म्हणून तिथे खांब नाहीत.

फुटपाथवर खांब हा काय प्रकार आहे, हे परदेशी माणसाला बम्पर गेले असावे, त्यामुळे तो, ‘वॉट, वॉट, वॉट इज दॅट’ असं विचारायला लागला. आमच्या लक्षात आलं, की, जे बोर्ड वाचून तसं वागत नाहीत, त्यांच्याकरताच स्पीड ब्रेकर आणि खांब लागतात. आणि यांचा शोध आपल्या कडेच लागला असणार.

हे सगळं ऐकल्यावर सगळ्यांच्याच मनात एक शंका नक्कीच येणार, तीच मनवाच्या पण मनात आली. विचारू का नको, असं करत, तिनी विचारलंच —

मनवा : इथे सगळे लोक नियम पाळतात, त्यामुळे कुणालाच अडवायचे नाही, कुणाचं लायसन्स बघायचं नाही, कुणाच्या पावत्या फाडायच्या नाहीत, मग इथे ट्रॅफिक पोलीस असतात का नाही? आणि असले, तर ते करतात काय?

परदेशी माणूस : अहो, इथे पोलीस आहेत. ते सगळ्या ट्रॅफिक वर नजर ठेवून असतात. कुठल्याही कारणामुळे कुठेही काहीही अडचण असेल, तर ते लगेच मदतीला पोहोचतात. सगळे रस्ते, फुटपाथ यांची स्वच्छता, वेळच्या वेळी दुरुस्ती, रस्त्यावरचे मार्किंग – पट्टे, या सगळ्या गोष्टी तेच पाहत असतात. इथे तुम्हाला रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, कचरा दिसणार नाही, एकही सिग्नल बंद दिसणार नाही.

मेघना : तुमचं हे सगळं ऐकून आणि बघून, असं वाटतं, की, आम्ही एखाद्या काल्पनिक दुनियेत आहोत. अजूनही काही विचारलं तर चालेल का?

परदेशी माणूस : हो, पण छोट्याश्या ब्रेक नंतर —

परदेशी माणसानी बाजूच्या व्हेंडिंग मशीन मधून ३ कोक आणले, आणि म्हणाला, चियर्स. एक एक घोट घ्या आणि विचारा.

मेघना : आमच्या कडे लोक रस्त्यावर कचरा जाळतात, खूप धूर सोडणारे आणि कर्कश्य आवाज करणारे फटाके फोडतात. सण साजरे करण्याकरता, मोठमोठया मिरवणूक काढतात, ट्रॅफिक जॅम होतो. कर्कश्य आवाजात गाणी लावलेली असतात. ही यादी खूप मोठी होईल. तुमच्या कडे असे प्रकार असतात का?

परदेशी माणूस : तुम्ही सांगता एवढी वाईट परिस्थिती इथे कधीच नव्हती. पण थोड्याफार प्रमाणात काही गोष्टी असायच्या. आता यातले काहीच इथे बघायला मिळणार नाही. इथल्या सामाजिक संस्था, लोकांच्या सभा घेऊन, वर्तमानपत्रांमधून, व इतर उपक्रमांमधून, हे केल्यामुळे होणारे दुष्परिणाम, लोकांना वेळोवेळी समजावून सांगतात. राजकीय विरोधी पक्ष पण, आपले नाव विरोधी, म्हणून सरकारच्या सगळ्याच धोरणांना विरोध करत नाहीत. चांगले असेल त्याला सगळेच मनापासून पाठिंबा देतात. इथे लोकांना एकदा कळलं, की, लगेच ते वळतं. ज्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल किंवा ज्यामुळे देशाच्या संपत्तीला हानी पोहोचेल, अशा गोष्टी इथे कुणीच करणार नाही. सगळेच राजकीय पक्ष याबाबतीत एकत्र काम करतात. विरोधी पक्ष म्हणून कायम विरोधीच भूमिका घ्यायची, हा प्रकार इथे नाही. लोकांचे हित, हेच सगळ्या पक्षांचे उद्दिष्ट असते.

मनवा : वा, तुमच्याकडून आज खूपच शिकायला मिळालं. आमच्याकडे असा बदल झाला तर काय मजा येईल!

(अशा ठिकाणी आता ३ महिने राहायला मिळणार, या कल्पनेनीच आम्ही सुखावलो). आम्ही परदेशी माणसाचे नाव विचारले, त्यांचे आभार मानले आणि त्यांना बाय – बाय केले – – – 

मी : वा, म्हणजे तुम्ही ३ महिने प्रदूषण मुक्त हवा आणि पाणी यांचा आस्वाद घेतला. तिथले अन्नपदार्थ पण केमिकल विरहित आणि भेसळ विरहित असणार! मस्तच! आपल्याकडे फक्त नारळ हाच एकमेव असेल, की, ज्यात केमिकल नाहीत आणि भेसळ नाही.

मनवा आणि मेघना : काका, तिकडे अन्न आणि औषधे यात भेसळ करणाऱ्याला नक्कीच फाशी असणार. काका, तुम्ही आता ड्राय – डे कधी सुरु करताय?

मी : मॅडम, तुम्ही स्वीडन ला जाऊन आला, आणि तुमचा स्टॉप शंकराच्या मंदिराजवळ आहे, म्हणून तुम्ही सोमवारी ड्राय – डे सुरु केला. मॅडम, मी दोनदा स्वीडनला जाऊन आलो, आणि माझ्या रोजच्या फिरण्याच्या रस्त्यावर शंकर, देवी, दत्त, बालाजी, मारुती, नवग्रह, अशी सगळीच देवळे आहेत, म्हणून मी रोजच ड्राय – डे पाळतो. फिरायला जातांना नो मोबाईल, गाडी चालवतांना नो मोबाईल, लिफ्ट मध्ये – जिने चढ/ उतरतांना नो मोबाईल, कुणाशी बोलतांना – गप्पा मारतांना नो मोबाईल, जेवतांना नो मोबाईल.

मनवा : काका, ग्रेट. तुम्ही आमच्याही पुढे आहात.

मी : आज तुमचा स्वीडन चा अनुभव ऐकायला मिळाला, खूप मजा आली. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, जर आपण सगळ्यांनीच आचरणात आणल्या, म्हणजे कळत्याला वळते केले, तर सगळ्यांचच जगणं खूप खूप सुखकर होई, यात शंकाच नाही. अर्थात हे कुत्र्याची शेपूट सरळ करण्यासारखे आहे.

मेघना : आपण सगळ्यांनीच जर नेपोलियन वर विश्वास ठेवला, तर अशक्य असं काहीच नाही, काका. शेपूट पण सरळ होईल.

आम्ही आता निघतो. लेट अस् ऑल बी पॉझिटीव्ह अँड होप फॉर द बेस्ट.

मी : यस मॅडम. नक्कीच. माहिती आणि चहा बद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. मी माझे नाव त्यांना सांगितले आणि त्यांची नावे विचारली.

त्या दोघी एकदम : एम फॉर मनवा आणि एम फॉर मेघना.

समाप्त –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares