☆ “छोट्या अणूची मोठी गोष्ट” – लेखक : श्री दिलीप बर्वे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : छोट्या अणूची मोठी गोष्ट
लेखक : श्री दिलीप बर्वे
पृष्ठे : १०४
मूल्य: १७०₹
श्री. दिलीप बर्वे आपल्या मनोगतात म्हणतात….
“ लहानपणी ‘भीमरूपी महारूद्रा… ‘ हे समर्थांनी रचलेले मारुती स्तोत्र तोंडपाठ असे. त्यात मारुतीचे वर्णन – “अणूपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे. ” ही ओळ म्हणतांना मला कुतूहल वाटे.
आईला विचारलं की ‘अणू म्हणजे काय गं?’ – ‘अरे, म्हणजे सूक्ष्म अगदी लहान आणि ब्रह्मांड म्हणजे अतिशय मोठा, प्रचंड ‘
नंतर जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजात अॅटम इलेक्ट्रॉन वगैरेचा अभ्यास सुरू झाला. अॅटमचे विघटन केले तर प्रचंड ऊर्जा निर्माण होते हे ही अभ्यासात आले.
दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब अमेरिकेने टाकला आणि अक्षरशः ब्रह्मांड हादरून गेले. (तेव्हा लक्षात आले की समर्थ किती थोर होते. अणूचा संबंध ब्रह्मांडापर्यंत जोडला होता.)
हिरोशिमा-नागासाकी अणू स्फोटाला आज मितीला ८० वर्षे होत आली. आजही अणू शब्द उच्चारला तरी सामान्य माणसाला भीती वाटते.
मात्र आपण लक्षात घ्यायला हवे की आताचे युग हे अणुयुग आहे. अणूपासून सुटका नाही. घाबरून लांब जाऊन चालणार नाही.
मुबलक वीज हवी तर अणुशक्ती, वाळवंटात शुद्ध भरपूर पाणी हवे तर अणू, चांगली भरघोस पिके हवीत, रसदार भरपूर फळे हवीत, तर अणू अनेक दुर्धर रोगांवर निदान, उपचार हवे असतील, तर अणू थोडक्यात अणुशक्तीला शरण जायला हवे. अणूची भिती काढून टाकायला हवी.
जैतापूरला जगातले सर्वात मोठे अणुवीज केंद्र सुरू व्हायचे आहे, प्रकल्पाचा करार होऊन १५ वर्षे होऊन गेली. पण अजूनही प्रकल्प कागदावरच आहे. कारण सामान्य जनतेला वाटणारी भिती.
जपानने अणूचा विध्वसंक अनुभव घेतला. पण भिती बाजूला ठेवून त्याच जपानमध्ये २५ पेक्षा जास्त अणुवीज केंद्र कार्यरत आहेत. हे लक्षात घ्यायला हवे.
शास्त्रीय जगतातील बहुतेक सर्व अणुशास्त्रज्ञ आता ‘शांतते करिता अणू’ या प्रकरणाच्या वाचनाने मनातील भिती निश्चित जाईल अशी मला आशा आहे. “
– – – या पुस्तकाच्या लेखकांचे वरील मनोगत वाचल्यावर पुस्तकाचा आणखी वेगळा परिचय करून देणे मला गरजेचे वाटत नाही.. बरोबर ना ? अतिशय आवश्यक असणारी ही माहिती सर्वांना असायला हवी असे वाटते.. लहानथोर सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी नक्कीच म्हणेन.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “परीसस्पर्श (लेखसंग्रह)” – लेखक : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर) ☆
पुस्तक : परीसस्पर्श (लेखसंग्रह)
(आदरणीय, स्पृहणीय, अनुसरणीय अशा शब्दचित्रांचा परामर्श.. !!)
लेखक – डॉ. निशिकांत श्रोत्री
मो ९४०४३२०५९३
प्रकाशक – स्मिता टाईपसेटर्स, पुणे
पृष्ठसंख्या – १५४
मूल्य – ₹ २००/-
काही स्मृतिचित्रे सातत्याने आपल्या मनाच्या चलभूमीवर परीसरूप घेऊन जीवनाला, अंतरंगाला सोनियाची झळाळी देतात. अशाच काही परीसांचे हे आलेख आपल्या हाती लेखक सुपूर्त करत आहेत.
सहज सोपी समजणारी रचना, प्रत्येकाच्या स्वभावातील बारकावे, प्रत्येकाची वागण्याची आणि व्यक्त होण्याची लकब हे सर्व वाचताना उत्कंठा वाढत जाते. लेखकाच्या आयुष्यातील ह्या सर्व व्यक्तिमत्वाशी आपण नकळत जोडले जातो.
यांत वापरलेली संवादशैली, योग्य आणि अचूक ठिकाणी पेरलेली वचने, गाणी, म्हणी यांचा चपखल वापर यामुळे हे पुस्तक वाचनीय, प्रेरणीय, संग्रहणीय झाले आहे.
पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ श्री. हेमंत सरदेसाई यांनी मोठ्या परिश्रमाने केल्याचे दिसून येते.
१) परीसस्पर्श : मराठे सर
मराठे सरांचे करडे व्यक्तिमत्व लेखाच्या सुरुवातीला असलेल्या संवादातूनच जाणवते. करडी शिस्त असलेले, विद्यार्थ्यावर मनापासून प्रेम करणारे मराठे सर म्हणजे विलक्षण संतापी व्यक्ती. हुशार, निवडक विद्यार्थी गोळा करून त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचे चीज व्हावे म्हणून शिकविण्याचा वेडा ध्यास. लेखकांचाही रात्री ९ ते ११ चालणाऱ्या विशेष वर्गात समावेश होता.
सरांना एक सवय होती. सतत खारे दाणे खाण्याची. त्यांचा अखेरदेखील या सवयीमुळे कठीण झाला होता. शेवटच्या दिवसात सरांची सेवा करावयास मिळाल्याचे भाग्य लेखकांना लाभले आहे. लेखाचा शेवट अतिशय हृद्य झाला आहे. सरांचे ऋण अखेरपर्यंत फेडू न शकल्याची खंत ते व्यक्त करतात.
२)गुरुमहर्षी : बाबासाहेब शिरोळे
झूलॉजीसारखा कठीण विषय सोपा करून शिकविणे हे त्यांचे कसब. विषय विलक्षण सोपा करून शिकवण्यासाठी दैनंदिन जीवनातील दाखले देत. त्याच्या जोडीला सक्रिय अभिनयही असे.
एखादे विशिष्ट पुस्तक संदर्भ म्हणून वापरत नसल्याने लेखक श्रोत्री सर शिरोळे सर शिकवत असताना त्याच्या मनापासून नोट्स काढत असत. सरांकडून त्या वेळेवारी तपासूनही घेत असत. शिरोळे सरांनी कधीही लेखकाच्या जिज्ञासू वृत्तीला तडा जाऊ दिला नाही. तथापि ते उत्तर कसे शोधायचे याचे मार्गदर्शन केले. यातूनच लेखकांनी स्वावलंबनाचा धडा आत्मसात केला.
हिमालय हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. हिमालयाशी संबंधित नऊ विषयावर त्यांची व्याख्यानमालाही असे. सरांनी सर्प या विषयीदेखील विशेष संशोधन केले होते. त्याबाबत गाढा अभ्यास होता. अध्यात्म आणि संत साहित्य यावर त्यांची विशेष व्याख्यानेदेखील होत.
३)दुधावरची साय : दादा भट
लक्षवेधक सुरुवात हे लेखकाच्या हातचं कौशल्यच आहे. मातृभूमीचा झालेला विरह करुण रसात आवेगाने मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेने लेखाची सुरुवात झाली आहे.
आपल्या लहानग्या कोवळ्या वयातील नातवाला जाज्वल्य देशभक्तीचा पाठ देणारे आजोबा श्री दादा भट यांच्याविषयी लेखकांनी या स्मृतीचित्रात वर्णिले आहे. लेखकांचे आजोबा हे हाडाचे शिक्षक. शिकणारे विद्यार्थी कोण, त्यांची आकलन शक्ती आणि शिकवण्यामागील उद्देश याची पुरेपूर जाण ठेवून ज्ञान देणारे दादा हे लेखकांच्या लेखनामागची प्रमुख प्रेरणा आहेत.
त्यांच्या मॅट्टिकच्या उत्तरपत्रिका या अंतिम निकालानंतर सूचनाफलकावर लावल्या होत्या. असा आदर्श शिक्षक आणि विद्यार्थी रूपात असलेले दादा हे लेखकाचे सर्वात लाडके शिक्षक होते. आदर्श शिक्षकासोबत ते लेखकही होते. त्यांनी लिहिलेली इतिहासाची पुस्तके ही त्याकाळी पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जात होती.
आपल्या सर्व मुलांना उत्तम संस्कार देऊन त्यांना आदर्श नागरिक घडविणे हा त्यांचा ध्यास होता. काळानुसार आवश्यक बदल करणे या प्रगत विचारांनां त्यांचा पाठिंबा होता. कोणतेही ज्ञान, कौशल्य प्राप्त करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो.
४) तत्त्वनिष्ठ : श्री. न. ना. भिडे सर
शास्त्र आणि भाषा यांचे अचूक, सखोल ज्ञान असलेले श्री भिडे सर हे आहेत या पुस्तकातील आणि लेखकाच्या जीवन मार्गावरील महत्त्वाचे परिस. स्वभाव शांत, डोळे कमालीचे तेजस्वी, अमोघ वाणी आणि पेहरावात अतिशय साधेपणा, विस्तीर्ण गौरवर्णीय भालप्रदेशावर भूमध्यावर रेखलेली लाल रंगाची चंद्रकोर विशेष लक्ष वेधून घेत होती. लेखकाला घडलेले परिसाचे हे प्रथमदर्शनी वर्णन आपल्या वाचकांच्या डोळ्यासमोर सहज चित्र निर्माण करते.
योग्य आणि परिश्रमी, होतकरू विद्यार्थ्यांना अधिक बहुश्रुत आणि परिपूर्ण बनविण्यासाठी ते विशेष संस्कृत वर्गाचे आयोजन करीत असत. वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी ते सर्व विद्यार्थ्यांना आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शनास घेऊन जात. अपेय पान, सामीष आहार आणि अनैतिक वर्तन यापासून दूर राहावे, अशी शपथ ते त्या समाधीसमोर विद्यार्थ्यांना घ्यायला लावत असत. शिक्षणाबरोबरच उच्च प्रतीचे सात्विक संस्कारही त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले.
५) दिलदार : डॉक्टर अच्युत उमराणीकर
अत्यंत विद्वान, तत्वनिष्ठ, कामाप्रती एकनिष्ठ आणि आपले सर्वस्व वाहणारे सर श्रोत्री सरांसाठी एक प्रसन्न, दिलदार व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यांमधील त्यांना त्याप्रमाणे जबाबदारी देणे आणि त्यांना गुणसंपन्न करणे हा त्यांचा ध्यास. म्हणूनच लेखक श्रोत्री सरांचे वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच पदवी मिळण्यापूर्वी उमराणीकर सरांनी त्यांचे मीरा हॉस्पिटल सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर एका दिवसाकरता दिली होती.
लेखकांच्या कुटुंबात एक हेलावून टाकणारी घटना घडली. लेखकांची वहिनी धनुर्वाचाचे निमित्त होऊन सव्वा वर्षाच्या लहान मुलीला सोडून अचानक निघून गेली. त्यावेळी सर्व घर अतिशय दुःखात होते. या कठीण प्रसंगी डॉक्टर स्वतः लेखकांच्या घरी आले आणि धनुर्वाताचा लसीकरणाचा कार्यक्रम उरकला. असे हे पितृतुल्य उमराणीकर सर. आपुलकीच्या पोटी लहानथोर भाव रुजत नाही, हे तत्त्वज्ञान या प्रसंगातून लेखकाला शिकावयास मिळाले.
पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही करणे हा जणू डॉक्टरांचा छंदच. पुणे ऑब्सटेट्रिक अँड गाय्नॉलॉजिकल सोसायटी सरांच्या अखेरपर्यंत अर्ध्या वचनात होती तरीही उमराणीकर सरांनी याचा कधीही स्वतःसाठी फायदा करून घेतला नाही. शेवटपर्यंत दिलदार आणि तत्वनिष्ठ हीच ओळख लेखकांच्या मनावर कायमची कोरली गेली.
६) देवमाणूस : देव सर
स्मृतीचित्राची सुरुवात वेधक प्रसंगाने करून देणे हे लेखकाचे गाढे वैशिष्ट्य. हाडाचे शिक्षक, अभिनय आणि रसाळ वाणीद्वारे पाठाची ओळख करून देणारे, अतिशय तन्मयतेने शिकविणारे, मोकळेपणाने आपुलकीचे संवादाचे नाते ठेवणारे प्रेमळ स्वभावाचे देवसर.
एखादा विषय नीट करावा म्हणून देखील त्यांनी आगळ्या पद्धती शोधून काढल्या होत्या. जसे की इंग्रजी शिकवताना काही नियम बनवले होते जे प्रत्यक्ष पुस्तकात दिलेले नसत. पण विद्यार्थी हमखास तेथे चुका करत. यासाठी त्यांनी काही बापजन्माचे नियम शोधून काढले होते,
सदैव हसतमुख राहणे आणि सहवासातील इतरांना देखील हसवणे हा स्वभाव. एखादा विषय विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावा यासाठी विलक्षण आटापिटा. असे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व.
७) मायेचा आधार : लिली कामत मॅडम
लिली कामत मॅडम म्हणजे जणू मायेची अवीट गोडीच. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी शिकण्याची धडपड पाहून त्यांना स्नेहाने मार्गदर्शन करणाऱ्या लिली मॅडम. लेखकाची झालेली पहिली ओळख मायेचा आधार होऊन आयुष्यभरासाठी सावली झाली. लेखकांची अभ्यासातील सखोल रुची पाहून त्यांना अनेक गोष्टी स्वतः समजावून सांगितल्या. बारकावे लक्षात आणून दिले. लिली मॅडम खरेच अत्यंत प्रेमळ आणि दयाळू होत्या.
अनेक उत्तम गुणांची खाण असलेल्या लिली मॅडम खरेच लेखकाच्या शैक्षणिक जीवनातील थोरली बहिण आहेत, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये..
८) कलाकार : डॉ. शिरीष दड्डी
“देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे”
ज्या हातांनी रुग्णांवर उपचार करावेत त्याला नवीन जीवनदान द्यावे त्याच हातांनी अतिशय सुंदर कलाकृती घडावी. प्लॅस्टिक सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे दड्डी सर म्हणजे हरहुन्नरी नव्हे तर हाडाचे कलाकार होते हे निश्चित.
जितकी मोहकता, कलाकुसर त्यांनी तयार केलेल्या शिल्पामध्ये तेवढेच देखणे आणि राजबिंडे व्यक्तिमत्व. बुद्धिमत्ता आणि कलात्मकता यांचा अनोखा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जाणवत असे. आणि म्हणूनच कौशल्यपूर्ण शिकवण्यामुळे आणि लोभस व्यक्तिमत्त्वामुळे विद्यार्थी प्रभावित होत असत. अशीच एक प्रभावित झालेली विद्यार्थिनी विनया फडके ही त्यांच्या आयुष्याची जोडीदारीण झाली.
इंटर्नशिपसाठी लेखक जेव्हा ठाण्याच्या रुग्णालयात दाखल झाले तेव्हा उपचार व शस्त्रक्रिया यात आलेल्या अडचणी विषयी लेखक दड्डी सरांना पत्र पाठवून विचारीत असत. दड्डी सर तत्काळ त्याला समर्पक आणि योग्य उत्तर पाठवत असत. आपल्या विद्यार्थ्याला क्षणोक्षणी मदत करणारे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे दड्डी सर हाडाचे कलाकार होते.
ख्यातनाम कुशल प्लास्टिक सर्जन नावारुपाला आलेले दड्डी सर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले होते.
९) परिसहुनीही थोर : डॉ. अपर्णा निशिकांत श्रोत्री
जीवनमार्गावर साथ करणारी सहचारिणी असो की सहचारी.. तिच्यामुळेच जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो. तो किंवा ती जीवनात येणे फार मोठे भाग्य असे समजले जाते.
वैद्यकीय व्यवसाय उत्तम करणे सांभाळणारे डॉक्टर निशिकांत श्रोत्री लिखित परीसस्पर्शी या स्मृतीचित्रातील हे अखेरचे सुगंधी पुष्प आहे डॉक्टर सौ. अपर्णा निशिकांत श्रोत्री यांचे.
वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रोत्री मॅडम घरी आल्यावर मात्र प्रेमळ पत्नी, कर्तव्यदक्ष सून या भूमिकेत सहजच शिरत असत. केवढी ही विशेषता. त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य ती सांगड घालत घराण्याची परंपरा जपली.
स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय जपत असताना आपण या समाजाचे काही देणे लागतो ही भावना अखेरपर्यंत मनात रुजत होती. जे नवीन ज्ञान असेल ते आत्मसात करायची विलक्षण पिपासा होती. मातृत्वाच्या सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग केला. प्रसूतीशास्त्र आणि त्या क्षेत्रात अपर्णा मॅडमनी अनेक महत्त्वपूर्ण शोध कार्य केले.
कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या अपर्णा मॅडम यांची घोडदौड अत्यंत वाखाणण्याजोगीच! विविध देशात होणाऱ्या परिषदांमध्ये निबंध सादर करण्यासाठी त्यांना निमंत्रणे येऊ लागली. त्यांची कीर्ती आणि कर्तृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले होते तरीही नम्रतेचा वसा घेतलेल्या अपर्णा मॅडम आपल्या दैनंदिन कामात आणि जबाबदारीमध्ये तितक्याच उत्साहाने वावरत असत. तेथे कधीही, कसलीही कसूर केली नाही.
तपस्वीनी, कलायोगिनी, मधुरभाषिणी, प्रेम मोहिनी अपर्णा, लेखक श्री श्रोत्री सरांच्या जीवनातील निरंतर संजीवन आहे. कौशल्य, सहजता, प्रेमळपणा, धाडस, साहस, खंबीरता अशा एक न अनेक गुणांनी बहरलेले हे केवळ एक पुष्प नव्हे तर हा सुगंधी ताटवाच!
– – – डॉ श्रोत्री यांनी वयाच्या ८०व्या वर्षीदेखील लेखन जगतात दाखविलेला हा उत्साह खरोखरीच स्तिमित करणारा आहें. वैद्यक व्यवसायामध्ये एमडी डीजी ओ आणि अशा अनेक पदव्या धारण करणारे डॉक्टर श्रोत्री साहित्याच्या प्रांतातही अत्यंत आवडीने आणि सहजतेने मुसाफिर करतात. डॉक्टरांचा व्यासंग फार मोठा आहे.
लेखक डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी लिहिलेला परीसस्पर्श हा लेखसंग्रह ह्याचं बोलक्या स्मृतिचित्रांचा अनोखा पुष्पस्तबक. वाचकांनी ह्या स्तबकातील हवे तें पुष्प हाती घ्यावे, मनमुराद गंध घ्यावा… वाचन करता करता उमलत जाते शब्दपाकळी आणि तें स्मृतिचित्र आपल्या मनावर नकळत कोरले जाते.. ज्या व्यक्तीमुळे लेखकांच्या जीवनाचे सोने झाले, त्या साऱ्या परीसांनी साकारलेले हे वाचनीय पुस्तक म्हणजे परीसस्पर्श.
☆ “आमच्या आयुष्यातील काही आठवणी” — लेखिका : श्रीमती रमाबाई रानडे ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
पुस्तक : आमच्या आयुष्यातील काही आठवणी
लेखिका : श्रीमती रमाबाई रानडे
प्रकाशक : समन्वय प्रकाशन, कोल्हापूर
प्रमुख वितरक- अजब डिस्ट्रीब्युटर्स, शाहूपुरी, कोल्हापूर.
हे पुस्तक म्हणजे रमाबाई रानडे यांनी महादेव गोविंद रानडे यांच्यावर लिहिलेले काहीसे आत्मचरित्रासारखे आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या विषयी समग्र माहिती देणारे असे पुस्तक आहे. या पुस्तकातील घटनांचा कालावधी 19 व्या शतकातील आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे ही गोष्ट समाजाच्या अंगवळणी पडलेली नव्हती. घरातील स्त्रियाच स्त्रियांना शिक्षणासाठी विरोध करत असत. रमाबाईंनी या पुस्तकात पतीचा उल्लेख ‘स्वतः’ असा केला आहे. ‘स्वत:’ नी रमाबाईंना धुळाक्षरापासून शिकवण्यास सुरुवात केली. तेव्हा घरातील इतर बायका त्यांना नावे ठेवत असत. ‘स्त्रीला शिक्षणाची गरजच काय? त्यांना गरजेपुरते संसाराचे ज्ञान असले की बास! अशा वृत्तीमुळे रमाबाईंना खूप जाच सहन करावा लागला.
पण पतीच्या इच्छेनुसार त्या शिकत गेल्या.
आर्य महिला समाजाच्या पंडिता रमाबाई तेव्हा सभेमध्ये व्याख्याने देत असत. त्यांचे सर्वांना कौतुक होतेच.
रानडे यांनी आपल्या पत्नीला त्यांच्या संपर्कात आणले. शिकण्यास प्रवृत्त केले. पतीच्या आज्ञेत राहून रमाबाईंनी आपला अभ्यास चालू ठेवला. पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत त्या अभ्यास करत व दिवसभर काम करत. महादेव गोविंद रानडे यांची ज्या ज्या ठिकाणी बदली झाली तिथे पतीबरोबर त्या गेल्या आणि त्यांनी पतीला साथ दिली. घरातील सर्व आश्रित विद्यार्थी, स्वयंपाकी वगैरे लोकांना सांभाळून घेत संसार सांभाळला.
ताई सासुबाई नणंद तसेच इतर वडील बायकांना त्या मान देऊन वागत असत, तरीही त्यांच्या शिक्षण घेण्याच्या विरुद्ध या सर्व स्त्रिया होत्या. पण रमाबाई त्याबद्दल ‘स्वतः’कडे तक्रार करीत नसत. स्वतः रानडे स्वभावाने करारी, सुसंस्कृत, न्यायी असे होते. रानडे यांची तब्येत बिघडल्यावर रमाबाईंनी त्यांची खूप शुश्रुषा केली हेही या आठवणींतून कळते.
त्यातच स्वतः रमाबाईनाही काही आजार झाला. रमाबाईंचे ऑपरेशन करायचा निर्णय देताना रानडे यांचे मन कातर झाले होते. पण ऑपरेशन सुखरूप पार पडले, तेव्हा माधवरावांना हायसे वाटले.
अहमदाबाद, जयपुर, कलकत्ता असा प्रवास करत ही सर्व मंडळी सिमला येथे गेली होती. सिमला मध्ये चार महिने मुक्काम केला, तसेच हरिद्वारलाही गेले. हरिद्वार, हून लाहोर, अमृतसर असे मुक्काम करत अहमदाबाद मार्गे परत पुण्यात आले. मद्रास कडे एक महिनाभर राहून जबलपूर, प्रयाग, काशी, कलकत्ता असाही प्रवास केला. त्यानंतर 1891 मध्ये ते करमाळ्याला आले. परंतु तोपर्यंत रानडे यांची प्रकृती बिघडू लागली होती. पुण्यात आल्यावर प्रायश्चित्त वगैरे घेणे या गोष्टींचा त्यांना मानसिक त्रास झाला. प्लेगच्या साथी मध्ये त्यांनी पुण्यातील मुक्काम हलवला व महाबळेश्वरला गेले. 1899 साली त्यांची तब्येत बिघडतच चालली. सप्टेंबर मध्ये आजार पण वाढले. त्यांना Angina Pectoris हा आजार झाला होता. सप्टेंबर 1900 मध्ये त्यांची जीवन यात्रा संपली…
रमाबाईंच्या लिखाणातून आपल्याला तत्कालीन समाज रिती, परंपरा यांचे दर्शन होते. तेव्हाची सामाजिक स्थिती, स्त्रियांची अवस्था तसेच प्रवासाच्या अडचणी वगैरे अनेक गोष्टी कळतात. रमाबाई अतिशय हुशार होत्या. त्यांचा स्वभाव करारी आणि कर्तव्यनिष्ठ होता. पतीची सेवा करताना अजिबात कुचराई केली नाही. पतीच्या शिकवणीने शिकून तयार झालेल्या रमाबाईंचे हे चरित्र म्हणजे तत्कालीन परिस्थितीचा काळाचा आरसा आहे असे मला वाटते.
ही कादंबरी रोजनिशी स्वरूपात लिहिल्यासारखी आहे किंवा एक प्रकारे आत्मचरित्र लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न असेल! 19 व्या शतकातील पुणे ऐतिहासिक दृष्ट्या कसे होते तेही या कादंबरीत आपल्याला दिसून येते. ही कादंबरी वाचताना मला त्या काळातील बऱ्याच सामाजिक गोष्टींचा उलगडा झाला! आता आपण स्त्रियांचे शिक्षण हा विषय अगदी सहजगत्या बोलतो. उलट स्त्रिया शिक्षणामध्ये कांकणभर पुढेच आहेत असे दिसते. पण जेव्हा स्त्री शिक्षण घेणे अवघड होते त्या काळात महर्षी धोंडो केशव कर्वे, आनंदीबाई जोशींचे पती गोपाळराव, तसेच म. गो. रानडे, वगैरे सुधारकांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले आणि त्या बाबतीत स्वतः कार्य केले!
सध्याचा काळ हा भारतीय उद्योजकांसाठी खूपच उत्साहवर्धक आहे. व्यवसाय छोटा असो की मोठा; तो टप्प्याटप्याने वाढत जातो. व्यवसायाची वाढ ही कधीच एका सरळ रेषेत होत नाही. ही वाढ वळणावळणाने होते. त्यालाच ‘ए’ कर्व्ह असंही म्हटलं जातं. व्यवसायाची सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांत एक वेळ येते जेव्हा तुम्हाला टप्पा ओलांडावा लागतो. त्यानंतर दुसरा टप्पा, त्यानंतर तिसरा टप्पा असा हा प्रवास असतो. यात अडचणी येतात, चढ उतार येतात, खूप अनुभव मिळतो. त्या सगळ्यांचा विचार करून पुढचा टप्पा गाठायचा आणि तोही पार करायचा असतो.
काटदरे फुड्सचा प्रवासही असाच वळणावळणाचा, रोचक आणि थक्क करणारा आहे. १९५८ मध्ये छोट्या गावातल्या एका स्वयंपाक घरात या व्यवसायाची सुरुवात झाली. तीन पिढ्यांनी त्याला खतपाणी घातलं आणि आज ‘काटदरे’ हा ब्रँड तयार झाला आहे. गेल्या ६७ वर्षातल्या अनुभवाचं संचित म्हणजे हे पुस्तक. त्यामुळेच त्याला एक वेगळं महत्त्व आहे. अशा प्रकारचं अनुभवाचं डॉक्युमेंटेशन होणं हे नव्या पिढीतल्या वाचकांसाठी आणि विशेषतः उद्योजकांसाठी साठी मोलाचं ठरणार आहे.
एखादा ब्रँड कसा घडतो हे ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल. प्रत्येक वेळी फक्त यशच सांगायचं नसतं तर झालेल्या चुकाही सांगाव्या लागतात, सांगायच्या असतात. मागच्या लोकांनी केलेल्या या चुकांपासून पुढल्या पिढीतले लोक शिकतात आणि त्यांचं नुकसान टळतं. आपण चार गोष्टी सांगितल्या तर दुसऱ्यांकडूनही आणखी चार गोष्टी कळतात. त्यामुळे मोकळेपणाने अनुभव शेअर केले गेले पाहिजेत. ज्ञान दिल्याने वाढतं असं आपल्या संस्कृतीत सांगितलंय; ते निःसंशय खरं आहे.
या पुस्तकात काटदरे उद्योगाच्या प्रवासातला संघर्षाचा काळ, झालेल्या चुका, त्या चुकांपासून घेतलेले धडे आलेलं अपयश, कसोटीचा काळ याबद्दल विस्ताराने आणि अगदी मोकळेपणाने लिहिलं आहे. या मोकळेपणाचं अभिनंदन यासाठी की प्रत्येकाने त्याच त्याच चुका करायच्या नसतात. जुन्या चुका टाळून नव्या चुका करायला संधी द्यायची हा या पुस्तकात सांगितलेला मंत्र खूप महत्त्वाचा आहे.
चढ-उतार हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. कितीही कठीण काळ आला तरी आपल्या सचोटीचा मार्ग सोडायचा नाही. आडमार्गाने जायचं नाही. ग्राहकांच्या विश्वासाला तडा जावू द्यायचा नाही. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसण्याची तयारी ठेवायची. आव्हानांचं संधीत रूपांतर करत मार्गक्रमणा करणं हाच शाश्वत यशाचा मार्ग असतो, हे काटदरे फूडसने घेतलेल्या भरारीचं खरं गमक आहे. सध्याचा काळ हा शॉर्टकटचा आहे. सगळ्यांना कमी श्रमात, कमी वेळेत जास्त यश हवं आहे. जास्त पैसे हवे आहेत. अशा काळात हे पुस्तक नवी वाट दाखवणारं ठरेल.
काळानुसार बदलणं, नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं, नव्या सिस्टिम्स आणणं हे ज्या पद्धतीने काटदरे यांनी केलं ते उद्योग करणाऱ्या प्रत्येकाने शिकण्यासारखं आहे. व्यवसायात यश मिळवायचं असेल तर काही गोष्ट आवश्यक असतात.
उत्तम टीम
वर्क कल्चर
नव्या तंत्रज्ञानाचा वापर
सेल्स/मार्केटिंगची अभिनव पद्धत
पॅकेजिंग
ग्राहक केंद्रित सिस्टिम्स
या प्रत्येक गोष्टीत काटदरे यांनी जे प्रयोग यशस्वी केले, राबवले, कामगारांचं परिवर्तन घडवलं त्यांच्या या अनुभवांमधून सगळ्यांना खूप काही-शिकण्यासारखं आहे. हे पुस्तक फक्त काटदरेंची प्रेरक कहाणी नाही तर ज्यांना उद्योगात यायचं आहे, जे उद्योग करत आहेत, ज्यांना मोठी झेप घ्यायची आहे, आव्हानांचं संधीत रूपांतर करायचं आहे अशा सगळ्यांना मार्गदर्शक ठरणारी ही एक रोमांचक यशोगाथा आहे.
– – ‘ उद्योजकतेच्या प्रवासात उद्योजकाकडे अनुभवाची खूप मोठी शिदोरी जमा होते. या पुस्तकाच्या रूपाने काटदरे कुटुंबाने आपली शिदोरी सर्वांसाठी खुली केली आहे. त्यातलं काय घ्यायचं? किती घ्यायचं? आणि त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करायचा हे प्रत्येकावर अवलंबून आहे. मनःपूर्वक शुभेच्छा! ‘
– डॉ. आनंद देशपांडे
संस्थापक, पर्सिस्टंट सिस्टिम्स आणि देआसरा फाउंडेशन
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काकासाहेब चितळे – सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक म्हणजे एका दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाचे आणि सहृदयी समाजसेवकाचे प्रेरणादायी जीवनचरित्र आहे. चितळे उद्योगसमूहाचे आधारस्तंभ असलेले काकासाहेब चितळे (दत्तात्रय भास्कर चितळे) यांनी केवळ एक मोठा व्यवसायच उभा केला नाही, तर आपल्या कार्यामुळे समाजाच्या आणि अनेक व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणली.
या पुस्तकातून काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडतात :-
प्रेरणादायी उद्योजक : भिलवडीसारख्या छोट्या गावातून सुरुवात करून सातासमुद्रापार पोहोचलेल्या चितळे डेअरीच्या यशामागे काकांचा कसा मोलाचा वाटा होता, हे समजते. त्यांनी केलेले कठोर परिश्रम, त्यांची व्यवसायातील दूरदृष्टी आणि आधुनिक दृष्टिकोन यातून कशी धवलक्रांती घडली, याचा अनुभव येतो.
समाजकारण आणि संवेदना : दुष्काळग्रस्त आटपाडीला चारा छावण्यांसाठी मदत असो, अंधश्रद्धेतून लोणारी समाजाला दुग्धव्यवसायाकडे वळवणे असो, वा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी युरोपमध्ये थेट निर्यात व्यवस्था उभी करणे असो, काकांनी नेहमीच समाजाच्या विकासाला प्राधान्य दिले.
माणुसकीचे दर्शन : कर्जाने ग्रासलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला मदत करणे, होतकरू तरुणांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना उद्योजक बनवणे, वाचनालयाच्या विकासासाठी केलेले कार्य, स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय – अशा अनेक प्रसंगांतून त्यांच्यातील संवेदनशीलता आणि माणूसकी अधोरेखित होते.
कला आणि अध्यात्म : केवळ उद्योजकच नव्हे, तर कलासक्त आणि सश्रद्ध व्यक्ती म्हणून काकासाहेब कसे होते, हे या पुस्तकातून अनुभवता येते. धार्मिक स्थळांची जपणूक वा शास्त्रीय संगीताला दिलेले प्रोत्साहन, यातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.
कौटुंबिक मूल्ये : चितळे कुटुंबातील परंपरा, त्यांचे नातेसंबंध आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या जडणघडणीत काकांचा कसा महत्त्वाचा वाटा होता, हेही वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळेल.
काकासाहेब चितळे – सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक केवळ एक चरित्र नसून, ते उद्यमशीलता, सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि दूरदृष्टीचा एक अनुपम पाठ आहे. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करेल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “अंगणातील आभाळ” – लेखक : डॉ. यशवंत पाठक ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक : अंगणातील आभाळ
लेखक : डॉ. यशवंत पाठक
प्रकाशन : ग्रंथाली प्रकाशन
‘अंगणातील आभाळ’ हे डॉ. यशवंत पाठक यांचं आत्मकथन. याची सुरुवात ‘दोन शब्दा’पासून होते. ते मुळी प्रास्ताविक वाटतच नाही. तिथूनच आत्मकथेला सुरुवात झालीयसं वाटतं. त्यात त्यांनी म्हंटलय, बालपणीपासून ते ४ थी पर्यन्त ते पिंपळनेरला होते. ते एकत्र कुटुंब होतं. घरात बावीस माणसे. आजोबांचा मोठा मुलगा भाऊ. म्हणजे नानाचे वडील. घरात यशवंताला नाना म्हणत. पुस्तकभर आपल्याला नानाच भेटतो. यशवंत नाही. आई म्हणाली, ’नानाला नाशकाला घेऊन जाते. ’ तेव्हा घरात सगळ्यांनीच आकांडतांडव केलं. आईला नाही नाही ते बोलले. आजी म्हणाली, ‘नानाला ने. शिकव. ‘
या ‘दोन शब्दात’ त्यांनी दोन-तीन वाक्यात आजोबा- आजीला डोळ्यापुढे उभं केलय. आपल्याला ‘शब्दाचे आभाळ’ दाखवणार्या आजोबांना आणि आपल्या सायपदराखाली जपत ‘अनुभवाचे आभाळ’ दाखवणार्या आजीला त्यांनी हे पुस्तक अर्पण केलं आहे.
अखेर आई नानाला नाशिकला घेऊन आली.
इथून पुढे त्यांची आत्मकथा येते. एस. एस. सी. ते पीएच. डी. पर्यंतचा प्रवास यात आहे, असे त्यांनी लिहिले आहे.
नाशिकचे त्यांचे घर नदीकाठी. गोदावरीला तिथे गंगाच म्हंटलं जातं. घर वरच्या मजल्यावर. घरातून पंचवटीतल्या सर्व देवांचं दर्शन होई. घर दोन लहान खोल्यांचं. त्यात नाना, त्याची दोन धाकटी भावंडे बंड्या, बेबी, आई आणि वडील भाऊ, म्हणजे त्र्यंबकबुवा राहत. ते प्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यामुळे जागोजागी जाऊन ते कीर्तने करीत. कीर्तनात मिळालेला शिधा (धान्य वगैरे), आरतीतले पैसे व मिळालेली बिदागी, यावर घर चाले. दिवसेंदिवस ही मिळकत कमी होत गेली. दारिद्र्य हे प्रारब्ध झाले. संसार फटका झाला, पण आई तो शिवून, त्याला ठिगळं लावून काटकसरीने तो करायची. कुणाकडे काही मागणे तिला नको वाटे. ती मायाळू होती, तशीच कर्तव्य कठोर होती. भाऊ दिसायला राजबिंडे, विद्वान, अभ्यासू, चांगले गाणारे. उत्तम कीर्तंकारात जे जे म्हणून हवे, ते भाऊंकडे होते. भाऊ संतापी होते, पण त्यांचा संताप लगेच जाई. ते तसे प्रेमळ होते.
घराच्या ४२ पायर्या उतरून खाली आले की पायाला अंगण लागे. वर आभाळ दिसे. वास्तवाच्या अंगणात नाना आभाळाएवढे उंच होण्याची स्वप्ने बघे.
अंगणातून बाहेर आले, की पायाखालची असीम जमीन त्यांना आभाळाएवढे अनुभव देई. यात अनेक प्रकारचे अनुभव होते. कडू- गोड, आंबट-चिंबट, खारट-तुरट….. अनेक प्रसंगातून घेतलेले अनेक अनुभव. ते प्रसंग, त्यातील सहभागी लोक, त्यांचे संवाद, या सार्यातून त्यांनी त्यांच्या जीवनात भेटलेल्या अनेक व्यक्तींची आपल्याला भेट घडवलीय. त्यात बाळासाहेब दिंडोरकर, सोहोनी सर, कार्डिलेले सर, श्री. रा. टीकेकर यांच्यारखी विद्वान, आदरणीय मंडळी आहेत. घराशेजारी रहाणार्या हडपीण काकू, रोज सकाळी येणारा वासुदेव, न्हाव्याचे काम करणारा भिकुबुवा यासारखी अनेक मंडळी आहेत. त्यांची वर्णने वाचून त्या त्या व्यक्ती डोळ्यापुढे उभ्या रहातात. त्यांच्या घरांचं वर्णनही अगदी बारकाव्याने केलं आहे.
एका मठातील महंताबद्दलही त्यांनी खूप लिहिलय. त्यांना नानाबद्दल आस्था आहे,. नानाच्या कॉलेजच्या अॅडमिशनाला पैसे कमी पडत होते. कुठेच कुणाला काहीही न मागणार्या नानाच्या आईने नाईलाजाने त्यांच्याकडे पैसे मागितले होते. ‘लवकरच परत करीन’, असंही ती म्हणाली. त्यांच्यावर तिची श्रद्धा होती. एका शेठाजींकडून त्यांनी नानाच्या शिक्षणासाठी मदत मागीतली. शेठजींनी त्याला आनाथ मुलांच्या फंडातून पैसे पैसे दिले. पण त्याला ते आवडले नाही. तो म्हणतो मी अनाथ नाही. महंतांनी ते पैसे आईला परस्पर दिले. नानाने त्यांना हात लावत नाही. आई म्हणाली, आपली परिस्थितीच अशी. काय करणार? यामुळे तू काय खरोखरच अनाथ झालास का? ‘हा सगळा प्रसंग प्रत्यक्षातच वाचायला हवा.
पुस्तकात अनेक प्रसंग असे आहेत, की जे प्रत्यक्षात वाचूनच त्यातला आनंद, किंवा, परिस्थिती किंवा मर्म समजून घ्यायला हवे. असाच एक प्रसंग, चिपळूणला रामनवमीच्या निमित्ताने केलेल्या कीर्तनाचा. कीर्तने उत्तम झाली. नाना तबल्याच्या साथीला. सुरूवातीला त्याच्याबद्दल साशंक असलेले मुख्य ट्रस्टी महाबळेश्वरकर त्याच्या तबला वादनावर खूश होऊन गेले. आईदेखील दुपारी दोन ते चार बायकांसाठी कीर्तन करी. या वेळी त्यांची संभावनाही चांगली झाली. हे सगळं वर्णनही प्रत्यक्षच वाचायला हवं.
नाना कोलेजमध्ये शिकत असतानाच अभिषेक, मंत्रजागर, शांतिपाठ, सदावर्त, एकादष्णी, संकल्प सोडणे, इ॰ कामे गरजेनुसार करत असे. आर्थिक गरज होतीच. यावेळी कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीनी आपल्याला अशा अवतारात पाहू नये, असे त्याला स्वाभाविकच तारुण्यसुलभ भावनेने वाटत असे. मंदिरात आणि नदीकाठी अशी धार्मिक कृत्ये करताना, भटजींच्यातले परस्परातले हेवे-दावे, भांडणे, मत्सर, स्वत:ला श्रेष्ठ ठरवणे, इतरांची मानहानी करणे, इतरांची गि-हाइके आपल्याकडे ओढणे, या गोष्टी कशा घडत, त्याचे प्रत्ययकारी वर्णन लेखकाने केले आहे.
चतुर्मासात अनेक शेठजी ब्राम्हण भोजन घालत. वस्त्र-पात्र- दक्षणा देत. अशाच एका प्रयोजनाला वडील बाहेरगावी गेले असल्यामुळे नानाला जावे लागले. त्या कार्यक्रमात काय काय घडले, जेवायला पानावर बसलेल्याला उठवून दुसरीकडे बसवणे, जगन्नाथ भटांनी शेठजींच्या पुढे दाखवलेली लाचारी, इतरांशी मात्र अरेरावी, त्यांचे व विष्णु भटाचे माना-पानावरून झालेले भांडण, मारामारी हा सगळा भाग प्रत्यक्ष वाचूनच अनुभवायला हवा. आध्यात्मिक क्षेत्रात वावरणार्या या लोकांचे पाय मातीचे आणि मने कशी चिखलांनी बरबटलेली आहेत, याचे दर्शन इथे होते.
कॉलेजमध्ये शिकताना नानाचा सहभाग वक्तृत्व, निबंधस्पर्धा, संस्कृतिक कार्यक्रम इ. मध्ये असे. अधून-मधून भिक्षुकीही होतीच. पुढे त्याला शाळेत टायपिस्टची नोकरी मिळाली. बी. ए. ला ऑनर्स मिळाल्यावार त्याच (तो शिकत असलेल्या) शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. नंतर त्यांनी एम. ए. केले. त्यांतर त्यांना मनमाडच्या कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. प्राध्यापकाच्या नोकरीसाठी विविध कॉलेजेसमध्ये इंटरव्ह्यू देताना झालेले संवाद, त्यातील राजकारण यांचे नेमके दर्शन त्यांनी घडवले आहे. पुढे मनमाड च्या डॉक्टर महाजनांशी त्यांचे मैत्र जुळले. त्यांनी पीएच. डी. करण्याचा आग्रह धरला. बाळासाहेबांनी विषय सुचवला, ’कीर्तन परंपरा आणि मराठी वाङ्मय’ मग या विषयावर त्यांचा अभ्यास चालू झाला.
कीर्तनाच्या नारदीय, वारकरी, रामदासी, गाणपत्य इ. अनेक परंपरा आहेत. मग त्यांचे वारसदार, मठपती महंत, बुवा इ. ना भेटणे, त्यांच्या परंपरा समजून घेणे, आख्याने, पोथ्या, बाडे मिळवणे यासाठी भ्रमंती, अभ्यास सुरू झाला. या भ्रमंतीत, मठपती, महंत, बुवा इ. चे आलेले अनुभव, त्यांच्याशी घडलेले संवाद, दिले आहेत. इथेही स्वत: आणि आपली परांपराच कशी श्रेष्ठ याबद्दल तावातावाने बोलणे, दुसर्याला हीन, कमी लेखणे, याचे त्यांनी खुमासदार शैलीत वर्णन केलं आहे. अनेक बाडातून त्यांना दुसर्याची आख्याने स्वत:ची म्हणून दिलेली दिसली. म्हणजे इथेही कीर्तन चौर्य आहे तर, त्यांच्या मनात आले.
प्रत्यक्ष लेखन करताना आपल्या पत्नीचा आपल्याला खूप उपयोग झाला, असं कृतज्ञतापूर्वक त्यांनी लिहिलय. विशेषत: लेखन सोप्या भाषेत रसाळपणे लिहीले गेले पाहिजे, याबद्दल ती आग्रही होती.
प्रबंध सबमिट् करतानाचा अनुभवही त्यांनी मोठ्या खुसखुशीतपणे लिहिला आहे. अर्थात् वाचकाच्या दृष्टीने. लेखकाची परिस्थिती तेव्हा कशी झाली असेल तोच जाणे. महिन्याभराने त्यांना पीएच. डी. मिळाल्याचे पत्र आले.
नानाला पीच. डी. मिळाली, तेव्हा भाऊ मात्र हयात नव्हते. त्यांची आत्यंतिक इच्छा होती, की नानाने उत्तम कीर्तनकार बनावे. नाना काही कीर्तनकार झाला नाही. पण त्याने ‘कीर्तन परंपरेवर’ संशोधन करून भाऊंची कीर्तनाची नाळ जोडून घेतली
पुस्तकाचा हा परिचय म्हणजे ट्रेलर आहे. नानाच्या जीवनात घडलेल्या गोष्टी, त्याने घेतलेले अनुभव, विविध प्रसंग, त्या त्या वेळचे संवाद, त्यातून आणि निवेदनातून व्यक्त झालेली व्यक्तिचित्रे, वातावरण, लेखकाचं व्यक्तिमत्व, त्याचं भावविश्व, हे सगळं नीट समजावून घेण्यासाठी ‘अंगणातलं आभाळ’ वाचायलाच हवं. पुस्तकाच्या शेवटी आपल्या, ‘अंगणातील आभाळावर एक अतिशय सुरेख थोडी दीर्घ कविता लेखकाने दिली आहे.
पुस्तकाचे मूखपृष्ठ मात्र आकर्षक आणि सार्थक वाटत नाही. कदाचित् मला त्याचे मर्म उलगडले नसेल.
परिचय : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी भाषेला “अभिजात मराठी”चा दर्जा देवून गौरवल्यामुळे मराठी भाषा प्रेमींना आनंद झाला नसता तरच नवल!! पण हे आणि एवढेच करून थांबणे योग्य नव्हे असे सुजाण साहित्यप्रेमी रसिक वाचकांना वाटणे अगदी स्वभाविकच आहे. याच भावनेपोटी “सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन्सचे” श्री. सुरेंद्र गोगटे यांच्या मनात एक अनोखा विचार आला. तो प्रत्यक्षात आणण्याबद्दल त्यांनी श्रीमती ज्योत्स्ना तानवडे यांच्याशी संपर्क साधला, चर्चा केली – – –
हा विचार म्हणजे “साकव्य विकास मंच” या साहित्य समूहातील काही प्रतिभावान कवयित्रींच्या कवितांच्या रसग्रहणाचा संग्रह प्रकाशित करणे. यानुसार दहा कवयित्रींच्या प्रत्येकी पाच अशा एकूण पन्नास कविता आणि त्यांच्या त्या कवितांचे रसग्रहण करणाऱ्या पाच रसग्रहणकर्त्या ज्या प्रत्येकी दहा कवितांचे रसग्रहण करतील असा विचार पक्का झाला. रसग्रहण या जराशा दुर्लक्षित साहित्य प्रकाराला या अभिनव कल्पनेमुळे गती मिळेल अशी मनोमन आशा ठेवून “काव्यानुभूती” हे पुस्तक दिनांक २७ जुलै २०२५ रोजी पुणे येथे प्रकाशित झाले. पुस्तकाची प्रस्तावना प्रसिद्ध साहित्यिक व माननीय डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांनी लिहून या पुस्तकाला आशीर्वाद दिले असे आम्ही सारे जण मानतो. या पुस्तकाच्या संकल्पनेबद्दल श्री. गोगटे याचे आभार. तसेच हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी व पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारा पुढाकार, समन्वय, संकलन व संपादन अशा विविधांगी भूमिका प्रामाणिकपणे करणाऱ्या सौ. तानवडे यांचे ही मन:पूर्वक आभार…
यात ज्या कवयित्रींच्या कविता समाविष्ट केल्या आहेत त्या कवयित्रींचे आणि रसग्रहणकर्त्या लेखिकांचे ही आभार.
साहित्यप्रेमी रसिक जनांनी संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे..
धन्यवाद..
परिचय : सुश्री नीलिमा खरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हॅल्युसिनेशन्स – लेखक – डॉ. पद्मनाभ केसकर ☆ परिचय – सुश्री वीणा रारावीकर ☆
पुस्तक : हॅल्युसिनेशन्स
लेखक – डॉ. पद्मनाभ केसकर
प्रकाशक – सुनिधी पब्लिशर्स, पुणे
पृष्ठ संख्या – १८८
मूल्य – ३०० रुपये
सध्याच्या काळात अनेक लोक आपला बहुतांशी वेळ आभासी दुनियेत घालवत असतात. कधी कधी त्यांना तेच जग खरे आहे असा भास होऊ लागतो. भास-आभासाच्या या खेळाचा माणूस आपल्या आयुष्यात कधी ना कधी अनुभव घेत असतो. या आभासाचा अतिरेक होतो तेव्हा त्याला हॅल्युसिनेशन्स होऊ लागते. त्यामुळे हॅल्युसिनेशन्स हे पुस्तकाचे नाव आणि मुखपृष्ठ बघून सुरवातीला या गूढ कथा आहेत असा मनात संभ्रम निर्माण होतो. लेखक डॉ. पद्माकर केसकर यांनी या भासाला छेद दिला आहे. हॅल्युसिनेशन्स हा बारा लघुकथांचा संग्रह आहे. या अभ्यासपूर्ण कथा आहेत. वैज्ञानिक, भावनिक, जीवनस्पर्शी अशा या कथा आहेत.
हॅल्युसिनेशन्स, लेखकाच्या पहिल्या कथेत पुढच्या काही कथांचा संदर्भ येतो. आणि यातून त्या कथा वाचण्याची उत्सुकता निर्माण होते.
माणसाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला तरीही तो पहिला येऊ शकत नाही. हेच सत्य द सेकंड बेस्ट या कथेतून अधोरेखीत केले आहे. मेंदूला पर्याय उपलब्ध होऊ शकतो का, याचा मागोवा त्यांनी एका श्वासाचे अंतर यात घेतला आहे.
एखाद्या अति श्रीमंत माणसाशी त्याच्या ईस्टेटीसाठी लग्न करायचे आणि नंतर त्याचा काटा काढायचा. हे कथेचे बीज जुनेपुराणेच. पण तो काटा काढताना कोणते तंत्र वापरायचे, हा एक प्रश्न. लेखकाने गोबेल या कथेत हिटलरच्या साथीदाराने शोधून काढलेल्या, युद्ध काळात वापरल्या जाणर्या तंत्राचा उपयोग अप्रतिमरित्या केला आहे.
लेखक वैद्यकीय व्यवसायात आहेत. हॉस्पिटल मधील वातावरण, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या भाव-भावना यांच्याशी लेखकाचा जवळून परिचय आहे. एखादा रुग्ण अगदी काही तासाचा सोबती असेल तर डॉक्टर कसे वागतील आणि त्याचबरोबर रुग्णाच्या जवळचे नातेवाईक कसे वागतात, याचा अनुभव त्यांनी सहजपणे रेखाटला आहे. याचा प्रत्यय बिंब-प्रतिबिंब या कथेत येतो.
तर त्यांच्याच व्यवसायातील धोका त्यांनी संडे इव्हिनिंग या कथेत अतिशय भावुकपणे मांडला आहे.
यातील बहुतांशी कथा मानवी जीवन – मृत्यू मधील संघर्ष संबंधीत आहेत. तरीही प्रत्येक कथेत एक वेगळा विचार आहे. एक कथा राजकीय तर एक मानवी स्वप्नांवर. तर भास- आभासाच्या या खेळात शेवटची पाहुणा पाऊस ही कथा एक वेगळीच वळण घेते आणि मनाला हुरहूर लावते.
लघुकथा अर्थात प्रत्येक कथा साधारणपणे १२ ते १५ पानांची आहे. त्यामुळे एकावेळी एक कथा सहजपणे वाचून होते आणि संपूर्ण पुस्तक वाचून कधी संपते हे समजत नाही. प्रत्येक कथेचा शेवट उत्कंठावर्धक आहे. सर्व कथा प्रथमपुरुषी एकवचनात लिहिल्या आहेत, हे विशेष. तसेच या कथांमध्ये केलेले ग्रीष्म ऋतुमधील उन्हाळ्याचे, शिशिरातील पानगळीचे अथवा न थंडीतील धुक्याचे वर्णन यामुळे अतिशय योग्य वातावरण निर्मिती होते.
या पुस्तकातील काही कथा लेखकाने त्यांच्या महाविद्यालयीन काळापासून म्हणजे साधारण ९० च्या दशकात लिहिलेल्या आहेत. वेगाने बदलत जाणार्या तंत्रज्ञानाने माणसाची जीवनशैली बदलून टाकली आहे. तरी पण आजही या कथा वाचताना तितक्याच ताज्या – टवटवीत, नवीन वाटतात. यातील काही पारितोषक विजेत्या कथा आहेत.
एक मनस्वी कलाकार, लेखक डॉ. सलील कुलकर्णी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तर डॉ. अच्युत गोडबोले आणि निरंजन घाटे यांनी त्याची पाठराखण केली आहे. यातील रेखाचित्रे अतिशय समर्पक आणि कथेला उठाव आणणारी आहेत.
तरुणांपासून जेष्ठ लोकांपर्यंत सर्व वाचकांना खिळवून ठेवेल अशा या कथा आहेत. सुनिधी पब्लिशर्सने प्रकाशित केलेला हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्की उतरेल, यात शंका नाही.
परिचय : वीणा रारावीकर
दक्षिण मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “देवालय – एक शोध परिक्रमा” – लेखिका : सुश्री सुनीला सोवनी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : देवालय – एक शोध परिक्रमा
लेखिका : सुनीला सोवनी
प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स
पृष्ठे : २१६
मूल्य: २५०₹
अयोध्येतील श्रीरामलल्लाची मूर्ती घडविणारा मूर्तिकार अरुण योगीराज प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणू लागला “ही मूर्ती मी घडवलेली नाही ” त्याच्या या आश्चर्यकारक उद्गारा मागचे रहस्य काय असावे ? त्यावेळी श्रीरामाची झलक अनुभवणाऱ्या प्रत्येकाचे भान हरपले, डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले ते कशामुळे ?
केरळमधील शबरीमला येथील स्वामी अय्यप्पा मंदिरात विशिष्ट वयातील महिलांना परंपरेने प्रवेश नाकारला तो का ?आणि तिरुअनंतपुरम पासून 16 कि. मी. वरील माता भगवती मंदिर परिसरात प्रतिवर्षी ओणमच्या दिवशी महिला भक्तांची विश्वविक्रमी गर्दी होते ती तरी का ?
भगवान विष्णुच्या विठ्ठलरुपी भेटीसाठी आतुरलेले वारकरी “माऊली माऊली “असा धावा करीत पंढरीची वाट तुडवतात मात्र असा ” माऊली” चा मान त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आदी ज्योतिर्लिंगांना का नाही दिला जात ?
तिरूमला पर्वतावरील बालाजी सुद्धा विष्णूचेच रूप.. मात्र तो “धनदाता”म्हणून विख्यात! तर या डोंगरा जवळचेच कालहस्ती मंदिर “सर्वबाधा निवारक” म्हणून प्रसिद्ध हा भेद कशामुळे ?
महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली किंवा बनशंकरी, शांतादुर्गा, कामाख्या अशी कित्येक शक्तीदेवतेचीच नावे नी तिचीच देवालये, परंतु प्रत्येकाची महती वेगळी, आराधना वेगळ्या, फलश्रृती सुध्दा वेगळी असे का असते ?
भल्या मोठ्या पिंपळाखालच्या पारावरील एवढ्याशा दिवटीच्या प्रकाशातला मारुतराय घाबरलेल्या मनात जशी आश्वासकता निर्माण करतो तशी आश्वासकता नेत्रदीपक रचनेने समृध्द वेरूळचे कैलास मंदिर किंवा कोणार्कचे सूर्य मंदिर का नाही करू शकत ?
देव- देवालयांच्या संस्कृतीने नटलेल्या अशा आपल्या देशात प्रत्येक देऊळ वेगळे दिसते, वेगळे भासते पण वेगळे असत नाही. ते कसे ?
कुठल्याही मंदिराच्या गाभाऱ्यात अनुभवता येणारी शांतता, प्रसन्नता दुसऱ्या एखाद्या भव्य- दिव्य.. डोळे दिपवणाऱ्या वास्तूरचनेमध्ये अनुभवता येईलच याची खात्री देता येत नाही. असे का व्हावे ?
दक्षिणेतील मंदिराभोवतीची गोपुरे किंवा दिपमाळा कोणाला साद घालतात ? देवळाचे गर्भगृह लहान व अंधारे का असते ? मनात येईल त्या मोकळ्या जागेवर मंदिर का नाही बांधत? मंदिरातून पूजा- अर्चा, होम- हवन सारखे का चालू असते ?
विभिन्न संप्रदाय नी मंदिरे यांचा परस्परसंबंध काय ?
मुळात देवालये निर्माण का केली जातात? मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का होते ? योगशास्त्रात वर्णिलेली कुंडलिनी शक्ती नी देवालये यांचा परस्परसंबंध असतो तो काय ?
अशा कित्येक प्रश्नांचा वेध घेत उत्तरे देणारी अर्थात मंदिर चे रहस्य उलगडणारी ही ” देवालय – एक शोध परिक्रमा “
मंदिर दर्शन हा देखल्या देवा दंडवत असा वरवरचा किंवा मार्गदर्शकाने दिलेल्या दृष्टीमुळे तात्पुरते अचंबित होण्याचा किंवा मंदिर प्रवेशावरून तावातावाने भांडण्याचा विषय नसून येथल्या प्रत्येक निर्माण प्रक्रियेमागे, कृतीमागे महाप्रचंड अर्थ आहे. ‘देवालय’ म्हणजेच परमेश्वराचे घर साकारण्याची ती एक अशी प्रक्रिया आहे की, ज्यायोगे परमेश्वरी शक्तीचे भक्तामध्ये जागरण घडून येईल, भक्ताचे रूपांतर होऊन भक्त आणि भगवंत एकरूप होतील. परमेश्वरी कृपाप्रसादाने भक्ताचा भगवंत व्हावा, त्याचे परमकल्याण व्हावे यासाठी केलेला तो फार मोठा यत्न आहे.
जीवमात्राला सुखी-आनंदी जीवन जगता यावे यासाठी जगभरात अक्षरशः शेकडो पंथ, संप्रदाय, वाद-विचारधारा, राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था जन्माला आल्या आणि बहुतेक जण अधिकांच्या अधिकतम सुखापर्यंत जाऊन पोहोचले. भारतातही अनेक मार्ग जन्माला आले, मात्र या सर्वांनी सर्वव्यापी ईश्वराचे (एकाच एका चैतन्यशक्तीचे) दर्शन घेतले व त्यांनी सर्वांच्या परमसुखाचा -चिआनंदाचा ध्यास घेतला. अनुभूतीच्या बळावर परमकल्याण साधणे हेच प्रत्येक मार्गाचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यातलाच एक मार्ग म्हणजे ‘सगुण भक्ती’च्या माध्यमातून समस्त उत्कर्ष घडविणारा भक्तिमार्ग होय आणि त्या भावआराधनेचे साधन केंद्र म्हणजे मंदिर होय.
‘देवालय’ शोध परिक्रमेचे संकलन मुख्यतः तीन भागात वर्णिले आहे. पहिला भाग बाह्य सृष्टीवर म्हणजेच मंदिराच्या अंगोपांगाचे वर्णन करणारा. त्याचे अंतरंग उलगडून सांगणारा आहे. एखाद्या नितांत सुंदर, भव्य, अत्याधुनिक वास्तूच्या रचनेने आपण प्रभावित झालो तरी तिला प्रार्थनास्थळ किंवा देवालय अशी उपमा देत नाही. मात्र शिखर, गोपुरे, दीपमाळा, शंखनाद असे काही दिसू, ऐकू येऊ लागले की आपण जाणतो की इथे परमेश्वराचे निवासस्थान आहे. प्रारंभिक भागात देव-देवालयांची परंपरा, त्यांच्या प्रमुख शैली, साकारलेल्या मंदिर रचनेमागचा अर्थ, प्रत्येक स्थानाचे महत्त्व, त्या वैशिष्ट्यपूर्व रचनेमागचा खोलवर विचार यात मांडला आहे.
दुसऱ्या भागात कुठल्याही भेदभावनेशिवाय हजारो मंदिरांमधून सर्वांना मुक्त प्रवेश असला, तरी एखाद्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश का नाकारला जातो अथवा एखादे मंदिर स्त्रियांना कृपा आशीर्वाद देण्यासाठी सिद्ध कसे असते, हे ज्या चैतन्य शक्तीवर अवलंबून असते, अशा मंदिर -निर्माण शास्त्राची म्हणजेच आगमे वा तंत्रे यांची माहिती देण्यात आली आहे. आज देशभरातील मंदिरे ज्या संप्रदाय व त्याच्याशी निगडित श्रद्धा -आगमांमधून निर्माण करण्यात आली आहेत, अशा प्रमुख संप्रदायांची संक्षिप्त ओळख, संबंधित प्रधान देवतेविषयीच्या भावना यात आढळतील. त्याचप्रमाणे मंदिर वास्तू अंतर्गत चैतन्यशक्तीची जागृती ज्या तंत्र, मंत्र, यंत्र, मूर्तीद्वारे विकसित आणि प्रवाहित ठेवले जाते, त्या प्रत्येक घटकांचे कार्य शब्दबद्ध केले आहे. याच भागात योगशास्त्राची विशेषतः कुंडलिनी जागृती संबंधाने माहिती दिली आहे. तंत्रशास्त्रांनी सुप्तावस्थेतील कुंडलिनी शक्तीला जागे करून पिंड-ब्रह्मांड शक्तीचे ऐक्य घडविणे हेच साध्य ठरविलेले असते. हेच लक्ष्य ठेवून मंदिरशास्त्र विकसित झाले आहे.
‘ब्रह्म’ सर्ग या तिसऱ्या भागात परमपुरुष हेच अधिष्ठान, त्याच्या अंतर्गत विभिन्न देवतांची कार्ये, पिंड-ब्रह्मांड संबंध, साधक साधनेतील शूचिता, पाळावयाची पथ्ये, प्राणप्रतिष्ठा व चैतन्यजागृती, चैतन्यशक्तीचा कुंडलिनी शक्ती जागरणावर होणारे परिणाम, भक्तिमार्गातील ईश-शरणता अशा अनिवार्य बाबींचा ऊहापोह करीत अंततः देवालयातील प्राणप्रतिष्ठित वैशिष्ट्यपूर्ण चैतन्यशक्ती अर्थात ईश सिद्ध पीठ जीवाशिवाचे ऐक्य घडविण्यासाठी सहायक ठरणारे ‘योग मंदिर’ म्हणून सदैव कार्यरत कसे राहते याचे वर्णन करीत ही परिक्रमा पूर्णत्वास जाते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मी… गांधारी” — लेखक : श्री सुधाकर शुक्ल ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
पुस्तक: मी… गांधारी
लेखक: श्री सुधाकर शुक्ल
प्रकाशक: काॅन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
गांधारी… महाभारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे गांधारी! धृतराष्ट्राच्या सहवासात असून सुद्धा गांधारीने स्वतःच्या जीवनात धर्माला महत्त्व दिलं होतं! ती प्रज्ञावंत, पतिव्रता व सत्यप्रिय जशी होती तशीच ती धर्मनिष्ठ ही होती. पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना शाप देण्याचे सामर्थ्य जिला प्राप्त झालं होतं ती पांडवांना शाप देऊन नष्ट करू शकली असती, पण तिने ते केले नाही. आधारमाला विरोध म्हणून गांधारीने धृतराष्ट्राशीही संघर्ष केला पण त्यातील अपयशी ठरली ही तिच्या जीवनाचे शोकांतिकाच आहे. धृतराष्ट्र हा जसा पुत्र मोहाने आंधळा झाला होता तशीच गांधारीही पुत्र प्रेमाने आंधळी झाली होती. पण धृतराष्ट्राजवळ विवेकाचा अभाव होता तर गांधारीचा विवेक जागृत होता. जिथे धर्म असतो तिथं विजय असतो हे मानणारी गांधारी पुत्राच्या यशाला विरोध करते हे विशेष होय. गांधारी ही नुसती एक स्त्री नव्हती तर शतपुत्रांची माता होती. पुत्रां बद्दलचे प्रेम असल्यामुळे तिने कुंती पुत्रांना विरोध केला. युध्दात कौरवांच्या विनाशा नंतर प्राप्त झालेल्या राजसत्तेचा त्याग करून गांधारीची सेवा करण्यासाठी कुंती वनवासात जाते हे तर अपूर्वच होतें. अधर्माशी प्रतिकार करताना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी सतत संघर्ष करावा लागला आणि त्यातूनच गांधारीची प्रतिमा उठून दिसली!
गांधारी ही एक थोर प्रतिव्रता होती, तशीच ती तेजाचे प्रतीक होती. पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर गांधारीला अलौकिक शक्ती प्राप्त झाली होती. पतीव्रतेचे व्रत म्हणजे एक कठोर तप होते. ते गांधारीने मनाने कधीच भंगू दिले नाही. अधर्माशी संघर्ष करूनही पति वरची निष्ठा तिने अभंग ठेवली, त्यामुळे तिच्या वाणीतून उमटणारा शब्द वरदान किंवा शाप होऊ शकत होता. याच सामर्थ्यावर भगवान श्रीकृष्णांना तिने कठोर शाप दिला. न्याय, नीती आणि धर्म यावर अढळ श्रद्धा ठेवणारी गांधारी तितकीच विशाल अंत:करणाची होती. पांडवांचा पक्ष तिने प्रत्यक्ष कधीच स्वीकारला नसला तरी पांडवाच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा विजय व्हावा ही तिच्या मनाची साक्ष सर्वांना चकित करणारी अशीच आहे!
पांडवाच्या समवेत विदुर वानप्रस्थाश्रमासाठी जाण्यास निघणार होते तेव्हा त्यांनी गांधारीची भेट घेतली. आणि तिचा निरोप घेण्याचे ठरवले. विदुर गांधारीला म्हणाले की, ‘आज पर्यंत मी अधर्माची सोबत करत आलो. मी एक त्यांचा धाकटा भाऊ म्हणून हे करत आलो. कुरुकुलातील एक घटक या नात्याने कुरुकुलाचे हित पाहणे माझे कर्तव्य होते, म्हणून ते मी केले. कौरव पांडवांच्या मध्ये संघर्ष होऊ नये म्हणून मी प्रयत्न केले. त्यात मी अपयशी ठरलो. त्यामुळे आता मी पांडवांबरोबर वनवासाला जाणे योग्य ठरेल. ‘ गांधारीने विदुराला समजावून दिले की, कुरुकुलाने आज पर्यंत स्त्रीची प्रतिष्ठा जपली नाही उलट स्त्रीची विटंबनाच केली! गांधारी तत्त्वज्ञ होती, हुशार होती. ती जाणून होती की कौरव आणि पांडवांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी द्रौपदीला पणाला लावले.. आणि त्यावेळी आपण काहीही बोलू शकलो नाही, प्रतिकार करायला आपण दुबळे ठरलो, या गोष्टीची गांधारीला खंत वाटत होती. डोळ्यावर बांधलेल्या पट्टीमुळे गांधारी स्वतःच्या पतीशी एकरूप झाली, पण त्यामुळेच ती हस्तिनापूर आणि कुरुकुल यामध्ये घडत असलेल्या संघर्षाला डोळसपणे सामोरी जाऊ शकली नाही!
गांधारीने आपले जीवन पती पुरतेच सीमित ठेवले पण त्यामुळे पुढे होणाऱ्या भीषण संघर्षाला तिला सामोरे जावे लागले. धर्माचे रक्षण करणारी प्रखरबुद्धी असूनही त्या शस्त्राचा उपयोग तिने केला नाही..
एक क्षत्रिय कन्या होती परंतु अधर्माच्या विळख्यात ती सापडली गेली, त्यातून ती बाहेर पडू शकली नाही.
गांधारी ने धृतराष्ट्राला समजावण्याचा प्रयत्न ही केला. , पण आता वेळ गेली होती.
गांधारीला पांडवांच्या बद्दल आदर होता. कारण पांडवांच्या मनात शत्रुत्वाची भावना तात्पुरती आहे आणि विश्वाचा जो आधार धर्म आहे तो युधिष्ठिर मानतो! यावर तिचा विश्वास होता. दुर्योधनाने द्यूताच्या वेळी जी वागणूक दाखवली होती त्याबद्दल गांधारीलाही खूप वाईट वाटत होते. महाभारताच्या शेवटी राजमहाल सोडून सर्वजण बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर गांधारीही बाहेर पडली. कुंतीबद्दल तिने प्रेम व्यक्त केले. कुरुक्षेत्रा जवळून जाताना गांधारीने झालेल्या सर्व घटनांबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला, तेव्हा विदुराने तिची समजूत घातली, ‘गांधारी, पश्चात्ताप हा व्यर्थच असतो आणि पश्चातापानंतर येणारे ज्ञान निरुपयोगी असते.
‘शेवटी पश्चात्ताप दग्ध होऊन गांधारीने महर्षी व्यासांच्या आश्रमात धृतराष्ट्र, विदुर आणि कुंती यांच्यासह प्रवेश केला..
गांधारी ही महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होऊन गेली..