☆ किमया… लेखक : श्री माधव आचवल ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक : किमया
लेखक : श्री माधव आचवल
☆ सौंदर्यातलं अध्यात्म… ☆
खरंतर पुस्तक वाचण्याची कुठलीही एक वेळ किंवा जागा अशी नसते. पण काही पुस्तकं काही विशिष्ट वातावरणात वाचली तर ती जास्त जवळची वाटतात असा माझा अनुभव.
भरपूर पाऊस पडून गेल्यानंतर तजेलदार ऊन असावं… हिरव्यागार झाडीत एक निवांत क्षणी आराम खुर्ची टाकून, ऊन सावल्यांचा खेळ बघत ओल्या मातीचा सुगंध, पानांची ओली काया, त्यावरती पडणारे सूर्याचे किरण, मधूनच उडणारे पक्षी त्यांचा मधुर चिवचिवाट, डोलणारी फुले बघत असताना खुर्चीच्या समोर टीपॉय वर कॉफीचा मग आणि हातामध्ये ‘माधव आचवल’ यांचे ‘किमया’ पुस्तक असावं.
असं का? कारण ‘माधव आचवल’ यांचं हे ‘किमया’ पुस्तक बंद दारात, खिडकीआड बसून वाचण्याचं नाही. हे पुस्तक वाचण्यासाठी रंग, रूप, रेषा, आकार या सगळ्याचा अनुभव घेता येईल अशा मोठ्या अवकाशातच ते वाचलं जायला हवं. कारण पुस्तकातला आशय इतका मोठा, प्रगल्भ आहे की कुठल्याही चौकटीत राहून आपल्याला तो समजूनच घेता येणार नाही. त्यासाठी मनाच्या चौकटी मोकळ्या करायला हव्यात. निसर्गाने केलेली सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण बघायला हवी. झाडं, झुडपं, पान, फुलं, वस्तू, यंत्र, माणसं, सारं सारं काही बघण्यासाठी सगळ्यांमधलं रेषेचं मूलभूत लयदार एकत्व शोधायला हवं. अशा मुक्त वातावरणात हळूहळू का होईना आपल्याला ते दिसू लागतं आणि मग लेखकाच्या शब्दांचं बोट धरून आपण जसं जसं ते बघायला लागतो, अनुभवायला लागतो तेव्हा आपल्याही नकळत आपण एका वेगळ्या उंचीवरून जग न्याहाळायला लागतो. आणि नेहमीच्याच गोष्टी, नेहमीच्याच वस्तू, वास्तु, माणसं, यंत्र, निसर्ग आपल्याला वेगळ्या दृष्टीने दिसायला लागतात. तेव्हा आपोआप एक भावना मनात निर्माण होते ‘एकोहं बहुस्याम! ‘
जगण्यामध्ये एकरूपता, एकतानता साधायची असेल तर काय प्रकारची साधना करावी लागेल हे सांगणारं खरं म्हणजे हे पुस्तक. हे नुसतं आकृत्या, रेषा, रंग, प्रकाश, अंधार, लय, ताल, रूप इ. बद्दल बोलत नाही.
मला या पुस्तकांमधून जगण्यातलं त्यापेक्षा सौंदर्यातलं अध्यात्म दिसतं. प्रत्येक गोष्ट, स्थिती, कृती किती बारकाईने, तिच्या असण्याच्या-नसण्याच्या संदर्भासह मांडली गेलीये, ते बघून थक्क व्हायला होतं. आपल्या रोजच्या जीवनामध्ये इतक्या प्रकारचं सौंदर्य, इतक्या प्रकारची अभिव्यक्ती, समृद्धपण दडलेलं आहे हे उलगडून सांगणारं अतिशय अप्रतिम म्हणावं असं हे पुस्तक. मनाला ताजेपणा आश्वासकपणा देणारं ठरतं. आणि म्हणूनच कधी मन उदास असेल, निराश असेल, आयुष्यात काहीच घडत नाही असं वाटत असेल, तर सरळ सगळे व्यापताप क्षणभर बंद करून मोकळ्या जागी बसावं. आणि हे पुस्तक वाचायला घ्यावं माहित नाही. किमया या शब्दांत आहे, या दृष्टीत आहे की, आपल्याला समृद्ध करणाऱ्या निसर्गात, भवतालात, पण ती घडते हे नक्की.
माधव आचवल यांचे खूप खूप उपकार आहेत की त्यांनी हे पुस्तक लिहिलं. अन्यथा सौंदर्याकडे आध्यात्मिक दृष्टीने बघण्याची इतकी सुरेख पद्धत मला तरी गवसली नसती.
परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “कांचनबारी” – लेखक : श्री नितीन अरुण थोरात ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक – कांचनबारी
लेखक – नितीन अरुण थोरात
प्रकाशक : Writer Publications
मुखपृष्ठ – प्रमोद कल्लाप्पा मोर्ती
पृष्ठ: २४८
मूल्य: ३९०₹
इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारी युद्ध-कादंबरी – ‘कांचनबारी’.
नाशिकजवळच्या चांदवड तालुक्यात आहे कांचना किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खिंड म्हणजे कांचनबारी अन् या खिंडीत झालेली लढाई म्हणजेच कांचनबारीची लढाई.
शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. राजे कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजगडाकडं निघाले. पण, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह कांचनबारीत येऊन उभा राहिला आणि सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.
– – ते युद्ध म्हणजेच कांचनबारीचे युद्ध.
१७ ऑक्टोबर रोजी या युद्धाला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत.
‘ शिवाजी महाराजांचे सर्वात भयाण मैदानी युद्ध ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कांचनबारीच्या लढाईचा तपशीलवार इतिहास सांगणारी ही “युद्ध-कादंबरी“ फक्त इतिहास अभ्यासक आणि इतिहासप्रेमींनीच नाही, तर शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि प्रेम बाळगणाऱ्या प्रत्येकानेच वाचायला हवी असे आवर्जून सांगावेसे वाटते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “त्याचं असं झालं ” – लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : त्याचं असं झालं…
लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर
मो। ९४२३२६७०२०
प्रकाशक. :चतुरंग प्रकाशन, सांगली.
मूल्य : रु. २७५/-
☆ ‘‘त्याचं असं झालं’… झालं ते चांगलंच झालं!… ☆
घरी दूरदर्शन संच नाही असे एकही घर आता नसेल. एखाद्या खुर्चीवर किंवा आराम खुर्चीत बसून हातामध्ये रिमोट कंट्रोल घेऊन टीव्ही सुरू करावा, एका मागे एक चॅनेल बदलत जावे आणि प्रत्येक चॅनेलवर आपल्या पसंतीचा कार्यक्रम पाहावा हे किती सुखकारक, आनंददायक आहे याचा अनुभव आपण सर्वजण घेत असतोच. असाच अनुभव एखाद्या पुस्तकातून मिळाला तर? होय, असाच आनंद एका पुस्तकाच्या वाचनातून मिळतो. ते पुस्तक म्हणजे ‘ त्याचं असं झालं ‘. या पुस्तकातील कोणतेही प्रकरण उघडावं आणि ते वाचायला सुरुवात करावी. कुठल्याही एका प्रकरणाचा दुसऱ्या प्रकरणाशी संबंध नाही. परंतु प्रत्येक प्रकरणातून, प्रत्येक लेखातून मिळणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा असाच म्हणावा लागेल. सांगली येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांनी लिहिलेले ‘त्याचं असं झालं ‘ हे पुस्तक नुकतच वाचून झाल. ते वाचून झाल्यानंतर आपण एखादा चलत् चित्रपट तर पहात नव्हतो ना किंवा दूरदर्शनवरील विविध चॅनेल्स एकामागून एक पुढे सरकवत नव्हतो ना असेच वाटले. हे आत्मचरित्र नाही. आत्मसंवादही नाही. हा आहे निव्वळ आत्मानुभव… मग असे काय आहे या पुस्तकात?
डॉक्टर श्रीनिवास नाटेकर हे सांगली येथील सुप्रसिद्ध रेडियॉलॉजिस्ट. आजपर्यंतच्या त्यांच्या जीवनात त्यांना ज्या ज्या व्यक्ती भेटल्या त्या त्या व्यक्तींच्या सहवासातील सुखदुःखांचे क्षण आणि त्याबरोबरच आपल्या व्यवसायातील काही अनुभव कथन करणारे हे पुस्तक म्हणजे लेखकाने प्रत्येक वाचकाशी साधलेला संवाद आहे असेच वाटते. लेखक आपल्यासमोर बसून चहा पीत पीत आपल्याला त्या आठवणी व्यवस्थितपणे सांगत आहे आणि आपणही त्याचा एक भाग बनून अत्यंत तन्मयतेने त्या ऐकत आहोत असे वातावरण निर्माण करण्याची ताकद या पुस्तकामध्ये आहे. डॉक्टरांच्या प्रदीर्घ व्यावसायिक वाटचालीमध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या अंगी असलेल्या संगीत प्रेम, बॅडमिंटन आणि वक्तृत्व या अंगभूत कलागुणांमुळे त्यांना असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभला, भेटी झाल्या. त्या कशा होत गेल्या, त्यातून कोणकोणते प्रसंग संस्मरणीय झाले, व्यवसायामध्ये आलेले अनुभव कसे चिरकाल स्मरणात राहतात, हे सर्व त्यांनी कथन केलेले आहे. आपण ज्यांना ‘सेलिब्रिटी ‘ म्हणतो अशा सुप्रसिद्ध व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती जर आपल्या जीवनात आली तर आपल्याला अप्रूप वाटते. इथे तर डॉक्टरांच्या जीवनात एकाहून एक अशी भारदस्त व्यक्तिमत्वं भेटून गेली आहेत. त्यांच्याशी झालेल्या गप्पा, कोणत्या प्रसंगातून त्यांच्या ओळखी झाल्या, काहींच्या भेटी होता होता कशा चुकल्या, काही ठिकाणी कसे सुखद अनुभव आले, काही ठिकाणी कशी फजिती झाली तर काही ठिकाणी सुरुवातीला दडपण, भीती पण त्या प्रसंगाचा शेवट मात्र अतिशय गोड कसा झाला हे सर्व त्यांनी अत्यंत खुमासदार शब्दांमध्ये सांगितलेले आहे. आता आपल्याला वाटेल असं कोण बरं यांना भेटलं असेल? या ठिकाणी सर्वच्या सर्व नावे सांगितली नाही तरी काही नावे सांगितली व आपण ती वाचली की लक्षात येईल की हा माणूस किती भाग्यवान आहे. भारतरत्न लता मंगेशकर व भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, सुधीर फडके, परविन सुलताना, पंडित जसराज, माजी राज्यपाल वसंतदादा पाटील, ओ. पी. मेहरा व आय. एच. लतिफ, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, पु ल देशपांडे, वसंत बापट, ना. ग. गोरे, बेबी शकुंतला, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई व चौधरी चरण सिंग, एकनाथ सोलकर, मंगेश पाडगावकर, उषाकिरण, सदाशिव अमरापुरकर, स्नेहल भाटकर, दिलीप प्रभावळकर, सी रामचंद्र, ओ. पी नय्यर इ. इ… ही नावे किंवा यातील प्रत्येक नाव आपल्याला भुरळ पाडणारे असेच आहे. विविध क्षेत्रातील अशा व्यक्तिमत्त्वांचा काही ना काही कारणाने संपर्क होणे आणि त्यांच्या सहवासात काही तास, एखादा दिवस घालवणे हे किती भाग्याचे आहे याची कल्पना आपण करू शकतो. याशिवाय व्यवसायामध्ये आलेले अनुभव त्यांनी कथन केलेले आहेत. हे सर्व करत असताना या व्यक्तिमत्त्वांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या शब्दातून उभ्या केल्या आहेत. एवढेच नव्हे तर आजुबाजूचा परिसर, एखादी इमारत, एखाद्या हॉटेल मधील फर्निचर, निसर्ग या गोष्टींचेही त्यांनी अचूक वर्णन केलेले आहे. त्यामुळे या आठवणी म्हणजे फक्त आठवणींच ‘ गाठोडे ‘ नव्हे तर एक ललितरम्य लेखमाला झालेली आहे. एखाद्या व्यक्तीचे वर्णन करताना त्याचा पोशाख, त्याचे रंग, रूप याबरोबरच त्याची देहबोली याचेही त्यांनी अचूक टिप्पण केलेले आहे. उदाहरणार्थ संगीतकार मदन मोहन, जय किशन, चौधरी चरण सिंग यांचे वर्णन वाचून ते चेहरे त्या व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहतात. ‘ वालाची उसळ ‘ या लेखातून त्यांनी जो प्रसंग कथन केला आहे तो वाचल्यानंतर डॉक्टर हे फक्त वैद्यकीय सल्ला देणारे नसून शरीरामध्ये नसलेल्या अवयवापर्यंत म्हणजे पेशंटच्या मनापर्यंत जाऊन भिडणारे डॉक्टर आहेत हे दिसून येते. ‘स्कूटरची किक ‘ या लेखातूनही त्यांनी आपल्या व्यवसायातील अत्यंत थरारक असा अनुभव कथन केला आहे.
वैद्यकीय व्यवसायात माणसांशी सतत येणारा संबंध आणि ते संबंध डोळसपणे अनुभवण्याची वृत्ती, तसेच बॅडमिंटन सारख्या खेळातील प्राविण्य, चित्रपट गीते ऐकण्याचा छंद व त्यावरील प्रेम आणि या सर्वांच्या जोडीला आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याच स्वभाव यामुळे डॉक्टरांनी जी माणसे मिळवली ती त्यांच्या स्मृती मध्ये कायमची कोरून ठेवली गेली आहेत. त्याचा त्यांनी जो आनंद उपभोगला तो आपल्यालाही या पुस्तकामुळे उपभोगायला मिळत आहे.
आयुष्याच्या अल्बममध्ये जतन करुन ठेवावेत असे फोटो खूप कमी असतात. पण इथे अल्बम भरुन जावा इतके फोटो डॉक्टरांजवळ आहेत. आज लेखक आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहेत तेथून मागे वळून पाहताना त्यांच्या तोंडून, त्यांच्या एका लेखाच्या शिर्षकाप्रमाणे ‘ कृतार्थ मी ‘ असेच उद्गार बाहेर पडत असतील. डॉक्टरानीच एका लेखात म्हटले आहे ” परमेश्वर किंवा आदिशक्ती असेल मला माहित नाही ; पण प्रत्येकाच्या नियतीत ज्या घटना घडतात, त्या त्यांनी योजिलेल्या असतात, असं समजलं जातं. ” ” विविध क्षेत्रातील इतकी मंडळी माझ्या जीवनात का डोकावली याचे माझ्याकडे समर्पक, पटेल असे उत्तर नाही. ही परमेश्वराची कृपा असावी, माझ्या नियतीतील महद्भाग्य असावे. किंवा माझ्या बाबतीतील निव्वळ योगायोग असावा अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. “
काहीही असो, जे झालं हे आम्हा वाचकांसाठी चांगलंच झालं.!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “अस्वस्थ नायक” – लेखक : श्री. आनंद टकले ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक : अस्वस्थ नायक
लेखक : श्री. आनंद टकले
प्रकाशक : शब्दश्री प्रकाशन
पृष्ठे – १८७
मूल्य – ३०० रु.
‘अस्वस्थ नायक’ ही कादंबरी नुकतीच वाचनात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवन संघर्षावर ही कादंबरी आधारित असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले आहे.
एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर कादंबरी लिहिणे, म्हंटले तर सोपे, म्हंटले तर अतिशय अवघड काम आहे. सोपे अशासाठी की त्या व्यक्तीचे व्यक्तिमव, त्याचे विविध पैलू माहीत असतात. त्या व्यक्तीच्या जीवनातले प्रसंग माहीत असतात. प्रसंग निर्मितीसाठी फारसा विचार करावा लागत नाही आणि अवघड अशासाठी, की कादंबरी आहे, म्हंटल्यावर काही प्रसंग कल्पनेनेही निर्माण करावे लागतात. ते निर्माण करताना त्यांच्या व्यकीमत्वाचे पैलू त्यातून नेमके प्रगट होतील, असे प्रसंग योजावे लागतात. प्रसग वर्णन करताना ते प्रभावी आणि उठावदार होतील याची काळजी घेताना, मूळ व्यक्तिमत्व, स्वभावविशेष नेमके स्पष्ट होतील, ही काळजी घ्यावी लागते. मूळ व्यक्तिमत्व वाचकाच्या परिचयाचे नसले, तरी लेखकाने वर्णन केलेल्या प्रसंगातून नायकाचे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे उभे रहाते.
‘अस्वस्थ नायक’ या कादंबरीचे चार भाग आहेत. पहिल्या भागात कादंबरीचा नायक रायानंद पुंडला धुळकर याचं गाव धुळकरवाडी आणि त्याच्या आस-पासचा प्रदेश याचं वर्णन येतं. तिथलं वातावरण, पर्यावरण आणि जनजीवन यांची माहिती त्यात येते. गाव दुष्काळग्रस्त. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरचं. निवेदन ग्रामीण बोलीत. ही ग्रामीण बोली पुन्हा त्या सीमा भागातली. आपल्याला परिचित ग्रामीण बोलीपेक्षा काही ठिकाणी वेगळेपण जाणवते. उदा. ‘लेका’च्या जागी ‘लग’ शब्द येतो. दावण तोडणे म्हणजे मेंढया पळवणे. गुड्डा म्हणजे डोंगर असे किती तरी वेगळे शब्द यात येतात. पुस्तकाच्या शेवटी काही अपरिचित शब्दांची यादीही दिली आहे. पण एकूण कादंबरी वाचताना निवेदनातला गोडवा मोहून टाकतो. नायक शिकलेला आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्यात कधी कधी नागरी शब्द आणि प्रमाण भाषाही येते. राया हा धनगर समाजातला. त्यामुळे धनगर समाजातील चाली-रीती, बोलण्याची- वागण्याची पद्धती, समाजाची संस्कृती, त्यांची आदराची स्थाने या सगळ्याची माहिती प्रसंगा-प्रसंगाने होते.
रायाला डॉक्टर व्हायचं होतं. ते जमलं नाही निराशेने घेरलं. मग जाणवलं, देवाने वक्तृत्वाची देणगी दिली आहे. तिचा उपयोग करू या. हळू हळू, लोकांची संघटना तो बांधत गेला. अनेक निमित्ते शोधली. अहिल्याबाईंची जयंती. सर्वांना बरोबर घेऊन त्याने तो उत्सव मोठ्या थाटात पार पाडला. यातून तो राजकारणाच्या क्षेत्राकडे वळला. कादंबरीच्या दुसर्या भागात त्याच्या राजकीय क्षेत्रातील वावर, याबद्दल लिहिले आहे. त्याने बांधलेल्या संघटना, काढलेले मोर्चे, त्याचे परिणाम, आपल्या गावात व इतरत्र जागोजागी उभारलेल्या भा. स. प. च्या शाखा, शेवटी सर्वांच्या आग्रहाने लढवलेली आमदारकीची निवडणूक, त्यात सुरुवातीला झालेला पराभव. तथापि तिसर्या क्रमांकाच्या मतांमुळे मनाला आलेली उभारी हा भाग येतो. इथे नायक म्हणतो,
लढता लढता हरलो जरी, हरल्याची खंत नाही.
पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, एवढ्यावर थांबायला
शांत बसायला मी काही संत नाही.
राजकारणातील कट-कारस्थाने हेवे-दावे, ही सारी माहिती, घटना-प्रसंगांचे वर्णन कादंबरीच्या दुसर्या भागात येते. इथे दुसर्या वेळी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत रायानंद प्रचंड मतांनी निवडून येतो. त्याच्या गावात, जत तालुक्यात प्रचंड जल्लोष होतो.
उत्तम वातावरण निर्मिती, प्रत्यक्षदर्शी प्रसंगवर्णन, संवाद आणि वर्णन याद्वारे केलेले विविधरंगी व्यक्तिचित्रण ही कादंबरीची विशिष्ट्ये सांगता येतील. वातावरण निर्मितीचा एक नमूना देते.
‘ऊन रखरखत होते. जमीन तापलेली. धग अंगात सुटलेली. वादळ-वारे भिरभिरत होते. वार्याने कहर माजवायला सुरुवात केली. आता टपोरे थेंब पडत होते. जीवाची तगमग थांबलेली. सारे अंग शांत शांत झालेले, पावसाच्या धारा धो धो बरसत होत्या. तापलेली भुई आधाशागत पाणी पोटात साठवत होती. ती आता सुस्त झालेली. तिचा अंगा-खांद्यावरून पाणी खेळत होते. ते पाणी खळाळत, धावत पुढे जात होते. ओढा-नाल्यातून पुढे जात होते. बंधार्यामुळे पाणी अडवले जात होते. पाणी जमिनीत मुरत होते. माणसांच्या चेहर्यावर समाधानाचं वारं सुटलेलं’
कादंबरीच्या पहिल्या दोन भागात अनेक घटना-प्रसंगांचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आहे. गावात पावसाने ओढ दिली. पाऊस पडावा, म्हणून मरीआईचा काढेला गाडा, गुड्डावरची बिरोबाची यात्रा, भिवर्गित साजरी केलेली अहिल्याबाईंची जयंती, चाबूक मोर्चा, मंत्र्यांना जत तालुक्यात जाऊ न देता पोलीस स्टेशांच्या तिथेच त्यांची गाडी आडवणं, धर्माच्या हॉटेलमध्ये गुंडांनी घातलेला राडा, त्यांच्यापुढे आगतिक झालेला धर्मा, त्यानंतर एकदा भा. स. प. चे नेते धर्माच्या धाब्यावर जेवायला येतात, ते अंनंदक्षण आशा किती तरी लक्षवेधी प्रसंगांची वर्णने यात आहेत.
अनेक नाट्यमय घटना यात आहेत. व्यजावर व्याज लावून पैसे वसूल केलेला सावकार तुक्या तांबे रायाच्या रानात येऊन धमकी देऊ लागल्यावर शिरमाने त्याची मस्ती कशी जिरवली, संत्या गायकवाडाने धनू गोरडाची दावण कशी कापून नेली आणि धनुने हाय खाऊन कशी आत्महत्या केली याचे वर्णन आहे. तोच सत्या गायकवाड अहिल्याबाईंची जयंती भिवर्गित साजरी होत असताना, सगळं गाव तिथे असणार, म्हणून लखू तात्याची दावण तोडायची (मेंढया पळवायच्या) योजना आखतो. संत्याला हे कळताच तो रायाला कळवतो आणि राया आपली ५०-६० पोरे घेऊन (मित्र) घेऊन ओहोळात त्याच्या जीपवर दगडांचा वर्षाव करून सत्याची जीप थांबवतो आणि त्याची मस्ती कशी जिरवतो, लहू तात्याची दावण कशी परत मिळवतो, हे सारे वर्णन घटना डोळ्यापुढे उभे करते. असाच आणखी एक प्रसंग म्हणजे संभाजी वाटळेकर कर्नाटकात मेडीकलसाठी रायाला प्रवेश मिळवून देण्याच्या बोलीवर, रायाकडून अडीच लाख रुपये घेतात. ते कॉलेजमध्ये भरत मात्र नाहीत. त्यामुळे रायाला मेडीकलला अॅडमिशन राया आणि त्याचा भाऊ धर्मा आपले पैसे परत मागायला जातो. त्यानंतर तो आत्महत्या करतो. पण त्याला जबाबदार राया व धर्मा असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवतो. सी. एम. , डी. सी. एम. , एस. पी. आय. जी. यांना चिठ्ठ्या पाठवून देतो. न केलेल्या गुन्ह्याची रायाला शिक्षा भोगावी लागली. पुढच्या काळातही अनेक खर्या – खोट्या गुन्ह्यात त्याला अडकवले गेले. असे अनेक प्रसंग, घटना, त्यातील संवाद यामधून रायचे आई-वडील, भाऊ, मित्र, विरोधक यांची व्यक्तिचित्रे आपल्या डोळ्यापुढे उभी रहातात.
या कादंबरीचे प्रस्तावनाकर प्राचार्य रा. तु. भगत म्हणतात, ‘या कादंबरीची ‘उंची’आहे, ग्रामीण समाजाला नवविचारांची प्रेरणा देण्याच्या सामर्थ्यात आणि तिची ‘खोली’ आहे, यातील पानापानावर पाझरणार्या माणुसकीच्या प्रगटीकरणात. येथील लेखकाचे शब्द वाचकांच्या आत्म्याशी संवाद साधतात आणि त्यांच्या हृदयातील तारा छेडतात. ’
कादंबरीचा तिसरा आणि चौथा भाग अगदीच लहान आहेत. तिसर्या भागात अवघी ५ पाने आहेत, तर चौथ्या भागात फक्त दोनच. तिसर्या भागात आमदार म्हणून निवडून आल्यावर रायानंदने कोणती कामे केली, याचे वर्णन येते. यात करोना काळातील दुर्दशेचेही वर्णन आहे. चौथ्या भागात कालानुरूप आणि रायानंदच्या प्रयत्नाने धुळकरवाडीचा विकास कसा झाला हे संगितले आहे. पाणी शेतीच्या बांधावर आले. शेती सुजलाम सुफलाम झाली एम. आय. डी. सी. निर्माण झाल्याने धुळकरवाडीच्या हाताला काम मिळाले. धुळकरवाडीत आर्थिक सुबत्ता आली. धुळकरवाडीतील तरुणांनी विविध क्षेत्रात नाव कमावले. लेखक म्हणतो, ‘नियती, निसर्ग, यातना, वेदना, अडचणींचा सामना करत, संघर्ष करत नव्या तेजाने प्रकाशणारी धुळकरवाडी सोनेरी दवाबिंदूसारखी लखलखत होती. उनाच्या झळावर विव्हळणारी झाडे आता शितलतेचा गारवा वाडीला देत होती.
एवढं सगळं चांगलं घडूनही नायक अस्वस्थ का? त्याचे कारण शेवटच्या दोन ओळीत दिले आहे. ‘जागतिकीकरणाच्या विळख्यात धुळकरवाडी गुंतत चाललेली. आर्थिक सुबत्ता आल्याने धुळकरवाडीच्या उंबरठ्यावर भोगवाद आणि चंगळवाद आ वासून उभा होता. ’ हा भाग अधीक विस्ताराने आला असता, तर नायकाची अस्वस्थता अधीक प्रभावीपणे वाचकांना जाणवली असती.
मुखपृष्ठ चांगले आहे. नायकाचा खंबीरपणा आणि अस्वस्थता दोन्हीही गोष्टी चेहर्यावरून प्रतीत होतात.
ग्रामीण नेतृत्वात होत चाललेली वाढ आणि बदलत चाललेल्या ग्रामीण जीवनाचे ताणे-बाणे समजून घ्यायचे असतील, तर प्रत्येकाने ‘अस्वस्थ नायका’चा अस्वस्थपणा जाणून घ्यायला हवा.
वातावरण निर्मिती छान आहे. व्यक्तिचित्रण वेधक आहे. विविध प्रसंगांचं वर्णन वाचताना आपण ते प्रत्यक्ष पहातोय आणि संवाद वाचताना ते प्रत्यक्ष ऐकतोय असं वाटतं. ज्वलंत वास्तवाचे दुर्मिळ दर्शन यात घडते. ‘संघटित व्हा. संघर्ष करा, यश आपल्यापुढे नतमस्तक होईल, हाच संदेश कादंबरी देते.
परिचय : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “के कनेक्शन्स” – लेखक : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : के कनेक्शन्स
– – – के फॉर कुमार… के फॉर कल्याण…
लेखक: श्री प्रणव सखदेव
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे.
पृष्ठ: १९४
मूल्य: २७५₹
कधी तरी आठवतं का तुम्हाला… पूर्ण दिवस मैदानात खेळलेलं क्रिकेट, चौकात मिळणारा बर्फाचा गोळा, सायकलवरचा वारा, मित्रांबरोबर केलेली मस्ती, शाळेतील पहिली क्रश, आणि गच्चीवर पतंग उडवताना मिळणारा आनंद? प्रणव सखदेव यांचं ‘के कनेक्शन्स’ हे पुस्तक अशाच विसरलेल्या आठवणींच्या कनेक्शनला उजाळा देतं – कुमार नावाच्या एका मुलाच्या आणि त्याच्या भोवतालच्या जगाच्या नजरेतून. पण गंमत म्हणजे, कुमार कोणत्याही एका पात्राचं प्रतिनिधित्व करत नाही – तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आतला लपलेला बालक !
प्रणव सखदेव यांनी लिहिलेली ही mosaic प्रकारातील कथा म्हणजे बारा छोट्या छोट्या धाग्यांनी विणलेली आठवणींची गोधडी आहे. प्रत्येक गोष्ट वेगळी असली, तरी सगळ्यांचं मूळ एकाच भावना-विश्वात आहे – ते म्हणजे कुमारवय. भाषा अतिशय सहज, ओघवती आणि लयबद्ध आहे – पुस्तक एकदा उघडलं की पुढचं पान वाचल्याशिवाय राहवत नाही. लेखकाचं निरीक्षण अत्यंत प्रगल्भ आहे – त्या काळातला कल्याण परिसर, व्यक्तिरेखा आणि घटनांचं हुबेहूब वर्णन वाचकाला त्या काळात घेऊन जातं.
या पुस्तकातली पात्रं मनाला भिडणारी आहेत – नवनवीन पदार्थ खाऊ घालणारी कडबोई मावशी, गाणं म्हणणारी मेघा ताई, त्याच्या भविष्याची काळजी करणारे फणस आजोबा, माया करणारी भाजीवाली अक्का, क्रिकेटच्या ग्राउंडबाहेर थंडगार चम्मच विकणारे हुसैनभाई गोळावाला, त्याचे जिवलग मित्र दिन्या आणि मन्या, वाचनाची गोडी लावणाऱ्या साळुंकेबाई – ही सगळी पात्रं इतकी खरी वाटतात की ती आपल्याच आजूबाजूला वावरतायत असं वाटतं. विशेष म्हणजे, हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं वाटत नाही – ते तुम्हाला नुसत्या आठवणी दाखवत नाही, तर भावनांच्या गाभाऱ्यात नेऊन पोहोचवतं.
हे पुस्तक प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं – विशेषतः ९०-२००० च्या दशकात मोठं झालेल्या मंडळींसाठी, जे अजूनही चिठ्ठ्या, रिबन्स, डब्बा शेअर करणाऱ्या आयुष्याला मिस करतात. कॉलेज स्टुडंट्स, नवखे वाचक किंवा नॉस्टॅल्जिया प्रेमींसाठी ही एक सुंदर भेट आहे. शेवटी, ‘के कनेक्शन्स’ हे पुस्तक म्हणजे केवळ गोष्टींचा संग्रह नाही – तर आपल्या आठवणींची एक सुंदर ठेव आहे !
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “यशवंत होण्यासाठी चाणक्यनीती” – लेखक : डॉ. धनंजय मंडलिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : यशवंत होण्यासाठी चाणक्यनीती
(जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यशासाठी चाणक्यांची ७५ सूत्रे)
लेखक : डॉ. धनंजय मंडलिक
पृष्ठे : २४०
मूल्य: २५०₹
“यशवंत होण्यासाठी चाणक्यनीती” हे पुस्तक वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यासाठी एक प्रभावी मार्गदर्शक आहे.
चाणक्यनीतीतील तत्त्वांचा योग्य वापर करून प्रत्येक व्यक्ती स्वतःचे ध्येय निश्चित करून त्याची पूर्तता साध्य करू शकते. चाणक्यांचे विचार अवलंबल्यास कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरते आणि यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवते.
या पुस्तकात यश मिळवण्यासाठी चाणक्यांच्या ठरावीक सूत्रांचे चार महत्त्वाचे प्रकरणांत विभाजन केलेले आहे:
१. यशस्वी होण्यासाठी २१ प्रभावी चाणक्यनीती
या प्रकरणात चाणक्यांनी सांगितलेली २१ महत्त्वपूर्ण तत्त्वे दिली आहेत. यात नैतिकता, योग्य वर्तन, वेळेचे नियोजन आणि समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक धोरणांचा सखोल ऊहापोह आहे.
२. यशस्वी होण्यासाठी चाणक्यांचे १५ गुण
या प्रकरणात आत्मविश्वास, संयम, धैर्य, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यांसारख्या १५ गुणांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. हे गुण व्यक्तीला कठीण प्रसंगी मार्ग शोधण्याची ताकद देतात.
३. ध्येय निश्चितीचे महत्त्व
ध्येय निश्चिती आणि नियोजनाविना यश मिळू शकत नाही. या प्रकरणात चाणक्यांनी ध्येय ठरवण्याचे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
४. चाणक्यांचे कानमंत्र
या भागात जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणादायी कानमंत्र दिले आहेत. गुप्तता राखणे, योग्य वेळी निर्णय घेणे आणि योग्य सहकारी निवडणे याविषयी मार्गदर्शन केलेले आहे.
–
ही चारही प्रकरणे चाणक्यनीतीचा सारांश असून यशस्वी जीवनासाठी आवश्यक दिशा दाखवतात. आचार्य चाणक्यांनी सुमारे २५०० वर्षांपूर्वी दिलेली सूत्रे आजही तितकीच उपयुक्त आहेत आणि प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करतात.
…. ध्येय निश्चिती आणि यशप्राप्तीसाठी “यशवंत होण्यासाठी चाणक्यनीती” हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी – लेखक : श्री जगदीश काबरे ☆ परिचय : सुश्री त्रिशला शहा ☆
पुस्तक : वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी
लेखक : जगदीश काबरे
प्रकाशक : लोकायत प्रकाशन
विज्ञान हा मानवजातीच्या प्रगतीचा कणा आहे.चाकाच्या आणि अग्नीच्या शोधातच आधुनिक विज्ञानाचे बीज आहे.तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. याच विषयावरील मांडणी करणारे विज्ञान लेखक प्रा.जगदीश काबरे यांचे वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी हे पुस्तक.
श्री जगदीश काबरे
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे जग झपाट्याने बदलत आहे पण तरीसुद्धा लोकांच्या मनात अंधश्रद्धा रुतल्या आहेत.प्रसारमाध्यमातील लेख,बातम्या,फिचर्स यातून पसरलेल्या अनेक समजूती समाज फारशी शहानिशा न करता ग्राह्य धरत असतो आणि यातूनच अनेक अंधश्रध्दा पसरविल्या जातात. म्हणूनच लेखकाने या गोष्टीवर प्रकाश टाकणारे लेखन केले आहे.पुस्तकातील लेखांद्वारे वैज्ञानिक द्रुष्टीकोन सांगताना विवेकी विचारही मांडले आहेत.
विवेकी विचार,ध्यान, सकारात्मक विचार आणि वैज्ञानिक द्रुष्टीकोन यामुळे व्यक्तीला आत्मविश्वास व मानसिक शांतता मिळते असे ते म्हणतात.लोकांना विचारी करायचे असेल आणि समाजसुधारणा करायची असेल तर भावनेपेक्षा बुध्दीला महत्व दिले पाहिजे कारण भावना माणसाला प्रसंगी हिंस्त्र बनवते पण बुध्दी मात्र माणसाला विवेकी बनवते असे लेखक म्हणतात.
दिवस,महिने,वर्ष आणि कालगणना या लेखातून नक्षत्र,महिने,मुस्लिम महिने याबध्दलची अतिशय रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळते.काळाची गरज म्हणून तर्कसुसंगत कार्यकारण भाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागते.निरीक्षण करुन,उपलब्ध ज्ञान वापरून तर्काने त्या घटनेमागचे कारण शोधले पाहिजे आणि ते योग्य आहे कि नाही हे पडताळून पहाण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत.
गणिताच्या क्षेत्रातील भारतीय गणितज्ञांचा इतिहास मधून अतिशय मौलिक माहिती लेखकाने दिली आहे. वास्तुशास्त्र, पित्रूपक्ष,गर्भसंस्कार, पौर्णिमा-एक अध्यात्मिक द्रुष्टीकोन, आधुनिक अंधश्रद्धा अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकणारे लेख या पुस्तकात वाचताना आपल्याही ज्ञानात नक्कीच भर पडते.एकूणच वेगळ्या विषयावरील अतिशय अभ्यासपूर्ण लेखन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.
परिचय : सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “टीचर… ते फटिचर…!” – संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाने प्रसिद्धीस आलेले प्रख्यात नाट्यकलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा एक किस्सा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज तुमच्यासोबत शेअर करतेय. ते व त्यांची पत्नी विजया जर्मनीला नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेले होते. दौरा आटोपून पुढच्या शहरात जाण्यासाठी ते फ्रँकफुर्ट विमानतळावर आले. तेथून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. नेमका गडबडीत त्यांचा पासपोर्ट बॅगमध्ये सापडत नव्हता. खूप शोधाशोध सुरु होती. दोन-तीन वेळेस अनाउन्समेंट झाली. शेवटी विमानतळाचे काही अधिकारी त्यांना तुम्हाला जाता येणार नाही, असे म्हणू लागले.
त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने त्यांना एक फॉर्म भरायला दिला. जर तुम्ही खोटा प्रवास केला असे सिद्ध झाले तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, अशा आशयाचा तो फॉर्म होता. त्या फॉर्मवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप लिहायचे होते. त्या जागी त्यांनी ‘Teacher’ असा उल्लेख केला.
तो पाहताच क्षणार्धात तेथील वातावरण बदलले. तो अधिकारी कमरेत वाकून म्हणाला, “We Germans, Believe in two things. One is God… Another is Teacher ! ते दोघेही खोटं बोलत नसतात… मी परमेश्वराला दुखावले आहे. तुम्ही तुमच्या वतीने माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी पापमुक्त होईन… ” अशी आॕपॉलॉजी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्यांने देशपांडे दाम्पत्याला थेट विमानात नेऊन बसविले.
प्रवासाच्या शेवटी देशपांडे दाम्पत्य मुंबईत आले. विमानतळावरील ग्रीन बेल्टमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तेंव्हा एका अधिकाऱ्याने त्यांना टोकले.
तर दुसऱ्या अधिकाऱ्याने ते काय करतात, त्यांना विचार, असे फर्मान हाताखालच्या अधिकाऱ्यावर बजावले. यांच्या मनात टीचरची प्रतिमा उजळ झाली होती. त्यांनी ताठ मानेने ‘आम्ही टीचर आहोत, असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणाला, ‘अरे वो फटिचर के पास क्या होगा ? जाने दो उसे… ‘
वऱ्हाडकरांचे टीचर नांवाचे विमान झटक्यात जमिनीवर आले.
कालांतराने ते औरंगाबादला गेले. काही दिवसांनी त्यांच्या घरी फ्रैंकफर्ट एअरपोर्टवरून एक टपाल आले. ज्यात ‘आपण टीचर असतानाही आम्ही आपल्याला त्रास दिला, ‘ त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र होते. देशपांडे यांना ते पाहून हसावे की रडावे ते कळेना…
शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
☆
संकलक / लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
न्यूज स्टोरी टुडे प्रकाशन तर्फे लेखिका नीला बर्वे यांचा कोवळं ऊन हा नुकताच प्रकाशित झालेला कथासंग्रह वाचनात आला.
या कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत. विविध विषयांवर या कथा लिहिल्या गेल्या आहेत. आयुष्य जगताना, समाजात वावरताना, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा, तेथील वातावरणाचा, मानसिकतेचा, मानवी स्वभाव वैशिष्ट्यांंचा, डोळसपणे आणि जाणीवपूर्वक वेध घेत या कथा लिहिल्या गेल्या आहेत हे जाणवतं. शिवाय अत्यंत साध्या, सोप्या, सरळ पण प्रभावी शब्दशैलीत या कथांची मांडणी केलेली असल्यामुळे विषय आशयासकट या सर्वच कथा वाचकांपर्यंत हवा तो परिणाम साधत पोहोचतात.
कोवळं ऊन ही या संग्रहातील पहिलीच शीर्षक कथा. मूल होत नाही म्हणून अनाथ आश्रमातून दत्तक घेतलेल्या एका दांपत्याची ही भावनिक कथा आहे. आश्रमाच्या नियमाप्रमाणे दत्तक मुलीस “आम्ही तुझे खरे आई वडील नाहीत” हे सांगण्यासाठी मनाची तयारी करत असतानाचा हा एक कष्टदायी मानसिक प्रवास या कथेत वाचायला मिळतो.
अंतरीचे बंध ही हृदयाला भिडणारी अशी कथा आहे. पती-पत्नीच्या प्रेमाच्या नात्याची एक विलक्षण कथा वाचण्याचा अनुभव या कथेद्वारे मिळतो. या कथेत बद्रीधाम केदारनाथ यात्रा केल्याचाही सुखद अनुभव वाचताना मिळतो. ही एक योगायोगाची कथा आहे असेही म्हणू शकतो पण कथेचा ओघ आणि सुरुवातीपासूनच कथेची मनावर बसलेली पकड “असेही घडू शकते” हे अगदी सहजपणे मान्य करते आणि ही मान्यता म्हणजेच या कथेचं यश आहे.
निर्णय ही कथा तशी लहान आहे पण या कथेतला आशय मोठा आणि चांगला आहे. जीवनात आपण घेतलेल्या निर्णयावर नेहमीच इतरांची टीका होत असते. त्याकडे दुर्लक्ष करून आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून संतुष्ट कसे राहता येऊ शकते अशा प्रकारचा एक संदेश या कथेतून मिळतो.
नाते ही एक अतिशय सुंदर कथा आहे. लग्नाआधी जोडीदाराला अपघात झाल्यानंतरही नायिका त्याच्याशीच लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत कशी पोहोचते हे अतिशय हृद्यपणे या कथेत लिहिले आहे.
मुक्त मी स्वच्छंद मी एक अतिशय मनोरंजक अशी नवल कथा. पाळलेला एक अज्ञात पक्षी त्या मानवी परिवाराच्या सहवासात वाढतो. त्या परिवाराकडून त्याला खूप प्रेमही मिळतं पण काही दिवसांनी त्या परिवाराला एका पक्षी मित्राकडून “तो गरुड असल्याचे” समजते आणि त्याला घरात ठेवणे हे कायदाबाह्य असल्यामुळे अखेर त्याची मुक्तता केली जाते. ही कथा वाचकांसमोर इतकी सहजतेने उलगडते की त्या पक्ष्याशी वाचकांचेही नाते जडते शिवाय एखाद्या पक्ष्याला पिंजऱ्यात बंद ठेवून त्याचं मुक्त आयुष्य हिरावून घेणे हे किती संवेदनाहीन
आहे हाही संदेश या कथेतून मिळतो. एक वेगळाच विषय यात हाताळला आहे.
हल्लीचीच एक गोष्ट “लिव्ह इन रिलेशनशिप” विषयी ही कथा असली तरी यात कोरोनाचा एक भयंकर काळ आणि त्या पार्श्वभूमीवर उलगडणारं प्रेम, घटना, नातेसंबंध, “आजचा आणि कालचा” यातल्या सीमारेषा ओलांडून एकेकाळच्या विरोधाला दूर सारत गोड आणि सकारात्मक शेवटाकडे नेणारी ही कथा नक्कीच मनोरंजक आहे.
मनू चा आनंद या कथेत मनू आणि आनंद हे नायिका नायक आहेत. मनूचा आनंद हे शीर्षक द्व्यर्थी आहे. यात विशेषनामे आणि आनंद हे भाववाचक नाम यांची कल्पकतेने केलेली गुंफण आवडली. थोडक्यात ही एक हळुवार प्रेम कथा आहे.
अपघात – सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारी आणि एका मुलीच्या भोवती फिरणाऱ्या समंजस कुटुंबाची ही कथा खरोखरच सुरेख आहे.
वंशाचा दिवा ही कथा वाचताना खरोखरच काळजाला चटका बसला. मोठी माणसं अशी का वागतात आणि अशा त्यांच्या वागण्याला कधीतरी धारदार उत्तर का देऊ नये? त्यांच्या चुका त्यांना दाखवून एखादा धाडसी पण आदर्श निर्णय घेणे हे कौतुकास्पदच आहे ना? या कथेतला निश्चल या तरुण नायकाची ही कथा वाचताना मन भरून जाते.
पहिली दिवाळी– नव्या जुन्याची सामोपचराने सांगड घालणारी ही कथा हलकीफुलकी असली तरी चांगला संदेश देणारी आहे.
स्वप्न या कथेतूनही खूप सुंदर विचार लेखिकेने मांडला आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून इंजिनियर बनण्याचे स्वप्न अर्धवट सोडून एक दुर्बल मनाचा पण बुद्धिमान युवक पुन्हा गावी परततो आणि वडिलांना शेती कामात मदत करता करता स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शेतीविषयक नवनवे तांत्रिक प्रयोग करून भरपूर यश व पैसा मिळवतो. मिळालेल्या संपत्तीचा उपयोग गावाचा उद्धार करण्यासाठी तो करतो. त्यामुळे साऱ्या गावाचा कायापालट होतो. त्याच दरम्यान याच नायकाच्या मुलाबाबत पुन्हा तीच रॅगिंगची समस्या उद्भवते त्यावेळी मात्र तो कॉलेजच्या संपूर्ण व्यवस्थापनेला आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून कॉलेजमधला हा गलिच्छ प्रकार समन्वयाने कसा सोडवतो हे सांगणारी ही एक सुंदर सामाजिक कथा आहे.
अस्मिता- मनाला सुन्न करणारी कथा. ऐन तारुण्यात बेदरकारपणे तान्ह्या मुलाला आणि संपूर्ण परिवाराला सोडून गेलेल्या नवऱ्यामागे त्याची बायको कशी खंबीरपणे जीवनाला सामोरी जाते आणि वीस-बावीस वर्षानंतर ठोकरा खाऊन परतलेल्या नवऱ्याला न स्वीकारता स्वतःची अस्मिता कशी जपते हे सांगणारी ही कथा हृदय पिळवटून टाकते. नारीशक्तीविषयीचा अभिमान वाढवते.
कांदा भजी– कोरोना काळातली ही एक कौटुंबिक, भावनिक, मानसिक ओढाताणीची हलकीफुलकी कथा आहे, मात्र वाचताना ती वाचकाचे रंजन नक्कीच करते.
चुकलेलं कोकरू– तारुण्याच्या उंबरठ्यावर मित्र-मैत्रिणींच्या मेळाव्यात काहीतरी थ्रिलिंग अनुभव घेण्याच्या जोशात मुलं भरकटतात, वाट चुकतात. पुढे काही गंभीर परिणाम होण्याच्या आतच त्यांना विश्वासात घेऊन सावरणं ही खरं तर पालकांची कसोटी असते. त्यासाठी लागणारं धैर्य, संयम, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचं दर्शन या कथेत अतिशय प्रभावी पद्धतीने होतं. ही कथा वाचल्यानंतर मन जडावतंही आणि हलकंही होतं.
वरील सर्व कथांचा आढावा घेताना मी प्रत्यक्ष कथानक सांगण्याचा मोह मुद्दाम टाळला आहे. मी फक्त कथेची रूपरेषा, आशय या परीक्षणात मांडले आहेत जेणेकरून कथा वाचनाचा निखळ आनंद वाचकाला मिळावा. त्यांची उत्सुकता टिकावी.
माननीय देवेंद्र भुजबळ यांची सुरेख प्रस्तावना या कथासंग्रहाला लाभली आहे. प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं आहे की, “जगाच्या कुठल्याही देशातील संस्कृतीशील माणूस हा या ना त्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या द्वंद्वात अडकलेला असतो आणि त्यातून शब्दबद्ध होणाऱ्या कथा या वैश्विक ठरतात. ”
माननीय नीला बर्वे यांच्या सर्वच कथातून हे अंतर्द्वंद्व जाणवतं हे या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य आहे.
या पुस्तकाचं मुखपृष्ठही मला फार आवडलं. संपूर्ण पांढऱ्या पार्श्वभूमीवर कोवळं ऊन पसरवणारं सूर्यबिंब, चार पानं फुटलेलं एक रोप आणि प्रातिनिधिक स्वरूपात एक रेखांकित चेहरा. चित्रातलं रोप हळूहळू उलगडणार्या आयुष्यासाठीचं रूपक वाटतं आणि रेखांकित चेहऱ्याच्या माध्यमातून माणसाचं जगणं टिपणारी एक संवेदनशील लेखिकाच दृश्यमान होते. अर्थात या मुखपृष्ठाचा हाच अर्थ असेल असेही नव्हे. मात्र पुस्तक हातात घेतल्यावर पाहता क्षणीच माझ्या मनात हे विचार आले ते व्यक्त केले.
एकंदरच एक सुंदर पुस्तक वाचल्याचा अनुभव मला मिळाला.
न्यूज स्टोरी टुडे प्रकाशनाच्या संपादिका माननीय सौ. अलका भुजबळ यांच्या या सुरेख देखण्या प्रकाशनाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि माझ्यासवे समस्त वाचकांतर्फे धन्यवाद!
तसेच सिंगापूरस्थित माननीय नीला बर्वे यांची मराठी भाषिक साहित्याविषयीची तळमळ, संवर्धन वृत्ती खरोखरच प्रशंसनीय आहे. पुढील साहित्यिक वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद!
परिचय – सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मी नुजूद.. वय वर्षं १० आणि घटस्फोटिता” – लेखक/लेखिका : डेल्फिन मिनोई/नुजूद अली –अनुवाद : सुश्री सुवर्णा बेडेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : मी नुजूद.. वय वर्षं १० आणि घटस्फोटिता – आधुनिक काळातील नायिका – नुजूद
लेखक: डेल्फिन मिनोई/नुजूद अली
अनुवाद: सुवर्णा बेडेकर
प्रकाशक: माय मिरर प्रकाशन, पुणे.
पृष्ठे: १७६
मूल्य: २५०₹
कोणे एकेकाळी एका प्रदेशातल्या जादुई भूमीविषयी, तिथल्या घरकुलांप्रमाणेच विस्मयकारी दंतकथा प्रचलित होत्या. तिथल्या घरकुलांवर जणू सुंदर, नाजूक नक्षीकामांची छपाई केली होती. ‘जिंजरब्रेड’ किंवा केक अधिक आकर्षक करण्यासाठी ज्याप्रमाणे साखरेचं ‘आयसिंग’ करतात, त्याप्रमाणे तिथल्या बैठ्या घरांची बांधणी होती. ही भूमी आहे अगदी दक्षिण टोकाला असलेल्या अरबी द्वीपकल्पाची! या भूमीला लाल समुद्र आणि हिंद महासागराकडून नित्य स्नान घातलं जातं. हजारो वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर इथे उभे असलेले विटेचे बुरूज, भवताली असलेल्या पर्वतांच्या रांगा आजही तशाच आहेत, असं दिसतं. दगडी पायवाट म्हणता येतील, अशा अरुंद गल्ल्यांमध्ये धूपाचा दरवळ जाणवतो.
या देशाला म्हणतात येमेन.
या देशाविषयी जुन्या काळातील माहितीचा थोडा शोध घेतला तर समजतं की, इथल्या ज्येष्ठांनी ‘अरेबिया फेलिक्स’ म्हणजेच ‘आनंदी अरेबिया’ असं नाव या देशाला दिलं होतं.
आता येमेन म्हणजे स्वप्नांना प्रेरणा देणारं! राणी शेबा हिचं हे राज्य. राणी शेबा अतुलनीय पराक्रमी, मजबूत आणि कमालीची देखणी महिला होती. तिने सोलोमॉन राजाच्या मनात प्रेमाचा अंकुर रुजवला. तिच्या कथांचा बायबल आणि कुराण या पवित्र ग्रंथांच्या पानावर अमिट ठसा उमटला आहे.
सर्वाधिक म्हणजे शंभरहून जास्त काळ राजांनी आपली सत्ता गाजवली. यानंतर गोरा साहेब म्हणजे ब्रिटिश आले. त्यांनी दक्षिणेकडे अडेनच्या आखातामध्ये बंदर उभे केले. या दरम्यानच्या काळात उत्तरेकडे तुर्वांनी आपली दुकाने थाटली होती. एकदा का इथून इंग्रज गेले की, अतिथंड प्रदेशातील रशियनांनी इथल्या दक्षिणेकडे आपले लक्ष केंद्रित केले. घरातल्या मुलांना आवडता केक खाण्याची खूप घाई झालेली असते, तशाच लोभी मुलांप्रमाणे हावरेपणामुळे या सुंदर प्रदेशाचे दोन तुकडे केले गेले.
जुनी-जाणती मंडळी या देशाला अरेबिया फेलिक्स असं संबोधन वापरतात. इथल्या खजिन्यामुळे या देशाविषयी मत्सराची भावना जास्त व्यक्त होत गेली. परकीयांना इथल्या तेलांच्या साठ्यांनी भुलवलं. इथला मधही सोन्याइतकाच मौल्यवान आहे. इथलं संगीतही मनमोहक आहे. इथल्या कविताही तितक्याच सौम्य आणि अलवार. तर इथे मिळणारे मसालेदार आणि चमचमीत खाद्यपदार्थ नित्य आनंद देणारे आहेत. अवघ्या जगभरातून पुरातत्वशास्त्रज्ञ इथल्या स्थापत्यकलेचा आणि विविध वास्तूंच्या अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी येतात.
वास्तविक येमेनवर हल्ले करणाऱ्यांनी इथून पलायन करूनही खूप मोठा काळ आता लोटला आहे. मात्र येमेनने गृहयुद्धाची मालिकाच अनुभवली होती. मुलांच्या इतिहासांच्या पुस्तकातील पानं चाळली तर येमेनच्या प्रश्नातील गुंतागुंत लक्षात येते. १९९० मध्ये जरी देश म्हणून एकसंध झाला असला तरी, अजूनही अनेक संघर्षाच्या ठसठसणाऱ्या जखमा इथे ठायी-ठायी दिसतात. घरातल्या एखाद्या वयोवृद्ध आजारी व्यक्तीला बरं करताना उठून उभं करण्याचा, चालवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र त्याला तोल सावरणंही अवघड जात असतं. तसंच काहीसं या देशाचंही झालं आहे. इथे तुम्हाला अनेक शाळकरी मुलं-मुली शाळेत जाण्याऐवजी रस्त्यावर भीक मागताना दिसतात.
अशा अस्वस्थ, अशांत देशात अवघ्या दहा वर्षांपूर्वी एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव नुजूद!
नुजूद काही राणी नव्हती की राजकन्या! एका सामान्य घरात जन्मलेली सर्वसाधारण मुलगी. तिला आई-वडील आहेत आणि खूप सारे भाऊ-बहिणीही आहेत. तिच्या वयाच्या इतर सर्व मुलांना ज्याप्रमाणे लपाछपी खेळायला आवडतं, तसंच नुजूदलाही हा खेळ आवडतो. तिला चॉकलेट्स आवडतात. तिला चित्रांमध्ये रंग भरायला आवडतात. तिच्या मनात समुद्रातील कासवांविषयी अनेक मजेशीर कल्पना आहेत. याचं कारण म्हणजे तिने अद्याप कधी समुद्रच पाहिलेला नाही. नुजूद ज्या वेळी हसते, त्या वेळी तिच्या इटुकल्या गालावर एक छानशी खळी पडते.
फेब्रुवारी २००८ मधल्या एका थंडगार आणि उदासवाण्या सायंकाळी तिच्या वडिलांनी सांगितलं की, ‘आता तिचा निकाह तिच्यापेक्षा वयाने तिप्पट असलेल्या पुरुषाबरोबर केला जाणार आहे.’ हे ऐकताच नुजूदमधली अवखळता जणू अचानक गायब झाली आणि तिच्या डोळ्यात कडूझार आसवं आली. जणू अवघ्या जगाचं ओझं आपल्याच खांद्यावर कुणीतरी टाकलं आहे, असं तिला वाटायला लागलं. काही दिवसांमध्येच नुजूदचं घाईघाईने लग्न उरकण्यात आलं तेव्हा तिचं बालपण अचानक संपलं.या लहानग्या मुलीने आपल्याजवळचं असलं नसलेलं बळ एकवटलं आणि आपल्यापुढे वाढून ठेवलेल्या अशक्यप्राय दुःखी नशिबापासून पळ काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नुजूदच्या पतीने तिच्यावर केलेल्या अत्याचारांबद्दल आणि तिच्या धाडसाने घरातून पळून जाण्याबद्दल ती अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये मांडते. स्थानिक वकिलांच्या आणि प्रेसच्या मदतीने नुजूदने तिचं स्वातंत्र्य परत मिळवलं. ज्या देशात अर्ध्याहून अधिक मुलींचं लग्न कायदेशीर वयापेक्षा कमी वयात लावून दिलं जातं, अशा येमेनमध्ये ही एक असाधारण कामगिरी होती. नुजूदने येमेनी रितीरिवाजांना आणि तिच्या स्वतःच्या कुटुंबाला धाडसीपणे आव्हान दिल्यामुळे मध्यपूर्वेतील इतर तरुणींना त्यांच्या लग्नाला आव्हान देण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
तिची ही शोकांतिका, तिच्या विजयाची आणि धैर्याची अविस्मरणीय कहाणी आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈