श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ नार्सिस आणि आपण… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
ग्रीक पुराणातील नार्सिसची (Narcissus) गोष्ट मोठी मजेशीर आणि बोधप्रद आहे. नार्सिस अत्यंत देखणा आणि बांधेसूद शरीराचा आहे. तो शिकारी आहे. तो इतका देखणा आहे की स्त्रियाच काय परंतु पुरुष देखील त्याच्यावर मोहित होतात. परंतु आपल्या रूपाचा आणि शरीरसौष्ठवाचा त्याला अहंकार होतो. हा अहंकार इतक्या पराकोटीला पोहोचतो की तो समोर येईल त्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान आणि तिरस्कार करायला लागतो. एकदा तो जंगलात शिकार करत असताना एका तळ्याकाठी येतो. तिथे त्याला इको ही अप्सरा भेटते. ती अत्यंत सुंदर असते पण तिला देखील तो तिरस्कार आणि दूर लोटतो.
या इकोची कहाणी सुद्धा मोठी मजेशीर आहे. ग्रीक देवांचा राजा झ्युस (Zeus) हा भोगविलासी असतो. तो नेहमी अप्सरांच्या बरोबर वेळ घालवत असतो. त्याच्या नाचगाण्यात मग्न असतो. अशावेळी बऱ्याचदा त्याची पत्नी हेरा (Hera)येते आणि त्याच्या नाचगाण्यात आनंदात व्यत्यय येतो. ती त्याला त्यापासून परावृत करण्याचा प्रयत्न करते. झ्युसला ही गोष्ट आवडत नाही आणि तो हेराला दूर ठेवण्यासाठी इकोची मदत घेतो. इको ही खूप बोलणारी आणि गप्पिष्ट असते. ती आपल्या गोड बोलण्यात हेराला गुंतवून ठेवते. पण लवकरच तिचे हे कारस्थान हेराच्या लक्षात येते आणि ती तिला शाप देते. ती म्हणते, ” यापुढे तुला बोलता येणार नाही इतरांनी बोललेल्या वाक्याचा शेवटचा भागच तुला बोलता येईल. “
शाप मिळाल्यानंतर इको कोणाशीही नीट संवाद साधू शकत नव्हती. एके दिवशी तिने जंगलात शिकारीसाठी आलेल्या सुंदर नार्सिसला पाहिले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. ती नार्सिसचा पाठलाग करू लागली, पण शापामुळे ती स्वतःहून त्याला साद घालू शकत नव्हती.
जेव्हा नार्सिसने विचारले, “इथे कोणी आहे का? ” तेव्हा इको फक्त शेवटचा शब्द बोलू शकली, “आहे का? ” नार्सिसने तिला बाहेर येण्यास सांगितले, पण जेव्हा ती त्याच्या समोर गेली आणि तिने त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गर्विष्ठ नार्सिसने तिचा धिक्कार केला आणि तिला तिथून निघून जाण्यास सांगितले.
या गोष्टीचा बिचाऱ्या इकोच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. आतापर्यंत असा अनुभव तिला कधी आला नव्हता. तिला काही सुचेना. ती शोकमग्न झाली आणि एका गुहेत जाऊन बसली. तिने खाणे-पिणे सोडले. हळूहळू तिचे शरीर नष्ट होत गेले आणि उरला फक्त तिचा आवाज! त्यालाच आपण इको (Echo) म्हणतो. पर्वतावरील दऱ्याखोऱ्यातून हा आवाज आपल्याकडे परत येतो.
परंतु यामुळे नेमेसिस ही सुडाची देवता संतापली तिने नार्सिसला शाप दिला. ” तू ज्या व्यक्तीवर प्रेम करशील ती व्यक्ती तुला कधीच प्राप्त होणार नाही. ” नार्सिस तळ्याच्या काठी बसला होता. तळ्यातील स्वच्छ पाण्यात त्याचे सुंदर प्रतिबिंब पडले होते तो स्वतःच्या प्रतिबिंबावर इतका मोहित झाला की ते प्रतिबिंब आपले स्वतःचेच आहे हे त्याच्या लक्षातही आले नाही आणि ती व्यक्ती (म्हणजे प्रतिबिंबातील) आपल्याला मिळावी अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. परंतु तो आपल्या जागीच स्थिर झाला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. काही लोकांच्या मते त्याने आपले प्राण त्यागले. त्याचा ज्या जागी मृत्यू झाला त्या जागी सुंदर डॅफोडील्सची सुंदर फुले उमलली. सौंदर्याचा गर्व शेवटी निसर्गात विलीन होतो असेच यातून सूचित होते.
या पुराणकथेतील देवांचा राजा झ्युस याचे आपल्या पुराणकथेतील स्वर्गाचा राजा इंद्र याच्याशी साम्य दिसते. इंद्र नेहमी असाच भोगविलासात मग्न असलेला दिसतो. झ्युस ची पत्नी हेरा आणि इंद्राची पत्नी शचि यांच्यातही साम्य वाटते. दोन्हीही पतिव्रता आणि शाप देण्याचे सामर्थ्य असलेल्या आहेत.
परंतु नार्सिस आणि इको यांची कथा आपल्याला खूप काही शिकवून जाणारी आहे. नार्सिस म्हणजे स्वमग्न असणाऱ्या व्यक्तींचा प्रतिनिधी! अशा माणसांना स्वतः खेरीज दुसरे काही सुचत नाही इतरांना ते महत्त्वच देत नाहीत. मी आणि माझं याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत. त्यांच वर्तुळ मर्यादित असतं. त्यातून अहंकार जन्माला येतो मग तो अहंकार रूपाचा, सत्तेचा, पैशाचा किंवा आणखी कशाचाही असू शकतो. या अहंकारापोटी ही माणसे दुसऱ्याला तुच्छ समजू लागतात. नार्सिसला स्वतः पलीकडे काही दिसत नव्हते. प्रेमाने जवळ आलेल्या इकोला त्याने दूर लोटले. अशी माणसे शेवटी स्वतःचाच नाश करून घेतात. आपल्याकडील रावणाची कथा अशीच आहे. त्याला स्वतःच्या शक्तीचा सामर्थ्याचा केवढा अहंकार झाला होता! मी सर्व शक्तिमान आहे. माझ्या विरोधात कोणीच लढू शकत नाही असा गर्व त्याला झाला होता. प्रत्यक्ष भगवान शंकरांना देखील आव्हान देण्याचा प्रयत्न त्याने केला होता. या अहंकारातूनच त्याचे हातून चुका घडत गेल्या. विद्वान आणि सगळे काही जाणत असूनही त्याने नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. प्रभू रामचंद्रांना तो एक तुच्छ मानव समजत होता. त्यांच्या हातूनच त्याचा अंत झाला.
अशी अनेक उदाहरणे आजही बघायला मिळतात. जी माणसे स्वतःतून बाहेर पडू शकत नाही आणि इतरांसाठी ज्यांना काही करता येत नाही अशी माणसे स्वतःच अडकून बसतात आणि त्यांची पुढची प्रगती थांबते, विकास थांबतो. इको म्हणजे प्रतिध्वनी! तिचे पुराणकथेतील पात्र प्रतीकात्मक घ्यायला हवे. हे पात्र कर्माचा सिद्धांत सांगते. जसा प्रतिध्वनी आपल्याकडे परत येतो तसे आपण जसे कर्म करू तसे ते आपल्याकडे परत येते. इको स्वतःचे अस्तित्व हरवून बसली. स्वतःचे कर्तव्य विसरली. जी व्यक्ती स्वतःचे अस्तित्व हरवून बसते, आपले कर्तव्य विसरते, तिचा देखील इकोसारखाच विनाश होतो. या सगळ्या व्यक्तिरेखा पौराणिक असतीलही परंतु त्या आपल्याला खूप काही सांगून जातात.
नार्सिससारखी प्रवृत्ती असणे म्हणजे नार्सिसिझम. आजच्या सोशल मीडियाचा प्रभाव असणाऱ्या काळात खूप लोक स्वतःच्या प्रतिमेत अडकलेले दिसतात. वारंवार स्वतःची सेल्फी घेणे, स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे, स्वतःला मिळालेले लाईक यामध्ये समाधान मानणे यातच ते अडकलेले दिसतात. रस्त्यावर एखादा अपघात झालेला असेल तर त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी ते त्याचा व्हिडिओ बनवणे किंवा रील तयार करणे यात मग्न दिसतील. मग तो सोशल मीडियावर टाकून आपल्याला किती लाइक्स मिळतात यावर समाधान मानतील. अशा व्यक्तींना इतरांनी मदतीसाठी पसरलेले हात दिसत नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नार्सिसिझम हा एक असा तुरुंग आहे ज्याच्या भिंती आरशांनी बनलेल्या असतात. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो आरसा फोडून समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे, प्रसंगी आपले दुःख बाजूला ठेवून इतरांना मदत करणे. मी ऐवजी आपण सर्व अशी भावना ठेवणे, आभासी जगाऐवजी वास्तवाचे भान ठेवणे, इतरांना निरपेक्ष भावनेने मदत करणे, इतरांबद्दल कृतज्ञता बाळगणे यासारख्या अनेक गोष्टी करता येतील.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




