श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
तत्तु विषयत्यागात्संगत्यागाच्च ॥३५॥
अर्थ : भगवंताला प्राप्त करायचे जे मार्ग आहेत, त्यांचे आचरण करताना काही नियम पाळले पाहिजेत. विषय आणि संग यांचा त्याग करता आला पाहिजे.
विवेचन : अध्यात्ममार्गात, भक्तीपंथात प्रगती साधण्यासाठी मुमुक्षाला आपले मन, तन, चित्त शुद्ध करणे अनिवार्य ठरते. मन शुद्ध केल्याशिवाय साधकाची अध्यात्मातील प्रगती होऊच शकत नाही. साधकाचा ‘मन ते अमन’ असा प्रवास असतो. संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग आपल्याला खूप काही सांगून जातो.
*नाही निर्मळ जीवन । काय करील साबण॥ १ ॥ तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥२॥ वृक्ष न धरी पुष्पफळ। काय करील वसंत काळ ॥ ३ ॥ वांजे न होती लेकुरे । काय करावे भ्रतारे ॥ ४ ॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाईल त्यासी ॥ ५ ॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥ तुका म्हणे जीवने विण । पिक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥*
ज्याला परमेश्वराची प्राप्ती करवून घ्यायची आहे त्याने अनेक पथ्ये पाळण्याची गरज असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, *”जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणें पथ्ये सांभाळावी”*. अर्थात हा नियम दैनंदिन व्यवहारात देखील पाळावा लागतो. ज्या कार्यालयात आपण नोकरी करतो, तेथील नियम आणि अटी मनुष्याला कधी नाईलाजाने तर कधी आवडीने पाळाव्याच लागतात आणि इथे तर साक्षात भगवंताची चाकरी आहे तर मग नियम अधिक कठोर असणार आणि लबाडी चालणे शक्यच नाही. सर्व संत असे सांगतात की देव कुठे बाहेर भेटत नाही तर तो आपल्या अंतरंगात असतोच, फक्त मन आणि शरीर शुद्ध झाले की तो प्रगट होतो, साधकाला त्याची प्रचिती येत असते.
आपण कुठे बाहेरगावी फिरावयास गेलो तर आपल्या आवडीचे आणि खिशाला परवडेल असे राहण्याचे ठिकाण शोधतो. इथे तर साक्षात भगवंत राहायला येणार असेल (अंतरंगात प्रकट होणार! ) तर आपले शरीर आणि मन त्याला आवडेल असे ठेवायला नको का? समजा तसे ते नसेल तर तो एखादवेळेस येईल पण कायम राहील याची शाश्वती कोण देणार? म्हणून साधकाने आपले आचार, विचार आणि आहार अतिशय शुद्ध ठेवायला हवा. शरीर शुद्ध राहण्यासाठी साधकाने योग्य तितका व्यायाम नियमितपणे करावा तसेच सात्विक आहार घ्यावा. आहार पचायला हलका असावा, तसेच चवीला तीव्र नसावा. पोट भरेल आणि सुस्ती येणार नाही याची काळजी साधकाने जरूर घ्यावी. *वाढत्या वयाबरोबर जिभेची चव आणि पोटाची भूक कमी व्हावी तसेच जिभेलाही थोडा आराम द्यावा. पचनसंस्थेस आराम मिळावा म्हणून साधकाने महिन्यातून किमान दोनदा किंवा जास्तीतजास्त चार दिवस उपवास करावा* (निराहार राहावे). *”एकादशी आणि दुप्पट खाशी”* असे होऊ नये. अतिउपवास केल्यामुळे नैसर्गिक भूक मरते आणि शरीरात विकृती निर्माण होतात, असे पू. बाबा आपल्याला सांगतात. आहारावर नियंत्रण आले की झोपेवर नियंत्रण मिळविणे सोपे होते.
*”ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला”* असे म्हणतात ते याचसाठी.
संग म्हणजे मिठी मारणे. साधकाने कोणाला मिठी मारावी अथवा मिठीत घ्यावे याचे नियम आहेत. (मिठी या शब्दाचा अर्थ संगत असा आहे) सर्व संत सांगतात की सत्संग करावा. अर्थात सत् म्हणजे चांगल्या गोष्टींचा संग. इथे चांगल्या म्हणजे ज्या देवाकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा संग. देहाकडे नेणाऱ्या गोष्टींचा संग त्यागण्यास सांगितले आहे.
दुधात किंचित मीठ पडले तरी पिंप भरून असलेले दूध नासते, पण त्यात किंचित साखर पडली तर ते दूध नासत नाही तर त्याची गोडी साखरेच्या प्रमाणात वाढते आणि त्यापासून अधिकाधिक रुचकर अशी मिठाई तयार होऊ शकते.
सर्व संत सांगतात की मनुष्याला भव रोग झाला आहे. आणि हा रोग सर्वांना झाल्याने त्या रोगाचे नाव रोगांच्या पुस्तकातून काढून टाकले गेले आहे. भवरोग दूर करण्याचे प्रभावी औषध एकच आहे, ते म्हणजे भक्तीमार्ग. आपण भक्तिमार्गापासून दूर जाणार नाही यासाठी जे काही करावे लागेल ते साधकाने करावे असे नारद मुनी या सूत्रातून सांगत आहेत.
विषयत्यागाने भक्ती का भक्तीने विषयत्याग? भक्ती करिता विषयत्याग हे साधन व विषय त्यागाकरिता भक्ती हे साधन मानले तर अन्योन्याश्रय दोष येतो. याचे थोडक्यात उत्तर हे की, नारदांनी सांगितल्याप्रमाणे प्रथमतः विवेकाने विषयत्याग व संगत्याग हळूहळू करण्याचा प्रयत्न करावा. हा करीत करीत भगवद्भक्तीकडे मन वळवीत जावे. ते जसे जसे वळेल व ती गोडी लागेल तसा तसा सवासना विषयत्याग पूर्णरूपाने होईल. हेच सांगण्याकरिता पुढील छत्तिसाव्या सूत्राची रचना केली आहे. विषयत्यागास विवेक-वैरागादि साधने सांगितली आहेत. पण तीही कठीणच आहेत. त्यातही अनेक विघ्ने येत असतातच. ज्यांना ते शक्य आहे असे वाटते त्यानी आत्मविश्वासपूर्वक त्या साधनाचा अवलंब करावा पण ज्यांना अशक्य किंवा कठीण वाटेल त्यांच्याकरिता भक्तिसाधनाचा मार्ग बंद नाही. याकरिता पुढील सूत्रात आणखी एक महत्त्वाचे साधन सांगितले आहे.
माझी सध्याची स्थिती खालील प्रमाणे आहे. ती नित्य तशीच रहावी असा आशीर्वाद आपल्या सारख्या रामस्वरूप वाचकांनी मला द्यावा अशी नम्र विनंती करतो.
*” संतांची उच्छिष्टें। बोलतों उत्तरे।*
*काय म्यां पामरें। जाणावें हें।।”*
– *संत तुकाराम महाराज*
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. ६
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






