श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४७ आणि ४८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ४७ – – –
मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे|
जनी जाणता भक्त होऊनि राहे|
गुणीं प्रीति राखे क्रमूं साधनाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |४७|
अर्थ : ज्या साधकाला आपल्या देहाच्या आत आणि बाहेर एकमात्र भगवंतच दिसतो, जो जाणता म्हणजे ज्ञानी भक्त म्हणून जगात वावरतो, जो सगुणाचे प्रेम टिकवतो आणि साधनेचा क्रम कायम राखतो असा भक्त म्हणजे सर्वोत्तमाचा (भगवंताचा)दास हा खरोखरीच जगात धन्य होय.
विवेचन : या ४७ व्या श्लोकापासून ते ५६ व्या श्लोकापर्यंत जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे अंतिम चरण आहे. यात समर्थ ज्ञानी साधकाचे किंवा भक्ताचे गुण सांगतात.
या श्लोकाच्या पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात, ” मनी लोचनी श्रीहरी तो चि पाहे” यामध्ये जो परमेश्वराचा भक्त असतो तो मनात आणि लोचनात म्हणजे डोळ्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहतो. इथे दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मनामध्ये त्याचे निर्गुण रूप असते आणि नेत्रांना म्हणजेच बाह्य जगतात त्याचे दृश्य रूप किंवा सगुण रूपाचे दर्शन होते. तात्पर्य म्हणजे आत बाहेर सर्वत्र त्याला परमेश्वराचेच दर्शन होत असते. भक्त हा शब्द जर आपण पाहिला तर जो परमेश्वराशी जोडलेला आहे तो भक्त. विभक्त म्हणजे वेगळा. जो परमेश्वराशी जोडलेला नसतो तो भक्त कसा असेल ?
खऱ्या भक्ताला देव सर्वत्र दिसतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी. प्राणीमात्रात सर्वत्र तोच भरलेला आहे. त्याची दृष्टी सम होते. मग भेद राहत नाही. जो आपल्या अंतरात आहे तोच बाहेर देखील आहे हे त्याला लक्षात येते. मग द्वैत राहत नाही. तो अद्वैताचाच एक भाग होतो. तो परमेश्वराशी तदाकार होतो. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे त्याला सांगण्याची आवश्यकता राहत नाही. तरी देखील जेव्हा कधी तो सगुण मूर्तीचे दर्शन घेतो, तेव्हा देखील तो परमेश्वराच्या दर्शनाने भाव विभोर होतो. त्याचे नेत्र पाणावतात.
समर्थांनी “मनी लोचनी तो चि पाहे” असे जे म्हटले आहे, त्यातील “चि “म्हणजेच तोच परमेश्वर त्याला सर्वत्र दिसतो. जसा तो भक्त प्रल्हादाला दिसत होता. आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीला निर्जीव दिसणाऱ्या खांबामध्येही प्रल्हादाला परमेश्वराचे अस्तित्व दिसत होते.
खऱ्या भक्ताच्या डोळ्यासमोर परमेश्वराची सगुण मूर्ती नसली तरी काही बिघडत नाही. त्याच्या अंतर्यामी ती मूर्ती ठसलेली असते. सगुण निर्गुणाने त्याला काही फरक पडत नाही. “सगुण निर्गुण एकू गोविंदु रे “. अशी त्याची अवस्था असते. त्याला परमेश्वराचे अस्तित्व सर्वत्र जाणवते. अशा भक्ताला समर्थ ज्ञानी भक्त म्हणतात. भक्तीतून ज्ञान होते पण ज्ञान झाल्यानंतरही भक्ती संपत नाही. असा भक्त हा ज्ञानी भक्त असतो.
पण ज्ञानी भक्त म्हणजे भोळा भक्त नव्हे. हा फरक आपण समजून घ्यायला हवा. आपला असा सोयीस्कर समज असतो की भक्त हा भोळा असतो, त्याला व्यवहार कळत नाही. काही लोक अशा लोकांना मूर्ख किंवा बावळट देखील समजतात. परंतु ज्ञानी भक्ताचे असे वागणे समर्थांना अपेक्षित नाही. त्यांच्या दृष्टीने चातुर्य अखंड सावधानता हे मोठे गुण आहेत. त्यांना अपेक्षित असलेला ज्ञानी भक्त व्यवहारात देखील चातुर्याने वागतो. तो लबाडी करत नाही, तो स्वार्थी नसतो परंतु लोकांकडून फसवला जाईल एवढाही भोळा नसतो.
तिसऱ्या ओळीचा अर्थ पाहूया. तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात गुणी प्रीती राखे क्रमूं साधनाचा. ” ही खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत. परमेश्वराचे जे गुण आहेत की तो सर्वव्यापी आहे, शरणागताला आश्रय देणारा आहे, यासारख्या त्याच्या अनेक गुणां प्रति भक्ताची प्रीती म्हणजे प्रेम असते. परमेश्वराच्या गुणांवरच ज्याची प्रीती नाही, तो परमेश्वरावर प्रेम कसे काय करू शकेल ? असा भक्त साधनेचा क्रम देखील पाळत असतो म्हणजे जिवापाड जपत असतो. साधनेचा क्रम याचा अर्थ भक्त हा पायरीपायरीने परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो ते. उदा. परमेश्वराच्या नामाचे स्मरण, मनन, सदैव त्याचे चिंतन आणि मग पुढे त्याच्याशीच तो एकरूप होऊन जातो. या सगळ्या विविध पायऱ्या आहेत. या ओळीतील राखे हा शब्द गुणांबद्दल प्रीती राखणे आणि साधनेचा क्रम राखणे या दोन्हींसाठी लागू पडतो.
चौथ्या ओळीत समर्थ अशा भक्ताबद्दल म्हणतात, ” जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ” सर्वोत्तम म्हणजे सर्वात उत्तम !कोण बरं असेल मग ? तर एक परमेश्वरच सर्वोत्तम आहे आणि अशा या सर्वोत्तमाचा दास होण्यामध्ये जी धन्यता आहे ती अन्य कशातच नाही. म्हणून अशा सर्वोत्तम असलेल्या परमेश्वराचा भक्त खरोखरच धन्य असतो. तसाच भक्त होण्याचा प्रयत्न आपणही करावा हेच समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद (नवीन) ::
१) माझ्या दृष्टीत “समदृष्टी” आहे का – माझ्या भोवतालच्या माणसांमध्ये, निसर्गात मला परमेश्वर दिसतो का ?
२) मी “ज्ञानी भक्त” आहे की “भोळा भक्त” – व्यवहारात चातुर्य राखून भक्ती करण्याचा माझा प्रयत्न आहे का ?
३) माझ्या साधनेचा “क्रम” आहे का – नामस्मरण, मनन, चिंतन या पायऱ्या मी नियमितपणे पाळतो का ?
– – – –
श्लोक क्र. ४८ – –
सदा देवकाजी झीजे देह ज्याचा |
सदा रामनामे वदे नित्य वाचा |
स्वधर्मेचीं चाले सदा उत्तमाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४८|
अर्थ : जो भक्त केवळ परमेश्वराच्या कार्यासाठीच आपला देह झिजवतो, ज्याच्या मुखात अखंड रामनाम आहे आणि स्वधर्माच्या म्हणजे आपल्या कर्तव्याच्या मार्गावर जो उत्तम रीतीने वाटचाल करतो तो भक्त म्हणजे सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.
विवेचन : देवकाज म्हणजे देवाचे कार्य. खरा भक्त नित्य परमेश्वराचेच काम करीत असतो. तो दोन प्रकारे कार्य करतो. स्वतः परमेश्वराचे नामस्मरण तर करतोच परंतु इतरांनाही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने वळवतो. सगळ्या संतांनी हेच परमेश्वराचे कार्य केले आहे. स्वतः नाम घेता घेता त्यांनी इतरांनाही नामाला लावले आहे. मग असा भक्त कोणतेही काम करीत असेल तर ते भगवंताचेच कार्य असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात अखंड रामनाम घेतले परंतु ही करीत असताना त्यांनी हजारो भक्तांना रामनामाची गोडी लावली. स्वतः समर्थ रामदास यांनी रामनामाचे आणि गायत्री मंत्राचे अखंड पुरश्चरण केले. स्वतः अकरा मारुतींची स्थापना केली आणि गावोगाव श्रीराम आणि मारुतीची मंदिरे निर्माण करवली. मठ उभारून महंत घडवले. हे सगळे भगवंताचेच कार्य त्यांच्या हातून झाले. त्या कार्यातच त्यांचा देह झिजला.
भगवंताचे कार्य करायचे म्हणजे केवळ नामस्मरणच केले पाहिजे असे काही नाही. रंजल्या गांजल्यांची, दीनदुबळ्यांची, प्राणीमात्रांची सेवा म्हणजे ईश्वर सेवाच आहे. ते देखील भगवंताचे कार्य आहे असे म्हणता येईल.
भक्ताने नेहमी ईश्वरसन्मुख राहिले पाहिजे. तसे राहण्यासाठी भगवंताचे नाम अखंड त्याच्या मुखात आले पाहिजे. ज्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड असते असा भक्त धन्य होय. व्यवहारांमध्ये बोलताना भलेही त्याला लोकरीतीनुसार व्यवहार करावा लागेल. परंतु अंतरातील भगवंताचे चिंतन अखंड सुरूच राहते.
तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात, “स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा” म्हणजे आपल्या वाट्याला आलेले काम तोच आपला स्वधर्म समजून जो उत्तम प्रकारे करतो तो भक्त धन्य होय. बऱ्याच वेळा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सर्व त्यावरील कलाकार आहोत असे म्हटले जाते. आपल्या वाट्याला जी भूमिका आली असेल ती उत्तम प्रकारे करणे हे आपले काम आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तोच आपला स्वधर्म आहे तो आपल्याला उत्तम रीतीने निभवता आला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागी ।।
त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा अतिशय प्रिय आहे. म्हणजेच आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडणे हे त्याला आवडते. मग तुम्ही मंदिरात किंवा तीर्थयात्रेला गेला काय आणि नाही गेलात तरी चालू शकते. प्रत्येकाने आपले काम जर उत्तम प्रकारे केले तर हीच त्या परमेश्वराची अतिशय चांगल्या प्रकारे पूजा आपण बांधली असे होईल. मग जगामध्ये आपोआपच सज्जनांची मांदियाळी तयार होईल आणि सगळे सुखी होतील. तेव्हाच ऋषींनी सांगितलेले अस्तित्वात येईल
सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः॥
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥
– – सर्व सुखी होतील सर्वांना आरोग्य लाभेल. अर्थात प्रत्येकाने आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले तर…
– – आणि असे वागणारा भक्त जगामध्ये धन्य होईल. भगवंताच्या उत्कृष्ट भक्तांमध्ये त्याची गणना होईल.
स्वसंवाद ::
१) माझ्या दैनंदिन कामात मी “देवकाज” पाहतो का – माझे काम म्हणजे परमेश्वराची सेवा आहे असा भाव माझ्या मनात असतो का ?
२) “स्वधर्म” म्हणजे माझ्या वाट्याला आलेली भूमिका – ती मी उत्तम प्रकारे निभावतो का की इतरांच्या भूमिकेकडे माझे लक्ष जास्त असते ?
३) माझ्या नामस्मरणाने किंवा वागण्याने इतर कोणाला परमेश्वराकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे का ?
– क्रमशः श्लोक ४७ आणि ४८.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






