श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ स्वामी विवेकानंद म्हणतात… – लेखक: स्वामी विवेकानंद ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)
☆
धर्मसंबंधीच्या सर्व संकुचित, मर्यादित, कलहप्रसू, आक्रमक कल्पना आता लयास जावयास हव्यात. धर्मसंबंधीच्या साऱ्या पंथनिष्ठ, जमातनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ कल्पना टाकून द्यावयास हव्यात. प्रत्येक जाती-जमातीचा फक्त स्वतःचा असा एकेक विशिष्ट देव असावा आणि स्वतःखेरीज इतर सगळ्यांचा देव खोटा आहे असे प्रत्येकाने मानीत असावे ही भ्रामक, वेडगळ समजूत आता भूतकाळात जमा व्हावयास हवी. असल्या सगळ्या कल्पनांचा सपशेल त्याग करावयास हवा.
धर्मांनी समावेशक वृत्ती धारण केली पाहिजे, ईश्वरविषयीच्या त्यांच्या विशिष्ट कल्पना इतरांहून वेगळ्या आहेत एव्हढ्याचसाठी त्यांनी तिरस्काराने एकमेकांना तुच्छ न लेखले पाहिजे. मी आपल्या आयुष्यात अशी कितीतरी धार्मिक माणसे पाहिली आहेत, अशी समंजस माणसे पाहिली आहेत की ज्यांचा ईश्वरावर, आपण त्या शब्दाचा जो अर्थ करतो त्या अर्थाने मुळीही विश्वास नाही. कदाचित तुम्हा-आम्हाला कधी कळू शकला असेल त्यापेक्षा कितीतरी चांगल्या रीतीने ईश्वर त्यांना कळला आहे.
धर्मांनी, त्यांच्या ठायी प्रचंड शक्ती वसत असल्यामुळे, जगाचे भले करण्यापेक्षा त्याचे नुकसानच जास्त केले आहे, आणि असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा संकुचितपणा आणि विशिष्ट सीमांमध्येच घुटमळत राहण्याची त्यांची प्रवृत्ती.
– स्वामी विवेकानंद (पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)
☆
लेखक: स्वामी विवेकानंद
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






