श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ एका म्हातारीची गोष्ट… – लेखक : बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

“एक म्हातारी होती. ती झोपडीत राहत असे. ती अत्यंत गरीब होती. तिच्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचे झाड होते. त्या झाडाचे आंबे विकून ती आपले पोट भागवत असे; परंतु तिथले शेजारी तिचे आंबे चोरायला लागले. ती आणखी गरीब झाली. एके दिवशी एक साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला- म्हातारे मी भुकेला आहे, मला काहीतरी खायला दे. म्हातारी म्हणाली मी गरीब आहे. माझ्याकडे एकच भाकरी आहे; पण त्यातली अर्धी तुला देते. साधूने अर्धी भाकरी खाल्ली, पाणी प्यायला आणि प्रसन्न झाला. तो तिला म्हणाला. “म्हातारे तू गरीब असशील, परंतु तुला खरी माणुसकी आहे. तू अर्धी भाकर दिलीस – मी प्रसन्न आहे. कोणताही वर माग. म्हातारी म्हणाली, “मला असा वर दे की माझे शेजारी आंबे चोरायला आले आणि त्यांनी झाडाला हात लावला रे लावला की ते झाडाला चिकटून लटकत रहातील आणि माझ्या संमतीशिवाय ते सुटणारच नाहीत.” साधू म्हणाला ‘तथास्तु!’ दुसऱ्या दिवशी तिला सकाळी आठ-दहा शेजारी आंब्याला चिकटलेले दिसले. सर्व ओरडत होते, “म्हातारे सोडव!, म्हातारे सोडव! झाडाला पुन्हा हात लावणार नाही. आम्हाला क्षमा कर.” असे त्यांनी कबूल केल्यावर म्हातारीने त्यांना सोडून दिले.

आणखी काही वर्षे गेली. म्हातारी आणखी म्हातारी झाली. तिच्या मृत्यूची वेळ आली. तिच्या मरणाचा दिवस आला आणि तिला न्यायला यमराज आले. ती यमराजाला म्हणाली, मला आणखी काही वर्षे जगू द्या. यमराज म्हणाले, “नाही, ते शक्य नाही कारण तुझ्या कपाळावर मरीआईने आजचा दिवस मरणाचा लिहिला आहे. त्यामुळे तुला आजच न्यावे लागेल. परंतु तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.” म्हातारी म्हणाली, “माझ्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. मरणापूर्वी त्याचा एक आंबा मला खावासा वाटतो आहे.” आंबा आणायला यमराज स्वतः झाडाजवळ गेले. झाडाला स्पर्श केल्याबरोबर यमराज झाडाला चिकटले आणि ओरडू लागले, “म्हातारे सोडव, म्हातारे सोडव” म्हातारी म्हणाली, “एका अटीवर सोडवीन. मी स्वतः इच्छा करेन, त्याच वेळी मरेन. मला इच्छामरणी करशील तर तुला  सोडवेन.” यमराज म्हणाले. “तथास्तु!” त्यामुळे ती म्हातारी अजून जिवंत आहे आणि ती कधीच मरणार नाही. तिचे नांव आहे :

भारतीय लोकशाही !!

“संसदमार्ग – लोकशाहीचा राजमार्ग “ : पुस्तकातून साभार.

लेखक : बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments