श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ६४ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- बँकेत जायला बाहेर पडलो तरी मनात गर्दी होती ती त्या मूर्तीच्या बाबतीतल्या असंख्य विचारांचीच आणि त्या विचारांना लगडलेले होते तारामावशीच्या संदर्भातले महत्त्वाचे धागेदोरे..! )
खरंतर मी आधी म्हटलं तसं बाबांनी मला पंचवीस वर्षांपूर्वी आशीर्वाद म्हणून दिलेल्या फोटोचे हे हुबेहूब मूर्तीरूप नेमक्या वेळी आश्चर्यकारक अशा योगायोगाने मला मिळणे हा माझ्यासाठी एक चमत्कारच होता. त्यामुळेच तो चमत्कार नेमका कसा घडला याबाबतचे औत्सुक्य माझ्या मनात निर्माण होणं सहाजिकच होतं. आणि त्या औत्सुक्यपूर्तीसाठीचा एक महत्त्वाचा धागा जाऊन पोचत होता तो अर्थातच माझ्या तारामावशीपर्यंत. तिला समक्ष भेटून तिच्याशी सविस्तर बोलणं हाच त्यासाठी एकमेव मार्ग होता. कारण त्याकाळी मोबाईलच काय घरोघरी टेलिफोनही नव्हते. पत्रोपत्री याबाबत चर्चा करणे संयुक्तिक नव्हते आणि तातडीने मुंबईला जाऊन तिची समक्ष भेट घेऊन तिच्याशी बोलणे माझ्या बदलीनंतरच्या प्रचंड व्यस्ततेत लगेच शक्य होणार नव्हते. त्यामुळे एकदा नवीन रुटीन सुरळीत सुरू झालं कीं जास्तीत जास्त लवकर मुंबईला जाऊन तिची भेट घ्यायची असं ठरवून नाईलाजाने मी मनातला तो कप्पा कांही काळाकरता बंद करून ठेवला. ही तारामावशी म्हणजे माझ्या आईची मामेबहीण. पूर्वीच्या काळी आत्ते-चुलत, मामे-मावस भावंडं ही नाती खूप जवळची तर असतच आणि ती जाणीवपूर्वक जपलीही जात. त्यामुळे अशा नात्यांमधले बंधही अतिशय घट्ट, अतूट असायचे. नोकरी निमित्ताने माझं सुरुवातीचं जवळजवळ तीन वर्षांचं वास्तव्य मुंबईत असल्यामुळे मुंबईतल्या ह्या सगळ्या नातेवाईकांबरोबर वरचेवर होणाऱ्या भेटींमुळे माझेही जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले होतेच. माझ्या या
तारामावशीचं संपूर्ण कुटुंबच अगत्यशील आणि आपुलकी जपणारं होतं. त्यामुळे त्यांच्याशी झालेल्या माझ्या पहिल्या भेटीतच मनातलं परकेपण विरून गेलं होतं. ती, तिचे यजमान आणि दोन मुली असं ते भिडे कुटुंब. माझ्या सख्ख्या मावशीच्या घराइतकंच डोंबिवलीतलं माझं तितकंच जवळचं विसाव्याचं ठिकाण म्हणजे माझी तारामावशी!
मुंबईहून माझी कोल्हापूरला बदली झाली तेव्हा मला निरोप देताना तारामावशी म्हणाली होती, “कोल्हापूर म्हणजे आमच्या वाटेवरचंच की रे. वर्षातून एकदा ग्रामदेवतेच्या उत्सवाला आम्हा दोघांचं संगमेश्वरला जाणं होत असतंच. त्यामुळे व्हाया कोल्हापूर जाऊन तुझ्याकडे मी नक्की येणार बघ. “
मी तिला कोल्हापूरला येण्याचा आग्रह केला तेव्हा तिने मला दिलेलं हे आश्वासन!
पुढे यथावकाश माझं कोल्हापूरला बस्तान बसलं, माझं लग्न होऊन संसार सुरू झाला. नंतरच्या रूटीनमधे माझं मुंबईला जाणं फारसं झालंच नाही आणि मावशीनं माझ्याकडे येण्याचा योगही बरीच वर्षं होऊनही कधी आलाच नाही. आमच्यातला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी मात्र टिकून राहिली होती ती माझ्या आईमुळे. माझी आई मुंबईतले आमचे नातेवाईक आणि आम्ही भावंडे यांच्यातला एक दूवा असायची. कारण नातेवाईकांकडील कार्याच्या निमित्ताने किंवा इतर कारणपरत्वे आईचं वर्ष दीड वर्षातून एकदा तरी मुंबईला जाणं, सर्वांना भेटणं व्हायचंच. त्यावेळी घरच्या सगळ्यांची ख्यालीखुशाली परस्परांना समजायची.
मधे अशीच कांही वर्षे उलटून गेल्यानंतर एक दिवस अचानक दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडले तर दारात एक अनोळखी, वयस्कर बाई उभ्या. त्या तारामावशीचा निरोप घेऊन आल्या होत्या ते आम्ही घरी आहोत कां हे पहायला!
आयुष्यात अगदी अनपेक्षितपणे योगायोगाने घडणाऱ्या अशासारख्या गोष्टी पुढे घडू पहाणाऱ्या कांही महत्त्वपूर्ण घटनांचा पट तयार करणारे महत्त्वाचे धागेदोरेच असतात यातलं तथ्य भूतकाळाकडे तटस्थपणे पहाताना आज प्रकर्षाने जाणवतं!
तारामावशीचं माहेर मुंबईतलं ग्रॅंटरोडचं. लग्नानंतर कोल्हापूरच्या सासरी येऊन इथल्याच झालेल्या या वयस्कर बाई म्हणजे तारामावशीची सख्खी बालमैत्रीण! यावर्षी संगमेश्वरच्या उत्सवाला गेलेली मावशी न् तिचे यजमान परतीच्या प्रवासात हिचा खूप दिवसांचा आग्रह म्हणून आदल्या दिवशी आधी तिच्याकडे उतरले होते आणि आजची रात्र आमच्याकडे राहून ते दोघे महालक्ष्मीने उद्या मुंबईला परतणार होते. ऐनवेळी येऊन घर बंद असेल तर अडचण नको म्हणून या बाई आमचा पत्ता घेऊन घर कुठं आहे ते पहायला आल्या होत्या. थोडावेळ बसून, हे सगळं सांगेपर्यंत चहा झाला न् त्या जायला निघाल्या तेव्हा मीही त्यांच्याचबरोबर बाहेर पडून त्यांच्या घरी जाऊन मावशी न् काकांना आमच्याकडे घेऊन आलो.
” इतक्या वर्षांनंतर आज पहिल्यांदा आलायत आणि तेही फक्त एक रात्र रहायला. आलायत तसे थोडे दिवस रहा आता. जायची घाई कशाला? आपण उद्याचं रिझर्व्हेशन कॅन्सल करू. “
” आता आलो कीं नाही? रहायला पुन्हा येऊ. ” भिडेकाका म्हणाले. ” कालपासून हिची तब्येतही थोडी नरम आहे रे. एकदा आपण आपल्या मठीत जाऊन पडावं हे बरं. “
” का गं मावशी? काय होतंय? ” मी विचारलं.
” प्रवासाची दगदग रे. बाकी कांही नाही ” ती हसत म्हणाली. पण ते हसणं नेहमीसारखं प्रसन्न नव्हतं. मला तरी ते कांहीसं मलूलच वाटलं होतं!
त्या रात्री मावशीला खूप ताप भरला. रात्रभर ती जागीच होती. पहाटे आम्ही उठलो तेव्हा काकांनी आम्हाला हांक मारून सांगितलं. थर्मामिटर लावून पाहिलं तर एक पर्यंत ताप. कधी नव्हे ते माझ्याकडे आलेल्या त्या दोघांनी चार दिवस रहावं, आराम करावा, असं मला मनापासून वाटलं होतं, पण ते असं विचित्रपणे खरं ठरलं होतं..! सकाळी स्टेशनवर जाऊन आम्ही त्यांची रिझर्वेशन्स कॅन्सल केली. घराजवळच डाॅ. नाबर या आमच्या फॅमिली डाॅक्टरांचं क्लिनिक होतं. त्यांना दाखवलं. तो प्रवासाच्या दगदगीने आलेला साधा ताप नव्हता. विषमज्वराचं निदान झालं. त्यामुळे आता इथं आराम करणंच आवश्यक होतं. योग्य ट्रीटमेंट आणि पथ्यपाणी यामुळे लवकर गुण आला. दोन्ही मुली आणि जावई तातडीने येऊन त्या दोघांना मुंबईला घेऊन जाऊ म्हणत होते. पण अशक्तपणामुळे ताप उलटण्याची शक्यता गृहित धरून आम्ही आग्रहाने त्यांना त्यापासून परावृत्त केले. मावशीला तर इतके दिवस इथं असं पडून रहाणं जीवावर आलं होतं.
” हे बघ, नेहमी वाईटातून चांगलं शोधायचं असं तूच म्हणतेस ना? इथं कुणा परक्याच्या घरी आहेस कां तू? छान आराम कर. अशक्तपणा कमी झाला, डाॅक्टरनी परवानगी दिली की मगच मुंबई. ” आम्ही दोघांनीही तिला समजावलं.
योग्यवेळी तिची मुलगी न् जावई त्या दोघांना घेऊन गेले. आयुष्यात अशा सगळ्याच घटना, प्रसंग सहजपणे, अगदी योगायोगानेच घडल्यात असं त्या त्यावेळी वाटतं खरं पण त्यामागेही नेमका असा कार्यकारणभाव असतोच याची हा प्रसंगही प्रचीति देणाराच तर ठरणार होता. कारण हाच प्रसंग पुढे भविष्यकाळांत येणार असलेल्या एका अनोळखी वळणावर मला शुभसंकेत देणाऱ्या कलाटणीसाठी योग्य पार्श्वभूमी तयार करणारा महत्त्वपूर्ण दुवा ठरणार होता. फक्त त्याक्षणी मला त्याची कल्पना नव्हती एवढंच!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




