श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – कळेल हे खूण … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

कळेल हे खूण /

तरि दावी नारायण //१//

*

सत्य संतांपाशी राहे /

येरां भय आड आहे//२//

*

अणुचिया ऐसे /

असे भरले प्रकाशें //३//‌

*

इंद्रियांचे धनी /

ते हे जाती समजूनि //४//

*

तर्क कुतर्क वाटा /

नागवे घटापटा //५//

*

तुका म्हणे ल्यावें /

डोळा अंजन बरवे//६//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

आपणास जे कळत नाही, ज्याची उकल होत नाही, काय करावे ते सुचत नाही अशावेळी ते जाणून घेण्यासाठी शांतचित्ताने आपण परमेश्वर चरणी लीन झाल्यावर, त्याची मनोभावे भक्ती केल्यावर परमेश्वर आपणास योग्य तो मार्ग दाखविल. अशावेळी नेमके काय करावे याच्या स्वानुभवाचे खरे सत्य ख-या संताजवळच आहे. इतरांजवळ त्यांचा स्वानुभव नाही. जो संत नाही त्यांच्याकडे भय भ्रमाचा घोटाळच साठलेला आहे. येवढे मात्र नक्की. इथे आपल्या अवतीभवती असणारा अणू रेणू ही परमेश्वरी परमतेजाने आणि प्रखर प्रकाशाने भारावून ठेवलेला आहे. पण ज्यांनी आपल्या इंद्रियांच्या अधीन न होता इंद्रियानाच आपल्या ताब्यात ठेवले आहे, त्यांच्या वर विजय मिळवला आहे असे जे जाणकार आहेत तेच हे सगळे समजून‌ उमजून घेऊन वागतात. व योग्य ते मार्गदर्शन करतात.

पण जे कोणी ही वाट सोडून तर्क कुतर्कांच्या मागे धावतात तेथे सगळ्याच भल्याभल्यांना ही नागवले जाते. फसवले जाते. हे कळण्यासाठी व जाणून घेण्यासाठी आपण आपल्या डोळ्यात भक्तीचे अंजन घालून त्याच्याकडे पाहिले तरच आपल्याला सारे कळून येईल. अन्यथा आपण ही भ्रमातच गुरफटले जाऊ. या अभंगातून तुकाराम महाराजांनी संतसहवासात राहिल्याने आपल्याला काय मिळेल ते स्पष्ट केले आहे. आणि ख-या भक्तीचा अगदी सरळ सोपा मार्ग ही दाखवून दिला आहे. सर्व सामान्य माणसाने याच मार्गाचा अवलंब करून परमेश्वराची भक्ती करावी असे सांगितले आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments