श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी अहमदनगरहून निघताना ” नव्या जागी जाल तेव्हा आधी शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घ्या आणि मगच रूजू व्हा. सगळं छान होईल ” असं काकू म्हणाल्या होत्या. मीही तेच ठरवलं होतं. म्हणूनच काकूंच्या तोंडून गजानन महाराज ‘तथास्तु’ म्हणालेत असंच मला वाटलं होतं!)

‘सगळं छान होईल’ म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय एखादा चमत्कार घडावा तसा अकोला येथील माझ्या अल्प वास्तव्यात मला येणार आहे याची मात्र मला कल्पना नव्हती.

अकोला ब्रॅंचचे माझ्याशी ऋणानुबंध होते जेमतेम सहा महिन्यांचेच. पण माझ्यासाठी हा तोवरच्या प्रदीर्घ बँकिंग करिअरमधला अक्षरशः तारेवरची कसरत वाटावा असाच काळ होता. त्यातला प्रत्येक दिवस माझी कसोटी पहाणारा, अकोल्यातल्या भाजून काढणाऱ्या कडक उन्हासारखे असह्य चटके देणारा, रेंगाळत, माझी गंमत बघत हळूहळू पुढे सरकणारा असाच होता!

मी अहमदनगरहून रिलीव्ह झाल्यानंतर रातोरात अकोल्यासाठी प्रवास सुरू केला होता तो फक्त रोजच्या लागणाऱ्या सामानाची एक मोठी सुटकेस बरोबर घेऊन. बदली झाल्यानंतरच्या नव्या गावी पहिले आठ दिवस आमची सर्व व्यवस्था लाॅजमधे बँकेमार्फतच होत असल्याने तिथे गेल्यानंतर रहाणं, जेवणखाण, चहापाणी हा तातडीचा प्रश्न नव्हता हे खरं, पण पहिल्याच दिवशी ब्रॅंचमधे गेल्यानंतर समजलं कीं तिथे ब्रॅंच मॅनेजर्ससाठी क्वार्टर्सची सुविधा उपलब्ध नाहीय. सुदैवाने ऑडिट डिपार्टमेंटमधे माझ्याबरोबर कांही काळ काम केलेले श्री. देशपांडे पहिल्याच दिवशी मी ब्रॅंचमधून बाहेर पडताना तिथे आले. ते मूळचे अकोल्याचेच आणि मी आजच तिथे रूजू झालोय हे समजल्यामुळे ते मुद्दाम मला भेटायला आलेले होते. त्यांचा अकोल्यातील स्वत:चा फ्लॅट रिकामाच होता. एरवी त्यांनी तो पुढे व्याप नकोत म्हणून कुणालाच भाड्याने दिलेला नव्हता.

” सर, तुम्ही जागेची काळजी करू नका. तुम्ही इथे असेपर्यंत हा फ्लॅट तुमचा. ” ते म्हणाले आणि जागेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच सुटला. त्या परिस्थितीत मला हा एक शुभशकूनच वाटला होता.

तेव्हाच्या मन:स्थितीत पहिल्याच दिवशी घडलेली ही घटना पुढे येणाऱ्या प्रत्येक पावलावरील प्रतिकूल परिस्थितीला हिंमतीने तोंड देण्यासाठी उमेद देणारी ठरली एवढे खरे. दुसरी एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे ब्रॅंचमधला स्टाफ! त्या सर्वांच्या आपुलकीच्या सहकार्यामुळेच मी थोडाफार का होईना बऱ्यापैकी स्थिरस्थावर होण्याची आशा बाळगून होतो.

इतक्या तातडीने माझी अकोल्याला बदली होण्यामागचे कारण सर्वस्वी नकारात्मक होते. आणि तेच माझ्यापुढचं मोठं आव्हान ठरणार होतं. प्रतिकूल हवामान, घरापासूनचं अतिशय दूर आणि तुलनेने बरचसं रूक्ष असं इथलं वातावरण अधिकच असह्य वाटावं इतकी नकारात्मकता माझ्या या बदलीमागच्या कारणामधे ठासून भरलेली होती. ते कारण तसं पाहिलं तर जगावेगळं नव्हतं. अशा घटना तुरळकपणे कां होईना प्रत्येक बँकेत घडत असतातच असंही म्हणता येईल. पण माझ्या दृष्टीने ते समर्थनीय ठरणारं नव्हतं. तो माझ्यासाठी पूर्वी कधीच न अनुभवलेला असा एक कटू अनुभव होता! शेवटी भलीबुरी माणसं सगळीकडे असणारंच. पण माझा हा अनुभव म्हणजे अशा माणसांमुळे एरवी सुरळीत सुरू असणाऱ्या व्यवस्थेवर केवढा प्रचंड ताण येऊ शकतो याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. माझी इथं तात्काळ बदली होण्यामागचं कारणही तसंच गंभीर आणि अचानकच निर्माण झालेलं होतं. अॅडव्हर्स ऑडिट रिपोर्टमुळे अकोला ब्रँचमधील मॅनेजरची लगोलग गच्छंती झालेली होती आणि तिथले पुढचे व्याप निस्तरण्यासाठी माझं तिथं हे पोस्टींग! माझी कसोटी पहाणारं आव्हान होतं ते. त्या कसोटीला उतरणं म्हणजे नेमकं काय काय होतं हे इतक्या वर्षानंतर आज आठवतानाही माझ्या अंगावर सरसरून काटा उभा रहातो!

बँकेच्या कर्ज योजनांमधील मंजूरी आणि वितरणामधे आधीच्या मॅनेजरने दाखवलेली अनावश्यक तत्परता, राहून गेलेल्या त्रुटी आणि त्यामुळे होऊ शकणारे बँकेचे आर्थिक नुकसान हे अॅडव्हर्स ऑडिट रिपोर्टमधले मुख्य आक्षेप. युद्धपातळीवर दखल घ्यायला हवी अशी ती अकरा कर्जखाती होती ज्यामुळे बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान व्हायची शक्यता होती. होऊ शकणाऱ्या या आर्थिक नुकसानीची जबाबदारी कुणाची हे ठरवण्याचं काम वरिष्ठ पातळीवर आधीच सुरू झालेलं होते. कर्ज वसुलीसाठी कायदेशीर कारवाईसह सर्व प्रयत्न तातडीने सुरू करणे ही नवीन मॅनेजर म्हणून माझी जबाबदारी होती. पण हे काम सहजसोपे नव्हते. ब्रॅंच मॅनेजर म्हणून असणाऱ्या इतर जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता हे करणे ही तारेवरची कसरत लगेचच सुरू झाली. रोजचं ब्रॅंचरूटीन आणि दैनंदिन कामांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना या कर्जखात्यांची माझ्या डोक्यावरची टांगती तलवार मला क्षणाचीही उसंत मिळू देत नसे.

त्या सर्व कर्ज फाईल्स बारकाईने अभ्यासण्यासाठी सुरुवातीच्या तीन-चार रात्री मी अक्षरशः जागून काढलेल्या होत्या. सर्व कर्जदारांना दिलेल्या नोटिसा त्यांनी न स्वीकारल्याने परत आलेल्या होत्या, त्यांचे व्यवसाय अस्तित्वात नव्हते, किंबहुना कर्ज वितरणानंतर अल्पकाळातच निर्माण झालेली ही परिस्थिती कर्जरकमेचा जाणीवपूर्वक केलेला दुरूपयोग अधोरेखित करणारीच होती. अशा परिस्थितीत बँकेचे आर्थिक नुकसान टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा सर्व खातेदारांविरुद्ध क्रिमिनल केसेस दाखल करणे हाच होता. आणि वरिष्ठ कार्यालयाने तोच अंमलात आणायचे ठरवले होते. पण माझ्यासाठी ते प्रोसेस योग्यपध्दतीने पूर्ण करणे वाटते तेवढे सोपे नाहीये हे सुरूवातीपासूनच मला पदोपदी जाणवत राहिले. नागपूर आणि पुणे येथील दोन्ही वरिष्ठ कार्यालयांनी युद्ध पातळीवर याचा पाठपुरावा सुरू करून अक्षरशः माझी झोप उडवली होती!

सर्व पातळ्यांवर सुरू असलेले माझे अथक प्रयत्न म्हणजे खरंतर न जिंकता येणारी लढाई लढण्यासारखं होतं, पण मी ती अखेरच्या क्षणापर्यंत लढायची हे मनोमन ठरवून टाकलं. कागदी घोडे नाचवत स्वत:ची कातडी बजावण्यात समाधान मानणं मलाच पटणारं नव्हतं. ही बॅंक आपली अन्नदात्री आहे आणि तिचं नुकसान हे माझंही नुकसान असणार आहे हीच भावना मनात असल्याने क्षणाचीही उसंत न घेणे हाच माझा मनोमन केलेला ठाम निर्धार होता! तोपर्यंत तिथे अशी घटना पूर्वी कधी घडलेली नसल्याने अॅप्रूव्ह्ड अॅडव्होकेट पॅनलवर एकही क्रिमिनल लॉयर नव्हता. आमच्या इतर कोर्ट केसेसच्या संदर्भात माझ्याकडे येणाऱ्या बॅंकेच्या वकिलांशी चर्चा केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यामधे अनुभवी असे दोनच क्रिमिनल लाॅयर्स होते. त्यातही जे सीनियर आणि नावाजलेले होते त्यांचंच नाव बँकेच्या वकिलांनी आवर्जून सुचवलेलं होतं. त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटणं, सगळा प्रॉब्लेम समजावून सांगणं, आणि त्यांचा बायोडेटा घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांच्या नावाला मान्यता मिळवणं या वेळखाऊ औपचारिकता पूर्ण होण्यापूर्वीच पुढचं सगळं किचकट प्रोसेस आधीच सुरू करण्याची मी वकिलांना केलेली विनंती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेच मान्य केली हा त्या मन:स्थितीत मला फार मोठा दिलासा वाटला होता!

मी चार्ज घेतल्यानंतरच्या पहिल्या पंधरा दिवसातल्या या उलाढाली! या पंधरा दिवसात या सगळ्या घटनांमागच्या, माझ्या लाडक्या ताईच्या चटका लावून गेलेल्या दु:खद मृत्यूपासून मी अकोल्याला बदली होऊन इथे येईपर्यंतच्या काळातल्या सगळ्याच घटनांचा या कामाच्या व्यापात मला नकळत विसरच पडला होता. त्यादिवशी रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि ते सगळेच प्रसंग मला नव्याने आठवले. मनातला दृष्टीआडचा ‘तो’ प्रसन्न नजरेने माझ्याकडेच पहात होता. ती नजर दिलासा देणारी, मनाला अनामिक अशी स्वस्थता देणारी होती. मी समाधानाने डोळे मिटले. त्या मिटल्या डोळ्यांना मात्र उद्यापासूनचा प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने माझ्या सहनशक्तीची कसोटी पहाणारा ठरणाराय याची कल्पनाच नव्हती…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted