श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाझ -ए -हिंद! 🇮🇳 अभिमान आहे!” ☆ श्री संभाजी बबन गायके

नाझ-ए-हिंद! अभिमान आहे!

जगात आणि त्यातल्या त्यात भारतात सर्वाधिक धर्मनिरपेक्ष जर कुणी असेल तर ती भारतीय सेना. सेनेत जणू सबंध भारत नांदत असतो. एक सैनिक, एक सैन्याधिकारी त्याच्या कार्यकाळात भारताच्या जवळजवळ सर्वच राज्यांत, सीमांवर विविध राज्यांतून आलेल्या विविध अधिका-यांच्या नेतृत्वात सेवा बजावून निवृत्त होतो.

नेतृ या संस्कृत शब्दापासून तयार झालेल्या नेता या शब्दाचा एक अर्थ ‘धोका पत्करणारा’ असाही सांगितला जातो… अर्थात समूहाच्या अग्रभागी राहून, समुहावर येऊ घातलेले संकट जो प्रथम आपल्या शिरावर घेतो.. तो खरा नेता… नायक!

“शत्रूला माझ्या सैनिकांना इजा पोहोचवायचीच झाल्यास.. त्यांना प्रथम माझ्याशी दोन हात करावे लागतील… त्यात मी मरण पावलो तरच त्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचता येईल! आणि मी माझ्या जवानांसाठी काहीही करू शकतो.. नव्हे करेन” असं छातीठोकपणे सांगणारा आणखी एक सेनानी भारतीय सेनेने अनुभवला… त्याची ही कथा! भारतीय सैन्याधिकारी त्यांच्या हाताखाली काम करणा-या जवानांना my boys म्हणतात… ते केवळ औपचारीकता म्हणून नव्हे… तर खरोखरीच संकटाच्या परिस्थितीत त्यांच्या मागे संरक्षक म्हणून उभे राहतात… हे सिद्ध करणारी!

बावीस ऑगस्ट, दोन हजार आठ… पहाटेचे साडेतीन वाजलेले आहेत… या दिवसाच्या सायंकाळी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात ४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना एक पक्की खबर मिळाली आहे… पाकिस्तानी अतिरेक्यांचा एक मोठा गट सीमा ओलांडून भारतात प्रवेश करणार आहे! Insurgent म्हणजे प्रस्थापित सत्तेस धुडकावून त्या सत्तेविरुद्ध शस्त्र हाती घेतलेली व्यक्ती. या Insurgent विरुद्ध कारवाई करून त्याला नेस्तनाबूद करणे गरजेचे ठरते.. अन्यथा सत्ता धुळीस मिळायला वेळ लागत नाही. भारतात भारताची, भारतातल्या सर्वच्या सर्व भूभागावर एकछत्री सत्ता आहे.. आणि असेल. या सत्तेला कुणी आव्हान दिले तर ते आव्हान मोडून काढण्याच्या अखंडित मोहिमेला Counter-Insurgency अशी संज्ञा आहे.

अतिरेकी आपल्या सीमेच्या आत खोलवर येण्याआधीच त्यांना रस्त्यातच गाठायला त्यांना सामोरे जायचे आणि त्यांचा खात्मा करायचा… अशी सर्वसाधारण पद्धत असते. हे जणू एकप्रकारे मरणावर चालून जाण्यासारखेच. पण ही अशी चाल करून जाणेच भारतीय सैनिकांच्या अंगवळणी पडले आहे.

४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना या येऊ घातलेल्या अतिरेक्यांविरोधात मच्च्छल गावाजवळ, कुपवाडा सेक्टरमध्ये ‘नाव-नार’ नावाने एक मोहिम आखली. आपल्या कुटुंबियांसमवेत एक दीर्घ सुट्टी उपभोगून सैन्य तुकडीत नुकतेच परतलेले अनुभवी कमांडिंग ऑफिसर या मोहिमेत अग्रभागी राहून निघाले. साहेबांना प्रत्यक्ष सैनिकी कारवायांचा थोडाथोडका नव्हे तर तब्बल वीस वर्षांचा अनुभव होता. आपल्या नेतृत्वातील सैनिकांना स्वत:चे पुत्र मानणारे अधिकारी म्हणून या साहेबांची ख्याती होती. त्यांचे पिताजी सेनेत Honorary Captain होते. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकीत हे साहेब सेनेत अधिकारी म्हणून दाखल झाले होते… आणि त्यांच्या दोन भावांनी सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवला होता… एकच कुटुंबातील चौघे पुरुष भारताच्या संरक्षण सेवेत होते!

त्या पहाटेचा अंधार अधिकच गडद होता. सावध पावले टाकीत आपली तुकडी पुढे पुढे सरकत राहिली… कर्नल साहेब त्यांच्यापुढे कुणालाही जाऊ देत नव्हते… इतक्यात समोरच्या झाडीत काही हालचाल दिसली… आणि एके-४७ मधून निघणा-या गोळ्यांचा चकचकाट त्या अंधाराला भेदून येऊ लागला… आपल्या सैनिकांनी प्रशिक्षणात शिकवल्यानुसार त्वरीत आपापल्या जागा घेतल्या… कर्नल साहेबांनी थेट पुढे घुसत त्यांची रायफल अचूक चालवली… दोन अतिरेकी त्यांच्या वर्षावात त्वरीत ठार झाले खरे… पण त्या अतिरेक्यांनी झाडलेल्या फैरीमध्ये (फैर=fire) साहेबांच्या शरीरात अनेक गोळ्या घुसल्या! साहेब जबर जखमी झाले… आणि कोसळले…. पण कोसळताना त्यांनी आणखी एक अतिरेकी पाहिला…. आधीच्या दोन अतिरेक्यांचे मुडदे पाहून त्या अतिरेक्याने डोंगर उतारावरील एका चिंचोळ्या जागेत आसरा घेतला आणि त्या सुरक्षित जागेवरून तो भारतीय सैनिकांवर जबरदस्त गोळीबार करु लागला! आपल्या सैनिकांना पुढे जाता येईना…. कर्नल साहेबांनी ही आणीबाणीची परिस्थिती जाणली…. प्रचंड जखमी अवस्थेत, एखादा जखमी वाघ चवताळून उठावा तसे साहेब उठले… तो अतिरेकी लपला होता त्या छोट्या डोंगराच्या दुस-याबाजूने वर चढले… आणि त्यांनी स्वत:ला त्या अतिरेक्याच्या दिशेने खाली लोटून दिले…. अगदी त्याच्या पुढ्यात जाऊन थांबले कर्नलसाहेब… त्या अतिरेक्याच्या समोर त्याचा मृत्यू साक्षात उभा होता….. कर्नल जोजन थॉमस साहेबांच्या रुपात! जोजन साहेब केरळमधील थिरुवला जिल्ह्यातील एका खेड्यात, कुट्टूर गावात २२ जुलै, १९६५ रोजी जन्मले होते. JOJAN हे JOHAN (जोहान) या शब्दाचे एक रूप आहे. जोहान चा अर्थ आहे देव दयाळू आहे! आणि Thomos हे प्रभू येशूच्या बारा शिष्यांपैकी एका शिष्याचे नाव होते. Jojan Thomos हे नाव धारण करणारा एक बहादूर सैनिक अधिकारी भारतीय सैन्याला लाभला, ही सुद्धा ईश्वरी कृपाच म्हणावी लागेल.

जोजन यांनी पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि चेन्नईच्या सैन्य अधिकारी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून ते रुजू झाले. आणि मार्च १९८६ मध्ये त्यांनी देशसेवेत प्रथम पग.. पहिले पाऊल ठेवले!

 जोजन साहेबांना रेजिमेंट मिळाली ती ११, जाट रेजिमेंट. एक केरळी माणूस हरियाणवी सैनिकांच्या सोबत काम करू लागला… जगातल्या इतर कोणत्याही सैन्यात असे वैविध्य आढळत नाही सहसा. सेनेत जणू सारा भारत एकवटलेला असतो. एकेक पायरी पार करीत करीत जोजन साहेब आता कर्नल बनले होते… त्यांची कार्यशैली, उत्साह आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन वरिष्ठांनी त्यांना 45 राष्ट्रीय रायफल्समध्ये डेप्युटेशनवर पाठवलं…. राष्ट्रीय रायफल्समध्ये देशाच्या विविध भागातील उत्तमोत्तम सैनिक, अधिकारी हेरून त्यांना कर्तव्यावर विशेष कामगिरीसाठी बोलावून घेतले जाते… आणि यासाठी अनेक सैनिक, अधिकारी उत्सुक असतात… कारण राष्ट्रीय रायफल्स जम्मू-कश्मीरमध्ये तैनात असल्याने इथे नेहमी शौर्य गाजवण्याची संधी असतेच! जोजन साहेबांनी मोठ्या उत्साहाने काश्मिरात पदार्पण केले!

काश्मीर म्हणजे काही एखाद्या हाऊसिंग सोसायटी नव्हे… सिमेंटची संरक्षक भिंत असलेली. प्रवेशद्वारावर एखाद-दोन रखवालदार नेमले की झाले! प्रचंड लांबीची भारत-पाक सीमा… घनदाट जंगल… लहरी हवामान… पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण दिले गेलेले, अत्याधुनिक शस्त्रसज्ज आणि भारतद्वेषाने पेटून उठलेले माथेफिरू अतिरेकी, त्यात काही स्थानिकांचा पाठिंबा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कायदे, संघटना, जनता यांच्यामुळे सैन्यबलाचा थेट वापर करण्यावर असलेल्या मर्यादा….. एक ना अनेक कारणे आहेत. इथे प्रत्येक फुटावर सैनिक उभे करणे अशक्य आहे… पण तरीही भारतीय सैनिक असेल त्या स्थितीत पाय रोवून उभे असतात… एखादा सैनिक धारातीर्थी पडला की दुस-याच क्षणी दुसरा सैनिक त्याची जागा घेत असतो…. माघार नाही घेत…. म्हणून कश्मीर आणि पर्यायाने भारत आपला आहे!

 २२ ऑगस्ट, २००८ रोजी जोजन साहेबांचे वय होते ४३ वर्षे १ महिना. पोटी दोन मुले होती.. एक मुलगी मेघना आणि चिरंजीव फिलेमॉन. पत्नी गृहिणी बीना. बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक मित्र जोडले आणि अनेक विषयांमध्ये कसब प्राप्त केले. एखाद्या वाघासारखी शरीरयष्टी लाभलेल्या जोजन साहेबांचे मन मात्र खूप हळवे होते. पत्नी आणि दोन मुले, आई, वडील यांच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. सैनिकी जीवनातील अनिश्चितता त्यांना ठाऊक असल्याने प्रत्येक क्षण पुरेपूर आनंदाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असत. त्यांनी हेलिकॉप्टरचालक प्रशिक्षण घेतले आणि भारताच्या सीमांवर तैनात असलेल्या शीघ्र कृती दलाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून सहा वर्षे प्रभावी कामगिरी करून नाव कमावले… त्यांच्या गणवेशावर आर्मी एविएशन कोअरचे पंख सन्मानाने मिरवत राहिले.

कर्नल जोजन साहेब त्या अतिरेक्याच्या अगदी समोर उभे होते… इतक्या जवळून रायफल झाडता येत नाही… थेट भिडायला लागते… जोजन साहेबांनी त्या अतिरेक्यावर झडप घातली… त्याला जणू मरणमिठीच मारली…. जोरदार संघर्ष झाला…. आणि शेवटी वाघाने तो पिसाळलेला कुत्रा मारला! पण साहेब पुन्हा उठून उभे राहू शकले नाहीत. आपल्या इतर सैनिकांनी तोवर इतर तीन जनावरे यमसदनी धाडून दिली होती… एकूण सहा शिकारी झाल्या होत्या! अतिरेक्यांना टिपताना नाईक नीरज आणि शिपाई सुलतान सिंग हे दोघे जखमी होऊन हुतात्मा झाले होते! या दोघांना मरणोत्तर सेना मेडल जाहीर झाले.

प्रत्येक मोहिमेत वैद्यकीय साहाय्य दल सोबत घेऊन जाता येतेच असे नाही… डोंगर, रस्ते, अंधार, अंतर या अडचणी असतात… त्यातून जखमींना अतित्वरीत वैद्यकीय मदत देता येतेच असे होत नाही, गरज पडली आणि शक्य झाल्यास हेलीकॉप्टरमधून जखमींना लष्करी रुग्णालयात नेले जाते. पण त्यादिवशी एवढे सर्व करूनही जोजन साहेबांचे प्राण वाचू शकले नाहीत! पण त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले…. अतिरेक्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचायचे झाल्यास… त्यांना माझ्या मृतदेहावरूनच पुढे जावे लागेल!

‘अशोक चक्र’ हा शांतता काळात सैनिकांना प्रदान केला जाणारा सर्वोच्च सैनिक सन्मान मानला जातो. त्याचे मानकरी ठरले कर्नल जोजन… मरणोत्तर अशोक चक्र विजेते! हुतात्मा कर्नल जोजन थॉमस यांच्या धीरोदात्त पत्नी बीना यांनी तत्कालीन महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये २००९ मधील प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार स्वीकारला! पती गमावल्यानंतर बीनाताई यांनी अगदी कमी कालावधीत स्वत:ला सावरले… कारण त्यांच्या पदरात दोन मुले होती… मुलगी मेघना आणि मुलगा फिलेमॉन. बीनाताई यांनी कर्नल जोजन साहेबांच्या स्मृति कायम राहाव्यात यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले. साहेबांची जीवनकहाणी सांगणारी चित्र-पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. साहेबांचे स्मारक उभारले.

भारतास धुळीस मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या शत्रूला प्रत्युत्तर म्हणून, जिथे कर्नल जोजन साहेब आणि अन्य सैनिकांनी देह ठेवले, त्या स्थळी भारतीय सेनेने नाझ-ए-हिंद अर्थात हिंदुस्थानाचा अभिमान नावाने एक मोठे स्मृतिस्थळ उभारले गेले आहे. इथे शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर तिरंगा डौलाने फडकत असतो. इथे कर्नल साहेबांची शौर्यगाथा प्रकाशित केलेली आहे. इथल्या द-या-खो-यात केरळमधून काश्मिरात आलेल्या आणि देशाचे शत्रू असलेल्या अतिरेक्यांची शिकार केलेल्या वाघाची डरकाळी कायम घुमत असते… या वाघाचे नाव जोजन! हम रहे या न रहे… यह देश रहना चाहिये…. यासाठी असे अनेक वाघ आपले प्राण देत असतात! देशाने त्यांच्या प्रती कृतज्ञ रहायला हवे…. त्यांच्या कथा पुढच्या पिढीला सांगत राहायला हव्यात…. कारण पुढच्या पिढ्यांना त्यांचा वारसा घ्यावा लागणार आहे! जयहिंद!

कर्नल जोजन साहेबांची कहाणी तुम्हाला इतरांना सांगावी वाटली तर जरूर सांगा. जिन्हे नाझ है हिंद पर वह कहां है? .. या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted