श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “वज्र प्रसवा मोती!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
वर्ष साधारण १९९५-९६. स्थळ काश्मीरमधील एक अतिरेकीग्रस्त गाव. या गावातल्या एका दुकानात काही अतिरेकी खरेदी करायला नियमित येतात… अशी पक्की खबर होती. यांत बहुतांश पाकिस्तानातून भारतात घुसखोरी केलेले असतात, हेही निश्चित होतं. ते त्यावेळी मेजर पदावर होते. ९, पॅराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्सेसमधून कमांडो प्रशिक्षण उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले सैन्याधिकारी होते.. त्यांनी कुणाच्याही नजरेस न पडता त्या दुकानाच्या छतावर मुक्काम हलवला… तब्बल ४८ तास… काहीही हालचाल न करता निपचित पडून राहिले… पण एक बोट हातातल्या एके-४७च्या ट्रिगरवर सज्ज होते. डोळ्यांनी झोपेची ओळख नाकारली होती. शरीराला कोणतेही धर्म आठवत नव्हते… एकोणपन्नासाव्या तासाला ते आले… तिघे होते… खांद्यांवर रायफल्स, कमरेला काडतुसं आणि गळ्यात हातगोळे. यांनी छतावरच्या फटीतून या तिघांनाही अचूक टिपले! आणि आपल्या खात्यात आणखी तीन बळी नोंदवले!
कश्मिरमध्ये येण्याआधी ते आसामात सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त होते. जन्माने त्याच भागातला असल्याने ते स्थानिक नागरिकांत सहजी मिसळून जात. परिसरात अतिरेकी तर आहेत… त्यापैकी एक-दोघांची नांवेही माहीत आहेत… पण आपल्या सैनिकांना ते मिळून येत नाहीत.. यामुळे हे साहेब अत्यंत अस्वस्थ होते. कारण लक्षात आलं… इतर सैनिक, अधिकारी स्थानिक लोकांच्यात सहज वेगळे दिसून यायचे. हे तर स्थानिक. एके दिवशी स्वारी एकटीच बाहेर पडली… अतिरेक्यांच्या शोधात. अंगात बनियन, कमरेला आसामी गमछा, पायांत साधे धावायचे शूज आणि कमरेत लपवलेलं एक साधं पिस्टल! पण हो… मनात मुलखाचा नीडरपणा. कोणत्याही पूर्वोत्तर राज्यातील माणसासारखी उंची… पण घोटीव देहयष्टी.. अंग कातळासारखे मजबूत… टणक. जंगलाची वाट तुडवत असताना वाटेत एक मुलगा भेटला… त्याला विचारलं… अमुक अमुक कुठं आहे काही माहीत आहे का? तो मुलगा ‘हो’ म्हणताच यांनी त्याला चुचकारून सोबतीला घेतले… तीन-चार किलोमीटर्सवर तो मुलगा अचानक थांबला आणि झाडाआड लपला… म्हणाला… साहेब… पुढून जो चालत येतो आहे ना… तो अमुक अमुक आहे. तो बहाद्दर एकदम आरामात हातात रेडीओ घेऊन चालत येत होता. तो जवळ येताच साहेबांनी थेट त्याची मानगूट धरली. तो होता most wanted… पण त्याने साहेबांना खोटं नांव सांगितलं… साहेबांनी त्याच्या डोक्याला पिस्टल लावत त्याचं बखोटं धरून त्याला चालवत गावाच्या दिशेनं नेलं. वाटेत एक लहान मुलगा भेटला… त्याला विचारलं… या दादाचं नांव काय… त्या पोरानं याचं खरं नाव सांगितलं! मग मात्र साहेबांनी याला त्याच्याच कपड्यांनी एका झाडाला करकचून बांधून ठेवलं… कारण याच्यापेक्षा आणखी एका भयानक अतिरेक्याचा शोध घेणं बाकी होतं! साहेबांनी आधी भेटलेल्या आणि सोबत घेतलेल्या मुलाला सांगितलं… तू आमच्या कॅम्प पर्यंत पळत जा… आणि तिथंच थांब… मी आलोच!
साहेब पुढे चालत निघाले… दोन-तीन किलोमीटर्स… एका जागी काही झोपड्या… लोक शेतातला भात कापत आहेत.. त्यांचे जेवणही तिथे अंगणात शिजते आहे… साहेब त्या लोकांच्या सुमारे थोड्या अंतरावर पोहोचले… त्यातला पिवळ्या टी शर्ट वाला उठून उभा राहिला… कोण पाहिजे? त्याने विचारले… साहेबांनी ते स्वत: अतिरेकी असल्याचे सोंग घेतले… साहेब म्हणाले… आपल्या कमांडरने (म्हणजे अतिरेक्यांच्या म्होरक्याने) मला तुझ्याकडे पाठवलं आहे… एक निरोप आहे तातडीचा… एवढं बोलता बोलता साहेब पुढं पुढं पावलं टाकत होते.. त्या अतिरेक्याला संशय आलाच… त्याने त्याच्या कमरेचं पिस्टल काढून साहेबांच्या दिशेने गोळ्या झाडायला सुरुवात केली… साहेबांनीही त्याला गोळीनेच प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली… पण दोघांचाही नेम त्या गोंधळात चुकला… तो अतिरेकी मागे वळून पळत सुटला… त्याचं पिस्टल बहुदा कुठं तरी पडलं असावं… साहेबांनी त्याचा पाच-सहा किलोमीटर्स पाठलाग केला.. त्याला जिवंत पकडायची संधी साधायची होती! शेवटी एके ठिकाणी त्याच्यावर साहेबांनी झडप घातली… त्याला व्यवस्थित फटकावला… इतका की तो अर्धमेला झाला! त्या बाजूने एक बिचारा खेडूत सायकलवरून येत होता… साहेबांनी त्याची सायकल उसनी मागितली… आणि या अतिरेक्याला सायकलवर पुढच्या नळीवर बसवून कॅम्प पर्यंत आणला! झाडाला बांधून ठेवलेल्या अतिरेक्याला इतर सैनिकांनी मग पकडून आणले! या साहेबांचं नाव हेमंतो पॅंगिंग.. आताचे कर्नल हेमंतो पॅंगिंग (सेवानिवृत्त)
हेमंतो साहेबांच्या मातोश्रींचं नाव रीटा… म्हणजे मोती. मार्गारिटा वा मार्गारेट या नावाचं संक्षिप्त रूप म्हणजे रीटा. मोती नाजूक, देखणा आणि तसा मृदू. पण या मोत्यातून दोन वज्र अर्थात हिरे जन्माला यावेत, हा एक असाधारण दैवयोग. आणि हा योग भारताच्या दैवात असावा, हेही भाग्याचेच लक्षण! रीटा या पेशाने शिक्षिका. त्यांचा जन्म त्यावेळच्या N. E. F. A. (North-East Frontier Agency) अर्थात व्यापक आसाम राज्यात, भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले त्यावर्षी, १९४७ मध्ये झालेला असला तरी त्या पुढे अरुणाचल प्रदेशची लेक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. अरुणाचल म्हणजे अरुण=सूर्य, अचल=पर्वत. उगवत्या सूर्याचा प्रदेश. त्यांनी घडवलेले शेकडो विद्यार्थी आज अभिमानाने विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे पती बन्सीराम पावो पॅंगिंग हे मूळचे शिक्षणतज्ज्ञ आणि बँक अधिकारी. पुढे ते स्पेशल सर्विसेस ब्युरो (आताचे सशस्त्र सीमा बल) मध्ये सर्कल ऑफिसर आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून नावाजले गेले. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट, नामसिंग सारख्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या या दांपत्याने त्यांच्या चारही मुलांना मोठी स्वप्नं पहायला उद्युक्त केलं. ही चारही अपत्ये शिस्तबद्ध आणि अभ्यास, खेळांत अत्यंत उजवी निपजली.
थोरले चिरंजीव मोहंतो यांनी प्रचंड मेहनत घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (N. D. A.) प्रवेश मिळवला व भारतीय वायूसेनेत विविध विमाने उडवू शकणारे, प्रशिक्षण देऊ शकणारे लढाऊ वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला. पुढे ते ग्रुप कॅप्टन पदापर्यंत पोहोचले. सुखोई-एम. के. आय. विमानांच्या स्क्वाड्रनचे कमांडर बनणारे पूर्वोत्तर राज्यातील ते पहिलेच वैमानिक ठरले. लढाऊ विमाने उडवण्याचा ३३०० तासांचा अनुभव असलेले आणि वायूसेना मेडलने सन्मानित मोहंतो साहेबांचे कर्तृत्व अभिमानास्पद आहे. ते सेवानिवृत्तीनंतर स्थानिक जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या कार्यात मग्न असतात.
भारतवासीयांच्या शारीरिक ठेवणीत वैविध्य आहे. मात्र अज्ञानी सामान्य जनता पूर्वोत्तर राज्यांतील भारतीय नागरीकांना सरसकट नेपाळी किंवा चिनी म्हणून मोकळी होते… हे अत्यंत दुर्दैवी! या आपल्याच राज्यांतील नागरीकांनी ब्रिटीशांविरोधात संघर्ष केल्याचा इतिहास आहे. विस्तारवादी चीन या प्रदेशांचा लचका तोडण्याचा सतत प्रयत्न करीत असतो… ही बाब जगजाहीर आहे. भारतीय सैन्यात इथल्या शूरांनी अफाट पराक्रम गाजवलेला आहेच… लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिटा साहेब(निवृत्त), लेफ्टनंट जनरल डॉ. कोन्सम हिमालय सिंग (निवृत्त), कारगिल युद्धातल्या असाधारण पराक्रमासाठी मरणोत्तर महावीर चक्र विजेते कॅप्टन केंगृसे, चीन विरोधातल्या युद्धात महाप्रचंड पराक्रम गाजवून मरणोत्तर महावीर चक्र प्राप्त केलेले रायफलमन जसवंतसिंग रावत ही काही नांवे आहेत जी लष्करात अत्यंत आदराने घेतली जातात. आसाम रेजिमेंट शौर्यासाठी प्रसिद्ध आहेच.. त्यांचा ‘तगडा रहो’… नारा पूर्वोत्तर राज्यांतील सैनिकांचे मनोबल दर्शवत असतो…थोडक्यात हे आपले रक्षक आहेत!आपले कथानायक श्री. हेमंतो पॅंगिंग यांनी बंधू मोहंतो यांच्या पावलावर पाऊल टाकीत एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवला. युद्ध कौशल्य, नेतृत्व कौशल्य, विविध खेळ, शस्त्रे चालवणे इत्यादी कामांत त्यांनी आपला अमीट ठसा उमटवून दाखवला. त्यांचे नाव सर्वच सैनिक मोठ्या आदराने घेताना दिसतात. काश्मीर मध्ये हेमंतो साहेबांनी अतिरेक्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली होती! सहकारी त्यांना एका विशिष्ट अर्थाने ‘चेंगीज खान’ असे संबोधत असत… कारण देशाच्या शत्रूंना हेमंतो साहेबांनी अजिबात दया दाखवली नाही. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत… अतिरेक्यांना आपण घाबरायला नको… उलट त्यांनी आपल्याला घाबरायला हवे… असा त्यांचा खाक्या होता… आणि त्यांनी तो जगून दाखवला आहे! लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी काश्मिरात घडवून आणलेल्या नरसंहाराचा प्रतिशोध त्यांनी त्यावेळी सीमापार घुसून सुमारे २० अतिरेक्यांना यमसदनी पाठवून घेतला होता. ९, पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्स कमांडो म्हणून कर्नल दीब्रेटो, मेजर सुधीर वालिया अशा अनेक श्रेष्ठ लष्करी अधिका-यांसोबत खांद्याला खांदा लावून लढताना हेमंतो साहेबांनी कित्येक अतिरेक्यांचा खात्मा केला.. ऑपरेशन रक्षकमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली! सेना मेडल, सेना मेडल+बार असे सन्मान त्यांनी प्राप्त केले. त्यांचे दुसरे बंधू जयंतो हे GAIL (गॅस ऑथोरीटी ऑफ इंडिया लिमिटेड) मध्ये उच्च पदस्थ आहेत, तर दिवंगत भगिनी गीता या न्यायाधीश होत्या!
“Monks & Warriors” नावाचा podcast शौर्य चक्र विजेते कर्नल कौशल कश्यप (निवृत्त) आणि सेना मेडल विजेते लेफ्टनंट कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) हे दोन माजी लष्करी अधिकारी चालवतात… त्यांचे आभार मानायला शब्द नाहीत! भारतीय सेनेतील शूरांचा अतिशय अचूक परिचय ते करून देत असतात… सर्वांनी हा podcast आवर्जून पहावा. याच “Monks & Warriors” च्या माध्यमातून कर्नल हेमंतो साहेबांची कहाणी ऐकायला मिळाली. कर्नल साहेबांचे शौर्य तर वादातीत आहेच… पण त्यांच्या आई-वडिलांचे श्रेय मोठे आहे… हे नि:संशय.
रीटा अर्थात मोती नाव धारण करून हि-यासारख्या, वज्रासारख्या पुत्रांना जन्म देणा-या वीरमाता कै. रीटा पावो पॅंगिंग, वीरपिता कै. बन्सीराम पावो पॅंगिंग यांना सादर वंदन. हेमंतो साहेबांना कडक सल्यूट! जय हिंद.. जय भारत!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






