श्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
गीतांजलीतील कविता वाचत असताना कवी आणि देव यांच्या भावनिक नात्यांतील वैविध्यतेचे पदर जसजसे उलगडत जातात तसतसा एक प्रश्न वाचकांच्या मनात रुंजी घालू लागतो; तो म्हणजे या दोघांचं नातं तरी कोणतं आहे? आणि आश्चर्य म्हणजे हाच प्रश्न टागोरांना देखील पडतो. गीत क्र. ७७ मधे ते देवाला म्हणतात, “तू माझा कोण आहेस? पिता आहेस? बंधू आहेस? सखा आहेस? तू आहेस तरी कोण? समजा मी तुला पिता मानलं तर या नात्यातला जो आदर आहे तो मला तुझ्यापासून लांब ठेवेल. मग मी तुझ्याजवळ कसा येऊ? तुझा हात कसा धरू? तुला जर सखा मानलं तर मी कायमचा तुझ्याजवळ राहू शकणार नाही. तुला जर बंधू मानलं तर माझं जे संचित आहे त्यात तुला वाटणी द्यावी लागेल. ती कशी देऊ? शेवटी कवी म्हणतो मी तुला सरळ माझं जीवन समर्पित करतो. म्हणजे या नात्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही कारण मग मी तुझ्याशी एकरूप होऊन जाईन. ”
देव पिता म्हणून:-
ते देवाला पिता मानून प्रार्थना करतात की जिथे मनात भीती नसेल, मान ताठ असेल, जिथे ज्ञान मुक्त असेल, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात मला घेऊन चल. तिथे सत्य, शांती, प्रेम, अहिंसा यांचेच राज्य असेल. (गीत ३५)
देव माता म्हणून:-
ते देवाला माता मानतात. त्यांना मातेला काहीतरी अर्पण करण्याची इच्छा होते. पण त्यांच्या लक्षात येतं की, सुख, आनंद, कीर्ती, संपत्ती या गोष्टी तर तिनेच दिल्या आहेत. त्याच तिला कशा परत द्यायच्या. त्यामुळे ते म्हणतात, माझ्या दुःखावर फक्त माझी सत्ता आहे. म्हणून त्या दुःखाश्रूंची माळच मी तुला वाहीन. ती तुझ्या वक्षावर रूळत राहील आणि तुझ्या हृदयाशी हितगुज करेल. (गीत ८३)
देव बालक म्हणून:-
त्यांना कधी कधी देव हा बालकाच्या रूपातही दिसतो. कवीने सागर किनारी वाळूत खेळणाऱ्या बालकांना वैश्विकरूप दिले आहे. त्या बालकांच्या निरागसपणात कवीला देव दिसतो. बालकांच्या हास्यात, नृत्यात, गोबऱ्या गालात त्यांना देवाची किमया दिसते, निसर्ग दिसतो आणि तो सर्व व्यापी परमेश्वर भेटतो. (गीत ६०, ६१)
देव पती म्हणून:-
मधुरा भक्ती ही आपल्या अध्यात्मात महत्त्वाची मानली जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चैतन्य महाप्रभू! या भक्तीमध्ये देव प्रियकर म्हणजे जोडीदार असतो. कवी स्वतः पत्नीच्या भूमिकेत जाऊन प्रियकराच्या रूपात देवाला पाहतो. या कवितेत (गीत ५२) कवीला म्हणजे पत्नीला वाटतं प्रियकराच्या गळ्यात असणारा हार खूप सुंदर आहे. पण त्याला विचारायचं कसं, देतोस कां म्हणून? पण सकाळ झाल्यावर तिला वाटतं तो आपल्यासाठी काहीतरी आठवण म्हणून नक्की ठेवून जाईल. तो जाता क्षणी ती धावत शेजेकडे येते. निदान एखादं फूल, निदान फुलाची पाकळी ठेवून जाईल. प्रत्यक्ष पाहते तो एक तळपणारी तलवार ठेवलेली असते. प्रेयसी/पत्नी (म्हणजे कवी) खूप घाबरते. पण तिच्या लक्षात येतं की ज्याअर्थी प्रियकराने दिलेली वस्तू आहे त्या अर्थी त्यामागे काहीतरी त्याचा उद्देश असेल. या तलवारीने आता आपल्याला पाश तोडण्याची भीती वाटणार नाही आणि एकदा पाश तोडले की आपण आपलं सगळं आयुष्य त्याच्यावर ओवाळून टाकू शकतो. तोपर्यंत ही तलवार जपून ठेवायला हवी.
(अपूर्ण, पुढील भागात)
—–
☆ गीत : ८८ ☆
DEITY of the ruined temple! The broken strings of Vina sing no more your praise. The
bells in the evening proclaim not your time of worship. The air is still and silent about you.
In your desolate dwelling comes the vagrant spring breeze. It brings the tidings of
flowers ⎯ the flowers that for your worship are offered no more.
Your worshipper of old wanders ever longing for favour still refused. In the eventide, when fires and shadows mingle with the gloom of dust, he wearily comes back to the ruined temple with hunger in his heart.
Many a festival day comes to you in silence, deity of the ruined temple. Many a night of worship goes away with lamp unlit.
Many new images are built by masters of cunning art and carried to the holy stream of
oblivion when their time is come.
Only the deity of the ruined temple remains unworshipped in deathless neglect.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत : ८८ ☆
☆
तुटल्या तारा अन् भग्न वीणा।
इथे न भाकित कोणी करूणा॥
*
पूजन, अर्चन कधी नसे जरी।
सहजच कोणी घंटानाद करी॥
*
भग्न तुझ्या या मंदिरी निर्जन।
उनाड वारा, बनुनी सज्जन॥
*
पुष्पांचा गंधीत निरोप आणी।
जी नच पडली तुझिया चरणी॥
*
जो होता कधी तुझा पुजारी।
कृपाप्रसादा वंचित तो मुरारी॥
*
मनःशांती त्या कुठे मिळेना।
म्हणुनि येई तुझिया स्तवना॥
*
येई परतुनि तो भग्न मंदिरी।
घेऊनि तशीच आर्तता उरी॥
*
संध्याप्रकाश अन् छाया जेंव्हा।
मिसळत धूलीकणांशी तेंव्हा॥
*
असो दिवाळी, दसरा, होळी।
कुणी न दर्शना ये वेळोवेळी॥
*
काळोख्या रात्री अंधारातून।
कोणी न लावी समई परतून॥
*
लबाड, व्यवहारी लोकांनी।
मंदिरे निर्मिली, जुनी त्यागुनि॥
*
विस्मरतील सारे, ती ही नंतर।
दुर्लक्षाचे दुर्लक्षित अंतर॥
*
भग्न न होई पुन्हा, भग्न ते।
मृतास पुन्हा, मरण न येते॥
☆
भावानुवाद © मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
—–
☆ गीत : ८९ ☆
NO more noisy, loud words from me ⎯ such is my master’s will. Henceforth I deal in
whispers. The speech of my heart will be carried on in murmurings of a song.
Men hasten to the King’s market. All the buyers and sellers are there. But I have my
untimely leave in the middle of the day, in the thick of work.
Let then the flowers come out in my garden, though it is not their time and let the midday bees strike up their lazy hum.
Full many an hour have I spent in the strife of the good and the evil, but now it is the
pleasure of my playmate of the empty days to draw my heart on to him; and I know not why is this sudden call to what useless inconsequence!
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत : ८९ ☆
☆
हळुवार सुरांनी, गाईन गाणी
बोल हृदीचे, गीतात गुणगुणी॥
*
नित्यच येथे चाले, देणे घेणे
मी परि जाईन, येता बोलावणे॥
*
ऐनपणाच्या भरात असता
साद तयाची, कानी घुमता॥
*
वसंत नसता, फुले फुलावी
मधु त्यातला, भ्रमरा खुणवी॥
*
काळ जातो, भल्याबुर्या कलही
सखा सौंगडी, भेटो लवलाही॥
*
असे अचानक त्याचे बोलवणे
असो सार्थ वा अर्थहीन भेटणे॥
☆
भावानुवाद © मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
—–
☆ गीत ९० ☆
ON the day when death will knock at thy door what wilt thou offer to him?
Oh, I will set before my guest the full vessel of my life ⎯ I will never let him go with empty hands.
All the sweet vintage of all my autumn days and summer nights, all the earnings and gleanings of my busy life will I place before him at the close of my days when death will knock at my door.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत : ९० ☆
☆
पुसे मज आज, सखा पांडुरंग।
पाहुणा यमासम, येता दारी सांग॥
*
करिसि का स्वागता, तुझ्या घरी।
दडपुनि दार का, पाठवी माघारी॥
*
शिकवण हीच, देई मम संस्कृती।
पाहुणा न जाये, रिकाम्या हाती॥
*
दिस शरदाचे, ग्रीष्मातल्या रात्री।
गोड समजुनी, वाढीन मी पात्री॥
*
ठेवीन सामोरी आयुष्याचा पेला।
कमाई नि कोठी देईन त्याजला॥
*
मृत्यूचे दूत, माझ्या दारी आले।
स्वागता तयांच्या, प्राण माझे दिले॥
*
– क्रमशः भाग ३०
मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.
भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






