श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८९ आणि ९० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ८९ – –
जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्य घोषें म्हणावे ।
हरीचिंतने अन्न जेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।।८९।।
अर्थ : लोकांमध्ये असताना आणि जेवण करताना भगवंताचे नाम घ्यावे. हे नाम घेताना ते आदरपूर्वक आणि मोठ्याने गजर करून स्पष्टपणे म्हणावे. जेवण करताना भगवंताचे चिंतन करावे. असे केल्याने नैसर्गिकपणे भगवंताची प्राप्ती होते.
(घोषें – मोठ्याने गजर करून, हरीचिंतने – भगवंताच्या स्मरणात राहून, स्वभावे – सहजपणे)
विवेचन : अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपली भारतीय संस्कृती अन्नाला परमेशराचाच दर्जा देते. अन्नाला इतका मोठा आणि पवित्र दर्जा आपण देतो हेच आपल्या संस्कृतीचे मोठे वैशिष्ट्य आहे. मग असे पवित्र अन्न सेवन करताना आपला भावही पवित्र असावा. भाव किंवा भावना या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी महत्व. आपल्या मानण्यावरच सर्व काही अवलंबून असते. परमेश्वराच्या मंदिरात जाणारा भाविक मनोभावे त्या मूर्तीची पूजा करतो. त्याच्यासाठी ती केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष भगवंताला तो त्या ठिकाणी पाहतो. परंतु त्याच ठिकाणी एखादा नास्तिक माणूस गेला तर त्याच्यासाठी ती फक्त एक पाषाणाची मूर्ती असते. म्हणूनच जेवताना पवित्र भाव असावा. हा पवित्र भाव कसा येईल? तर अन्नाचा घास घेण्यापूर्वी जेव्हा आपण पवित्र असे भगवंताचे नाम उच्चारू तेव्हा.
आजकाल हॉटेलमध्ये जाण्याची, बाहेरचे खाण्याची आवड सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कसे जेवतो आपण हॉटेलमध्ये? जरा आठवून पहा. आजूबाजूला लोकांच्या बोलण्याची कलकल असते. त्यातच आपण वेटर केव्हा आपले जेवण आणतो त्याकडे लक्ष ठेवून असतो. जेवताना बरेच जण मोबाईल पाहतात. जेवणाला आपल्या संस्कृतीत ‘ उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ‘ असे म्हणतो. पण तिथे केवळ उदरभरणच होते. त्याला परमेश्वराच्या नामाचे अधिष्ठान आपण देत नाही.
जेवण म्हणजे एक यज्ञकर्म आहे. एखादा यज्ञ करताना आपण त्या त्या देवतेचे नाव घेऊन अग्निमध्ये आहुती टाकत असतो. अशा प्रकारे दिलेली आहुती अग्निमार्फत त्या त्या देवतेपर्यंत पोचते असे आपण मानतो. आपल्या पोटात देखील जठराग्नी असतो. तो प्रदीप्त झाल्यानंतरच त्याला आहुती द्यायची असते. आपल्या जठरातील अग्नीला ‘वैश्वानर’ असे नाव आहे. हा शब्द विश्वात सर्वत्र व्यापून राहिलेल्या अग्निदेवतेचे प्रतिनिधित्व करतो. अर्थात ही अग्निदेवता म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवंताचे स्वरूप आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ” अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।” अर्थात सर्व प्राणिमात्रांच्या शरीरात असलेला वैश्वानर अग्नी म्हणजे मी आहे.
म्हणून समर्थ म्हणतात की समूहामध्ये जेवण करताना आदरपूर्वक परमेश्वराचे नाम घ्यावे. सर्वांना कळेल, स्पष्टपणे ऐकू येईल अशा पद्धतीने ते म्हणावे. पूर्वी आपल्याकडे जेवणाच्या पंक्तीत बसताना श्लोक म्हणण्याची प्रथा होती. आजही ती काही ठिकाणी पाळली जाते. त्यामुळे अन्नाबद्दल पवित्र भाव बाळगणे, जेवणाला लगेच सुरुवात करण्याऐवजी थोडा संयम पाळणे, भगवंताचे नाम आदरपूर्वक घेणे या गोष्टींचे संस्कार सहजपणे बालमनावर होत होते. आता मात्र पंक्तीत श्लोक म्हणणे फार कमी झाले आहे. कोणी तो म्हणत असेल तर त्याच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. घरी आपण एकटे असू तेव्हा देखील जेवणापूर्वी भगवंताचे नामस्मरण करूनच जेवणाला सुरुवात करावी.
आपण जसे अन्न खाऊ तसे विचार निर्माण होतात. सात्विक अन्न असेल तर विचार देखील चांगले निर्माण होतात. राजस किंवा तामसीअन्न विकारांना जन्म देते. आपली आई, पत्नी किंवा बहीण जेव्हा स्वयंपाक करते, त्यावेळी तिच्या मनात आपण आपल्या माणसांसाठी हे भोजन बनवतो आहोत असा भाव असतो. ते भोजन तयार करताना मनात प्रेम असते. साहजिकच ते विचार तिने तयार केलेल्या अन्नात उतरतात. आपले पूर्वज आणि ऋषीमुनी म्हणूनच वाटेल त्या ठिकाणी जेवत नव्हते. महाभारतात श्रीकृष्ण जेव्हा शिष्टाई करण्यासाठी कौरवांकडे जातो, तेव्हा दुर्योधनाने बराच आग्रह करूनही तो त्या ठिकाणी जात नाही. त्याऐवजी विदुराकडील साधेच परंतु सात्विक अन्न जेवणे तो पसंत करतो.
अनेक लोकांना नोकरी व्यवसायानिमित्त काही वेळा नाईलाजाने बाहेर जेवण घ्यावे लागते. असे जेवण घेताना त्याभोवती पाणी फिरवून आपण भगवंताचा प्रसाद ग्रहण करतो आहे अशी भावना मनात असू द्यावी. मग त्या अन्नाचे प्रसादात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. जेवताना भगवंताचे स्मरण असू द्यावे. असे केले म्हणजे ती आहुती खरोखरच भगवंतापर्यंत पोहोचेल. ज्याला अध्यात्मार्गावर चालायचे आहे त्याला तर अन्न सेवन करताना अशी दक्षता घ्यायलाच हवी. अन्नाचा स्थूल भाग आपल्या शरीराचे भरण पोषण करतो तर त्याचा सूक्ष्म अंश आपल्या मनाचे आणि बुद्धीचे पोषण होते. म्हणून अन्न ताजे, सात्विक, साधे असावे.
जेवताना आपले लक्ष चवीकडे जास्त असते. एखादी गोष्ट आवडली की आपण खाण्यावर नियंत्रण ठेवत नाही. रसना म्हणजे आपली जीभ यात महत्वाची भूमिका पार पाडते. जिभेची दोन कार्ये आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वाद किंवा चवीचे ज्ञान आपल्याला तिच्यामुळे होते. दुसरे म्हणजे जीभ हे बोलण्याचे साधन आहे. ज्याला जिभेवर नियंत्रण ठेवता आले, त्याला परमार्थ लवकर साधता येतो. खाताना आणि बोलताना अशा दोन्ही अर्थाने. ज्याला भगवंत प्राप्तीची इच्छा आहे त्याने त्याच्या स्मरणाशिवाय एक क्षणही वाया जाऊ देता कामा नये. स्वामी समर्थांच्या वाङ्मयात सांगितल्याप्रमाणे “अहो येता जाता, कार्य करीता, सदा घेता देता, उठत बसता वदनी वदता ग्रास गिळता… ” या पंक्तीप्रमाणे सदोदित त्याचे नामस्मरण करत जावे. मग भगवंत दूर नाही.
स्वसंवाद ::
१. मी जेवण करताना केवळ जिभेच्या ‘स्वादाचा’ आणि आवडीचा विचार करतो, की ते शरीराला ऊर्जा देणारे एक ‘यज्ञकर्म’ म्हणून शांत चित्ताने स्वीकारतो?
२. आजकाल जेवताना मोबाईल पाहण्याची किंवा टीव्ही बघण्याची लागलेली सवय सोडून, मी किमान २ मिनिटे देवाचे नाव घेऊन भोजनाला सुरुवात करतो का?
३. “अन्नाचा सूक्ष्म अंश माझ्या मनाचे आणि बुद्धीचे पोषण करतो, ” हे लक्षात ठेवून मी सात्त्विक आहार घेण्याबाबत आणि अन्न शिजवताना मनात चांगले विचार ठेवण्याबाबत जागरूक आहे का?
४. “येता जाता, उठत बसता, ग्रास गिळता” माझ्या मनात आणि वाचेवर त्या जगनियंत्याचे नाव अखंड राहते का?
——-
श्लोक क्र. ९० – –
न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी ।
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ।।९०।।
अर्थ : ज्याच्या मुखात रामाचे नाव येत नाही असा माणूस आपल्या जीवनाचे मोठे नुकसानच करून घेत असतो. अशा व्यक्तीचे जगणे व्यर्थ आहे. अशी व्यक्ती अत्यंत हीन समजावी. वेदशास्त्रे, पुराणे यात महर्षी व्यासांनी हरिनामाची महती विविध प्रकारे सांगितली आहे.
(हाणी – हानी/नुकसान, काणी – क्षुद्र/हीन)
विवेचन : रामनामाचे महत्व अपरंपार आहे. आतापर्यंतच्या विविध श्लोकातून त्याचे महत्व विविध प्रकारे आपल्याला सांगितले आहे. या श्लोकात ते ज्याच्या मुखी रामनाम येत नाही अशा मनुष्याची अवस्था वर्णन करतात. मुळात मनुष्य जन्म दुर्लभ. ८४ लक्ष योनी अनेकवार फिरून हा जन्म मिळतो असे सांगितले जाते. अशा या दुर्लभ मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर मुखामध्ये हरिनाम येणे आवश्यक आहे. रामनाम म्हणजे अमृत आहे. जे रामनामाचा आश्रय घेतात अशांचा मुखातून जणू अमृत बाहेर पडते. ते मुख खरोखरच धन्य होय. अन्यथा आयुष्य व्यर्थ बडबडण्यात गेले असे समजावे. अशा व्यक्ती जगल्या काय आणि मेल्या काय सारखेच? त्यांचे जीवन व्यर्थ गेले. अशा व्यक्तींचे जगणे म्हणजे अत्यंत हीन दीन अशा प्रकारचे आहे असे समर्थ म्हणतात. समर्थानी अशा व्यक्तीसाठी ‘काणी ‘ शब्द वापरला आहे. अशा व्यक्तींचे जिणे कवडीमोलाचे. स्वा. सावरकरांचे शब्द हरिनामाबद्दल वापरायचे तर असे म्हणता येईल, ” तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण… “
हरीनाम मुखात न येता जगणे म्हणजे मरणच आहे. ‘ हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रें ‘ असे ज्ञानदेव म्हणतात. हरिनामाचे सामर्थ्य अगाध आहे. त्याचे नाम मुखात आले की जन्मोजन्मीचे पाप नष्ट होते. त्यासाठी ज्ञानदेव गवत आणि अग्नीची उपमा वापरतात. वाळलेले गवत अग्नीच्या संपर्कात आले की क्षणार्धात जळून नष्ट होते, अग्नीशी समरस होते. तसेच परमेश्वराचे नाम घेणारी व्यक्ती त्याच्याशी एकरूप होते. ती परमेश्वरच होऊन जाते.
असे हरिनामाचे महत्व साधुसंतांनी निरनिराळ्या प्रकारे वर्णन केले आहे. मनुष्याला त्याद्वारे सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यासांनी वेद, शास्त्रे, पुराणे यांची रचना केली. त्यांनी देखील विविध प्रकारे त्यात हरिनामाचे महत्व स्पष्ट केले आहे. महाभारतात एकदा दुर्योधन श्रीकृष्णाला विचारतो की धर्म म्हणजे काय हे मला कळते पण तसे वागण्याची बुद्धीच मला होत नाही. अधर्म म्हणजे काय हेही मला समजते, पण त्यातून मला बाहेर पडता येत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, ” तुझ्या हृदयात तू मला स्थान दे म्हणजे तुला चांगले वागण्याची बुद्धी होईल. ” प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात परमेश्वराचे वास्तव्य असतेच. परंतु अज्ञानामुळे त्यावर पडदा पडलेला असतो. हा पडदा ज्ञानाच्या प्रकाशाने दूर होतो. पण दुर्योधनासारख्या व्यक्ती प्रत्यक्ष भगवंताने सांगूनही त्याप्रमाणे आचरण करीत नाहीत. अशा माणसांचे जगणे खरोखरच व्यर्थ होय. संत मीराबाई म्हणतात, ” रामनाम रस पीजे मनवा, रामनाम रस पीजे, तजि कुसंग संतसंग बैठी नित, हरी -चर्चा सुणी लीजें. ” रामनामाच्या रसातील गोडी चाखल्याशिवाय कळणार नाही. तेव्हा आपणही रामनामाचा आश्रय घ्यावा. आपल्या मुखात अखंड रामनाम येईल असा सत्संग, असे वागणे असावे. मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यावे. संत एकनाथ म्हणतात, “रामनाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी. “
स्वसंवाद ::
१. ८४ लक्ष योनी फिरून मिळालेल्या या ‘दुर्लभ मनुष्य जन्माचा’ वापर मी केवळ व्यर्थ गोष्टींमध्ये करत आहे, की रामनामाने त्याचे सार्थक करत आहे?
२. दुर्योधनाप्रमाणे मलाही बऱ्याचदा ‘चांगले काय आणि वाईट काय’ हे समजत असूनही, माझ्या मनातील अज्ञानाचा पडदा दूर करण्यासाठी मी देवाकडे ‘सद्बुद्धी’ मागतो का?
३. संत एकनाथांच्या वचनानुसार, तिन्ही लोकांत ‘धन्य’ होण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी मी रोजच्या जगण्यात नामस्मरणाचा आश्रय घेतो का?
– क्रमशः श्लोक ८९ आणि ९०
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







