श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ९१ – –
नको वीट मानू रघुनायेकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ।
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ।।९१।।
अर्थ : समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात, ” हे मना, भगवंताच्या नामाचा कंटाळा (वीट) येऊ देऊ नकोस. आपल्या मुखाने अत्यंत आदरपूर्वक रामाचे नाव घे. त्यासाठी एक पैसा देखील खर्च करावा लागत नाही. जानकीला म्हणजे सीतेला अत्यंत प्रिय असलेल्या अशा त्या श्रीरामांच्या नामाचा सतत घोष कर.
(वाचा – मुखाने, न वेचे – खर्च करावे लागत नाही)
विवेचन : मनामाचे महत्वच या ठिकाणी अधोरेखित करताना समर्थ म्हणतात की हे मना, राघवाच्या नामाचा म्हणजे ते नाम घेण्याचा मुळीच कंटाळा करू नकोस. सामान्य माणसांची मानसिकता समर्थ जाणून आहेत. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली तरी आपल्याला कंटाळा येतो. भगवंत हा तर निर्गुण, निराकार. काही काळ हे नाम घेतल्यानंतर त्याचा काही अनुभव जेव्हा मिळत नाही, तेव्हा सामान्य माणूस ती गोष्ट सोडून देतो. आपण दृश्य जगात जास्त अडकतो. ध्यान करायला बसलो तर डोक्यात नाना विचार येतात. चित्त एकाग्र होत नाही. एखादे उत्तम पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला टीव्ही पाहायला, मोबाईल बघायला जास्त आवडते. दृश्याकडे आपली धाव जास्त असते. तसा अनुभव नामात मिळायला दीर्घ काळ जावा लागतो. नामाची साधना न कंटाळता सातत्याने निश्चयपूर्वक सुरु ठेवावी लागते. हे नामच मला तारून नेईल. या जन्मी जरी मला भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी पुढील जन्मी का होईना पण ती होईल. परंतु मी भगवंताचे नाम घेणे सोडणार नाही असा निर्धार हवा. ज्याला भगवंत हवा आहे, त्याला श्रद्धेने भगवंताचे नाम अखंड मुखात यायलाच हवे.
ते नाम किती सोपे आहे! त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. भगवंत प्राप्तीचे इतरही मार्ग आहेत. काही मार्गात कठोर तपश्चर्या करावी लागते, तर कोठे तीर्थयात्रा, यज्ञयागादी गोष्टींसाठी भरपूर पैसा लागतो. नामासाठी या कोणत्याच गोष्टी लागत नाहीत. बसल्याजागी काम करताना देखील हरिनामाचा जप करता येतो. म्हणूनच भगवंत प्राप्तीचा हा सोपा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात. या मार्गाने भगवंत विनासायास प्राप्त होतो. आपण हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट शोधत असतो. भगवंत प्राप्तीसाठी ‘ नाम ‘ हाच शॉर्टकट समजायला हरकत नाही. संत सोयराबाई म्हणतात, ” सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ” सर्व संतांचे हेच सांगणे आहे. शब्द वेगळे असतील पण सांगण्यात एकवाक्यता आहे.
समर्थांनी या श्लोकात श्रीरामाच्या एका लोकप्रिय नामाचा उल्लेख केला आहे. ‘ जानकीवल्लभ ‘ हे ते नाम! सीता जनक राजाची कन्या म्हणून जानकी. जानकीला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे. ती म्हणजे श्रीराम!अशा या सीतामातेला जो प्रिय आहे, तो श्रीराम आपल्यालाही प्रिय व्हावा. त्याचेच नाम आपल्या मुखात सातत्याने यावे असे समर्थाना वाटते. ज्यांनीं ज्यांनी त्याचे नाम घेतले ते हा भवसागर तरून गेले. त्यानेच आपले कल्याण होईल. “अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं।” या मंत्रातला गोडवा जो प्रेमाने आणि आदराने ते नाम घेईल, त्यालाच कळेल. गोंदवलेकर महाराज रामनामात पेढ्यासारखी गोडी आहे असे म्हणतात. पण पेढा गोड आहे असे नुसते म्हटले तर त्याची गोडी थोडीच जिभेवर येते? त्यासाठी तो खाऊनच पाहावा लागतो. पेढ्याचा कोणताही तुकडा खाल्ला तरी तो गोडच लागणार. तसेच भगवंताचे नाम आहे. त्याचे कोणतेही नाम गोडच आहे. ‘ केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. ‘अनुभवून तर बघा!
स्वसंवाद ::
१. मोबाईल किंवा टीव्ही तासनतास बघताना मला कंटाळा येत नाही, मग विनामूल्य असणारे रामनाम घेताना माझ्या मनाला ‘वीट’ (कंटाळा) का येतो?
२. “नामस्मरण हाच भवसागर तरून जाण्याचा सर्वात सोपा आणि विनासायास मिळणारा शॉर्टकट आहे, ” या संतांच्या वचनावर माझा दृढ विश्वास बसला आहे का?
३. जानकीवल्लभ श्रीरामांचे नाम केवळ ओठांवरून उच्चारण्याऐवजी, मी कधी पेढ्यासारखी त्याची आंतरिक गोडी अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का?
४. संत चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे, मी माझ्या रोजच्या कामाच्या व्यापातून किती वेळ ‘आवडीने आणि आदराने’ त्या विठोबाचे किंवा राघवाचे नाव घेण्यासाठी काढतो?
=====
श्लोक क्र. ९२ – –
अती आदरे सर्व ही नामघोषे ।
गिरीकंदरे जाइजे दुरि दोषे ।
हरी तिष्ठतु तोषला नामतोषे ।
विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।
अर्थ : भगवंताच्या नामाबद्दल अत्यंत आदर बाळगून जो कोणी त्याचे नामस्मरण करतो, त्याचे सर्व दोष दूर गिरिकंदरी म्हणजे लांब निघून जातात. ज्या ठिकाणी आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंतांचे नामस्मरण सुरु असते, तिथे भगवंत अत्यंत संतुष्ट होऊन वास्तव्य करीत असतो. भगवान शंकरांना रामनामाचे विशेष वेड लागले आहे (आणि ते सतत त्याचे नामस्मरण करीत असतात)
(गिरिकंदरी – पर्वतांमधील गुहेत, तिष्ठतु – थांबून राहतो, तोषणे – संतोष/आनंद होणे, पिसे – वेड)
विवेचन : भगवंताचे नाम सर्व दोष हरण करणारे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे माहात्म्य स्पष्ट करताना समर्थ म्हणतात की जो कोणी भगवंताचे आदरपूर्वक नामस्मरण करतो त्याचे दोष दूर म्हणजे गिरिकंदरी निघून जातात. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की समर्थ भोजन प्रसंगी आपल्याला भगवंताचे नाम मोठ्याने गजर करून आदरपूर्वक म्हणायला सांगतात. या श्लोकात ते भगवंताचे नाम आपल्याला मोठ्याने उच्चारून म्हणायला सांगतात. मोठ्याने म्हणणे म्हणजे वैखरीने म्हणणे. आधी सुरुवात वैखरीपासून करावी लागते. मग ते नाम क्रमाक्रमाने मध्यमा, पश्यन्ती या वाणींच्या प्रकारांमार्फत परा वाणीपर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा मनातल्या मनात नामजप सुरु असतो. पण त्यावेळी मन दुसरीकडे कुठेतरी असते. म्हणजे मानसिक जपात यांत्रिकता येण्याचा संभव असतो. मुखाने हे नाम उच्चारले तर आपले लक्ष त्या नामाकडे राहते. आपल्या भोवती असणाऱ्या इतर लोकांच्या कानावरही हे नाम आपोआप पडते.
भगवंताचे नाम घेण्यासाठी दूर कुठे गिरिकंदरात जावे लागत नाही. आपण त्याचे नाम घेऊ लागलो की आपल्यातील दोषच दूर गिरिकंदरात निघून जातात. जिथे नाम आहे तिथे दोष राहणे शक्य नाही. जिथे उजेड आहे, तिथे अंधार कसा राहील? तुकाराम महाराज सुद्धा नामाचे महत्व सांगताना म्हणतात
नामसंकीर्तन साधन पैं सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥
ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वदा ॥
– – श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत समर्थ आपल्याला परमेश्वराचे वास्तव्य नेमके कुठे असते हे सांगतात. जिथे परमेश्वराचे नामस्मरण, गुणगान आदरपूर्वक किंवा मोठया प्रेमाने चाललेले असते, तिथे तो स्वतःच उपस्थित असतो. त्याला शोधण्यासाठी कुठे दुसरीकडे जावे लागत नाही. आपल्याजवळच तो सदैव उभा असतो. वरील अभंगात तुकाराम महाराजांनी पण हेच सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा ‘ जेथे नाम तेथे माझे प्राण ‘ असे म्हणतात.
नाम घेणे हे वरवर सोपे वाटते. गोंदवलेकर महाराजांचे ३६५ दिवसांच्या प्रवचनाचे एक पुस्तक आहे. यातील प्रत्येक प्रवचनात गोंदवलेकर महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळी उदाहरणे देऊन नामाचा महिमा आपल्याला पटवून दिला आहे. त्यामुळे नाम घेणे सोपे आहे, त्यात विशेष ते काय असे आपल्याला वाटते? पण जी गोष्ट ऐकायला सोपी वाटते, ती करायला तेवढीच कठीण असते. कारण ती करण्यासाठी निर्धाराची गरज असते. आपण कमी पडतो ते इथेच! रामनामाचे किंवा भगवंताच्या नामाचे वेड लागले पाहिजे. ज्यांना एखाद्या गोष्टीचे वेड लागते, असेच लोक जीवनात काही करून दाखवतात. इथे समर्थ आपल्याला पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यांना रामनामाचे पिसे म्हणजे वेड लागले आहे असे समर्थ म्हणतात. भगवान शंकर एवढे देवाधिदेव. परंतु ते देखील रामनाम जपत असतात. त्याचे महत्व वारंवार माता पार्वतीला समजावून सांगत असतात.
रामाची भूपाळी गाताना समर्थ म्हणतात…
उठोनिया प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥
भाविक जनहो, प्रातःकाळी उठून रामनामाचे स्मरण करा. तो चंद्रमौळी म्हणजे स्वतः शिवशंकर देखील शैलपुत्रीसह म्हणजे माता पार्वतीसोबत श्रीरामांचे ध्यान करतो.
स्वसंवाद ::
१. मी माझे दोष दूर करण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी बाह्य साधनांमागे धावतो आहे, की माझ्याच अंतरी रामनामाचा उजेड पाडून अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतोय?
२. मनातल्या मनात नाम घेताना माझे मन संसाराच्या चिंतेत ‘यांत्रिकपणे’ भटकत राहते का? माझ्या नामात आदर आणि एकाग्रता आणण्यासाठी मी काय करायला हवे?
३. गोंदवलेकर महाराजांच्या वचनानुसार, “जेथे नाम तेथे माझे प्राण” यावर माझा विश्वास आहे का?
४. भूपाळीत म्हटल्याप्रमाणे जर प्रत्यक्ष चंद्रमौळी शिवशंकर शैलबाळीसमवेत उठोनिया प्रातःकाळी रामनाम जपत असतील, तर मग माझ्या दिवसाची सुरुवात मी रामनामाने करतो का?
– क्रमशः श्लोक ९१ आणि ९२
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





