सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ परमेश्वराचे दर्शन… लेख क्र. १७ – देणाऱ्याचे हात हजार… ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

देणाऱ्याचे हात हजार…

माझ्या वर्गातील ऋजुताच्या (नाव बदललेले) वडिलांचा अपघात झाला होता.

घरची अत्यंत गरिबी. नोकरी नव्हती कारण कंपनी बंद झालेली होती. नाईलाज म्हणून कुठेतरी ताडीच्या दुकानावर रात्री दहा वाजेपर्यंत काम करत. तिथूनच रात्री घरी परत येताना त्यांना अपघात झाला.

पायाच्या हाडांचा चुरा झालेला, पार्ल्याला कूपर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं.

समजल्याबरोबर बघायला हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना पाहिलं मात्र, मला भडभडून आलं. परिस्थितीनं माणूस किती अगतिक आणि लाचार बनतो, नाही का! पायात सळी घातल्याने पूर्ण पाय प्लॅस्टरमध्ये आणि पराकोटीचा केविलवाणा चेहरा. खूप वाईट वाटलं.

“ऋजुताची आई कुठे आहे? , ” विचारलं, तर त्या फोन करायला खालच्या मजल्यावर गेल्या आहेत असं कळलं. त्या येईपर्यंत ऋजुताच्या वडिलांशी गप्पा मारत बसले.

पंधरा वीस मिनिटांनी पाय ओढत येणाऱ्या ऋजुताच्या आई दिसल्या. त्यांच्याकडून कळलं की धावपळ करणारे कोणी नव्हते, त्या एकट्याच सगळीकडे पळत होत्या. रात्री वॉर्डमध्ये बायकांना राहण्याची परवानगी नव्हती म्हणून गावाहून त्यांनी भावाला बोलवलं होतं.

त्या स्वतः स्वयंपाकाची कामं करत, तीही बंद झाली होती, कारण त्यांना दिवसभर दवाखान्यात रहावं लागायचं. हे सगळं सांगताना त्यांना आतून येणारे दुःखाचे कढ मला जाणवत होते.

मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला मात्र, त्यांच्या दुःखाचा बांध फुटला.

“काही काळजी करू नका, बाबांना लवकर बरं वाटेल. जीवावरचं पायावर निभावलं म्हणून देवाचे आभार माना. काही मदत लागली तर मला नक्की सांगा, ” असं म्हणून मी पर्समधले पाचशे रुपये काढून त्यांना दिले.

“नको बाई पैसे. तुम्ही स्वतः यांना भेटायला – बघायला हॉस्पिटलमध्ये आलात हेच आमच्यासाठी खूप आहे, ” असं म्हणत त्या पैसे परत देऊ लागल्या.

मी म्हटलं, “काय हो? तुमच्या मोठ्या बहिणीने पैसे दिले असते तर घेतले असते ना? ” 

खरंच, त्यांना पैशांची खूप गरज होती. एरवी मला पैशांचं कौतुक नसतं, पण त्या घटकेला माझ्याजवळ जास्त पैसे असायला हवे होते, असं मला राहून राहून वाटायला लागले.

घरी आल्यावर, सर्वप्रथम मी त्या हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या माझ्या एका माजी विद्यार्थ्याशी संपर्क साधला आणि ऋजुताच्या बाबांना सर्व मदत करायची विनंती केली. त्यानेही आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे ती मान्य केली. ते हॉस्पिटलला असेपर्यंत ते रोज त्यांच्याकडे चौकशीला जात असे, औषधे देत असे.

पण त्यांच्या उपचाराच्या खर्चासाठी, तात्पुरते तरी घर चालवण्यासाठी पैशांची काहीतरी तजवीज करणं गरजेचं होतं.

काही विचार करून मी ऋजुताच्या वर्गातील काही निवडक पालकांना भेटायला बोलावलं. भीतभीतच मी ऋजुताच्या वडिलांच्या अपघातांविषयी आणि त्यांच्या घरच्या सध्याच्या परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली आणि यथाशक्ती मदतीचं आवाहन केलं.

आमच्या शाळेतल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती सर्वसाधारणच होती. त्यामुळे क्षणभर मला वाटलंही की पालक म्हणतील, “तुम्हाला करायची असेल तर करा तुम्ही मदत, आम्हाला कशाला वेठीस धरता? “

पण मी याही बाबतीत किती भाग्यवान आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. “बाई, अशा गोष्टींसाठी आम्हाला हक्कानं बोलवायचंच. आम्ही सगळेच मदत गोळा करू. तुम्ही सांगताय म्हणजे पैसे योग्य पद्धतीनेच वापरले जाणार याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही कोणताही संकोच बाळगू नका. “अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पालकांकडून मिळाली.

आणि हे नुसतं, तोंडदेखलं आश्वासन नव्हतं. पालकांनी पैसे आणून द्यायला सुरुवात केली. पन्नास रुपयांपासून अगदी पाच हजार रुपयांपर्यंत लोकांनी मदत केली.

वेळोवेळी जमा झालेले पैसे ऋजुताच्या आईला देत गेलेच. नंतर आलेले पैसे आणि साडी देऊन, मातृदिनाच्या दिवशी त्यांची ओटी भरावी, आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हरवलेलं हास्य, थोड्या प्रमाणात का होईना, त्यांना परत मिळवून द्यावं, हीच इच्छा आहे.

आणि हजारो हातांनी देणाऱ्या माझ्या दानशूर आणि मनाने तितक्याच श्रीमंत असणाऱ्या पालकांमुळे ती नक्कीच पूर्ण होईल.

(ऋजुताच्या वडिलांचे पाय व्यवस्थित सुधारले. आता ऋजुता, आई व वडील सर्व छान आहेत.) 

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted