सुश्री शुभदा जोशी

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग – 3 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

आनंद म्हणजे झुळूक! सहज अलगद स्पर्शून जातो पण पकडून ठेवता येत नाही मुठीत! काही क्षणच किंचित बरं वाटतं… आणि भुर्रकन उडून जातो तो. पुन्हा आपलं जैसे थे! 

कशामुळे सुखावते मी? सगळ्यात जास्त वेळा… कुणी माझ्याबद्दल चांगलं  बोललं की… तोंड देखली स्तुती किंवा भारावून जाऊन केलेली स्तुती समजते, त्याबद्दल नाही बोलत मी पण माझ्या प्रयत्नांचे आवर्जून कुणीतरी कौतुक केले, खरंतर दखल घेतली गेली माझ्या असण्याची, कामाची की बरं वाटतं. 

त्यातही हे कौतुक किती मनापासून आहे, कितपत  खरं आहे, नेमकं आहे का अशा अनेक बाबींवर त्या आनंदाची तीव्रता अवलंबून असते.

याचा अर्थ इतरांवर अवलंबून आहे का माझा आनंद? माझ्या हातात नाही का? नाही नाही अगदी असं नाही म्हणता येणार! त्या वेळची माझी मनस्थितीदेखील पूरक असायला हवी ना? तर घेता येईल मला ते कौतुक! पण काहीही म्हणा, appreciation हा बऱ्यापैकी खात्रीचा मार्ग आनंदापर्यंत पोचण्याचा हे मात्र मानावे लागेल. 

अनेकदा सोशल मेडियामध्ये मी तुम्हाला चांगले म्हणते, तुम्ही मला म्हणा असा खेळ चाललेला जाणवतो. हे म्हणजे ‘fishing for the compliments’ झाले.

असला ओढून ताणून आनंद नको बाबा आपल्याला!

माझ्या मनात जर सभोवतालच्या लोकांबद्दल प्रेमाची आणि आस्थेची ज्योत तेवत असेल तर आपसूकच माझ्या असण्यातून, वागण्यातून आनंदाची सुखद झुळूक लोकांना अनुभवायला मिळते नि साहजिकच ती परतून माझ्यापर्यंतही पोचते. खरंतर ती आपली आपल्याला देखील जाणवत रहाते…   

हृदयातली प्रेमाची ज्योत जेव्हा अलगद सुलगते…त्यात कोणतीही अपेक्षा नसते, संपूर्ण स्वीकार असतो, आपलं मानलेलं असते. कुणासाठी तरी खूप आस्था, प्रेम वाटतं, काही तरी करावसं वाटतं… अगदी स्वतः त्रास सोसून देखील… ही भावना किती सुरेल असते! 

मनातल्या अस्वस्थतेला, असाहायतेला, निराशेला पार करण्याचं बळ लाभतं त्यातून… मात्र तिथवर  पोचण्यात किती अडचणी? निखळ प्रेम आणि स्वीकार येतच नाही अनुभवाला. किती तरी ‘पण…’ असतात मध्ये. तक्रारी, जुने अपेक्षाभंग, आरोप अशा अनेक गोष्टी त्या प्रेमाच्या ज्योतीला जीवच धरू देत नाहीत. त्यासाठी भूतकाळात त्या त्या क्षणात शिरून गोष्टी resolve कराव्या लागतात, पाहिल्यांदा स्वतःच्या मनात आणि नंतर त्या व्यक्तीपर्यंत पोचून देखील! आपला दृष्टिकोन बदलला असेल तर सकारात्मक प्रतिसाद निश्चित मिळणार… 

अगदी जवळच्या आणि प्राथमिक – जैविक नात्यातल्या माणसांबरोबर जगताना आजवर झालेल्या जखमा, ओरखडे आपण जर वागवत राहिलो बरोबर तर ते नाते आणखी आणखी कडवट बनत जाते. ते नाते heal व्हायला हवे तर त्यासाठी जखमा बऱ्या व्हायला हव्यात. ही वाट चालून जाण्यासाठी आपल्याला उर्मी आणि बळ लाभो.

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments