श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ हयातीचा दाखला.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

ज्यांना दरमहा पेन्शन मिळते, त्यांना प्रत्येक वर्षअखेरीस ‘हयातीचा दाखला’ सादर करावा लागतो.. जेणेकरून त्यांना आपण जिवंत असून, पेन्शन बंद न करता चालू रहावी हे संबंधित खात्याला लक्षात आणून द्यावं लागतं..

काळ बदलला.. आता मात्र आपण ‘हयात’ आहोत, हे आपल्या फेसबुकवरील आप्तस्वकीयांना समजण्यासाठी, त्यावर कार्यरत रहावं लागतं…  

आता एखाद्या मित्राचा शोध घेणं फेसबुकमुळे, सहज शक्य आहे.. त्याचं नाव ‘सर्च’ करायला टाकल्यानंतर त्याने जर आपला फोटो टाकलेला असेल तर तो लगेच सापडू शकतो.. 

गेले दहा वर्षे मी फेसबुकवर आहे.. या कालावधीत कित्येक फेसबुकफ्रेण्ड, फेसबुकवर आले आणि गेले.. सुरुवातीला माझ्याकडून फेसबुकचा वापर जास्त प्रमाणात नव्हता.. कोरोना सुरु झाला आणि गेल्या दोन वर्षांत माझी फेसबुक फ्रेण्ड्सची संख्या शेकड्यांमध्ये वाढली.. 

मला त्या दोन वर्षांत घरी बसून राहिल्याने, लेखन करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला.. मी रोजच वेगवेगळ्या विषयांवर लिहित राहिलो.. ते लेख वाचून असंख्य वाचक माझे मित्र झाले.. कधी आवर्जून ते फोन करुन बोलू लागले.. मित्र परिवार वाढत गेला. 

आता जर मी कधी कामाच्या गडबडीत काही दिवस पोस्ट टाकू शकलो नाही तर, मला काहीजण विचारतात.. ‘बरेच दिवस झाले, आपण पोस्ट टाकलेली नाही..’ ‘काय सुट्टी घेतली का!’ ‘बाहेरगावी गेला होता का?’ इत्यादी..

याला कारण म्हणजे, फेसबुकवर रोजच भेटायची आपल्याला सवय लागलेली असते.‌. जर ती व्यक्ती दोन चार दिवस, फेसबुकवर दिसली नाही तर मनात नाही नाही त्या शंका येतात.. काळजी वाटू लागते.. अलीकडे कामाशिवाय कोणीही कुणाला फोन करीत नाही.. काही विचारायचं असेल तर व्हाॅटसअपवर विचारलं जातं.. ती व्यक्ती रोजच व्हाॅटसअप पहात असेल तर उत्तर लगेच मिळू शकतं. काहीजण आवर्जून सांगतात की, ‘मला व्हाॅटसअप केलं की फोन करुन सांगत जा.. मी ‘व्हाॅटसअपवेडा’ नाहीये..’ असे ‘सेलिब्रिटी’ फेसबुकवर मात्र सतत कार्यरत असतात.. 

माझे एक मित्र आहेत, ते रोजच माहितीपूर्ण अशा पोस्ट नेहमी टाकत असतात. त्यांच्या पोस्ट वाचण्याची मला सवय लागलेली आहे.. कधी चार दिवस ते फेसबुकवर दिसले नाहीत तर मी त्यांना फोन करतो. मग समजतं, की ते आजारी होते..

फेसबुकच्या या आभासी जीवनात जगताना आपण, कळत नकळत त्यात सहभागी झालेलो असतो.. विविध छंद, कला, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील मोठी माणसं आपल्या संपर्कात असतात.. आपण त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलेलो नसलो तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर व आपुलकी असते.. कधी त्यांची पोस्ट आवडल्याचे त्यांना लिहिल्यास, मैत्री अधिक दृढ होते.. त्यांच्या मनोगतातून, फेसबुक वाॅलवरुन त्यांचा जीवनप्रवास कळतो.. त्यांच्या जीवन संघर्षापुढे आपले प्रश्न अगदी सामान्य वाटू लागतात.. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, जगण्यासाठी उमेद मिळते.. 

आताच्या जमान्यात पत्रव्यवहार, हा लुप्त झालेला आहे. कुणासाठी दोन ओळी लिहून, आठ दिवस उत्तराची वाट पहाण्यापेक्षा व्हाॅटसअप किंवा मेसेंजरवर त्वरीत संपर्क साधता येतो.. 

पाच हजारांची फ्रेण्डलिस्ट असणाराही, फेसबुकवर एकटा पडू शकतो.. तो फेसबुकवर कसा व्यक्त होतो, हे महत्त्वाचे असते.. काहीजण सतत टिका करीत असतात.. काहीजण एखाद्या पक्षाचे समन्वयक म्हणून कार्यरत असतात.. काही उपदेशाचे ‘रेडिमेड’ डोस पाजत असतात.. इथं जर तुम्ही जसे आहात तसेच राहिलात, तर अधिक लोकमान्यता मिळते.. 

मला माझं फेसबुक समृद्ध असल्याचा सार्थ अभिमान आहे.. कारण माझ्याकडे दिग्गज कवी, लेखक, चित्रकार, सिने-नाट्य कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, प्रकाशक, प्रिंटर्स इत्यादी क्षेत्रातील असंख्य स्त्री-पुरुष संपर्कात आहेत.. त्यातील कित्येकांनी साहित्य व कला प्रांतातील उच्चतम पुरस्कार मिळविलेले आहेत..

मी तर फेसबुकवर कार्यरत आहेच, माझेही हे सर्व मित्र असेच ‘हयात’ असल्याची जाणीव करुन देत कार्यरत रहावेत, एवढंच माझं परमेश्वराकडे ‘मागणं’ आहे!!

© सुरेश नावडकर

१२-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments