शोभा जोशी
वाचताना वेचलेले
☆ “सुदामा…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆
सुदाम्यासोबत बोलता बोलता श्रीकृष्ण कधी त्याचे पाय दाबू लागले, हे सुदाम्याला कळलंच नाही. सुदामा तर झोपून गेला होता, पण कृष्ण स्वतःच्या विचारांत मग्न होऊन त्याचे पाय दाबत दाबत बालपणाच्या आठवणी बोलत होते. इतक्यात रुक्मिणीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.
कृष्ण दचकले. आधी त्यांनी रुक्मिणीकडे पाहिले, मग सुदाम्याकडे, आणि परिस्थिती समजताच तेथून उठून आपल्या कक्षात आले.
कृष्णांची अशी अवस्था पाहून रुक्मिणी म्हणाल्या, “स्वामी, आज तुमचं वर्तन फारच अद्भुत वाटत आहे.
तुम्ही.. जे, या जगातील सर्वात मोठे सम्राट जरी द्वारकेत आले तरीही जरा सुद्धा प्रभावित होत नाही, ते आपल्या मित्राच्या आगमनाच्या बातमीने इतके भावूक झालात की जेवण सोडून उघड्या पायाने त्याला घ्यायला धावत गेलात.
तुम्ही, ज्यांना कोणतंही दुःख, कष्ट किंवा आव्हान कधी रडवू शकले नाही, अगदी गोकुळ सोडताना माई यशोदांच्या डोळ्यातले अश्रू पाहूनही तुम्ही रडला नाहीत, ते तुम्ही तुमच्या मित्राचे जीर्ण- शीर्ण आणि जखमांनी भरलेले पाय पाहून इतके भावुक झालात की तुमच्या अश्रूंनीच त्याचे पाय धुतले.
कूटनीती, राजकारण आणि ज्ञानाचे शिखर असलेले तुम्ही, तुमच्या मित्राला पाहून इतके तल्लीन झालात की विचार न करता त्याला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती आणि समृद्धी देण्याचा निर्णय घेतलात. “
कृष्ण त्याच आनंदी अवस्थेत म्हणाले, “तो माझा बालपणीचा ‘मित्र’ आहे, रुक्मिणी. “
“पण बालपणी गुरुमातेनं तुम्हा दोघांना वाटून खायला दिलेले हरभरे त्याने तुमच्यापासून लपवून खाल्ले होते ना? मग अशा मित्रासाठी एवढी भावना का? ” सत्यभामेनेही आपली उत्सुकता व्यक्त केली.
कृष्ण हसत म्हणाले, “सुदाम्याने असं कार्य केलं आहे, सत्यभामे, की संपूर्ण सृष्टीने त्याचे आभार मानले पाहिजेत. त्याने ते हरभरे भुकेमुळे नाही खाल्ले, तर यासाठी खाल्ले की त्याला नको होतं की त्याचा मित्र कृष्ण दारिद्र्य पाहो.
त्याला माहिती होतं की ते हरभरे आश्रमात चोरांनी सोडून दिले होते, आणि ते एका ब्राह्मण स्त्रीच्या घरातून चोरले गेले होते. त्याला हेही ठाऊक होतं की त्या ब्राह्मण स्त्रीनं शाप दिला होता की जो कोणी ते हरभरे खाईल, तो आयुष्यभर दरिद्री राहील.
सुदाम्याने ते हरभरे माझ्यापासून लपवून खाल्ले, जेणेकरून मी सुखी राहीन. तो मला ईश्वराचा अंश मानत होता, म्हणून त्याने ते खाल्ले, कारण त्याला वाटलं की जर ईश्वरच दरिद्री झाला, तर संपूर्ण सृष्टीच दरिद्री होईल. सुदाम्याने संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी स्वतः दरिद्री होणं स्वीकारलं. “
“इतका मोठा त्याग? ”असं रुक्मिणीच्या तोंडून आपोआपच निघालं.
“माझा मित्र ब्राह्मण आहे, रुक्मिणी, आणि ब्राह्मण ज्ञानी व त्यागी असतात. त्यांच्या हृदयात जनकल्याणाची भावना ओसंडून भरलेली असते. काही अपवाद वगळता ब्राह्मण असेच असतात.
आता तुम्हीच सांगा, अशा मित्रासाठी हृदयात प्रेम निर्माण होणार नाही तर काय होणार, प्रिये? गोकुळ सोडताना मी म्हणून रडलो नाही, कारण मी रडलो असतो तर माझ्या माईने प्राण सोडले असते. पण माझ्या मित्राचे असे पाय पाहून, त्यातील जखमा पाहून माझं हृदय भरून आलं, रुक्मिणी.
त्याच्या पायांवरील या जखमा आणि आयुष्यातील ही अवस्था फक्त यासाठी झाली की तो आपल्या या मित्राचं भलं इच्छित होता.
रुक्मिणी, कुटुंबाव्यतिरिक्त कुणीही या कृष्णाचं इतकं भलं कधीच इच्छिलं नाही. लोक माझ्याकडून स्वतःचं भलं व्हावं अशी अपेक्षा ठेवतात. पण सुदाम्यासारखे मित्रच असे असतात, जे आपल्या मित्राच्या सुखासाठी स्वेच्छेने दारिद्र्य आणि कष्ट स्वीकारतात.
असे मित्र फार दुर्मिळ असतात, आणि कळत नाही, कोणत्या पुण्यांमुळे मिळतात. आता अशा मित्राला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती दिली तरी ती कमीच पडेल,” कृष्ण भावुक आवाजात म्हणाले.
इथे कक्षात सर्व राण्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, आणि तिथे कक्षाबाहेर उभ्या सुदामा यांच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहत होत्या…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







