शोभा जोशी
वाचताना वेचलेले
☆ “आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆
एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.
एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.
त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.
ज्यामध्ये असे लिहिले होते की..
माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.
अर्थात ही वाटणी कशी व्हायची, असा सर्वांचाच गोंधळ उडाला.
१९ उंटापैकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल.
त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहिले.
त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग?
सगळेच खूप गोंधळले होते.
तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.
तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.
त्याने समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.
मग म्हणाला,” ठीक आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.”
प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.तो म्हणतो की, “त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या.”
तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही.
असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला.
आता एकूण उंट १९+१=२० झाले.
२० उंटापैकी अर्धे मुलाला दिले.
उरले १० उंट.
२० उंटापैकी एक चतुर्थांश हिस्सा मुलीला म्हणजे ५ उंट तिला दिले.
२० उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे ४ उंट नोकराला दिले.
असे एकूण १०+५+४=१९ होतात.
त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता, तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.
अशा प्रकारे १ उंट मिसळल्यानंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले.
त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही १९ उंट आहेत.
५ ज्ञानेंद्रिये.
(डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा)
५ कर्मेद्रिंये.
(हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुदद्वार)
५ पंचप्राण.
(व्यान, समान, अपान, उदाम व प्राण )
आणि…
४ अंतःकरण चतुष्ट्य.
(मन, बुद्धी, चित्त, अहंकार)
असे एकूण १९ उंट आहेत.
माणूस आयुष्यभर या १९ उंटांच्या वाटणीत अडकून राहतो.
आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात “मित्र” रूपी उंट त्यात जोडा.! अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा “मित्र” रूपी उंट सोबत ठेवा.
जोपर्यंत मित्ररूपी उंट आपुल्या आयुष्यात जोडत नाही. तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाहीत.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





