श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- परतीच्या प्रवासात माझ्या मनात प्रमोशन मिळेल कीं नाही हा विचार नव्हताच. गेले चार महिने आपण घेतलेल्या अविरत कष्टाचं, आपल्या अथक प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं, यानिमित्ताने थेट रिपोर्टिंग सेंट्रल ऑफिसला झाल्याचं समाधानच माझ्या मनाला उभारी देत राहिलं. अनपेक्षितपणे घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमांमागे ‘तो’च होता याची पुढे लगेचच आलेली *प्रचीति ‘देता घेशील किती दो कराने’ अशी भावना माझ्या मनात आपसूकच निर्माण व्हावी अशीच होती!! )

आणि हे सगळं घडलं ते अकल्पित असा सुखद धक्का बसावा तसं. त्या सगळ्याच घटना इतक्या एकामागोमाग एक घडत गेल्या होत्या आणि त्या घटनाक्रमांमधल्या धाग्यांची वीणही इतकी घट्ट होती कीं प्रत्येक क्षणी हे खरंच घडतंय कां अशी शंका मनाला चाटून जायची इतकं ते अकल्पित होतं! ‘हे एखादं स्वप्न तर नसेल..? या सुखस्वप्नातून अचानक कोणत्याही क्षणी जाग येईल आणि पुन्हा तेच चटके देणारं हे वास्तव… ‘ अशा विचारांशी मी चाचपडत रहायचो. ते सगळं आठवलं की आजही मी आश्चर्याने थक्क होतो आणि त्यात लपलेल्या ‘त्या’च्या कृपालोभाच्या जाणीवेने पूर्णत: निश्चिंतही..!

माझ्या उत्कर्षाच्या वाटेवरचं या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने समोर आलेलं हे वळण माझ्यासाठी कांहीसं संभ्रमात टाकणारंच होतं. इकडं आड न् तिकडं विहीर अशीच अवस्था. प्रमोशन म्हणजे पुन्हा बदली आलीच. एक्झिक्युटिव्ह पोस्ट म्हणजे जवळपास बदली होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. शिवाय कुठं, कशी होणार हे पुढं ऐनवेळी ठरणाऱ्या सेंट्रल आॅफिसच्या पाॅलिसीवर अवलंबून. इंटरव्ह्यूचे निकाल अगदी आज, उद्या असे कधीही येऊ शकणार होते. अगदी कोणत्याही क्षणी. रोज घरून बॅंकेत जाताना तिथं काय वाढून ठेवलं असेल हाच विचार मनात दबा धरून बसलेला असे.

माझ्या बाबतीतली अनिश्चितता तर इतरांच्या तुलनेत अधिकच काटेरी होती. कारण माझं आधीचं अहमदनगरचं फार तर वर्षभराचं आणि नंतर अचानक स्विकारावं लागलेलं हे चार महिन्यांपासूनचं अकोल्याचं वास्तव्य! या दोन्ही ब्रॅंचेसमधली आधीपासूनच साठून राहिलेली पेंडिंग कामं आणि तिथले मी चार्ज घेण्यापूर्वीच आलेले अॅडव्हर्स आॅडिट रिपोर्टस् हे माझ्यासाठी जड झालेल्या ओझ्याइतकेच पुढे मला अडसर ठरु शकणारे फार मोठे अडथळेही ठरणार होते! कारण नेमके त्याचवेळी आमचे नवीन डी. जी. एम्. (झोनल हेड) परप्रांतातून ट्रान्स्फर होऊन नुकतेच पुण्याच्या झोनल आॅफिसमधे रिपोर्ट झाले होते. या दोन्ही ब्रॅंचेसमधल्या निगेटीव्ह मॅटर्सना मी जबाबदार नसूनही माझ्या, शिवाय माझ्यासारख्या या झोनमधल्या इतरांच्या बाबतीतही त्यांचा अॅप्रोच सरधोपट, पूर्वग्रहदूषित आणि टोकाचा नकारात्मकच असायचा. ब्रॅंच मॅनेजर म्हणून याची झळ कांहीही चूक नसताना मलाच सहन करायला लागायची. त्यामुळे त्यांच्याकडून कसल्या सहकार्याची, प्रोत्साहनाची, कौतुकाची अपेक्षाच नव्हती. शिवाय एक दिवसाआड फाॅलोअपच्या निमित्ताने येणारा त्यांचा प्रत्येक फोन मला फटकारणाराच असायचा. तोवर आजपर्यंत सर्वांकडून मिळणाऱ्या कौतुक आणि प्रोत्साहनामुळेच मी यशाच्या पायऱ्या अतिशय सक्षमतेने भराभर चढत आलो होतो. मात्र यानंतरचं आपलं मार्गक्रमण मात्र अतिशय बिकट वाटेवरच्या खाचखळग्यातून वाट काढतच करावं लागणाराय आणि त्याची मानसिक तयारी करण्याशिवाय पर्यायही नाही हे मी गृहितच धरलं होतं. तरीही या नवीन आलेल्या डीजीएम् साहेबांची असमर्थनीय नाराजी आणि राग यांचे चटके इतर ब्रॅंचमॅनेजर्सच्या तुलनेत या दोन्ही ब्रॅंचेसमुळे मलाच अधिक बसायचे. ब्रॅंचमॅनेजर्सच्या पहिल्याच मिटींगमधे तर सेंट्रल आॅफिसकडून येणाऱ्या सततच्या तगाद्यांमुळे ते आम्हा सर्वांवर प्रचंड संतापले होते. त्या रागाच्या भरात माझ्यासकट अनेकांना..

“नाऊ यू फरगेट फ्यूचर प्रमोशन्स. आय वील टीच यू अ लेसन माईंड वेल. युवर अॅप्रेझल रिपोर्टस् आर इन माय हॅ़ंडस्.. ” ही त्यांनी केलेली दमदाटी कांहीही कारण नसताना सरसकट फर्मावलेली जबरदस्त शिक्षाच ठरणार होती आमच्यासाठी! नागपूर रिजनमधली ही अकोला ब्रॅंचही त्यांच्या पुणे झोनच्या अखत्यारीतच येत असल्याने माझी त्यांच्या तावडीतून सुटका नव्हतीच. कारण माझे अप्रेझल रिपोर्टही त्यांच्याच हातात असणार होते!

या सगळ्याच नकारात्मक पार्श्वभूमीवरचा नुकताच झालेला माझा तो एक्झिक्यूटिव्ह पोस्टचा इंटरव्ह्यू! निदान यावेळीतरी प्रमोशनच्या शक्यतेवर डीजीएम् साहेबांकडून गेलेल्या माझ्या अॅप्रेझल रिपोर्टमधल्या कमी स्कोअरिंगच्या शक्यतेचं सावट मला जाणवत होतंच. अशा परिस्थितीतही प्रमोशन मिळालंच तर कमी स्कोअरींगमुळे माझी आउट आॅफ स्टेट पोस्टींगची दाट शक्यता आणि नाही मिळालं तर अकोला ब्रॅंचला अजून किमान अडीच वर्षे असंच खिचपत पडणं! हे किंवा ते मला दोन्हीही नको होतं. त्यामुळे रोज ब्रॅंचमधे पाऊल ठेवताना आज पुढं काय वाढून ठेवलंय हीच भीतिने काळवंडलेली उत्सुकता मनात असायची. इंटरव्ह्यू देऊन आल्यापासून अशा मन:स्थितीत चारपाच दिवसच गेले असतील. कारण त्याच आठवड्यांत अचानक हातात पडला सेंट्रल आॅफीसमधल्या स्टाफ डिपार्टमेंटकडून माझ्या वैयक्तिक नावावर आलेला एक बंद लिफाफा!

त्या लिफाफ्यात माझं भविष्य बंदिस्त होतं! याआधी सविस्तर उल्लेख केलेल्या सर्व पार्श्वभूमीमुळे जास्तीत जास्त नकारात्मकच सगळं गृहीत धरलेल्या माझ्या मनात या बंद पाकीटात काय असेल याबद्दलची भीती नव्हती तशीच उत्सुकताही नव्हती. ती वेळच अशी होती कीं जे घडेल ते कितीही गैरसोयीचं असलं तरी स्विकारण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता‌. समोरची अनिश्चितता संपवण्यासाठी तो लिफाफा उघडून बघणं एवढंच माझ्या हातात होतं! तोपर्यंत असा क्षण मी कधीच अनुभवला नव्हता. सगळं उध्वस्तही होऊ शकेल हे गृहित असूनही कसा कुणास ठाऊक पण मनात भीतिचा लवलेशही नव्हता. शिक्षाच होणार असेल तर ती मी न केलेल्या चुकीचीच जर असणाराय तर त्यातही मला सुखरुप सांभाळणारा ‘तो’ आहेच कीं! आणखी काय हवं? मी शांतपणे लिफाफा ओपन केला. आतलं पत्र झरझर वाचताना अनपेक्षित अशा सुखद धक्क्याने मी अक्षरश: अंतर्बाह्य शहारलो होतो! त्या गोठून गेलेल्या मन:स्थितीत त्यातला शब्द न् शब्द हा एक चमत्कारच होता माझ्यासाठी! होय. मला प्रमोशन मिळालं होतं आणि आॅल इंडिया पातळीवर निवड झालेल्या एक हजार जणांच्या मेरीट-लिस्टमधे मी पहिल्या शंभरात होतो!! त्यामुळे अर्थातच होणारं पोस्टींग परराज्यात होणार नव्हतं. याही पेक्षा आश्चर्य हे कीं पुढे दोनच दिवसांनी माझी पोस्टींग-ऑर्डरही आलीच. त्यानुसार चीफ मॅनेजर म्हणून मला तात्काळ झोनल आॅफीस, पुण्याला जाॅईन व्हायचं होतं!

‘त्या’ने उदार अंत:करणाने मला असं भरभरून दिलं होतं आणि नेमक्या शब्दात सांगायचं तर ‘ देता घेशील किती दो कराने.. ‘ अशीच माझी अवस्था झाली होती! पण या अत्युत्तम सुखातही एक अनामिक अशी रुखरुख रेंगाळत होतीच. त्यामुळे इतकं सगळं अनपेक्षित घडलेलं असूनही, क्षणार्धात सुरू झालेल्या अभिनंदनाच्या वर्षावातही मी मात्र आतून कोरडाच होतो! कां ते माझं मलाच समजत नव्हतं. गेल्या चारपाच महिन्यात एकदाही सांगलीला घरी जाऊ न शकलेला मी आता पुण्याला म्हणजे घरापासून हाकेच्या अंतरावरच तर जाणार होतो, अकोल्यातून माझी मला हवी तशी कायमची आणि तीही अशी सन्मानाने सुटका होणार होती, आणि तरीही मनाला आनंद नव्हताच झाला. कां ते मलाच समजत नव्हतं आणि म्हणून मी मात्र सगळं मनासारखं घडूनही असं कां होतंय या विचारात अस्वस्थ!

त्या अस्वस्थतेमागचं नेमकं कारण मला अचानक उमगलं ते त्या रात्री मी अंथरुणाला पाठ टेकून शांतपणे अलगद डोळे मिटले तेव्हा! मनातली रुखरुख मग अधिकच तीव्र झाली. एखादं अनामिक असं संकट पुढं दबा धरून बसल्याची ती चाहूल मला स्वस्थ झोपू देईना. मी ताडकन् उठलो. आत आलो. दिवा लावला. देवघरासमोर नतमस्तक होऊन उभा राहिलो. समोरच्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरचं मंद स्मित तसंच होतं. आता जे कांही सांगायचं ते इथंच आणि याच क्षणी! समोर पाटावर बसून मी हात जोडले. अलगद डोळे मिटले आणि…..? मनात रुतून बसलेली, मला नुकतीच जाणवलेली ती रुखरुख नि:शब्दपणे ‘त्या’च्या समोर व्यक्त होत राहिली. मन शांत झाल्यावर मी अलगद डोळे उघडले तेव्हा मनातली रुखरुख नाहीशी झाली होती! आता जे होईल ते ‘तो’ म्हणेल तसंच या विचाराच्या स्पर्शाने मनातला अंधार विरुन गेला होता! मनावरचं ओझं त्याच क्षणी हलकं झालं. पण माझ्या आयुष्यातल्या नव्या पर्वाची तो क्षण हीच आश्वासक सुरुवात ठरणाराय याची मात्र मला कल्पना नव्हती..!

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted