श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग 70 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी देवघरासमोर नतमस्तक होऊन उभा राहिलो. आता जे कांही सांगायचं ते इथंच आणि याच क्षणी! समोर पाटावर बसलो. अलगद डोळे मिटले आणि मनात रुतून बसलेली, मला नुकतीच जाणवलेली रुखरुख नि:शब्दपणे ‘त्या’च्यासमोर व्यक्त होत राहिली. मनातला अंधार विरुन गेला. मन शांत झालं! मनावरचं ओझं त्याच क्षणी हलकं झालं.आता जे होईल ते ‘तो’ म्हणेल तसंच!)

माझं पोस्टींग पुण्याला झाल्यामुळे अकोल्यातल्या प्रतिकूल परिस्थितीतून अतिशय सन्मानाने माझी एक प्रकारे सुटकाच होणार होती. खरंतर त्यामुळेच मला निश्चिंत

करणारा आनंद माझ्या मनात भरून राहिलेला होता. पण हळूहळू तो विरून गेला. कां कुणास ठाऊक पण हा आनंद निखळ वाटेनाच. कां तेच समजत नव्हतं. गेल्या अठ्ठावीस वर्षांत मी जिथे जिथे काम केलं होतं तिथले माझे सर्व वरिष्ठ आणि माझे सहकारी, अकोला ब्रॅंचमधले सध्याचे स्टाफ मेंबर्स सर्वांकडूनच चोहोबाजूंनी माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता पण हसतमुखाने ते स्वीकारत असताना आतून मात्र मी कोरडाच होतो! एक अनामिक अशी रुखरुख मनाला जाणवत होती पण कारण मात्र समजत नव्हतं. त्या रात्री खूप उशीरा अंथरुणाला पाठ टेकली, त्या निवांत क्षणी मनातली ही बोच अधिकच तीव्र झाली. अचानक नजरेसमोर तरळून गेला तो आमच्या पुण्यातल्या झोनल ऑफिसमधील डी.जी.एम् साहेबांचा रागीट चेहरा! त्यांची संतप्त नजर माझ्यावर रोखलेली. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा पांघरूण दूर करीत मी ताडकन् उठून बसलो. मनाला स्पर्शून गेलेला भासच तो, पण मनातली रूखरूख अधिकच तीव्र करणारा! त्याच क्षणी मनातल्या त्या अस्वस्थतेचं कारण त्या संतप्त नजरेतच लपलेलं असल्याचं मला लख्ख जाणवलं. कधीकाळी एका ब्रँच मॅनेजर्स मिटिंगमधे आम्हा सर्वांनाच समज देताना त्यांनी आम्हाला ऐकवलेल्या दमदाटीची आठवण मनात ताजी झाली…

“नाऊ यू फरगेट युअर प्रमोशन. आय वुईल टीच यू अ लेसन. माईंड वेल”.. हे त्यांचे जळजळीत शब्द आठवले. आता झोनल ऑफिसमधे जॉईन होणं म्हणजे रोजच्या मरणाला समोर जाण्यासारखंच होतं हेही लक्षात आलं. माझं झोनल आॅफीसमधे पोस्टिंग झाल्याचं समजताच आनंदून गेलेल्या माझ्या गाफील मनाला या वस्तुस्थितीची जाणीव नव्हतीच.माझ्या अंतर्मनात मात्र ती अव्यक्त रुपात मला टोचणी देत पडून राहिली होती!!

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी माझी अवस्था झाली. मला नवीन जबाबदारी आनंदाने स्वीकारायची तर होतीच, माझ्या कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा अकोल्यापेक्षा माझं पुण्यात असणं कितीतरी पटीने जास्त सोयीचं आणि सुखावहही असणार होतं, पण या सगळ्या सकारात्मकतेला डी.जी.एम. साहेबांच्या रूपातलं भयावह वास्तव छेद देत राहिलेलं! एक प्रकारच्या केविलवाण्या अगतिकतेने मन एकदम मलूलच होऊन गेलं. चोहोबाजूंनी अंधारून आलेल्या अशा मन:स्थितीत ‘त्या’च्याशिवाय मला सावरणारं त्या एकटेपणात दुसरं होतंच कोण? मी पांघरूण दूर सारुन आत धाव घेतली आणि देवघरासमोर नतमस्तक होऊन उभा राहिलो. त्या प्रसन्न, हसतमुख दत्तमूर्तीसमोर बसलो. अलगद डोळे मिटून हात जोडले आणि मनातलं हे सगळं माझ्याही नकळत नि:शब्दपणे आपसूक ‘त्या’च्यापर्यंत पोचत राहिलं! ‘कोणत्याही परिस्थितीत त्या माणसाच्या हाताखाली काम करणं सोडाच, त्याचं तोंड बघायचीही माझी इच्छा नाहीय’ ही माझ्या मनातली भावनाच त्याच्यापर्यंत नेमकी पोचलेली आहे याचं त्याक्षणीचं समाधान येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मला पुरेसं होतं!

आता आहे त्या परिस्थितीत शेवटच्या क्षणी कांहीही बदल होऊ शकणार नाहीय हे स्पष्टपणे माहित होतं.तरीही गच्च भरून आलेलं आभाळ गार वाऱ्याची एखादी झुळूक येताच तिच्या हळूवार स्पर्शाने एका क्षणात मळभ दूर होऊन मोकळं व्हावं तसा माझ्या मनातला अंधार क्षणार्धात नाहीसा झाला! कारण मला माहित होतं, आता यापुढे जे काही होईल ते ‘तो’ म्हणेल तसंच आणि तेच माझ्या हिताचं असणार आहे! आश्चर्य म्हणजे माझ्या मनातला हा विश्वास काय आक्रीत घडवू शकतो याची प्रचितीही मला लवकरच येणार आहे याची मात्र मला त्याक्षणी कल्पनाच नव्हती!

सर्वांचा निरोप घेऊन मी अकोल्याहून प्रस्थान ठेवलं त्या क्षणी आणि पुढे रात्रीच्या पूर्ण प्रवासातही मनावर कसलंच दडपण नव्हतं. नगर आणि अकोला या दोन्ही ब्रॅंचेसमधे मी काम करीत होतो तेही पुण्याच्या त्याच डीजीएम् साहेबांच्या अधिपत्याखाली. पण तेव्हा त्यांच्या नजरेपासून मी कितीतरी दूरच्या अंतरावर होतो. पण आता मात्र उद्यापासून त्यांच्याच ऑफिसमधे त्यांच्या लहरीप्रमाणे काम करायचं म्हणजे रोज नव्या संकटाला आमंत्रण देत रहाण्यासारखंच होतं. पण म्हणून काय झालं? तिथे त्यांच्या हाताखाली इतरही पाच-पन्नास जणं काम करत होतीच की. त्यांच्यापरीनं ते निभावतच आहेत ना? तसंच आपणही निभवायचं. त्यात घाबरण्यासारखं काय आहे? खरं सांगायचं तर हे असे दिलासा देणारे विचार प्रथमच माझ्या मनात येत होते! एखाद्या नकोशा परिस्थितीला सामोरं जाताना जे कांही दुःख, प्रश्न किंवा अडचणी असतात त्या फक्त आपल्यालाच आहेत असंच प्रत्येकाला वाटत असतं. मन जेव्हा शांत, समतोल विचार करतं तेव्हा मात्र त्यातली निरर्थकता आणि दुसरी बाजूही स्वच्छ दिसू लागते. माझंही तसंच झालं होतं. या उलटसुलट विचारांत प्रवासातली ती संपूर्ण रात्र मी जागाच होतो!

पुण्याला ऑफिसमधे सकाळीच मला रिपोर्ट करायचं असल्याने पुरेसा आराम मिळणं शक्यच नव्हतं.

आमच्या झोनल ऑफिसच्या त्या भव्य इमारतीत ब्रॅंचमॅनेजर्स मिटिंगज् किंवा इतरही कांही कामांच्या निमित्ताने यापूर्वी मी अनेकदा आलेलो होतो. त्यामुळे ती वास्तू आणि तो परिसर माझ्या ओळखीचा होता. तरीही आज तिथे मी येत होतो ते तिथलाच एक वरिष्ठ अधिकारी म्हणून. त्यामुळे मनात उत्सुकता होती, चलबिचल होती आणि पुढं काय वाढून ठेवलेलं असेल ही भीति आणि अनिश्चितताही!

मी लिफ्टमधून बाहेर येऊन कॉरिडॉरमधे पाऊल ठेवलं. डी.जी.एम् साहेबांच्या केबिनच्या दिशेने चालू लागलो. मी त्यांच्या प्रशस्त अशा त्या ए.सी.केबीनच्या बंद दाराबाहेर उभा. केबीनचं दार अलगद ढकलून मी तिथंच थबकलो.

“मे आय कम इन सर?”

समोर पाहिलं तर आतील प्रशस्त टेबलामागील रिव्हाल्व्हींग चेअरवर नेहमीचे डी.जी.एम् नव्हतेच. अतिशय प्रसन्न आणि हसतमुखाने माझं स्वागत करणारा हा चेहरा मला ओळखीचा वाटतोय पण यांचं नाव मात्र…..

” वेलकम मिस्टर लिमये. नो फाॅरमॅलिटीज्.प्लीज डू कम..” त्यांनी अतिशय आपुलकीने माझं स्वागत केलं.

यांना मी पूर्वी कधीतरी पाहिलंय पण यांचं नाव…..

हा भास तर नसेल? की स्वप्न?

” आय अॅम मिस्टर वखरे. बेसिकली आय अॅम फ्राॅम नागपूर रिजन. कालच मी चार्ज घेतलाय.”

” आणि इथले आधीचे डी.जी.एम्? ते रजेवर आहेत कां?” ही शक्यताही नाकारता येत नव्हतीच.

” ओह्..यू डिडन्ट नो द एपिसोड?”

“न..नाही सर”

” खूप भयंकर आहे ते. अॅन्ड व्हेरी अनफाॅर्च्युनेट फाॅर हीम. बोलू आपण. आणि तसंही बाहेर दिवसभर याचीच चर्चा चालणाराय. कळेलच तुम्हाला…’ वखरे साहेब हसत म्हणाले.

हा एक चमत्कारच होता माझ्यासाठी. मला हवं ते हवं तसं आणि नेमकं हवं तेव्हा घडवणारा  आणि जे घडेल ते माझ्या हिताचंच असेल हा माझ्या मनातला विश्वास सार्थ ठरवणारा चमत्कार!..पण स्वप्नवत वाटावा असा हा चमत्कार घडला कसा हा मनातला प्रश्न मात्र अजून तरी अनुत्तरीतच होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted