श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ८५ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – त्यादिवशी आजोबांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते अनपेक्षितपणे बरंच कांही मिळाल्याचं समाधान घेऊन. अर्थात या सगळ्यामागचा कर्ता-करवता ‘तो’च होता! )
या घटनेनंतर माझ्या भावी आयुष्याला एक वेगळीच आनंददायी कलाटणी देणाऱ्या अशा कांही अनपेक्षित घटना लागोपाठ घडत गेल्या की आज इतक्या वर्षांनंतरही ते सगळं आठवताना मला जितकं सुखकारक वाटतं तितकंच अनाकलनीयही!
माझ्या आयुष्याला प्रत्येकवेळी असं अनोखं वळण देणाऱ्या त्या अनेक घटनांपैकी लगेचच घडलेल्या एका घटनेला निमित्त ठरला तो मला आलेला एक अनपेक्षित फोन!
मी अकोल्याहून रिलीव्ह झाल्यानंतर इथे पुण्यातील आमच्या झोनल-ऑफिसला चीफ मॅनेजर म्हणून जॉईन झालो ती जुलै २००० मधली गोष्ट. त्यानंतर लगेचच झालेली एम्. डी. व्हिजीट आणि त्यावेळी निर्माण झालेला तो ‘लॉंग पेंडिंग कंप्लेंट’ चा इश्यू हे जे सगळं रामायण घडलं ते मी जॉईन झाल्यानंतरच्या पहिल्याच महिन्यात. या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाच्या रूपातलं अचानक उद्भवलेलं ते चक्रीवादळ शांत होईपर्यंत अर्धा अधिक ऑगस्ट महिना उलटून गेला होता. त्या दरम्यान साठत गेलेली अनेक महत्त्वाची कामं मी हातावेगळी करत असतानाच एक दिवस अचानक तो फोन आला!
त्याकाळात मोबाईल्स नव्हते. ऑफिसचा लँडलाईन नंबर मी इमर्जन्सीसाठी आवश्यकच होता म्हणून फक्त आमच्या सांगलीतल्या घरी देऊन ठेवलेला होता. शिवाय रोज किंवा एक दिवसाआड घरी माझा संपर्क व्हायचा तो रात्री टेलिफोन बूथवरूनच. त्यामुळे हा माझ्या घरून आलेला फोन असायची शक्यता नव्हतीच. टेलिफोन ऑपरेटरने फोन कॉल कनेक्ट करून देताना ‘नाईक म्हणून एकजण बोलतायत’ असं सांगितलं होतं. त्यातून नेमका उलगडा झालाच नव्हता. फोन अॅटेंड केल्यावर समजलं, फोन भ. रा. नाईक सरांचा होता! मला आश्चर्यच वाटलं. सरांनी मला फोन कां केला असेल? आणि माझं हे पोस्टिंग, इथला नंबर हे सगळं त्यांना समजलं कसं?
सरांचा असा अचानक फोन येणं मला अनपेक्षित होतं. आज या फोनच्या निमित्ताने आम्ही खूप वर्षानंतर पुन्हा संपर्कात आलो होतो. बोलण्यासारखं खूप कांही होतं पण त्या बिझी श्येड्युलमधे मनमोकळ्या गप्पा होणं शक्यच नव्हतं. त्या क्षणीचा माझ्या मनातला हा विचार अलगद टिपून घ्यावा तसं सर म्हणाले,
“तू कामाच्या गडबडीत असणार आहेस याची मला कल्पना आहे पण.. “
“नाही हो सर. अहो ही कामं कधीच संपणारी नाहीत. त्याचं कांही विशेष नाहीय. बोला ना सर तुम्ही. माझं इथलं पोस्टिंग, फोन नंबर सगळं मिळवलंत कुठून? ” मी उत्सुकतेनं विचारलं.
“ते तू भेटशील तेव्हा सांगतो सगळं. मी काल संध्याकाळी राजू/नितिन कडे आलोय. उद्या प्रतिभाकडं मुंबईला गेलो कीं मग लगेच पुण्याला येणं होणार नाहीय. तू सध्या पुण्यातच आहेस असं समजलं तेव्हाच तुला फोन करायचं ठरवलं होतं. आज आॅफीस सुटल्यानंतर तू येऊ शकतील कां राजूकडे? म्हणजे भेट होईल. बघ जमलं तर. “
सरांच्या बोलण्यातून त्यांची भेटण्या-बोलण्याची ओढ प्रकर्षाने जाणवत होती. त्यांची धाकटी मुलगी राजलक्ष्मी आणि जावई नितिन देशपांडे पुण्यातच रहात असत. सर त्यांच्याकडे आले होते. ते दोघेही साहित्यिक. यादृष्टीने आम्ही तिघेही समानधर्मी. माझ्या ऑडिट टेन्युअरमधे माझा पुण्यात जेव्हा सलग मुक्काम असायचा तेव्हा झालेल्या आमच्या मोजक्या भेटी आणि गप्पांनंतर खूप दिवसांनी सरांच्यामुळे आज त्या दोघांनाही पुन्हा भेटण्याचा योग येणार होता.
“सर, मी येईन नक्की. ” मी मनापासून म्हणालो.
अहमदनगर आणि नंतर अकोला या लागोपाठच्या बदल्या आणि तिथले त्या त्या वेळचे व्याप यामुळे त्या मधल्या काळात मला फारसा कुणाशीच संपर्क ठेवता आला नव्हता आणि अर्थातच याला नाईकसरही अपवाद नव्हते. असं असताना मुद्दाम माझा नंबर मिळवून त्यांनी मला फोन करावा याचं मला आश्चर्य वाटलं आणि आनंदही! या आधीच्या अगदी सुरूवातीच्या भागांमधे मी सविस्तर वर्णन केलेल्या प्रसंगांपैकी नाईकसरांच्या भेटींच्या संदर्भातले कांही मोजकेच प्रसंग आहेत. तरीही आम्हा दोघांच्या मनातला परस्परांबद्दलचा सद्भाव आणि आमचे ऋणानुबंध यांची कल्पना येण्यासाठी ते पुरेसे आहेत. त्या मोजक्या प्रसंगात वर्णन केल्याप्रमाणे त्या त्या प्रत्येकवेळी सर जेव्हा जेव्हा मला भेटले ते अगदी योगायोगाने भेटावेत तसेच पण त्या सगळ्याच भेटी मला खूप कांही देण्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणलेल्या असाव्यात तशा अतर्क्यच होत्या माझ्यासाठी! या संदर्भातली खूप वर्षापूर्वीची मी माधवनगर शाखेचा मॅनेजर म्हणून चार्ज घेतलेल्या पहिल्या दिवशीच अचानक झालेली सरांची भेट या अर्थाने प्रातिनिधिक ठरावी अशीच होती! आज अशा सगळ्या घटना प्रसंगांचं मनोमन विश्लेषण करत असताना तर सरांशी झालेल्या सगळ्याच भेटींमधलं हे वेगळेपण मला अधिकच लख्ख जाणवतंय. आणि अर्थातच आज सरांचा फोन आल्यानंतर झालेली आमची भेटही अशीच एक अतिशय मोलाची आठवण म्हणून माझ्या मनात मी कायमची जपून ठेवलीय!
मी ऑफिस सुटल्यावर परस्परच सरांना भेटायला देशपांडे कुटुंबीयांच्या घरी गेलो. त्या सर्वांना भेटणं, मनसोक्त गप्पा सगळंच अपेक्षेप्रमाणे भरपूर आनंददायी होतं. सरांनी नेहमीप्रमाणे माझ्या लेखनप्रवासाबद्दल आपुलकीने चौकशी केली. सरांचं विशेषत: आध्यात्मिक विषयांवरील लेखन ही त्यांची खासियत होती. शिवाय त्यांच्या मनात माझ्या कथा लेखनाबद्दलही विशेष औत्सुक्य आणि कौतुक होतं. त्यांच्या मनात असणारा माझे बाबा आणि आम्ही कुटुंबीय यांच्याबद्दलचा लोभच या कौतुकाला निमित्त ठरत असावा. कारण बँकेतल्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि कामांचे व्याप यालाच माझं प्राधान्य होतं जे मी आवडीने आणि मनापासून करत होतो. त्यामुळेच आवड असूनही फारसं लेखन होत नसल्याची खंतही मला कधी जाणवतही नव्हती. मनातलं कुणाशी तरी मोकळेपणानं बोलून टाकावं असं कधीकधी उत्कटतेनं वाटतं तेव्हाच आपण जवळच्या व्यक्तींसमोर मनापासून ते व्यक्त करतो, तसंच माझं लेखनाच्या बाबतीत होत असे. कितीतरी कथाविषय सुचायचे, मनात ठाण मांडून रहायचे, कधी कधी खूप त्रासही द्यायचे तेव्हाच मुद्दाम वेळ काढून त्याला कथारूप दिलं जायचं. या अर्थाने माझं लेखन स्वान्त सुखायच असायचं. सरांनी प्रत्येकवेळी केलेल्या कौतुकाइतकंच त्यांनी माझ्या कथा आवर्जून वाचून त्यांचं केलेलं सखोल विश्लेषण मला प्रोत्साहित करणारं ठरत असे.
त्यादिवशी सहज गप्पांच्या ओघात सरांनी ‘राजलक्ष्मी आणि नितिनने त्यांची स्वतःची ‘चिरानी प्रकाशन’ संस्था सुरू केल्याचं’ ही आवर्जून सांगितलं. ती तासाभराची भेट आवरती घेत गप्पा संपवून मी सरांना नमस्कार करून सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
तिथून बाहेर पडल्या क्षणापासून घरी पोहोचेपर्यंत सरांच्या संदर्भातल्याच विचार आणि आठवणींनी मनात गर्दी केली होती. पण दुसऱ्या दिवशी नेहमीचं धावतं रुटीन नेहमीच्याच वेगाने पुन्हा सुरू झालं आणि सरांच्या आठवणींचा कप्पा मग आपोआपच बंद झाला.
सरांची अचानक झालेली ही भेट वरवर पहाता योगायोगाने घडलेल्या एखाद्या घटनेसारखी वाटली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. ती भेट लवकरच मला अमूल्य असं कांही देण्यासाठी एक निमित्त ठरणार होती हे मला तेव्हा माहित नव्हतं एवढंच!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






