श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – बरे झाले आली ज्याच्या त्याच्या घरा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
बरे झालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा /
चुकला पान्हेरा ओढाळांचा //१//
*
बहु केलें दु:खी त्याचिया सांभाळे/
आतां तोंड काळे तेणें लोभें //२//
*
त्यचिया अन्यायें भोगा माझे अंग /
सकळही लाग घ्यावा लागे//३//
*
नाही कोठें स्थिर राहो दिलें क्षण/
आजिवरि सिण पावलों तो //४//
*
वेगळल्या खोडी केली तडातोडी /
सांगावया घडी नाहीं सुख //५//
*
निरवूनि तुका चालिला गोवारें /
देवापाशी भार सांडवूनि //६//
*
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
तुकाराम महाराज या अभंगात परमेश्वरानी आपल्याला दिलेली इंद्रिये, आणि त्याना दिलेली शक्ती व बुद्धी याच्या विषयी सांगत आहेत. देवाने मला दिलेल्या या नाठाळ इंद्रियांचा संग आता संपला. ही सगळी देवानेच मला दिली होती. ती मी ज्यानी मला दिली होती त्याच्या घरी पोहचवली. मी त्यांचा लोभचं सोडून दिला आहे. त्यांनी आपापले तोंड काळे करून माझ्यापासून दूर जायचे ठरवले आहे. त्यांनी माझ्यावर खूप अन्याय केले. पण त्याचे सारे भोग मात्र माझ्या देहाला भोगावे लागले. मला त्यांनी कोठेही स्थिर होवू दिले नाही. आजवर त्यानी मला खूप त्रास दिला. क्षणभराचीही कधी विश्रांती घेवून दिली नाही. त्याचा मला खूप शिणवटा झाला आहे. मी त्यांचा सांभाळ केल्यानेच त्यांनी अनेक खोड्या केल्या. माझ्या जगण्याची तोडफोड करून त्याची वाट लावली. कुणाला सांगण्या पुरतेही सुख त्यांनी माझ्याजवळ ठेवले नाही. आता मीच ह्याचा सहवास संपवण्याचा विचार करून त्यांना देवाकडे परत करून मोकळा झालो आहे. यातून बाहेर पडलो आहे.
देवाने अनेक इंद्रिये दिली. त्याना चालवण्याची बुद्धीही देवानेच दिली. पण मला हे कळले की हे सर्व देवाचेच आहे. मग मी त्यांचा अवखळपणा ओळखून, त्यांचा हुडपणा पाहून ते सर्व ज्याचे त्याला म्हणजे परमेश्वरालाच देवून टाकले. पण हे माझ्या ध्यानी येईपर्यंत त्यानी मला फार भंडावून सोडले. त्यांचा मोहाने सांभाळल्या मुळेच किती तरी दु:खे मला भोगावी लागली. त्यांच्या मुळेच माझ्या कडे पापे जमा होते गेली. किती तरी चांगल्या गोष्टींची ताटातूट झाली. मला क्षणभर सुद्धा शांतपणे जगता आले नाही.
आता मला सारे काही कळून चुकले आहे. म्हणून देवाने मला जे जे दिले होते ते सर्व देवांचे देवालाच देऊन मोकळा झालो आहे. म्हणूनच मला आता कसलीच अडचण उरली नाही.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






