सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ९ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगांतून कळलेले संत तुकाराम(२)

आजच्या लेखातही अभंगातून कळलेल्या संत तुकाराम महाराजांविषयी

आपण बोलणार आहोत.

 बोलावा विठ्ठल/ पहावा विठ्ठल/

 करावा विठ्ठल/ जीवे भावे//

 येणे सोसे मन/ झाले हाव भरी/

 परती माघारी/ येत नाही//

 बंधनापासूनी/ उकलल्या गाठी/

 देता आली मिठी/ सावकाश//

 तुका म्हणे देह/ भरीला विठ्ठले/

 काम क्रोधे केले/ घर रिते//

 विदुषी किशोरीताई अमोणकर यांनी हा अभंग त्यांच्या गोड गळ्यातून गाऊन अतिशय प्रसिद्ध करून ठेवला आहे.

 या अभंगातून आपल्याला स्पष्ट दिसून येते की तुकाराम महाराजांची भक्ती आता सगुणाकडून निर्गुणाकडे जात चालली आहे. विठ्ठलाची भक्ती करत असताना या ठिकाणी त्यांची देहबुद्धी नाहीशी झालेली आहे. म्हणून ते म्हणतात, ” मी ब्रह्म आहे या भावनेच्या अवस्थेत माझा जन्म झाला. माझे सगळे नवस पूर्ण झाले व सर्व आशा नाहीशी झाली. मी आत्मा आहे या अनुभवाने बलवान झालो. “

 मी ची मज व्यालो/ पोटा आपुलिया आलो/

 आता पुरले नवस/ निरसोनी गेली आस/

 दोन्हीकडे पाहे/ तुका आहे तैसा आहे//

 काही जाणो नये /पांडुरंगाविण/

पावीजेल सीण/ संदेहाने//

 भलतिया नावे/ आळविला पिता/

 तरी तो गात्रा धणी/ हरी कथा//

 तुका म्हणे उपजे / विल्हाळआवडी/

 करावा तो घडी/ घडी लाहो//

एका पांडुरंगा व्यतिरिक्त कसलाच विचार करू नये. कोणत्याही कारणाने कळवळ्याने मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते. हरी कथेने सर्वांगांचे समाधान होते. एक हरीकथाच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते.

अशाप्रकारे तुकारामांची अवस्था हरीमय झाली आहे.

म्हणून पुढे ते म्हणतात,

 दास झालो हरिदासाचा/*बुद्धी काया मने वाचा/

 तेथे प्रेमाचा सुकाळ/टाळ मृदुंग कल्लोळ//*

नासे दुष्ट बुद्धी सकळ/समाधी हरिकीर्तनी//

ऐकता हरी कथा/भक्ती लागे त्या अभक्ता//

 देखोनी कीर्तनाचा रंग/ कैसा उभा पांडुरंग//

 हे सुख ब्रह्मादीका/ नाही नाही म्हणे तुका//

हरी प्रेमाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी महाराजांनी बऱ्याच ठिकाणी रूपकात्मक अभंग रचना केली आहे.

 या ठिकाणी ते म्हणतात…

 रवीचा प्रकाश/ तोचि निशी घडे नाश/

 झाल्या बहुवस तरी/ त्या काय दीपिका//

बंधमोक्षाचे वर्णन करताना महाराज रात्र आणि दिवस याची उपमा देतात. सूर्यप्रकाश आला की रात्र नाहीशी होते. अनेक दीप लावून रात्र संपत नाही. त्याप्रमाणेच सर्वोत्तम असा श्रीहरी तो माझ्या जीवात राहिला तरच त्याची सर्व रहस्य मला कळतील. ते दुसरा दृष्टांत देतात.

सवे असता धनी/ आड ये न सके कोणी/

नलगे विनवणी/ पृथकाची करावी//

प्रत्यक्ष मालकच आपल्याबरोबर असला तर वाटेत कोणाची विनवणी करावी लागत नाही, तसेच आपल्याजवळ श्रीहरीचे प्रेम असले तर आपल्या मार्गात काहीच अडथळे येत नाहीत.

म्हणजेच जन्म मरणाच्या बंधनातून आपण सहज मुक्त होतो.

या ठिकाणी तुकारामांना भक्ती सुखाबरोबर ब्रह्मसुख भेटले आहे.

 नाम घेता मन निवे/ जीवे अमृतची स्त्रवे/

 होताती बरवे /ऐसे शकुन लाभाचे//

 मन रंगले रंगले/ तुझ्या चरणी स्थिरावले/

 केलीया विठ्ठले/ ऐसी कृपा जाणावी//

 *सुख भेटता आले सुखा/ निध सापडला मुखा/

 तुका म्हणे लेखा/ आता नाही आनंदा//

 सर्वत्र अवर्णनीय असा आनंद आहे.

 जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत/

 त्यांचे पायी चित्तठेवीन मी//

 जयासी विठ्ठल आवडे लोचनी/

 त्याचे पायवणी स्वीकारीन//

 विठ्ठलाची जीही दिला सर्व भावा/

 त्यांच्या पायी जीव ठेवीन मी//

 तुका म्हणे रज होईन चरणींचा/

 म्हणावी ती त्यांच्या हरीचे दास//

तुकाराम भक्तिमार्गाला लागले आहेत, आता ते मायामोहातून बाहेर पडले आहेत, परंतु आपण संसार बंधनात अडकलो याचे त्यांना दुःख आहे. ते दुःख आपल्या अभंगातून व्यक्त करतात

 पंचभूतांचे सापडलो संदी/

 घातलीसे बंदी अहंकारे//

 आपल्या आपण बांधविला गळा/

 नेणेची निराळा असताही//

 कासया हा सत्य मानीला संसार/

 काहे केले चार माझे माझे//

 का नाही शरण गेलो नारायणा/

 का नाही वासना आवरिली//

 किंचित सुखाचा धरीला अभिळास/

 तेणे बहु नास केला पुढे//

 तुका म्हणे आता देह देऊ बळी/

 करुनी सांडू होळी संचिताची//

तुकारामांनी आपले सर्वस्व पांडुरंग चरणी वाहिले आहे आणि ते देवाच्या विविध कथांचा संदर्भ घेऊन विठ्ठलाला आळवीत आहेत.

 फिरविले देऊळ जगामाजी ख्याती/

 नामदेवा हाती दूध प्याला//

(नामदेवाने आपल्या भक्ती द्वारा विठ्ठलाचे देऊळ फिरवून प्रवेशद्वार आपल्यासमोर आणले अशी कथा आहे.)

 भरियेली हुंडी नरसी मेहत्याची/

 *धनाजी चाट्याची सेते पेरी//

 मिराबाई साठी प्याला विषाचा/

 लाख्याकोला त्याचा ढोल पिटी//

 

 कबीराचे मागी विणू लागे शेले/

 मूल उठविले कुंभाराचे//*

 या सर्व संतांची कामे पांडुरंग स्वतः करत होता

 त्याचप्रमाणे तुकारामांकडेही देवाने लक्ष द्यावे

 म्हणून ते विनवणी करतात…

 आता तुम्ही दया करा पंढरीराया/

 तुका विनवी पाया वेळोवेळा//

विठ्ठल भेटीची तुकाराम महाराजांना किती तळमळ लागून राहिली होती हे आतापर्यंत अनेक अभंगातून आपण पाहिले. आता पुढील काही अभंगातून त्यांची व विठ्ठलाची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनाची अवस्था पाहण्यासारखी आहे.

 बहुता दिसांची आजी झाली भेटी/

 झाली होती तुटी काळ गती//

 येथे सावकाश घेईन ते धणी/

 गेली अडचणी उगवोनी//

 बहु दुःख दिले होते घरी कामे/

 वाढला हा श्रमे श्रम होता//

 बहु दिसत होता सांडीला मारग/

 क्लेशाचा त्या त्याग आजी जाला//

 बहु होती केली सोंग संपादणी/

 लौकीकापासूनी निर्गमले//

 तुका म्हणे येथे झाले अवसान/

 परमानंदी मन विसावले//

 पुष्कळ काळपर्यंत देवाच्या पायांचा वियोग झाला होता, आज सुदैवाने त्याची भेट झाली. आता सर्व अडचणी दूर होऊन, विठ्ठलाच्या पायाचे ध्यानसुख तृप्त होईपर्यंत घेईन. अनेक वैश्विक इच्छांनी मी दुःखी झालो होतो, त्यामुळे श्रम फार वाढले होते, ते आज संपले. प्रपंचात राहून अनेक सोंगे करावी लागली, आता सर्व लौकिक गोष्टींशी असलेला माझा संबंध संपला. मन मोकळे झाले. शेवटी सर्व व्यवहाराचे पर्यवसान एका परम आनंदात होऊन त्या ठिॅ

थौतकाणी माझे मन विश्राम पावले आहे. एक समाधानाची रेषा त्यांच्या मुद्रेवर या ठिकाणी दिसून येते.

 क्रमशः… ९  

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted