श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२२
☆ अर्थवाही हेर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
दूर शब्दांतील आता केर झाला पाहिजे
शुद्ध वाणीचाच गजले शेर झाला पाहिजे
*
सोड आता बेगडी ह्या कल्पनांना शोधणे
तू प्रभावी अर्थवाही हेर झाला पाहिजे
*
दोन ओळी मांडताना खेळ ऐसा डाव तू
सर्कशीच्या तंबुचा तो घेर झाला पाहिजे
*
काव्य तू ऐसेच कर करशील तेव्हा शायरा
ऐकताना शत्रु कायम ढेर झाला पाहिजे
*
वाहवा टाळ्या क्षणासाठी नको मिळवू इथे
भोवताली माणसांचा फेर झाला पाहिजे
*
तू जिथे जाशील तेथे गाड झेंडा कीर्तिचा
मैफिलीचा गवगवा चौफेर झाला पाहिजे
*
धार ही शब्दास यावी मांडताना येवढी
शेर साधा या इथे समशेर झाला पाहिजे
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





