श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “पर्यावरण शिबीर… 3023… ” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“… मित्रांनो! हे जे चित्र दिसतय त्याला वृक्ष किंवा झाडं असे फार फार पूर्वी म्हणायचे. हे झाड निसर्गाचा एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जात होता.आज जो आपल्याला प्राणवायू नळकांड्यातून घ्यावा लागतोय ना त्यावेळी प्राणवायू मुबलक होता आणि तोही झाडांमुळे.चराचराच्या आरंभापासून झाडांचे अस्तित्व अबाधित होते.निसर्गातला तो उपयुक्त घटक..पान, फूल, फळा बरोबर सावली, शुध्द हवा, वेळेवर पाऊस, जमिनीची धूप कमीत कमी धूप, अन्नधान्य, गरजेचा लाकूडफाटा, वनोंषौधी इ.इ.अगणित फायदे तेव्हा आपल्या पूर्वजांना मिळाले होते.त्यांनीही त्याचं जिवापाड जतन, संवर्धन केलेले होते.त्याला देवत्व बहाल करून त्याची पूजा करत होते.
आज आपण जिथे बसलो आहोत याच जागेवर हजारो वर्षांपासून या पर्यावरण विषयक अगणित शिबिरे, चर्चासत्र, परिसंवाद घडत आलेले आहेत.आपल्या सारख्या काही अतिसंवेदनशील,
पर्यावरणप्रेमी मित्रांनी या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी इथेच तीव्र आंदोलन, धरणं, मुक मोर्चा काढले होते.तर सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही पर्यावरण बचाव मोहीम आजही तशीच तितक्या गांभीर्याने पुढे सुरू आहे.मित्रांनो! हा प्रवास, हा लढा, हा संघर्ष अजूनही फलद्रूप ठरलेला नाही.याचं कारण काय म्हणून विचाराल तर हा आपलाच लढा आपल्याशी आपण करत आहोत.ऐकायला थोडसं विचित्र वाटेल.पण सत्य नजरे आड करू शकत नाही.आज आपण जिथे जमलो आहोत तोच भू भाग ऐके काळी हिरव्या हिरव्या घनदाट जंगलांनी व्यापलेला होता.केव्हढी प्रचंड जंगल संपत्ती होती तेव्हा, त्याचबरोबर जलसंपत्ती, वनौषधी संपत्ती, अन्नधान्य-फल संपत्ती, पशुपक्षी, कृमी किटक, इ. इ. अक्षय असा अवाढव्य संपत्तीचा साठा भरलेला होता.कशाचीच कमतरता कधीच भासली नव्हती, तेव्हा पर्जन्यमान भरपूर प्रमाणात वेळेवरच पडत असे, जमीनीची धूप होत नसे, ओढे, नाले, तळी, विहीरी जलाने तुडुंब भरलेल्या असत.पांथस्थांना गर्द सावलीचा निवारा मिळत असे.आणि आपल्या पूर्वजांची वस्ती या जंगलाच्या आसपासच्या परिसरापासून दूर दूर च्या मैलोगणती प्रांतात पसरली होती.आपले पूर्वज निसर्गप्रेमी होते.ते स्वतः बरोबर या पर्यावरणाची काळजी घेत .त्याचं संवर्धन करत असत.एकंदरीत त्यावेळी भूतलावर स्वर्गीचे नंदनवनच अवतरले होते म्हणाना.शुष्क काष्ठ झालेले वठलेलं एक झाडं तोडायचं त्यांच्या जीवावर येई.त्याच्यापायी असलेली कृतज्ञता त्याला असलं कृतघ्नपणाचं कामं करण्यास परावृत्त करीत असे.पण निसर्गाच्या नियमात नव्या कोंबाला विकास साधायला जुन्या खोडांना नेस्तनाबूत होण्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे अशी शुष्क काष्ठ झालेले वठलेलं एकेक झाडं कामाला येई.पण पण हे कृत्य करत असताना आपले पूर्वज एकाच्या ठिकाणी चार चार झाडं लावत गेले.आपली जशी आबादी जपली तशीच निर्सगाची सुद्धा.याचा इष्ट तो परिणाम त्यांना दिसून येत असे.सगळीकडे समृद्धी, आनंद सुख शांती अनुभवता येत असे.एक आनंदघन संगित निसर्गात गुंजत राहत असे.
पण हळूहळू काळ बदलत गेला… गुगल नि नेटचं जंगलाच़ जाळं पसरत गेलं… आणि पूर्वजांच्या नव्या नव्या पिढ्या पटी पटीने वाढत गेल्या त्यांचं जंगलामुळे जीवीतमान वाढत गेले तसे त्यांना जागेची टंचाई भासू लागली… एक झाड तोडले म्हणून काही जंगल नामशेष होत नाही ही स्वताची समजुत आपल्या हव्यासापायी त्याने घालून घेतली नि हळूहळू एकेक करत जंगलाची कत्तल तोड सुरू झाली… कलीने ग्रासले… हव्यास, स्वार्थ, सारख्या षड्रिपूंने निर्सगाचे ओरबाडणे सुरू केले.जंगलतोड, लाकुडतोड, चंदन, औषधी, साग, साल झाडाची कत्तल करण्यात आली, ..जळणासाठी, विक्री साठी, ..हे कमी होतं त्यात जंगलसपाट करून भू भाग बळकाविण्यासाठी ऐनकेन प्रकार अवलंबिले गेले… इतकचं काय आता ज्याच्यावर तुम्ही बसला आहात ते सुद्धा एकेकाळचे वटवृक्ष होते… पण ते त्यावेळी ठेकेदार, वनरक्षक, शासनबाबू, दरबारी यंत्रणा नियमांचे कागदी फुसके घोडे नाचवून तोडून टाकले गेलेले असे आहेत… कागदावर झाडांची नि जंगलाची संख्या वारेमाप दिसते.पण प्रत्यक्षात मात्र तिथे उजाड माळ नि वाळवंट आहे… सिमेंटची जंगलं उभा राहू लागली… नि नैसर्गिक जंगल सपाट झाली.. विकासाचा विधायक मार्ग जंगल बचावच्या इच्छाशक्तीच्या अभावी विघाताच्या विचारानुसार गेला… पर्यावरणाचा र्हास झाला प्रदुषणाचा विळखा पडला… साधी शुद्ध ताजी, प्राणवायूची हवा मिळेनाशी झाली, पाणी आटले, वनस्पती नाहीशी झाली, वन्यजीव उध्वस्त झाले..शिकार वाढली.अवैध धंदे वाढले… पर्जन्य घटले…
… या चित्रात तुम्ही पाहता आहात त्याला वृक्ष, झाडं असे नावाने ओळखले जात असे… आता ते आपल्याला कुठेच दिसत नाही… आणि हे वृक्षारोपण पुन्हा आपल्याला नव्याने सुरू करायला हवे… आता सुरुवात केली तर आपल्या नातवंड पतवंडानां सुखाचे जाईल… जी चूक आमच्या वाडवडिलांच्यापासून त्यांनी केली फक्त वृक्षारोपणाचे फक्त फोटोच मागे राहिले आणि वृक्ष जगलेच नाहीत, जगवलेच नाहीत… विकासाच्या कार्यात वृक्षतोड करताना एकास चार वृक्ष लावण्याची अट घातली गेली होती .पण तेही एकाचे चार फक्त कागदावर दाखवून पैका मात्र खोऱ्याने ओढला गेला… गळा मात्र सगळयांनी एकाच सुरात लावला… निसर्ग कोपला कोपला… झाडे लावा झाडे जगवा घोषणा मात्र दुमदमल्या नि भिंती भिंती रंगल्या… पण एक झाड काही जगले नाही ते नाहीच.या दुष्परिणामाला आपण बळी पडत आहोत.पण आपण हि चुक सुधारायाचा प्रयत्न केला पाहिजे… तर हि वसुंधरा तरेल आणि आपल्या वारसांना तारेल… नाहीतर जगणं या चित्रात दिसतय तस वाळवंट होईल… ”
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




