श्री सुहास रघुनाथ पंडित
जीवनरंग
☆ “मंदबुद्धी” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मी १०-१२ वर्षांचा असतांना आमच्या वस्तीत एक मंदार नावाचा मुलगा राहात होता. बरेचदा तो आम्हा मित्रांमध्ये खेळायला येत असे. आम्ही त्याला मंद्या म्हणत असू.
माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी तो लहान होता. त्याचा मोठा भाऊ राजा, साधारण माझ्या वयाचा. मंद्याला “मंदबुद्धी” म्हणत हिणवत असे. मंद्याचे आईबाबासुद्धा त्याचा उल्लेख “मंदबुद्धी” असाच करत. हळूहळू वस्तीतले सर्वच लोक त्याला मंदबुद्धीचा म्हणू लागले.
त्याकाळात आम्हा मुलांना मंदबुद्धी म्हणजे नक्की काय हे फारसं कळतही नव्हतं. आमच्याशी त्याचे वागणे, बोलणे नॉर्मल होते. तो कपडेही व्यवस्थित घालायचा. सहाजिकच आमच्या दृष्टीने तो इतर मुलांसारखाच नॉर्मल होता. बोलतांना त्याचं थोडं बालिश टोनिंग होतं इतकंच. आम्ही मित्रांनी त्याला कधी कमी लेखले नाही. त्याचा स्वभाव मनमिळाऊ होता. कधी कुणी चिडीचा गेम खेळला किंवा खेळात कुणी त्याच्यावर अन्याय केला तरी तो अजिबात चिडत नसे. हसण्यावर सोडून देत असे.
एकदा रेस टीप खेळतांना मी उंच बालकनीतून खाली पडलो होतो. त्यावेळेस इतर मुलं हसू लागली. पण मंद्या मात्र दोघा तिघांना सोबत घेऊन, मला उचलून बाजूच्या घराच्या पोर्चमध्ये पाळण्यावर घेऊन गेला. माझ्या हातापायांच्या जॉईंट्सवर हलकेच दाबून, कुठे दुखतं का, कुठे सूज आहे का, फ्रॅक्चर आहे का, डोक्यावर कुठे जखम आहे का वगैरे त्याने तपासलं. त्या घरातल्या अनोळखी काकूंना विनंती करून मला पाणी, चहा वगैरे पाजण्याची व्यवस्था केली. इतकंच नव्हे तर खेळ सोडून तो माझ्यासोबत माझ्या घरापर्यंत आला अन् माझ्या आईला, “आज याला आराम करू द्या” म्हणून सांगितलं.
संपूर्ण घटनाक्रम मंद्याकडून माझ्या आईला कळल्यावर आईने त्याचे कौतुक केले. त्यावर तो निरागसपणे म्हणाला “आमच्या सरांनी शिकवलंय, रस्त्यात कुणाचा अपघात झाला, किंवा कुणी चक्कर येऊन पडलं तर हातचे कामं सोडून आधी त्याला अटेंड करायचे. व त्याला कुठे, किती लागलं ते तपासून इतर लोकांच्या मदतीने, गरज पडल्यास डॉक्टरकडे घेऊन जायचं. “
कमी वयात त्याचे इतके समजूतदारपणाचे बोल ऐकून त्यावेळेस माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. या घटनेपासून मला मंद्याबद्दल जास्तच आपुलकी वाटू लागली.
दुसऱ्या दिवशी देवळातल्या मैत्रिणींकडे आई मंद्याची तारीफ करू लागली. तेव्हां, तो किती गुणाचा मुलगा आहे, कुणाचे इलेक्ट्रिक बिल भरून देतो, तर कुणाचे दळण आणून देतो, असे सांगत सगळ्याच गृहिणी त्याचे कौतुक करू लागल्या.
इतक्या समजूतदार मुलाला त्याच्या घरची मंडळी मंदबुद्धी का म्हणतात हा प्रश्न मला व माझ्या आईला त्यावेळेस पडत असे.
श्री टॉकीजजवळ एक मतिमंद मुलांची शाळा होती. त्या शाळेत तो जात असे, हे त्यानेच मला सांगितले. मतिमंद मुलांच्या शाळेत नक्की काय शिकवतात ते मला माहित नव्हते. तिथे इतर शिक्षणासोबतच काही हस्तव्यवसाय शिकवतात असे तो सांगत असे. जसे वेताच्या खुर्च्या विणणे, फर्निचर दुरुस्त करणे, घराला रंग देणे, कुंपण बांधणे, इत्यादी तो त्या शाळेत किती वर्षं शिकला हे मला माहित नाही.
‘मंदबुद्धीचा’ म्हणून त्याचा दादा व त्याचे बाबा कायम त्याला हिडीस फिडीस करून त्याच्याशी फटकून वागत. तो उलट उत्तर कधी देत नसे. रोज अंगण झाडणे, फुलझाडांची मशागत करणे, दळण आणणे, भाजीपाला विकत आणणे अशी घरातली बरीचशी कामं तोच करत असे. त्याची वहिनी बरेचदा त्याला घरगुती कामं सांगत असे, जसे कपडे धुणे, इस्त्री करणे, सायकलमध्ये हवा भरणे वगैरे.
भविष्यात हा मंद्या वयाने मोठा होईल, अन याच्या खाण्यापिण्याचा, कपडेलत्त्याचा भार आपल्यावर पडेल, कदाचित् भविष्यातील या चिंतेने, त्याचा दादा, वहिनी कायम त्याला दाटदुट करून अपमानास्पद वागणूक देत.
पुढे माझे कॉलेज शिक्षण, जॉब, यात मी गुरफटलो. नंतरच्या काळात मंद्या फारसा कधी दिसला नाही. वय वाढल्यावर जर हा स्वतःच्या पायावर उभा न राहू शकला तर दादा, वहिनी याला सांभाळतील का, या विचाराने मला त्याची काळजी वाटू लागे.
मंद्याच्या दादाला सरकारी नोकरी होती. साहजिकच मंद्याच्या आईवडिलांना भविष्यात म्हातारपणी त्याचाच काय तो आधार असणार होता. त्यामुळे दादाच्याच कलाने घर चाले. मंद्याला घरात काही किंमत नव्हती. त्याला नोकरासारखे वागवायचे. पुढे माझा अंदाज खरा ठरला, खरोखरच मंद्याला दादा वहिनीने घरातून हाकलून दिल्याचे कानावर आले. ऐकून फार वाईट वाटले. त्यानंतर मंद्याशी संपर्कच तुटला. माझीही बदली झाली होती. मध्ये बराच काळ लोटला. कधी मधी त्याची आठवण येई.
मी साधारण पन्नाशीचा असतांना एकदा एस टी ने चंद्रपूरहून नागपूरला येत होतो. त्याकाळी वाटेत चार रेल्वे फाटक लागत. मला वाटतं बामनी फाटक असेल, बंद फाटकासमोर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. काही तांत्रिक बिघाडामुळे नेमकी फाटकासमोरच रेल्वेगाडी थांबली होती. फाटक उघडण्यास आता बराच अवधी लागणार, म्हणून सहज पाय मोकळे करायला म्हणून आम्ही काही प्रवाशी बसच्या बाहेर पडलो. रेल्वे फाटकाशी मी रेंगाळत होतो.
अचानक माझं लक्ष तिथल्या गेटमनकडे गेलं. अन मला आश्चर्यचा धक्काच बसला. हातात लाल, हिरव्या झेंड्याच्या भेंडोळ्या घेऊन चक्क मंद्या उभा होता. मंद्याने मला ओळखलं. पूर्वीसारखाच बालिश हसला. आपुलकीने त्याने मला फाटकाच्या आत बोलावलं. मी आढेवेढे न घेता आनंदाने वाकून फाटकाच्या आत गेलो. डोक्यावरचे काही पांढरे केस सोडले तर मंद्यात काही फरक पडला नव्हता. चार पावलांवर गेटमनची चौकी होती. तिच्या मागे विट बांधकाम करून मंद्यानी झोपडीसारखं टुमदार घरकुल बांधलं होतं. थोड्यावेळ त्याच्या सहकारी गेटमनवर जवाबदारी टाकून मंद्या मला आत घेऊन गेला. एका कोपऱ्यात किचन ओटा, छोटंसं कपाट, एक किचन रॅक व मध्यभागी प्लायवुडचं पार्टीशन होतं. तितक्यात कुठुनशी मंद्याची मिसेस आली. थोडी ठेंगणी ठुसकी. चेहऱ्यावर सोज्वळ, नम्र भाव. मंद्याने माझी ओळख करून दिली.
उभी असलेली गाडी कुठल्याही क्षणाला हॉर्न देऊ शकते, हे जाणून मंद्याची मिसेस घाईघाईत चहा मांडू लागली.
मंद्या आपली कहाणी सांगू लागला. घर सोडल्यावर मंद्या लोकांकडे सोफ्याला केनिंग, पॉलिश करायला जात असे. मंद्याचा निरागस, प्रामाणिक स्वभाव पाहून कुठल्याशा देवमाणसाला त्याची दया आली. त्याने मंद्याला रेल्वेत नोकरी लावून दिली. त्याच्या घरादाराची, पोटापाण्याची सोय झाली. पुढे त्याचे लग्नही झाले.
तितक्यात पार्टीशन पलीकडून खोकलण्याचा आवाज आला. मंद्या माझा हात धरून मला पलीकडे घेऊन गेला. बघतो तर मंद्याचे म्हातारे वडील खाटेला खिळलेले. बाजूला मोडक्या हाताच्या खुर्चीवर त्याची आई दीनवाण्या चेहऱ्याने बसून होती. ते पाहून मला धक्काच बसला. मला बघताच दोघेही थोडे ओशाळले.
“बाबांना पॅरालिसीस झाला आहे. आईला बीपी चा त्रास आहे. तिच्याने हल्ली जास्त कामं होत नाहीत. “
पूर्वीच्याच बालिश टोनिंग मध्ये मंद्या सांगू लागला.
“दादाला मुलांचे करिअर घडवायचे आहे. त्यांचे अभ्यासाचे महत्वाचे वर्षं आहेत, म्हणून वहिनीला ह्या दोघांचं करणं झेपेना. रोजचे वादविवाद व्हायचे! पाडव्याच्या दिवशी आई-बाबांचे आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघेही घरी गेलो होतो. तर तिथले हाल मला बघवेना. हिनेच निर्णय घेतला. म्हाताऱ्यांची सेवा म्हणजे पुण्याचं काम आहे म्हणत हिनेच येतांना बॅगेत त्यांचेही कपडे भरले. ”
“इथे ही आनंदाने सर्व सांभाळते. दोघेही आता माझ्या झोपडीत सुखात आहेत. महिन्याला त्यांचे रेल्वे हॉस्पिटलला चेकअप, औषधपाणी सर्व होतं. मलाही काळजी नाही. आपले जन्मदाता आहेत ते, त्यांनी तरी म्हातारपणी कुणाकडून अपेक्षा करावी! त्यांच्या सुखात आपलं सुख आहे. “
हे मला अनपेक्षित होतं. एखाद्या जवाबदार, समजूतदार व्यक्तीने बोलावे तसे मंद्याला बोलतांना पाहून मला गहीवरून आले.
“मंद्या, कुठे रे हे सर्व शिकलास! ” म्हणत साश्रू नयनांनी मी मंद्याला घट्ट मिठी मारली.
माझ्या दृष्टीने मंद्या मंदबुद्धी नव्हे तर श्रावणबाळ होता.
तितक्यात गाडीने हॉर्न दिला. मी उठलो.
“या पुन्हा कधी” मंद्याची मिसेस म्हणाली.
मंद्याचा घाईतच निरोप घेऊन जड अंत:करणाने मी एस टी कडे निघालो.
मंद्याचा वरवरचा बुध्यांक (I Q) बघणाऱ्या निष्ठुर जगाला, शालेय शिक्षकांच्या प्रामाणिक मुशीतून घडलेल्या त्याच्या निर्मळ, निष्पाप पण विशाल अंतर्मनाचा थांग लागणे शक्यच नव्हते.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





