डॉ मकरंद पिंपुटकर

☆ एका veterinary डॉक्टरची दिवाळी पहाट : भाग २ ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

(एकंदरीतच माझ्या करिअरच्या निवडीला शिव्या घालत मी घरी परतलो. थोडी झोप काढून झोपेची थकबाकी वसूल करण्याचा प्लॅन मनात घोळवत होतो. दरवाजा उघडताच होतो, पुन्हा एकदा फोन खणखणला. मालवाडीच्या भिडे काकांचा फोन आला होता. त्यांच्या दोन वर्षांच्या बकरीच्या घशात काहीतरी अडकलं होतं, ते urgent बोलवत होते.

एकंदरीत काय तर माझ्या दिवाळी पहाटेच्या सुखास्वप्नांचा पुरता चुराडा झाला होता. काय वाढून ठेवलं होतं पुढे, कोण जाणे! ) 

इथून पुढे – – – 

नमस्कार, मी डॉ. निखिल पाटील. मी भिलवडी, सांगली इथे एक veterinary डॉक्टर आहे – जनावरांचा डॉक्टर. दिवाळीच्या पहाटेला मला चोपडेवाडीच्या थोपट्यांकडे visit ला जावं लागलं होतं. त्याच्याकडे आलेल्या खत्रुड अनुभवांनी माझं डोकं सॉल्लिड फिरलं होतं. दमून भागून, वैतागून घरी पोचतोय की नाही तोच माळवाडीहून भिडेकाकांचा फोन आला. भिलवडीच्या दुसऱ्या टोकाला भिडेकाकांकडे visit ला जायला लागणार होतं. मी पुरता वैतागलो.

हे भिडेकाका पुण्यात नोकरी करत असत. निवृत्तीनंतर ते भिलवडीला आले होते. लोकं हौसेने कुत्रा किंवा मांजर पाळतात, या काकांनी बकरी पाळली होती. आणि या बकरीला प्रॉब्लेम होण्यासाठी आजचा दिवाळी पहाटेचाच मुहूर्त सापडला होता.

मी असंच अजून बराच वेळ तडतडत राहिलो असतो, पण मग माझा मीच थांबलो. थोपट्यांच्यामुळे माझा मूड गेला यात भिडेकाकांचा आणि त्यांच्या बकरीचा काहीच दोष नव्हता. जीभ चावत मी तसाच तडक भिडेकाकांकडे निघालो.

भिडेकाका दारातच उभे होते. पुलंच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या डोळ्यांत छप्पन सशांची व्याकुळता दाटलेली होती. “सॉरी, सॉरी, सॉरी, डॉक्टर. आज दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला बोलावून घ्यावं लागलं. पण माझा नाईलाज होता. लाडकीची अवस्था फारच बिकट आहे आणि आमच्याच्याने बघवत नाहीये ती. ” लाडकी हे त्यांच्या बकरीचे नाव.

आम्ही लाडकी जिथे होती तिथे गेलो. आणि लाडकीची परिस्थिती पाहून मीसुद्धा हादरलो. ती आवंढा गिळायचा प्रयत्न करत होती, तिला ठसका लागत होता, ती थरथरत होती, तिची लाळ गळत होती.

काका माझ्याकडे आर्ततेने बघू लागले, “पाहिलं ना सर! आज तुम्हाला जर बोलावलं नसतं तर हिनं काही उद्याचा दिवस पाहिला नसता. “

तिच्या घश्यात काहीतरी अडकलं होतं, हे उघड होतं. मी जाऊन तिचं तोंड उघडलं आणि तिच्या जीभेच्या मागच्या बाजूला – घश्याशी बोटं घालून काय अडकलं आहे ते बघायचा प्रयत्न करू लागलो.

माझी ही आगंतुक घुसखोरी तिच्या पचनी पडली नाही. ती मला चावायचा प्रयत्न करू लागली, में में आवाज करू लागली. माझ्या बोटाला काहीतरी जाणवत होतं. पकडता येत नव्हतं, पण स्पर्श लक्षात येत होता.

“आश्चर्य आहे, मला वाटलं होतं अडकलं आहे म्हणजे काहीतरी टणक – लाकूड वगैरे, अथवा काही गोल गरगरीत फळ वगैरे असेल. पण हे काहीतरी कापडासारखं वाटतंय. पण कापडच असेल, तर ती ते गिळत का नाहीये? “

खाक खोक करून शेवटी तिने मला तिच्या तोंडातून बोट बाहेर काढायला भाग पाडलं. अजूनही तिच्या परिस्थितीत सुधार नव्हता.

“तिचं ती खोकून खाकरून जे काही अडकलं आहे ते बाहेर काढू शकणार नाही का? किंवा आहे त्या परिस्थितीत तिला relief मिळणार नाही का? ” काकांनी आशावाद मांडला.

मी काही न बोलता तिच्या पोटाकडे बोटं दाखवलं. ते आता फुगू लागलं होतं. ती क्षण दोन क्षण शांत झाली होती, पण तिला पुन्हा जीवघेणा ठसका लागला.

काकांना काही सुचत नव्हतं, आणि माझीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. मी टॉर्च आणला आणि त्या प्रकाशात तिच्या तोंडात काही आढळतं आहे का ते बघू लागलो. जिभेखाली काहीतरी dark रंगाचं दिसत होतं. माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

“त्या कापडाच्या चिंधीचा जीभेला पीळ पडला आहे, किंवा ती चिंधी दातात कुठेतरी अडकली आहे, म्हणून ते कापड आत पोटात जात नाहीये आणि अडकून बसलंय. “

मी ती चिंधी बाहेर खेचू लागलो, तर ती रबर बँडसारखी ताणली जाऊ लागली. ते elastic होतं. बोटांनी हळूवाररीत्या मी ते खेचून बाहेर घेतलं, त्याच्या मागोमाग ते कापड खेचू लागलो.

ते नीळंपिवळं चट्टेरी पट्टेरी कापड होतं, मी खेचत गेलो, खेचत गेलो – ते जवळजवळ चार फूट लांब कापड होतं. लाडकीने ते खाताना फाडून फाडून त्याच्या पार चिंध्या करून टाकल्या होत्या.

ते कापड संपूर्ण बाहेर आल्यावर मी ते असं पसरवून हातात धरलं मात्र, भिडे काका खो खो हसायला लागले. “अहो, माझा लेंगा आहे तो. कालपासून मिळत नव्हता म्हणून मी धूम शोधत होतो. लाडकीने पार कल्याणच करून टाकलं त्याचं. “

हसता हसता डोळे पुसत ते सांगत होते. “ते काय आहे की आता लेंग्याच्या नाडीची गाठ बांधता येत नाही नीट, म्हणून मग काकूने इलॅस्टिकचाच लेंगा घेतला होता, आणि नेमकं ते इलॅस्टिकच लाडकीच्या जीवावर बेतत होतं. “

घशात अडकलेलं कापड निघाल्याने बकरीला ताबडतोब प्रचंड relief मिळाला होता, तिचं फुगलेले पोट नॉर्मल होऊ लागलं होतं, तिच्या उचक्या – ठसके – खोकला थांबला होता आणि मुख्य म्हणजे ती पुन्हा खाणं शोधू लागली होती. प्राण्यांच्या बाबतीत, त्यांनी खायला सुरुवात करणं ही प्रकृती नॉर्मल झाल्याचं लक्षण असतं.

मी विचारात गुंतलो होतो आणि काका माझ्या शर्टाची बाही धरून मला खेचत होते. “चला, चला, डॉक्टर, तुम्ही आधी घरात चला. Already तुमच्या दिवाळीला मी सुरुवातीलाच गालबोट लावलं आहे, त्याचं थोडं तरी पापक्षालन मला करू द्या. “

काकूंनी मस्त फराळ मांडला होता – चिवडा, लाडू, चकल्या, शंकरपाळे – सगळी नुसती रेलचेल होती, काकांनी बिस्मिल्लांची शहनाई लावली होती, शेजारपाजारहून फटाक्यांचे आवाज येत होते, आणि माझी दिवाळी पहाट जरी वाईट गेली असली, तरी माझी दिवाळी सकाळ मात्र मस्त सुरू झाली होती.

– समाप्त –

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

(कथाबीज – James Herriot)

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted