? वाचताना वेचलेले ?

☆ घड्याळ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

जेवताना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काही तरी साम्य जाणवले.

घड्याळ्यात तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असतो. तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनिट काटा म्हणजे आई व सेकंद काटा म्हणजे मुलं असल्याचे जाणवले.

या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे आणि तास पूर्णत्वास येऊ शकत नाहीत .

परिवारात वडील म्हणजे तास काटा. याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व उद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात.

पण ते घरातल्या कोणाच्याच लक्षात नसते.

ध्येय पूर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.

तोपर्यंत वडिलांचे महत्त्व लक्षात येत नाही.

आई म्हणजे मिनिट  काटा असते.प्रत्येक मिनिटाला (अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत) तिची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनिट काटा जसा घड्याळ्यात फिरताना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्या बरोबर थांबतो व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असताना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे, या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

आणि सेकंद काटा म्हणजे लहान मुलं.ती कितीही मोठी झाली तरीही आईवडिलांच्या मागे पुढे कायम उत्साहाने तुरुतुरु पळताना, खेळताना, बागडताना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनिट काटा (वडील, आई) यांच्या मधेच धडपडताना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्यापेक्षा जास्त असतो.

जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशिवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटुंबाचे आहे. या तीन काट्यांप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्याशिवाय घराला पूर्णत्व येत नाही.

पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास या मुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे हे पूर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे.

 एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते,  तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला

 तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ उडेल.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments