श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
तल्लक्षणानि वाच्यन्ते नानामतभेदात् ॥ १५ ॥
अर्थ – भक्तीचे वर्णन अनेक प्रकारे करता येते. अनेक विद्वान भक्तीचे वर्णन त्यांच्या त्यांच्या मताप्रमाणे, अनुभवाप्रमाणे करतात, अनेक लक्षणे सांगतात.
नाना मतानुसार त्या भक्तीची लक्षणे सांगितली जातात.
विवेचन: कोणतीही गोष्ट लक्षणांनी सिद्ध झाली पाहिजे असा शास्त्रकारांचा दंडक आहे. लक्षणाविना लक्ष्य स्वरूपाचा बोध यथार्थ रूपाने होऊ शकत नाही. येथे भक्ती हे लक्ष्य आहे. कोणी म्हणेल भक्तीचे लक्षण तर पूर्वी सूत्र दोनमध्ये ‘परमप्रेमरूपा’ असे सांगितलेच आहे. पुन्हा लक्षण सांगण्याचे प्रयोजन काय? लक्षण हे सामान्य; विशेष अशा दोन रूपाने कोठे कोठे सांगितले जाते. ‘परमप्रेमरूपा’ हे भक्तीचे सर्वसामान्य लक्षण आहे. पण तेच प्रेम अभिव्यक्त होण्यास कोणती तरी क्रिया कारण होत असते. त्या क्रियेच्या मागे काही विशिष्ट भावना असते. म्हणूनच भक्तिशास्त्रामध्ये भक्तीचे विविध प्रकार सांगितले गेले आहेत. श्रीमद्भागवतामध्ये प्रल्हादचरित्रात नवविविधा भक्तीचा निर्देश आहे.
श्रीविष्णो श्रवणे परीक्षिदभवद् वैयासकिः कीर्तने।
प्रह्लादः स्मरणे तदङ्घ्रिभजने लक्ष्मीःपृथुः पूजने।
अक्रूरस्त्वभिवन्दने कपिपतिर्दास्ये च सख्येऽर्जुनः।
सर्वस्वाऽऽत्मनिवेदने बलिरभूत् कैवल्यमेषां समम्॥
भक्तीचे नऊ प्रकार वरील सुभाषितामध्ये सांगितले आहेत. (श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन) ह्या नऊ पायऱ्या म्हणजे मनुष्याच्या जीवनविकास आहे असे म्हटले तर अधिक योग्य होईल. मनुष्य सर्वात आधी ऐकायला शिकतो, मग हळूहळू एखादा शब्द बोलायला शिकतो, त्यांनतर बाकीच्या भक्ती मनुष्य क्रमाने आचरण्याचा प्रयत्न करतो. माऊली पहिल्या ओळीत भावेंवीण भक्ति करता येत नाही असे म्हणतात. वरील सर्व प्रकारच्या ‘भक्ती’ आपण परमार्थाच्या पाठशाळेत शिकू शकतो किंवा त्या शिकायलाच हव्यात. मनुष्य दासबोधात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तिंचे सर्व समास तोंडपाठ करू शकतो, खरतरं पाठ करतोही. पण त्यामुळे मनुष्याच्या अंतरंगात बदल होत नसेल, ते पाठांतर काय उपयोगाचे? आपण फारतर त्याला घोकमपट्टी म्हणू शकतो. म्हणजे फक्त दमछाक! एखाद्या सुगरणीने उत्तम स्वैंपाक केला, अन्नाचा सुगंधही घरभर पसरला, पण त्या अन्नात जर मीठ नसेल तर त्याचा उपयोग शून्य. भाव हा आपल्या साधनेतील मीठ समजावे. इथे भाव हा शब्द ‘प्रेम’ या अर्थाने आला आहे. हे ‘सैराट’प्रेम नाही. हे ‘खरे’ प्रेम आहे, अर्थात वस्तू निरपेक्ष, व्यक्ति निरपेक्ष आणि परिस्थिती निरपेक्ष प्रेम!!!
“प्रेमेवीण श्रुतिस्मृतिज्ञान। प्रेमेवीण ध्यानपूजन। प्रेमेवीण श्रवणकीर्तन। वृथा जाण नृपनाथा।।”
एकनाथी भागवत २. ३२
संतांनी जे प्रेम भगवंतावर केले, मिरेने कृष्णावर केले, प्रल्हादाने देवावर केले, हनुमानाने रामावर केले ते हे प्रेम!! या प्रेमाची सर जगातील कोणत्याही प्रेमास येऊ शकत नाही. आई आपल्या बाळाला धोंड्या, दगड्या, पेंद्या किंवा मऱ्या कोणत्याही नावाने हाक मारते आणि ते बाळ सुद्धा लगेच हाक देते, कारण त्या दगड्या, धोंड्या सबोधनातील ‘वात्सल्य’ त्यास कळते. संतांनी विठूरायाला कोणत्या नावाने हाक मारली नाही? कोणी त्यास काळतोंडया म्हटले आहे, तर कोणी त्यास पंढरीचा चोर म्हटले आहे, तर कोणी आणिक काही म्हटलं आहे. पण ह्यामागे निष्काम प्रेम आहे. जन्मभरीच्या श्वासाइतके हरिनाम घेऊन कोणी विठ्ठलास विकत घेतले आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देव श्रीखंड्या बनून पाणक्याचे काम केल्याचे वर्णन आहे. खरंतर प्रेमाचे वर्णन करणे शक्य नाही. “प्रेम नये सांगता बोलता दावितां। अनुभव चित्ता चित्त जाणे।।” कणभरही विरह सहन न होणे ही प्रेमाची खरी कसोटी. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णाच्या गोपी. त्यांच्या ध्यानीमनी फक्त कृष्णच असायचा.
वरीलप्रमाणे अनेक अंगाने भक्ती होत असते, त्यात कित्येक भक्त म्हणविणार्याच्या काही विवक्षित स्वतंत्र भावना असतात, त्या भावनेप्रमाणेच तो तो त्या त्या क्रियांना भक्ती म्हणत असतो. श्रीनारदऋषींनीही ही भक्ती मूळ एकरूपा असूनही अकरा प्रकारची होते असे सूत्र त्र्याऐंशी मध्ये सांगितले आहे. भक्तीची अनेक लक्षणे सांगता येतील.
प्रत्येक आई आपल्या लेखकावर विविध प्रकारे वात्सल्य भाव प्रकट करते. कोणी लेकराला कुरवाळेल, कोणी पाठीवरुन हात फिरवेल, कोणी खाऊ देईल, कोणी पुरणपोळी करेल, तर कोणी आणिक काही करेल….? यात एक गोष्ट मात्र खरी असेल की ती माउली आपल्या लेकरांवर प्रेम करीत असेल…..!
इथून पुढील काही सूत्रात आपण प्रेमाची अर्थात भक्तीची लक्षणे पाहणार आहोत.
श्रोता वक्ता श्रीराम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
– लेख क्र. १४
नारद महाराज की जय!!!
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





