मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने..  ☆ श्री जगदीश काबरे ☆

दरवर्षी 30 जुलै हा जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक मैत्री दिनाची सुरुवात 1958 साली दक्षिण अमेरिका खंडातील पॅराग्वे देशात झाली. तेव्हा “वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड” नावाच्या एका सामाजिक चळवळीने या दिवसाची कल्पना मांडली. या चळवळीचा उद्देश माणसाच्या मानवतेतील ऐक्य, सहकार्य आणि शांततेला प्रोत्साहन देणे असा होता. या कल्पनेतून 30 जुलै हा दिवस ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. नंतर 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे 30 जुलै या दिवसाला ‘जागतिक मैत्री दिन’ म्हणून मान्यता दिली. या दिवसाच्या निमित्ताने विविध देश, धर्म, वंश, आणि संस्कृतीतील लोकांमध्ये परस्पर समज, संवाद आणि ऐक्य वाढवण्यावर भर दिला जातो. मैत्री हे केवळ वैयक्तिक नाते नसून, सामाजिक सलोखा आणि जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी भूमिका या दिवसामागे आहे. भारतात मात्र ’जागतिक मैत्री दिन’ अधिक औपचारिक नसून, प्रामुख्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी तरुणाईत लोकप्रियतेने साजरा केला जातो. त्यादिवशी मित्रांना मैत्रीच्या बंधनाची जाणीव करून देण्यासाठी फ्रेंडशिप बँड देणे, एकमेकांना शुभेच्छा देणे अशी स्नेहपूर्ण परंपरा दिसून येते. जागतिक पातळीवर मैत्रीचा विचार करताना, हा दिवस केवळ नात्यांचा उत्सव न राहता, एक सामाजिक संदेश घेऊन येतो – तो म्हणजे, मैत्री हे शस्त्र नसून सेतू आहे, जो माणसामाणसात आणि समाजासमाजात संवाद, सहिष्णुता आणि शांतता निर्माण करतो.

पण आज नेमकं होतंय असं की, एकीकडे एका क्लिकवर भेटणं होतंय, एका मेसेजवर बोलणं होतंय, पण दुसरीकडे हा संवाद काहीसा खुंटतो आहे. नुसतं लाईक आणि ईमोजी टाकून भावनिक कोरडेपणा येतो. आणि नकळत एक प्रश्न मनात रुंजी घालतो. या डिजिटल जिंदगीत सोशल मीडियाने, इंटरनेटने मैत्रीची व्याख्याच बदलून टाकली आहे का? मैत्री फक्त भावनिक चैन नाही तर तिचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींच्या आयुष्यात सच्चे मित्र असतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते, तणावाचं प्रमाण कमी होतं आणि आयुष्यमान वाढतं. कारण मैत्रीच्या नात्यातून मेंदूमध्ये ‘ऑक्सिटॉसिन’ आणि ‘डोपामिन’सारखे आनंददायक रसायने स्रावत असतात, जी आत्मीयता, विश्वास आणि आनंदाची भावना निर्माण करतात. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने मैत्रीची व्याख्या आणि व्याप्ती दोन्ही पालटलं. ऑर्कुटपासून सुरू झालेला प्रवास फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटपर्यंत आला. आता इन्स्टंट मेसेजिंग, व्हिडीओ कॉल्स आणि सोशल मीडियामुळे मित्रांशी जोडणं क्षणार्धात शक्य आहे. मित्र कितीही लांब असला, तरी व्हॉट्सअपवर एक मेसेज, झूमवर कॉल किंवा स्नॅपचॅटवर स्ट्रीक पाठवला की संपर्कात राहता येतं. भावना व्यक्त करण्यासाठी आता शब्दांपेक्षा इमोजी, मिम्स आणि व्हिडीओ कॉल्स जास्त बोलके ठरतात. मैत्रीतली ही झटपट कनेक्टिव्हिटी आणि नव्या प्रकारे व्यक्त होण्याची पद्धत यामुळे मित्रांचं जग जवळ आलंय, पण त्याच वेळी मैत्रीच्या खोलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

नव्या युगात मैत्रीचे रूपच बदलले आहे. पूर्वी प्रत्यक्ष भेटीशिवाय मैत्री अशक्य वाटायची. मैत्री फुलायला भेटीगाठी, प्रत्यक्ष गप्पा या अनिवार्य होत्या. आता मात्र सोशल मीडियामुळे आपण कुठल्याही कोपऱ्यात असलो, तरी आपल्या मित्रांशी रोजच्या रोज संपर्कात राहू शकतो. अंतरं संपलेली आहेत आणि संवाद अधिक सोपा झालाय. स्टेट्स, स्टोरी यातून त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी थेट न सांगताही कळतात. शाळेतले जुने मित्र, जुने शेजारी कदाचित सोशल मीडिया नसता तर संपर्कात राहिले नसते. शाळा, कॉलेज, ऑफिस मेट, जिम अशा विविध व्हॉटसअप ग्रुपमधून आता गप्पाटप्पा रंगतात. याशिवाय, मिम्स हे मैत्रीत संवादाचं नवं माध्यम बनलं आहे. भावना व्यक्त करणं असो की नर्म विनोद किंवा टोमण्यांची कोपरखळी पानभर शब्दांपेक्षा एक मिम पुरेसं ठरतं.

डिजिटल माध्यमांमुळे मैत्री आता केवळ शेजारपाजार, शाळा-कॉलेज ऑफिसपुरती मर्यादित राहिलेली नाही. इंटरनेटमुळे मैत्रीही जागतिक झाली आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी जोडलं जाणं शक्य झालं आहे. विविध विषयांच्या फेसबुक पेजेसवर समान आवडीची माणसं एकत्र येतात, त्यातून मैत्रीची नाती फुलतात. डिजिटल मैत्रीने अशा अनेकांना व्यक्त होण्याची नवी संधी दिली आहे. अंतर्मुख स्वभावाचे किंवा प्रत्यक्ष समोर व्यक्त होण्यात संकोच वाटणारे लोकही आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर अधिक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. शिवाय, इंटरनेटमुळे विविध संस्कृती, भाषा, जगभरचे विचार आणि जगण्याच्या पद्धती यांचा आपल्याला परिचय होतो आणि त्यामुळे मैत्रीचं परिमाणही विस्तारतं. डिजिटल जगात जशी मैत्रीची नवीन दालनं खुली झाली आहेत, तशा काही नव्या समस्यादेखील तयार झाल्या आहेत. कारण बऱ्याचदा प्रत्यक्ष न भेटता झालेली ऑनलाइन मैत्री अनेकदा वरवरची ठरण्याची शक्यता असते. जेव्हा आपण एखाद्याला भेटतो, सोबत वेळ घालवतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे उलगडतात. आवडीनिवडी, स्वभाव समजतो. आणि मग ‘‘समशील: समव्यसनेषु सख्यम्’’ या उक्तीनुसार मैत्री जुळते.

डिजिटल विश्वात मात्र बऱ्याचदा फक्त चांगलं तेच दाखवलं जात असतं. त्यामुळे स्क्रीनपल्याडची व्यक्ती खरी कशी आहे, याचा अंदाज येणं कठीण होतं. त्यामुळे काही वेळेस नंतर विसंवाद होऊ शकतो. अपेक्षा न जुळल्याने इंटरेस्ट कमी होतो आणि मग अचानक ‘घोस्टिंग’ — म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता संवाद बंद केला जातो. यामुळे नैराश्य आणि गैरसमज होण्याची शक्यता असते. कधी कधी ही डिजिटल मैत्री खोटी निघते. फेक प्रोफाइल्समुळे खोटं व्यक्तिमत्त्व उभं केलं जातं आणि त्यातून आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर प्रकारही घडू शकतात. या पार्श्वभूमीवर, डिजिटल मैत्री पुन्हा नव्याने समजून घेण्याची गरज आहे. मैत्री म्हणजे फक्त मेसेजच्या माध्यमातून कनेक्टेड राहणं नव्हे. मैत्रीत भावनिक जवळीक, पारदर्शकता आणि परस्पर आदर असतो. ती केवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टेटस अपडेट्स किंवा रिप्लायवरून समजली जाऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांशी केवळ चॅटवर विसंबून न राहता, अधूनमधून फोन किंवा व्हिडिओ कॉल करावेत. ख्यालीखुशाली विचारावी, गप्पांचे फड रंगवावेत आणि अर्थातच प्रत्यक्ष भेटींचं स्थान अजूनही अतिशय महत्त्वाचं आहे. डिजिटल साधनं केवळ पूरक ठरावीत, पर्याय नसावीत, हे लक्षात घेणं गरजेचं. म्हणून ऑनलाइन मैत्रीतही काही मर्यादा ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येकजण लगेच रिप्लाय करेलच असं नाही, प्रत्येक संवादात भरभरून भावना व्यक्त केल्याच पाहिजेत असं नाही. ‘शेअर-शेअर’चा खेळ न खेळता मनापासून संवाद साधणं हेच मैत्रीचं खरं रूप आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, व्यग्र दिनक्रमातून जरा वेळ बाजूला काढून आपल्या जिवलग मित्रांना प्रत्यक्ष भेटावं. जेव्हा सगळे मित्र एकत्र जमतील, तेव्हा मोबाइल बाजूला ठेवावा.

ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ रॉबिन डनबार यांच्या सिद्धांतानुसार मेंदूतील निओकॉर्टेक्स या भागाचा आकार आणि आपण किती जटिल सामाजिक नातेसंबंध हाताळू शकतो याचा थेट संबंध असतो. परिणामी, मानवी मेंदूच्या आकारानुसार आपण सुमारे १५० स्थिर आणि अर्थपूर्ण नातेसंबंध जपण्यास सक्षम आहोत. डनबार यांच्या मते, आपल्या ओळखींच्या विविध पातळ्या असतात. आपल्याला अधूनमधून गाठभेट होणारे, थोडाफार संवाद असणारे सुमारे १०० – १५० कॅज्युअल मित्र असू शकतात. त्यातून जरा अधिक ओळखीचे, अधिक संवाद साधणारे ३० – ५० जण आपले मित्र ठरू शकतात. पुढे त्यातून १० – १५ जण असे असतात ज्यांना आपण ‘चांगले मित्र’ म्हणू शकतो. यांच्यासोबत विश्वासाचं नातं अधिक गडद झालेलं असतं. आणि या सर्वांतून उरतात काही खास… अगदी कुटुंबासारखे ‘बेस्ट फ्रेंड्स’. डनबार यांच्या मते ही संख्या आहे जास्तीतजास्त पाच. या जिगर के तुकडे बडीज सोबत आपण आपल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी सुख-दु:ख, खेद-खंत, संघर्ष- स्वप्नं सगळं काही शेअर करू शकतो.

पण डिजिटल मैत्री अनेकदा तोंड दाखवण्याइतकीच होते. आपण ज्या मित्राला ऑनलाइन “बेस्ट फ्रेंड” म्हणतो, त्याच्याशी प्रत्यक्षात अनेकदा महिनोन्महिने भेटही होत नाही. भावनिक संकटांच्या क्षणी त्याचे फक्त फोटो असतात, पण खांदा द्यायला तो नसतो. याउलट, एखादा जुना मित्र जो सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो, पण प्रत्यक्ष भेटतो, तो खराखुरा सहकारी ठरतो. एकूणच या डिजिटल काळात मैत्रीची व्याख्या बदलली आहे, पण माणसाच्या गरजा बदललेल्या नाहीत. माणसाला अजूनही स्पर्श, सहवास, विश्वास, आणि नजरेतून संवादाची गरज आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमांचा वापर करताना आपण खऱ्या भेटी, एकत्र वेळ घालवणे, आणि खऱ्या अर्थाने नातेसंबंध टिकवणे याकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे. एक क्लिकवर असलेली माणसे प्रत्यक्षही आपल्या आयुष्यात असतील यासाठी प्रयत्न करणे, हीच डिजिटल मैत्रीची खरी कसोटी ठरते.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “They never met.. but…..” – इंग्लिश लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “They never met.. but…..” – इंग्लिश लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

डॉ. शंभुनाथ डे … डॉ. महालानाबिस

They never met … But ….

 … त्या दोघांनी कधीही एकमेकांना पाहिले नव्हते. तरीही दोघांनी मिळून जवळजवळ सत्तर लाख प्राण वाचविले आणि तरीपण आपण भारतीय ह्या दोघांनाही विसरलो आहोत.

कलकत्ता : १९५९ … 

एका छोट्याशा प्रयोगशाळेत, डॉ. शंभुनाथ डे नावाच्या एका धीरोदात्त शास्त्रज्ञाने असा काही शोध लावला की त्याने संपूर्ण जगच हादरून गेले. त्याने कॉलरा-पटकी या रोगातील रोगजंतूंचा नुसता शोधच लावला नाही तर त्या जंतूंचे शस्त्रसुद्धा शोधून काढले.

त्याने सिध्द करून दाखविले की कॉलरा एक विष पसरवितो आणि ते विष शरीरातील आतडी फाडून शरीरातील सर्व पाणी नष्ट करून टाकते आणि मनुष्याचे जीवनही संपवून टाकते. यावर कोणाचाच विश्वास बसला नाही म्हणून त्याने ‘नेचर’ या नियतकालिकात त्याचा हा शोध छापला आणि मग… आपल्याला माहित आहेच…

या त्याच्या शोधाबद्दल त्याला ‘नोबेल’ तर राहू दे पण वर्तमानपत्रातून साधी प्रसिध्दी पण नाही. एवढेच काय पण वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातसुध्दा त्याचा साधा उल्लेखही नाही!

बऱ्याच लोकांना असे वाटत होते की त्यांच्या या शोधाबद्दल शंभुनाथ डे हे नक्कीच नोबेल पुरस्कारासाठी पात्र होते. परंतु जगाला त्यांचा विसर पडला. मात्र तरीही जगाने त्यांच्या शोधाचा वापर केलाय.

१९८५ साली कलकत्ता येथे शंभुनाथ डे यांनी आपली जीवनयात्रा संपविली. कोणताही पुरस्कार नाही आणि मृत्यूचाही गाजावाजा नाही. वर्तमानपत्रात वार्ताही नाही. निसर्ग नियमाप्रमाणे अनंतात विरून गेले.

सन : १९७२ …

१२ वर्षांनंतर, १९७२ मध्ये अजून एक भारतीय असाच शोध लावूनही त्यांना प्रसिध्दीपासून दूर ठेवले गेले, ते म्हणजे डॉ. दिलीप महालानाबिस हे होय!

डॉ. महालानाबिस बांगला देश युध्दावेळी अगदी सरहद्दीजवळच होते. बोंगाव येथे – निर्वासितांच्या छावण्या-कॉलऱ्याचे थैमान-तासांगणिक माणसे-मुले दगावत होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी एक मिश्रण तयार केले. मीठ-साखर आणि पाणी… कोणाचाच विश्वास बसेना… ते मिश्रण एका मोठ्या ड्रममधून ढवळले आणि नारळाच्या करवंट्यांमधून स्वत:च्या हाताने रोग्यांना दिले. काही आठवड्यातच मृत्यूचे प्रमाण घटले… अगदी ३०% वरून ४% वर खाली आहे. कोणतीही मशिनरी नाही. प्रयोगशाळा नाही. फक्त चमचे आणि शास्त्र!

त्यांनी ORS चा शोध लावला नाही पण जगाला दाखवून दिले की ते मिश्रण कोणत्याही तत्सम रोगावर उपयोगी पडू शकते आणि अशाच प्रकारचा शोध डे यांनी १९५९ साली लावला होता.

१९७८ मध्ये W. H. O. आणि UNICEF यांनी जाहीर केले की २० व्या शतकाचा वैद्यकीय शास्त्राचा नवीन शोध म्हणजे ‘‘ORS’’ चा होय. अशा रीतीने ORS ने प्रत्येक ऍम्ब्युलन्स, हॉस्पिटल आणि खेड्यातही प्रवेश केला. जवळजवळ ७० लाख जणांचे प्राण आत्तापर्यंत वाचले आहेत आणि तरीही…

या दोघांचाही कोठेही पुतळा नाही किंवा साधा फोटोसुध्दा ORS च्या पाकिटावर नाही.

एकाचा कोणत्याही प्रसिध्दीविना मृत्यू झाला आणि दुसऱ्याला त्याच्या मृत्युनंतर २०२३ मध्ये ‘‘पद्मविभूषण” पुरस्कार मिळाला.

त्यामुळेच कोणीतरी म्हंटले आहे…

‘‘भारतीय माणसे शास्त्राच्या मुळाशी जाऊन काम करत नाहीत”

‘‘भारतीय जगाला बदलू शकत नाहीत”

वरील टीकेला असे प्रत्युत्तर देता येईल..

‘‘आम्ही कॉलऱ्याला दोनदा हरविलेच… एकदा प्रयोगशाळेत आणि एकदा निर्वासितांच्या तंबूत. ”

… दोन आख्यायिका – एकाने शरीरात आढळणाऱ्या विषाच्या प्रकाराचा शोध लावला तर दुसऱ्याने त्यावरील उपाय सांगितला… आणि तरीही अजूनही जग त्यांच्याबद्दल अनभिज्ञच आहे.

मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लास्ट लोकल – लेखक : एक अज्ञात मोटरमन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ लास्ट लोकल – लेखक : एक अज्ञात मोटरमन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

— एक मोटरमन-लोको पायलट ( लोकल ट्रेनचा ड्रायव्हर) याने लिहिलेले हे मनोगत आहे…

शेवटची लोकल निघते सीएसटीवरून १२. ३७ ला. आणि शेवटची पोहोचणारी लोकल असते १. ३८ ची. १२ वाजून ३७ मिनीटांनी निघालेली लोकल तीन च्या दरम्यान पोहोचते कर्जत ला. तिथून ती रिटर्न निघते साधारण साडे चारला. मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये. तसं प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात अधिक तम ६ ते ८ तास. हे तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात. त्यात ट्रेन कुठे किती वेळ थांबली वगैरे ग्राह्य धरलं जात नाही. पण त्या तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एका दिशेत पाहत राहणं, योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं, दर चारशे मीटरवर येणाऱ्या सिग्नलला तपासणं शिवाय प्रत्येक स्पीड इंडिकेटरवर लक्ष ठेऊन स्पीड मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. रात्रीच्या वेळेस हे काम फार जिकीरीचं असतं. जर स्पीड ४० ऐवजी ४२ वर जरी गेला तरी मोटरमन आणि गार्ड यांना कंट्रोल रुमकडून ताकीद जाते. ड्युटी संपल्यावर त्याचं लेखी कारण द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मोटरमन कडून सिग्नल असताना जरी ट्रेन क्रॉस केली गेली तर अवघ्या पाचशे मीटर अंतर पुढे गेल्यावर ट्रेन आपोआप बंद होते. नवीन मोटरमन बोलावला जातो. चूक झालेल्या मोटरमनला आणि गार्डला आधी सस्पेंड केलं जातं मग चौकशी आयोगाला सामोरं जावं लागतं. चौकशी आयोगाच्या फेऱ्यात रेल्वे कर्मचारी अडकला की त्याचं त्यातून सुटणं मुश्किल असतं. तर ह्या अशा वाहनचालकांच्या बाबतीतलं थोडंसं.

मी अनेकदा यांच्या रेस्ट रुम मध्ये शिरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. स्वभावाने बरे असतात. पण अबोल असतात. रोज रोज एकच रस्ता. तेच रुटीन, तेच सिग्नल, तेच काम त्यांच्या स्वभावाच्या एकसुरीपणाला कारणीभूत असेल असं वाटलं होतं. पण खरं कारण वेगळंच होतं. त्यातील काहींनी सांगितलेलं कारण फार भयानक होतं. प्रवाशी फुटओव्हर ब्रीजचा वापर करत नाहीत. अपघात होतात. वारंवार हाय डेसीबलचा हॉर्न वाजवून आमच्या कानांचे पडदे फाटतात पण बेजबाबदार प्रवाशांना स्वतःची काळजी करावीशी वाटत नाही. काही लोक आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर निर्धास्त होऊन उभे राहतात. काही मान रुळावर ठेऊन झोपून जातात. काही संडास करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर बसतात ते ही कानाला हेडफोन लावून. रेल्वे क्रॉसींग करताना कानात हेडफोन लावतात. त्यांचं चिरडलं जाणं, कापलं जाणं, तुकडे तुकडे पडलेले शरिर आम्हाला दर दोन तीन दिवसाआड एकदा तरी पहावंच लागतं. जेव्हा जेव्हा कुणी आत्महत्या करतं, ट्रेनमधून पडून मरतं, क्रॉसिंगच्या वेळेस मृत्यूमुखी पडतं तेव्हा आमचं हृदय काही काळासाठी स्टॉप झालेलं असतं. पण ट्रेन चालू असते. लगेच भानावर यावं लागतं. डोळे सुद्धा मिटता येत नाहीत. सिग्नल चुकवायचा नसतो. नाहीतर मोठ्या अनर्थाला सामोरं जावं लागू शकतं. पाहीलेला आघात कडु घोटासारखा गिळून घ्यावा लागतो. थोडा वेळ ही मिळत नाही सावरायला.

एकदा मोटरमनच्या कोचमधून प्रवास करत असताना एका मुलाने अगदी ऐन वेळेला ट्रॅक क्रॉस केला. थोडक्यात बचावला. ट्रेन साधारण ऐंशीच्या स्पीडला होती. मोटरमन भलताच वैतागला. खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्या पोराला मजबूत शिव्या हासडल्या. म्हणाला, मादरचोद मेरी ही ट्रेन मिली थी क्या तुझे मरने के लिए? त्याचं हे बोलून होईपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेली होती. त्याचं बोलणं काय त्या मुलाला ऐकू जाणार नव्हतं. पण तरी मनातला राग व्यक्त करण्याचा त्याचा हा प्रकार होता. (शुभ अप झालेला BP नाॅमल करण्याचा प्रकार समजा हव तर) असो..

लास्ट लोकल च्या प्रवासात रुटीन अपघात होत असतात. कुणी दारातून पडतं तर कुणी ट्रेन पकडण्याच्या नादात तरी पडतं. तर कुणी लोकल सायडींगला लावल्यावर झोपायला मिळावं म्हणून अपोझिट साईडनं चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तरी चाकांमध्ये अडकतं. काही पोलिसांचा अटकाव नको म्हणून टपावर लपून बसतात. काही कपलिंगच्या स्पेस मध्ये लपतात. लपणारे, चढणारे तीनेक तासांसाठी आसरा शोधत असतात. काहींना गर्द घ्यायची असते, काहींना चरस ओढायची असते तर काहींना नेलपेंट रिमुव्हर हुंगायचा असतो. साईडिंगच्या ट्रेनमधलं अंधारं जग काही कुरापत्या करून बसलं तर त्याचा जाब लोकल गार्ड आणि मोटरमनलाच विचारला जातो. भले त्यांचा त्यात काही हात नसला तरी..

असाच एकदा रिटायर्ड मोटरमन लोकांच्या मेळाव्याला गेलो होतो. तेव्हा त्यात गर्दी बरीच कमी होती. काही आकडेवारी काढली. २००८ सालची गोष्ट. त्यात जवळपास नव्वद टक्के मोटरमन हार्ट अटॅकने गेलेले आढळले. त्यातील अनेकांच्या सर्विस सुद्धा पूर्ण झालेल्या नव्हत्या. मरणारा माणूस एकदाच मरतो. मोटरमन रोज रोज नवीन मृत्यू पाहत असतो. रात्रीच्या वेळेस रेस्ट रुम मध्ये असणारे मोटरमन झोपत नाहीत. त्यांना झोप लागत नाही. ते कुठे ना कुठे गाडीखाली येऊन मरणाऱ्या माणसासाठी स्वतःलाच दोषी धरत असतात. चूक त्यांची नसतेच मुळात… बेजबाबदार प्रवाशांसाठी ते लोकल मध्ये असलेल्या हजारोंचं प्राण तर पणाला लावू शकत नाही ना.

लेखक : एक अज्ञात मोटरमन 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चिता आणि चिंता ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ चिता आणि चिंता ☆  श्री मकरंद पिंपुटकर

गोविंदमूर्ती आज जरा चिंतेतच होते. त्यांच्या शिष्याची – सुधीरची बरेच दिवसांत काही खबरबात नव्हती. म्हणजे, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर दिसत होता सुधीर, संदेश टाकत होता, चांगल्या संदेशांचं कौतुक करत होता, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होता, पण ते काही त्याचं “असणं” नव्हतं.

सुधीर होतकरू लेखक होता. दर आठ दहा दिवसांतून एकदा तरी काहीतरी चांगलं वाचलेलं, चांगलं सुचलेलं, काहीतरी बौद्धिक खाद्य – तो शब्दबद्ध करे आणि त्याच्या मित्रमंडळात पाठवून देई. आणि गोविंदमूर्ती जरी सुधीरचे गुरू असले तरी त्यांनाही तो हे सगळे मेसेज पाठवून द्यायचा.

पण या वेळीस महिना दीड महिना होऊन गेला तरी सुधीरकडून असा काही मेसेज आला नव्हता, आणि म्हणूनच ते जरा चिंतेत होते.

योगायोगाने आज ते प्रवचन देण्यासाठी व्यासपीठावर स्थानापन्न झाले, आणि श्रोतृवर्गात त्यांना सुधीर दिसला – विस्कटलेले केस, डोळ्यांखाली थोडी काळी वर्तुळं, दाढीचे वाढलेले खुंट, चुरगळलेला शर्ट – सुधीर चिंताग्रस्त असल्याचा गुरुजींचा अंदाज खरा असल्याची सगळी लक्षणं त्यांना प्रत्यक्षच दिसत होती.

आजचा गुरुजींच्या प्रवचनाचा विषय होता – चिंता. गुरुजींना या योगायोगाची मोठी गंमत वाटली, त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. “एक संस्कृत सुभाषित आहे – ते सांगतं की चिता आणि चिंता या दोन्ही अगदी सारख्या गोष्टी आहेत. फरक इतकाच आहे की चिता मृत व्यक्तीला जाळते, तर चिंता जिवंत व्यक्तीला पदोपदी जाळत राहते. “

प्रवचन याच अनुषंगाने पुढे जात राहिले आणि त्या ओघात त्यांनी शाहू महाराजांच्या पदरी असलेल्या एका पहेलवानाची कथा लोकांना सांगितली.

“एका राजाच्या पदरी एक बलशाली पहेलवान होता. भरपूर पौष्टिक खुराक, प्रचंड अंग मेहनत आणि व्यायाम यामुळे ते आडदांड बलदंड झालेला. ताकत तर एवढी की एकदा एका हत्तीची शेपूट धरून त्याला याने खेचले तर तो हत्ती एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकला नाही.

त्या राजाने त्या पहेलवानाला गावाबाहेरील एका देवळात रोज सकाळी आणि संध्याकाळी बरोब्बर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावण्याचे काम दिले. वेळेच्या बाबतीत मागेपुढे झाले तर दंड केला जाईल म्हणून सांगितले.

महिनाभराने त्या पहेलवानाला हत्तीची शेपूट धरून ओढायला सांगितली, तेव्हा हत्ती सहजी त्या पहेलवानाला फरफटत – खेचत घेऊन गेला.

आपण वेळेत पोचू का नाही, वेळ चुकली तर काय दंड होईल या चिंतेने ग्रासलेल्या पहेलवानाची ताकद कमालीची घटली होती.

आपल्या आयुष्यातही असेच असते, ” गुरुजी सांगत होते, “कोणाला आई वडिलांच्या प्रकृतीची चिंता असते, कोणाला नोकरी मिळण्याची. कोणाचे लग्न होत नसते म्हणून चिंता असते तर कोणाला कजाग बायको मिळते म्हणून चिंता असते. पैसाअडका मिळवणे, कोर्टकचेरी, मुलांची शिक्षणं – चिंतेच्या कारणांची ही यादी कधीही न संपणारी आहे.

अशा वेळेस माणसाने प्रयत्नांची कास धरावी. जे घडायचे ते घडणारच आहे, आपण निमित्तमात्र आहोत, प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे, त्यात कुचराई होता कामा नये. बाकीचे सर्व आपले गुरू आणि तो जगन्नियंता बघून घेतील. गुरू आणि देव आपल्या भल्याचे असेल तेच करतील, ही पक्की खुणगाठ उरी बांधून ठेवावी, वृथा काळजी करू नये, ” गोविंदमूर्ती समारोप करते झाले.

दुसरा दिवस उजाडला, स्नानसंध्या, ध्यानधारणा आदि नित्यकर्मे करून गुरुजींनी मोबाईल हाती घेतला, सुधीरने सकारात्मक विचारांची एक सुंदर कविता पाठवली होती.

गुरुजी स्वतःशीच हसले.

सुधीरच्या जीवनप्रवाहातील चिंतेचा बोळा दूर झाला होता, जीवन पूर्ववत प्रवाही झाले होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुरस्काराचा सोस… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ पुरस्काराचा सोस☆ श्री जगदीश काबरे ☆

समाजकारणातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या एक युवा कार्यकर्त्या मित्राला पुरस्कार मिळाल्याचे वाचून आनंद झाला. तेव्हा फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि मी त्याला विचारलं की, ’तुला कोणत्या संस्थेचा पुरस्कार मिळाला आणि काय म्हणून मिळाला? ‘

त्याने मला त्या संस्थेचे नाव सांगितले आणि पुरस्कार ’समाज भूषण’ म्हणून दिला गेला, असे सांगितले. मला आश्चर्य वाटले की, त्याने सामाजिक कार्याला सुरुवात करून दोन वर्षेच झाली होती. त्यातून त्याने राजकारणात प्रवेश केला होता. मग एवढ्यातच तो समाज भूषण कसा काय झाला?

ही शंका मनात आल्यानंतर मी ज्या संस्थेकडून त्याला पुरस्कार दिला गेले होता त्या संस्थेचा गुगलवर धांडोळा घेतला. त्यांचा फोन नंबर मिळवला आणि त्यांना विचारले की, तुम्ही पुरस्काराचे निकष काय ठरवलेले आहेत?  

त्यावर त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून मी उडालोच.

ते म्हणाले, “साहेब, आम्ही पुरस्कार देताना त्या व्यक्तीकडून देणगी स्वीकारतो आणि त्या देणगीच्या रकमेप्रमाणे त्या व्यक्तीला कोणता पुरस्कार द्यायचा हे ठरवतो. एक हजार रुपयेपासून पंधरा हजार रुपयापर्यंतच्या देणगी रकमेप्रमाणे ’उत्कृष्ट कार्यकर्त्यापासून समाजभूषण’ पर्यंतचे विविध पुरस्कार दिले जातात. सोबतच आमच्या संस्थेचे सन्मानचिन्ह. त्यामुळे त्या व्यक्तीचे जसे नाव होते तसे संस्थेला कार्य करण्यासाठी आर्थिक हातभारही लागतो. अशाप्रकारे ’एकमेका सहाय्य करू’ पद्धतीने आमचे काम चालते. समजा उद्या तुमची कोणी शिफारस केली तर आम्ही तुम्हाला फोन करून विचारू की, तुम्ही किती रक्कम द्यायला तयार आहात. तुम्ही समाजसेवक, कवी, लेखक आहात की नाट्यचित्रवाणी कलाकार आहात, अशा कुठल्याही क्षेत्रात पुरस्कार हवा असेल त्याप्रमाणे तुम्हाला तो देण्यात येईल. “

याचा अर्थ सध्या जसा ’पेड बातम्यां’चा जमाना आलेला आहे तसाच ’पेड पुरस्कारां’चाही जमाना आलेला दिसतोय. काही वर्षांपूर्वी पुरस्कार हे माणसाच्या कलागुणांना जोखून दिले जायचे, नव्हे अजूनही दिले जातात. कारण त्याच्या कर्तृत्वाला दिलेली ती एक आदरणीय सलामी असते. पण आता सगळ्याच गोष्टीचे बाजारीकरण झाल्यामुळे हे क्षेत्र तरी कसे मागे राहील?  

पण या संस्थाना तरी का दूषण द्या?  कारण पैसे देऊन पुरस्कार विकत घेणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे. लोक खोट्या प्रतिष्ठेला भुलून प्रत्यक्ष कार्य करण्यापेक्षा त्यांना पुरस्कारांची घरात रांग लागलेली दिसली म्हणजे आपण कोणीतरी मोठे झाले आहोत असे वाटू लागते आणि त्यांचा अहं सुखावतो. लोकांनाही ते खरे वाटते. अशा प्रकारे समाजात सगळाच बेगडी बटबटीतपणा बोकाळला आहे. समाजसेवेचे किंवा त्यांना हवेहवेसे वाटणाऱ्या क्षेत्राचे रूपांतर एका शो पीसमध्ये झालेले आहे.

पण यामुळे एक मोठे नुकसान होते ते ज्यांना त्यांच्या कलागुणामुळे आणि कर्तृत्वामुळे खरे पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे. कारण अशा लोकांकडेही मग माणसे, त्यांनी पुरस्कार विकत घेतले असतील, या नजरेने बघायला लागतात. एकूणच समाजाचे गढूळेल्या नजरेने कर्तृत्ववान व्यक्तींच्या पुरस्कारांकडे पाहणे ही समाजाची अधोगती दर्शवते. ती अधोगती झाली आहे पुरस्कार विकत घेणाऱ्या लोकांमुळे, असे खेदाने नमूद करावेसे वाटते. विचार तर कराल?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अस्वस्थ समाजाचा नायक” – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अस्वस्थ समाजाचा नायक” – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

(ताराबाईंसारख्या एक दोन नाही तर, महाराष्ट्रात एकशे सत्तर महिला आहेत, ज्यांच्या पतीने पगार मिळत नाही म्हणून, आत्महत्या केली. त्यांच्यानंतर त्यांची मुलं, त्यांची पत्नी, त्यांचे आई-वडील या सगळ्यांचा मुख्य आधार गेला. कुणाचा शिक्षणावर विश्वास राहिला नाही. कुणाचा शिक्षण संस्थांवर विश्वास राहिला नाही. सरकारवर तर नाहीच नाही. थोडा वेळ ‘ती’ महिला आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाली आणि पुन्हा माझी रेल्वे आहे म्हणून परतीच्या प्रवासाला निघाली. ) – इथून पुढे —– 

आम्ही रस्त्याने चालत होतो. मी जगदाळे मास्तर यांना विचारले, “जखमा का झाल्या तुमच्या पायाला?  चप्पल का घालत नाहीत?  काही त्रास आहे का? ”

त्यावर जगदाळे मास्तर काहीच बोलले नव्हते. जगदाळे मास्तरांसोबत असलेले शिक्षक म्हणाले, “गुरुजींनी एक ‘पण’ केला आहे”.

मी म्हणालो “काय? “

त्यावर तो शिक्षक म्हणाला, “जोपर्यंत राज्यातल्या प्रत्येक शिक्षकाला पूर्ण पगार मिळणार नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असे त्यांनी ठरवले आहे”. सतत प्रवास, आंदोलने, उपोषण यातून पायाला दम नाही. ‘तो’ शिक्षक आणि मी बोलताना जगदाळे मास्तर म्हणाले, “माझे कौतुक सोडा, तुमचे सांगा”.

जगदाळे मास्तर यांच्या बोलण्यानंतर ‘ते’ शिक्षक काहीच बोलले नाहीत. ते गप्प गप्प होते. मग जगदाळे मास्तरनीच ‘त्या’ शिक्षकांचा इतिहास सांगितला. ‘ते’ शिक्षक सिद्धार्थ गायकवाड सोलापूरचे आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते एका शाळेवर काम करतात, पण त्यांची चूल पेटत नाही, म्हणून ते शाळेचे काम झाल्यावर एका शेतामध्ये म्हशींचा गोठा सांभाळण्याचे काम करतात. जगदाळे मास्तरसोबत असलेले दुसरे शिक्षक संतोष पवार हे उस्मानाबादचे आहेत. ‘ते’ शाळा झाल्यावर रात्री एका लाकडाच्या घाण्यावर काम करतात. त्यांना बारा वर्षांपासून पगार नाही. जगदाळे मास्तर त्या दोघांची आणि त्यांच्यासारख्या हजारो शिक्षकांची व्यथा मला सांगत होते.

आम्ही चालत चालत ‘प्रेस क्लब’ला पोहोचलो. बऱ्याच वेळापासून जगदाळे मास्तर यांचा फोन वाजत होता. त्यांनी तो फोन घेतला आणि तिकडून येणाऱ्या महिलेचा शांत आवाज आम्ही ऐकत होतो. ती महिला तिकडून बोलत होती, “काहीतरी खाऊन घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका”. तो फोन चालू असताना मी जगदाळे मास्तरांना म्हणालो, “कुणाचा फोन आहे?  आईचा आहे का? “

जगदाळे मास्तर म्हणाले, “नाही माझ्या पत्नीचा आहे”.

मी म्हणालो, “मी बोलू शकतो का? ‘ 

जगदाळे मास्तरांनी माझी ओळख त्यांच्या पत्नीला करून देत लगेच माझ्याकडे फोन दिला. आमचा नमस्कार झाल्यावर तिकडनं जगदाळे मास्तरच्या पत्नी मला म्हणाल्या, “सर तब्येतीची काळजी घेत नाहीत, म्हणून वारंवार फोन करावा लागतो”.

बोलताना जगदाळे वहिनींनी घरची सगळी माहिती माझ्यासमोर ठेवली. जगदाळे मास्तरांना मानसी आणि दुर्गा नावाच्या दोन कन्या आहेत. मानसी सध्या एम. एस. सी. नंतर बी. एड करते आहे आणि दुर्गा दहावीला आहे. आई शकुंतला आणि वडील शिवाजीराव हे दोघेही आता हयात नाहीत. त्यांनी हाती घेतलेलं काम हे फार मोठं आहे. आम्ही परिवार म्हणून त्यांच्या पाठीमागे आहोत. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, की त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे’. असं म्हणून जगदाळे वहिनींनी फोन ठेवला.

आमच्या गप्पा रंगल्या. ‘प्रेस क्लब’मध्ये आम्ही चहानंतर जेवण घेतले. जेवताना जगदाळे मास्तर म्हणत होते, “आज माझे पन्नास हजार शिक्षक आनंदाने जेवणार आहेत. गेले पंधरा दिवस आम्ही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपोषणाला बसलो होतो. सरकारला आमचं म्हणणं पटलं आणि आज पन्नास हजार शिक्षकांना न्याय मिळाला. “

मग काय, शिक्षक, समाज, शिक्षणव्यवस्था, राजकारण या सर्व विषयांवर जगदाळे मास्तर माझ्याशी बोलत होते. आम्ही बोलत असताना विजय तळपे नावाचे एक शिक्षक जगदाळे मास्तर यांना भेटायला आले. त्यांची ओळख करून देताना जगदाळे मास्तर म्हणाले, “हे विजय आहेत. विजयची तीन लग्नं मोडलीत. बायका निघून गेल्या. आता वय वर्ष ४६ आहे. या वयात यांना बायको कोण देणार?  प्रत्येक वेळेला जेव्हा लग्नाचा विषय निघतो, तेव्हा पोरीचा बाप मला फोन करतो आणि विचारतो, “सर मी माझी मुलगी देतो, पण मागची मुलगी विजयला पगार नाही म्हणून निघून गेली. विजयला पगार सुरू होणार आहे ना सर? ”

“मी अगदी आत्मविश्वासाने म्हणतो, हो मग, होईल ना?  तुम्ही काही काळजी करू नका”. असे अनेक विजय प्रत्येक गावात आहेत. माझी भाबडी आशा असते, की वीस टक्के होईल. चाळीस टक्के होईल. काहीतरी होईल आणि माणसं उभे राहतील. माणसं खचून जाणार नाहीत, असे वाटते. पण अनेक वेळा शासन पदरी निराशाच टाकते.

मी म्हणालो, “इतके सगळे शिक्षक आमदार आहेत. इतकं मोठं राजकीय पाठबळ आहे त्याचं काय करायचं? “

त्यावर जगदाळे मास्तर म्हणाले, “हे सगळे शिक्षक आमदार भाषणापुरते आहेत. आश्वासनाच्या खैरातीवर आपली पोळी भाजून घ्यायची आणि पुढे जे गरजवंत आहेत त्यांना टाटा बाय-बाय करत आपण मस्त जगायचं. याच्या पलीकडे या आमदारांचे काहीच काम नाही. बरं, बिचारे सगळे ‘हो हो’ म्हणतात, पण करत काहीच नाहीत. काही मिळाल्यावर मात्र श्रेय घेण्यासाठी यांच्या उड्या पडलेल्या असतात. सतरा-सतरा वर्ष फुकट नोकरी करायची आणि पुढे पैसे मिळाले तर त्याचं काय करायचं?  कारण पूर्ण आयुष्य संपलेलं असतं. अशी अवस्था सगळीकडे आहे. ” 

जगदाळे मास्तरांचा प्रत्येक प्रश्न काळजाला भाजून शिवून काढणारा होता. “शासनाच्या सगळ्या निकषांत बसत असूनही शासनअनुदान पदरात टाकायला का वेळ लावते?  या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळत नाही. अनुदानित शाळांवर दरवर्षी पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च होतात. आणि इथं विनाअनुदानितसाठी अकराशे कोटी द्यायला सरकार मागे पुढे पाहते. मी चप्पल घालावी असं प्रत्येक राजकारण्याला वाटतं. पण मी, ज्या प्रश्नासाठी लढतो, त्याला वाचा फोडण्यासाठी कोणताही राजकारणी पुढाकार घेत नाही. असे का?  आम्ही अर्धी लढाई जिंकली आणि अर्धी लढाई अजून बाकी आहे. एक ना एक दिवस आम्ही ही लढाई जिंकूच! त्या दिवशीच चप्पल घालीन. ” जगदाळे मास्तर बोलत होते आणि मी नुसता ऐकत होतो.

‘प्रेस क्लब’मध्ये जगदाळे मास्तर यांच्या सोबत दोन तास कसे गेले, हे कळालेच नाही. जगदाळे मास्तरांनी घड्याळीकडे पाहिलं आणि म्हणाले, “माझी गाडी आहे आता. मला निघावे लागेल. उद्या परत सांगलीमध्ये बैठक आहे”. असे म्हणून नमस्कार करत जगदाळे मास्तर त्यांच्या वाटेला लागले. एकटाच माणूस, त्या रस्त्याने एकामागे एक पाऊल टाकत निघाला होता. त्याच्या प्रत्येक पावलामागे रक्ताचा थेंब पडून त्याचा ठसा उमटत होता. ‘तो’ रक्ताचा प्रत्येक ठसा ‘त्या’ अस्वस्थ करणाऱ्या समाजाला त्रासून सोडणाऱ्या यंत्रणेला ओरडून सांगत होता, ‘तुम्ही कितीही रस्ते बदला, तुम्ही कितीही त्रास द्या, तुम्ही कितीही अत्याचार करा, मी आंदोलनाचा मार्ग पत्करलेला आहे. आता मी माघार घेणार नाही’.

या अस्वस्थ समाजाला जागे करणारा हा नायक कशाचीही तमा बाळगणार नव्हता. अहंकार, स्वार्थीपणा किंवा कुठल्याही पदाचा हव्यास असता, तर जगदाळे मास्तर कधीही ‘अस्वस्थ समाजाचा नायक’ होऊ शकले नसते. तुमच्या अवतीभवती असे जगदाळे मास्तर अनेक असतील. त्यांना नक्कीच तुम्ही आधार द्या. त्यांच्या लढ्यात सहभागी व्हा. आणि ‘तो’ आपला लढा आहे, असं समजून पुढे या?  येणार ना?  

समाप्त –  

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अस्वस्थ समाजाचा नायक” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अस्वस्थ समाजाचा नायक” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

ऑगस्टमध्ये अमळनेर येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ‘केडर कॅम्प’ आयोजित केला आहे. त्या ‘केडर कॅम्प’च्या अनुषंगाने माझी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या काही पदाधिकाऱ्यांसोबत ‘प्रेस क्लब’मध्ये बैठक आयोजित केली होती. बैठक संपली आणि मी ‘प्रेस क्लब’च्या बाहेर गाडीची वाट बघत थांबलो होतो. 

थोड्या वेळाने मी बाजूच्या रस्त्यावर पाहिले, तर आझाद मैदानावर जी आंदोलन होतात, त्या आझाद मैदानाच्या गेटच्या अलीकडे एक माणूस आणि त्याच्या समवेत काही जण अगदी रस्त्याच्या कडेला बसले होते. त्यांच्यात मोठ्याने संवाद चालू होता. पहिल्यांदा मला वाटलं की, त्या माणसाचा अपघात झालाय, त्याला काहीतरी लागलंय म्हणून, तिथे चार माणसं जमली आहेत. 

मी थोडा पुढे गेलो, तेव्हा तिथे एका माणसाच्या पायावर असणाऱ्या जखमांवर शांतपणे पाणी टाकणारी माणसं मी पाहात होतो. आझाद मैदानातून बाहेर येणारी अनेक माणसं, त्या पायाला जखमा असणाऱ्या माणसाला नमस्कार करत होते. तो माणूस उठायचा, थोडा चालायचा आणि पुन्हा पायाची खूप आग होते म्हणत जागेवर बसायचा. पुन्हा ती माणसं, त्या माणसाच्या पायावर पाणी टाकायची. 

तो माणूस सोबतच्या माणसांना म्हणत होता, “पायाची भयंकर आग उठली हो, दहा-पंधरा मिनिटे काही कळालं नाही, आता थोडसं मन स्थिरावले, तर पायाकडे लक्ष जाते”.

तो पायाला जखमा असलेला माणूस आणि त्याच्या सोबत असणारी माणसं, एकमेकाला बोलत होती, आणि ते मी ऐकत होतो. महाराष्ट्राला उगाच फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत नाहीत, तर इथं काम करणारी अनेक साधीसुधी माणसंसुद्धा, त्याच फुले- शाहू- आंबेडकरांचा वारसा पुढे चालवताना दिसतात. तो पायाला, जखमा झालेला माणूस, त्याच फुले, शाहू, आंबेडकरांचा वंशज आहे, ज्यातून त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या. तो जखमा असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असणारी माणसं कोण आहेत? तिथं ते का बसलेत. येणारी – जाणारी माणसं त्यांना नमस्कार का करतात, इथपासून ते ‘त्या’ पायाला जखमा असणाऱ्या माणसाचा सगळा प्रवास, मी रस्त्यावरच अनुभवत होतो.

हा आपला सारा अस्वस्थ समाज, या समाजाला जागे करायचे, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणारे अनेक ‘नायक’ म्हणून या महाराष्ट्राची खास वैशिष्ट्ये आहेत. तसे ‘ते’ पायाला जखमा असलेले व्यक्ती होते. “कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही”, या भूमिकेच्या पलीकडे जाऊन काम करणारी ही माणसं खऱ्या अर्थाने त्या ‘अस्वस्थ समाजाचे नायक आहेत’. 

या जखमा असणाऱ्या व्यक्तीची कहाणीसुद्धा तशीच आहे, अगदी अस्वस्थ करणारी. ‘त्या’ पायाला जखमा असणाऱ्या माणसाच्या जखमा ह्या केवळ त्याच्या पायाच्या जखमा नव्हत्या, तर राज्यात अस्वस्थता पेरणारी समाजव्यवस्था होती, त्याचे चित्र स्पष्ट करणारे बोलके स्वरूप होते. 

ज्या जखमा असणाऱ्या व्यक्तीशी मी बोलत होतो, त्यांचं नाव खंडेराव शिवाजीराव जगदाळे 

(9673551793) गाव शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. 

जगदाळे मास्तर पेशाने शिक्षक. सुरुवातीला ‘ते’ नोकरी करीत असलेल्या त्यांच्या शाळेवर पगार नव्हता, म्हणून त्यांनी आंदोलनाचा नारा दिला होता. त्यातून त्यांना मिळालेल्या दुसऱ्या शिक्षकांचा प्रतिसाद, मग तिसऱ्याचा प्रतिसाद, असं करत करत जगदाळे मास्तरांनी हजारो शिक्षकांना घेऊन संपूर्ण राज्यात संघटना बांधली. त्या बांधणीमधून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित संघटनेचा जन्म झाला. शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेने जोरात काम उभे केले, ज्याला प्रचंड यश मिळाले.

राज्यात अनुदानाचा ‘टेकू’ घेऊन एक-दोन नव्हे, तर तब्बल ६५०० शाळा आहेत. तिथे काम करणाऱ्या ६२ हजार शिक्षकांना शासनाचे अनुदान कसे मिळेल, त्यांची चूल कशी पेटेल, याची पूर्ण जबादारी या संघटनेने घेतली.

शासनाचे निकष आणि नियमावली ही अनुदानासाठी ठरलेली आहे, पण ते वेळेत कधीच होत नाही. त्यातून शैक्षणिक अस्वस्थता टोकाला गेली आहे. या ६५ हजारांपैकी काहींना २० टक्के, काहींना ४० टक्के, तर काहींना ६० टक्के असा पगार मिळतो. पण ज्यांना वीस वीस वर्ष नोकरी करूनही, काहीच पगार मिळत नाही, अशा शिक्षकांची संख्या या महाराष्ट्रात २३ हजारांपेक्षा जास्त आहे. मग काय? तर आंदोलन करा. लढा उभारा आणि न्याय पदरात पाडून घ्या. यासाठी जगदाळे मास्तरांनी जिवाचं रान केलं. प्रत्येक पीडित माणसामधला शिक्षक जिवंत राहावा, यासाठी पुढाकार घेतला. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जगदाळे मास्तर अनेक पीडित शिक्षकांना घेऊन, ‘महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान संघटनेच्या झेंड्याखाली आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले होते. या संघटनेच्या हाकेला ‘ओ’ देऊन अनेक संघटना एकत्रित आल्या. त्यांनी सर्वांच्या वतीने लढा दिला. आजच या लढ्याला यश मिळाले. या लढ्याने राज्यातल्या ५० हजाराहून अधिक शिक्षकांना थोड्या प्रमाणात का होईना फायदा झाला. त्यांना न्याय मिळाला आणि जगदाळे मास्तरांचे उपोषण, आंदोलन सुटलं. लढ्याचा तंबू आवरून जगदाळे मास्तर दुसऱ्या आदोलनच्या दिशेने निघाले होते. जगदाळे मास्तरांच्या सोबत असलेल्या शिक्षकांशी माझं बोलणं सुरू होतं. ते मला सारे काही सांगत होते. 

मी जगदाळे मास्तरांना विनंती केल्यावर काहीतरी पाहुणचार घेण्याच्या उद्देशाने आम्ही ‘प्रेस क्लब’च्या दिशेने निघालो. आम्ही रस्त्याने जात असताना मागून एका महिलेने आवाज दिला. ‘ती’ महिला म्हणाली, ‘सर, पुढच्या आठवड्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून हातभार लावला, म्हणून मुलीचा संसार लागला. तुम्ही लग्नाला नक्की या’. 

जगदाळे मास्तरांनी हात जोडत, ‘त्या’ महिलेला मी नक्की येतो, असा निरोप दिला. माझ्याकडे पाहात ‘त्या’ महिलेकडे बोट दाखवत, जगदाळे मास्तर म्हणाले, “संदीपराव, ही ताराबाई जाधव. ह्या सांगलीच्या आहेत. संगमेश्वर जाधव या शिक्षकाच्या ‘त्या’ पत्नी आहेत. संगमेश्वर यांनी सतरा वर्ष पगार मिळेल, याची वाट पाहिली. संगमेश्वर दिवसभर शाळा करायचे आणि रात्री शेतीचे काम करायचे. सतरा वर्षांनी बिचाऱ्या संगमेश्वरचा संयम सुटला. संगमेश्वरने कमरेला दगड बांधून विहिरीत उडी मारली. काहीतरी मावेजा मिळावा यासाठी ‘ही’ महिलाही आमच्या समवेत अनेक वर्ष आंदोलनात आहे. आम्ही सर्वांनी ताईला मदत व्हावी, यासाठी पुढाकार घेतला. मुलांचे शिक्षण झाले. आता लग्न होत आहे. अजून या महिलेला न्याय मिळाला नाही.

मी ‘त्या’ ताराबाईंशी बोलत होतो. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. ताराबाई मला म्हणाल्या, “दादा घरातला कर्ता माणूस गेला आणि उमेदीचे दिवस संपले की, आयुष्यात शिल्लक काही उरत नाही. त्रासातून सुटण्यासाठी पुरुष मरतात. महिलांचं तसं नसतं. त्यांना सगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. जगदाळे सरांसारखे पाठीराखे भाऊ माझ्या मागे नसते तर, मीही माझ्या आयुष्याला आत्महत्येची दोरी लावली असती. माझे पती गेले त्यांच्या पाठोपाठ, ‘त्यांचे’ आई-वडील गेले, नंतर माझे आईवडील गेले. पाहता पाहता आयुष्यातला सगळाच आधार मावळला”.

उपासपोटी, ज्ञान देणारे शिक्षक, त्यांच्या कार्याला किती न्याय देत असतील, हे त्यांचे त्यांनाच माहिती! या शिक्षकाला शिक्षणाला न्याय देत असताना, त्या शिक्षकाला एकीकडे समोर बसलेली उद्याची पिढी दिसत असेल, आणि दुसरीकडे त्यांच्या घरी त्यांचे उपाशी असलेली मुलंबाळं दिसत असतील. सारे काही धक्कादायक होते.

मी एकदम भानावर आलो. ताराबाईंच्या संवादातून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. ताराबाईंच्या पतीची आई, ताराबाईची आई यांच्यामध्ये होणारा संवाद सांगून ताराबाई अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या. अत्यंत भावनिक असणारे जगदाळे मास्तर, त्या बाईला शांत करण्याऐवजी स्वतःचे अश्रू खिशातल्या रुमालाने पुसत होते. 

ताराबाई स्वतः सावरल्या आणि म्हणाल्या, “सर मी निघते. गाडीची वेळ झाली. सोबत आणखीन महिला आहेत”. जगदाळे मास्तरांनी ‘त्या’ महिलेकडे पाहायची हिंमतही केली नाही. तिला नमस्कार करत, ते शांतपणे जागेवर उभे राहिले. 

ताराबाईंसारख्या एक दोन नाही तर, महाराष्ट्रात एकशे सत्तर महिला आहेत, ज्यांच्या पतीने पगार मिळत नाही म्हणून, आत्महत्या केली. त्यांच्यानंतर त्यांची मुलं, त्यांची पत्नी, त्यांचे आई-वडील या सगळ्यांचा मुख्य आधार गेला. कुणाचा शिक्षणावर विश्वास राहिला नाही. कुणाचा शिक्षण संस्थांवर विश्वास राहिला नाही. सरकारवर तर नाहीच नाही. थोडा वेळ ‘ती’ महिला आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाली आणि पुन्हा माझी रेल्वे आहे म्हणून परतीच्या प्रवासाला निघाली. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुभद्रा – लेख क्र. ६ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ सुभद्रा – लेख क्र. ६ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.) 

सारी नक्षत्रं ओंजळीत घेऊन मी उभे होते. सारी ओंजळ मी पार्थांच्या अंगणात रिती केली पण ती नक्षत्रं अंगणात सांडलीच नाहीत, वरच्यावर कुठेतरी विरून गेली. कां? याचे उत्तर शोधते आहे, या सांजवेळी सौंधावर उभी राहून! मागे पाहतांना‌ सारं लख्ख आठवतंय!!

तात आणि देवकी माता यांचा बंदिवास संपला होता. तातांसाठी त्यांच्या बलवान पुत्रांनी सुवर्णानं मढलेली द्वारका नगरी दिमाखात उभी केली होती. अशा सुख समृद्धीत माझा जन्म झाला. नाव ठेवलं सुभद्रा! भद्र म्हणजे कल्याण! कल्याण करणारी! म्हणजे इतरांचं? माझं काय? आठवतोय तो फक्त माझ्या दुःखाचा पाढाच! एकदा कुंती आत्या सर्व मुलांना घेऊन आली होती. त्यावेळी पार्थांना मी प्रथम पाहिलं आणि पहिल्याच दृष्टी- भेटीत जायबंदी झाले. हळूहळू मलाही उमगलं की माझं स्थानही त्यांच्या हृदयातच आहे. ही गोष्ट श्रीकृष्ण दादांच्याही नजरेतून सुटली नाही. ते तर सरळ सरळ माझ्यासमोरच पार्थांना म्हणाले, ” अर्जुना आमची सुभद्रा आम्ही तुला देणार. एकदा फक्त बलराम दादांशी बोलून घेतो.” मला तर अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. मग मी विवाहाची स्वप्नं रंगवायला लागले. रोजच पार्थांची वाट पाहू लागले. आपणहून विवाहाचा विषय काढायचा तरी कसा? पण पार्थानीच एकदा मला सांगितलं की, ” अजून युधिष्ठर दादांचा विवाह व्हायचा आहे. कौरव तर आमच्या विनाशाचीच वाट पाहत आहेत. एकदा सगळं स्थिरस्थावर झालं की मोठ्या सन्मानाने तुला घेऊन जाईन.” वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात होतं तरी काय!!

मग तो लाक्षागृहाचा प्रसंग! बापरे!! पांडवांचं क्षेमकुशल समजण्यास मार्गच नव्हता. शेवटी न राहून कृष्ण दादांना विचारलं. म्हणाले, ” तू अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नकोस. एक लक्षात ठेव राजकन्येच्या अंगी अष्टकला असाव्यात, असा दंडक आहे. त्यात तू परिपूर्ण व्हायला हवं. विचाराला अन् आचाराला वळण लागायला हवं.” दादांच्या शांत असण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला आणि मग हायसं वाटलं. नंतर समजलं, पांडव मातेसह वेष बदलून ब्राह्मण वेषात माधुकरी मागून, एका झोपडीत दिवस कंठीत आहेत. पण इतकं कष्टप्रद जीवन! कसंसच वाटलं! माझा मात्र वाट पाहण्याचा कालावधी आणखी वाढला.

त्याच गडबडीत द्रुपद राजाने आपल्या कन्येचं स्वयंवर मांडलं. ब्राह्मण वेषातच पार्थ स्वयंवराला गेले. त्यांनी द्रौपदी मिळवली पण त्यावेळी माझ्या मनावर किती आघात झाले झाले असतील याची जाणीव कुणालाच नव्हती. ना दादांना, ना पार्थांना! विवाहानंतर पांडवांना अर्धं राज्य म्हणून खांडव वन दिलं गेलं. दादा आणि पार्थ यांनी विश्वकर्म्याच्या सहाय्याने तिथे स्वर्ग निर्माण केला. मयराक्षसानं तर मय सभा उभी केली. दादा एकेक वर्णन करून सांगायचे, मग तर कधी जातोय अन् सारं पाहतोय, असं झालं होतं. हळूहळू पांडवांनी आपल्या राज्याची भरभराट केली. आता सारं स्थिरस्थावर झालंय असं वाटत होतं पण माझं दुर्भाग्य ते माझ्या मागूनच येत होतं. का ते माझ्या पुढेच होतं कोणास ठाऊक! नियमांचा भंग केल्याबद्दल पार्थांना बारा वर्षाचा वनवास पत्करावा लागला. ते तीर्थयात्रेला बाहेर पडले. उत्तरेकडे हिमालयात ऊन, वारा, थंडी, पाऊस सगळं झेलत फिरायचं. काय खात असतील? कुठे झोपत असतील? मला अन्न गोड लागेना. शेज सुद्धा खुपायला लागली. पुन्हा माझी प्रतीक्षा सुरू! तब्बल बारा वर्षांची!

कृष्ण दादांकडून पार्थांची खुशाली कळत होती. पण इतर बातम्या काळजाला घरे पाडणाऱ्या होत्या. पार्थांचा नाग लोकात उर्वशीशी झालेला विवाह! मणिपूरची राजकन्या चित्रांगदेशी झालेला विवाह! त्यात भर म्हणून की काय बलराम दादांनी माझा विवाह दुर्योधनाशी पक्का केला. ते तर खूप तापट! त्यांच्यासमोर ब्र काढण्याची पण प्राज्ञा नव्हती. काय करावं काही सुचत नव्हतं. कृष्णदादा मूग गिळून गप्प बसले होते म्हणून राग येत होता. पण त्यांनी काहीतरी मनात निश्चित ठरवलं असणार असंही वाटत होतं. कारण त्यांनीच तर पार्थांना वचन दिलं होतं की सुभद्रेचे पाणी ग्रहण तूच करणार! आणि, आणि, तो क्षण आला! माझी प्रतीक्षा संपणार होती. पार्थ प्रभास पट्टण येथे आले आहेत हे कळल्यावर कृष्ण दादा गेले. सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि सुभद्रा हरण झालं! मला एवढा आनंद झाला होता पण तेवढीच भीती पण वाटत होती. बलाराम दादा आता काय करतील? इंद्रप्रस्थास गेल्यावर माझं तिथं स्वागत होईल का? कसं होईल? अनेक प्रश्न मनात रुंजी घालत होते. पण तसं काहीच झालं नाही. बलराम दादांना समजावण्यात कृष्ण दादा यशस्वी झाले, आणि आम्हाला परत घरी नेऊन मोठ्या थाटात आमचं लग्न लावून दिलं. वनवास संपल्यावर आम्ही इंद्रप्रस्थास गेलो. तिथंही मोठ्या उत्साहात आमचं स्वागत झालं आणि माझं सुखाचं पर्व सुरू झालं. महाराणींच्या संगतीत खूप कांही शिकायला मिळालं.लवकरच गर्भाची चाहूल लागली तेव्हा तर माझे डोहाळे पुरवतांना पार्थांनी काहीही न्यून 

 ठेवलं नव्हतं. मला तेंव्हा धनुष्यबाण खेळण्याची इच्छा होत होती. तेंव्हाच सगळे म्हणत होते, सवाई धनुर्धर जन्माला येणार आणि पांडवांच्या किर्तीत भर घालणार. दादा आणि पार्थ यांच्या गप्पा नेहमी युद्धनीतीच्याच असायच्या. माझी भूमिका श्रोत्याचीच असायची. पण मला वाटायचं उदरातला अंकुर सारं ऐकून हुंकार देतोय. पुत्र जन्म झाला आणि मी तृप्त झाले. पण माझं दुर्दैव? अजूनही जायचं होतं!

दुर्योधनाने द्युताचं आमंत्रण दिलं. महाराणीं सह सारे हस्तीनापूरला गेले. जातांना सहदेव पुत्र श्रुतसेन आडवा आला. जाऊ नका म्हणू लागला आणि सगळ्यांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली. नलराजाचा घात या द्युतानेच केला होता. पण महाराजांना कोण समजावणार? दूत येऊन बऱ्याच गोष्टी सांगायचा पण महाराणी घरी आल्यावर सारं समजलं. समजलं कसलं? सारंच आकलनापलीकडचं होतं. डोकं बधिर झालं होतं. किती रडले मी! वनवासात मलाही बरोबर न्या म्हटलं. पण साऱ्या पांडवपुत्रांचा सांभाळ कोण करणार? त्यांची जबाबदारी कोण घेणार? पतीसेवा धर्म सोडून मला पती आज्ञा पाळावी लागली. पांडव पुत्रांना घेऊन दादांबरोबर द्वारकेस गेले. माझ्या नशिबी पुन्हा वियोग! आता तेरा वर्षांचा!!

तेरा वर्षे, वाटेकडे डोळे लावून बसले होते. कृष्ण दादांनी सारे कुशल आहेत व परत येत आहेत हे सांगितले. त्यावेळी त्यांनी आणखी एक गोड बातमी दिली. विराट राजाची कन्या उत्तरा हिच्याशी अभिमन्यूचा विवाह निश्चित झाला होता. थोड्याच दिवसात राज्य नसलेल्या राजकुमाराचा विवाह मात्र राजवैभवात पार पडला. मला वाटलं आता प्रतीक्षा संपली. सुखच सुख येईल. पण! हा पण, नेहमीच आडवा येतो. ‘सुईच्या आग्रावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही ‘ या कौरवांच्या दर्पोक्तीने युद्धाची ठिणगी पडली. पुन्हा चिंता!! विजय आमचाच होईल याची खात्री होती पण त्यासाठी कोणती किंमत द्यावी लागणार? आपण अर्जुनाचा पुत्र आहोत हे सिद्ध करून अभिमन्यू ने प्राण सोडले. मी उत्तरेला पोटाशी धरून सुन्न होऊन बसले होते. तिच्या पोटात तर आमचा पौत्र वाढत होता. त्यातच महाराणींनी पार्थांना “जयद्रथाचा सूड घ्या नाहीतर मी महाराजांच्या पायाशी देहत्याग करेन” हा निर्वाणीचा इशारा दिला. पार्थांनी जयद्रथाचा सूड घेईन, असा शब्द दिला आणि शब्द पाळला गेला नाही तर अग्नी काष्ठ भक्षण करेन अशी प्रतिज्ञा केली. काय अघोरी प्रतिज्ञा!! मी काय करू? पुत्रशोक करू? उत्तरेला सांभाळू? की पार्थांची चिंता करू?

महाराणींचा जन्म केवळ पांडवांच्या पराक्रमाला, तेजाला उत्थान देण्यासाठी झाला आहे पण माझं जीवन कार्य कोणतं? फक्त पुत्र- पौत्रादिकांचा सांभाळ करणं? महाराणींशी पार्थांचा विवाह मी मान्य केलाच होता. ते तेजाचं तेजाशी मिलन होतं. पण मला प्रीतीची वचनं देऊन चित्रांगदा व उर्वशी यांच्याशी झालेला विवाह? महाराणी या सगळ्याला राजकारण म्हणून सोडून देतात पण मला हे पटत नाही आणि ते राजकारण कळतही नाही. एवढंच कळतं कि इथे भावनांना अधिष्ठान नाही. पुत्रमरणाचे दुःखही करायचं नाही? हे कसलं जिणं! महाराणींचा हक्क मी कधीच नाकारला नव्हता पण माझं स्थान? ते मला कधीच कां नाही मिळालं? म्हणायचे मात्र द्रौपदी माझी सह-धर्मचारीणी आहे पण तू माझ्या हृदयाची अधिष्ठात्री देवता आहेस. पण माझ्या इच्छांचं, अपेक्षांचं काय? त्या तर हर घडी पायदळी तुडवल्या गेल्या, कर्तव्याच्या सोज्वळ नावाखाली!

आज हा उगवता सांजतारा पाहून आठवते ती पार्थांच्या भेटीसाठी आसुसलेली सुभद्रा! अभिमन्यूच्या जन्मानंतर रोमरोमी नक्षत्रांचा साज ल्यालेली सुभद्रा! आता एकटीच आहे. पार्थ या सुभद्रेची एवढी तरी विनंती ऐका, तुमच्या निर्वाणाआधी माझे निर्वाण होऊ द्या. या रित्या ओंजळीत एवढं तरी दान पडू द्या!

– लेख क्र. ६ 

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

(नारद भक्तिसूत्रे १२ व १३ – लेख क्र. १२) 

भवतु निश्चयदार्ढ्‍यादूर्ध्वं शास्त्ररक्षणम ॥१२॥

अन्यथा पातित्याशङ्‍कया ॥१३॥

अर्थ : (अलौकिक अशा भगवत्प्रेमाचा मनात) निश्चय दृढ झाल्यानंतर शास्त्राचे रक्षण व्हावे. ॥१२॥

 अन्यथा पातित्याची संभावना आहे. ॥१३॥

विवेचन:~ मागील सूत्रात लौकिक व वैदिक कर्मापैकी भगवद्‌भक्तीस अनुकूल कर्मे करावीत व भगवद्‌भक्तीविरोधी व्यवहारात उदासीनता राखावी, असे म्हटले आहे. त्याचा विचार त्या सूत्राच्या विवेचनात झाला आहे. भक्ताचे विशेष कर्तव्य अंतःकरणात भगवान् व त्याच्या प्राप्तीचे साधन भक्तिप्रेम याच विषयाचा निश्चय दृढ राखणे हे आहे; आणि हाच साधकाचा धर्म सांगितला आहे.

याविना अन्य धर्माचरणात भक्ताने स्वतःला बांधून घेऊ नये. श्रीतुकाराममहाराज हेच पुढील अभंगात सांगतात –

निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥

निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥

तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥

(अभंग क्रमांक. ९४०, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

मी साधक झालो, साधक म्हणून माझी प्रगती सुरू झाली, आता मला कोणताही नियम पाळण्याची अथवा बंधने पाळण्याची गरज नाही असे काही साधकांना वाटू शकते.

श्रीमद्‍भगवद्‌गीतेतील बाराव्या अध्यायात जी भक्तलक्षणे सांगितली आहेत, त्यांत ‘यतात्मा दृढनिश्चयः’ असे एक महत्त्वाचे लक्षण आहे.

विनोबाजी याचे गीताई मध्ये पुढील प्रमाणे भाषांतर करतात.

सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी|

अर्पी मज मनो_बुद्धि भक्त तो आवडे मज||

(गीताई १२. १४)

मन शुद्ध केल्याशिवाय साधकाची अध्यात्मातील प्रगती होऊच शकत नाही. साधकाचा ‘मन ते अमन‘ असा प्रवास असतो.

संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग आपल्याला खूप काही सांगून जातो.

नाही निर्मळ जीवन । काय करील साबण॥ १ ॥

तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥२॥

वृक्ष न धरी पुष्पफळ। काय करील वसंत काळ ॥ ३ ॥ 

वांजे न होती लेकुरे । काय करावे भ्रतारे ॥ ४ ॥ 

नपुंसका पुरुषासी । काय करील बाईल त्यासी ॥ ५ ॥ 

प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥

तुका म्हणे जीवने विण । पिक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥

(अभंग क्रमांक ४०४, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

ज्याला परमेश्वराची प्राप्ती करवून घ्यायची आहे त्याने अनेक पथ्ये पाळण्याची गरज असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणें पथ्ये सांभाळावी”. अर्थात हा नियम दैनंदिन व्यवहारात देखील पाळावा लागतो. ज्या कार्यालयात आपण नोकरी करतो, तेथील नियम आणि अटी मनुष्याला कधी नाईलाजाने तर कधी आवडीने पाळाव्याच लागतात आणि इथे तर साक्षात भगवंताची चाकरी आहे तर मग नियम अधिक कठोर असणार आणि लबाडी चालणे शक्यच नाही. सर्व संत असे सांगतात की देव कुठे बाहेर भेटत नाही तर तो आपल्या अंतरंगात असतोच, फक्त मन आणि शरीर शुद्ध झाले की तो प्रगट होतो, साधकाचेला आत्मप्रचिती होते.

आपण कुठे बाहेरगावी फिरावयास गेलो तर आपल्या आवडीचे आणि खिशाला परवडेल असे राहण्याचे ठिकाण शोधतो. इथे तर साक्षात भगवंत राहायला येणार असेल (अंतरंगात प्रकट होणार! ) तर आपले शरीर आणि मन त्याला आवडेल असे ठेवायला नको का? समजा तसे ते नसेल तर तो एखादवेळेस येईल पण कायम राहील याची शाश्वती कोण देणार? म्हणून साधकाने आपले आचार, विचार आणि आहार अतिशय शुद्ध ठेवायला हवा. शरीर शुद्ध राहण्यासाठी साधकाने योग्य तितका व्यायाम नियमितपणे करावा तसेच सात्विक आहार घ्यावा. आहार पचायला हलका असावा, तसेच चवीला तीव्र नसावा. पोट भरेल आणि सुस्ती येणार नाही याची काळजी साधकाने जरूर घ्यावी. वाढत्या वयाबरोबर जिभेची चव आणि पोटाची भूक कमी व्हावी तसेच जिभेलाही थोडा आराम द्यावा. पचनसंस्थेस आराम मिळावा म्हणून साधकाने महिन्यातून किमान दोनदा किंवा जास्तीतजास्त चार दिवस उपवास करावा (निराहार राहावे). “एकादशी आणि दुप्पट खाशी” असे होऊ नये. अतिउपवास केल्यामुळे नैसर्गिक भूक मरते आणि शरीरात विकृती निर्माण होतात, असे पू. बाबा आपल्याला सांगतात. आहारावर नियंत्रण आले की झोपेवर नियंत्रण मिळविणे सोपे होते.

“ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला” असे म्हणतात ते याचसाठी.

या विषयाशी निगडीत संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजांचा एक अभंग महत्त्वाचा आहे.

“हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी दोष । श्रवण स्मरण भक्ति तेणें पडली वोस ॥१||हरिनामाचेनि बळे करिसी अदर्ध । देवाचेनी तुमचें शुद्ध नोहें कर्म ॥२॥ दुर्वासाचेनि कोपे अंबऋषीस शाप । देवाचे चक्रें त्या दिधलें संताप ॥३॥ सत्यवती धर्म सदयज्ञनिष्ठ । असत्य वचनी त्याचा झाला अंगुष्ठ ॥४॥ निष्पाप मांडव्य शुळीं वाइला । इतुकियास्तव यम दासीपुत्र केला ॥५॥ एका जनार्दनीं संत सोयीनें चाले । सदगुरुवचनें सबाह्म शुद्ध जालें ॥६॥”

(अभंग क्रमांक १६७१, एकनाथी अभंग गाथा)

याच दृष्टीने नारद महर्षीनी अन्यथा पातित्याशंकया’ असे सूत्रात म्हटले आहे की साधकाचे विहित कर्माचरण सुटले, अधर्मप्रवृत्ती वाढली तर कदाचित भक्तिमार्गापासून साधक पतित होण्याचा संभव आहे.

संतांची उच्छिष्टें। बोलतों उत्तरे।

काय म्यां पामरें। जाणावें हें।।

 – संत तुकाराम महाराज

जय जय रघुवीर समर्थ!!

(वरील दोन्ही सूत्रे एकमेकांशी निगडीत असल्याने त्यांचे विवेचन एकत्र केले आहे.) 

– क्रमशः लेख क्र. १२ व १३  

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दीप अमावस्या!… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

दीप अमावस्या! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

चातुर्मासातली आवडत्या कथांमधली दिव्यांची कथा ही माझ्या फार आवडीची. लहानपणापासून मला या कथेचे विलक्षण आकर्षण आहे. आजही अगदी झाडांवरती येऊन बसलेले दिवे, त्यांच्या आपसातल्या गप्पा आणि मग त्यावेळेला राजाला कळलेली आपली चूक आणि मग त्याने आपल्या सुनेचा प्रेमाने स्वीकार करणं. या सगळ्या गोष्टी विलक्षण वाटायच्या. चातुर्मासातल्या कुठल्याही कथेला वेगवेगळे कंगोरे आहेत. ते पाहणं ही एक मजा आहे.

मला नेहमी मानवी स्वभावाचे गुढ वाटत आलं आहे. कारण माणसाला कुठल्याही कृती मागे, परंपरेमागे एखादा कथानक रचण्याची, असण्याची सवय झाली आहे. विचार करायला लागल्यावर मला असं जाणवलं की बऱ्याचदा आपण कथानकांमधून घडत जातो. म्हणजे एक प्रकारचे आपण कथेतली पात्रंच आहोत. मग या कथा आपल्या घराण्यातल्या कुळाचार, चालीरीती यातून सांगितलेल्या असतील. काही सार्वजनिक सण, परंपरा यांच्यामधून आल्या असतील किंवा धार्मिक सोहळ्यांमधुन आल्या असतील. त्या सगळ्या आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काहीतरी देत असतात. घडवत असतात.

कालौघात नक्कीच चातुर्मास कथा वाचनाचं प्रमाण कमी झालं असेल. परंतु लहानपणी वाचलेल्या कथांचं गारुड आजही अनेकांच्या मनावर आहे. ज्यांच्या घरात वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आजही चातुर्मासाच्या काळात त्या कहाण्यांचं वाचन होत असेल.

आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की या कथा आजच्या काळाशी अगदी विसंगत आहेत. आणि ते काही अंशी बरोबर आहे. दिव्यांच्या झगमगटाच्या काळामध्ये पणतीचं किंवा समईच महत्त्व असलं तरी त्यांचं महात्म्य मान्य करणं हे जरा अवघड जाऊ शकतं. कारण पूर्वीच्या तुलनेत त्याची उपयुक्तता कमी आहे. पण तरीही या प्रथा पाळल्या जातात. काही बदल विरंगुळा हे एक कारण नक्कीच आहे. परंतु गंमत म्हणजे त्या मागचं हे कथानक जुनं झाली तरी ते टाकून द्यायला आपण तयार नसतो. आपल्याला त्यातलं एक भाबडेपण, एक सश्रद्ध आणि एक साधं नैसर्गिक वातावरण लोभसवाणं वाटतं.

मला या कथा रचणाऱ्या रचनाकाराचं विशेष कौतुक वाटतं. म्हणजे माणूस आणि वस्तू यांच्यामधलं नातंसुद्धा किती सघन आहे ते यातून दिसतं. दिव्यांना बोलता येतं, ते इकडे तिकडे फिरू शकतात, झाडावर येऊन मस्त माणसांप्रमाणे गप्पा मारू शकतात, ही गोष्ट मला फार अचंबित करते. लहानपणी खूप प्रश्न पडायचे. काहींची उत्तरं मिळायची काहींची नाही. पण ही गोष्ट ऐकताना माझी एक सुंदर समाधी लागायची. सगळे दिवे आपापल्या घरातल्याप्रमाणे रूप धारण करून एका वडाच्या झाडावर येऊन बसलेत. छान पाय मोकळे सोडून फांद्यांना घट्ट धरून गप्पा मारत बसलेले ते दिवे मी माझ्या नजरेसमोर आणायचे. शेतकऱ्याचा दिवा कसा साधा फेटा घातलेला समाधानी असेल.. एखादा मजुराचा दिवा कसा मिणमिणता थकलेला असेल… सरदाराचा दिवा कसा जरा डौलदार असेल आणि राजांचा दिवा तर काय विचारूच नका त्याला फार छान, मुकुट छान, अंगरखा वगैरे असेल… आणि त्याचा खूप मोठा प्रकाश पडत असेल असं मला वाटायचं. साहजिकच ते बोलताना झाडांवर सगळे प्रकाश कमी-जास्त होत असतील. त्यांच्या सावल्या कशा गमतीशीर पडत असतील. ते झाड कसं दिसत असेल. अशा अनेक गोष्टी मी कल्पनेतूनच रंगवत राहायचे.

या गोष्टीने बाकी काही दिलं नाही दिलं पण कल्पनेतून छाया प्रकाशाचा खेळ कसा कमी जास्त होतो हे मात्र दिलं. मग ती राजाची सून तिने, खाल्लेला पदार्थ उंदरावर घेतलेला आळ आणि त्याने चिडलेल्या उंदराने घेतलेला सूड त्यामुळे खुश होऊन मिशीला पीळ मारून फिरणारा उंदीर, रागावलेले पाहुणे, राजाच्या घरची माणसं, सगळे नोकरचाकर, राजाच्या सुनेचा होणारे हाल आणि मग शेवटी थकून भागून येऊन झाडाखाली बसलेला देखणा राजबिंडा राजा, यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणारा मनातच आपण कसलीच खातरजमा केली नाही म्हणून खजील होणारा आणि सरते शेवटी सत्य समजल्यावर मोठ्या मनाने आपली चूक कबूल करून सुनेला माफ करणारा… अशी चित्रांची एक मालिका डोळ्यांपुढे तयार व्हायची.

कधी उंदीर चांगला तर कधी खलनायक, कधी राजाची सून चांगली तर कधी ती खलनियिका, कधी राजा चांगला, त्याचा परिवार चांगला तर कधी तो आणि त्याचा परिवार खलनायक. या गोष्टीत मला जाणवलेली गंमत अशी की यामधली सगळी पात्रं दिवे सोडून चांगलीही वागलीत आणि वाईटही वागलीत. पण शेवटी सगळ्यांनाच आपल्या चुका कळतात. थोडक्यात सगळ्यांचाच अंधार अज्ञानाचा, मोहाचा, अविश्वासाचा दूर होतो. दिवेच तो अज्ञान दूर करतात तटस्थपणे घटना सांगून. आणि मग राजा घरी सगळीजण एकत्र येतात. सुखाने नांदतात. म्हणजे हा दिवा अज्ञानाचा पडदा दूर करतो आणि ज्ञान देतो त्याने सगळ्यांनाच आपापल्या चुका कळून त्या सुधारण्याकडे त्यांचा कल राहतो.

गोष्ट आवडत राहते याचं कारण हेच आहे. अज्ञान आहेच ते दूर करण्यासाठीच अनेक कथानकं, घटना घडतात, कधी घडवाव्याही लागतात आणि त्यानंतरच ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्यामुळे कथा जुनी आहे प्रतीकंही जुनी आहे परंतु त्यातला मतीतार्थ मात्र आजही लागू आहे. आजच्या घडीला ताजाही आहे.

त्यामुळे

“काजळी जमण्याची खंत बाळगावी कशाला

तो तर तेवण्याचा जिवंत पुरावा आहे”

हे लक्षात घ्यावं. चातुर्मासाच्या या कथा वाचताना आणि आपापल्या परीने कल्पनेत रंगावं आणि आपल्या परीने त्याचे अर्थ शोधताना पुन्हा पुन्हा प्रकाशमान होत राहावं.

याच सर्वांना दीप अमावस्येच्या शुभेच्छा!

फोटो – पिंटरेस्ट

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares