श्री दिवाकर बुरसे
अल्प परिचय
नावः दिवाकर धुंडिराज बुरसे
१९६७ सप्टेंबरमधे पासून पुण्याच्या टाटा मोटर्स या जगप्रसिद्ध कंपनीत मशीन टूल डिझाईन्स विभागात कार्यरत. २००६ साली डिव्हिजनल मॕनेजर पदावरून सेवानिवृत्त.
१९९२ साली ‘श्री सुरक्षितताबोध’ हा ‘सुरक्षितता’ विषयावरील एकवीस अध्यायी काव्यबाद्ध ग्रंथ लिहिला. टेल्को कंपनीने प्रकाशित केला.
उद्योग महर्षी आदरणीय श्री शंतनुराव किर्लोस्कर यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्र शासनाने विशेष साहित्यिक पारितोषिक प्रदान करून ग्रंथास गौरविले.
इंद्रधनुष्य
☆ दिव्याची आवस आणि गटारी आवस… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
आषाढ अमावस्येला पूर्वी ‘दिव्यांची आवस’ किंवा ‘दर्श अमावस्या’ म्हणत. अलिकडे हा दिवस ‘गटारी आवस’ म्हणून महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. तो अधिकाधिक उत्साहाने साजरा करण्याची जणु चुरसच गटा-गटात, कुटुंब-परिवारात आणि गावा-गावात लागल्याचे दृष्य आहे.
आठवडाभर आधीपासूनच आपल्याला व्हाॕटस् ॲपवर या गटारीवरचे सवंग जोक्स यायला लागतात. हे जोक्स् काही मंडळी अगदी चवीने वाचतात, एवढेच नाही, तर इतरांनाही कौतुकाने पाठवतात.
छंदीफंदी चंगळवादी मंडळी या गटारी महोत्सवाच्या तयारीला आठवडाभर आधीच लागतात. मित्रमंडळी वर्गण्या गोळा करू लागतात. उत्सवाला साजेसा ‘माहोल’ बनवायला लागतात. जमवत असलेला माहोल चढत्या क्रमाने परमोत्कर्षबिंदूपर्यंत नेटाने नेतात आणि आवसेच्या मध्यरात्री तो परमोत्कर्षबिंदू मनासारखा साधला जातो एकदाचा!
मग ही पेताड मंडळी दुस-या दिवशी दुपारपर्यंत जागोजागी, पदपथांवर, रस्त्यात, घरांच्या कुंपणाच्या भिंतींजवळ, गल्ली, बोळ, नुक्कड, मोहोल्ल्यातल्या गटारा-गटारात सुखेनैव अस्ताव्यस्त व बेधुंद अवस्थेत लोळत पडलेली आढळतात.
शेवटी रस्त्यावर गस्त घालणारे पोलीस किंवा पेताडांच्या घरची मंडळी त्यांना शोधून काढतात. दोघा-तिघांच्या मदतीने त्यांना उचलून कसेबसे घरी नेऊन पाईपाने पाणी मारून लख्ख धुऊन काढतात. एवढे केल्यावर ही मंडळी ब-यापैकी भानावर येतात!
या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला आरंभ होतो. श्रावण हा हिंदूंचा पुण्यप्राप्तीचा, व्रतवैकल्ये, उपास-तापास करण्याचा महिना अशी धार्मिक मान्यता आहे. या श्रावण महिन्यात मांसाहार, मद्यपान पूर्ण वर्ज्य असते. अर्धशतकापूर्वीपर्यंत बहुतेक हिंदु ही शिस्त पाळत होते.
अलीकडे मात्र कितीजण हे पाळतात, कोण जाणे. हल्ली ‘गटारी अमावस्या’ मात्र बरेच लोक उत्साहाने साजरी करताना दिसतात.
मुळात गटारी आणि गटार यांचा काही संबंध असतो, की नसतो, हेच आपल्यापैकी अनेकांना ठाऊकही नाही.
गटारी अमावस्या हे नाव कसे पडले?
‘गतहारी’ अमावस्या हा मूळ शब्द. ‘गत’ (गेलेला) आणि ‘आहार’ (खाणेपिणे) या दोन शब्दांपासून सिद्ध झालेला शब्द म्हणजे ‘गताहार’. गताहारचा अर्थ होतो ‘गेलेला, त्यागलेला आहार’. ‘गतहारा’चा अपभ्रंश ‘गटारी’. यावरून याला ‘गटारी अमावस्या’ असे नाव पडले आहे, असा तर्क काही भोळेजन देतात.
दुसरा तर्क असा की, त्या दिवशी लोक मनसोक्त मांसाहार करून व दारू पिऊन अक्षरशः गटारात लोळत पडतात, म्हणून याला ‘गटारी आवस’ म्हणतात. मला तरी हा दुसरा तर्क वस्तुनिष्ठ व अधिक तर्कसंगत आणि म्हणून योग्य वाटतो.
आता ही ‘गटारी’ का साजरी केली जाते?
श्रावण महिन्यात दारू, मांसाहार या गोष्टी वर्ज्य मानल्या आहेत. म्हणून श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात-पीत नाही. म्हणजेच सामिष आहार नित्य भोजनातून गेलेला असतो. म्हणून श्रावण सुरु होण्याआधीची म्हणजेच आषाढाची अमावस्या गताहारी, साजरी केली जाते आणि पुढच्या महिन्याभरात जे जेवण त्यागायचे आहे, सोडायचे आहे ते भोजन या दिवशी यथेच्छ केले जाते. पुढे महिनाभर मांसाहार, अल्कोहोलयुक्त पेये आणि कांदा आणि लसूण यांसारखे तामसी पदार्थ आहारातून कटाक्षाने टाळतात. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळे महाराष्ट्रात गटारी अमावास्या साजरी केली जाते.
गटारी आवसेचे हे लोण शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडूपर्यंतही जाऊन पोहोचल्याचे समजते.
गटारीच्या दिवशी, लोक जवळचे मित्र आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेतात. श्रावण सुरू झाल्यानंतर चिकन, मटण, मासे खाणे चुकीचे मानले जाते. पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात आजारांचा धोका अधिक असतो. त्यामुळे लोक हलके अन्न खाण्यास प्राधान्य देतात. गटारी सणाच्या दिवशी, कुटुंबे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत या सामिष मेजवानीचा आनंद घेण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात, एकत्र बसून खाणे-पिणे करतात.
दुर्दैवाने ‘गटारी अमावस्या’ या दिवसाचे मटण-मच्छी खाणे आणि आकंठ दारू पिणे याव्यतिरिक्त काही वेगळे सांस्कृतिक महत्व आहे, हे आपण सपशेल विसरलो आहोत! ते महत्व सहसा कोणी माहित करून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही.
म्हणून सांगावेसे वाटते, ‘मित्रहो, खरे तर या आषाढ आमावस्येला गटारी नव्हे तर ‘दिव्याची आवस’ म्हणतात. या दिव्याच्या अमावस्येची एक पारंपारिक जानपद कहाणी प्रसिद्ध आहे, तीही सांगतो. कहाणी अगदी बाळबोध असली, तरी काही सुसंस्कार करणारी आहे. ऐका…
एका आटपाट नगरातील राजाची सून रोज दिवे घासून तेलवात करायची. दिव्यांच्या अवसेला दिव्यांची पूजा करून चांगला नैवेद्य करून दिव्यांना दाखवायची.
एकदा घरात केलेला एक पदार्थ तिला खूप आवडला. तिने तो गुपचुप खाऊन संपवला आणि आळ उंदरांवर घेतला. याचा उंदरांना राग आला. सूड घेण्यासाठी त्यांनी त्या रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली. त्यामुळे तिची सर्वांनी निदा केली आणि घरातून बाहेर काढून टाकले. ती निघून गेल्यानंतर त्या घरातील दिव्यांची काळजी कोणीच घेतली नाही. असेच दिवस गेले.
दर्श अमावस्येचा दिवस आला. त्या दिवशी राजा अरण्यात मृगयेला गेला होता. येताना त्याला उशीर झाला म्हणून तो एका झाडाखाली विश्रांतीला थांबला होता. त्याच झाडावर त्या गावातील सर्व दिवे जमले होते. ते दिवे आपापसात प्रत्येक घरातील केलेली पूजा आणि मिळालेला नैवेद्य या विषयी बोलत होते. तेव्हा राजाच्या घरातील दिव्याने दु:खी स्वरात राजाच्या सुनेची कहाणी सांगितली आणि म्हणाला की, ‘ती गेल्यापासून राजाच्या घरातील दिव्यांची वाईट अवस्था आहे. ‘
झाडाखाली उभ्या असलेल्या राजाने हे ऐकले. तो वाड्यावर गेला आणि सर्वांना समोर उभे करून त्याने विचारले की, कोणी सुनेला पाहुण्यांच्या खोलीत जाताना प्रत्यक्ष बघितले होते का? सर्वांनी ते नाकारले. हे ऐकून राजाला पश्चात्ताप झाला. मग राजाने पालखी पाठवून सुनेला परत बोलावून घेतले आणि तिची क्षमा मागितली. तिला साऱ्या घराची जबाबदारी दिली. त्यानंतर राजाची सून दिव्यांची पूजा परत करू लागली.
तर जसा राजाच्या सुनेला दीपक पावला, तसा तुम्हां आम्हाला पावो. तिचा आळ जसा टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
(संदर्भः संपूर्ण चातुर्मास)
श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दीपपूजनाचा दिवस म्हणून ओळखली जाते. पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे.
या दिव्यांचे प्रकार तरी किती आहेत पहा…
पोत, पलिता, मशाल, पणती, टेंभा, चिमणी, ढणढण्या, निरांजन, समई, पिळाची समई, आवळ्याची समई, मोराची समई, नागाची समई, कासवाची समई, ज्योति समई, लामण दिवा, ठाणवाई, लक्ष्मी दीप, सूर्यदीप, कंदुकदीप, पुतळी, टांगता दिवा, कंदील, पेट्रोमॕक्स, सायकलचा दिवा, विजेरी आणि असे किती तरी!
घराघरातील गृहिणी आदल्या दिवशी घरातील वापरातले आणि बाजूला ठेवलेले हे सर्व प्रकारचे दिवे घासूनपुसून स्वच्छ, लखलखीत करीत. तेल आणि वाती घालून हे दिवे एका चौरंगावर नवे वस्त्र आच्छादून त्यावर आकर्षक पद्धतीने मांडीत. संध्याकाळी हे सर्व दिवे प्रज्वलित केले जात. नंतर त्यांची हळद-कुंकू, गंधाक्षता, फुले वाहून यथासांग पूजा केली जाई.
या दिवाशी किसलेला गूळ आणि कणिक यात कढत तेलाचे मोहन घालून ते मिश्रण मळून साधारण लिंबाएवढे दिवे करीत. ते दिवे वाफेवर मोदकांप्रमाणे उकडत. पुजलेल्या दिव्यांना त्याचा नैवेद्य दाखवला जाई. प्रसाद म्हणून कणकीचे दिवे सर्वांना दिले जात. मागच्या पिढीपर्यंत घरोघरीच्या माता गृहिणी दिव्यांच्या अवसेला हे दिवे आवर्जून करायच्या. मुलांना ह्या दिव्याच्या प्रसादाचे मोठे अप्रूप वाटायचे.
मित्रहो, अतिप्राचीन भारतीय संस्कृती हिंदुसंस्कृती विश्वातील पंचमहाभूतांचा, चराचराचा, भूतमात्रांचा, ग्रहनक्षत्रांचा सदैव आदर करणारी संस्कृती आहे. सर्व चराचरात आणि विश्वातील कणाकणात परमेश्वर वास करत असतो, यावर भारतिय हिंदूंचा दृढ विश्वास आहे. मानवी जीवनासाठी जे जे उपयुक्त, उपकारक त्या सर्वांविषयी भारतीय सभ्यता सदैव कृतज्ञ आहे. याच उदात्त भावनेपोटी आपल्या जीनवात सदैव प्रकाश देणा-या दीपकांचाही आदरपूर्वक नित्य संध्याकाळी आम्ही ‘दीपज्योति नमोस्तुते’ म्हणत समई लावून तिला वंदन करतो.
या कृतज्ञतेपोटीच आषाढ अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची आम्ही पूजा करतो आणि दिवाळीचे चार दिवस घराघरात आणि गावा – मंदिरात लक्ष लक्ष दिवे लावून विश्वातील अंधःकार दूर करतो.
अशा या संपन्न, उदात्त परंपरेकडे दुर्लक्ष करून आपण गटारीचे हे नवे खूळ का आरंभले आहे? याला काय अर्थ आहे? अशा सुंदर परंपरा सोडून, चारित्र्याने, मनाने, विचाराने ऊन्नत होण्याऐवजी मद्यपान करुन, उन्मत्त होऊन, गाढवासारखे उकिरड्यात किंवा डुकरासारखे गटारात लोळण्याची ही अवदसा का आठवावी आपल्याला? खरं तर, वानराचा नर आणि नराचा नारायण हा उत्क्रांति-क्रम अपेक्षित आहे. तसेच व्हावे असा प्रयत्न करून स्वतःचा व समाजाचा उत्कर्ष करणे हे ध्येय सोडून असे पशुवत वागणे शोभा देते का आपल्याला?
लोकहो, विचार करा आणि आपल्या उदात्त संस्कृतीच्या गंगाप्रवाहात येऊन मिळणा-या या अशा अभद्र, अमंगळ गटारांना वेळीच आवर घाला. अन्यथा प्राचीन तीर्थवत भारतीय संकृतीरूपी भद्रमंगल भागिरथीचे विशाल गटार व्हायला कितीसा वेळ लागणार आहे!
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈















