मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गंमत ब्लड डोनेशनची – भाग – 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गंमत ब्लड डोनेशनची – भाग – 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

तेव्हड्यात डॉक्टर चेकिंगला आले. तोपर्यंत सरही आले होते. मित्र म्हणाला, ‘डॉक्टर, आमचा मित्र ठीक तर झालाय. पण असे का करतोय बघा जरा. चांगले तपासा’. तपासा म्हंटल्या बरोबर त्याने आपले दोन्ही हात क्रॉस करून खांद्यापाशी धरले. ‘नको, नको. डॉक्टर मी बरा आहे. काही झालं नाही मला. फक्त आता घरी जाऊ दे माझ्या मैत्रिणी बरोबर, याच्या बरोबर नको.’

सर सुद्धा आश्चर्याने पहात राहिले. सगळी ट्रीप याने ठरवली. आता हा असे का बोलतोय त्यानाही समजेना. तेही डॉक्टरना म्हणाले,”डॉक्टर, प्लिज बघा बर जरा, हा असे का बोलतोय. अहो, आमच्या कॉलेजचा जी.एस. आहे हा. ऑल राउंडर. सगळी कामे धडाडीने करणारा. मैत्रिणी आहेत त्याला. पण त्यांच्या बरोबर घरी जाणं असलं काही नाही आवडणार त्याला.

डॉक्टरही संभ्रमात पडले.अशा कारणासाठी तपासायचे तरी कसे? याची पर्सनॅलिटी का बरे अशी चेंज झाली आहे? आपण याला ब्लेड दिले ते लेडीज कॉलेजच्या कॅम्पसमधून कलेक्ट केलेले आहे. त्याचा हा परिणाम तरी नाही? त्यांना मनोमन हसू आले. पण ते हसू चेहऱ्यावर उमटू न देता सरांना म्हणाले, “पेशंट आत्ता ओके दिसत असला, तरी त्याला अजुन ब्लड द्यायला लागणार आहे. याचे दोन तीन मित्र थांबू देत इथे. आज रात्री आणि उद्या सकाळी येऊन दुपारी डिस्चार्ज देतो. बाकी तुम्ही सगळे गेलात तरी चालेल. त्याच्या बरोबर मी मेडिकल सर्टिफिकेट देतो. काळजी करू नका.”

अन दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्याच्या मित्रांचे मॅच होणार ब्लड डॉक्टरांनी पेशंटला दिलं. पेशंट एकदम नॉर्मल झाला. जाताना डॉक्टरांना शेक हॅन्ड केले.आणि मित्रांच्या खांद्यावर हात टाकून डौलात पायऱ्या उचलून गेला.

डॉक्टर अजूनही आपल्या विचारावर, आपण केलेल्या निदानावर आणि पुन्हा दिलेल्या ब्लड ट्रीटमेंट वर विचार करत बसलेत. या ब्लड डोनेशन च्या गमतीचा तेढा अजूनही त्यांना सुटला नाही.

कथा संपूर्ण

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गंमत ब्लड डोनेशनची – भाग – 2☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गंमत ब्लड डोनेशनची – भाग – 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

पाठीमागून येणाऱ्या मुली, सर आणि काही विद्यार्थी येईपर्यंत या जखमी मुलाला चांगली तरतरी आली होती. मित्रांनी त्याला चहा बिस्किटे दिली होती. आपणही वडा पाव वर ताव मारला होता.त्यांनाही बरोबरीने दमणूक झाली होती.

पेशंट आता खूप सावरला होता.अपघाताच्या धक्या मधून पूर्णपणे बाहेर आला होता. आपण अचानक दरीत कसे कोसळलो? हेच अजूनही त्याला एक कोडेच होते. “पाय खरेच घसरला की कुणी आपल्याला ढकलले? पण ढकलले असते, तरी तो सावध झाला असता. कोणाशी दुश्मनी नव्हतीच मुळी. त्यामुळे तो विचारच चुकीचा होता. वर्गातल्या मैत्रिणी सुद्धा ठीक आहेत. सर्वांशी मैत्रीचा धागा चांगला विणला होता. शिवाय या सगळ्यांनीच आपल्याला दरीतून वर काढायला मदत केली. म्हणजे खरच तो अपघातच. पण त्याला समजेना असले बायकी विचार का यायला लागलेत? मित्रांपेक्षा मैत्रिणीशी बोलावे, गप्पा माराव्या, गुजगोष्टी कराव्या असे का वाटते?

त्याला चांगलेच बरे वाटत होते. पांघरलेली चादर त्याने मुली ओढणी घेतात, तशी घेतली. मुलींसारखं पालथी मांडी घालून आपल्या नखा चे पॉलिश निरखत बसला. छान गुलाबी नेल पॉलिश लावायला पाहिजे. त्याच्या मनात आले. चेहऱ्याला पावडर लावली तर फ्रेश वाटेल, म्हणून तो मैत्रिणींची वाट पाहायला लागला.

तेवढ्यात एक मित्र आला आणि अरे वा! उठून बसलास का? बरं वाटतंय ना आता? असे म्हणून पाठीवर त्याने थाप मारली. हा लाजून सरकत कॉटच्या कडेला जाऊन बसला.

क्रमशः….

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆  गंमत ब्लड डोनेशनची – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गंमत ब्लड डोनेशनची – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

स्टडी टूर मधल्या मुला-मुलींच्या दंग्याला बहार आला होता. तरुणाईला निसर्गाच्या सान्निध्यात उत्साहाचे उधाण आले होते. डोंगर चढता चढता गप्पा गाणी यांना ऊत आला होता. आणि अचानक ग्रुप लीडरचा पाय घसरला, बघता बघता गटांगळ्या खात तो डोंगरावरून दरीत कोसळला. क्षणभर काय झाले, ते कोणालाच समजले नाही. पण लक्षात आल्यावर घाबरून सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. खाली बघायचे धाडस कोणाला होईना.

दोन-चार मित्रांनी शांतपणे विचार करून आणि आपल्या सरां बरोबर चर्चा करून या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचे ठरवले. ड्रेस वाल्या मैत्रिणींकडून त्यांच्या ओढण्या मागून घेतल्या आणि त्या सगळ्या एकमेकांना घट्ट बांधून मोठा दोर तयार केला. दोघांनी तो दोर वरती गच्च पकडून धरला आणि त्याच दोराच्या सहाय्याने दोघेजण खाली उतरायला लागले. सगळीकडे निशब्द शांतता पसरली होती. पुढे काय होणार? मित्र सापडेल ना? कोणत्या अवस्थेत असेल काहीच अंदाज बांधता येत नव्हता. अन अचानक त्या दोघांना, झाडाच्या फांद्यांवर अडकलेला आपला मित्र दिसला. फरपटत फरपटत खाली आल्यामुळे त्याचा शर्ट पूर्ण फाटला होता. चेहरा पाठ रक्तबंबाळ झाली होती. त्याचा  कण्हण्याचा आवाज येत होता. त्याही परिस्थितीत दोघांना आनंद झाला. जोरात शिट्टी वाजवून आपण जिंकल्याचा इशारा त्याने वरच्या मित्रांना दिला.

त्या परिस्थितीत त्याला हळूहळू वर ने अतिशय अवघड अन् जिकिरीचे काम होते. पण आता निम्मा गड सर केला होता. ओढणीच्या दोराने त्याच्या कमरेला करकचून बांधून दोघेजण त्याच्या हातापायांना सावरत कसेबसे वरपर्यंत आले. वरच्या मुलांनी त्याला अलगद उचलून घेतले आणि सगळ्यांनी निश्वास सोडला. जबरदस्त मानसिक धक्का आणि शरीराला झालेल्या जखमां मुळे तो बेशुद्ध पडला होता. चेहऱ्यावर पाणी मारून सरांनी त्याला सावध केले आणि कसाबसा तो जागा झाला. त्याच्या एकुण भेदरलेल्या चेहऱ्यावरून आणि जखमां वरून त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे होते.

दोन मित्रांनी आपले शर्ट काढून त्याची झोळी तयार केली आणि त्याला उचलून पळत पळत गावाकडे जाण्यास सुरुवात केली. डोंगर कपाऱ्या तले गाव ते. तिथे कुठला दवाखाना? की हॉस्पिटल? पण एकाची चार चाकी गाडी मिळाली आणि त्यामधून त्याला जवळच्या गावी लवकरात लवकर नेण्यात मित्रांना यश आले.

गावातल्या दवाखान्यात पटापट उपचार सुरू झाले. जखमा पुसून ड्रेसिंग झाले. त्याला सलाईन लावले आणि रक्त जास्त गेल्यामुळे रक्तही लवकरात लवकर देण्याचे ठरले.  आदल्या दिवशी गावातल्या मुलींच्या कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प झाला होता. त्यावेळी गोळा केलेल्या बाटल्यांमधून योग्य ब्लड आणले गेले. ताबडतोब ब्लड देणेही सुरू झाले.

क्रमशः….

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सल ☆ श्री रवींद्र पां. कानिटकर

जीवनरंग ☆ सल ☆ श्री रवींद्र पां. कानिटकर ☆ 

करोनाची लस सरकारने सर्वांना देण्याची घोषणा केली. अडेलतट्टू  काटदरेंनी मात्र कुठल्याही परिस्थितीत ती लस टोचून घेणार नसल्याचे सांगून टाकले.  नुकतेच    एका   लग्न समारंभाला हजर राहण्याचे निमित्त झाले व लगेचच ताप येऊन धाप लागू लागल्याने त्यांना  दवाखान्यात नेले.

करोनाची लागण झाल्याने चारच दिवसात त्यांचे निधन झाले. काटदरे काकूंना मात्र काकांनी लस टोचून न घेतल्याची सल कायमची टोचत राहिली.

© श्री रवींद्र पां. कानिटकर

सांगली

≈श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कृतज्ञ डोळे – भाग-3 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ कृतज्ञ डोळे – भाग-3 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆ 

मी थोडा वेळ बोललो नाही सुषमा आशाळभूत पणे पाहतेय हे न पाहताही मला समजत होते.

मी नामदेव कडे वळून विषय काढला तुमच्या पोरीचा डोळा पूर्वी सारखा झाला तर तुम्हाला आवडेल काय,नामदेव व तिच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव एकदम बदलले. पुढच्याच क्षणी खर्च किती येईल हे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. कोणताही खर्च न करता हे होईल मी बोलताच दोघेही जवळ आले.

आता सुषमाही बाहेर आली मी त्यांना डॉक्टरांशी झालेल्या संवादाची माहिती दिली. व होणाऱ्या शिबिरात सुषमाला घेऊन येण्याचे सांगून निघालो,दोघांचेही चेहरे सकारात्मक दिसले, मला विस्वास होता ते सुषमाला आणतील, खात्री होती.

ठरलेल्या दिवशी डॉक्टर अधलखिया आले, पेशंटची तपासणी सुरू झाली,पण माझी नजर सुषमाच्या  येण्याकडे लागली होती,थोड्या वेळाने सुषमा आई वडीलां सोबत आल्याचे मला दिसले. सुषमा ला डॉक्टरांनी तपासणी साठी आत घेतले जवळपास पांढरा मिनिटे डॉक्टरांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी केली. सुषमा बाहेर आली, डॉक्टरांनी मला बोलावून घेतले, सर केस थोडी किचकट आहे.नजर येईल की नाही ते सांगता येत नाही पण डोळ्याचा पांढरे पणा आपण घालवू शकतो.  दिसायला दोन्ही डोळे सारखे दिसू शकतात,मला आशेचा किरण सापडला.डॉक्टरांनी सुशमा च्या आई वडिलांना बोलावून घेतले,दोघेही खुश झाले,दिसले नाही तरी डोळा दिसायला सर्वसाधारण होईल हे त्यांची समस्या सोडवू शकणार होते.दुसऱ्याच दिवशी सर्व आवश्यक टेस्ट करून डॉक्टरांनी सुषमाला आत घेतले ऑपरेशन थिएटर चा लाल दिवा लागला.ऑपरेशन संपवून डॉक्टर बाहेर आले.नजरेनेच डॉक्टरांनी जमले अशी खूण केली नामदेव च्या खांद्यावर हात ठेवून डॉक्टरांनी ऑपरेशन सक्सेस झाल्याचे सांगितले. व ते पुढील ऑपरेशन साठी आत गेले.

पुढील काही दिवस स्थानिक डॉक्टर दांडेकर यांनी सुषामाची काळजी घेतली. आज सकाळपासून मी अस्वस्थ होतो आज सुषमाची पट्टी खुलणार होती, तिला दिसणार की नाही हे ठरणार होते डॉक्टर अधलखीयाआले सुषमाची पट्टी सोडण्याची तयारी सुरू झाली. हृदयाची धड धड सुरू झाली…….पट्टी खुलली डॉक्टरांनी हळू हळू डोळे उघडण्यास सांगितले दोन्ही डोळे सारखे पाहून सर्वच खुश झाले. आता हर्ष वायू होण्याची वेळ माझी होती,सुषमा चांगला डोळा झाकून ऑपरेशन झालेल्या डोळ्याने पुढील अक्षरे वाचत होती क.ख ग घ. सुषमा चे आई वडील  दोन मिनिट बोललेच नाही पण दोघांनीही डॉक्टरांचे पाय केंव्हा पकडले समजलेच नाही माझ्या  डोळ्यात पाणी तरळले. डॉक्टरांचे आभार मानून मी बाहेर निघालो. सुषमाचे ते अबोल डोळे बोलके झाले होते.

पुढे सुषमा कॉलेजला आली पास झाली मी सुद्धा आपल्या कामाला लागलो, प्रमोशन मिळाले प्राचार्य झालो……

सर पेढा घ्यान…….सुषामाचा आवाजाने  मी भानावर आलो. कसलाग पेढा…..सर मी शिक्षिका झाले.बी एड केले आता हायस्कूल टीचर म्हणून माझी नियुक्ती झाली. वा…अभिनंदन. सर सारे श्रेय तुमचे आहे.  आजचा दिवस तुमच्यामुळे उगवला सर ….तिचे डोळे पाणावले. नामदेव मुक होता पण त्याच्या मौना तूनही आभाराचे  स्वर उमटत होते. सर पोरीसाठी तीन स्थळ सांगून आले आहे.ताडाळीचे  दिवसे गुरुजी मागे लागले आहे,पोरगा तहसीलदार आहे सर, तुम्हाला यावं लागलं सर पोरीच्या मायचा खास आग्रह आहे जी. येईन येईन….मी सहजतेने बोललो. सगळा प्रकार पाहून रमेश शिपाई चहा घेऊन आला.

सुषमाने घेतलेल्या शिक्षणाची माहिती सांगितली. कशी स्कॉलरशिप मिळाली व औरंगाबादला घेतलेल्या उच्च शिक्षणाची माहिती दिली. थोड्याच वेळात दोघेही निरोप घेऊन निघाले. नकळत मी ही बाहेर आलो. कॉलेजच्या मुख्य दरवाज्या पर्यंत जावून सुषमा पलटली….माझ्याकडे पाहून हात हलविला न बोलताही तिच्या डोळ्यातून कृतज्ञता बोलत होती………

समाप्त

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कृतज्ञ डोळे – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ कृतज्ञ डोळे – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆ 

“सायंकाळी मी बेलसानी गावात शुषमाच्या घराचा पत्ता विचारत जावून पोचलो .आवाज देताच सुष्माने दार उघडले ती माझी वाट पहात होती हे जाणवले. खाट टाकून त्यावर चादर टाकत ती बसा सर असेम्हणत आत वडिलांना बोलव्यायला गेली ,तिचे आई वडील दोघेही बाहेर आले नमस्कार सर म्हणत जवळ येऊन उभे राहिले तेव्हड्यात पाण्याचा ग्लास घेऊन सुषमा आली.मी सुरुवात कुठून करावी या विचारात असतानाच ,तिचे वडील बोलायला लागले,बरे झाले सर तुम्ही आले ही पोरगी ऐकतच नाही जी शिकतोच म्हणते का करावं जी समजतं नाही गुरुजी.मी त्याला उलट विचारले ती शिकतो म्हणते तर शिकू द्या न अभ्यासात हुशार आहे ती. एक गंभीर उसासा टाकून नामदेव बोलायला लागला सर तुम्हाला आमची परिस्थिती नाही समजायची गुरुजी.ही पोरगी एका डोळ्याने आंधळी आहे .लहानपणी विटू दांडा खेळताना विटी इच्या डोळ्याला येवून लागली. गावच्या  वैदान पानाचा रस टाकला डोयात डोळा पुरा पांढरा झाला सर टिक पडल्या वानि . आता मी गडी माणूस दुसऱ्याच्या शेतावर काम करणारा .इच्यासंग कोण लगीन करणार सर कोणी गडी माणूसच ना जी,जास्त शिकली तर कोण करण लगण भोकण्या पोरिसंग सांगाजी तुम्हीच काय करावं आम्ही. आता खरी समस्या माझ्या लक्षात आली होती.चहाचा कप हातात देत सुषमा अधिरपणे माझ्याकडे पहात होती.

मी चहाचे घोट घेत विचार करू लागलो कुठून सुरुवात करावी.मला त्यांची अगतिकता कळत होती पण सुषमाचे शिक्षण सुटु नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होत. सुषमाच्या आईच्या आवाजाने मी भानावर आलो ,गुरुजी शिकवाची इच्छा आहे जी आमची पण हीच्या डोळ्याचा प्रश्न आहे जी.दोन भाऊ लहान आहे त्याईच भी पहा लागणं नाजी. उद्या जास्त शिकणं त पोरगा भी जास्त शिकलेला लागणं जी कोणी मास्तर करण काजी मह्या पोरीसंग लगीन. मी विचारात पडलो. आव्हनडा गिळून मी बोलायला सुरवात केली मला वाटते तुम्ही तीच शिक्षण बंद न करता तिला पायावर उभी करावी म्हणजे ती तुमच्यावर भार होणार नाही. सुषमा दारा मागून माझ्याकडे पाहत होती.तिची माझ्याकडून अधिक अपेक्षा असावी हे मला जाणवत होते, पण अधिक काय बोलावे हे सुचेना .विचार करून विचारले शुषमाचा हा डोळा चांगला असता तर तुम्ही तिला शिकविले असते काय . नक्कीच….. दोघेही एका सूरात बोलले .मला एक दिशा मिळाल्यासारखे वाटले. सुषमाला खुणेनेच सांगितले चिंता करू नको करतो काही तरी.निरोप घेऊन निघालो.नामदेव कार पर्यंत पोहचवायला आला, म्हणाला सर पोरीसाठी करा काहीतरी, मी मान हलवून निघालो, घरी अलोतरी मन कुठे लागेना, सुषमाचे डोळे पुन्हा पुन्हा समोर येत होते. त्याच वर्षी मी जेसिज या सामाजिक संस्थेचाही अध्यक्ष होतो. एक नेत्रशस्त्रकिया शिबीर घेणार होतो वर्धेचे सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉक्टर अधलखिया येणार होते. चेन्नयी ची अँपास्वामी कंपनी लेन्स प्रायोजित करणार होती.नकळत मी डॉक्टरांना फोन लावला सुषमाची केस सांगितली डॉक्टर म्हणाले प्रत्यक्षात पाहिल्यावरच सांगता येईल जर कार्निया सुरक्षित असेल तर बरेच काही करता येईल, मला एक आशेचा किरण सापडला.मनाशी खूणगाठ बांधून दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो सुषमा आली नव्हती.पुढे आठवडा भर आलीच नाही.मीच गेलो तिचा गावाला ठरवून टाकले शिक्षणाचे बोलायचे नाही.अपेक्षेप्रमाणे माझे थंड स्वागत झाले पाहून न पहात केल्यासारखे करून तिची आई म्हणाली गुरुजी येत नाही जी आतासुषमा कॉलेजात, तुम्ही त्यायाले काही मनू नका.

क्रमशः भाग – 3….

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघु कथा – मरवा… ☆ श्री बिपीन कुलकर्णी

☆ जीवनरंग ☆ लघु कथा – मरवा … ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆

घरात ते दोघेच … आजी आणि आजोबा. बाल्कनीत गुलाब,मोगरा, अनंत ह्या बरोबरच तुळस आणि मरवा. अजून पर्यंत तरी ह्या बागेचे नुसतंच बाहेरून दर्शन. आजी – आजोबांची नुसती नजर ओळख… ती सुद्धा बाल्कनीत बसून चहा घेताना. हळूहळू जाता येता हात उंचावून चौकशी, मग बोलणं सुरु झालं. ओळख वाढली. एके दिवशी ऑफिस मधून घरी येता येता आजींनी घरात बोलावलं. बाल्कनीत बसून चहापान झालं.मंजिरींनी लगडलेल्या तुळशीच्या बाजूलाच असलेल्या कुंडीत हिरवा गार मरवा होता. मंद असा घमघमाट बाल्कनीत पसरला होता. आजोबा बोलते झाले … “ह्या मरव्याचं कसं असतं माहीत आहे कां?” माझी प्रश्नार्थक नजर बघून आजोबा हसले. म्हणाले, “ऐक…  हा मरवा ना… नुसतं नावालाच  झाड. ना फळं, ना फुलं. पण मंद का होईना सुगंध अप्रतिम.आपल्याकडे काहीही नसताना आपल्या अस्तित्वाने मात्र दुसऱ्यांना प्रसन्न करण्यात आपलं जगणं घालवणार.” हे सांगताना मात्र आजोबा एकदम खिन्न झाले…

घरा बाहेर पडत असताना माझी नजर एका फोटो कडे गेली.अपघातात गेलेल्या त्यांच्या मुलाचा फोटो होता. मी सुन्न. संसारवेलीवरचं उमललेलं फूल गळून पडलं होतं. मी घरातून बाहेर पडलो. डोक्यात विचार घेऊन…. आज काय होतं त्या वृद्ध दांपत्याकडे ..? मनाचं पंगुत्व? परावलंबित्व? की दैवाने दिलेली हतबलता? नाही.नक्कीच नाही. नशिबाचे फासे उलट पडलेले असताना समोरचा क्षण आपला मानून तो इतरांबरोबर साजरा करायचा आणि  आपल्या स्वभावातल्या गोड सुगंधाने दुसऱ्यांना प्रेमळ पणे आपलंस करायचं. त्या कुंडीतल्या मरव्या सारखं. माझ्या घरात शिरताना सहज मागे वळून बघितलं…

कुंडीतला तो मरवा अजूनच हिरवाकंच दिसत होता. त्याचा तो मंद सुगंध त्या  घरासोबत माझ्याही मनात दरवळत होता… माझ्या घरात शिरू पहात होता.

 

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कृतज्ञ डोळे – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

 ☆ जीवनरंग ☆ कृतज्ञ डोळे – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆ 

गाडी पार्क करून निघालो तो नेहमीप्रमाणे तुकाराम शिपाई ब्याग घ्यायला धावत आला, त्याला ब्याग देऊन चेंबर मध्ये खुर्चीवर स्थानापन्न होऊन समोरील फाईल्स चाळतो  तो तुकाराम वर्दी द्यायला आला, सर… कुणी. नामदेव शेरकि नावाचे  पालक भेटू इच्छितात  पाठवू का आत.

फायलीतून नजर उंचावून मी केबिन च्या काचातून बेंचावर बसलेल्या त्या पालकांकडे नजर फिरविली त्याच्यासोबत एक स्त्री बसली होती वयावरून ती त्याची मुलगी असावी याचा मी अंदाज बांधला. डोक्याला तान देऊन त्याव्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो, कधीतरी त्याला भेटलो असल्याचे जाणवत होते पण ओळख पटत नव्हती….. सर पाठवू का आत तुकाराम च्या आवाजाने मी भानावर आलो. टेबलावरची बेल वाजवुन मी क्लार्क ला बोलावून घेतले व त्या पालकाचे काही कार्यालयीन काम असेल तर करून देण्याचे सांगितले.

थोड्या वेळाने क्लार्क परत आला म्हणाला सर ते तुम्हालाच भेटायचं म्हणतात. काय समस्या असेल बुवा…..थोड्याशा नाखुशिनेच मी  पाठवून दे अशी मानेनेच खुण केली. येवू का आत सर…. या आवाजाने मी नजर वर केली एक पन्नाशीच्या वयातील गृहस्थ समोर उभा होता. मळलेला पांढरट पायजामा बंगाली खांद्यावर दुपट्टा बोटबोट दाडी वाढलेली उन्हात काम केल्याने रापलेला चेहरा. प्रयत्न करूनही ओळख पटेना. सोबत असलेल्या  मुलीकडे नजर टाकली चेहरा ओळखीचा वाटला पण साडी  घालण्याची सवय नसावी हे तिच्या साडी घालण्याच्या पद्धतीवरून दिसून येत होते. मी मानेनेच या अशी खुण केली. आत येताच त्या दोघांनी माझे पाय केंव्हा पकडले कळलच नाही अरे…. अरे…. हे काय लावले, पाया कशाला पडता. म्हणत मी उठून उभा राहिलो. सर तुम्ही मला ओळखले नाही, ती मुलगी  म्हणाली सर मी बेलसनी गावची सुषमा, सुषमा शेरकी सर. एका डोळ्याने आंधळी सुषमा सर. आणि आता चकित होण्याची पाळी माझी होती. अरे शूषमा म्हणत मी तिला उचलून उभे केले आता ती माझ्या छातीवर डोके टेकवून रडायला लागली मी तिला शांत हो ग. असा धीर देत तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत खुर्चीवर बसण्याचा संकेत केला.तिचे वडील भाऊक होऊन पाहत होते त्यांनाही बसायला सांगितले.सुषमा सावरून बोलायला लागली.सर हे अश्रू आनंदाचे होते. सर मी शिक्षिका झाले,माझ्या पायावर उभी झाले.तुमचे स्वप्न पूर्ण केले. तिच्या डोळ्यातून दोन आसवे पुन्हा चमकली. आता  मी विचारमग्न झालो आणि सुषमा चा भूतकाळ. डोळ्यासमोरून सरकू लागला…….. जवळपास पाच वर्ष झालीत. त्यावेळेस मी प्राध्यापक होतो तीन दिवसापासून वर्गात मागे बसलेल्या मुलीचे लेक्चर मध्ये लक्ष नसल्याचे जाणवत होते.चवथ्या दिवशी मी तिच्याजवळ जाऊन विचारले,ती काही बोलत नव्हती,काही नाही सर म्हणून अबोल झाली,मी सुध्धा अधिक ताणले नाही. दुपारी अचानक ती तिच्या मैत्रिणीला सोबत घेऊन स्टाफ रूम मध्ये माझ्या समोर येऊन उभी झाली, मी प्रश्नार्थक नजरेने दोघींकडे पाहिले, सुषमाचा एक डोळा पूर्ण पांढरा होता हे मला पहिल्यांदाच दिसले. तिच्या चासम्यामुळे कधी जानवलेच नाही. आता तिची तिची मैत्रीण बोलू लागली. सर हीचा प्रॉब्लेम आहे, मी नजरेनेच काय म्हणून विचारले. आता सुषमा बोलू लागली, सर माझे वडील शिक्षण सोडण्यासाठी मागे लागले आहे,रोज घरी यासाठी भांडण होत आहे.उद्यापासून कॉलेजला जाशील तर कुलूप लावून बंद करून ठेवीन, असा वडिलांनी दंम दिला आहे सर मला शिकायचे आहे पायावर उभे व्हायचे आहे. काय करू सर. ती रडायला लागली. तिला समजावून मी धीर देत सांगितले मी तुझ्या वडिलांशी बोलतो, संध्याकाळी मी तुझ्या वडिलांना भेटायला येतो गावाला,चिंता करू नको. दोघीही मान हलवून परत वर्गात गेल्या.

                            क्रमशः भाग-2….

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – लबाडीचा व्यवहार ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – लबाडीचा व्यवहार ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

?लघु बोध कथा?

कथा १९. लबाडीचा व्यवहार

एकदा एका राजाला तो त्याच्या महालातून बाहेर पडत असताना दारात कोणी एक मनुष्य हातात कोंबडा घेऊन उभा असलेला दिसला. तेव्हा राजाने त्याला “तू कोण आहेस? आणि इथे का उभा आहेस?” असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, “मी आपल्या नावावर कोंबड्यांच्या व्यापारात हा कोंबडा जिंकलो. तेव्हा त्याला आपल्या चरणांवर अर्पण करण्यास आलो आहे.” “ठीक आहे, कोंबडा आत देऊन ये” असा राजाने त्याला आदेश दिला.

दुसर्‍या वेळी मेंढा घेऊन तो मनुष्य राजाच्या दारात उभा राहिला. पूर्वीच्याच त्या माणसाला पाहून राजाने “हे काय आणले?” असे विचारले. तेव्हा, “हा बोकड सुद्धा मी आपल्या नावावर जिंकला” असे त्याने कथन केले. राजाने त्याला पूर्वीप्रमाणेच आत येण्यास अनुमती दिली. राजाची अनुमती मिळालेल्या त्या मनुष्याने बोकडाला राजगृही ठेवले व तो निघून गेला.

पुन्हा तिसर्‍या वेळी काही व्यापाऱ्यांसोबत आलेल्या त्या मनुष्याला पाहून “काय आज काहीही बरोबर न आणता आलास?” असे राजाने विचारले. तेव्हा तो म्हणाला, “महाराज, मी काहीही न घेता आलेलो नाही. आपल्या नावाने लावलेली दोन सहस्र नाणी मी व्यापारात हरलो. ती नाणी दे असे म्हणत या व्यापाऱ्यांनी मला निर्दयपणे पकडले आहे. म्हणून महाराजांजवळ मी त्यांना आणले आहे.” तेव्हा राजाने त्याच्या कोषागारातून तों हजार नाणी त्याला आणून दिली व ‘यापुढे माझ्या नावावर व्यापार करू नकोस’ असे त्याला बजावून पाठवून दिले.

तात्पर्य – लबाडीचा व्यवहार जास्त काळ टिकू शकत नाही. तो उघडकीस येतोच..

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/म्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्यादं….भाग -3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -3 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

भारतीला मुलाला संभाळूनच अभ्यास करावा लागणार म्हटल्यावर आम्ही शिक्षकांनी दुसरे उपाय काढले. आठवड्यातले तीन दिवस इंग्रजी, गणित, सायन्सचे तास लागून होते. तेव्हढ्या तासाना भारतीने यायचं, मराठी शाळा दुपारी सुटायची. तिथल्या दोन तीन मुली बाळाला खेळवायला हौशीने तयार झाल्या. जादा तास शाळेच्या वेळाच्या बाहेर होते. तेव्हा भारतीची लहान भावंडं बाळाला संभाळणार. भारतीने दिवसभराचा अभ्यास मुलींकडून घ्यायचा, बाळ झोपलेल्या वेळेत तो करायचा. तिला ‘अपेक्षित’ ची गाईडं दिली. तिच्या कडून फक्त काठावर पासिंगची अपेक्षा ठेवली. हे सर्व प्रयत्न परिक्षार्थी होते खरे, पण त्या पास होण्यामुळेच तिचा पुढचा मार्ग खुला होणार होता.आम्ही सर्वानी चंग बांधला की भारतीला दहावीतून बाहेर काढायची. भारतीच्या वडिलांना इतका सगळा पत्ता लागू द्यायचा नव्हता. कारण त्यांना मुलींच्या शिक्षणासाठी  खटाटोप करणं मान्यच नव्हतं. ते दिवसभर घरी नसायचेच. आई आमच्या बाजूला होती. असा अभ्यास करणं भारतीला खूप अवघड होतं, पण ती प्रयत्नाला लागली होती. तिच्या घटक चाचण्या, सहामाही झाली. वर्गातल्या बऱ्याच मुलांसारखे तिला इंग्रजी, गणितलाच फक्त मार्क कमी पडले. शाळेच्या चांगल्या निकालाला भारतीच्या पासिंगचा उपयोग ग्रहीत धरून मुख्याध्यापकांनीही आम्हाला सहकार्य दिलं. फॉर्मचे पैसे सगळ्या शिक्षकांनी भरले म्हटल्यावर वडिलांनीही  फार खळखळ केली नाही.

पैसा एव्हढाच त्यांचा प्रॉब्लेम होता. तरीही त्यांना अंधारात ठेवणं बरोबर नाही असं सगळ्यांचं मत पडलं. परिक्षेच्या वेळी अडमडायला नकोत.

मी भारतीचे वडील घरी असतील अशा वेळीच तिच्याकडे गेले. म्हटलं, नीट समजावून सांगू म्हणजे ते ऐकतील. ते काही राक्षस नाहीत.

सगळं घर सामसूम होतं. वडील घरात नव्हतेच. आई होती. भारतीचे नाक डोळे रडून लाल झाले होते. चेहरा सुजला होता. मी तिच्या पाठीवर हात ठेवल्यावर तिला हुंदकाच फुटला.

‘काय झालं’मी विचारलं. तिला बोलताच येईना. आईच म्हणाली, “बाईनू, लय गुत्ता झालाय बगा. अनिताची सासू म्हनतिया, ‘भारतीला सून करून घ्येतो, म्हंजी पोराचंबी ती करील नि तुम्हास्नीबी तिच्या लगिनाचं बघाय नको.  भारतीचा बा तयार झालाय. म्हनतोय, लग्नाचा खरचं वाचला. उरावरचं  वझं उतरेल.एकदा त्यांच्या मनाने घ्येतलं की न्हाई ऐकायचा. जावयाकडून पैसं बी घ्येतलं असतील. तसंच काही तरी दिसतय्. बाईनू, तुमी ह्यात पडू नगासा. तुमास्नी फुकटचा तरास व्हील.”

भारतीच शिक्षण ही आता हाताबाहेरची गोष्ट झाली होती. अज्ञानाच्या, दारिद्रयाच्या  काळ्याकुट्ट अंधारात आपली मिणमिणती दिवली विझून जाणार हे आम्ही ओळखलं.

मोडक्या चुलीच्या जागी नवी चूल बसवतात तशी भारती आपल्या बहिणीच्या संसारात जाऊन बसणार होती.  सोपा हिशोब होता. भारती म्हणजे एक प्यादं होतं. त्याला कुठेही, कसंही सरकवलं तरी चालणार होतं.

मी तिच्या पाठीवर हात ठेवला. म्हटलं ‘रडू नकोस. बाळाला नीट वाढव. ते मोठं झालं की तुझ्या शिक्षणाचं बघू.’

तेव्हढ्या आशेने सुध्दा भारतीचे डोळे लकाकले. जवळच पटकुरावर पडलेलं, सावळं, गुटगुटीत  बाळ मुठी चोखता चोखता हसत होतं. ते आनंदी भविष्याचं सूचक होतं का?

बऱ्याच वर्षानी भारती ए. डी. ई. आय होऊन शाळा तपासायला आली. मधल्या काळातली सगळी हकिगत तिने सांगितली. नवऱ्याला पुण्याला नोकरी मिळाली होती. बाळाला संभाळून तिने शिक्षण चालू केलं होतं. नोकरी मिळवली होती. सगळ्या वाटचालीत नवऱ्याने तिला साथ दिली होती. प्यादं पुढे पुढे सरकलं होतं. त्याने बरीच मजल मारली होती.

शाळेतले संस्कार फुकट जात नाहीत, ते टिकतात, बहरतात सुध्दा.

समाप्त.

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares