मैत्रीण म्हणाली गोकर्णीच्या बिया आहेत लाव तुझ्या कुंडीत…
पावसाळ्याचे दिवस आहेत रुजतील बघ…
कुंडी रिकामी नव्हती .तुळशीच्या कुंडीतच तीनी खड्डा केला …आणि त्यात बिया पेरल्या. पाणी घातलं .
दर दोन दिवसांनी ती बघायची अजून अंकुर वर आला नव्हता.
काही दिवस तिचे तिकडे लक्षच गेले नाही .आणि त्या दिवशी अचानक दोन पानं दिसली …
तिला विलक्षण आनंद झाला.. वेल भराभर वाढायला लागली..
ती प्रचंड खुश…
तुळशीच्या फांद्यांचा आधार घेऊन वेल वर चढायला लागली..
भरपूर हिरवीगार पानं दिसत होती.
ती रोज परत परत बघायची वेल ऊंच ऊंच गेली होती ….
त्या दिवशी सुनबाई जवळच उभी होती म्हणाली..
“ आई इतकं काय निरखून बघताय?”
“ अगं वेल वाढली आहे पण अजून फुलं काही लागली नाहीत “
सून जरा शांत बसली.. नंतर हळूच म्हणाली..
“आई इतकी घाई नका करू.. वेलीला वाढू दे …सशक्त होऊ दे.. तिला योग्य वाटेल तेव्हा येतील फुलं…
तिचा तिला वेळ द्या…. कदाचित तिची अजून तयारी झाली नसेल…”
तिने सुनेकडे बघितलं … म्हणाली, “ अग फुलांची वेल आहे मग फुलं आलीच पाहिजेत …फुलं येत नाहीत म्हणजे काय…. “
सून काही बोलली नाही. शांतपणे बाजूला झाली .
‘फुल कशी येत नाही बघतेच आता…..’ असं म्हणत तिने त्यावर उपाय करायला सुरुवात केली .
अनेक जण सांगणारे भेटले. माहितीचे नवेनवे स्तोत्र हाताशी होतेच .जे जे जमेल ते ते ती करत होती .
एकदा सुन म्हणाली ….
“आई या सगळ्याचा वेलीला त्रास होत असेल …हिरवीगार वेल पण छान दिसते आहे….”
तिने सुनेच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तिचा फुलासाठी आटापिटा सुरू होता.
यश मात्र येत नव्हते .काही दिवसांनी ती निराश झाली…आणि मग तो खटाटोपही कमी झाला .
मध्ये काही दिवस असेच गेले………… एक दिवस ती उठली सहज वेलीकडे लक्ष गेले …
ती चमकली. फुलासारखं तिला काहीतरी दिसलं… जवळ गेली तर लक्षात आलं ते प्राजक्ताचे फुल होतं….
वाऱ्यावर वेल डोलली …तसे ते फुल अजूनच तिला छान वाटलं…
ती बघत बसली….आज वेल जास्त सुरेख दिसते आहे असं तिला वाटलं.
मनोमन तिला सगळं काही उमगलं…
अचानक तिने हळूच सुनेला जवळ घेतलं. पाठीवर थोपटलं …तिचे हात हातात घेतले.. तो आश्वासक हात बरंच काही सांगून गेला…
… आई स्टूलावर चढली होती. ती पडेल अशी लेकीला भीती वाटत होती …” आई मी स्टूल घट्ट धरून ठेवते म्हणजे तू पडणार नाहीस….” आपल्या छोट्याशा हाताने तिने स्टूल पकडले…
आईला आधार देण्यासाठी…आईची काळजी लेकीच्या इवल्याशा डोळ्यात दिसत होती….
दोघी कौतुकाने छोटुकल्या प्राजक्ताकडे बघत होत्या…
सासू सुनेचे डोळे गच्च भरून वाहत होते……
कुठलाही गाजावाजा न होता एका वेलीनी अवघड प्रश्न सहजपणे सोडवला होता…….
गणेशोत्सव संपला की सर्वांना नवरात्राचे वेध लागतात ! नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. नऊ ही संख्या ब्रह्म संख्या समजली जाते. निर्मिती शक्ती आणि नऊ हा अंक यामध्ये एक नाते आहे. जमिनीत गेल्यावर बीज नऊ दिवसांनी अंकुरते. आईच्या पोटात बाळ नऊ महिने राहते आणि जन्म घेते. नऊ हा अंक सर्व अंकात मोठा आहे. आदिशक्तीचा उत्सव हा निर्मितीचा उत्सव असल्याने तो नऊ दिवस असतो.
सनातन वैदिक धर्म हा माणसाने निसर्गाशी नाते जोडावे हे शिकवतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे सण उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रकानुसार करण्यात आली आहे. पावसाची नक्षत्रे संपता संपता भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणपती पूजन केले जाते. भाद्रपद कृष्णपक्षात आपण पूर्वजांचे स्मरण करतो तर अश्विन महिन्याच्या सुरुवातीला शेतात धान्य तयार होते म्हणून निसर्गातील निर्मिती शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मिती शक्ती नवीन पिढीला जन्म देते ती या आदिशक्ती मुळेच ! म्हणून नवरात्र उत्सव किंवा आदिशक्तीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो..
आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपले सण हे त्या त्या काळातील हवामान, शेती, प्राणी या गोष्टींशी संबंधित असतात. निसर्ग आणि मानव मूलतः एकमेकांशी जोडलेले असतात. भौतिक प्रगतीच्या नादात माणूस आपले मातीशी असलेले नाते विसरत चालला आहे. आप, तेज, माती, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राचा उत्सव सुरू होतो. आदिशक्तीची ‘श्री महालक्ष्मी’, ‘श्री महासरस्वती’ आणि ‘श्री महांकाली’ ही तीन रूपे आहेत. श्री महालक्ष्मी संपन्नतेची देवता आहे, तर श्री महासरस्वती ज्ञानाची देवता आहे. श्री महाकाली रूपात देवी अन्यायाला वाचा फोडणे आणि गुंड प्रवृत्तीचा नाश करणे यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे महाकाली ही वाहनावर बसून हातात आयुधे घेतलेली अशी आपण पाहतो.
पारंपारिक पद्धतीनुसार पाहिले तर सर्जनाचे प्रतीक असणाऱ्या मातीची व धान्याची पूजा नवरात्र प्रारंभी सुरु होते. एका घटात माती घालून त्यावर कलश ठेवला जातो. कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो. घटाच्या बाजूने घातलेल्या मातीत सप्तधान्याचे बी टाकले जाते. रोज नऊ दिवस पाण्याचे सिंचन होऊन रोपे तयार होतात. यालाच आपण घट बसवणे असे म्हणतो. मातीच्या घटातून येणारी ही छोटी रोपे माणसाला सृजनाची ताकद दाखवतात. ही ‘आदिशक्ती’ असते.
याच काळात “सरस्वती”ची पूजा केली जाते. लहान मुलांच्या अभ्यासाचा श्री गणेशा पाटीपूजनाने केला जातो. सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचे पूजन करणे हा संस्कार लहान मुलांना दिला जातो. तिची पूजा म्हणजे आपल्या बुद्धीचे तेज वाढवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. ‘ तू शक्ती दे, तू बुद्धी दे ‘ असे म्हणून सरस्वती पूजन होते. पाटी पूजन अजूनही कित्येक मराठी शाळांमधून केले जाते. ते नवमीच्या दिवशी होते.
या नवमीला खंडे नवमी असेही म्हणतात.त्या दिवशी पांडव वनवासातून परत आले आणि वनवासाला जाताना शमीच्या झाडांवर ठेवलेली शस्त्रे त्यांनी काढून घेतली आणि कौरवांशी युध्दाची तयारी केली. अशा या खंडेनवमीचे स्मरण म्हणून आपण घरी शस्त्र पूजा करतो. देवासमोर घरात असणारी छोटी मोठी शस्त्रे जसे की सुरी, कात्री, कोयता मांडून ठेवतात व त्याची पूजा करतात. (आमच्याकडे माझे मिस्टर डॉक्टर असल्याने आम्ही स्टेथोस्कोप, फोर्सेप्स, सिरींज यासारख्या वस्तू ठेवून त्यांची पूजा करत होतो.) शेवटी ही पण आत्ताच्या काळातील शस्त्र आहेत ना ! खंडेनवमीला वाहनांची पूजाही करण्याची पद्धत आहे.. अर्थात काहीजण दसऱ्याच्या दिवशीही करतात. त्यानिमित्ताने वाहने स्वच्छ करणे, धुऊन काढणे, झेंडूच्या फुलांच्या माळा घालून सुशोभित करणे, दाराला तोरण बांधणे हे सर्व घडते.
देवीचे तिसरे रूप म्हणजे “महाकाली” ! अन्यायाचे पारिपत्य करण्यासाठी देवीने घेतलेले हे दुर्गा रुप ! यात देवी सिंहावर बसून, हातात आयुधे घेऊन आक्रमक स्वरूपात येते. आत्ताच्या काळात अन्यायी वृत्तीला प्रतिकार करण्यासाठी स्त्रीने सबल होणे गरजेचे आहे. त्यासाठीही “महाकाली” ची पूजा आहे !
या सर्व देवी रूपांना नमन करण्याचा काळ म्हणजे नवरात्र ! या नवरात्राला “शारदीय नवरात्र” हे सांस्कृतिक नाव साहित्य उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. लेखक, कवी यांच्याकडून जे लिहिले जाते, तीही एक सृजनशक्तीच आहे. तिचा आदर करणे, वंदन करणे, यासाठी शारदीय नवरात्रात साहित्यिकांकडून, संस्थांकडून वेगवेगळे उपक्रम जाहीर केले जातात. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायची संधी या नऊ दिवसात मिळते. नवीन विचारांची मनात पेरणी होऊन नवीन लिखाणाला स्फूर्ती देणारा हा काळ ! त्यामुळे आपल्याला बुद्धी वैभव देणाऱ्या सरस्वतीचे पूजन या काळातच होते.
ज्याप्रमाणे पावसाची नक्षत्रे सृजनाची निर्मिती करतात, स्त्रीमध्ये बालकाची गर्भातील वाढ नऊ महिने, नऊ दिवस असते तो हा ‘ नऊ ‘ अंक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आदिशक्तीच्या कृपेमुळे ही नवनिर्मिती होते. भारतात विविध प्रांतात नवरात्र पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. जसे, गुजरातमध्ये देवीसमोर गरबा खेळला जातो. बंगालमध्ये कालीमाता उत्सव होतो. उत्तर भारतात दुर्गा पूजन होते, तसेच महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे आणि इतरही सर्व ठिकाणी महालक्ष्मी पूजन होते.
सांस्कृतिक, पारंपारिक आणि ऋतुमानानुसार देवीचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. आपल्या माता, भगिनी आणि कन्या या देवीस्वरूप मानून त्यांचा आदर करावा ही शिकवण या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना मिळावी, हीच या शारदीय नवरात्राच्या काळात मी देवीची प्रार्थना करते.
‘मंगलदीप’च्या मैफिलीनंतर आम्हा कलाकारांच्या अवतीभवती कौतुकानं जमणारा श्रोतृवर्ग, हा खरं तर नेहमीचाच अनुभव ! मात्र त्यादिवशीच्या माझ्या चाहत्यांची झालेली माझी गळाभेट, मनाला चटका लावून गेली. कार्यक्रम संपता-संपता एकच गलका झाला आणि अनपेक्षितपणे मुलींच्या एका लोंढ्याने, झपाटल्यासारखं जवळ येत मला घेरून टाकलं…
कुणी थरथरत्या हातानं, माझे हात पकडले तर, कुणी थंडगार हातांनी, “ताई, तुमचा गाणारा गळा कसा आहे पाहू!” म्हणून माझा गळा चाचपू लागल्या, तर काही मुली मला चक्क बिलगल्या! त्या बिलगण्यात उत्कट प्रेमाचा वर्षाव होता! त्या विलक्षण स्पर्शात, आपलेपणाचा ओलावा होता. मला भेटून त्या निरागस मुलींचे गोंडस चेहरे उजळून गेले होते. पण डोळे?….. त्यांचे डोळे मात्र जन्मतःच प्रकाशाला पारखे झाले होते, हे जाणवलं आणि मला गलबलून आलं. मनात आलं, थोडा वेळ जरी अंधारलं तरी आपण किती अस्वस्थ होतो, मग कसं असेल हे दृष्टिहीन आयुष्य? माझे डोळे भरून आले.
तेव्हापासून माझं आणि कमला मेहता अंधशाळेचं नातं जुळलं. त्यानंतर मात्र दरवर्षीची १४ जुलैची माझी आणि त्यांची भेट पुढील बरीच वर्षं होत होती. कारण नेहमी ओढ असते, ती माझ्या या बालमैत्रिणींना भेटायची, त्यांच्याबरोबर गाणी गायची, त्यांच्यातल्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य यासारख्या कलागुणांचा मनसोक्त आनंद घेत दाद द्यायची!
अॅना मिलार्ड बाईंनी ही शाळा स्थापन करून आज शंभराहून जास्त वर्षं झाली आहेत!! इथं १४ जुलै हा शाळेचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा या शाळेत आले. संस्थेच्या विश्वस्त हंसाबेन मेहता यांनी हसतमुखाने आणि अत्यंत आपुलकीनं माझं स्वागत केलं. ‘धन्य अॅना मिलार्ड बाई…!’ या गौरवपर गीताचे सूर मुलींच्या कोकीळ कंठातून पाझरू लागले. गडबडीचं वातावरण एकदम शांत झालं. मुलींच्या सुरात आत्मविश्वास पुरेपूर होता. सुरेल स्वरांनी वातावरण एकदम शांत झालं, वातावरण भारून गेलं. या मुलींपैकीच एक निवेदिकाही खणखणीत आवाजात कार्यक्रम रंगवत होती. हे सर्व अनुभवताना मीच बिथरले होते..!
त्यानंतर काही नाट्यप्रवेश, एकांकिका आणि थक्क करून सोडणारं बांबूनृत्य झालं. भीती, त्याचबरोबर आश्चर्य आणि आनंद माझ्या डोळ्यांत मावत नव्हता. मी स्तंभित झाले! त्यांच्या प्रत्येक स्टेप्स, इतक्या अचूक कशा? कुठेही अडखळत नाहीत, पडत नाहीत, अडचण नाही. सर्व काही सुंदर आणि बिनचूक! त्यानंतर मी त्यांच्यासाठी गायले. माझ्या ‘मंगलदीप’ परिवारातल्या साथीदारांनीही अत्यंत आनंदात मला या सेवेत साथ केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘हासरा नाचरा श्रावण’ ही कविता, ‘केंव्हातरी पहाटे’, ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, या गझला व अशी अनेक गाणी सर्व मुली माझ्यासंगे सुरेलपणे गात होत्या. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! ‘दिवे लागले रे दिवे लागले, ‘तमाच्या’ तळाशी दिवे लागले’ ही कविवर्य शंकर रामाणींची माझ्या स्वररचनेतली कविता, मुली तन्मयतेनं गाताना पाहून माझ्यासमोर प्रकाशाचं झाडच लखलखलं! वाटलं, या मुलींना ही सर्व गाणी पाठ कशी? नंतर जाणवलं, अरे सूरदास नव्हता का अंध? पण त्यालाही परमेश्वरानं जशी दैवी दृष्टी दिली होती, तशीच या मुलींना स्मरणशक्तीची जबरदस्त देणगी दिली आहे. या कार्यक्रमात आम्ही सर्वांनीच खूप आनंद घेतला.
त्यानंतर सुरेल गळ्याच्या स्नेहल, सारिका, तेजल, पल्लवी तसंच सणसणीत ढोलकी व तबला वाजवणारी योगिता, अशा मुलींच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. रेडियो टीव्हीवर कुठेही माझा आवाज ऐकला तरी आजही यांचा फोन असतो. योगिताने तर माझ्या कार्यक्रमातही मला साथ केलीय.
मधून मधून मी त्यांना कमला मेहता शाळेत जाऊन काही गाणीही शिकवली. त्यांची आकलनशक्ती जरी तीव्र असली तरी लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे त्यांना शिकवणं, ही किती कठीण गोष्ट आहे हे मला उमगलं. त्या मुलींना शिकवताना आपल्याला संयमाची खूप गरज असते हे जाणवलं. म्हणूनच त्यांना सांभाळून घेणार्या त्या-त्या वेळच्या मुख्याध्यापिका स्मिताताई, श्यामाताई, शिक्षक आणि शिपायांचंही मला नेहमीच मोठं कौतुक वाटतं. शिवाजी पार्क मधील समर्थ व्यायाम शाळेच्या श्री. उदय देशपांडे सरांनीही या मुलींना मल्लखांब, दोरखंडावरची हवेतली वेगवेगळी आसनं आणि अव्यंगालाही सहजतेनं न जमणारे, चकित करून टाकणारे, व्यायामाचे भन्नाट प्रकार शिकवताना मी अनेकदा पाहिलंय. कराटे, ज्युडोसारख्या स्वसंरक्षणार्थ खेळांचंही व्यायामशाळेत शिक्षण दिलं जातं..
बाहेरच्या जगात कुणी फसवू नये म्हणून खचून न जाता, धैर्यानं कसं वागावं, याचं शिक्षण या ‘कमला मेहता अंध शाळे’त दिलं जातं. स्वावलंबी व आत्मनिर्भर बनून जगण्याचं भान येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न इथे केले जातात. ‘तू करू शकतेस, Nothing is impossible…’ असं म्हणत आयुष्याला वळण दिलं जातं. या शाळेतले निरलस सेवाव्रत घेतलेले सर्व शिक्षक, शिपाई, हंसाबेन मेहता या कामाशी आणि मुलींशी एकरूप झाल्या आहेत, ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.
शाळेत रोज प्रार्थनेच्या वेळी वाजवल्या जाणार्या ‘जन गण मन’मधून मुली माझ्या आवाजाशी घट्ट परिचित आहेत. तसंच माझ्या इतर सीडींमधील ‘दारा बांधता तोरण’, ‘प्रीती जडली तुझ्यावरी’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आणि मुलींचं सर्वांत आवडतं ‘गो मजे बाय, तू माका जाय, माका तुजें जडले पिशें….’ सारखी अनेक गाणी त्यांना मुखोद्गत आहेत.
मी शाळेला भेट दिल्यावर दर वेळेस या लाडक्या चिमण्यांचा घोळका आनंदाने चिवचिवाट करत येतो आणि मला बिलगतो. त्यावेळी माझा हात हाती घ्यायला, माझा स्पर्श अनुभवायला आसुसलेल्या, चिमुकल्या मैत्रिणींच्या स्पर्शात मला जाणवतं,….
मागच्या आठवड्यात एका मित्राच्या शेतातल्या घरी मुक्कामाला गेलो होतो. दुपारी १२ वाजता तिथे पोहोचलो. टुमदार कौलारू घर, आजूबाजूला भात शेती.आंबा, आवळा, पिंपळ अशी वृक्षांची मांदियाळी. हे सर्व पहाता पहाता नजर स्थिरावली ती त्याच्या घराच्या अंगणातच असलेल्या एका झाडावर आणि त्याला टेकून उभ्या केलेल्या शिडीवर.
रानातलेच झाड ते. जमिनीपासून आठ फूट उंच आणि तिथून वर फांदयांना सुरुवात. फांदया आणि पाने एवढी दाट की आत कुणी पक्षी असला तरी दिसणार नाही. या झाडाला टेकूनच एक शिडी ठेवली होती. त्या शिडीला प्रत्येकी दोन फुटांवर एक पायरी. शिडी एवढी भक्कमही नव्हती की त्यावरून माणूस चढेल. रानातल्याच वाळलेल्या काटक्यांपासून बनविलेली. मित्राला विचारले, ‘ही शिडी कुणासाठी रे?’ तो हसला. म्हणाला, ‘ संध्याकाळ होऊ दे, मग समजेल ‘.
संध्याकाळ झाली. अंधाराचे राज्य सुरू झाले. तसे मित्रासमोर तीन कोंबड्या, एक कोंबडा आणि चार छोटी पिल्ले येऊन उभी राहिली. त्याने पिल्ले उचलली. एका खोलीत मोठ्या टोपल्याखाली झाकली. त्यावर वजन ठेवले. कोंबड्या हे दुरुन पहात होत्या. पिलांची सोय झाली आहे,याची खात्री पटताच एकेक कोंबडी आणि तो कोंबडा क्रमाक्रमाने त्या शिडीवर उड्या मारत मारत झाडावर पोहोचले.
“ आता खाली कधी उतरणार? “ माझा प्रश्न.
“ सकाळी उजाडल्यावरच. रात्रभर त्या झाडावरच झोपणार “ , मित्राचे उत्तर.
थोड्या वेळाने झाडाखाली जाऊन मी पाहिले, तर खोडाला फांदी जिथे जोडली जाते, तिथे त्या डोळे मिटून पायावर बसून विश्रांती घेत होत्या. गावातले भटके कुत्रे आणि रानातले मुंगूस यापासून त्यांना जीवाला धोका. मग त्यांनीच ही सुरक्षित जागा शोधली. रोज प्रयत्न करून त्या छतावर, तिथून झेप घेऊन झाडावर जायच्या. मग मित्रानेच ही शिडी ठेवून त्यांचा मार्ग सुकर केला. आता रोज रात्री त्या झाडावर जातात. ध्यानस्थ होऊन विश्रांती घेतात. उजाडल्यावर खाली येतात. पहाटेची बांगही झाडावरूनच…. मित्राने ही माहिती पुरविली.
हे ‘ कुक्कुट ध्यान ‘ मनात घर करून राहिले. पिलांची काळजी नाही.. ती घ्यायला मालक सक्षम आहे, याची खात्री. उद्याची चिंता नाही. शत्रूपासून सुरक्षित ठिकाण शोधायचं. तिथे ध्यानाची ‘खोड’ लावून घ्यायची की फांदीवरचा तोल समन्वयाने आपोआप राखला जातो. जीवाला स्वस्थता आणि विश्रांतीही.
सहज मनात आलं, आपणही राग, लोभ, मोह, हे आतले शत्रू आणि स्पर्धा, असूया, मत्सर हे बाहेरचे शत्रू यांच्यापासून दूर, सुरक्षित ठिकाण शोधून तिथे निश्चिंतपणे, असेच ‘कुक्कुट ध्यान’, रात्रभर नको …पण दिवसातून थोडा वेळा तरी केलेच पाहिजे. या ध्यानातून मिळणारी स्वस्थता ही ऊर्जा प्रदान करणारी असेल. आत उजेड निर्माण करणारी असेल. उजाडताच पुन्हा नव्या ऊर्जेने उगवलेल्या दिवसाला सामोरी नेणारी असेल. हेच आपले एका दिवसाचे ‘ उजेडी राहिले उजेड होऊन ‘, असे होणे… असे रोज व्हावेसे वाटत असेल तर रोज हे ‘कुक्कुट ध्यानम्’…..
गणपती बाप्पाचे विसर्जन होते आणि त्यानंतरचा पुढचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून मानला जातो.
भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातले हे पंधरा दिवस पितरांच्या स्मरणार्थ व्यतीत केले जातात.
आत्मा अमर आहे हे आपण मानतो. तसेच मृतात्म्यांचे ऋणानुबंध, मृत्यूनंतरचे अस्तित्व, या संकल्पनांनाही आपण नाकारत नाही. आयुष्य जगत असताना कधी कधी असे अनुभव येतात की अशा अतिंद्रिय घटनांचाही विचार करावा लागतो. कित्येक वेळा, ही सारी पूर्वजांची पुण्याई असे उद्गारही मुखातून निघतात. याचाच अर्थ कुठल्याशा अदृश्य अस्तित्वाला आपण मनाशी बाळगतो. त्याच्याशी आपण जोडले जातो.
आपले पूर्वज हे आपलं मूळ असतं. (ओरिजिन). शास्त्रीय दृष्टीने सुद्धा त्यांचे जीन्स, क्रोमोझोम्स, पेशी या आपल्या शरीरात जन्मत:च स्थित असतात. आणि याच बरोबर आपल्यातले गुण, स्वभाव ,आवडीनिवडी, आपलं कर्तृत्व, आपल्या जगण्याच्या, विचार करण्याच्या दिशा या याच धाग्यांची निश्चितपणे निगडित असतात. ज्याला आपण जन्मजात गुण असेही म्हणतो.
आपले सण, आपले उत्सव हे ऋतूचक्र आणि शास्त्रीय विचारांवरच आधारलेले आहेत. आणि बहुतांशी ते साजरे करत असताना निसर्गाच्या पंचतत्वांशी कृतज्ञता व्यक्त करणे हेच केंद्रस्थानी असते. पितृपक्ष हा असा पंधरवडा आहे की,तो पाळण्यामागे आज या जगात आपण ज्यांच्यामुळे जन्म घेतला आहे त्यांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच अपेक्षित आहे. पितृपक्ष मानण्याचा हा एक मुख्य हेतू आहे.
आपण वरचेवर एकमेकांना थँक्यू सॉरी म्हणतच असतो ना? मग जे आपल्या जीवनात होते आणि आज नाहीत, शिवाय ज्यांना आपण बघितलेही नाही, पण त्यांच्या कथा मौखिक पद्धतीने आपण ऐकत आलो आहोत, त्या सर्व पितरांसाठीही अंतःकरणापासून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. त्याच वेळी सॉरीही म्हणायचं आहे. कारण अनेक वेळा आपण त्यांना नकळतपणे दुखावलं आहे. त्यांचा अवमान केलेला आहे. त्यांची आबाळहीआपल्या हातून झालेली आहे, म्हणून या अदृश्य आत्म्यांना मनापासून सॉरी म्हणून पुढच्या पिढीलाही संदेश द्यायचा आहे की, बुजुर्गांचा, वाडवडिलांचा ते असतानाच मान ठेवायला हवा. त्यांनी जे कष्ट आपल्यासाठी उपसले आहेत त्याची जाणीव ठेवायला हवी. आमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुमच्या हातून होऊ नये.. असे रचनात्मक संस्कार पुढच्या पिढीवर या पितृपक्षाच्या निमित्ताने करावेत.
दर्भाहुती, तर्पण, अग्नि कुंडातला घास, यामागे विकारांचे दहन आणि झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना हाच उद्देश जाणावा.
भाद्रपद महिना हा पशु पक्षांचा जनन काळ असतो. (ब्रीडिंग सीजन ), कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळ वृक्षांचे पुन्हा पुन्हा नैसर्गिकरित्या बीजारोपण होत असते. म्हणूनच वृक्षासम सावली देणाऱ्या पूर्वजांना कावळ्याच्या मुखातून घास भरवून निसर्गवर्धनाची भूमिका जाणून घ्यावी.
ही अंधश्रद्धा नसून मनातल्या अबोल भावनांना व्यक्त करण्याचं हे एक साधन आहे. आणि आपलं जीवन सार्थ, सुखी आणि सुरक्षित करणारे एक माध्यम आहे असा सकारात्मक विचार करून पितृपक्षाची ही परंपरा यथाशक्ती राखावी असे मला वाटते.
या काळात शुभकार्य करू नयेत, वाहन खरेदी, वस्त्र खरेदी, गृह खरेदी करू नये, प्रवास करू नयेत या संकल्पनांचा मात्र नक्की पुनर्विचार व्हायला हवा. पितृपक्ष या काळाला अशुभ कशासाठी मानायचे यावर चर्चा व्हावी. या संकेतांना कितपत महत्व द्यावं हे व्यक्तीगत असावं.
आणखी एक विचार मांडावासा वाटतो की, ग्लोबलायझेशन झाले आणि जीवनपद्धतींची देवाणघेवाण झाली. त्यात मदर्स डे, फादर्स डे साजरे होऊ लागले. मग आपली ही पितृपक्ष परंपरा, मातृ-पितृ दिन, फादर्स डे, फोर फादर्स डे म्हणून मानायला काय हरकत आहे? घरातल्या वृद्ध बुजुर्ग मंडळींचा सन्मान त्यांच्या हयातीतच या दिवसात का करू नये? स्वर्गस्थांचे स्मरण आणि हयातांचा सन्मान पितृपक्षात जाणीवपूर्वक व्हावा यात न पटण्यासारखे काय आहे?
दरवर्षी न चुकता हे घडत जातं…डोळ्यांपुढे उभी राहतात ती सारी माणसं जी आपल्याआधी निघून गेली या जगातून. काही माझ्या आधी कैक वर्षे जन्माला आलेली होती म्हणून.. तर काहींना अवेळी बोलावणं आलं म्हणून….गुरुजी सुधांशुला एक एक नाव उच्चारायला लावून पाठोपाठ एका मंत्राचा पुनरुच्चार करीत त्याला त्याच्यापुढे ठेवलेल्या परातीत, हातावर घेतलेलं पाणी सोडायला सांगत होते तेव्हा ती ती माणसं नजरेसमोर दिसू लागली.
आज सासुबाईंचं नवमी श्राद्ध ! मामंजी आहेत अजून. खूप थकलेत म्हणून नातवाच्या हातून करून घेतात तर्पण….दरवर्षी अगदी आग्रहाने. सुधांशु आणि त्याची नोकरीवाली बायको कधी काचकूच करीत नाहीत. सुधांशु कितीही काम असले तरी किमान सकाळची अर्धा दिवसाची सुट्टी घेऊन येतोच घरी आणि सूनबाई रजा टाकतात. सुधांशु दुपारी बारा वाजता काकग्रास ठेवतो बंगल्याच्या भिंतीवर आणि दोन घास खाऊन माघारी जातो त्याच्या कामाला. द्वितीयेला ह्यांचं श्राद्ध असतं, त्यादिवशी तर तो सबंध दिवस सुट्टीच टाकतो….माझ्यासोबत रहाता यावं दिवसभर म्हणून. माझ्या आधी गेले हे. म्हणजे मी ह्यांच्या माघारी श्वास घेत राहिले…एकाच सरणावर जाण्याचं भाग्य माझ्यासारखीच्या कपाळी कुठून असायला?
चुलत जाऊबाई मात्र माझ्यापुढे गेल्या….सर्वच बाबतीत….
‘ अहेव मरण पिवळं सरण, भ्रताराआधी डाव जितला गोरीनं
भ्रताराआधी मरण दे रे देवा, दीर खांदेकरी नणंदा करतील सेवा ।।’
ह्या ओळी जणू त्यांच्यासाठीच लिहिल्या होत्या कुणीतरी. सुधाकर भावोजी मोठ्या लढाईतून जगून वाचून परतले होते. पेन्शन बरीच होती पण ती खायला घरात तिसरं कोणी नाही. ह्यांची बहिण,वसुधा, तिला दिलेली होती दूर तिकडे खानदेशात. तिचं माहेरपण मात्र आमच्या दोन्ही घरांत होत असे निगुतीनं. सुधाकर भावोजी तिचे ह्यांच्यापेक्षा अंमळ जास्तच लाड करायचे. तसा आमच्यातही भावजय-नणंद असा भाव नव्हताच कधी. दिवस पाखरागत उडून गेले आणि जाऊबाईंनी अनाकलनीय दुखण्याने अंथरूण धरले ते कायमचेच. वसुधाताई जाऊबाईंच्या शेवटच्या दिवसात नेमक्या माहेरपणाला आल्या होत्या. त्यांची सेवा घडली त्यांच्या हातून. आणि ह्यांनी खांदा दिला शेवटी.
अजूनही लख्ख़ स्मरतो तो दिवस. जाऊबाईंच्या पार्थिवाला नव्या नवरीचा शृंगार केला होता जमलेल्या आयाबायांनी. एवढा आजारी देह तो.. पण त्यादिवशी चेहरा इतका गोड दिसत होता…पण डोळे मिटलेले ! काठी टेकीत टेकीत तिला शेवटचं पहायला गावातल्या चार दोन वृद्धाही आल्या होत्या. नव्या पोरीही होत्या आसपासच्या. त्या भेदरलेल्या…काही म्हणत नव्हत्या फारसं काही. पण एक वृद्धा म्हणून गेली…’ पोरी हो…कपाळी हळदी-कुंकू लावा….अहेव मरण आलं काकींना…नशीब काढलं !’ असं म्हणत त्या म्हातारीने तिच्या सुरकत्या पडलेल्या हातांनी पार्थिवाला नमस्कार केला….तेव्हा माझा हात आपसूक माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर पडला. माझं सौभाग्य…मी आणि आमचा सुधांशु ! किती दिवसांची असेल सोबत ही अशी? जीवनात सारेच क्षणभंगुरच की. पण याचा विसर मात्र सहजी पडतो जीवाला…नाही?
काळ झपाझप पुढे निघाला..त्याला जणू कुठंतरी खूप दूर जायचं होतं स्वत:लाच ! तिस-याच वर्षी सासुबाईंनी इहलोकीची यात्रा समाप्त केली आणि आमचं घर तसं ओकंओकं झालं. आणि मामंजी अबोल. त्यांचा अगदी बालवयापासूनचा संसार होता. पण कितीही वय झालं तरी साथसंगत संपून जावी असं कुणाला वाटतं? सासुबाई काहीवेळा गंमतीनं म्हणायच्या…..तुमच्यानंतर जन्माली आलेली असले तरी जाताना तुमच्याआधीच जाईन ! यावर मामंजी त्यांना मनापासून रागवायचे आणि मग त्यांच्याकडे पहात रहायचे..चष्म्याच्या भिंगांतून. त्यांची ती नजर, सासुबाईंच्या नजरेतील ते ओलेपण मनात रुतून बसले ! आणि दोनेक वर्षांत सासूबाईंनी डाव जितला ! त्यानंतरच्या पितृपक्षापासून नवमी माझ्या घरीआली. ’अहेवनवमी.’ ‘अविधवा नवमी’ही म्हणतात असं ऐकलं होतं कधीतरी. पहिल्या वर्षी तर कित्येक पानं उठली होती वाड्यात. इतका मान असतो भ्रताराआधी जाणा-या बाईला?
माझ्या चेह-यावरील पूर्णाकृती प्रश्नचिन्ह बघून हे म्हणायचे, “ अगं,वेडे ! जुना काळ तो. चूल आणि मूल नव्हे मुलं हेच विश्व असायचं तुम्हां बायकांचं. पुरुषावर अवलंबून रहायचं स्त्रियांनी सर्वच बाबतीत. माहेर कितीही लाखाचं असलं तरी ते घर फक्त साडी-चोळीपुरतं. कारण तिथं नव्या कारभारणी आरूढ झालेल्या असतच. त्यामुळे नव-याची सुख-दु:खं तीच त्यांचीही होऊन जायची. आणि हा आधार निखळून पडल्यावर बाई गतभ्रर्तृक होई. तिचं भरण-पोषण करणारा, तिची बाजू घेणारा तिचा भ्रतार जगातून नाहीसा झाल्यावर तिचं ओझं कोण वागवणार?.. असा कोता विचार करायची माणसं त्यावेळी. घराबाहेर पडून स्वत:चं आणि पोरंबाळं असल्यास त्यांचं पोट भरण्याचं धारिष्ट्य आणि सोय सुद्धा नव्हती आतासारखी. या सर्वांतून सुटकेचा जवळचा मार्ग म्हणजे पालनकर्त्याच्या आधी जगाला राम राम ठोकणे. पुरुषांचं राहू दे….तिच्यासारख्या इतर बायकांना तिचा हेवा वाटणं किती साहजिक?”
ह्यांनी कितीही समजावून सांगितलं तरी माझ्या मनातल्या एका कोप-यात अहेवपणाचं वेड हळव्या बाईपणाचं लुगडं नेसून घुसून बसलं ते बसलंच. हे आजारी पडले तेव्हा तर मन अगदी धास्तावून गेलं होतं. डोळ्यांत तेल घालून उशाशी बसून रहायचे मी कित्येक रात्री. रामरायाच्या कृपेने यांना आराम पडला आणि मी निर्धास्त झाले. सुधांशु मोठा झाला, शिकला, पोटापाण्याला लागला. शिकली-सवरलेली सून आली. आता माझे दोन दोन पालनकर्ते होते घरात…एक हे आणि दुसरा सुधांशु. आम्हा दोघांच्याही वयांनी उंबरठे ओलांडले आणि इस्पितळांचे चढले. माझी तब्येत तशी तोळामासाच म्हणा प्रथमपासून. हे मात्र स्वत:ची योग्य ती काळजी घेत. लहानपणी गरीबीमुळे खाण्या-पिण्याची आबाळ झालेली होती. पण जरा बरे दिवस पाहिल्यावर शरीरानं उभारी धरली होती यांच्या. जाण्यासारखे नव्हते हो इतक्यात…पण गेले … .. … माझ्याआधी..मला हरवून. सुधांशु म्हणाला होता…..”आई, बाबांच्यानंतर मला तुझ्याच तर प्रेमाचा आधार आहे…तू अशी खचून जाऊ नकोस !” मग मात्र मी स्वत:ला फार त्या विचारांत गुंतवू दिलं नाही. पण दरवर्षी द्वितीया आणि नवमी यायची आणि माझ्या थकत चाललेल्या चेह-याच्या नकाशात निराशेचं बेट अगदी ठळक दिसू लागायचं…समुद्रातून अचानक वरती आलेल्या बेटासारखं…!
आज सासुबाईंची ‘अविधवानवमी’ . कालपासून तयारी सुरू होती. गुरुजी तर दरवर्षी नेमानं येणारे. त्यांना आठवण करून द्यावी लागत नाही…उलट तेच निरोप देतात…येतो म्हणून. पण मला बरंच वाटत नव्हतं गेल्या काही दिवसांपासून…खूप थकवा जाणवत होता. गुरूजी आले….घर त्या मंत्रांनी भरून आणि भारावून गेलं. माहेरकडची, सासरकडची सारी माणसं.. त्यांच्या प्रत्येकाच्या नावांच्या उल्लेखानं जणू जिवंत होऊन एका रांगेत येऊन बसली पंगतीला….सासुबाई, जाऊबाईही होत्या…कपाळी कुंकू लेवून. पण मला त्यांना कुंकू लावायची परवानगी नव्हती…मी कुठं अहेव होते?
टळटळीत दुपार झाली. सूर्य डोक्यावर आला. नैवेद्य..ज्याचे त्याला ठेवले गेले. सुधांशुने,सूनबाईने सासूबाईंच्या तसबीरीपुढे डोके टेकवले…मामंजी त्यांच्या खोलीतल्या बिछान्यावर जरासे उठून बसले…थरथरत्या हातांनी नमस्कार करीत.
सुधांशुने माझ्या हाताला धरून मला उठवलं…आई….वहा हळदीकुंकू आजीच्या तसबीरीवर ! मी चमकून त्याच्याकडे पाहिलं….तो म्हणाला…”अगं पालन-पोषण करणारा फक्त नवराच असतो का…मुलगा नसतो का आईचा पालनकर्ता…आधारस्तंभ? बाबा नसले म्हणून काय झालं? तू मागे राहिली नसतीस तर मला कोण असलं असतं. आता मी आहे की….तुला शेवटपर्यंत.”
माझ्या डोळ्यांना धारा लागलेल्या…भिंतीवरच्या ह्यांच्या तसबिरीकडे पहात राहिले. सूनबाईंनी माझा एक हात हाती घेतला. मी ह्यांच्या तसबीरीच्या काचेत पाहिलं…सुधांशु मागे उभा होता…..आणि तसबीरीतील ह्यांच्या डोळ्यांतही आज चमक दिसत होती ! सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडून, नव-यामागे त्याच्या आईवडिलांची सासु-सासऱ्यांची मुलाप्रमाणेच सेवा करण्याचं भाग्य लाभलेल्या माझा.. हो .. माझा मलाच हेवा वाटू लागला होता ! अहेवनवमीही मंद स्मित करीत पुढे सरकत होती…आणि आज मला तिचा हेवा वाटत नव्हता !
(अशीच एक आई आणि तिचा मुलगा आठवला…ह्या पितृपक्षात. या घटनेला बराच कालावधी उलटून गेला आहे तरी स्पष्ट आठवली दोघं. कालानुसार बदललं पाहिजे सर्वांनी. आठवलं तसं लिहिलं…काही कालक्रम इकडचा तिकडे झाला असेलही. पण असे सुधांशु आहेत म्हणून ही नवमी ‘अहेव’ आहे, असे म्हटल्याशिवाय राहावत नाही.)
शारदा दारातून आत आली. आणि म्हणाली, “ वहिनी या बघा नवीन बांगड्या काल घेतल्या. दोनशे रुपयांना…” चकचकीत बांगड्यांनी तिचा हात खुलून दिसत होता…..आणि हातापेक्षाही चेहऱ्यावरचा आनंद लोभसवाणा होता…
“ अगं किती छान आहेत.. थांब शारदा फोटो काढते.”
“ नको नको “ ती लाजून म्हणाली
“ अगं तुझा नाही.. बांगड्यांचा काढते. मग तर झालं….” मी फोटो काढला…
बांगड्यांवरून प्रेमानी हात फिरवून शारदा कामाला लागली…
दिवसभर काम करूनही ती नेहमी आनंदातच असते…
देवाची पूजा करताना बाप्पाला गुलाब वाहिला आणि सरूची आठवण आली…
काळी सावळी तरतरीत सरू मी गेले की ‘ या काकू ‘ म्हणते. मी नेहमी तिच्याकडूनच फुलं घेते. काल फुलं घेतली तर एक टपोरा गुलाब देऊन म्हणाली “ काकू हा घ्या तुमच्या देवाला.. “ मनात आलं किती गोड निरागस मन आहे पोरीचं….देवाला हात जोडले त्याला मनोमन प्रार्थना केली .. ‘ दिवसभर कष्ट करणाऱ्या सरूला सुखी ठेव…’
साहिलच्या म्हणजे नातवाच्या शाळेत फनफेअर होतं. तिथे त्यांचा पाणीपुरीचा स्टॉल होता. तो बघायला निघाले होते. रिक्षा बघत होते… काल साहिलने सांगितले होते आजी आम्ही चीज रगडापुरी करणार
आहोत “
“अरे पण असं कसं? रगडापुरी वर चीज….”
“ हो आमचं तसच ठरल आहे..आणि पाणीपुरीवर नेहमीचं चिंचेचं पाणी नाही तर आम्ही त्यात थम्सअप फॅन्टा आणि स्प्राईट घालणार आहोत…त्याला आम्ही पाणीपुरी शॉटस् असं नाव दिले आहे. “
“ अरे हे कसलं कॉम्बिनेशन? कुणी खाईल का? “
“ अगं टीचर पण म्हणाल्या.. तुम्हाला करावसं वाटतंय ना करून बघा….
काय झालं असेल की…मी विचार करत होते तेवढ्यात ‘ नीता…’ अशी हाक आली
मैत्रीण दुकानात आईस्क्रीम घेत होती. बाई साहेबांनी स्वेटर घातला होता आणि घेत होती आईस्क्रीम…
विचारलं तर म्हणाली “ थंडीतच मजा येते..ही घे तुला एक कॅंडी जाताना खा. “ वर डोळा मारून म्हणाली
“ वन फाॅर द रोड एन्जॉय इट.. घे ग कोणी बघत नाही….”
आयुष्यात प्रथमच रिक्षात बसून आईस कँडी खाताना गंमत वाटत होती….
फन फेअरला पोचले, तर तिथे खूपच मजा चालली होती.
नातवाच्या स्टॉलवर गर्दी उसळली होती लोक धमाल करत होते.
पाणीपुरी शॉटस् हिट झाली होती…
आई बाबा आजी आजोबा पोरं… सगळे हसत होते .. ट्राय करून बघत होते…
मुलं मुली चीज रगडा पुरी बनवत होते, ते पण लोक आवडीने खात होते…
‘ कसली भारी आयडिया आहे ना…वाॅव…..’ वगैरे चाललं होतं
इतकी गर्दी होती की नातवाला आमच्याकडे बघायलाही वेळ नव्हता
हे आणि सुनबाईचे आई-वडील पण आले. आम्ही चौघेही गप्पा मारत बसलो.
खूप वेळानंतर साहिल सांगायला आला, “ आजी आमचं सगळं संपलं तुला शॉट्स नाही मिळाले ना .. आता उद्या घरी करू तेव्हा तू ट्राय कर…चालेल ? “….
मनात म्हणाले, “ नाही रे राजा…. उलट आज मला सुखाचे शॉट्स मिळाले.. ते कसे घ्यायचे हे समजले..
त्याची चव ही दुय्यम होती.. मुलांचा आनंद महत्त्वाचा होता “
खरंच अशा छोट्या छोट्या शॉट्सनीच जीवनाची मजा घ्यायला शिकू…
ते असतातच आसपास…बघायचे ठरवले तर दिसतात..
बघायचे…. हळूहळू येईल ती दृष्टी….मग दिसतील आपले आपले सुखाचे शॉटस्
मग ठरलं तर…’ अशा शॉटस्ची मजा घेत आयुष्य जगायचं .. अगदी आनंदानी…’
☆ “प्रश्न अनेक, पण उत्तरांचा पत्ताच नाही !” – भाग-१ … लेखक : डॉ. मयुरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देताना सामाजिक प्रवर्तकांना हेच अपेक्षित होतं का? समाजातल्या व्यावसायिकांना अशाप्रकारे लुटणं अपेक्षित होतं का? याची उत्तरं कुणी मागायची आणि या प्रकारांवर अंकुश कोण आणणार? याचं ठोस उत्तर समाजाला हवं आहे.
सार्वजनिक उत्सव हे अशा गोष्टी राजरोसपणे करण्यासाठीचं हक्काचं निमित्त आहे का? माणसांना जे एकट्याला किंवा स्वतंत्रपणे करता येणार नाही, नेमक्या त्याच गोष्टी अशा मोठ्या गर्दीचा फायदा घेऊन केल्या जातात का? यातलं तथ्य शोधण्याकरिता सामाजिक संशोधनाची आवश्यकता आहे.
सार्वजनिक मिरवणुकीचं गणितच फार निराळं आहे. दहा दिवसांकरिता प्रतिष्ठापित केलेला देव नवव्या दिवशी दुपारीच मांडवाबाहेर काढायचा, आदल्या दिवशी रात्रीच त्या पूजेतल्या देवालाच थेट रस्त्यावर नंबरासाठी रांगेत उभं करायचं, पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर नंबर लागत नाहीच. मग या रांगेत उभ्या असलेल्या गणपतींचा अनंत चतुर्दशीची सकाळ ची पूजा, आरती, नैवेद्य आणि संध्याकाळची पूजा-आरती-नैवेद्य होतो का? शोडषोपचार होतात का? रांगेत गणपती उभा केला की, त्याची पूजाअर्चा माणसं पार विसरूनच जातात. त्यांना मिरवणुकीचे वेध लागलेले असतात. (त्यातही “वाट पाहे सजणा, संकष्टी पावावे” अशांचीच संख्या जास्त. अनेकांना तर तेवढंही येत नसतं. मग आरती आणि मंत्रपुष्पांजली सुद्धा स्पीकर वरच लावली की काम ओके !)
कार्यकर्त्यांची मिरवणुकीची हौसच मोठी दांडगी.
ते गणपतीच्या रथासमोरच रस्त्यावरच जेवतात, तिथंच झोपतात. डीश, द्रोण, पत्रावळी, चमचे, पाण्याच्या (आणि अन्य सर्व प्रकारच्या द्रव पदार्थांच्या) बाटल्या वगैरे तिथंच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. गणपती बाप्पा सकाळ होण्याच्या प्रतिक्षेत रथावरच बसून असतात.
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पारोश्या अवस्थेतच मिरवणूक सुरू होते, आंघोळही न केलेले सो काॅल्ड भक्त मोठ्या भक्तिभावानं शीला की जवानी, बोल मैं हलगी बजावू क्या, पोरी जरा जपून दांडा धर अशा गाण्यांवर नाचत राहतात. हे कुठल्याच शुचितेत किंवा पावित्र्याच्या व्याख्येत बसत नाही.
राष्ट्रीय सणांच्या दिवशी शोभायात्रा निघतात, त्यात केवळ देशभक्तीपर गाणीच वाजवली जातात. पण मग देवाच्या मिरवणुकीत आयटम साॅंग्ज कशी काय लावली जातात? अशा सर्व कार्यकर्त्याकरिता एखाद्या वेगळ्या दिवशी डीजे नाईट आयोजित केली तरी काम होऊन जाईल, त्याकरिता गणेशोत्सवाचंच निमित्त कशाला हवं?
कित्येक ठिकाणी तर निवडलेल्या दुर्वांच्या जुड्या नसतातच. त्याऐवजी उपटून आणलेलं गवतच वाहिलेलं असतं. म्हणजे तेही महत्वाचं वाटत नाही. मग याकडे धार्मिक उत्सव म्हणून कसं पहावं? आणि का पहावं?
दहाच्या दहा दिवस अंडी किंवा मांसाहारी पदार्थ खुशाल खायचे, व्यसनं करायची, मनसोक्त अपेयपान,धूम्रपान करायचं आणि ‘हा बघा आमचा हिंदूंचा प्रिय उत्सव’ असं वरून पुन्हा आपणच म्हणायचं, हा कुठला अजब प्रकार? एकूणच सवंगपणा, आचरटपणा, छचोरपणा, स्वत:च्या मनातल्या असामाजिक कृती करण्यासाठी गणेशोत्सव आणि मिरवणुका यांचा व्यवस्थित वापर केला जातोय, यामागची सामाजिक मानसिकता जाणली पाहिजे.
लोकमान्य टिळक, न.चिं.केळकर अशा मान्यवरांनी पुढाकार घेऊन हा उत्सव उभा केला आहे. मिरवणुकीची सांगता मान्यवरांच्या भाषणांनी होत असे. यांची शिस्त तर इतकी करडी होती आणि सामाजिक जरब अशी होती की, त्यांचा शब्द मोडण्याची कुणी प्राज्ञा करू शकत नसे. आज तशीच शिस्त पुन्हा लावण्याची आवश्यकता नाही का? की उत्सवातला आनंद आम्ही लुटणार आणि गैरप्रकार किंवा तत्सम गोष्टी घडल्या की त्याची जबाबदारी प्रशासन-पोलिस यांच्यावर ढकलणार? याचा विचार आपल्या मनात आहे की नाही?
सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची कोणती विशेष आचारसंहिता किंवा चौकट आहे का? आजवर ती नसेल तर, ती असायला नको का? उत्सवाचं नियोजन, आखणी, खर्चाची सोय, मूर्तीचा आकार किंवा तपशील, देखाव्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे, मिरवणुकीसंबंधी चे मार्गदर्शक नियम, उत्सव संपल्यानंतर रथ किती दिवस रस्त्यात तसाच ठेवायचा, मांडव किती दिवस ठेवायचा, आॅडीट कुणाकडून करून घ्यायचं, उत्सवासाठी शिस्तपालन समिती कशी नियुक्त करायची याविषयी आजवर कुणीही पुस्तिका काढलेली नाही. १२५ वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या उत्सवाविषयीचं असं मार्गदर्शनच असू नये, ही केवढी मोठी तृटी आहे?
प्रत्येक कार्यकर्ता सूज्ञ असतोच, असा आपला समज आहे का? असा सरकारचा समज आहे का?असा धर्मादाय आयुक्तांचा समज आहे का? आपण सर्वांनाच जन्मत:च सूज्ञ, समंजस, समजूतदार, विवेकी असं समजण्याची चूक करतो आहोत का? उत्सव हा उत्सवासारखाच झाला पाहिजे याविषयी सर्वांचं एकमत असेलच, पण मर्यादांचं भान सुटणाऱ्यांविषयीचं कारवाईचं पाऊलही तितक्याच कठोरपणे टाकलं पाहिजे. समाजाला प्रबोधनाची आवश्यकता नेहमीच असते, ही गोष्ट नाकारण्यात अर्थच नाही. पण जेव्हा समाजच आम्हाला कुणीही अक्कल शिकवण्याची गरज नाही असं एकमुखानं म्हणायला लागतो तेव्हा काय समजावं?
उत्सवाला परिवर्तनाची गरज नाही, उत्सव पुन्हा त्याच्या मूळ सात्विक रूपाकडे नेण्याची खरी गरज आहे.
– समाप्त –
लेखक : डॉ. मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “प्रश्न अनेक, पण उत्तरांचा पत्ताच नाही !” – भाग-१ … लेखक : डॉ. मयुरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
रात्री लक्ष्मी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका चना जोर गरम वाल्याकडून सात-आठ जणांच्या टोळक्यानं भेळ घेतली. पैसेच दिले नाहीत. त्यानं पैसे मागितले तेव्हा सगळेजण त्याच्या अंगावरच धावून गेले आणि त्या पन्नाशीच्या वयाच्या माणसाला दमदाटी केली, एक-दोन टोलेही दिले. तो माणूस बिचारा घाबरून गेला, जागेवर थरथर कापायला लागला. ती पोरं त्या माणसाची टर उडवत, हसत खिदळत निघून गेली. जाताना त्याच्याकडची चुरमुऱ्याची पिशवीच उचलून घेऊन गेली. आता चुरमुरेच गेले म्हटल्यावर याचा धंदाच संपला !
पंधरा-वीस जणांच्या टोळक्यानं रात्री साडेतीन-चारच्या सुमारास एका मिल्कशेक वाल्याला धरलं. त्याच्याकडून पंधरावीस मिल्कशेक घेतले. पैसे मागितल्यावर दमदाटी केली, धक्काबुक्की केली. हपापाचा माल गपापा ! थोड्याफार फरकानं असे अनेक प्रसंग काल डोळ्यांसमोर घडताना दिसत होते.
गर्दीचा फायदा घेऊन मुली आणि स्त्रियांच्या जवळ जाऊन स्पर्श करण्याचे आणि छेड काढण्याचे तर अक्षरश: शेकडो प्रकार घडत होते. ढोल-ताशांच्या ठेक्यावर काही मुली नाचू लागल्या. लगेच बाजूला चार-पाच पोरं जमा झाली. नाचता-नाचता मुलींच्या अगदी जवळ जाऊ लागली. बेसावध मुलगी बघून तिच्या कानात कर्कश पिपाणी वाजवणे, तिचं लक्ष नसल्याचं पाहून हळूच तिच्या चेहऱ्यावर सिगारेटचा धूर सोडणे, जळती सिगारेट हातावर टेकवणे, ओढणी किंवा वेणी ओढणे, तरूण मुली किंवा स्त्रियांच्या जवळ जाऊन मुद्दामच घाणेरड्या शिव्या देणे असे विकृत प्रकार तर अनेक पाहिले. “विनाकारणच धक्काबुक्की करून पोरीबाळींना त्रास देण्याची हक्काची जागा म्हणजे मिरवणुकांचे रस्ते !” असाच समज समाजानं करून घेतलेला दिसतो. हा समज की गैरसमज याचं उत्तर कुणाकडे आहे?
अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आपण कोणते कपडे घालावेत किंवा कसं वावरावं याचं भान युवतीच काय पण स्त्रियांनाही नव्हतं, हे दुर्दैवानं आणि खेदानं नमूद करावंसं वाटतं. स्त्रियांविषयीच्याच अश्लील आणि द्वैअर्थी गाण्यांवर स्त्रियांनीच बेभान होऊन नाचावं, म्हणजे कमाल झाली !
दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचा तर सुळसुळाट झालेला होता. रस्त्यावरच खुलेआम बसून मद्यप्राशनाचे कार्यक्रम सुरू होते. नीलायम टाॅकीज जवळ तीन-चार मुलं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाक्यांची तोडफोड करत होती. त्यांनी आठ-दहा गाड्यांचं प्रचंड नुकसान केलं. रस्ते बंद करण्यासाठी वापरलेले बांबूचे तात्पुरते अडथळे तर लोकच मोडून टाकतात, हा दरवर्षीचाच अनुभव आहे. पण बंद दुकानांची शटर्स तंबाखू, गुटख्याच्या पिंका टाकून रंगवणे, फ्लेक्स फाडणे, दुकानांच्या बाहेरचे दिवे काढून ते फोडणे, चारचाकी-दुचाकी गाड्यांना स्क्रॅचेस मारणे, आरसे फोडणे असे उद्योग सर्रास घडत होते.
डुकराच्या ओरडण्यासारख्या आवाजाच्या पिपाण्या वाजवत रस्त्यावर मोकाट फिरायचं, तऱ्हेतऱ्हेचे विचित्र प्राण्यांचे आणि कवट्यांचे मुखवटे तोंडाला लावून मोकाट फिरायचं, मक्याची कणसं किंवा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पायानं टोलवत टोलवत फिरायचं… या गोष्टी सामाजिक एकात्मता, देवभक्ती, देशभक्ती, हिंदू धार्मिक परंपरांविषयीचं प्रेम-आस्था-आपुलकी, मंगलमय पवित्र वातावरण यापैकी नेमकं काय करतात? याचं खरंखुरं उत्तर कुणी देऊ शकेल का?
हा काही आजचाच प्रकार आहे असं नाही. २००६-०७ साली मी पुण्यात काॅट बेसिसवर राहत होतो तेव्हाची गोष्ट. गणपती उत्सव जवळ आलेला. संध्याकाळी दारावरची बेल वाजली. दार उघडलं, एकदम चार-पाच माणसं थेट घरातच घुसली. दोन जणांनी सगळं घर फिरून पाहिलं. किती जण राहता वगैरे चौकशी केली. आणि चौघं राहताय ना, मग प्रत्येकी ३००/- प्रमाणे १२००/- रूपये द्या असं म्हणून बसून राहिले. शेवटी खूप अर्जविनंत्या करून प्रत्येकी १५०/- प्रमाणे ६००/- रूपये घेतले आणि गेले. हाच प्रकार २०१८ सालीदेखील सुरू आहे.
सातारा रोडवरच्या एका हाॅटेलमध्ये ऐन गणेशचतुर्थीच्याच दिवशी रात्री जवळपास ३०-४० माणसं पावतीपुस्तक घेऊन आली. काऊंटरवर जोरदार बाचाबाची सुरू होती. यातली बरीचशी पोरं पंचविशीच्या आतलीच. इकडे हात घाल, तिकडे हात घाल असे उद्योग सुरू होते. एकदोघांनी ज्यूस काऊंटरवरची फळंच उचलून नेली. एकजण पावभाजी काऊंटरवरचे टोमॅटो-काकडीचे काप खात उभा होता. एकाने तर कहरच केला. आॅर्डर घेऊन जाणाऱ्या वेटरला अडवलं आणि त्याच्या ट्रे मधल्या तीन-चार मसाला पापडच्या डिश काढून घेतल्या. तिथंच खात उभा राहिला. मग इतरांना जरासं धैर्य आलं. मग कोल्ड्रींक्सचा फ्रीज उघडून बाटल्या काढून घेऊ लागले, एकानं चीज क्यूब्ज चा बाॅक्सच उचलला. हा सगळा प्रकार अर्धा तास सुरू होता. काऊंटरवरचा माणूस मला म्हणाला, “व्यवसाय करायचा असेल तर हे सगळं सहन करावं लागतंच. नाहीतर तोडफोड करतात, नुकसान करतात, आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात, मारहाण करतात. पंचवीस हजार मागत होते, दहा हजारात फायनल होतंय बहुतेक.”
– क्रमशः भाग पहिला
लेखक : डॉ. मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “डीजेवाले बाबू … मला अंध नका करू…” – लेखक : डॉ. गणेश भामरे / डॉ. सचिन कासलीवाल ☆ प्रस्तुती – डॉ. प्राप्ती गुणे ☆
कालच अनंत चतुर्दशी आनंदात पार पडली आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात विसर्जित केलं. ढोल ताशा आणि हा … आत्ता सध्या D J च्या ट्रेण्डिंग गजरात आपण नाचत, थिरकत गणपती बाप्पाला निरोप दिला !
दुसर्याच दिवशी मी नेहमीप्रमाणे ओपीडी मध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो. थोड्या वेळात एक विशीतला तरुण काल अचानक दिसायला कमी झालं म्हणून आला. प्राथमिक तपासणी करून बघितली तर त्याची नजर खूपच कमी झाली होती. मग डोळ्याचे pressure घेऊन त्याला नेत्रपटल तपासणीसाठी घेतले. बघतो तर काय त्याच्या नेत्रपटलावर खूप मोठे रक्त साखळले होते आणि नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा आढळल्या.
नेहमीप्रमाणे वाटणारा हा आजार नव्हता याची मला जाणीव झाली. मग फेर हिस्टरी तपासणीत त्याला विचारलं की काही मार लागला होता का? किंवा तू काही ग्रहण बघितले का? की कुठे वेल्डिंग बघितले? तर यातील काहीच पॉझिटिव्ह नव्हते . खोलवर विचार केल्यावर त्याने सांगितलं की काल मिरवणुकीत नाचलो आणि D J वर लेसर शो बघितला.
मग मनात पाल चुकचुकली आणि लेसर शोचा लेसर बर्न रेटिना वर असल्याची खात्री पटली. मग रेटिनाचा O C T स्कॅन करून माझं निदान कन्फर्म केलं. पुढील दोन तासात असेच जून दोन रुग्ण आलेत. त्यांना पण रेटिनावर याच प्रकारचे चित्र दिसले. मग मात्र मी आमच्या नेत्ररोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून दोन हॉस्पिटलला असेच रुग्ण आहेत असे निदर्शनात आले.
बापरे ! म्हणजे ५ च्यावर तरुण एकाच दिवशी DJ लेसर शोचे शिकार झालेले पाहिले. यातील बरेच जण अजून कदाचित रिपोर्ट झालेले नसतील किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे असतील. हा आकडा याहून जास्त प्रमाणात असावा .. नेत्रपटलावर आम्ही या प्रकारचे लेसर बर्न क्वचितच बघितले असावेत.
हा काहीतरी भलताच प्रकार समोर आला आणि जनजागृतीसाठी हा पत्रप्रपंच केला. मग प्रश्न पडला की, ठराविक लोकांनाच असे का झाले. याचा खोलवर अभ्यास केला आणि कळाले की या green लेसरचे frequency खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेसर च्या frequency च्या फोकल लेंग्थवर आलेत किंवा त्यांचे नेत्रपटल आले, त्यांनाच हे प्रकार घडले. आपण लहानपणी भिंग घेऊन ज्याप्रमाणे उन्हात कागद पेटवायचो तसाच प्रकार या लेसरने या तरुणाईवर केला होता.
असल्या लेसर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाहीतर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीत दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल. आपल्याकडच्या भाऊ ,दादा आणि राजकारणी चमकोगिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या DJ लेसरचा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल याची यत् किंचित कल्पना पण करवत नाही.
या सगळ्या तरुणांना आणि तरुणींना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या करियरसाठी किती भयावह असेल? यातील बरीच मंडळी उच्च शिक्षण घेणारी होती.
प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि वेळीच हा प्रकार थांबवावा. नाहीतर लातूरच्या अनंत चतुर्दशीच्या भूकंपाप्रमाणे अंधत्वाचा भूकंप आपली वाट बघत आपल्या तरुण पिढीचा घास घेईल.
लेखक :
डॉक्टर गणेश भामरे (रेटिना स्पेशालिस्ट )
डॉक्टर सचिन कासलीवाल (नेत्ररोग तज्ज्ञ )
जनहितार्थ : नाशिक नेत्ररोग तज्ञ संघटना )
संग्राहिका – डॉ. प्राप्ती गुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈