मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘यात काही राम नाही’…. म्हणजे काय ? ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

यात काही राम नाही…. म्हणजे काय ?

आपण सहज जेव्हा म्हणतो यात काही राम नाही… म्हणजे काय ?

राम याचा अर्थ काय ?

राम असणे म्हणजे आनंद…

राम म्हणजे देव, दशरथ नंदन ,कोदंडधारी,  सीतापती, कौसल्याचा पुत्र, असा इतकाच त्याचा अर्थ नाही.

राम म्हणजे परिपूर्णता ,सौख्य ,सुख, विश्राम …. राम म्हणजे  आंतरिक समाधान……

सेतू बांधताना खारीने रामरायांना मदत केली .त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला .म्हणून खारुताईच्या पाठीवर रामाची बोटं उमटली आहेत…

 चांगलं काम केलं की रामराया पाठीशी उभा राहतोच..

 खारीचा वाटा आपणही उचलूया. काय करूया तर…

… एक श्लोकी रामायण आहे ते पाठ करू या .

सहज सोपं जमणार आहे आणि त्याच्याशी निगडित कायमची आठवण राहणार आहे ती आपल्या राम मंदिराची.

तर हे काम जरूर करा ही नम्र विनंती.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रांगोळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ रांगोळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सकाळी लवकर ऊठून अंगणात सडा टाकायचा मग त्यावर छानशी रांगोळी काढायची असा दिवस सुरू व्हायचा•••

तेव्हा आजीला विचारले “ का गं आजी सडा रांगोळी करायची? “ तेव्हा आजीने सांगितले••••

“ या कृतीतच संसाराचे सार दडलेलं आहे गं•••

आश्चर्याने मी विचारले “ ते कसं?”

तशी आजी म्हटली, “ ते मी सांगते. पण तू मला सांग, सडा रांगोळीचे अंगण पाहिले तर तुला काय वाटते?”

मी म्हटलं “ काय वाटणार? छान वाटते. प्रसन्न वाटते. अजून काय?”

आजी म्हटली, “ बरं आता मी सांगते बरं का ! सकाळी उठून जेव्हा बाई आधी अंगण झाडते ना••• तेव्हा कालची मनातली घाण रुसवे फुगवे कुरबुरी यांचा कचरा ती बाहेर फेकून देते. नंतर जेव्हा पाण्याने ती सडा टाकते ना•••• तेव्हा आपल्याच मनावर ती समजुतीची, सामंजस्याची शिंपण करीत असते आणि सगळी नकारात्मकता ती दाबून टाकत असते. मग जेव्हा ती या दाबलेल्या मनावर अर्थात सडा टाकलेल्या अंगणावर रांगोळी काढते ना? तेव्हा सगळी सकारात्मकता त्यात येते. माझे अंगण चांगले दिसावे, माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला मी सूख द्यावे याकडे तिचे चित्त जाते.  मग कोणासाठी काय काय करायचे कसे करायचे याचे नियोजन ती रांगोळी काढताना करते. .. मग असे सकारात्मक उर्जेने भरलेलं मन तिला दिवसभर सळसळतं ठेवतं. तिच्याकडून घरातील सदस्यांना सुखावण्याचा आटोकाट प्रयत्न करतं.  पर्यायाने तिच्या बाजूने घरातील शांतता प्रसन्नता टिकवण्याचा प्रयत्न होत असतो…. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जेव्हा सुंदर रांगोळी पहाते तेव्हा ती पण प्रसन्न होते. जरी वाईट विचार मनात घेऊन आली असेल तरी त्याचाही काही अंशी निचरा होतो. पर्यायाने त्याचा या घराला मोठा फायदाच होतो.”  

अशा प्रकारचा सकारात्मकतेचा एक स्त्रोत सध्याच्या काळात आपणच बंद केला आहे. सध्या अंगणच नाही तर त्यापुढे रांगोळी तरी कशी येणार?

पण असा विचार करण्यापेक्षा दारात जेवढी रिकामी जागा असेल तेवढ्या जागेतच छोटीशीच रांगोळी काढूया.  सगळी नकारात्मकता घालवून जेवढी सकारात्मकता घेता येईल तेवढी घेऊया. दिवसाची सुरुवात चला निर्मळतेने करू या…

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शहाणपणाचं  वेडेपण… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

शहाणपणाचं  वेडेपण ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सायली भेटायला आली.

“नीता मावशी आईबद्दल तुझ्याशी जरा बोलायचं आहे…”

“अगं काय झालं मीनाला?”

“आई सध्या काहीतरी वेगळंच वागते आहे.”

“म्हणजे?”

” अचानकपणे तिच्या आत्ये बहिणीला भेटायला गेली .”

“पण मग त्यात काय झाल?”

“इतके दिवस ती  सहज अशी  कधीच गेली नाही. दारातली रांगोळी सकाळची कधी चुकली नाही …आता पेपर वाचत बसते मग  कधीतरी नऊला काढते …. पूर्वी खरेदीला मला घेऊन जायची. आता आपली आपण जाते… जे मनाला येईल ते घेऊन येते.. मध्ये चतुर्श्रुंगीला जाऊन आली …”

सायली एक एक सांगायला लागली….

“अशी का गं वागत असेल ?”

“तुम्हाला तिचा काही त्रास होतो आहे का ?तिची ती जाते तर जाऊ दे ना…”

“अग पण..असं कसं ..”

” घरात कशी असते?”

“अगदी नॉर्मल नेहमीसारखी..”

” बरं ती जाते तर तुमची काही अडचण होते का?”

“नाही काहीच नाही..”

“ मग झालं तर..”

“अग रविवारी अचानकच देहू आळंदीला गेली मैत्रिणींना घेऊन…….. म्हणाली जेवायचं काय ते तुम्ही तुमचं मॅनेज करा.. केलं आम्ही ते …..”

“अगं मग प्रॉब्लेम काय आहे?”

“अगं नीता मावशी हे सगळं अॅबनॉर्मलच  वाटतंय … मी आनंदशी बोलू का?  काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम तर नसेल ना …”

मी जरा स्तब्ध झाले..

म्हटलं “ तुला वाटत असेल तर तू जरूर बोल…”

“हो बोलतेच ..” .. असं म्हणून ती गेली.

मनात आलं…. 

… समाजाच्या घराच्या चौकटीत बाईने अगदी तसंच वागलं पाहिजे .. जरा कुठे वेगळं घडलं ..  मन इकडे तिकडे लावलं तर …कुठे बिघडलं ? ….पण नाही…लगेच ते खटकतं ..

मी मैत्रिणींना हे सांगितलं तर त्यांच्या प्रतिक्रिया ….

“मी पण माझ्या चुलत वहिनीला उद्या भेटायला जाते …खूप दिवस घोकते आहे…”

“मला कॅम्पात जरा एकटीने जाऊन यायचं आहे आता मी जातेच..”

“मला सारसबागेत गणपतीच्या सकाळच्या सातच्या आरतीला जायचं आहे उद्या जाऊन येते…

कितीतरी वर्ष मनात आहे पण असं उठून जावं हे काही कधी सुचलंच नाही बघ …”

एक मैत्रीण  म्हणाली..

 “नीता मला कॅफे कॉफी डे ची ती महागडी कॉफी एकदा प्यायचीच आहे. तुझ्या घराजवळच आहे . उद्या आपण जाऊया  ..कशी असते ती बघूया तरी…”

मैत्रिणी धडाधड सगळं मनातलं बोलायला लागल्या. 

सायलीचा फोन आला .

“आनंदशी बोलले. त्यांनी छान समजावून सांगितलं मला .” ती शांत झाली होती. वाटलं  तिला सांगावं …

“ अग त्यापेक्षा आईचं मन वाचलं असतंस तर…फार काही नसतात  ग बाईच्या अपेक्षा… साध्या साध्या गोष्टी तर आहेत ..करू दे की तिला .. इतके वर्ष तुमची सेवा केली, आता थोडं मनासारखं वागते आहे वागू दे की…” 

तुम्हाला एक  कानमंत्र देते..

वागावं थोडं मनासारखं …. निदान आता तरी …

ही अशीच वागते हे कळलं की ते आपोआप शहाणे होतील…

आता तुम्हाला अजून एक आतली गंमत सांगते बरं का …

मीनाने हे संकल्प मला सांगितले होते…

तिला म्हटलं, “अगं नवीन वर्षाची कशाला वाट बघतेस ? आत्ताच  सुरु कर की..” .

तिने मनासारख वागणं सुरू केलं आणि ही सगळी मज्जा सुरू झाली…..

मला काय म्हणायचं आहे ते आता तुम्हाला समजलच असेल..  फोड करून सांगत नाही… 

सख्यांनो  फार मोठी मागणी नसतेच हो आपल्या मनाची …  

वागा की थोडं मनासारखं…

मग कोणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तरीसुद्धा तुमचे दिवस आनंदाचे आणि सुखाचे जातील याची खात्री मी तुम्हाला देते….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परतीच्या वाटेवर… लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ परतीच्या वाटेवर… लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, वर्ष सरत आलेलं पाहून, परतीच्या वाटेवरच्या प्रवासातलं एक “स्टेशन “मागे पडलं ही भावना मनात  येतेच.

सत्तरी पर्यंतच्या प्रवासात, गंतव्य स्थान ठरवून केलेल्या प्रवासाच्या मिश्र आठवणी बरोबर असताना अटळ अशा गंतव्य स्थानाकडे परतीचा प्रवास सुरु झालाय.

यात कुठेही दुःख, खास करून नैराश्य याचा लवलेश ही नाही.

जन्माला आलेला प्रत्येक जण हे मनापासून स्वीकारतो.

तरीही परतीचा प्रवास कसा असावा याचे आडाखे बांधतोच.

वयपरत्वे कमी झालेली शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती ही इंधनं परतीच्या प्रवासातली गाडी थोडी धिमी करतात. हे हसत मान्य केलं तरी ही इंधनं शेवटपर्यंत संपू नयेत ही  प्रार्थना  मनोमन सतत बरोबरीने चालत असते.

परतीच्या प्रवासात आपली ही “कुडी “derail “(अपंगत्व ) होऊ नये ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते.

आपल्या मुलांची गाडी सुसाट धावत असते. कौतुक भरल्या अभिमानाने त्या कडे बघत असलो तरी तरी मनात चटकन येऊन जातंच की आपली गाडी त्यांनी “siding “ला टाकू नये.

त्यांचा वेग झेपणारा नाहीये तर आपल्या वेगाशी कुठे तरी जुळवून घेत मधे मधे अशी स्थानक दोघांनी निर्माण करावीत की तिथे ऊर्जा भरून घेता येईल अशी क्षणभर विश्रांती अनुभवता येईल.

या वाटेवरची विधिलिखित  स्टेशन्स तर टाळता येणार नाहीच आहेत. पण प्रवास सुखकर होण्यासाठी ची आगाऊ आरक्षणं तर करूच शकतो.जसे की….

साठी नंतर तब्बेतीविषयी  अधिक जागरूक राहून स्वतः ला fit ठेवणं गरजेचं आहे.

आर्थिक नियोजन चोख करावं…. छंद जोपासत आपला स्वतः चा समवयस्क  गोतावळा, मैत्रीचं कोंडाळ  असावं.

नवीन गोष्टींचं मनापासून स्वागत करावं. पुढच्या पिढी बरोबर कमीत कमी संघर्षाची वेळ यावी या साठी आपली आणि त्यांची मानसिकता प्रयत्न पूर्वक, जाणीव पूर्वक जोपासावी.

मुलांच्या संसाराच्या जबाबदाऱ्या अट्टाहासाने  आपल्यावर ओढवून  घेणं टाळावं.

“आपल्या ” “स्वतः साठी जगण्याच्या महत्वाच्या junction ला आलोय. … आनंदाने राहू या.

आगाऊ आरक्षणाची ही शिदोरी बरोबर घेतलीय, झालाच आत्ता परतीचा प्रवास “सुखकर”, 

असं तर म्हणणंच नाहीये.पण सह्य नक्कीच होऊ शकतो.

शेवटी हा प्रवास ज्याचा त्याचा, ज्याला वाटेल तसा करायचा असतो. शाश्वत आणि इच्छित ही स्टेशन्स बिन थांब्याची निघू शकतात. 

तरीही बा भ बोरकर यांच्या कवितेत सांगितल्याप्रमाणे … 

‘दिवस “जरेचे “आले “जरी “त्या काठ जरीचा ” लावू सुखे ‘ .. म्हणत परतीचा प्रवास आनंदाने, समाधानाने करण्याचा  मानस ठेवूच शकतो आपण…

लेखिका : सुश्री नीलिमा जोशी

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोमटण ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

कोमटण ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

कधी नव्हत ते भई आज रागावले होते. भई म्हणजे माझे आजोबा. आईचे वडील. त्यांचे बंधू त्यांना भई म्हणत मग ते सर्वांचेच भई होऊन गेलेले! भई तसे फारसे कधी रागावत नसत. ते शांत व धोरणी स्वभावासाठी नावाजलेले. घरी वा बाहेर ही ते सदा हसतमुख राहत असलेले. क्वचितच ते रागे भरत व त्यास तसे ठोस कारण असले तरच ते विचलित होत. घरात ते तसे सर्वात वडील. घरात नाही नाहीतरी पंचवीसच्यावर माणसं, एकत्र कुटुंब. लहानथोर सर्वांना सांभाळून घेत, घरातील आपापसातले मतभेद, रूसवेफुगवे यातून समंजसपणे मार्ग काढण्याची जबाबदारी त्यांचीच. कितीही संकटं येवो त्याला तोंड देण्याची तयारी सदैव. मागचा पुढचा विचार करण्याचे कसब तसे उपजतच. त्यामुळे घरीदारी त्यांना आदराचे स्थान. पण आजचा दिवस तसा वेगळाच. त्याचे कारण म्हणजे आजोबांचे रागे भरण्याचे कारण तिघांनाच माहित, त्यात मी, आजी व आजोबा. 

मी त्यावेळेस तिसरी चौथीत असेन. मे महिन्याची सुट्टी लागली की माझा मुक्काम आजोळीच हे ठरलेलेच.  तसा मी आजीचा लाडका होतो. सुट्टीतले दिवस तिच्याबरोबर मजेत जात. ती पहाटे उठत. गंगागोदावरी वर पहाटेच स्नानास जात. खंडेरावाच्या कुंडात स्नान आटोपले की काळारामाच्या काकड आरतीला हजेरी लावे व आम्ही बच्चेकंपनी उठण्याच्या आत परतत सुद्धा असे.  वर्षातून बऱ्याचदा ती पौर्णिमेपासून ते पौर्णिमेपर्यंत हेमंतातील कार्तिक स्नान, शिशिरातील हाडं गारठवणाऱ्या थंडीतही पौष स्नान, व माघ स्नान नेमाने करत. चैत्र, वैशाखातलं तसं पहाटेचं स्नान तेवढं सुसह्य असे. बाकीची स्नानं ती सोशिकपणे भक्तिभावाने करे. त्यामुळे तिच्याभोवती सात्विक वलय जाणवे. 

सुट्टीत दिवसभर गल्लीत हुंदडून झालं की रात्री दमूनभागून आजीच्या कुशीत झोपण्याचे सुख तिच्या इतर नातवंडांपेक्षा माझ्या वाटेला जास्त आलंय. खरंतर आजी गोष्ट सांगते व मुलं ऐकतात असं घडत असतं, पण आमच्या बाबतीत वेगळं होतं. शाळेत व गीतेच्या वर्गात ऐकलेल्या महाभारताच्या गोष्टी मीच रंगवून रंगवून आजीला सांगत असे निजताना व ती आपली माझी पाठ थोपटत असे. “ जयू गोष्ट छान सांगतो! ” हे तिच्याकडून ऐकायला गोड वाटत असे. असं होतं तिचं अन् माझं नातं. 

पूर्वी हातगाडीवर मीठ विकणारा गल्लीत येत असे. तसेच नारळाची करवंटी माप म्हणून माठात बुडवून दारोदारी दही विकणारा ही येत असे, आणिक “ सुयाऽऽ सागरगोटे” म्हणून मोठ्याने ओरडत कातकारी बाया ही येत. पाटा वरवंट्याला टोच्या मारून देणारे ही येत. तसेच  दारासमोरच लहानसा खड्डा करून त्यात कोळसे टाकत अंगार फुलवून त्यावर पितळी भांड्यांना कल्हई लावून देणारे ही येत. या सगळ्यांमधे आगळी वेगळी येत ती कोमटण. कोमटण हा आमच्यातला खासगी शब्द, बाकी सर्वजण तिला बोहारीण म्हणत. ती ठेंगणी ठुसकी, काहीशी जाडेली, काळी कुळकुळीत, डोक्यावर नवी कोरी भांड्यांची पाटी घेऊन येई. ती आंध्रातली( हल्लीचे तेलंगणा) कोमटी जमातीतली म्हणून कोमटीण वा आम्ही म्हणत असू तशी कोमटण होती. ती शक्यतो दुपार उलटून गेल्यावर येई. तोपर्यंत बायकांचे स्वयंपाक घरातील झाकपाक झालेलं असायचं. आली एकदाची की किमान अर्धापाऊण तासतरी थांबे.  आजीचं व तिचं विशेष सख्य होतं. ती दोन तीन महिन्यातून एकदा यायची, मग आजी जणू तिची वाटच पहात असल्यागत असायची. हे त्या कोमटिणीलाही ठाऊक असायचं. आजी ढीगभर कपडे अगोदर गाठोड्यातच बांधून ठेवायची. मग त्या बदल्यात हवी ती भांडी घ्यायची. आजोबांकडे भिक्षुकी होती. मुंबई व भारतातून कुठूनही श्राद्ध क्रियाकर्मासाठी माणसं यायची. ती कपडे देऊन जायची. आजी ते कपडे बाजूला ठेवत व त्यातून कोमटिणीशी व्यवहार करे.  आजीने निम्माशिम्मा संसार अशाच कोमटिणीकडून घेतलेल्या भांडीकुंडीने रचला होता. 

कोमटण उन्हातून आल्याने आजी अगोदर तिच्यासमोर पाण्याचा तांबा धरे. मग दोघी एकमेकींची, मुलाबाळांची ख्यालीखुशाली विचारपुस करत. एकमेकांच्या सुखदुःखांचीही देवाणघेवाण होत. प्रसंगी डोळ्याला पदर लावणं ही होई.  “भाकरतुकडा असेल तर दे गं माई.” असं कधीकधी ती हक्कानं आजीकडून मागून घेई. तिचं चूळ भरून झालं की सावकाश मग आजी विचारे, “ हं, काय आणलंस दाखव बघू?”  मग खरा अध्याय सुरू होत. ती कोमटीण कपड्यांचं गाठोडं उघडायचा आग्रह करे तर आजी भांडी पाहण्यात मश्गुल होत. दोन्हीत घासाघीस सुरू होई. हे नको, ते नको, माझ्याकडे आहेत सगळी. वेगळं काही दाखव. मग ती कोमटण पाटीच्या तळाला लपवून ठेवलेली ठेवणीतली भांडी काढे, मग आजीचा चेहेरा फुले. लहानमोठी पातेली, ताटवाट्या, चमचे, साणसी, तवे अगदी टिफीनही आजी निरखून निरखून पाही. पसंत असेल ते बाजूला ठेवे व मग गाठोडं उघडत असे. तसं त्या कोमटिणीच्या मागण्या सुरू होई, आणखी कपडे आण, हे तर जुनेपुराणे, फाटके आहेत. घालता येईल असे दाखव, मग आजी आणखी एक लहानसं गाठोडं आणे व दोघींचं समाधान होईपर्यंत बोलणी चाले. व्यवहार संपला की आजी चहा ठेवायला उभी होई. हक्काचा चहा घेऊनच कोमटण जात असे ते पुढच्या वेळेस नवी भांडीकुंडी घेऊन येण्याचे वचन देतच. 

मला तो दिवस अजूनही लख्ख आठवतो.  त्यादिवशी ती कोमटीण आपल्याबरोबर धाकट्या  बहिणीलाही घेऊन आली होती दुपारचीच.  त्यादिवशी भई गंगेवरची कामं आटोपून लवकर घरी आले होते. तसेच आजोबा आजी दुपारीच एका लग्नाला जाऊन आले होते. आल्यावर आजीने लुगडं बदललं, पण चोळी बदलायची राहून गेली घाईगडबडीत. दुपार नंतर कोमटण आल्यावर नेहेमीप्रमाणे नमस्कार, चमत्कार झाले, तसे त्या कोमटिणीची व तिच्या बहिणीची नजर आजीच्या चोळीवरच खिळली. ती चोळी तशी होती ही खासच. मखमली जांभळ्या रंगाची, त्यावर वेलबुट्टीची पांढरी कशिदाकारी व जरीचा काठ व सोनेरी अस्तर लावलेली. आजीनं भांडी पहायला सुरूवात केली पण दोघींचं मन सौद्यात रमेना. आजीच्या लक्षात आलं सगळं, तसं तिने गाठोडं उघडून कपडे दाखवायला सुरूवात केली. कोमटिणीनेही मग बोलायला सुरुवात केली. पण तिच्या बहिणीची नजर हटता हटेना. तिने सरळ सरळ त्या चोळीचीच मागणी केली. आजी म्हणाली, “अगं, मी ही दोनदाच तर घातलीय. शिवाय जर ही आहे त्यात, इतक्यात कशी देऊ? ” तर कोमटिणीच्या बहिणीने हट्टच धरला. नेहेमीच्या कोमटिणीने त्यांच्या भाषेत बहुधा तेलुगू असावी, सांगून पाहिलं, की “असं नेसलेलं वस्त्र मागू नये कधी.”  पण तिची बहीण बधली नाही. दुसऱ्याच क्षणी आजीनं ती चोळी उतरवून कोमटिणीच्या हातात ठेवली. ती कोमटीण पहातच राहिली. मीही. आजीनं त्यादिवशी एकही भांडं घेतलं नाही. कोमटिणीला व तिच्या बहिणीला चहा पाजून बोळवण केली. त्या दोघी गेल्यावर मी वेड्यासारखं आजीला विचारलं. “ए, आजी तू ती इतकी छान व महागडी चोळी देऊन का टाकली? ” तसं आजीनं मला जवळ घेत शहाण्या माणसासारखं सांगितलं, “हे बघ जयू, तिची बहीण नादान होती, पण तिची नजर सारखी माझ्या चोळीवरच होती, तिचा जीव त्यात गुंतला गेला होता एका क्षणात.  मी ते अगोदरच हेरलं. तिची नजर वाईट का चांगली हे मी नाही सांगू शकत, पण जर ती चोळी मी पुन्हा घातली असती तर ती मला साहली नसती. कुणाकडे असं एकटक पाहणं वाईटच, त्यातही त्यातून काही मागणं तर आणखी वाईट. असं घडलं तर देऊन टाकावं देण्यासारखं असेल तर, आपला मोह कमी होतो.” मी अवाक् होऊन आजीकडे पहातच राहिलो. तसं माझं वय लहानच होतं. हे सगळं कळण्या पलिकडचं. मी मात्र हे सगळं आजोबांना साग्रसंगीत सांगितलं तसं त्यांना कधी नव्हे तो राग आला. आजोबांनी आजीसाठी ते खास लुगडं घेतलं होतं महागाचं व त्यावरची चोळीही हौसेनं शिवून घे म्हणून सांगितलं होतं. सगळं घडून गेलं पण  आजोबा आजींना काहीच बोलले नाही. मात्र राग त्यांच्या हालचालीतूनच जाणवत होता. 

काय घडलं ते आजीच्या लक्षात आलं. आजोबांचा राग कसा घालवायचा हे आजीला ठाऊक होतं. गल्लीतल्या गोठ्यातूनच आलेल्या ताज्या खरवसात गूळ व केशर घालून वड्या केल्या भईंना आवडणाऱ्या, व माझ्याकरवीच भईंना देऊ केल्या. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तरुणाई… ☆ श्री श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

☆ तरुणाई… ☆ श्रीरंग खटावकर  ☆

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं, आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते. मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला.”

तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट! “दात दोनच असले, तरी कडक बुंदीचा लाडू खातो अजून.”

“खातोस की चघळतोस रे” ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.

“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले!”

असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील, मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही. फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.

“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो “

“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?

एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!

त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.

” अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना!त्यालाच सोडायला गेलो होतो”

“कुठे??”

अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ” त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!” “काही म्हणा, मन्या भाग्यवान हो!

लेक अमेरिकेतून येतो काय, हाटेलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला, तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”

बाकी सगळे खिन्नपणे हसले. मी म्हंटलं, “तात्या इतकं लाईटली घेताय?”

“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”

मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!

दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या, आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”

“पार्टी?”

“अरे, नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे, फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”

“बास एवढंच ना? दिलं!”

“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते, आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो, आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”

मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!

मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो, आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला  असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल?

असायलाच हवी !

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,

 

“कल खेल में, हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यही दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहा मरना यहा,

इसके सीवा जाना कहा !!”

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सावरकर आणि मी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सावरकर आणि मी…” ☆ श्री सुनील देशपांडे

६ जानेवारी १९२४: रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अंदमानातून सुटून मायदेशी परतले. त्यानंतर त्यांचे पुढील वास्तव्य बारा तेरा वर्षे रत्नागिरी येथे पण नजर कैदेत होते.

आज ६ जानेवारी रोजी सावरकरांच्या सुटकेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यापूर्वी मी लिहिलेला  सावरकरांचा समाज सुधारक हा पैलू , प्रामुख्याने मला आवडलेला व त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात त्यांनी सर्व समाजापुढे मांडलेला आहे. याबाबतचा माझा लेख आज पुन्हा आठवला आणि आपल्यासमोर मांडतो आहे.

सावरकर आणि मी  –

 

त्यांची माझी प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही. याची देही याचि डोळा त्यांना प्रत्यक्ष कधी पाहिलेही नाही. तरीसुद्धा त्यांची माझी पहिली भेट झाली ती मी एसएससीला म्हणजेच अकरावीला असताना १९६५-६६ मध्ये.

हो, ही भेट होती त्यांच्या एका निबंधातून झालेली. त्या निबंधाचे नाव होते ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हो तेच ते,  विनायक दामोदर सावरकर. अकरावीला असताना मराठीच्या पुस्तकात ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हा आम्हाला धडा होता.  माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो एक जीवनाचा धडा होता. आमच्या मराठीच्या आपटेबाईंनी हा धडा जरी आम्हाला शिकवला होता, तरी तो माझ्या डोक्यात बसला तो माझ्या आईने मला शिकवला तेव्हा ! तसं पहायला गेलं तर माझी आई आणि सावरकर यांच्यात वैचारिक साम्य फार नव्हतं.  त्या धड्यामध्ये सावरकरांनी परमेश्वराची जी संकल्पना मांडली आणि जी माझ्या डोक्यात रुजली ती वस्तुतः आमच्या आईला मान्य असण्याचं काही कारण नव्हतं. पण तरीही स्वतःची मतं लादण्यापेक्षा त्या धड्यामध्ये सांगितलेला विचार उत्तम प्रकाराने समजावून सांगणे ही हातोटी आमच्या आईमध्ये असल्याने, त्या निबंधाचे माझ्या मनामध्ये जे बीज पेरलं गेलं त्यातून माझ्या अनेक विचारांची जडणघडण होत गेली.

त्या निबंधाची मांडणी मला खूप आवडली. ज्या विषयाची आपल्याला मांडणी करायची आणि जी बाजू आपल्याला पटवून द्यायची आहे, त्याच्या विरोधी बाजू पूर्वार्धात पूर्णपणे पटवून द्यायची आणि उत्तरार्धात त्या सर्व पूर्वार्धातील मुद्द्यांचे खंडन करायचे. अशा पद्धतीचे त्या निबंधाचे लेखन माझ्यावर प्रभाव पाडून गेले.

ईश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करणे ही त्या वेळेला मला क्रांतिकारी कल्पना वाटली. कारण त्या वेळेपर्यंत ईश्वर आणि त्याचं अस्तित्व, हे लहानपणापासून झालेल्या संस्कारातून आपण गृहीतच धरलेलं असतं.  तसं मी ते गृहीतच धरलेलं होतं. सावरकरांनी माझं ते गृहित मुळापासूनच उखडून टाकलं प्रथमच.

सावरकरांच्या म्हणण्यानुसार मनुष्याचा देव म्हणजे,  देव प्रसन्न व्हावा म्हणून माणसे जी काही कर्मकांडं करतात, ती कर्मकांडं करण्यासाठी भाग पाडणारा देव. हा देव त्यांना सर्वथा अमान्य आहे. नवसाला पावणारा देव, भक्ताच्या हाकेला ओ देणारा देव, भक्ताच्या नैवेद्याने प्रसन्न होणारा देव, भक्ताच्या नामस्मरणाने.त्याच्या हाकेला धावून जाणारा देव, किंबहुना देव नावाचं कोणतंही अस्तित्वच त्यांना (आणि अर्थात मलाही) अमान्य आहे.  त्यामुळे ज्याला अस्तित्वच नाही अशा देवाला प्रसन्न करून घेण्याची कोणतीही कृती ही निरर्थक आहे या मतावर ते ठाम आहेत. देवाने मानवासाठी काहीही निर्माण केलेलं नाही आणि देव मानवासाठी काहीही करीत नाही. या विश्वामध्ये नैसर्गिक प्रक्रियेने जे काही निर्माण झालं आहे त्या निर्मितीचा उपयोग मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी, सुखासाठी आणि उपयोगासाठी करून घेत असतो. ही कृती करीत असताना तो स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करतो, विकास करतो आणि या निसर्गकृती मागील कार्यकारण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.  पुढील पिढ्यांसाठी संशोधनाचे विश्व अधिकाधिक विस्तारून ठेवतो.  या निसर्गाच्या अर्थात या संपूर्ण विश्वाच्या निर्मिती मागे काही कार्यकारण भाव असेल काही सूत्रबद्धता आणि नियमबद्धता असेल आणि त्या सर्वांना बांधून ठेवणारी शक्ती  असेल व त्या शक्तीलाच जर आपल्याला देव समजायचं असेल तर, त्या विश्वाच्या देवाचीच पूजा केली गेली पाहिजे. मनुष्याच्या देवाला पूर्णपणे नाकारलं पाहिजे. हा निसर्ग काही विशिष्ट नियमाने बद्ध आहे त्या नियमांची माहिती करून घेणे त्याचं सर्वतोपरी ज्ञान मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे त्यासाठी संशोधन कार्यात रममाण होणे हीच त्या विश्वाच्या देवाची पूजा असं ते मानतात. म्हणूनच त्यांनी कोणतेही पूजा पाठ आणि कर्मकांडांचं समर्थन केलं नाही. पुरस्कारही केला नाही. उलट त्याचा विरोध केला. निषेध केला. ज्या कृती मागे निश्चित कार्यकारण भाव नाही नैतिक विचार नाही आणि मानवतेच्या मूल्यांचा विचार नाही अशा सर्व गोष्टींना त्यांनी विरोध केला. मग त्या गोष्टी हिंदू धर्मात असोत वा दुसऱ्या कोणत्याही धर्मात असोत.  देवपूजेपासून देवतांचे स्तोम वाजवणाऱ्या मंदिरे, व्रतवैकल्ये, ज्योतिष शास्त्र, मुहूर्त, यात्रा, जत्रा, उत्सव या सर्वांना त्यांनी विरोध केला आहे. माणसा माणसांमध्ये भेदभाव करणाऱ्या चातुर्वर्ण्य, जातीयवाद अशा सर्व गोष्टींना कडाडून विरोध केला आहे. धर्मशास्त्राच्या आधारे समर्थन करत असलेल्या श्रृती आणि स्मृतींना त्यांनी नाकारलं आहे. त्यासाठी त्यांचे इतर बरेच साहित्य वाचले पाहिजे. किमान त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचले पाहिजेत. त्यांचे क्ष किरणे नावाचे त्यांच्या निवडक लेखांचे निघालेले पुस्तक ते तरी वाचले पाहिजे. खरं म्हणजे या निबंधानंतर एसएससी नंतरच्या सुट्टीमध्ये मी झपाटल्यासारखा समग्र सावरकर वाङ्मय वाचत होतो. माझ्या आठवणी प्रमाणे त्यावेळी पाच-सहा खंड होते. ते मी वाचून काढले आणि त्यांच्यासारखाच मी निरीश्वरवादी झालो.  सावरकर व आगरकर या दोघांनी हिंदू धर्म हा भटाभिक्षुकांचा धर्म नाही हे पोट तिडकीने ठामपणाने व ओरडून ओरडून सांगितले. हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे. त्याला रूढी आणि कर्मकांडांच्या बंधनात जखडून त्याचा मूळ जीव घोटण्याचा प्रयत्न करून त्या जीवनशैलीचा धर्म बनवला गेला. तिथेच आपल्या संस्कृतीच्या, जीवनशैलीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. सावरकरांचा हिंदू धर्म म्हणजे तथाकथित धर्म मार्तंडांच्या पाशात जखडलेला हिंदू धर्म नव्हता असे माझे मत झाले आहे. सावरकरांचे हिंदुत्व हे तथाकथित पारंपरिक सनातनी हिंदुत्ववादी लोकांच्या हिंदुत्वापेक्षा अत्यंत वेगळं होतं आणि ते तथाकथितांना पटण्यासारखं आणि पचण्यासारखं नव्हतं आणि नाही.  अर्थात या सर्वांचा विचार मांडण्यासाठी अजून एका लेखाचे प्रयोजन करावे लागेल असे मला वाटते. पण एकंदर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्यानंतर मला सुचलेल्या कवितेच्या ओळी पुढे देत आहे.

भावी काळ कसा असेल अपुला ठाऊक ना मानवा.

केंव्हा देव जगी करेल प्रलया माहीत नाही कुणा.

भूकंपातुन जीव आणिक किती जातील पृथ्वी तळी.

आगी आणिक वादळामधुनही जीवीतहानी किती.

देवा प्रार्थियले आम्ही जरि किती याहून नाही गती.

विश्वा वाचविण्या समर्थ जगती वैज्ञानिकाची मती.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशी ही म्हातारपणाची तऱ्हा..!! – लेखक : कृष्णकेशव ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

अशी ही म्हातारपणाची तऱ्हा..!! – लेखक : कृष्णकेशव ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

परवा व्हाट्सअपवर म्हातारपणावर एक सुंदर कविता आली होती आणि त्यात दोन अगदी छान ओळी होत्या..!

🌹  तुम्हीच सांगा छंद

     जोपासायला वयाचा संबंध असतो का ?…

     रिकामटेकडं घरात बंद

     माणूस आनंदी राहतो का ?” 🌹

छंद जोपासायला वयाचा संबंध असतो की नाही हे मला माहित नाही पण माझे काहीं म्हातारे मित्र आणि त्यांचे अफलातून छंद बघितल्यावर ‘रिकामटेकडेपणा बरा पण छंद आवर’ असं काहीसं मला  हल्ली वाटायला लागलंय..

आता  हेच बघा ना..!      

आमच्या सोसायटीत पहिल्या मजल्यावर राहणारे कुंभकोणी काका..!

नेमकं मुलांच्या प्ले एरिया समोरचं त्यांचा फ्लॅट आणि मुलं सकाळ संध्याकाळ खेळायला आली की कुंभकोणी काका न चुकता गॅलरीत हजर..! किंबहुना गॅलरीत बसून मुलांवर डाफरत राहणे हा त्यांचा आवडता छंद..!!

“अरे किती आरडाओरडा करताय..खाली येऊन एकेकाला फटके दिले आणि बॉल ‘जप्त’ केला म्हणजे तुम्हाला समजेल..!”   

दिवसातून एकदा तरी हा डायलॉग सगळ्या सोसायटीला ऐकू येतोच.‌.

फिरायला जाणं अथवा सिनीयर कट्ट्यावर गप्पा मारत बसणं असल्या ‘टाईमपास’ गोष्टीत त्यांना इंटरेस्ट नव्हता..आयुष्य सगळं महापालिकेत ‘वसुली अधिकारी’ म्हणून गेल्यामुळे ‘जप्ती’ हा त्यांचा आवडता विषय..!

आणि चुकून एकदा कधीतरी बॉल त्यांच्या गॅलरीत येऊन पडला की कुंभकोणी काका तो बॉल घेऊन खाली जाईपर्यंत सगळी मुलं तेथून गायब झालेली असायची..!

पण कोणी बॉल मारलाय हे काकांच्या बरोबर लक्षात असायचं आणि मग त्याच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडीलांबरोबर कुंभकर्णी काकांची ‘ट्वेन्टी ट्वेन्टी’ सुरू व्हायची ती लवकर संपायची नाही..!

नाहीतरी कुंभकोणी काकांना सोसायटीची सगळी नियमावली तोंडपाठ असल्यामुळं त्यांच्याशी वाद घालणं अवघडचं..!

आणि मग तो बॉल ‘जप्त’  झालेला असायचा हे इथं सांगायला नकोच..!

(असे आत्तापर्यंत जप्त झालेले पंधरा वीस बॉल तरी कुंभकोणी काकांच्याकडे असतील.)

यंदा काहीं मोठ्या मुलांनी शेवटी चिडून त्यांचा दाराबाहेर ठेवलेला लाकडी शू-रॅक मध्यरात्री होळीत टाकायचं ठरवलं होतं..पण कुंभकोणी काकूंनी चार बॉल गुपचूप परत केल्यामुळें तो प्लॅन मुलांनी कॅन्सल केला..!!

धुमाळसाहेबांची मात्र वेगळीच तऱ्हा..! 

तहसीलदार या पदावरून ते निवृत्त झालेले.. त्यामुळे वरुन आणि (टेबल)खालून भरपूर कमावलेलं..त्यांनी तीन चार बॅंकेत एफ डी आणि सेव्हींग खाती उघडून ठेवली आहेत..

आणि रोज एका बॅंकेत जाऊन सेव्हींग खात्यात हजार दोन हजार भरणे किंवा काढणे हा त्यांचा आवडता छंद..!

एकदा मी त्यांना विचारलं..”कशाला रोज बॅंकेत जाता..एटीएम कार्डनं पैसे काढत जा..जाण्यायेण्याच्या त्रासपण होणार नाही.. आणि हल्ली ‘होम बॅंकींग’ची पण सोय आहे..!”

ते हसून म्हणाले ” अहो त्यात कसला आला त्रास.!

उलट तेवढाच माझा तास दोन तास छान वेळ जातो..!

एकदा कौंटरवर टोकन घेतलं की अर्धा पाऊण तास तिथं एसीमध्ये कोचवर बसून आराम करता येतो..काहीं बँकेत वाचायला पेपर पण ठेवलेला असतो.! 

आणि माझी मोठी डिपॉजीटस असल्यामुळे कधी कधी चहा पण मिळतो..! इथं घरी मुलगा व्यायाम करा, हे करा ते करा म्हणून सारखं मागे लागत असतो.!” (धुमाळ साहेबांनी जास्तीत जास्त वेळ बॅंकेत घालवता यावा म्हणून बॅंकासुद्धा जास्त गर्दी असलेल्या ‘सिलेक्ट’ केल्यायतं.!)

आता मला सांगा बॅंकांमधून कितीही एडव्हान्स टेक्नाॅलॉजी आली आणि  सर्व्हिस इंम्प्रुव्हमेंट झाली तरी धुमाळांच्या या ‘लॉजीक’पुढे तिचा काय उपयोग होणार..!

शेजारच्या वींगमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शेंडेकाकांची तर वेगळीच गोष्ट..! 

आईवडीलांना वरच्या फ्लोअरवर जायला यायला त्रास नको म्हणून मुलानं कौतुकानं ग्राऊंड फ्लोअरला फ्लॅट घेतलेला..! पण शेंडेकाकांना रोज सकाळी  कोवळ्या उन्हात बसून पेपर वाचण्याची (गावाकडची) सवय..! आणि  खाली ऊन येत नाही म्हणून शेंडेकाका रोज सकाळी पाच पन्नास 

पायऱ्या चढून टेरेसवर जाऊन पेपर वाचत बसतात..! (तेवढाच पायांना व्यायाम होतो हे त्यांच अ‍ॅडिशनल लॉजिक.!) 

आता ह्याला काय म्हणणार ..? 

आणि शेवटी जे व्हायचं ते झालंच.. मागच्या आठवड्यात खाली उतरताना एक पायरी चुकली आणि पंधरा दिवसासाठी शेंडेकाकांना प्लॅस्टर घालून घरात बसावं लागल..! 

माझा एक मित्र आहे.. बॅंकेतून रिटायर झाल्यापासून त्यानं वेळ घालवण्यासाठी एक छंद लावून घेतलाय..

रोज सकाळी उठलं की वॉटस्अपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मयतीचे शोकसंदेश देण्याचा.. आणि तेही कवितेत..!! 

(कवि होण्याचं त्याच स्वप्न  राहून गेल होतं.) 

आणि तेवढ्यासाठी मित्रांचे, नातेवाईकांचे.. त्यांच्या भाऊबंदाचे असे आठ दहा गृप जॉईन केलेत.!  

आणि मग एखाद्या गृपवर कुणाच्या वाढदिवसाचा मेसेज दिसला रे दिसला की  शुभसंदेश आणि  याची कविता तयार..! 

“तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळणारा झरा.. 

सळसळणारा शीतल वारा.. 

पिवळ्या उन्हातील

रिमझिमणाऱ्या श्रावणधारा..

तुला  खूप खूप शुभेच्छा..!” 

प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्याच्या काव्य प्रतिभेला असा नवीन नवीन बहर येत असतो.! 

आणि अगदीच कुणाचा वाढदिवस नसेल तर हा अमिताभ बच्चन ‘माधुरी दिक्षित मोदीजी अशा  सेलिब्रिटींचे वाढदिवस आपल्या मोबाईलवर उत्स्फूर्तपणे साजरा करत असतो..!! 

संध्याकाळी सोसायटी च्या सिनियर सिटिझन कट्ट्यावर येणाऱ्या आबा पवारांचा किरकिर आणि कुरकुर हा स्थायीभाव..! 

बायको असताना “आज भाजीच तिखट झाली.. चटणीचा भुगा झालाय, चहात साखर जास्त पडलीय” अशी सतत किरकिर करून सगळा संसार करपवलेला..! 

आणि आता कट्ट्यावर बसलं की  सुनेच्या तक्रारीचा पाढा वाचायला लागायचं.. (सूनेसमोर बोलण्याची काय बिशाद..?)   

“बर्वेकाका.. आजकालच्या सुनांना घरातल्या वडीलधाऱ्यांबद्दल अजिबात प्रेम आणि आपुलकी वाटत नाही.. तुला सांगतो आजपर्यंत एकही दिवस माझ्या सूनबाईनं मला समोर उभं राहून जेवायला वाढलं नाही.. डायनींग टेबलवर ताट वाढून ठेवलेलं असतं आणि ती कायम  बेडरूममध्ये बसून वॉटस्अपवर मेसेज बघत बसलेली असते..! सासऱ्याची अजिबात किंमत नाही..! “

“अरे तुझी सून निदान ताट वाढून तरी ठेवते.. इथं मला रोज सुनबाईचा जेवणाचा डबा डबेवाल्याकडे भरून द्यावा लागतो..! पण मी तुझ्यासारखं कुंथत नाही. 

मुलगा सून दोघही नोकरी करतात.. दिवसभर कष्ट करतात त्यामुळं हातपाय धड आहेत तोपर्यंत आणि आपल्याला जमेल तशी त्यांना मदत करायची..! आपलं ओझं होऊ द्यायचं नाही..म्हणून मी प्रेमानं ते करतो..! 

आणि हो.. तुझ्या सूनेची तरी काय चूक आहे..? ती समोर असली की तू तिच्या स्वयंपाकातलं अधिक उणं काढणार.. त्यापेक्षा समोर नसलेलं बरं..!” 

काकांनी आबा पवारांच्या वर्मावरच बोट ठेवलं.. 

बर्वेकाका म्हणजे तसे आनंदमुर्ती..! म्हातारपण कसं आनंदात जगावं वागावं याच प्रात्यक्षिकच..! 

पंचाहत्तरी ओलांडली तरी रोज सकाळी वॉकींग योगा.. त्यामुळं तब्बेत ठणठणीत..! घरची भाजी आणायला निघाले तरी सगळ्या शेजाऱ्यांना विचारत जायचे..”  बाजारात चाललोय.. कुणाला काहीं आणायचय कां..? येताना घेऊन येतो..” 

मागच्या महिन्यात त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं.. गृपवर त्यांनी मेसेज टाकला होता.. “मला नवीन गुडघे आले आहेत.. सगळे न विसरता बघायला आणि त्यानिमित्तानं चहाला या..!” 

तर अशी ही नाना  तऱ्हेची म्हातारी माणसं आणि त्यांच्या या अशा नाना तऱ्हा..!

पण त्यांचे हे असे तऱ्हेवाईकपणाचे  कंगोरे आपल्या नेहमीच्या सरळसोट आणि बोथट आयुष्यात एक सुखद टोचणी देत असतात आणि रोजच्या  जगण्यात नवनवीन रंग भरत असतात एवढं मात्र नक्की..!!

लेखक : कृष्णकेशव

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जिजाऊं’च्या लेकींसाठी… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ जिजाऊं’च्या लेकींसाठी… ☆ श्री संदीप काळे ☆

सकाळी, सकाळी रमेश चित्ते आणि दिलीप माहुरे दाजी यांचा फोन आला  म्हणाले, “दाजी एक वाईट बातमी आहे, अविनाश कदम यांची आई गेली.’’ मला एकदम धस्स झाले. “मी परवा येतो” असे सांगून फोन ठेवला. अविनाश कदम पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते. गेल्या बावीस वर्षांपासून त्यांचे आणि माझे नातेसंबध.

मी अविनाशला भेटायला ठरल्याप्रमाणे नांदेडला गेलो. चित्ते, माहुरे दाजी माझ्यासोबत होते. नांदेडमध्ये हनुमानगडजवळ जानकीनगर येथे अविनाश यांच्या घरी आम्ही पोहचलो. घरात अविनाश यांच्या आई कमलबाई यांच्या फोटोला मोठा हार घातला होता. काकूंचा फोटो पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. 

घरात अविनाशचे वडील नामदेव कदम गुरुजी, काका होते. आम्ही घरात बसलो. काकू कशा गेल्या हे काकांनी सांगितले. बोलता-बोलता काका म्हणाले, “अविनाशला त्याच्या आईपेक्षा प्रिय जिजाऊ स्मृती सृष्टी होती. त्याची आई कित्येक महिने दवाखान्यात पडून होती, त्याने आईची सेवा केली नाही.’’

काकांच्या बोलण्यातून सतत जिजाऊ सृष्टी, जिजाऊ सृष्टी, असे सारखे माझ्या ऐकण्यात येते होते. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न पाहून माहुरे दाजी म्हणाले, “गेल्या २० वर्षांपासून याच भागात असलेला ‘राजमाता जिजाऊ सृष्टी’ असा मोठा प्रकल्प शासन, प्रशासन, लोकसहभाग यांच्या मदतीने अविनाश उभे करीत आहेत. या ‘जिजाऊ सृष्टी’ने नांदेडच्या वैभवामध्ये मोठी भर घातली. जसा नांदेडमध्ये गुरुद्वारा सर्वांना प्रिय आहे, तसे या जिजाऊ सृष्टीचे सर्वांना आकर्षण झाले आहे.” माहुरे, चित्ते आणि कदम काका तिघेही ‘जिजाऊ सृष्टी’ बाबत भरभरून बोलत होते. 

मी काकांना म्हणालो, “अविनाश जिजाऊ सृष्टीकडेच गेलेत का?’’ काका म्हणाले, `हो’. आम्ही उठलो आणि `जिजाऊ सृष्टी’च्या दिशेने चालायला लागलो. 

अविनाश यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर भव्य `जिजाऊ सृष्टी’ साकारली होती. बाहेरून वाटत होते आपण एखाद्या किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय. आम्ही आतमध्ये गेलो, दूर नजर टाकली तर अविनाश तिथल्या झाडांना पाणी टाकत होते. काकांनी अविनाशला आवाज दिला. अविनाशचे लक्ष आमच्याकडे गेले. हातातला पाईप बाजूला फेकत अविनाश आमच्याकडे आले. 

माझ्याजवळ येताच अविनाशने मला मिठी मारली. आमच्याकडे पाहून काकांच्या डोळ्यात पाणी आले. आई गेल्याचे दु:ख आणि खूप वर्षांची भेट अशी दोन्ही कारणे त्या मिठीमागे होती.

आईविषयी बोलावे का जिजाऊ सृष्टीविषयी बोलावे, अशी गडबड अविनाशच्या मनामध्ये सुरू होती. अविनाशने माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली ती `जिजाऊ सृष्टी’पासूनच. जिजाऊ सृष्टी, ती उभी करण्याची भूमिका, त्यातून मोठे काय होणार आहे. आईने सर्वांचा घेतलेला निरोप हे सर्व काही अविनाश सांगत होते.

पुरोगामी चळवळीमध्ये काम केलेल्या माणसांचे काम आकाशाला गवसणी घातल्यासारखे असते. अविनाशचेही तसेच होते. वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये काम केल्याचे अंग असलेल्या अविनाशने त्यांच्या `राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान’च्या माध्यमातून `जिजाऊ सृष्टी’चे स्वप्न साकारण्यासाठी पुढाकार घेतला. २० वर्षांच्या मेहनतीने अविनाशने `जिजाऊ सृष्टी’ अंतिम टप्प्याकडे नेण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. 

अविनाशचे वडील नामदेवराव एक आदर्श शिक्षक म्हणून सर्वपरिचित. जे काय उभे करायचे, ते पुढे चिरंतर टिकले पाहिजे, हीच शिकवण अविनाशला वडिलांकडून मिळाली. त्या शिकवणीतून उभी राहिलेली वास्तू `जिजाऊ सृष्टी’च्या रूपाने समोर दिसत होती. 

जिजाऊंच्या जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापर्यंत सारा इतिहास इथे चित्राच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आला होता. या चित्राचे स्केच काढले होते चित्रकार दिलीप कदम यांनी. चित्र बनवली शिल्पकार व्यंकट पाटील यांनी. प्रत्येक चित्राच्या खाली जे ऐतिहासिक प्रसंग लिहिले होते ते श्रीमंत कोकाटे यांनी. `जिजाऊ सृष्टी’बद्दल काय सांगू आणि काय नाही, असे अविनाशला झाले होते.

अविनाशने माझा हात पकडला आणि सारी ‘जिजाऊ सृष्टी’ तो मला दाखवत होता. ती ‘जिजाऊ सृष्टी’ मला अशी सांगत होती जणू तिथल्या प्रत्येक वीट आणि वस्तूला अविनाशचा स्पर्श झाला आहे.

जिजाऊ चरित्राचा अभ्यासक असणाऱ्या अविनाशला जिजाऊ यांच्याप्रमाणे अनेक स्त्रिया, मुली घडल्या तर चिरंतर टिकणारे समाज परिवर्तन घडेल हे माहिती होते. त्यातूनच `जिजाऊ सृष्टी’ची निर्मिती समोर आली. प्रत्येक मुलगी, महिला जिजाऊ बनू शकते, या भावनेतून या सृष्टीची निर्मिती झाली. जिजाऊंची शौर्यगाथा, जिजाऊंनी घडवलेले शिवाजी महाराज, जिजाऊंची रणनीती, सामाजिकता, मूल्यधारणा, हे सर्व काही चित्रांच्या, देखाव्यांच्या  माध्यमातून दाखवण्यात आले होते.

महिला, मुली ज्यांना कुणाला राजमाता जिजाऊंच्या सच्च्या पाईक बनायचे आहे त्यांनी ‘जिजाऊ सृष्टी’त जाऊन तिथला अंगावर काटे आणणारा इतिहास एकदा डोळ्यांखालून घाला, तिथे असणाऱ्या जिजाऊंच्या पायावर डोके ठेवा, म्हणजे त्यांच्या मोठेपणाचे कण तुमच्या मेंदूला चिकटतील. अशी खासियत त्या ‘जिजाऊ सृष्टी’ची होती, हे मी अनुभवत होतो.   

एका मोठ्या हॉलकडे आमचे लक्ष वेधत काका म्हणाले, ही मुलींची अभ्यासिका आहे. या ‘जिजाऊ सृष्टी’चे सगळ्यात वैशिष्ट्य काय असेल तर ही मुलींची अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेसाठी माझा खूप आग्रह होता. या अभ्यासिकेमध्ये दीडशे मुली एकावेळी अभ्यास, जिजाऊ चरित्राचे पारायण करणार आहेत. जिजाऊ, सावित्री, रमाई असा सर्वांची आई म्हणून भूमिका बजावणाऱ्या मातांचे आत्मचरित्र, त्यांची माहिती देणारी, स्पर्धा परीक्षेची पुस्तके येथे असतील. किमान पंधरा हजार पुस्तकांचा ‘गोतावळा’ इथे असणार आहे.

अविनाश कदम ( ७९७२३७८०८४) म्हणाले, मी जे जे विषय या जिजाऊ सृष्टीच्या अनुषंगाने हेरले होते, ते ते विषय मला प्रत्यक्षात आणायचे होते. ते सर्व विषय मी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सर यांना सातत्याने सांगत गेलो. चव्हाण सर यांनी जिजाऊ सृष्टीसाठी माझ्याइतकीच जीव ओतून मला मदत केली. शासन, प्रशासन, नांदेड मनपा आणि लोकसहभाग या सगळ्यांच्या माध्यमातून या ‘जिजाऊ सृष्टी’ला हातभार लागला. काम पूर्णत्वास नेण्यासाठी आजही मदतीची गरज आहे. केवळ दिखावा नाही तर या जिजाऊ सृष्टीच्या माध्यमातून खूप काळ टिकणारी संस्कृती उभी राहावी. अनेक महिला, मुली येथे घडाव्यात हा उद्देश आहे, असे अविनाश मला सांगत होते.

`जिजाऊ सृष्टी’मधल्या एका झाडाखाली आम्ही जाऊन सगळेजण बसलो. मी हळूच आईचा विषय काढला, अविनाश कमालीचे हळवे, डोळे पुसत मला सांगत होते. माझी आई तिकडे दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिचा आजार हाताच्या बाहेर गेलाय आणि ती आज ना उद्या सोडून मला जाणार आहे, याची कल्पना मला होती. तिच्या आजारपणाच्या काळामध्ये मी तिच्याजवळ थांबणे अपेक्षित होते, पण त्याच वेळेला `जिजाऊ सृष्टी’चे काम अधिक गती घेत होते. `जिजाऊ सृष्टी’ उभी करताना काय पाहिजे. त्याचे स्वरूप काय असले पाहिजे. ते जोपर्यंत आपण समोर उभे राहून करून घेत नाही तोपर्यंत ते निर्माण होऊ शकत नाही. हे माझ्या अनेक वर्षांच्या कामातून लक्षात आले होते. त्यामुळे आजारपणात मला आईला अजिबात वेळ देत आला नाही. एक जिजाऊ मला तिकडे सोडून जात होती आणि दुसरी जिजाऊ इकडे `जिजाऊ सृष्टी’च्या माध्यमातून निर्माण होत होती. 

आजारपणाच्या काळामध्ये आईने मी भेटावे, जवळ राहावे असा ध्यास घेतला. माझा ध्यास मात्र जिजाऊ सृष्टी होती. आई आणि `जिजाऊ सृष्टी’ हे दोन टोक होते. इकडे `जिजाऊ सृष्टी’ उभी राहिली. तिकडे आई जात राहिली. 

आई जाण्यागोदर दोन दिवस अगोदर मी आईला भेटायला गेलो. मी परत निघताना आईने माझा हात तिच्या हातामध्ये घेतला. माझ्या डोळ्यात डोळे टाकून ती म्हणाली, अविनाश सगळ्यांचे चांगले होईल असे बघ. स्वतःची काळजी घे. तुझी `जिजाऊ सृष्टी’ पाहायला मी खाली नसले तरी ती जिजाऊ सृष्टी मी वरतून नक्की पाहीन. तिच्या डोळ्यांतले पाणी खाली पडायच्या अगोदरच तिने ते पाणी पुसले. तिला वाटले असेल ती रडली तर मी कमकुवत होईन. मी `जिजाऊ सृष्टी’चे काम सोडून तिच्याकडेच बसेन.

मी आईपासून निघालो आणि तिसऱ्या दिवशीच आई गेली. भावुक झालेल्या अविनाशची माहुरे आणि चित्ते दाजी समज काढत होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. आम्ही अश्रूंभरले डोळे पुसून पुन्हा डोळे उघडल्यावर समोर `जिजाऊ सृष्टी’ होती. आम्ही जिजाऊ सृष्टीमध्ये अजून एक चक्कर मारली. 

रडून मोकळे झालेले अविनाश काळजीच्या मुद्रेमध्ये गेले होते. अविनाश म्हणाले, आतापर्यंत दोन कोटी रुपयांच्यावर यासाठी खर्च झालाय. पदरमोड, शासन, राजकीय मंडळी, नांदेड मनपा, अनेक दाते यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले. ते काम अजून पुढे जाण्यासाठी किमान एक कोटी रुपयांची गरज आहे. हे एक कोटी रुपये गोळा कसे करायचे, हा माझ्यासमोर प्रश्न आहे.

मी अविनाशच्या खांद्यावर हात टाकत म्हणालो, “सुरुवात करत असताना तुमच्याकडे दोन रुपये नव्हते. झाले ना दोन कोटी रुपये जमा. हेही एक कोटी जमा होतील. नका काळजी करू, धडपड सुरू ठेवा. तुमच्या धडपडीतून पुढचे चारशे वर्षे हेवा वाटावा, असा इतिहास निर्माण होणार आहे.”

`जिजाऊ सृष्टी’त काढलेले प्रत्येक चित्र पाहिल्यावर, त्या चित्राच्या खाली लिहिलेला प्रत्येक संदेश वाचल्यावर अंगावर काटा उभा राहत होता. असे वाटत होते की किमान अजून पाच-सहा तास तिथेच बसून राहावे.

खूप मोठे काहीतरी निर्माण केले, याचा अभिमान जसा अविनाश यांच्या रोमारोमात होता तसा तिथली कलाकृती पाहताना आपण काहीतरी वेगळे अनुभवतोय याची जाणीव पावलोपावली होत होती.

अविनाश, नामदेव गुरुजी, काका यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. चळवळीत राहून आपण वेगळे काहीतरी केले पाहिजे आणि त्या वेगळेपणाला चिरंतर टिकणारी झालर लागली पाहिजे. असे काम प्रत्यक्षामध्ये साकार करणारा अविनाश माझ्यासमोर एक उत्तम उदाहरण होते. आपण काहीतरी शिकलो आणि त्यामधून पुढच्या पिढीसमोर एक वेगळा आदर्श आपण ठेवून जाणार आहोत. हे सारे काही अविनाश यांच्या कामांमधून पुढे आले होते. हल्ली आपल्याकडे पुतळे आणि स्मारक उभारण्याची स्पर्धा लागलेली आहे, पण त्या पुतळ्याने स्मारकाच्या माध्यमातून चिरंतर टिकणारे काहीतरी उभारणार आहोत, याचे उदाहरण फक्त नांदेडच्या अविनाश यांच्यासारखे एखादे सापडू शकते. बरोबर ना…!

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “२०२४ मध्ये…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “२०२४ मध्ये…” ☆ श्री मंगेश मधुकर

अजून एक वर्ष संपलं .. .. 

सरत्या वर्षाला निरोप देताना,

नवीन वर्षातसुद्धा आजूबाजूला, 

भावनांवर ताबा नसणारे,

कशानंही ‘ईगो’ दुखावणारे,

रागावर कंट्रोल नसणारे,

कायम अस्वस्थ असणारे,  

विचार न करता वागणारे,

जाईल तिथं स्वार्थ पाहणारे,

मुखवटे घालून बोलणारे,

नात्यांपेक्षा व्यवहाराला महत्व देणारे, 

स्वतःच्या आगाऊपणाचं कौतुक वाटणारे,

नेहमीच दुसऱ्यांच्या चुका दाखवणारे,

ईएमआय, इंटरनेट, इमोशन्स यात गुरफटून 

वर्षातले ३६५ दिवस टेंशनसोबत जगणारे,

सुशिक्षित असूनही अडाण्यासारखं वागणारे,

पैशाचा माज दाखवणारे,

फालतू गोष्टीवर वारेमाप खर्च करणारे,

सेलिब्रेशनसाठी निमित्त शोधणारे,

उथळ गोष्टीत आनंद मानणारे,

सार्वजनिक ठिकाणी मूर्खासारखं वागणारे,

निर्लज्जपणे वाहतुकीचे नियम तोडणारे,

गर्दीत बेफाम गाडी चालवणारे,

फोनवर बोलत ड्रायव्हिंग करणारे, 

स्वतःबरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणारे,

कुठंही वेडयावाकड्या गाड्या पार्क करणारे,

रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानं थाटणारे,

अशा दुकानातून खरेदी करणारे,

रस्त्यावर कचरा टाकणारे,

कुठंही पचकन थुंकणारे, 

अन्न फेकून देणारे,

डॉक्टर असूनही व्यापाऱ्यासारखं वागणारे,

दुकानासारखं हॉस्पिटल चालवणारे, 

वाढदिवस सार्वजनिक साजरा करणारे,

जागोजागी फ्लेक्स लावून स्वतःची टिमकी वाजवणारे,

फुटकळ कामाचे वारेमाप प्रदर्शन करणारे,

शोभत नसताना विचित्र फॅशन करणारे,

सोयीनुसार रूढी-परंपरा पाळणारे,

‘आमच्यावेळी असं नव्हतं’ हे सतत ऐकवणारे,

वेळ कसा घालवावा या विवंचनेत असणारे,

वय वाढलं तरी हेका न सोडणारे,

माणसांपेक्षा मोबाईलला जवळचा मानणारे, 

सतत फोनवर बोलणारे,

हेडफोडवर गाणी ऐकत चालणारे,

सोशल मीडियाला भुलणारे,

खाजगी गोष्टी चव्हाट्यावर मांडणारे, 

लाईक्स,कमेंट हेच आयुष्य मानणारे,

चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणारे,

राजकारणाचे खेळ आणि 

खेळातले राजकारण पाहत गप्प बसणारे,

अजूनही नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणारे,

आणि आपसात भांडणं करणारे,

आणि 

नव्या वर्षात यंव करायचं, त्यांव करायचं 

असं नित्य नियमानं ठरवणारे आरंभशूर,

 

…… असे मी, तुम्ही, आम्ही, आपण सारे एकाच माळेचे मणी……..

 

सो कॉल्ड मॉडर्न लाईफमध्ये 

अस्वस्थता, बेचैनी आणि मोबाईल सतत सोबत,

जावं तिथं गर्दी आणि गोंगाट, 

सगळी सुखं आहेत तरी मन शांत नाही 

माणसं असूनही किडा-मुंगीसारखं जगणं.

त्याच त्या चक्रात फिरत राहणं.  

स्वप्न,अपेक्षा पूर्ण करण्याच्या धावपळीत 

तब्येतीला फारच गृहीत धरलं जातयं.

डायबेटिस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हे कायमचे सोबती 

फार लवकर आयुष्यात येऊ लागलेत… वेळीच काहीतरी करायला हवं.

नाहीतर दिवसेंदिवस हे वाढत जाणार.

जीव तोडून कमावलेला पैसा, 

जीव टिकवण्यासाठीच खर्च होणार, 

तेव्हा …… 

नंतरचा पश्चात्ताप टाळण्यासाठी थोडा विचार करा…  

नक्की काय चुकतंय हे शोधा….. 

 

समाजासाठी, घरच्यांसाठी आणि स्वतःसाठी…… 

2024 मध्ये…….फक्त कॅलेंडरच नाही …. तर काही सवयीसुद्धा बदलू या.

‼सर्व वाचकांना नवीन वर्षातला प्रत्येक दिवस मनासारखा, आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा‼

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print