मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ स्कायलॅब… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “स्कायलॅब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आणि तुमच्या पुढच्या वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा… शलाकाला ती मेलची शेवटची लाईन वाचताना काळजात कालवल्यासारखं झालं… कंपनीचा वाढत्या तोट्याची उपाययोजना म्हणून काही कर्मचाऱ्यांना आज कंपनीने नारळ दिला होता… त्यांचा आजवरचा सगळा देय असलेला आर्थिक हिशोबही तितक्याच वेगात भागवूनही टाकला होता… आता संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत थांबला नाही, तरीही काही हरकत नाही अशी सवलतही दिली होती… आजवर दिलेल्या सेवेबद्दल कंपनी आभार व्यक्त करतेय… बाकी युवर कंपनी एम. डी. एक लफ्फेदार काळ्या अक्षरातली सही… थोडक्यात तुमचं भविष्य बिघवडून टाकणारा हा पोटाचा नियंता.. लहरी विक्षिप्त. त्याच्या समाधानासाठी जीवाचे असेल नसेल तितके रक्त सांडलेलं काही वर्षे.. तरी त्याच्या मनाची हाव काही संपयाचीच नाही. रोज नवे नवे टार्गेट देऊन सकाळपासून ते रात्री पर्यंत जीवतोड पळायला लावून उसाच्या रसाच्या चक्रातून चोथा निघेपर्यंत पिळून काढून घेतल्यावरही, ‘अरे यार तुम कुछ काम के बंदे नही लगते हो ‘असा असमाधानी आत्मा. आणि एक दिवस अचानक ध्यानीमनी काही नसताना… आणि गंमत म्हणजे आजच एप्रिलच्या एंडला कर्मचारीचंं ॲप्रेझल.. रेटींग डिक्लेअर करून.. कुणाला प्रमोशन वुईथ पगारवाढ, तर कुणाला नुसतीच पगारवाढ, बोनसं, इन्सेटिव्ह वगैरे वगैरे चे मेल मिळालेले असल्याने कंपनी च्या सगळ्या सेक्शन मधे जल्लोषचा माहोल पसरलेला… पार्टी तर जरूर होना है यार.. आपापसातल्या सहाकाऱ्यांचां अशी मागणीचा जोराचा आवाज दुमदुमत होता… सगळीकडे वातावरण उत्साही होतं आणि आणि शलाका एकटीच आपला चेहरा पाडून तो आलेला मेल वाचत बसली… मन खूप विषण्ण झालं… तिच्या त्या ऑफिसमधले बाकीच्या सहकाऱ्यांना त्यांच्या या आनंदा पुढे शलाकाकडे बघायला वेळच नव्हता… कदाचित तिला फोर्थ रेंटींग मिळालं असेल आणि त्यामुळे यावर्षी नो पगारवाढ आणि रेड अलर्ट सिग्नल दिला असणार.. या समजुतीत ते सगळे होते… कंपनीच्या त्या फ्लोअर वरील फक्त शलाकालाच एकटीला हा मेल आला असल्याने… बाकी कुणालाच त्याची काहीच कल्पना नव्हती… गंभीर चेहऱ्याने शलाका आपल्या लॅपटॉपवर आलेल्या मेल कडे पाहत बसली… चिंतेचं जाळं हळूहळू तिच्या भोवती लपेटून जाऊ लागलं होतं… आणि आता डोळ्यासमोर तिला तिचं घरं, चार वर्षाचा आर्यन तिचा मुलगा, पक्षाघाताने आजारी सासू आणि आणि एकाही ठिकाणी न टिकणारा… सतत नव्या नव्या नोकरीच्या शोधात असलेला पण हतबल झालेला तिचा नवरा शिरीष… सगळेच तिच्या कडे आशाळभूत नजरेने पाहातयेत असं वाटत राहिलं… पुढचा प्रवास अनिश्चित, अंधकारमय दिसत होता… बॅंक लोनचे हप्ते, महिन्याचा किराणसामान देणारा वाणी, दूध, पेपर वाले, सोसायटी मेंनटेनस, आर्यनची पोलिओ ट्रिटमेंट, सासूबाईंचा अल्ट्रासाउंड इफेक्टची आठवड्यातील तीन सिटींग… आणि आणि नोकरीचं कुठंच सेंटीग अद्याप न जमल्यानं शिरीषचा वाढता प्रवास खर्च… मोलकरणीचां पगार… या सगळ्या घेणेकऱ्यांचे हात लांब लांब पसरत शलाकाच्या गळ्याभोवती वेढे घालू लागलेले तिला जाणवले… शलाका मनाने खूपच खचून गेली… नवी असाईंन्मेंट इतक्या लवकर मिळणं मुश्किल होतं.. त्यात कंपनीने काढून टाकलयं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या आपण जाॅबला अनफिट आहोत याचचं शिक्कामोर्तब केल्यासारखे ते रिलिव्हिंग लेटर तिच्या तनामनावर चरचरा ओरखडे काढत राहिलं… मागच्या वर्षापर्यंत एक दोन रेंटिंग मिळालेलं असुन सुद्धा आपल्याला कंपनीनं नारळ दिला… आणि तो डिसुझा, रमण भाटीया, सुधाकर सावंत सारखे कायमच अनसंग असणारे गाईज मात्र कंपनीने रिटेन करून ठेवावेत… मगं आपण कशात कमी पडलो… बाॅसची हांजी हांजी करणं आपल्याला कधीच जमलं नाही.. ना कधी कुठल्याही पार्टीला, पिकनिकला ना आऊटडोअर साईटला त्याच्या सोबत गेलो नाही.. म्हणून कदाचित त्याने हा ठरवूनच डाव खेळला असणार… कदाचित मी आता लगेचच त्याच्या केबिनमध्ये जाऊन रडत भेकत आपल्याला घरच्या परिस्थितीची कल्पना देऊन एक वेळ त्याने आपल्यावर दया दाखवावी अशी त्याची कल्पना असणार बहुतेक… म्हणून तर केबिनमध्ये बसून सारखं ग्लास विंडोज लूक आऊट चाललयं त्याचं…. ही मासोळी गळाला लागायलाच हवी यासाठी त्यानं केव्हढं मोठं जाळं टाकून बसलाय.. आमिषाचे तुकडे टाकून बधत नाही म्हटल्यावर पाण्यातूनच कायमची बाहेर काढून फेकून देताना आपली पाॅवर किती स्ट्राॅंग आहे हेच दाखवयाचं होतं त्याला… पण शलाका काही कच्च्या गुरुची शिष्यां नव्हतीच मुळी.. तिनं त्या मेलला रिप्लाय देताना. गुडबाय इतकेच म्हटले.. आपला डेस्कटॉप मधील आपली सगळी महत्वाची माहिती तिनं डिलीट करायला विसरली नाही.. डेस्कटॉप शटडाऊन केला.. ड्रावर रिकामे केले.. कुठल्याही आमिषाला बळी पडणारं इतकं तकलादू सौंदर्य तिचं तर नक्कीच नव्हतं… ऑफीसच्या कामाचे काही इथिक्स, प्रिन्सिपल्स तिचे ठाम होते… त्याला मुरड घालून कंपनीत रिटेन राहणं तिच्या स्वभावात नव्हतं… हातात कौशल्य होतं नि बुद्धी ची झेप मोठी होती हेच तिचं मोठ्ठं भांडवल असल्याने आज जरी हातातला हा जाॅब सुटला तरी दूसरा मिळणारच हा आत्मविश्वास होता… तो मिळेपर्यंत संयम ठेवणं गरजेचं होतं.. शलाकाने आपली पर्स उचलली आणि कुणाशीही काही न बोलता ती एकेक पाऊल टाकत आॅफिसातून बाहेर पडली.

.. त्यावेळी तिथं असलेल्या कुठल्याही कलिगला तिचं असं निघून जाणं याकडे खास असं काहीच वाटलं नाही.. उद्या त्याचं नेहमीप्रमाणे रूटीन सुरू राहणार होतं याची आजतरी त्यांना खात्री होती… आणि शलाका मात्र उद्याला त्यांना तिच्या डेस्कला दिसणार नव्हती याची कल्पना देखील नव्हती. मग उशिराने का होईना त्यांच्यात लक्षात येणार होतं कि अरे या वेळीची स्कायलॅबचा बळी शलाका होती तर….

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… आणि तुम्हांला सांगतो आमच्या तालुक्यात वीज आली… आमच्या गावात वीज आली… आमच्या वस्तीत वीज आली आणि आमच्या घरात वीज आली… तो तुम्हाला चित्रात दिसतोय तो वीजेचा खांब सगळ्यात पहिल्यांदा उभा राहिलेला खांब आहे बरं आमच्या गावात, वस्तीवर वीज आपल्या डोक्यावरून वाहून घेऊन येणारा… आज उणीपुरी पन्नास वर्षे झाली बरं त्या खांबाला आमच्या गावाच्या वेशीवरं वेताळाच्या झाडाजवळ उभा आहे… त्यावेळी जसा होता तो आजही तसाच उभा आहे ना भाऊ… वीज गावात खेळत राहीली त्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांनी तर दिवाळीच साजरी केली… सगळ्यांच्या घराघरातले सगळ्या असल्या नसल्या खोलीतले ओट्या्वरचे, खळ्यावरचे, परसूमधले,… आणि कशा कशातले दिवे… म्हणजे पिवळे चाळीस व्होल्टचे दिवे ते दिवसरात्र ढणढणा जळत राहिले हो… सकाळच्या सूर्य प्रकाशात त्यांचं महत्त्व वाटलं नाही पण अख्खी रात्र मात्र तेजाची फुलबाज्यांची रोषणाई सांडत राहिली… आयाबाया पोरंबाळं अंगणात दारात ठिय्या मांडून फतकल मारून बसले.. वीजेची दिव्य गोष्टीचां वार्तालाप करत… बरीच रात्र उलटून गेली तरी घरात जाऊन आता झोप घ्यावी असं कुणालाही सुचलचं नाही… तर इकडे पुरूष मंडळी कट्यावर, पारावर बसून पत्याचा डाव टाकून बसले तर काही ना हा आजचा दिवसाचा आनंद घश्यात काहीतरी गरम पेयाचे चषक इत्यादी रिते कसे करता येईल याची गुत्याच्या वाटेवर हसी मजाक चालू झाला… गोठ्यातली गुरं ढोरं आनंदानं शिंगं डोलावू लागली… आणि आणि ती राॅकेलची चिमणी तो प्रभाकरचा कंदील ह्या वीजेच्या दिव्यांनी दिवे लावलेले पाहून बिचारे रुसून कोपऱ्यात अंधारात बसून गेले… निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवाराकडे कसा अपयशाचा अंधकाराचा सन्नाटा असतो त्याच्यापेक्षा ही जास्त म्हणाना… आता आपली इथली गरज संपली गड्या तेव्हा आपला बोऱ्याबस्तरा उचलायला हवा आणि अडगळीत पथारी टाकावी अन्यथा भंगारावाल्याच्या काळ्या कभिन्न गोदामात गंजत खितपत पडावं लागेल… मग कोण कशाला वास्तपूत करतोय… गरज सरो नि… पण हि काना मागून आलेली चटक चांदणी किती दिवस.. आपलं किती रात्रं लखलखत राहीलं हे ही सांगता कसं येईल…आता हेच बघा की ते ब्रिटिशांच्या आमदनीत फक्त मोठ्या शहरात तेव्हा वीज खेळत होती आम्हाला वाटायचं हि श्रीमंतांची मिजासच आहे…ती कशाला वो तडमडयाला खेड्यापाड्यात येतेय… इथं रोजच्या रात्रीला चिमणीच्या ढणढण्या उजेडाला नि कंदिलाच्या मेणचटलेल्या प्रकाशाला अंधार लाजून मुरकून जरा दूर हटायचा… गाव शीव वालं सगळे जण त्याला सराईता सारखे चालत बोलत येत जात नि राहत होते… अगदीच  नड पडली तरच रातच्याला गावाच्या बाहेर पडतं नाही तर जो तो आपल्या घरातच.. पण हि छमक छल्लू वीज आली नि गावा गावातले लोक पायात चाळ बांधल्या सारखे बघा दिवस नाही कि रात्र नाही चौवीस तास अखंड कारण असू दे वा नसूदे हिंडायला लागले कि… कोणीतरी लै शिकलेला मोठा माणूस म्हणत होता आता वीज आली पाठोपाठ गावाचा विकास पण होत जाणार म्हणून… उद्योग धंदे वाढून सुख समृद्धी लोकांच्या घरघरात पोहचणार… मग ती चिमणी आणि तो कंदील असताना काय कमी सुखं होतं का तेव्हा… खाऊन पिऊन सुखीच होतो कि आम्ही… हिच्या मुळं आणि दोनचार सुखाची साधनं वाढली इतकंच काय ते… गावातली बाया माणसं, पोरंसोरं असं बोलत बसली होती आनी तितक्याच फक्कन अंधारच झाला जिकडं तिकडं.. अरं काय झालं या वीजंला.. दिवा एकदमच का विझला.. का वीज संपली वाटतं.. रे लावा ती आपली चिमणी आणि तो कंदील.. त्याशिवाय काही आपलं जगणं काही खरं नाही गड्या हो… आता आहे तर नंतर नाही आणि दिवसा आहे तर रातच्याला नाही अशी बेभरवश्याची वीज आपल्या काय कामाची नाही.

ऐन नडीलाच हि नडणार..तेव्हा चिमणी आणि कंदील कायमचं असू द्या घरात… वीजेच्या अति झगझगीत उजेडाच्या हव्यासापायी चिमणी नि कंदील बाजूला सारले तर दारिद्र्याचा अंधार आपल्याला गिळून टाकल्या शिवाय राहणार नाही… म्हणतात ना जुनं ते सोनं.. कितीही उत्कर्षाचा काळ आला तरी ऐनवेळी सोनंच मदतीला धावून येतं तसं या चिमणी नि कंदीलाची सोबत आहे बरं… तो वीजेचा खांब जेव्हा पहिल्यांदा इथं आला तेव्हा किती कौतुक झालं होतं त्याचं पण तेच आता पन्नास वर्षे उलटल्यानंतर त्याच्यकडं कुणीही ढुंकूनही बघना झालयं…कितीतरी उन्हाळे, पावसाळे, थंडीचा कडाका खाऊन खाऊन अगदी कणखर झाला… त्याचबरोबर आता त्याच्या अंगोपा़गांवर पानाच्या पिचकाऱ्या पडून पडून तो आता लाल तांबडा नि करडा रंगाचा झालाय तर कुठे जाहिरातीचे बोर्ड, तर कुणी त्याच्याच आधार घेऊन पानाची, चहाची टपरी टाकून बसलयं.. हळूहळू त्या खांबाची गावानं ओळखच विसरून गेलयं.. आणि खांब सुध्दा आपलं खरं काम काय होतं हे विसरून दुसऱ्या कामातच गुरफटून गेलाय… त्याला या सगळ्या गोष्टींचा उबग आलाय पण सांगतो कुणाला.. आपल्या इथून कुणीतरी हलवलं तर बरं होईल असं सारखं वाटतयं…रस्ता रुंदी करणाच्या नावाखाली तरी…वादळाने तरी उन्मळून पडावं नाहीतर वीज मंडळानं तरी आपण खूपच जूने जीर्ण झालोय म्हणून तरी बदलुन टाकावं असं त्याच्य मनात येतयं… त्याच्या मनात जे येतयं ते वीज मंडळाच्या मनात कधी यावं आणि आलचं समजा पण त्यासाठी खर्चाच्या बजेटाची मंजूरी कधी मिळायची… साराच लालफितीचा कारभार…एकवेळ देवाजीच्या मनात आलं तर इकडची दुनिया तिकडं व्हायला वेळ लागायचा नाही पण या विद्युत देवतेच्या पुजाऱ्यांच्या मनात हे येणार कधी नि कसं…याच्याच प्रतिक्षेत तो खांब तसाच असिधारा व्रतस्थाप्रमाणे प्रतिक्षेत उभा आहे…

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ सामान्यत्व… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सामान्यत्व…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

स्वत:चं सामान्यत्व फार छळू लागलं की म्हातारीच्या पिसाकडे बघावे. स्वच्छंदपणे कसे उडत असते हवेत.

आपल्याला कोणी गरूड म्हणत नाही याची त्याला खंत नसते.

बळकट पंख नसल्याचा खेद नसतो. आकाशाचा अंत गाठण्याचा हव्यास नसतो.

अन पृथ्वीचा ठिपका होऊन जाण्याइतकी उंची गाठण्याचा मोहही नसतो.

आपल्या मस्तीत भिरभिरत, हवेशी जुळवून घेत,

आपल्या हलक्या अस्तित्वाला सहजपणे स्विकारत, ते मजेत जगून घेते.

उंचावर गेल्यावर त्याला जमिनीची भीती नसते.

अन् जमिनीवर उतरल्यावर नसतो आकाशाचा मोह.

हवेची हलकीशी झुळूक येवो वा सोसाट्याचा वारा आपलं काम फक्त त्याच्यासोबत तरंगत जायचं.. हसतहसत पुढे पुढे… वाटेत जर का कशाला नि कशात अडकून पडलो तर… आपला प्रवास इथवरचं होता असं समजायचं आणि जे सभोवताली असेल त्यावर आपली आनंद मुद्रेचा जमेल तितका ठसा उमटवयाचा.. हिच आपली जनमानसातील पुसटशी ओळख… मी जाता मागे राहील काय याचं वैषम्य उगाचच वाटून का घ्यायचं… आणि समजा प्रवासाच्या वाटेवर पावसाची सर वा धो धो पाऊसच आला आणि त्यानं जर आपल्याला पाण्याच्या सपकाऱ्याने खाली चिखलात मिसळंवलं तर.. आयुष्याचा चिखल झाला म्हणून वाईट वाटून का बरं घ्यायचं… तुज घडवीशी तूच फोडीशी… न कळे यातून काय साधशी… त्याच्या त्या अनाकलनीय योजनेचा आपल्याला कधी अंत ना पार लागावा कसा… पण पण आपल्या जिवीत्वाचा अंश एका नव्या सृजनाच्या निर्मीतीत अणू रेणूतला अंश झाला हे समाधान नाही का मिळणार… हे आपल्यातले दडलेले असामान्यत्व आपल्याला कधीच ओळखता येत नाही… आणि दुसऱ्यांना ते दिसतं असले तरी ते दाखवत नाहीत… इतका सामान्यत्वाची घट्ट सांगड आपल्याला बांधून असते…

म्हणूनच स्वत:चे सामान्यत्व छळू लागलं की बघावे

नि:संग भिरभिरणाऱ्या म्हातारीच्या पिसाकडे…

#

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गाड़ी बुला रही है… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “गाड़ी बुला रही है…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

 हं आता ज्याचं या 7. 32 च्या सीएसटी जलदगती लोकलचे रिझर्वेशन, पास आहे ते आधी या डाव्या बाजूने आत येतील… ही लोकल इथूनच सुटणारी असल्याने इथं एकदा सगळ्या सीट भरल्यावर कुणालाही उभ्याने प्रवास करण्यास परवानगी नाही.. या मोकळ्या जागेचा हक्क पुढील येणाऱ्या प्रत्येक स्थानकातील प्रवाशांचा असेल… या घोषणेला जो कोणी अयोग्य रित्या प्रतिसाद देईल.. नियमबाह्य वागेल तो प्रवासी या लोकल मधून जो पर्यंत खाली उतरणार नाही तो पर्यंत ही लोकल हे स्थानक सोडून पुढे जाणार नाही. याची समस्त प्रवाशांनी नोंद घ्यावी.. आणि यासाठी जो काही विलंब झालाच तर त्याची त्या आगांतुक प्रवाशाची जबाबदारी असेल.. रेल्वेप्रशासन या दिरंगाई ला जबाबदार असणार नाही… लोकल दर पाच मिनिटाला इथून सी. एस. टी. कडे जात असते… प्रवाशांनी आधी ज्याचं रिझर्वेशन असेल आधी त्याला लोकलच्या डब्यात जाऊ द्यावे.. रिझर्वेशन च्या प्रवाशांनी आपल्याला दिलेल्या सीट नंबरवरच बसून घ्यायचं आहे..

…. आता लवकरच ही व्यवस्था आणि शिस्तीची अंमलबजावणीची आत्यंतिक गरज आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण करणारी खाजगी संस्थाना देकार देऊन लोकल प्रवाश्यांची सुरक्षेची काळजी वाऱ्यावर सोडून आपले हात मोकळे (झटकून) घ्यावेत… आणि फक्त ध्वनीक्षेपकावरून गोड आवाजात सुचनांचा नुसता धो धो पाऊस पाडावा.. प्रवाश्यांच्या मानसिकतेच्या, सोशिकतेचा कडेलोट कसा होईल हे पाहावे… आणि वर रेल्वे ही भारत देशाची संपत्ती आहे तेव्हा तिचं संरक्षण करणं हे प्रत्येक सुजाण प्रवाश्याचं कर्तव्य आहे आहे असे म्हणून आधीच कावलेल्या प्रवाशांच्या मनाला डागण्या द्याव्यात… ना घर का ना घाटका असलेला प्रवासी मग सरकारला, रेल्वेला ठेवणीतल्या गालीगलोचं पारायण करतो… कारण त्याला कुणीच वाली उरलेला नसतो… मधेच कधीतरी संधीसाधू राजकीय पक्ष याचं राजकारण करतो, बंद बंदची हाक घालतो… आपली राजकीय पोळी या तापलेल्या तव्यावर भाजून घेतो पण पोटार्थी नोकरदारांची या बंद मुळे चुल थंडावते आणि तो मात्र उपाशीच राहतो… प्रश्न कसा सुटेल लोकांची सोय कशी होईल याकडे कुणालाच काही पडलेलं नाही… रोज मरे त्याला कोण रडे या वचनाला सगळेच जागतात… आणि लोकलचा, रेल्वे च्या प्रवाश्याचे हाल कुत्रे खातात… चलो अंदर, चलो भैय्या करत आपल्याच भाईबंदावर चिडत रागावत, प्रसंगी हमरीतुमरी येत लोकलच्या डब्यात घुसत राहतात… एकदा असा प्रवेश मिळाला म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळाल्याचा फिल येतो… वरच्या पंख्याचं पातं वातावरण कोमट राहीलं याची काळजी घेतं.. आणि मग डब्यात स्थिरावलेली ती मुटकुळी झालेली शरीरं एकमेकांशी संवाद साधताना.. छोड ना यार ये रोज की मगजमारी है… अच्छा सुन ना आज शाम कि पाच पैंतालीस डब्बल फास्ट अंबरनाथ को आ रहा है ना… मै राह देखता हूं… आणि ती संध्याकाळची आणि उद्या सकाळीची लोकल सुद्धा आपापल्या प्रवाश्यांची वाट बघत प्रत्येक स्टेशनवर थांबून पुढे पुढे जात असते…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ बरसात में हमसे मिले तुम सजन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “बरसात में हमसे मिले तुम सजन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.. त्यावेळी पण हा पाऊस असाच पडत होता… आभाळाने तर आपल्या पांढऱ्या ढगाची कात टाकली होती आणि नवी कोवळी काळी सावळी चंद्रकळा अंगभर पांघरून लपेटून घेतली होती आभाळानं.. जसा तिनं साडीचा पूर्ण पदर आपल्या अंगा भोवती लपेटून घेतलेला होता तसा… सकाळचे वाजले किती असावेत सांगणारं घड्याळ आज थंडीनं गारठलं होतं अन बाराच्या आकड्यावरच विसावलं होतं… जसं तास काट्याला मिनिट काट्यानं गाढ आलिंगनात घेऊन आपल्या प्रेमाची उबेची देवाणघेवाण करत होता… त्यांचे तसे ते प्रीती च्या पावसात एकरूप होण्याने सेंकद काट्याची चिलबिचल वाढली होती… काय करू कसं करू म्हणजे मलाही त्या तास काट्याला असचं मिठीत घेता येईल… असा कोणता निवांत एकांतपणा देणारा एक ते बारा मधला कुठला तास बरं असेल कि त्या ठिकाणी माझं मनोवांछित बिनधोकपणे पूर्ण होईल.. त्या तासाच्या शोधात बिचारा सेंकद काटा आपल्या चंचल स्वभावानुसार एकाही ठिकाणी जराही स्थिर न होता आपला शोध जारी ठेवत राहीला… मधे मधे त्याला तास काटा एकटा असताना भेटतही होता पण सेंकद काट्याला ती क्षणभंगुर भेटीचं सुख नको होते.. अन दिर्घ भेटीची स्वप्नं त्याला खुणावत खुणावत पुढे पुढे खेचून नेत होती. फुलपाखरा सारखं उडत उडत घेतलेल्या सुखात मधाची गोडी मनात न उतरता कुठेतरी पायाला, पंखाला लागून एका फुलावरून लगेच दुसऱ्या फुलावर जायचं इतकं का बेगडी प्रेम आहे का आपलं सेंकद मनाला समावत राहिला… तास काट्याला वाटायचं सेंकदाला कळत कसं नाही.. इतकं का झुरतं कोणी प्रेमात एखाद्याच्या जे माणूस आपलं कधीच होणार नाही हे सत्य वज्रलेप असताना. शब्दाने दोन गोष्टी त्याच्याशी बोलायला जावं तर तो आता नको आता नको बोलूस काही असं नकाराची मानं सतत हलवत हलवत पुढे पुढे सरकत जातो… आता पळणाऱ्याच्या मागे मागे पळतं का कुणी… आणि तसं त्याला ठाऊक नसेल का ज्याने मला या बारा आकड्यांच्या पिंजऱ्यात आणून ठेवलयं तो दर तासाला एकदा तरी वेगवेगळ्या पिंजऱ्यात मला भेटूनच जात नसेल… मला ठेवलयं त्यानं आपल्या संसारात गु़तंवून आणि आपण जातो हिंडत बारा गावं पालथं करीत संसाराचा चरितार्थ चालविण्याचा पुरूषार्थ करायला… आणि तसं त्याचंही बरोबरच आहे म्हणा त्याच्याशिवाय दुसरं आहे कोण मला असा भक्कम आधार नि विश्वासनं प्रेमाची काळजी घेणारा… आणि मलाही कुठं त्याच्यासारखं नि त्याच्याबरोबरीनं इतकं भरभर कुठ पळायला जमणारं होतं.. मंदगतीच्या चालीची मी.. मी कुठल्याही तासाच्या घरात असले तरी उरलेल्या अकरा तासाच्यां कुठल्याही घरात तो असला तरी त्याचं लक्ष टेहळणी केल्यासारखं माझ्याकडेच असते…. असावा का कुठला शंकेचा किंतू माझ्याबद्दल त्याच्या मनात असं काही वेळा माझ्या मनात सुई टोचत राहते संशयाची… माझंही आहेच कि त्याच्यावर निस्सीम प्रेम त्या दिवसापासून ज्या वेळी आमची पहीली भेट झाली होती तेव्हा पासून… मग मी कधी दाखवला का माझ्या प्रेमातला दुजाभाव… नाही तसं माझ्याकडुन कदापिही होणं शक्य नाही.. एकदा आपला मानला, झाला कि तो अखेर पर्यंत तोच एकमेव… कपाळीचं कुंकू नि गळ्यातलं मणी मंगळसूत्र अक्षय सौभाग्याचं लेणं जीवापाड जपणं हाच धर्म पाळत आलेय मी… पण तो सेंकद काटा जेव्हा जेव्हा त्याच्या जवळून जात असतो तेव्हा तेव्हा मिनिट काट्याचा रागाने अहंकार फुलून येतो काही क्षणाचीं दोघांची नजरानजर नि बोलाचाली नक्कीच होत असणार आणि मिनिट काटा त्याला ठणकावून, धमकावत असणार तू इथून चालता हो… फिरून या ठिकाणी जर मला दिसलास पाय टाकलास तर तुझं तंगडचं तोडून टाकीन… जो आता तू तुरूतुरू मजनू सारखा चालत प्रेयसीच्या मागे मागे लागला आहेस ना तोच तुला एका पायाने लंगडत चालत जावे लागेल कायमचे… आणि तसं या जगात भले भले चांगल्या धडधाकटांची डाळ जिथे शिजत नाही तिथं तुझ्यासारख्या लंगड्याला कोणी भिकही घालणार नाही… घाबरलेला, भेदरलेला सेंकद काटा त्त्वरेने पुढे सरकत राहतो… आणि आपली प्रिया आता तरी एकटीच कुठल्या तरी तासाच्या पिंजऱ्यात नक्कीच भेटेल अशी आशा ठेवून मनात भेटीत काय काय करायचे… किती किती बोलायचे नि शेवटी आपल्या प्रेमाचा विश्वास दाखवताना तिला एकच सांगायचं,. तू आहेस तिथेच थांब कायमची, लवकरच मी येतोय ना तुझ्या सोबतीला कायमचा लवकरच… अजून माझी वेळ आलेली नाही… कारण सध्या पडणारा हा पाऊस मला धार्जिणा नाही.. हा मला हवा असणारा पाऊस तो हा नाही… त्यामुळे माझ्या छत्रीचा आवाकाच तुटपुंज्या असल्याने तुला मी कसे बरे पाऊस पडत असताना माझ्या छत्रीत घेऊ शकणार… पण पण नेमकं मला त्यावेळी काय असं होतं सांगता येत नाही.. जे मनात ठरवलेलं असतं ते एकाही शब्दानं तिच्या जवळ बोलताच येत नाही.. आणि डोळे फक्त तिच्याशी काही वेगळाच शब्दाविनाचा संवाद साधत जात असतात आणि सेंकद काटा भान हरपून पुढे पुढे सरकत जातो… त्याला तिला काही सांगायचयं हे ही तिला कळते… मनात त्यालाच हवे असलेलेच असणारे असावे ते… आणि सेंकद काटा तिची समजूत काढत काढत सा़गतो आता या वेळेला नको.. हि माझी वेळ नाही.. अजून माझी वेळ यायची आहे… ती आली कि तेव्हा… कारण आता पडणारा हा पाऊस माझा नाही… माझा पाऊस पडायला अजूनही अवकाश आहे… म्हणून तू तरी सध्या पडणाऱ्या पावसतात न भिजलेलं बरं असं मला वाटतं.. म्हणून तू तरी सध्या पडणाऱ्या पावसतात न भिजलेलं बरं असं मला वाटतं… हम इंतजार करेंगे कयामत तक….

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मी येतोय बरं का !.☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “मी येतोय बरं!.. ” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

श्री नंदकुमार पंडित वडेर

“… मगं काय दशावतराची दिवसरात्र रंगीत तालमी जोरात चालू आहेत वाटतं!…. गणपती बाप्पाचा काॅस्च्युम घालूनच चहाला आलात ते!… बाकी या बाप्पाच्या काॅस्च्युम

 मधे तुम्ही तर खरचं बाप्पाच चहा प्यायला टपरीवर आल्यासारखाच वाटतोय!… आपले बाकीचे सहकलाकार कुठे आलेले दिसत नाहीत!… का ते आधीच चहा पिऊन तालमी साठी परत गेलेत?… हो तेही खरचं असणार म्हणा!… तुम्हाला या सोंडेतून चहा प्यायची कसरत करावी लागत असल्याने निश्चितच वेळ नाही का लागणार?… मगं थोडा वेळ तो बाप्पाचा मुखवटा काढून ठेवला असतात तरी चाललं असतं… आज पावसाने तर सकाळपासून दमदार बॅटींग सुरू केलीय!.. मी गणपतीला रत्नागिरीला घरी जाण्यासाठी रेल्वेचं तिकिट काढायला म्हणून स्टेशनवर येतो काय?.. नशिबाने मला हवं असलेल्या तारखेचं कन्फर्म तिकिट लगेच मिळतय काय?… कधी नव्हे ती रेल्वेची कृपा झाली.. होय हो, एक वेळ तुमचीच म्हणजे गणपती बाप्पाची मर्जी, आपलं कृपा सहजगत्या होईल पण रेल्वेचं हवं तेव्हाचं रिझर्वेशन मिळायची कृपा कधीच होत नाही!… ती आज झाली नि आनंद माझ्या पोटात माईना माईना….. असल्या पावसात गरमागरम चहा पिण्याची तलफ आली म्हणून मी इकडे आलो तो. तर तुमचं प्रत्यक्ष बाप्पाच्या रूपात दर्शनच झालं… अगदी देव साक्षात भेटीला आल्यासारखे वाटते… काय योगायोग असतो नाही का!… तुमचं काय म्हणणं यावर?. “

“.. हो! हो. !. वत्सा थोडा धीर धरं. !.. त्या मशिनगनमधून धाड धाड गोळ्यांच्या फैरी झाडव्यात तश्या मुखातून एका पाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरीवर फैरी सोडल्यास कि माझ्या वर!… मला वाटलं तूच बोलत राहणार आणि मी फक्त ऐकायचं काम करायचं!… पण शेवटी तू दमलास आणि मला बोलायची संधी दिलीस त्याबद्दल तुझे थँक्स.. हं तर वत्सा! मी कोणी कुठल्या दशावतारातील नाटकातील गणपती बाप्पाची भूमिका करणारा कलावंत नसून मी खराच गणपती आपलं तुमचा लाडका देवबाप्पा आहे बरं!.. आणि मी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आधी महिनाभर इथं या स्टेशनवर नुसता संचार करत असतो… कारण याच वेळेपासून तुमचं कोकण रेल्वेचं आरक्षण सुरू होणार असतं… आणि मुंबईतला चाकरमानी कोकणातला माणूस इकडचं जग तिकडं उलथल़ं तरी गणपतीच्या सणाला गावाकडे जाणार म्हणजे जाणारच… कामावरून मंजूर रजा मिळो वा न मिळो.. रेल्वे बसची तिकिटा मिळो वा न मिळो पण मिळेल त्या वाहनाने गणपतीला घरं गाठणार म्हणजे गाठणारंच!… अशी माझ्यावर निस्सीम भक्ती करणारी मंडळी फक्त कोकणातच बघितली बरं… पण मी संपूर्ण देवाच्या वेषभूषेत न येता तुम्हा मानवांच्या नित्याच्या वेशभूषेत इथं या स्टेशनवर फिरत असतो… ती गणपतीची सगळ्या दिवसाची रेल्वे तिकिटा खिडकी उघडता उघडताच संपून गेलेली असतात… याचं दरवर्षी मला ना कोडं पडतं.. सकल विद्येचा मी दाता हा स्थायीगुण माझाच असला तरी या तिकिट रिझर्व्हेशनच्या बाबतीत माझी मतीच गुंग होते… देव असून मला तिथे कुठलाच चमत्कार वगैरे दाखवता येत नाही याचं मात्र दुख होतं.. ती रात्रभर लाईनीत उभी राहीलेली माझ्या भक्त मंडळींचा भ्रमनिरास मला पाहवत नाही.. आणि तो तिकडच्या दूरच्या कोपऱ्यातला पांढरा पायजमा कुरता वाला आपल्या डोक्यावरची गोल टोपी सारखी फिरवत… रत्नागिरी अडीच हजार, कुडाळ चार हजार सावंतवाडी पाच हजार.. भावाचे मुलमंत्र घोकत असतो… माझ्या प्रमाणे तो ही दरवर्षी न चुकता या ठिकाणी या वेळेलाच मला दिसतो… रेल्वे नाही तर नाही बस तर नक्कीच कोकणी माणूस प्रयत्न करणार आणि गणपतीला जाताना आकाशाला भिडलेली कितीही भाडेवाढ झालेली असली तरी त्याच्या भक्तीच्या विशाल हृदयात श्रद्धेची फुलंच फुलं उमलेली असतात तिला कुठल्याही काट्यांनी कमीपणा येत नाही.. दलाल लोकांना अडलेल्या गरजूला नाडून घेतल्याशिवाय त्यांना लक्ष्मी प्रसन्न होत नाही त्यांच्या ही दिवसागणिक चढतीभाजणीचा खेळ सुरू असतोच… रस्ते तर खड्याने अडवलेले असतात.. जागोजागी टोलनाके दरडोखोरांसारखे भाविकांच्या वाहनावर अव्वाच्या सव्वा टोलधाड घालत असतात… कोकणातील माणूस अनेक आपत्तींना तोंड देत देत आपलं जेव्हा गावं गाठतो तेव्हा अत्युच्च आनंद होतो… चतुर्थी पासून ते अनंतापर्यंत दहा दिवस सकाळ संध्याकाळ आरती महाआरती, पूजाअर्चा, गौराईचं आगमनाची तयारी.. रोज रात्री भजन, भारूड, डब्बल बारी… दशावताराचा एखाद्या भाग… गावातल्या हौशी तरुणांनी बसवलेले नाटक… एक ना अनेक करमणुकीचे आनंदवर्धक भरघोस कार्यक्रम.. मी मखरात बसून बघत असतो. शेवटी कर्ता करवीता तो मीच असल्याने जे जसं होईल ते तसंच मला अर्पण करत असतात.. मग मला कुठे बरी असावी ती आवड निवड.. पण खेड्यातल्या या भक्ती ला स्पर्धाचे ग्रहण लागले.. भक्ती तोलणारा तराजू वगर्णीच्या रककमेवरच तोलला जाऊ लागलाय… सावंतांच्या गल्लीचा राजा तर काळसेकरांच्या गललीतला महाराजा.. एकमेंकावर कुरघोडी करू लागलाय… पवित्र आणि निर्मळ मनाने केलेली पूजेला पावणारा बुद्दीदेवाचे.. आता आपल्याच बुद्धीचे दिवाळे वाजवून नवसाला पावणारा महागणपती म्हणून गावोगावी जाहिरात बाजीचं धंदेवाईक मार्केटिंग करू लागलेत… चुकून माकून बोला फुलाला गाठ पडावी तसा एखाद्याचं किरकोळ मागणं सत्यात उतरलं गेलं कि… गणपती पेक्षा गुरवाचाच गोरक्ष धंदा जोमात चालतो… आणी मी मात्र डोळे कान, मन सगळं सगळं उघडे ठेवून निर्विकारपणे एकही शब्द न बोलता बघत बसतो… दहावा दिवस कधी उजाडेल नि मी परत माझ्या गावाला कधी परत जातोय याचीच वाट पहात असतो… ते दहा दिवस अक्षरश झिट आणून सोडतात.. कोकणात आलेला चाकरमानी अकराव्या दिवशी मिळेल ती गाडी पकडून मुंबईला कामधंद्यावर हजर होतो… ती त्याला मिळालेली त्या दहा दिवसातली उर्जा पुढच्या वर्षीच्या माझ्या आगमनापर्यंत पुरते… आणि गणपती बाप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या… या आरोळीच्या नादाच्या गुंजनात स्वताला हरवून बसतो… आता अलिकडे मला देखील दर वर्षी या दहा दिवसाच्या आगमनाची ओढ लागून राहिलेली असते… या दिवसातच मी प्रत्येकाला त्याच्या नकळत चांगलाच ओळखत असतो… आता मनी नसतो भाव श्रद्धाळूचा बडा दिखाव… सणांचं पारंपरिक माहात्म्य लोपलंय तिथं सणाचं इव्हेंटमध्ये सोनंच सोनं चमकतयं… समाजप्रबोधनाचे विचारांचे व्यासपीठ छचोर, सवंग तद्दन कलाविष्काराचं पीठ दळतयं… देशाभिमान, समाजाभिभान, धर्माभिमान, भाषाभिमान, आणि आणि स्वाभिमान या पोकळ अर्थहीन शब्दांचे बुडबुडे झाले… आणि राजकीय स्वार्थासाठी त्यांचेच वाद निर्माण करून लोकमानसाची दिशाभूल करून अराजकता निर्माण करून अस्थिरता आणलीय… पूर्वी पॅकेट सिस्टीम होती आता सगळीकडे पॅकेजचाच बोलबाला आहे.. मधुबालाचं निखळ सोज्वळ सौंदर्य तिच्याबरोबरच अस्तंगत झालयं आणि बारबालाचं भडक मादक बेगडी सौंदर्य उदयाला आलयं.. भजन, कीर्तनातले गाता गळ्याचे बुवा जाऊन त्या ठिकाणी शिंदळकी करणारी बुवाबाजी आलीय… संत मंहत, थोरा मोठ्यांच्या विधायक कार्याने घडलेल्या इतिहासाच्या वारसा असलेला हा देश आता त्यांच्याच नावावर आणि प्रतिमांच्या चौकटी ठिक ठिकाणी भिंतीवर लावून आपलचं चोरांचचं राज्य करु लागलाय.. विद्यावंताला बटीक आणि खुशमस्करेनां मलिदेचा खाटीक केला गेलाय… हा सगळा हैदोस मी जसा पाहतो तसा माझे असंख्य भक्त ही पाहतात अनुभवत आहेत… आणि दरवर्षी माझ्या आगमनाच्या वेळी हे गणराया या हैदोसाला आता तुझ्या शिवाय पायबंद कोण घालेल बरं.. असं साकडं घालतात.. तूच कर्ता आणि करविता आहेस असं म्हणतात… पण वत्सा माझं असं म्हणणं आहे की हे तर सगळंच तुमचकचं कतृत्व आहे… यात मी कशी ढवळाढवळ करणार… मी फक्त सामर्थ्य देऊ शकतो.. लढाई तर तुम्हालाच लढावी लागणार आहे… बुद्धीच वरदान तर मी तुम्हांला कधीच दिलयं पण ते वापरायचं असतं की नसतं हे तुम्हीच ठरवायचं रे… नाहीतर शोभेच्या डोक्यावर पगडी, टोपी, नि फेटा बांधताहातच कि तुम्ही आता तर माझ्याही डोक्यावर तुम्ही मुकूट असताना फेटा बांधयला कमी करत नाही… मला तर वाटतं हे फेट्याचंच जग आहे आणि सगळं विधायक विचारांना फेटाळून लावत विघातक विचारांची नि कृत्यांची फक्त फेटे उडवाउडवी चालेली दिसतेय… खऱ्याला कुणी ओळखत नाही कारण खरं ओळखायची निर्भेळ, निरक्षीरविवेक दृष्टी कुठे आहे… खोट्याची झगमती दुनियेपुढे डोळे तर दिपून जातातच पण मती देखिल गुंग होऊन जाते… कालाय तस्मै नम: म्हणून सोडून द्यायचं!… आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे गणपती बाप्पा मोर्या म्हणत राहायचं… माझा चहा पिऊन झालाय तेव्हा मी आता इथंनं निघावं म्हणतो… बघं तुला माझं काही पटलं असेल तर यावेळी आचरणात आणता येतयं काय ते! आग्रह नाही माझा पण लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देश्याने हा उत्सव सुरू केला होता त्याला थोडासा न्याय दिल्यासारखे होईल… ! “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिक्षा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “प्रतिक्षा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

ये रे  ये रे कधीची तुझी वाट बघत बसलोय आम्ही तिघेही…

मी, ह्या टपटप गळणाऱ्या पावसाच्या सरी आणि

तो तुझा गरमागरम चहाचा कप…

आम्ही सारेच निशब्द, स्तब्ध आणि बरचं काहीसं हरवून गेल्यासारखं बसून राहिलोय या गवाक्षाजवळ…

एकच एक तुझी कमी भासतेय आम्हाला… मैफिल खोळंबून राहिलीय..

ती टपटप गळणारी सरीवर सरी मला सांगतेय कि  मन  प्रसन्न करणारं वातावरण आहे…

हाती तुझ्या वाफळता चहाचा मग आहे… तरीही तू का उदास आहे…

अरे वेड्या जरा माझ्या कडे पहा मलाही असतात बरं तुझ्यासारख्या भावभावना..

पण त्याच मी जर उराशी कवटाळून बसले तर मला जगता येईल का..

म्हणून मी असे काळ्या ढगातून ओघळत असते आणि आणि माझ्या भावभावनां ओघळू देते..

टाकलेले  उसासे माझे विरघळतात तुमच्या चेहऱ्यावरील आनंदात जे तुम्ही मला जेव्हा पाहतात तेव्हा मला माझ्या आयुष्याचा अर्थ गवसतो..

आणि तू मी इथं तुझ्या अवतीभवती वावरत असताना नि हातातील मगातले गरमागरम चहाचे चुटके घेऊन मनाला तजेला करण्या ऐवजी…

तो कोण अद्यापही आला नाही याच्या चिंतेत बसतोस… आणि या आनंदाला मुकतोस..

बघ तो चहाचा मग सुद्धा कसा आता त्या गरमागरम चहाने रागावून गाल फुगवून  तुझ्या कडे पाहात बसलाय..

काय अरसिक माणूस असेल हा.. इतक्या सुंदर वातावरणात आणि एखाद्याची कवि प्रतिभा कशी खुलून आली असती आणि झरझर मोत्यांच्या ओळीत कविता सरसर कागदावर उतरली असती…

पण नाही  ना हा अरसिक मनाचा त्याला सौंदर्याचा, निर्सगाचा आस्वाद कसा घेतात तेच ठाऊक नाही… आणि उगाच तो कोण कुठला त्याच्या प्रतिक्षेत आपल्या बरोबर आम्हालाही ताटकळ ठेवलयं…

ती टपटप ओघळणारी पावसाची सर आणि तो गरमागरम वाफळता चहाने भरलेला मग त्याला अखेरचं निक्षेपानं सांगू लागले…

आम्हांलाही मर्यादा असतात हे ठाऊक आहे ना तुला.. मग आमच्या सोबतीची ठेवना जर कदर… का ओढून घेतोस मनावर  विषण्णेतेची चादर…

अरे आता नाही तरी नंतर पुढे काही वेळेत आमच्यातला जोश ते हवेहवेसे चैतन्य लोप पावत जाईल..

मग थंड पडलेल्या कलेवरासारखे तूच काय कुणीच आमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही..

मग तूच म्हणशील या पावसानं काय उच्छाद मांडलाय नि त्यात तो मगातला चहा तर गारठोण झालाय..

दिवसाची सुरुवात तरी या मुड ऑफ करणाऱ्या गोष्टीने तरी व्हायला नको होती…

पण पण तो देखील का बरं नेमका आज उशीर करून राहिलाय…

त्याला पक्कं ठाऊक असतं अश्या रम्य वातावरणात मी त्याची नेहमीच आवर्जून वाट पाहत असतो..

आणि तो सोबत असतो तेव्हा तेव्हा आमच्या या मैफिलीला खुमार चढत असतो..

तो बोलत जातो एकामागोमाग एक बोरकर, पाडगावकर,शांताबाईंच्या  आणि बऱ्याच कविंच्या  कविता मागून कविता..

बाहेर  टपटप ओघळणाऱ्या सरीच्या तालावर धुंदफुंद झालेल्या वातावरणात हातातले गरमागरम वाफाळ लेले चहाचे घुटके घेत असताना सारं सारं काही चैतन्यानं फुलंत उमलत जातं…

मी माझा राहातच नाही…

आणि यासाठीच मी त्याची चातकासारखी वाट बघत असतो…

जरी सोबतीला ती टपटप ओघळणारी पावसाची सरीवर सर आणि वाफळता चहाचा मग  माझा आणि त्याचा असले तरी…

त्याच्याशिवाय मैफिल रंगतच नाही…

मन उदास होऊन बसतं त्याला जसजसा उशीर होतोय माझ्याकडं येण्यासाठी…

आणि आक्रंदन करणारं मन त्याला बोलवंत राहतं…

ये रे कधीची तुझी वाट बघत बसलोय आम्ही…

मी, ह्या टपटप गळणाऱ्या पावसाच्या सरी आणि 

तो तुझा गरमागरम चहाचा कप…

आता अधिक उशीर लावू नकोस बरं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दार उघड बया दार उघड… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “दार उघड बया दार उघड…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

ट़ोक टोक… टोक.. कुणी आहे का आत? या बंद खिडकीतून ऐकू कसं जाईल म्हणा! … पण कुणी तरी या दिवाणखान्यात येऊन जाईलच कि! .. सगळीच मंडळी का स्वयंपाक घरात कायमची बसून राहणार आहेत… बसली असतील म्हणा या असल्या राक्षसी पावसाच्या दिवसात.. गरमागरम कांदा भजी नि सोबत तो वाफाळता चहाचे दमा दमाने घुटके घेत… गारठली असावीत तना ने नि मनाने… उबदार पांघरूणात गुरफटून मुस्कट मारून पडून राहावंसं वाटतं असेल त्यांना… पण मला काय करायच्या त्यांच्या या कविकल्पनां ना घेऊन…. माझा कुठे प्रश्न सुटलाय अजून… आहे का त्यांना कशाचं व्यवधान.. जरा दारावरची बेल वाजू दे अशी कर्कश आवाजात की मग जातील धावत पळत आता कोण तडमडलंय या असल्या धुंवाधार पावसात? म्हणत दार उघडतील… आणि हवी असलेली व्यक्ती असेल तर हास्याचा गडगडाट करून आनंदाची कारंजी फुटून त्या अभ्यागताचं स्वागत करतील.. अरे आधी आत तर ये.. पावसाने किती भिजलास बघ बरं आधी बाथरूम जाऊन कपडे बदलून घे… आणि मगं गरमागरम चहा घे… आणि सोबत कांदा भजी पण आहे बरं… आज तुझं नशिब चांगलच फळफळलयं बघ.. आम्ही सगळेच घरात तुला या वेळी भेटतोय शिवाय सोबत चहा नि भजी… त्या पाहुण्यानं काढलं ते नशीब.. आं आणि मगापास्नं या खिडकीच्या काचेवर टोक टोक करून बोलवतोय आहे का कुणाचं लक्ष माझ्याकडे.. सगळे एकजात बहिरे कशाने झाले एव्हढे… का कानात एअरफोनचा बोळा कोंबून हरिहरनची गज़ल मधे गुंग झालेत…. अरे कुणी तरी या रे या दिवाणखान्याच्या खिडकी जवळ… या मुसळधार पावसात मी ही चिंब चिंब भिजलोय… बराच लांबन उडत उडत आलोय रे.. आणि जरा अजून थोडसंच लांब घरटं राहिलय़ माझी मैत्रिण चिमणीचं… पावसात उडत उडत इथवर आलो खरा पण आता त्याच पावसाच्या ओल्यानं पंख पाठीला नि पोटाला इतके चिकटून बसले मला उडताच येईना… शिवाय पावसात भिजून गेलो त्याने अंगात चांगलीच हुडहुडी भरली आहे… थोडसं अंग शेकून काही वेळ विसावा घेऊन पुढे निघावं असा विचार करून या खिडकीच्या कठड्यावर येऊन टेकलो.. पण पावसाचा मारा काही चुकवता आलाच नाही… अरे असं नका करू रे… अहो ताई माई अक्का…. दादा भाऊ, काका… अरे कुणी तरी यांना या खिडकीच्या जवळ.. आणि हि खिडकी उघडून मला आत घ्या… मला ठाऊक आहे ती कावळ्याची नि चिमणीची चिऊ ताई चिऊ ताई दार उघडं.. जुनी गोष्ट चांगली आठवत असणार तुम्हाला.. तेव्हाचा माझा धूर्त स्वार्थी स्वभावही चांगलाच तुम्ही लक्षात ठेवलेला असणार.. म्हणुन तर तुम्ही बघून न बघितल्यासारखे करून मला टाळायचं पाहताय… काय कलियुग आलयं असं तुम्ही एकमेकांना सांगताय चिमणीचं घर मेणाचं जवळच तर आहे तिकडे जायचं सोडून हा इकडे माणसांच्या फ्लॅट कडे कसा आला… का त्याला तिकडे चिमणीने तिच्या कटू पूर्वानुभवाने त्याला हाकलुन दिलं असणार तेव्हा कुठेच थारा मिळत नाही हे पाहून हा आमच्या घराच्या खिडकीच्या कठड्यावर टेकलायं काय? …. अरे पण तुम्ही असं दुष्टपणानं वागणार नाही याची मला खात्री आहे… अजूनही तुमच्या मनात माणूसकी, भूतदया शिल्लक आहे… तुम्ही मला नक्कीच आत घ्याल… थोडावेळ कोरडं होऊ द्याल… काही बाही चटकमटक खायला ही पुढ्यात टाकाल… अशी माझी आशा आहे… बाकी तुम्ही काहीही म्हणा पण तुम्ही सुध्दा माझ्याही पेक्षा जास्त स्वार्थी, आपमतलबी निघालात हं… कसं काय म्हणतात अहो तुमच्या या वाढलेल्या स्फोटक लोखसंखेला सामावून घेणाऱ्या लक्ष लक्ष संखेने बांधल्या जाणाऱ्या घरासाठी, महामार्ग बांधण्यासाठी आणि काय काय उभा करण्यासाठी वृक्षतोड किती केलीत… अहो सिमेट जंगल उभा केलत ते नैसर्गिक जंगलाची आहुती देऊन… आम्हा पक्षांची घरटी उद्ध्वस्त करून आमचा संसार धुळीला मिळवलात आणि छान छान घर बांधलीत आणि राजाराणी टुकीचा संसार करू लागलात… तुम्हाला ठाऊक आहे का या तुम्ही केलेल्या उध्वस्त पणात आमची गण संख्या रोडावत चालली.. आणि एकवेळ तर अशी येईल कि तुम्ही आमचं चित्रच बघाल… का म्हणून तुम्ही असं आमच्याशी उभा दावा केलात… काय घोडं मारलं होतं आम्ही तुमचं… गरज आम्हाला नाही गरज तुम्हालाच जास्त होती आमची… तुमच्या पितरांना ठेवलेले पिंडांना आम्ही शिवल्या शिवाय मुक्ती कशी मिळणार आहे… हा आमचा मान होता पण तुमच्या कृत्याने आमचा अपमान झाला आहे… या गोष्टी मी तुम्हांला तुमच्याच घरात येऊन बोलणार नव्हतो… पण वेळच तशी आणली तुम्ही आमच्यावर.. मग नाईलाजच झाला… आता कसं प्रायश्चित्त घेणार आहात… बघा राग आलाना तुम्हाला म्हणून तर बंद खिडकीच्या आतूनच मला हुसकावून लावण्यासाठी आलात नां? जातो बाबा बाबा इथून जातो… मला वाटलं नव्हतं आम्हा कावळ्यांपेक्षा तुम्ही डोमकावळेच फार भीतीदायक असाल म्हणून…. ह़ं चला तर मग तुमच्या पाशी सहृदयता, सहानुभूती, भुतदया, दयाळूपणा संपलेलाच दिसतोय… आता आपल्या मैत्रीण चिऊताई शिवाय आहे कोण दुसरं…. शेवटी आपल्याच बिरादारीतलीच माणसं एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात हेच निर्विवाद सत्य आहे… चिऊ ताई चिऊ ताई दार उघड जरा बाई… आलोय तुझ्या कडे मदत मागायला… माझं घरटं वाहून नेलय पाऊसानं… मी निघालोच तुझ्याकडे.. काव काव काव….

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कसा त्यजू मी त्या पदाला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “कसा त्यजू मी त्या पदाला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

दादा त्या येळेला तुमास्नी लै म्हंजी लै राग आलता हुता ना…. म्या सोता बघितला ना त्या येळेला तुमास्नी… हे कसलं लालभडक मिरचीच्या बुक्कीवानी त्वांड झालेलं तुमचं… टकुरात राख घालूनशान हे घरात निसता रागाचा आगडोंब उसळेलेला…

‘तू आदुगर बाहीर गपगुमान बाहीर पडं.. मला तुझं थोबाड बघायचं न्हाई… अन असं, समजू नगंस की आपून न्हाई तर ह्यो दादा घराबाहीर कसा काय पडनार… पायात काय बी घातल्याबिगर अनवाणीच… चालणार.. रस्त्यावरनं… पाय पोळलं म्हंजी.. एखादा चुकार मोळा पायाला टुपला तर… त्ये टोकदार खडं, दगुड तळपायात रूतला तर आली का बैदा ना पुढं जायची ना माघारी फिरायची आबदा… ‘

दादा मला ठावं हायं तुमास्नी माझाच राग आला व्हुता… आन राग आला नसला तरी यायलाच पाहिजे हुता… त्यो तुमालाच कोण बी ह्यो जोडा पायात घालंल त्येला बी तसाच राग येनारच व्हता… अवं काय म्हंजी त्यो पाव इंचाचा इतुकासा खिळा वर आलेल्या आनि त्येंन पायाला कडकडकीत टोचावं.. लाल लाल रगताचा एक टपोरा थेंब बाहीर येईस्तोवर जोड्यात पाय टाकणाऱ्यानं एकदमच अय्यो गं.. मेलो मेलो करत किचाळयाला लागलाच… अन मग पाय काढून जोड्यात कुठं बरं हा लपलाय हे डोळं फाडूनशान शोध घेतला तरी बी बहाद्दर नदरंला हाताला गावना म्हंजी.. लै मस्तीला आलाय म्हनायचा जोडा… असला जोडा असल्यापेक्षा फेकून दिलेला बरा… नाहीतरी लै जुनाच झालेला व्हता आणि खालनं तळवा तर साफ कागदावानी गुळगुळीत झालेल्या असल्यानं मधीच भसकं पडलेली व्हती… तसं तुम्ही या जोड्याला जाम कटाळला बी हुता… आनि एक दिस दिला की फेकून घराच्या बाहीर त्या मातीच्या ढिगावर.. म्या आपलं इवलसं त्वांड करून त्या ढिगाऱ्यावर बेवारसा सारखा पडून राहिलो… दुसरं माझ्याहाती तरी हुतं काय म्हना… आता ततनं कुनी उचलून उकिरड्यावर बी टाकना.. त्येंना तरी काय पडलीया म्हना नसत्या उचापती करायची.. एकच जुना अन त्योबी फाटका पडंना कि तकडं… असं कानाडोळा करून बेवारश्यागत झटकून टाकलं कि समंध्यानी… मगं भुईचा फुफाटा, उनाचा ताव, पावसाची झड अन थंडीची तड बाराहीमहिनं आता काय आपल्या नशिबाला चुकाया न्हाई हे एकदाचं पक्क झालं… आधीच अंगाच्या कातड्याची दैना दैना झालेली आन त्यात या ऋतु चक्राच्या भडिमारानं रयाचं गेली… हळूहळू भुईवरचं हिरव्या गवतानं, शेवाळानं जोड्यावरनं पांघरूण घालायला सुरुवात झाली… पाठीवरनं मायेचा हळूवार.. उबदार हात फिरविल्या सारखा वाटतं हुतं… अन कुठलं तरी एका झाडाचं बी रूतलं नि रुजलं बी जोड्याच्या आत… बघु बघू करता एक दिवस ते पिवळं धमक सोनचाफ्याच्या फुलावानी दोनचार फुलं ततं फुलून आली… थोडा सुंगध दरवळला जिकडे तिकडं.. माझा कायापालटच केला त्या फुलानं… जसा शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो अगदी तसचं झालं बघा मला… मग आजुबाजूची भुईवरची छोटी मोठी तृणपाती माझ्या समोर लवून मुजरा करताहेत असंच वाटलं… कुठं उकिरड्यावर बेवारस होउन कुजत पडलो असतो.. तो आता या पिवळ्या धमक फुलांच्या संगतीन जिंदगीचच सोनं झालयं असं जाणवू लागलंय… दादा तुम्ही मला वळिखला नव्हं… आवं त्योच मी तुम्ही ज्याला घराबाहीर फेकून दिलात… आता कसं बरं आठवयाचं तुमास्नी… तुमच्या पायात आता नवा इंम्पोरटेड जोडा हाय नव्हं… मग या देशी बेण्याला कोन इचारतो… ते जाऊ दे.. आता तुम्हाला नवा जोडा चावत, टुपत नाही नव्हं… हे ब्येस झालं बघा… दादा अजून एक इचारीन म्हणत होतो… रागवनार नसशीला तर बोलू काय.. व्हय त्या दिवशी मला तुम्ही घराबाहीर फेकून दिलासा तर त्यानंतर माझ्या दुसऱ्या जोडीदाराला कुठं फेकून दिलात… म्या त्याच्या आठवनीनं लै बैजार झालू बघा… त्याला बी माझ्या दिशेकडं टाकनासं करायचा हुता… अशी कधी कोनाची जोडी तोडून फोडून टाकत आसतयं व्हयं…

जोडीनं पडलो असतो तर कुणा गरजवंताला अनवाणी पायाला कामाला तरी आलू असतो… आमच्या राहिलेल्या जल्माचं ते्व्हढचं सार्थक नसतं का झालं असतं.. परं तुम्ही लै पैकं वालं पडलं ना… तुम्हाला कुठं कळायला गोरगरीबा़ची व्यथा… न्हाई का?

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रवाहपतीत… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “प्रवाहपतीत…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

शोधता तळ तुझा अंतराचा… नितळ स्फटिकासमान खळळाता मला दिसला… पारदर्शी, निर्मळ होता तो…किल्मिष न उरले इतुकेही तव मनात माझ्याविषयी… रागाचे ते तणही पाण्यासोबत वाहत वाहत निघती… पण दिसली बरं का मला!मी पूर्वी दिलेल्या तुला दुखाची काळी काळी पुटं! … रुतून बसलीय तुझ्या अंतकरणात…का अजुनही जतन करून ठेवली आहेस हे न कळे!.. तोच एक दुखरा सलणारा तुकडा आता मी जेव्हा पाहिला …माझ्यातला माणूस हरवून गेला होता का तेव्हा! हेच समजून आले मला…नित्य वाहते खळखळ करत ते जल पण अजूनही त्याला निपटून टाकणे नाही जमले …करतसे कबुली ती प्रांजल … नतमस्तक मी झालो त्या तुझिया प्रेमाचा झरणारा निर्झरास कि जो असावा अमृत धारेचा निर्मम प्रवाह तो..जो माझीया उत्शृंखल वृतीस दमन करतो…. सारे तुझ्या विपरीत घडतची राहत गेले तरी तू मात्र तुझ्या अंतरी त्यांच्याप्रती शुद्ध भावच ठेवतोस… मिसळून घेतोस त्या दृष्टादृष्ट भावनांना एकतत्व नामातला अद्वैताचा प्रवाह होतोस… आणि आणि मी मात्र तुझ्या प्रवाहाला पावलो पावली अवरुध्द करण्यासाठी मुढमतीचा खडक होउन तुझी वाट अडवण्याचा करंटेपणा करत आपली महत्ता दाखवून देत बसतो… पण त्यालाही तू तुझ्या पवित्र जलाने सचैल स्नान घालून त्याचं सदैव पापक्षालन करण्याचं असिधारा व्रताचं पालन करत राहतोस… देहाचं मालिन्य आजवरी तुझ्या प्रवाहाने धुवून गेले… पण मनाचं मालिन्य घालवण्यासाठी त्या अमृताचा थेंब प्रवाहपतीतम्हणून घेण्याची इच्छा काही झाली नाही… नि मी अजूनही असाच नर्मदेच्या गोट्या सारखा प्रवाहपतीत राहीलो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares