मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ओंजळ … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ओंजळ … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचताना आज एक ओळ फार आवडली, की महाराज करतल भिक्षा घेत असत.

करतल म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी!!

मला हा शब्द खूपच आवडला. प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी परमेश्वराने जास्तीत जास्त माप म्हणजे ‘करतल’ दिले असावे असे मनात आले.

करतल म्हणजे ओंजळभर!

आता हेच पहा ना…. खूप तहान लागली असली तर फक्त ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते. इतकंच काय.. ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.

आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते.

खुप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा….!!

तर कधी एखादी सलज्ज ललना‌ ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच व्यक्त करू शकते.

बाप रे… केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे….!!

म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे. त्याचा आपल्याला विसर पडता कामा नये असे पटकन मनात आले.

दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार. किती छान पद्धत आहे भारतीयांची हात जोडून अभिवादन करण्याची!!  

समोरच्याचे मन जिंकायला दोन करतल पुरेसे आहेत. कोणाला धीर देतांना त्याचे दोन्ही करतल आपल्या दोन्ही करतलांनी घट्ट धरले तर समोरच्याला किती मोठा दिलासा मिळतो ते शब्दांत सांगणे कठीण आहे.

अर्घ्य देतात तेही ह्याच करतलांच्या ओंजळीने आणि एखाद्या स्वमालकीच्या गोष्टीवर पाणी सोडतात तेही ह्याच ओंजळीने!!

ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे दोन्ही करतल जोडून प्रार्थना केली आणि ‘पसायदान’ मागितले… l!

खरंच परमेश्वराने केलेल्या या छोट्या छोट्या योजना माणसाला आत्यंतिक समाधान देऊन जातात. आणि मन जेव्हा असे समाधानाने भरून जाते, तेव्हा आपोआपच शब्द ओठी येतात……….

तेथे कर माझे जुळती!!  

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सावरकर भारतात अवतरोत पुन्हा… कवी : ह. त्र्यं. देसाई ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? वाचताना वेचलेले ?

☆ सावरकर भारतात अवतरोत पुन्हा… कवी : ह. त्र्यं. देसाई ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे

(२८ मे.. स्वा. सावरकर जयंती – त्यानिमित्त त्यांना आदरांजली)

प्रभु चरणी हिंदु राष्ट्र करित प्रार्थना

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। ध्रु।। 

*
‘अभिनव भारत’ नामे क्रांती-कारिणी

संघटना निर्मियली देश-व्यापिनी

शत्रूच्या शिबिरातहि ठाण मांडिले

क्रान्तिस्तव देशबंधू तेथ जमविले

करूनि तया शपथ बद्ध योजिले रणी

संगरार्थ शस्त्रात्रे जमविली झणी

संघटन-क्रांतीने राष्ट्र तारण्या

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। १।। 

*

सत्तावन-वर्षी ना बंड जाहले

स्वातंत्र्यास्तव राष्ट्रे समर लढविले

संशोधन करुनि नवा ग्रंथ निर्मिला

मॅझिनीचा चरित-ग्रंथ तेवि रचयिला

उभय जप्त झाले तरी गुप्त मुद्रिले

सर्वत्रहि युक्तीने धाडुनी दिले

अभिनव भारत वैभवशालि बनविण्या

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। २।। 

*

त्रस्त आंग्ल सरकारे अटक करुनिया

अंदमान कारागृहि कोंडिले तया

शिक्षा जरि वर्षे पन्नास जाहली

यातनामय भिन्न परी धृति न भंगली

‘कमला’ सम नवकाव्या तेथ रचियले

बंदीजना शिक्षित नी शुद्ध बनविले

हिंदु-बंधु विघटन ते त्वरित रोखण्या

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। ३।। 

*

रत्नागिरीमाजि स्थलबद्ध जै असे

लेखन भाषण उत्सव विविध करितसे 

शुद्धिकार्य सहभोजन करवूनी स्वयें

जाति-भेद निर्मूलन घडविले तये

मंदिरही पतितपावनाख्य उभविले

आणि हिंदु-संघटन-प्रेम निर्मिले

चेतविण्या पुनरपि या हिंदवी जनां

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। ४।। 

*
हिंदुसभाध्यक्ष बनून राष्ट्र जगविले

झुंजुनिया प्रथम निजामासि नमविले

उत्तेजुनि हिंदूंना सैन्य वर्धिले

त्यायोगे ‘नेताजी’ समर झुंजले

कट पाकिस्तानाचा शिजत पाहुनी

वंग नि पंजाब अर्ध रक्षिला झणी

कर्तव्य न उरता उपवास योजिला

‘आत्मार्पण’ करुनि धन्य धन्य जाहला

देवा! नव देहाने त्यास धाड ना

सावरकर भारतात अवतरो पुन्हा।। ५।। 

(त्यांच्याच ‘शतपैलू सावरकर, तिसरी आवृत्ती, या स्वा. सावरकर प्रेमी मंडळ, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार)

रचयिता – ह. त्र्यं. देसाई

प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पुणे स्पेशल दवाखाना!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “पुणे स्पेशल दवाखाना! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

 — जराशी गंमत हं 🤪

:: डॉ…., सदाशिव पेठ यांची नियमावली ::

  • उधारी अजिबात नको! आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील!
  • लिहून दिलेली पूर्ण ट्रिटमेंट घ्यावी! अपूर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरांचेच नाव बदनाम करतात!
  • प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होईल असा काही नियम/नवस नाही! मी डॅाक्टर आहे, तुमचे कुलदैवत नाही!
  • पेशंटने लुंगी/बनियन/बरमुडा घालून दवाखान्यात येऊ नये! आपण चेन्नई मध्ये राहत नाही!
  • सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्यात!
  • (तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)
  • एका पेशंटसोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे!
  • इष्टमित्र सहपरिवार यायला इथे आम्ही लग्नाची पंगत बसविलेली नाही! तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगू नयेत! आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल! एका पेशंटवर त्याच्या अख्ख्या घरादाराची तपासणी फ्री, ही योजना आमच्या दवाखान्यात तरी नाही,
  • इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी लहान मुलांसारखा आकांडतांडव करण्यासाठी हा बालवाडीचा वर्ग नाही!
  • कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणून त्या घेऊ का असे विचारुन डॅाक्टरांचा वेळ घेऊ नये!
  • (घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)
  • कन्सलटंट कडून तपासून आल्यावर ती फाईल फॅमिली डॅाक्टरकडे परत दाखवायला आणायची नाही! (तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डॅाक्टर कधीही गॅासीपींग करत नाहीत)
  • कुठल्यातरी डॅाक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डॅाक्टरांवर काढू नये! (इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डॅाक्टर्संनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला अनंतात विलीन व्हावे लागेल) 
  • तुम्ही ग्राहक बनला, तर डॅाक्टर दुकानदार बनेल!
  • तुम्ही आधी ‘माणूस’ बना, मग डॅाक्टर अवश्य ‘देवमाणूस’ बनतील…!

-ट्रिटमेंट पुरता आपला डॉक्टर!

धन्य ते पुणेकर!!

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शून्यातून विश्व, की विश्वातून शून्य…!!!” – लेखक : पु. ल. देशपांडे – संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

शून्यातून विश्व, की विश्वातून शून्य…!!!” – लेखक : पु. ल. देशपांडे – संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

शून्यातून विश्व, की विश्वातून शून्य…!!!

– – – पु. लं… च्या शब्दात…

शून्यातून विश्व,

 की विश्वातून शून्य…!!!

 टू रुम किचनचा 

 एखादा फ्लॅट…

 दोन चार एकरचं 

 फार्म हाऊस… ,

 एखादी चार चाकी गाडी 

 आणि भौतिक वस्तूंचं 

 प्रदर्शन मांडता आलं, की

 आपण म्हणतो…

अमक्या-तमक्यानं 

 शून्यातून विश्व 

 निर्माण केलं….!!!

 म्हणजे होतंय कांय, की 

 सुख मिळेल, या आशेनं 

 माणूस श्रीमंत होण्यासाठी

 धडपडतोय, पण सुखी 

 कांही दिसत नाही…!!!

 आपणचं म्हणतो, की

आमच्या लहानपणी खूप 

 मजा यायची…

 खूप करमायचं,

 घर भरलेलं असायचं…

 दिवस कधी मावळायचा 

 ते कळायचंच नाही…!!!

 मग आता

 कांय झालं???

मजा कुठं गेली???

 एकटं एकटं कां वाटतं…???

 छातीत धडधड कां होते…???

 कशामुळं करमत नाही…???

 कारण…

 “विश्व निर्माण करण्याची” 

 व्याख्या कुठंतरी चुकली…!!!

 विश्व निर्माण करणं 

म्हणजे…

नाती गोती जपणं…

 छंद जोपासणं…

 पाहुणे होऊन जाणं…

 पाहुण्यांचं स्वागत करणं…

 खूप गप्पा मारणं…

 घराच्या उंबऱ्यात 

 चपलांचा ढिग दिसणं…

 खळखळून हसणं…

आणि…

 काळजातलं दुःख सांगून

 मोकळेपणानं रडणं…!!!

 या गोष्टी आपण

 प्राप्त करू शकलो, तर…

 “शून्यातून विश्व 

 निर्माण केलं” असं म्हणावं…

 तुम्हीच सांगा…

आपल्या आयुष्यांत या 

 सर्व गोष्टींची वाढ झाली,

 की घट झाली…???

 तुमचं खरं दुःख तुम्ही

 मोकळेपणानं किती 

 जणांना सांगू शकता???

 असे किती मित्र, शेजारी,

 नातेवाईक आपण निर्माण 

करू शकलो…???

 खूप कमी,

 किंबहूना नाहीच…!!!

 मग आपण 

 “विश्व निर्माण” 

 केलं कां…???

 तर नाही…

 

 मित्रहो,

रजिस्ट्रीच्या कागदाच्या 

 फायली म्हणजे विश्व…???

 भौतिक साधनांची रेलचेल 

 म्हणजे विश्व…???

 नाही…!!!

 लॉकरमध्ये ठेवलेले 

 हिरे मोत्यांचे दागिने 

 म्हणजे विश्व…???

मुखवटे घातलेल्या 

 चेहऱ्यांची गर्दी 

 म्हणजे विश्व…???

 नाही…!!!

 हे समजून 

 घ्यावं लागेल…!!!

 मोठं बनण्याच्या

 दडपणामुळं…

आणि मग कामाच्या 

 व्यापामुळं…

 नाती दूर जाणार 

 असतील,…

 इतरांना तुच्छ लेखण्यामुळं

 आणि अहंकारामुळं माणसं 

 जवळ येणार नसतील…

 दुःख सांगायला,

मन हलकं करायला 

 जागांच उरणार नसेल,

 तर…

 आम्ही शून्यातून 

 विश्व निर्माण केलं,

 की…

 विश्वातून शून्य…?????

लेखक : पु. ल. देशपांडे 

संकलक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पैसा एकच आहे पण…’ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘पैसा एकच आहे पण… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात – – 

१) शाळेत दिले तर त्याला “फी” म्हणतात.

२) लग्नात दिले तर त्याला “हुंडा” म्हणतात.

३) घटस्फोटात दिले तर त्याला “पोटगी” म्हणतात.

४) दुसऱ्यास दिले तर त्याला “उसने दिले” म्हणतात.

५) शासनास दिले तर त्याला “कर” म्हणतात.

६) न्यायालयात दिले तर त्याला “दंड” म्हणतात.

७) निवृत्त व्यक्तीस दिले तर त्याला “पेंशन” म्हणतात.

८) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले तर त्याला “पगार” म्हणतात.

९) मालकाने कामगारास दिले तर त्याला “बोनस” म्हणतात.

१०) बँकेकडून दिल्यास त्याला “कर्ज” म्हणतात.

११) कर्जाची परतफेड होत असताना त्यास “हप्ता” म्हणतात.

१२) सेवा केल्याबद्दल दिल्यास त्याला “टिप” म्हणतात.

१३) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास त्याला “खंडणी” म्हणतात.

१४) अवैध कामासाठी दिल्यास त्याला “लाच” म्हणतात.

१५) भाडेकरूने घरमालकास दिल्यास त्याला “भाडे” म्हणतात.

१६) सामाजिक/धार्मिक कार्यास दिल्यास “देणगी” म्हणतात.

१७) देवालयास/मंदिरास दिले तर “नवस” म्हणतात.

१८) लग्नकार्यात दिले तर त्याला “आहेर” म्हणतात.

१९) पुरोहित, भटजी, पुजाऱ्याने घेतले तर त्याला “दक्षिणा” म्हणतात.

२०) सर्व पैशांचा ताळमेळ लावला तर हिशोब आणि वर्षांचा हिशोब मांडला तर बजेट म्हणतात.

२१) पैसे उरले तर शिल्लक आणि कमी पडले तर तूट.. ,.

असा हा पैसा जीवनभर माणसाला पळवतो आणि माणूस त्यामागे सदैव धावत असतो…. गरीब असो वा श्रीमंत!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गृहिणीपणाचा उत्सव – ‘चैत्रगौर’…” – लेखक : श्री विनय मधुकर जोशी ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “गृहिणीपणाचा उत्सव – ‘चैत्रगौर’” – लेखक : श्री विनय मधुकर जोशी ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया. आजपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो. देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो. अनेक शुभ चिन्हांची रांगोळी” चैत्रांगण ” काढली जाते.

गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते. गौरी हि भौतिक समृद्धीची देवता. अन्नधान्य, वात्सल्य, धन संपती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा. आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान! . योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते. बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट.

पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व?

शिव म्हणले साफ खोट आभासी आहे हे,

 विश्वातील सौंदर्य, मांगल्य, नातीगोती???

ते हि असत्य बर मग आपण खातो ते अन्न तरी?

तेही खोट, असत्य, आभासीच, फक्त ब्रह्म तत्वच सत्य! !

झालं …. गौरीला आला थोडा राग. ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खर बाकी सगळ आभासी ना. या क्षणी मी अंतर्धान होते.

गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले, नात्यांचा गोडवा उडाला, घराचे घरपण हरपले, सात्विक सौंदर्य विरले, आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्न धान्य सुद्धा अकस्मात संपले. शिवाना वाटले हरकत नाही.. या वाचून जगाचे काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्या जगातले देव, मानव, ऋषी, पशु पक्षी सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले. महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म कसलं ज्ञान. आधी अन्न द्या मग पुढ्च बोला. पण अन्न आणायचे कुठून??

कोणीतरी सांगितल अख्या विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले.

ओम भवती भिक्षां देहि.

आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य??

महादेवानी पाहिलं, आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे, मांगल्य लेवून, पावित्र्य पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र, वात्सल्याच्या पळीने ती प्रतेक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती, शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला.

शिव म्हणाले ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी, त्यासाठी सकस अन्न हवे, अन्न हे पूर्णब्रह्म. त्याचीच भिक्षा दे! ! !

ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।

पार्वती हसली, तिने आनंदने शिवांना भोजन दिले, शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले.

त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस, जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.

हि अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींच प्रतिक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवर देखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेऊ घालत होती. परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे. कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात. तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं, नाती जपावीत, घराला घरपण द्याव. हे सगळं करत असताना “गृहिणी कुठे काय करते? ” असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.

या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर. रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते. किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात. त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वैगरे. गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.

स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।

दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥

पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे। 

ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।

लेखक : श्री विनय मधुकर जोशी

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “ओव्या.. निवृत्तीपूर्वीच्या आणि नंतरच्या…” – कवयित्री : सुश्री अमिता नागले ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “ओव्या.. निवृत्तीपूर्वीच्या आणि नंतरच्या…” – कवयित्री : सुश्री अमिता नागले ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

ओव्या निवृत्तीपूर्वीच्या – –

अरे संसार संसार घड्याळाचा झाला गजर

उठा हजेरी द्या आता स्वैपाकाच्या ओट्यावर

 *

अरे संसार संसार झाली पहाट पहाट

काम करता करता घेऊ चहा घोट घोट

 *

अरे संसार संसार चार जिवांचा विचार

डब्यासाठी काय करू? समस्येचा होई भार

 *

अरे संसार संसार सकाळची वेळ छान

शिट्टी कुकरची कानी आणी घड्याळाचे भान

 *

अरे संसार संसार कामे आटपली सारी

ओटा पुसता पुसता गिझर मी अॉन करी

 *

अरे संसार संसार कावळ्याची अंघोळ होई

आरशात बघण्यास मुळी सुद्धा वेळ नाही

 *

अरे संसार संसार पळा पळा लोकल गाठा

जागा मिळताच आत गर्दीतच हुश्श म्हणा

 *

अरे संसार संसार बँकी पोचले मी बाई

वेळ सुरू होता होता काउंटरवर माझ्या घाई

 *

अरे संसार संसार जेवायला लंच रूम

डब्यांची ती देवघेव आणि हास्याला उधाण

 *

अरे संसार संसार निघायची झाली वेळ

पुन्हा गर्दी तीच थोर आणि जीवालागी घोर

 *

अरे संसार संसार जाता गाठावा बाजार

मनातील चिंता मोठी रात्रीसाठी करू काय?

 *

अरे संसार संसार बसू नये मी निवांत

देवापुढे मात्र नित्य लावायची सांजवात

 *

अरे संसार संसार रोजचीच भाजीपोळी

मिळे बदल यातून फक्त एका रविवारी

 *

अरे संसार संसार जेवणेही उरकली

आता उघडून पाहू पेपराची पाने दाही

 *

अरे संसार संसार झोप डोळ्यात साठली

उद्या काय करू याची चिंता मनात दाटली

 *

अरे संसार संसार पाठ गादीला टेकली

डोळ्यामध्ये माझी सारी स्वप्ने कशी झाकोळली

 ☆ ओव्या निवृत्तीनंतरच्या – – ☆

अरे संसार संसार झाली पहाट पहाट

कानावर पडे माझ्या पाखरांचा किलबिलाट

 *

अरे संसार संसार सकाळची वेळ छान

हाती कप चहाचा नी वाची पेपराचे पान

 *

अरे संसार संसार घेऊ चला मॉर्निंग वॉक

चालताना करू थोडा व्यायामही झटपट

 *

अरे संसार संसार स्वाद घेऊ संगीताचा

आता नाही ऐकू येत कुकरच्या मला हाका

 *

अरे संसार संसार न्याहारीस मिळे सवड

गरमागरम इडली चटणी आणि चविष्ट सांबार

 *

अरे संसार संसार अंघोळीस वेळच वेळ

देवपूजेसाठी मिळती फुलेपत्री ताटभर

 *

अरे संसार संसार लेखन वाचन अपार

आनंदास माझ्या नसे आता मुळी पारावार

 *

अरे संसार संसार छंद जोपासावे किती

राहिलेल्या आवडींना आता मिळतसे मुक्ती

 *

अरे संसार संसार दुपारची वामकुक्षी

आणितसे माझ्या ठायी उर्जाभरी जीवनशक्ती

 *

अरे संसार संसार उन्हे उतरू लागती

छाया लांबता लांबता जगण्यासी अर्थ देती

 *

अरे संसार संसार आता उजळूया वाटा

देऊ दान आनंदाचे जगास या जाता जाता

 *

अरे संसार संसार संधीप्रकाश दाटला

ज्ञानदीप उजळूया अंधाराच्या वाटेकरिता

 *

अरे संसार संसार नाही वाटत लोढणं

आयुष्याच्या वाटेवरचं आहे दैवी ते लावण्य

 *

अरे संसार संसार वेळा निरोपाची आली

किंचितही दुःख नसे, नसे किंचितही भिती

 *

अरे संसार संसार डोळ्यांतील स्वप्ने सारी

साकारलो म्हणती आता उभी ठाकोनी सामोरी

कवयित्री : सुश्री अमिता नागले

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परतफेड…(बोधकथा) – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? वाचताना वेचलेले ?

☆ “परतफेड…(बोधकथा)” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

कसे आहात..? ? “

एवढा एकच प्रश्न तिने विचारला.. , आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो…

ती म्हणाली.. “भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधीही डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.. “

त्या नंतर तिने जे काही सांगितलं.. त्यामुळे माझं अंतरबाह्य परिवर्तन झालं..!

तिनं काय सांगितलं..? ?

ती शांतपणे म्हणाली की.. “आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाही किंवा नसावा.. कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत… आणि त्यामुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..! “

“माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी… “

“जसं तुमच्या सौभाग्यवती गेल्या, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडुन झाली.. तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा… “

“मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत.. ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण नाही… तेंव्हा मनातल्या मनातसुद्धा परमेश्वराला उद्देशून “तु मला का जगवलंस..? ” हा प्रश्न विचारू नका.. “

“कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं.. , तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा… “

“बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर, ‘Account Closed… ‘ असा शिक्का मारतात ना.. , त्याप्रमाणे जेंव्हा एकांत मिळेल तेंव्हा आपले किती Account Closed झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका… “

“कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं… “

तेंव्हा मनाला सांगा.. “बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून मी तुझ्यापासून स्वतःला मुक्त करत आहे..! “

“हा प्रयोग करा… आणि किती खाती पटापट बंद होतायेत ह्याची प्रचिती घ्या.. मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही.. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती असं समजा. “

परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त… “परतफेड आणि परतफेड” हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल….

आणि “मी येते… ” असं म्हणत ती निघून गेली..

इतकं सगळं बोलून गजा उठला आणि म्हणाला.. , “आज ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली.. मी आयुष्य खुपच मस्त जगत आहे.. तृप्त आहे..

तुम्ही ‘सहन करतो, सहन करतो.. ‘ हे इतक्या वेळा सांगितलंत, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही.. तुम्ही फक्त दुःख वाटत असता.. “

“जो सहन करतो ना.. तो कधी बोलत नाही..! “

चला तर मित्रांनो, आजपासून आपणसुध्दा आपल्या आयुष्यात कोणाकडुन अपेक्षाभंग करुन घेण्याऐवजी फक्त “परतफेडीचं” आयुष्य जगायला सुरुवात करुन आयुष्य मजेत घालवुया..

कवी: अज्ञात

प्रस्तुती : सौ.अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रेमाची ताकद…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रेमाची ताकद…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला आणि राधा शांतचित्त होती.

गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली…..

“कसे आहात द्वारकाधीश? “

जी राधा त्याला ‘कान्हा’ ‘कान्हा’ म्हणायची तिने “द्वारकाधीश” असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला,

“राधे, मी आज ही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस …! खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती. “

राधा म्हणाली, “खरं सांगू? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही. कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच होतास त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जावू नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही.

प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू? “

श्रीकृष्ण ऐकतच राहिला…..

राधा म्हणाली, “तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे, गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस, तू खूप मोठा झालास, तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली. पण ह्या प्रगतीमध्ये तुझी किती अधोगती झाली? यमुनेच्या पवित्र, गोड पाण्यानी तुझे आयुष्य सुरु झाले, त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जावून पोहोचलास (द्वारका समुद्रकिनारी होती/आहे). “

“एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास? “

“कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस? “

“कान्हा आणि द्वारकाधीश ह्यांत काय फरक आहे सांगू ….? “

“तू कान्हा असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास, सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं! ! “

“प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे … ‘युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो’. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही! ! “

“तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस, महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास? “

“तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देवून टाकलेस? “

“तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास, त्याचा मार्गदर्शक बनलास, ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले? “

“तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना? तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास! ! ” 

“इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा? मग जा, पृथ्वीवर जावून बघ …. तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध. “

“नाही सापडणार तुला शोधूनही! ! “

“जिथे जाशील तिथे घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन. “

“होय, कान्हा मला गीतेचे महत्व माहिती आहे. आज ही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसं ही गीतेला पुज्य मानतात पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकानरेश श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात. “

“गीतेमध्ये माझा – राधेचा – तर दुरून ही उल्लेख नाहीये पण आजही लोकं गीतेचा- तुझ्या महान भगवद् गीतेचा- समारोप करताना ‘राधेकृष्ण राधेकृष्ण’ असाच जप करतात!! “

हीच ती प्रेमाची खरी ताकद…!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सौन्दर्य वैशाखाचे…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “सौन्दर्य वैशाखाचे…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. सध्या वैशाख महिना सुरू आहे. या महिन्यात त्रेता युग प्रारंभ झाले. याच महिन्यात विष्णूंचे भगवान परशुराम, नरसिंह आणि कुर्म अवतार झाले. या महिन्यात वेद प्रकटले. या महिन्यात सीता नवमी, नारद जयंती, भगवान बुद्ध जयंती.. आद्य शंकराचार्य जयंती असते. असे महत्त्वाचे सण असलेला हा पवित्र मास.

या वैशाखात वाढणारा उष्मा मात्र त्रास देतो. पण जीवनात प्रत्येकाला वैशाख वणवा सोसावाच लागतो. जणू सहनशक्तीची ती परीक्षाच. पण परमेश्वर या रुक्षतेतही जो दिलासा देतो त्यासाठी कृतज्ञ राहायलाच हवे.

हा दिलासा मिळतोय तो बहरलेल्या निसर्गातून. हे बघण्याची दृष्टी लाभली होती अण्णासाहेब किर्लोस्करांना. त्यांचे ‘संगीत सौभद्र’ हे सन १८८२ चे अजरामर नाटक. त्यात त्यांनी वैशाखाचे असे काही अप्रतिम वर्णन केले आहे की हा ‘सौंदर्य मास’ ठरलाय.

या महिन्यात बहरलेल्या गुलमोहराने आकाश व्यापलेय. मोगरा.. जाई जुई.. अनंत.. गुलाब सगळ्याच फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतोय. मनुष्यच आम्ररसाने संतृप्त झालाय असे नाही तर आम्रवृक्षावर आम्ररस मनसोक्त पिऊन कोकिळ आनंदाने गात आहेत. फुलांभोवती गुंजारव ऐकू येतोय.

लग्नासाठी आतुर वर वधूंना पावणारा.. स्वप्नपूर्तीचा हा काळ. जाईच्या सुगंधी फुलांचे हार एकमेकांना घालून नवजीवनाचा प्रारंभ केलाय. लग्न मंडपात गर्दी जमलीय. वाद्याचा गजर सुरू आहे. एकुण काय तर हा सौंदर्य मास. सध्या झाडावरच्या फुलांचे फळात रूपांतर करण्यासाठी धडपडणारा, जीवन सुगंधी करणारा हा माधव.. वैशाख मास.

 वैशाखमासी वासंतिक 

 समय शोभला ।

 आम्रासव पिऊनि

 गान करिती कोकीला ॥धृ॥

*

 या जाईजुई मोगरिला

 बहर तो अला ।

 गुंजारव करण्यात 

 गुंग मधुप जाहला ।

 नव पल्लव ते फुटति

 सकल वृक्षगणाला ।

 कुसुमगंधयुक्त मंद

 वात सुटला ॥१॥

*

 अति थंडगार चंदनाचि

 उटी लावुनी ।

 वर जातिपुष्प-धवल हार

 कंठि घालुनी

 रमतात युवति चांदण्यात

 पतिस घेउनी ।

 लोका शीतोपचार

 इष्ट वाटला ॥२॥

*

 नगरांत लग्नमंडपाचि

 दाटि जाहली ।

 नरनारि नटुनि वीर्थित 

 मिरवित चालली ।

 बहु वाद्यगजर दुमदुमुनी

 गर्दि उसळली ।

 दक्षिणार्थ भिक्षुकगण 

 पळत सुटला ॥३॥

*

(गीत : अण्णासाहेब किर्लोस्कर.)

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares