☆ “बासरी” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘ मीपणाच्या ‘ अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, म्हणजे समस्त गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, ‘आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? ‘
बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल. ‘
अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं… बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ… ना एखादं वळण… मी पोकळ आहे. त्या पोकळीतूनच माझ्यातला अहंकार गळून पडलाय.
माझ्या अंगावरच्या सहा छिद्रांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.
मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली, तरच मी बोलते.
तो जशी फुंकर मारतो, तशी मी बोलते. ‘ यावर गोपी निरुत्तर झाल्या.
अहंकाररहित शरीर (जीवन)…
हीच श्रीकृष्णाची बासरी होय!
ज्याने आपल्या जीवनातून अहंकार घालवला, ‘मी’पणाला आपल्यापासून दूर केलं, त्याचंच जीवन हे शांतीपूर्ण, सुखमय, आनंदमय व त्यागमय झालंय आहे. आणि तोच मनुष्य अध्यात्माच्या मार्गावर आरूढ झाल्याशिवाय राहत नाही. तो एकनिष्ट श्रीकृष्णभक्ती मध्ये तल्लीन होऊन, नश्वर सुखाचा त्याग करून, खऱ्या सुखाचा, आनंदाचा अनुभव करतो…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या आयुष्यात सजीव भेटतातच. तशाच काही निर्जीव गोष्टीही अवचित, अचानक भेटतात. पण निर्जीव तरी कशा म्हणू? कारण अशा वस्तू कधी सुखावतात, अल्लद मोरपीस फिरवतात. काही रडवतात. काही तर आपल्या आठवणींचा अगदी आतला, आतला कप्पा उघडून देतात. पुनःप्रत्ययाचा आनंद देतात.
अशा अचानक, अवचित गाठ पडलेल्या अलक कथा…
अण्णासाहेब सकाळचे फिरून आले. सूनबाई एप्रिलच्या कडकडीत उन्हात आमची परंपरागत सोन्याची जर असलेली पैठणी दांडीवर ऊन दाखवायला घालत होती.
अण्णासाहेब तिकडून जात असताना दांडीवरच्या पैठणीने त्यांच्या अंगाशी लडिवाळपणे घसट केली. “आलात फिरून, दमला असाल, ” पाठोपाठ बोलण्याचा भास.. गर्रकन अण्णासाहेब 65 वर्ष मागे गेले.. अंगापेक्षा बोंगा मोठा असूनही पैठणी सावरत असलेली कावेरी आठवली. क्षणभर त्या पैठणीला हळूवार कुरवाळत म्हणाले “आज अचानक गाठ पडे. “
सूनबाईच्या नजरेतून सासऱ्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी सुटले नाही. तिचेही डोळे पाणावले.
2. दिवाळीची साफसफाई चालू होती. माळ्यावरचे सामान खाली आले होते. नको असेल ते सामान काढून टाकायचे, असे ऑडिट चालू होते. एवढ्यात चांदीची मूठ असलेली सामानातली काठी उचलून चार वर्षांचा नातू घोडा घोडा खेळायला लागला. शांताक्का ती काठी पाहून खूप मागे जाऊन पोचल्या. नातवाचे खेळून झाल्यावर ती काठी हातात धरून शांताक्का कितीतरी वेळ नुसत्याच बसून होत्या. कुठूनसा आवाज येत होता, “वापर तू आता, फिरायला जाताना असू दे आधाराला. “
काठीचे निमित्त.. पण एवढ्या वर्षांनी “आज अचानक गाठ पडे” असे वाटून मन भूतकाळात फिरून आले.
आई खूप आजारी होती. शेवटचेच आजारपण. भेटायला गेले तेव्हा मला क्षीण आवाजात म्हणाली, “ताई, तुला काय देऊ ग? हातातल्या दोनच बांगडयांपैकी एक तू घेऊन जा,” असे म्हणून काढत होती.
“आई ग, बांगडी नको ग.. तुझी आठवण म्हणून तुझी एक मऊसूत नऊवारी साडी घेऊन जाते.. त्याची छानशी गोधडी शिवून रोज पांघरूण म्हणून वापरेन. तेवढीच तू कायम माझ्या अगदी जवळ असशील ना ग.”
आई गेली, पण होती माझ्या अगदी जवळच. गोधडी थोडी जीर्ण झाली तरी मी वापरत होते. एकदा लेकाने नवीन छान पांघरूण आणले आणि म्हणाला “आता हे वापर आई. ” त्याचे मन मला मोडवले नाही. पण अंथरुणाच्या तळाशी मी गोधडी ठेवून दिली होती. माझ्या आईची आठवण.
नातसुनेला मुलगा झाला. यांच्या माॅडर्न जमान्यात दुपटी शिवायला छान मऊसे काही सापडेनाच. मग मीच माझ्या आईच्या गोधडीची चार दुपटी शिवली..
आत्ता तो गुलाम तिच्यावरच पहुडला आहे.. जणू काही त्याची खापरपणजी त्याला अंगाई म्हणत जोजावत आहे..
मनोमन मी आणि आई बाळाजवळ बसलो होतो.. “आज अचानक गाठ पडे”.
4. मी सोळाच वर्षांची होते.
नुकतीच अकरावीची परीक्षा झाली होती आणि तेव्हाची फॅशन म्हणून आम्ही सगळ्या मैत्रीणींनी मिळून उंच टाचाच्या चपला खरेदी केल्या होत्या.. टाॅक टाॅक करत रुबाबात चालायचे स्वप्नरंजन होते तेव्हाचे.. दोनच महिन्यांत माझे लग्न ठरले(तेव्हाचा काळ). आम्ही दोघे उंचीने जवळपास सारखेच होतो. झाले! टाॅक टाॅक चालायचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. उंच टाचांच्या चपला बासनात गुंडाळून ठेवल्या. परवाच नातीला त्या सापडल्या..
म्हणाली, “आज्जी तू का नाही वापरल्यास ग? आता घालत जा.”
दोन्ही पायांची कनी Replacement झाली होती. आणि आत्ता त्या टाॅक टाॅक अवचित समोर आल्या. “आज अचानक गाठ पडे”.
5. मोबाईल ची लांब रिंग वाजली. बंगलोरहून मावसभाऊ बोलत होता. लग्न होते त्याच्या लेकाचे. त्यासाठी त्याला आमच्या आईच्या पिढीतील एका नातेवाईकांचा पत्ता हवा होता. खूप जुने असल्यामुळे मोबाईल मध्ये त्यांचा काँटॅक्ट मिळणे अशक्यच होते. म्हणूनच त्याने मला फोन केला होता.. माझ्याजवळ माझ्या आईची डायरी होती. आणि मोबाईलच्या जमान्यातही मी ती वेळोवेळी अपडेट करत होते.
त्याला हवा होता तो पत्ता मी दिला आणि सहज म्हणून डायरी चाळत होते.
तेव्हा त्या डायरीतून टुपकन दोन जुनी पोस्टकार्डं माझ्या मांडीवर पडली.. माझ्या नमू आणि कुसुम मावशांनी लिहिलेली पत्र होती ती.. काय नव्हते त्या पत्रांमधे? अगदी वरच्या टोकापासून ते थेट पत्त्याच्या लाईनपर्यंत गिचमीड करून मजकूर ठासून भरलेला होता.. ती नुसती गिचमीड नव्हती. तर त्यात ओतप्रोत माया, प्रेम, काळजी भरून वाहात होती.. ओसंडत होती.
आजच्या मोबाईलच्या जमान्यातील इमोजी, खोटे खोटे वरपांगी मेसेजेस, वाढदिवसानिमित्त आणि मेल्या-गेल्यां बद्दल खोटी सहानुभूती.. या पत्रांच्या पार्श्वभूमीवर सगळेच कसे उघडे बोडके पडले होते..
जुना पत्ता शोधता शोधता मला माझ्या जिवाभावाच्या, माझ्यावर निखळ, निस्वार्थी प्रेम आणि माया करणाऱ्या मावशा भेटल्या.. कित्ती तरी वेळ आम्ही बोलत होतो.. “आज अचानक गाठ पडे.. आज अचानक गाठ पडे.”
लेखिका : श्रीमती प्राची पेंडसे
प्रस्तुती : श्रीमती राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘अंतिम सत्य : म्हाताऱ्यांसाठी…’ – लेखक :डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆
☆
१) पुरुष म्हातारा होतो, स्त्रिया वयस्कर होतात.
२) पुरुषाने त्याच्या मुलामुलींची लग्ने पार पाडल्यानंतर, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आर्थिक स्थैर्याची काळजी घेतल्यानंतर, त्याचे कुटुंबातील जेष्ठ आणि श्रेष्ठ स्थान संपुष्टात येते.
३) नंतर त्याला कुटुंबावर एक ओझे म्हणूनच वागवले जाते. एक विक्षिप्त, कटकट्या, अप्रत्याशित म्हातारा म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते.
४) त्याने पूर्वी मुलांच्या व पत्नीच्या संदर्भाने घेतलेल्या कठोर निर्णयाची चिरफाड या काळात करीत त्याला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दोषीच ठरवले जाते. त्याने जर खरोखर चुका केल्या असतील तर देवच त्याचे रक्षण करो.
५) वयस्कर स्त्रीकडे मात्र मुलांकडून व सुनांकडून सहानुभूतीने पाहीले जाते, कारण तिच्याकडून करुन घेण्यासारख्या गोष्टी अजूनही असतात.
६) वयस्कर स्त्री योग्य वेळी म्हाताऱ्याची पार्टी सोडून मुलांच्या व सुनांच्या पार्टीत निघून जाते.
७) म्हातारा वयाने जास्त असल्यास, त्याच्यानंतर मुलगा आपल्यापासून दूर जाऊ नये, आपली काळजी घ्यावी म्हणून वयस्कर स्त्री सुनेशी जमवून घेते.
८) पुर्वायुष्यामधे कितीही कर्तृत्व गाजवलेले असो, त्याची पुण्याई म्हातार्याच्या कामी येत नाही.
९) वयस्कर स्त्री मात्र पुर्वपुण्याईचे व्याज खाऊ शकते.
१०) ज्यांची वंशपरंपरा असलेली भरपूर शेती आहे (की ज्याचा मुलाबाळांना मोह पडू शकतो) त्यांची अवस्था थोडी बरी असते. ज्यांनी आपल्या पश्चात मुलांच्यात भांडणे नकोत म्हणून खातेफोड केलेली असेल तर त्यांच्याही नशिबी वर सांगितल्याप्रमाणेच हाल असतात. शक्यतो खातेफोड करुच नये.
११) कोणत्याही हॉस्पिटलमधे जाऊन बघा. म्हातारा ॲडमिट आहे की म्हातारी हे नातेवाईकांच्या पाणावलेल्या डोळ्यांवरून लगेच कळते. म्हातारा ॲडमिट असेल तर मुलगी सोडून कोणाच्याही डोळ्यात पाणी नसते.
१२) तात्पर्य : वय झाल्यावर पुरुषाने स्वतःसाठी इतरांकडून अपेक्षा न करता जगण्याचे कौशल्य शिकावे. पुरुषच जन्मभर विद्यार्थी असतो हे लक्षात ठेवावे. या जगात कोणीच कोणाचे नसते हे लक्षात घेऊन सर्वांतून अलिप्त राहून स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगावे.
१३) माझा सल्ला, इतरांसाठी जगलेले आठवू नका, उगाळू तर अजिबात नका.
१४) पुराणातसुद्धा कोणत्या स्त्रीने वानप्रस्थाश्रम, संन्यास स्विकारल्याचा दाखला नाही.
१५) संन्यास व वानप्रस्थाश्रम हे पुरुषांसाठीच स्मृतींनी सांगितले आहेत. याचे महत्त्व लक्षात घ्या. आपले पूर्वज दूरदृष्टीचे होते याची खात्री पटेल.
☆
लेखक: डॉ. शिरीष राजे, मानस शास्त्रज्ञ.
प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हक्काचं ठिकाण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
“एक दोन तरी असायलाच हवीत हक्काची ठिकाणं.
“अरे तुझा चेहरा आज असा का दिसतोय? “
” काही नाही रे… “
” नाही कसं? काय झालंय? बोल ना.. “
आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ त्याच्याजवळ रिकामं होतं. एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं.
हेच.. हेच ते “हक्काचं_ठिकाण”.. My Happy Place!!
फक्त आठवून बघा अशी कोणती हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत? मनाला उभारी, खराखुरा विसावा देणारी.. एक एक आठवत चला. एकदम फ्रेश वाटेल! त्या व्यक्तीसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील. कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसलं जातं, भावासोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी.. तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा… sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं!
अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात. आई वडील तर खास हक्काचेच. त्याशिवाय मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण,
भावजय, दीर, नणंद, cousins, नातेवाईक.. कुणीही असू शकतं तुमचं हक्काचं ठिकाण, Your true Happy Place!
जिथे आपुलकी, जिव्हाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी.. मनाला जिवंत करणारी! किंवा अगदी एखादा व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा.. जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक virtual फेरफटका मारला तरी मन एकदम relax होतं!
निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं. मन हलकं हलकं होऊन जातं. अगदी मोरपिसासारखं! तिथे कुठलाच आडपडदा नसतो किंवा show-off ही नसतो. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर घेतलं जातंच, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केलं जात नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत, मन मोकळं वाटतं.
“तुमको देखा, तो ये खयाल आया
जिंदगी धूप, तुम घना साया! “
ही हक्काची ठिकाणंही अगदी अशीच.. सावली देणारी, विश्रांती देणारी.. थकल्याभागल्या जिवाला आणि मनाला! आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी. म्हणून जास्त विश्वास!
अशी हक्काची ठिकाणं अगदी जिवापाड जपूssssन ठेवायला हवीत.. हिऱ्या माणकां पेक्षा जास्त! ती हरवायला नकोत, आयुष्याच्या गडबडीत. कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी.. म्हणूनच “तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं, ” हे त्यांना नक्की सांगायालाच हवं.
कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं, की मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल, जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल? कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज! त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार?
आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं! नाही का?
“खूsssssप बरं वाटलं ना वाचून? मग friends आणि सर्व हक्काच्या ठिकाणांना जरूर शेअर करा आणि सांगा ‘खूsssप बरं वाटतं तुझ्यासोबत’! “
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सेवानिवृत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
नोकरीनंतर निरुपयोगी म्हणजेच ‘रिटायर्ड’ झाल्यानंतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर वेळ घालवणे ही एक भीषण समस्या बनली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोकांनी विविध मार्ग आणि पद्धती शोधून काढल्या आहेत.
काही ‘कष्टाळू ब्रँड’चे लोक निवृत्ती नंतर लगेचच चित्रपटातील ‘रामू काकां’च्या भूमिकेत येतात आणि सकाळी लवकर उठून खांद्यावर टॉवेल टाकून घराची साफसफाई आणि स्वयंपाकघर साफ करायला लागतात.
उरलेल्या दिवसात ते त्यांच्या बायकोसाठी ‘वाहन चालक’ म्हणून सेवा देतात आणि बाजारात खरेदी किंवा चित्रपट वगैरे दाखवतात. अशा लोकांच्या पत्नींनी पूर्वजन्मात काही चांगले कर्म केले असावे, ज्याचे फळ म्हणून त्यांना ही सुखासीन परिस्थिती प्राप्त झाली आहे.
असेही काही लोक आहेत जे निवृत्तीनंतर अचानक अतिधार्मिक बनतात आणि ते यापूर्वी कधी मंदिरात डोकावलेही नसले तरीही सकाळ संध्याकाळ दोन दोन तास विविध मंदिरात पूजा आणि भजन कीर्तन करण्यात घालवतात. अशा लोकांना आपण नोकरीस असताना केलेल्या सर्व गैरकृत्यांच्या पापांतून आता निस्तरले जात असल्याची भावना होत आहे.
सेवानिवृत्तांचा असा आणखी एक वर्ग आहे, ज्यांच्यामध्ये निवृत्तीनंतर अचानक वाल्मिकी आणि तुळशीदासांचे आत्मे प्रवेश करतात आणि ते रातोरात ‘कवी’ च्या भुमिकेत येतात. हे लोक सोशल मीडियावर असे विचार लिहितात की त्यांचे मित्र या काव्य-प्रदूषणाने त्रस्त राहतात पण नाइलाजाने ‘व्वा व्वा’ म्हणणं भाग पडतं.
अशी काही थोर माणसे सुद्धा बघायला मिळतात, ज्यांच्यात ‘राजकारणाचा किडा’ नेहमी धुमाकूळ घालत राहतो आणि नोकरीच्या कार्यकाळात ‘आपण जनतेत खूप लोकप्रिय होतो, ‘ असा त्यांना भ्रम निर्माण होतो आणि निवृत्त होताच ते एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्याशी हातमिळवणी करतात व एखाद्या गटात सामील होऊन निवडणूक लढवतात आणि निवडणुकीत आपटले की ते खूप संतापतात, पण त्यांना हे क्वचितच माहीत असते की नोकरीत असताना त्यांची होणारी विचारपूस किंवा त्यांना ‘मिळणारा मान, होणारा आदर’ हा त्यांच्या आसनस्थ पदामुळे त्यांच्या लाळघोटेपणा करणाऱ्या चमच्यांनी पसरवलेला खोटा आभास होता. मग ते अनेकदा पक्षाच्या कार्यालयाबाहेर लाह्या किंवा चणे खात असताना दिसतात.
निवृत्त वृद्धांचा एक मोठा वर्ग असा देखील आहे जे कुटुंबात कदाचित ‘नकोशे झालेले’ आहेत आणि म्हणूनच त्यांना घराबाहेर पडण्याचा एक अनोखा मार्ग सापडतो. सकाळी दहा वाजता ते स्वत:ची व कुटुंबातील सर्वांची बँकेची पासबुके जमा करतात आणि कुठल्यातरी बँकेत प्रवेश करून त्या पासबुकांच्या नोंदी काढण्यात आणि बँकेच्या वातानुकूलित वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी दिवसाचे एक दीड वाजवतात. हे लोक बँकेच्या ग्राहकांपेक्षा जास्त तेथील कर्मचारी असल्यासारखे दिसतात आणि बँक कर्मचाऱ्यांचे जगणे ते कठीण करुन सोडतात.
वरील सर्व श्रेण्यांव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने सेवानिवृत्त लोकांची आवडती ठिकाणे म्हणजे शेजारची उद्याने, जिथे ते सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या बहाण्याने जमतात आणि त्यांच्यापैकी कोणीही नोकरीत असताना आपापल्या क्षेत्रात कधीही सकारात्मक काम केले नाही, हे साफ विसरून सरकारला शिव्याशाप देण्याचे त्यांचे आवडते कार्य करत राहतात व दीर्घकाळ हळहळ व्यक्त करत असतात.
आमच्या अनेक सेवानिवृत्त बांधवांना हे सर्व अजिबात आवडत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ घरातच राहायला आवडते. अशा लोकांसाठी त्यांच्या सुना व मुलांनी वेळ घालवण्याचे चांगले साधन शोधून ठेवले आहे. आपल्या लहान मुलांना त्यांच्याकडे सोपवून सर्व काळजींपासून मुक्त होऊन ते ऑफिस, मार्केट आणि थिएटरमध्ये जातात आणि हे निवृत्त भाऊ लगेच ‘आजोबा’ च्या भूमिकेमध्ये येतात आणि आपल्या मुलांसाठी ते अत्यंत उपयुक्त आणि कामाचे व मौल्यवान असल्याचे सिद्ध करतात.
ज्यांची मुले-मुली कुठेतरी परदेशात आहेत, तिथे गेल्यावरही हे लोक महिनोनमहिने उत्तम ‘बाळ संगोपन’ सेवा दिल्याबद्दल कृतज्ञ होत आहेत.
यांतील असेही काही आहेत की निवृत्त झाल्यावरही ज्यांचे चेहरे मोहरे अजूनही तेजस्वी, ओजस्वी आणि समाधानाच्या ओघवत्या तेजाने चमकत आहेत. अशांच्याभोवती त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी ते सतत लोकांच्या गर्दीने वेढलेले आहेत. त्यांना आदराने, भेटवस्तू दिल्या जात आहेत.
काही सेवानिवृत्त लोक त्यांचे नोकरीत असतानाचे ‘कारनामे’ ऐकवण्यासाठी ‘श्रोते’ शोधत बागेत फिरतात, कारण बायको त्यांच्या या भाकडकथांना कंटाळालेली असते आणि मुलगा व सून मोबाईलमधून डोकंही वर काढत नाहीत.
काही सेवानिवृत्त लोक कार्यालयातील सवय झालेल्या फुकट चहाची तलफ भागवण्यासाठी जवळपासच्या चौकातील चहाची टपरी आणि जुन्या मित्रांच्या शोधात फिरत आहेत. घरात तर शुगर आणि वाढत्या वयाचे दाखले देत त्यांच्या चहा पिण्यावर बंधन घालण्यात आले आहे.
मला आशा आहे की आपण या वर्णनात स्वत: कुठे बसतो ते शोधत आहात.
मी स्वतः माझी जागा आणि काम निवडण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब करत आहे. उंट कोणत्या बाजूवर बसणार हे बघू या..
तुम्हा सर्वांचे निवृत्ती नंतरचे जीवन सुखमय, आनंदी व स्वास्थ्यपूर्ण राहो
हीच सदिच्छा…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
☆ आलोच पहा… कविवर्य ग. ल. ठोकळ – संकलनकर्ता – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
कविवर्य ग. ल. ठोकळ ह्यांची माझ्या बालपणी खेड्यातील शाळेत ऐकलेली कविता विस्मृतीत गेली होती आणि फक्त पहिली ओळ आणि पायजमा, अर्ध्या बटनपट्टी चा फुल शर्ट आणि गांधी टोपी अश्या वेशातील गुरुजींनी मदर इंडिया तल्या दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेगा ह्या गाण्याची चाल लावून दिलेली आठवत होती. खूप काळ अनेक ठिकाणी शोधल्या नंतर सापडली एकदाची.
लाही लाही करायला लावणाऱ्या, शरीराची काहिली करणाऱ्या ह्या उन्हाळ्यात कविवर्य ठोकळांचा शब्द न शब्द मनाला भिडतो.
☆ जतन करून ठेवण्यासारखे काहीतरी… ☆
☆
आलोच पहा ग्रीष्म अशी दे ललकारी
ओतीत सुटे आग नभी सूर्य दुपारी
या ऊन झळा या करिती तप्त शरीरा
आता कुठला शितळसा विंझण वारा
कासाविस हो जीव, ती सूर्य करांनी
घामेजूनी अंगांग निघे चिंब भिजोनी
देई फिरताना चटके ऊन फुपाटा
अंगात भरे पूर्णपणे शीण गाळाठा
एकेक तरू लागतसे पार झडाया
कोठून मिळावी हिरवी पाखर माया
खाऊन उन्हाळा सुकली ही वनराई
दृष्टीस पडेना हिरवे चार कुठेही
काळी ठिकळे आणिक हे कुंपण काटे
या वाचून शेतात दुजे काही न भेटे
या शुष्क तृणांनी भरल्या पाऊल वाटा
रानात दिसे जीर्ण उभा लाकूडफाटा
बारीक ढगाळी दिसती सुन्न आभाळी
रोडाऊनी ओढ उघडी होत लव्हाळी
झाडांवर पक्षी दिसती केविलवाणी
आणिक पिकांची सरली साखरराणी
ओहोट कधी घेईल हा तीव्र उन्हाळा
देईल कधी पाणकळा सुख जीवाला…
☆
कविवर्य ग. ल. ठोकळ (१९३१)
संकलक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मृत्यू गरजेचा आहे का?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
एका राजाने शहराबाहेर, एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, _
“साधूमहाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?“
साधू म्हणाला, “ हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास की, तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील. “
ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले. गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही. ” त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, “ छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं, तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. “
त्याने साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, “ ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा. म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल. ”
साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला. तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, “आता मी अडीचशे वर्षांचा आहे. तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षांचे माझे बाबा, पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करु.? “
राजाने त्या युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले, तर तो म्हणाला, “ अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडेतीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा. ”
साडेतीनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता, तो म्हणाला, “ मी तरी संपत्ती कुठून देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता ४०० वर्षांचे आहेत. ”
यावर राजा म्हणाला, “ पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय? ” यावर पणाजोबा म्हणाले, “आमच्या घरात दिवसरात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने, गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे. ”
तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले, तर तेही नकोच. कारण ते जास्त भयंकर आहे. राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, “ तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत.
मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा जवळचीच माणसे आपल्याच माणसांच्या जीवावर उठली असती. ”
साधू म्हणाला, “ मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे! “
स्वतः बदला, जग बदलेल!!
१) स्नान करताना नाम घेतले तर ते ‘तीर्थस्नान’ होईल!
२) भोजन करताना नाम घेतले तर तो ‘प्रसाद’ होईल!
३) चालताना नाम घेतले, तर ती ‘तीर्थयात्रा’ होईल!
४) स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो ‘महाप्रसाद’ होईल!
५) झोपताना नाम घेतले तर ती ‘ध्याननिद्रा’ होईल!
६) काम करताना नाम घेतले तर ते कर्म ‘भक्ती’ होईल!
७) घरात नाम घेतले, तर ते घर ‘मंदिर’ होईल!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈