मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘दहीकाला…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘दहीकाला…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

ब्रह्मरूप दहीहंडी टांगलीसे आकाशात ।

दहीदूधरूपी मोद भरुनी राही तयात।।१।।

 

आनंद तो मिळवण्या मानव करितो यत्न ।

परी उपायांनी नाना नाही होत हस्तगत ।।२।।

 

कामक्रोधादिक गोप जेव्हा शिर नमविती ।

आत्मरूप तो श्रीकृष्ण । चढे त्यांच्या खांद्यावरती ।।३।।

 

अहंकार घट फुटे परब्रह्मरूप भेटे ।

साधकास मिळताती आनंदरूपाचे  साठे ।।४।।

 

मग परब्रह्म हंडी येई तयाच्या हातात ।

गोपरूपी इंद्रिये ती आनंदाने नाचतात ।।५।।

 

सारे काही एकंकार मावळले आपपर ।

परमात्मस्वरूपी त्या आत्मा झाला तदाकार ।।६।।

 

ऐसा दहीकाला झाला जीव शिवासी भेटला ।

ऐसा कृष्णजन्म आम्ही साजरा असे तो केला ।।७।।

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तर, आयुष्य खूप सुंदर आहे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

तर, आयुष्य खूप सुंदर आहे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

माणसाचे कपडे फाटले तर, ते शिवता येतात. 

पण विचारच फाटके असतील, तर आयुष्याच्या चिंध्या होतात. 

 

काय बोलावे हे ज्ञान ठरवते, 

कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, 

किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, 

…. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही,

हे आपला संयम आणि, संस्कारावर अवलंबून असते. 

 

चुकीला चूक, आणि बरोबरला बरोबर .. म्हणायला शिकलं पाहिजे. 

नुसतं स्वार्थासाठी जगणं, सोडून दिलं पाहिजे. 

जिथे चूक नाही तिथे झुकु नका. आणि जिथे सन्मान नाही, तिथे थांबू नका. 

 

उशिरा मिळालेले सत्य हे, कुलूप तोडल्यानंतर, चावी मिळाल्यासारखे असते. 

यशस्वी होण्यासाठी, चुकणं आणि शिकणं, दोन्ही महत्वाचं असतं. 

कुठे व्यक्त व्हायचं, आणि कधी समजून घ्यायचं, 

हे कळलं तर, आयुष्य भावगीत आहे.!! 

 

किती ताणायचं, आणि कधी नमतं घ्यायचं, 

हे उमजलं तर, आयुष्य ‘निसर्ग’ आहे. !! 

किती आठवायचं, आणि काय विसरायचं, 

हे जाणलं तर, आयुष्य ‘इंद्रधनुष्य’ आहे. !! 

किती रुसायचं, आणि केव्हा हसायचं, 

हे ओळखलं तर, आयुष्य ‘तारांगण’ आहे.!! 

कसं सतर्क रहायचं, आणि कुठे समर्पित व्हायचं, 

हे जाणवलं तर, आयुष्य नंदनवन’ आहे.! ! 

 

कुठे,? कधी,? किती,? काय,? केव्हा,? कसं,? 

याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे… 

 

काही माणसं लाखात एक असतात, 

आणि काहींकडे लाख असले, तरी ते माणसात नसतात. 

 

दु:खांच्या दिवसांमध्ये, आनंदाची आशा ठेवणारी माणसं, 

कुठल्याही प्रसंगी, ठामपणे उभी राहतात. 

 

ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता, याचे ‘भान’, 

आणि भान म्हणजे कधी काय करू नये, याचं ‘ज्ञान’, 

 

दुःख गिळून आनंद व्यक्त करणे, म्हणजे जीवन… 

कष्ट करून फळ मिळवणे, म्हणजे व्यवहार… 

स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे, म्हणजे सहानुभूती… 

आणि माणूसकी शिकून, माणसासारखे वागणे, म्हणजे अनुभूती… 

 

प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. 

ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर, 

काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. 

 

सुख‌ म्हणजे नक्की काय,? ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे …. 

भरलेलं घर, आणि एकमेकांची साथ…!!

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जुन्या वाड्याच्या आठवणी…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “जुन्या वाड्याच्या आठवणी…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

अनेक कुटुंबे गुंफणारा

वाडा म्हणजे हाराचा धागा असतो,

समूहगानातला मल्हार असतो

तो भूप असतो आणि भैरवीही असतो.

 

वाड्याचे अंगण म्हणजे नंदनवन असते

छोट्यांचे क्रिडांगण असते,

महिलांचे वृंदावन असते,

पाणवठा असते, शिळोपा असते,

मोठ्यांचे कधी कुरुक्षेत्रही बनते

अंगण सगळ्यांनाच बोलावत असते.

 

वाड्यात अनेक बिऱ्हाडे असतात

कुटुंब मात्र एक असतं,

एका घरातल्या फोडणीची चर चर

सगळीकडे पोहोचत असते

वाड्यात कुणाचेच काही खाजगी नसते.

 

जोशाचं बाळ कुलकर्ण्यांकडे झोपते

बंडुला घरच्यापेक्षा शेजारच्यांची भाजी आवडते,

मिनी लोखंडयांकडे अभ्यासाला बसते

देसाईआजी पावशांची भाजी निवडत असते.

 

भावाकडे मुंज आहे ना, मग अशी कशी जाते

माझ्या पाटल्या घेऊन जा,

नव्या साडीची घडी मोडायचिये घेऊन जा

कुणाचे दागिने, कुणाची पैठणी

कुणाची वेळ कशी साजरी करायची ते वाड्यालाच माहित.

 

जा रे , शेजारून वाटीभर डाळीचे पीठ आण

देसाई वहिनी थोडं दूध द्या,

तुमचा गॅस संपलाय, आमचा घेऊन जा,

पाहुणे आलेत तुमची मोठी सतरंजी द्या

हे संगीत केवळ वाड्यातच गायलं जातं.

 

जोशी वहिनींचे वडील वारले कोकणात

तार मिळताच वातावरण बदललं,

जोशी वाहिनिंचे घर माणसांनी भरलं

वाड्यासह अंगणही गहीवरलं,

सुख दुः खाचं वाटप केवळ वाड्यातच असतं.

 

वाडा प्रेमळ होता, त्याचा धाक होता

कुणालाच एकाकी ठेवत नव्हता,

वाडे गेले, फ्लॅट आले, घरे मोठी पण मने छोटी झाली,

सोयी वाढल्या , रुबाब वाढला

कुटुंबाची संख्या वाढली,

एकाकी कुटुंबाच्या गर्दीची आता सोसायटी झाली.

 

वाडा गेला, नुसताच गेला नाही

माणसामाणसांना बांधणाऱ्या रेशीम धाग्याच्या गाठी उकलून गेला,

वाडा गेला, वाडा गेला

उरला फक्त आठवणींचा पाला.

 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाळंतपण — अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? वाचताना वेचलेले ?

☆ बाळंतपण — अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री नीलांबरी शिर्के ☆

 बाळंत या शब्दाचाचं अर्थ मुळात बाळ तरी, नाही तर अंत तरी असा आहे.

गर्भात आकाराला आलेला जीव पूर्ण रुपात साकारताना मांडलेला जीवाचा आकांत म्हणजे बाळंतपण. 

बाळंतपण म्हणजे असतो बाईचा नवा पुनर्जन्म.

बाईपणातून आईपणात रूपांतर होणारी अत्युच्च पातळी म्हणजे बाळंतपण.

बाळंतपणाच्या प्रसूती वेदनांची तीव्रता असते तरी किती..? तर ४३ डेल इतकी… म्हणजे माणसाची २० हाडे फ्रॅक्चर झाल्यानंतर जितक्या वेदना होतात माणसाला तितक्या वेदना बाळंतपणात सहन कराव्या लागतात बाईला.

दुःखातून जन्म पावणाऱ्या वेदना वाहतात नेहमी दुःखाचा भार… पण इथं असतं उलटं…

वेदनेतून सुख जन्माला येतं आणि शेवटी मानते ती या वेदनांचेचं आभार.

वेदना कोणाला हवीहवीशी वाटेल…?

परंतू कितीही असह्य असल्या तरी  तिला त्या हव्याहव्याशा वाटतात.

वेदना नको म्हणून कुठलीही बाई नाकारत नसते कधीच बाळंतपण.

मरणयातना भोगून पुन्हा मिळणार असते तिला जिवंतपण.

वेदनेचं नी बाळंतपणाचं नातं असतं अतूट.

सोसत नसते तरी सोसते…अनावर किंकाळी फुटत असते.

व्याकुळ होते…कासावीस होते भान हरपून जात असते.

आणि जीवन मरणाच्या मधली झुंज बाई देत असते.

शेवटी बाळ तरी…नाही तर अंत तरी.

 

इतक्या अटीतटीची निकराची झुंज असते बाळंतपण म्हणजे.

कित्येक बाया बाळंतपणात आई होताना गेल्या आहेत हे जग सोडून… मागे एखादं गोंडस बाळ ठेऊन.

कित्येक आया आजही भोगताहेत बाळंतपणानंतरच्या कळा अजून.

पण नसते कधीच भीती तिच्या मनात अशा दुर्दैवी घटनांची.

किती मोठा त्याग असतो ना बाईचा…आई होण्यासाठी… शरीरासोबत जीवाचं समर्पण देते ती यासाठी.

 

शेवटी अनंत यातनेचा वेदनेचा अंत पाहणाऱ्या सहनशीलतेचा सामना करून होते ती बाळंत..

टाकते सुटकेचा निश्वास…देते एका जीवाला श्वास…जणू ओतते आपला जीव त्या जीवात.

हाडामासाचं जिवंत-साजिवंत सुंदर कलाकृती साकारणारी विश्वातली एकमेवाद्वितीय कलावंत असते ती म्हणजे बाळंतीण.

 

बाळ जन्म घेतो आणि बाईचाही आई म्हणून जन्म होतो.

सोपं नाही आई होणं ते दिव्य पार करावं फक्त बाईनं.

आईपणाच्या अंगावर फुटणारा पान्हा.. आणि छातीला बिलगून दूध पिणारा तान्हा…

आहे ना हा अद्भुत आणि अद्वैत नात्याचा नमुना..

बाईलाच आईपणाची का हो असते चाहूल..?.. वेदनेचा हा भोगवाटा बाईच्याच का वाट्याला ?

तिच्याच वाट्याला निसर्गानं का हे बाळंतपण दिलंय..?.. निसर्गानं नवनिर्मितीचं आणि सृजनशीलतेंच सौख्य एक मातीच्या आणि दुसरं मातेच्या पदरी घातलंय.

 

मातीच्या आणि मातेच्या नावात एका वेलांटीचा फरक आहे असं म्हणतात. .. खरंय ते…

जशी माती तशी माता… माती भिजते..ओलावते…पाझरते…तिच्या कुशीत बियाणं रुजत…पोसतं…फुलत…बहरतं.

अगदी तशीच माता ओलावणारी, पान्हावणारी, पोसणारी, मायेनं अखंड पाझरणारी.

 

माती कुणालाही अंतर देत नाही … कुणामध्येही भेद करीत नाही… मातीशी कसंही कुणी वागलं तरी माती कधीचं सोडत नाही आपलं मातीपण.

असंच आई जपत असते आपलंही आईपण.

मातीसारखंच मातेला आईच्या कसोटीवर उतरावं लागतं.

आणि म्हणूनच तर बाईला आईचं वरदान लाभलेलं असत.

सोपं नसतं आई होणं…

त्यासाठी बाईच्या जन्माला यावं लागतं… आणि आई होण्यासाठी प्रत्येक बाईला बाळंतपणातून जावं लागतं.

लेखक : अज्ञात. 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असा शिष्यवर होणे नाही — प.पू .बाबुराव रूद्रकर ! ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

प. पू .बाबुराव रूद्रकर !

? वाचताना वेचलेले ?

☆ असा शिष्यवर होणे नाही… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

पुण्यातील धनकवडीचे योगी शंकर महाराज यांनी १९४७ साली समाधी घेऊन आपले प्राण पंचतत्वामध्ये विलीन केले. त्यांच्या भक्तांनी त्या काळात महाराजांचे शरीर पुण्यात सर्वत्र शेवटचे दर्शन करण्यासाठी फिरवले. आणि पदमावतीला आणले. तेथेच जमीन खणून महाराज यांचे शरीर त्या जमिनीत ठेवले. वरून माती टाकली. त्या मातीच्या ढिगाऱ्यावर हार व फुले होती.

जसा जसा अंधार पडायला लागला होता, तसे तसे सर्व भक्त आपापल्या घरी गेले. कारण त्या काळी १९४७ साली त्या धनकवडी भागात सर्वत्र मोठे जंगल होते. त्या जंगलात रानटी कुत्रे, वाघ आणी इतर जंगली प्राणी होते… त्यामुळे ‘ महाराजांची भक्ती करणे वेगळे आणि आपला जीव वाचवणे वेगळे. रात्री या जंगलात थांबणे योग्य नाही. महाराज गेले. त्यांचे शरीर आपण विधीवत पुरले. आता आपले काम झाले. शेवटी आपला पण संसार आहे,’ असा विचार करत हळूहळू सर्व जण निघून गेले.

रात्र झाली. त्या भयंकर जंगलात महाराजांच्या समाधीजवळ त्यांचा एक शिष्य थांबला होता.

त्या शिष्याने विचार केला की, जंगलात रानटी कुत्रे आहेत. रात्री त्यांनी जर महाराजांच्या समाधीवरची माती उकरून महाराजांचे शरीर बाहेर काढले आणि खाल्ले तर?

…आपल्या लाडक्या गुरूच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको. म्हणून तो शिष्य, तेथून घरी परत गेलाच नाही.

रात्री अनेक वेळा जंगली कुत्री आली. त्या शिष्याने त्यांना दगडी मारून पळवून लावले. तो शिष्य रात्रभर जागत जंगली प्राण्यांना न भिता तेथेच समाधीचे रक्षण करत राहिला… काय त्या शिष्याचे धाडस बघा.

तुम्ही जर फक्त एकच रात्र एकटे एखाद्या जंगलात.. जेथे रानटी कुत्रे व इतर जंगली प्राणी आहेत, त्यांना दगडाने हाकलत काढली तर तुम्हाला कल्पना येईल की, त्या शिष्याने काय धाडस केले होते.

दुसरे दिवशी सकाळी त्याने विचार केला की, आता आपल्याला महाराजांच्या समाधीचे रक्षण करण्यासाठी येथेच कायमचे थांबले पाहिजे. त्याने तसा निश्चय केला. तो तेथेच थांबला.

त्या शिष्याने एक दोन दिवस नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे महाराजांच्या समाधीची राखण करत राहीला.

त्याबद्दल त्याला कोणी दरमहा पगार देत नव्हते. की खायला अन्न ही देत नव्हते. पण त्याला कशाचीच अपेक्षा नव्हती. त्याबद्दल त्याला कोणी पुरस्कार देणार नव्हते की, चार पैसे मिळणार नव्हतेच. पण केवळ गुरू वरच्या अफाट प्रेमासाठी आणि आपल्या गुरूच्या शरीराची जंगली प्राण्यांनी दुर्दशा करू नये म्हणून तो तेथेच थांबला होता.

भूक लागली की, त्या जंगलात दुरवर कोठे तरी चार पाच घरे होती, त्या घरात जाऊन भिक्षा मागायची. ती माणसे जे देतील ते समाधानाने घ्यायचे, आणि परत महाराजांच्या समाधीजवळ यायचे. सात आठ दिवस झाले. इकडे त्या शिष्याची बायको, नवऱ्याला सगळीकडे शोधायला लागली. तिला काळजी पडली की, आपला नवरा घरी का आला नाही? कुठे गेला? ती बिचारी नवऱ्याला शोधत शोधत महाराजांच्या समाधी जवळ आली. तर तिने पाहिले की, आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधीजवळ बसून आहे. तिने नवऱ्याला घरी परत येण्यासाठी विनवले. पण त्या शिष्याने घरी परत यायला नकार दिला.

आपला नवरा आता ऐकणार नाही हे त्या माऊलीच्या लक्षात आले. तेव्हा त्या माऊलीने पण त्याच्याबरोबर  समाधीजवळच राहण्याचा निर्णय घेतला. त्या गुरूवेड्या शिष्याची ती पतिव्रता साधीभोळी बायको, तिने विचार केला की, जेथे माझा नवरा राहील तेथेच मी पण रहाणार.

… ती घरी जाऊन थोडीफार भांडी घेऊन आली. दोघांनी तेथेच छोटीशी झोपडी उभी केली. आणि तेथेच राहू लागले….. आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य आणि त्या शिष्याची काळजी करणारी त्याची वेडी पतिव्रता बायको.

उन्हाळ्यात महाराजांच्या समाधीला ऊन लागू नये म्हणुन त्याने छत्री दिवसभर धरली, तर पावसाळ्यात पाण्याचे लोटच्या लोट यायचे. तेथे त्या काळी भरपूर उतार होता. त्या पाण्याच्या लोटाने समाधीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून, तो वेडा शिष्य त्या समाधीच्या वरच्या भागावर आडवा झोपायचा. वरून पडणारा प्रचंड पाऊस, वरून वेगाने येणारे पाण्याचे लोट, त्या शिष्याने आपल्या अंगावर घेतले, पण गुरूच्या समाधीला काही होऊ दिले नाही.

…. आणि असे एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे !

काही दिवसांनी महाराजांचे काही शिष्य तेथे समाधीचे दर्शन घ्यायला आले होते. त्यांनी पाहिले की, तो शिष्य समाधीची राखण कशी करत आहे ते? मग त्यांनी एकत्र येऊन समाधीभोवती विटांचे बांधकाम केले. वरून पत्रा टाकला.

हळूहळू काळ बदलला. तेथे जंगल कमी होऊन माणसे रहायला आली.

पंचवीस वर्षानंतर आपल्याला आता जे मंदिर दिसत आहे. ते मंदिर उभे राहिले.

कशाचीच अपेक्षा न करता आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य होता …… 

प.पू .बाबुराव रूद्रकर !

हा लेख जे वाचत आहेत त्यांना पदमावतीचा सातारा रोडवरील महाराज यांची समाधी असलेला मठ माहीत असेल.  पण त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण करणाऱ्या बाबुराव रूद्रकर यांचा ‘ रूद्र शंकर मठ ’  भारती हॉस्पिटलजवळ आहे. हे माहित नसेल.

जी माणसे शंकरमहाराज यांना नावे ठेवतात, त्यांनी या रूद्कर यांच्या पंचवीस वर्षाच्या सेवेचा जरूर विचार करावा. शंकर महाराज हे दिव्य पुरुष होते. त्यांनी खुप चमत्कार केले. ते चमत्कार रूद्रकर यांनी स्वतः पाहिले. अनुभवले. रूद्रकर यांच्या लक्षात आले की, हा माणूस वेडा नाही तर खूप मोठा योगी आहे. यांच्याकडे दैवी शक्तीचे अस्तित्व आहे. म्हणूनच रूद्रकर यांनी शंकर महाराज यांना गुरू मानले. आणि त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण केली.

बाबुराव रूद्रकर यांनी १९८५ मध्ये आपला देह ठेवला.

धन्य ते गुरू शंकर महाराज आणि धन्य ते शिष्य बाबुराव रूद्रकर …. 

असा गुरू होणे नाही..  आणि असा गुरूवर अफाट प्रेम करणारा शिष्यही होणे नाही.

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ केव्हा उजळशील मम जीवन… कवयित्री : कु. रेणुका पराडकर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ केव्हा उजळशील मम जीवन… कवयित्री : कु. रेणुका पराडकर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

विठोबाच्या दारी नाचे भक्तगण

दुमदुमली पंढरी गाणी गाती भक्त जन ….

 

रुप पाहुनी विठूरायाचे

हरपले देहभान

एकरुप झालो क्षणभरी

आले उर भरून …..

 

सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याची

लागली बघा ही ओढ

मध्ये उभा संसार‌सागर

पैलतीर आता तूच चढव …..

 

सावळे रूप गोजिरे सुंदर

भरजरी‌ वस्त्रात लपले लावण्य

सवे उभी रुक्मिणी माउली

विनवी जोडोनी कर,कर‌ माझ्यावर सावली …..

 

युगे अठ्ठावीस उभा

पुंडलिकासाठी देवा

भक्तांचा आहेस त्राता

तव‌ चरणी केव्हा मिळेल विसावा? …..

कवयित्री : कु. रेणुका पराडकर, वर्ग ९ वा

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रावणमास… कवी : संदीप मणेरीकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 श्रावणमास… कवी : संदीप मणेरीकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)  

जरा जरासा अवखळ अवखळ 

हवाहवासा मंगल सोज्वळ 

लाजरा बुजरा हिरवा साजण 

दारी आला श्रावण श्रावण //१//

 

जरा जरासा हिरवा हिरवा 

अंगावरती शालू  कोवळा 

ठुमकत मुरकत मंगल पावन 

दारी आला श्रावण श्रावण //2//

 

फुलाफुलांनी नटुनी सजुनी 

रेशीम धारा भिजुनी किरणी

इंद्रधनूचे बांधून तोरण 

दारी आला श्रावण श्रावण //3//

 

सणवारांचे  अवीट भोजन 

पावित्र्याचे  सुंदर योजन 

मांगल्याचे करी आवाहन 

दारी आला श्रावण श्रावण //४//

 

अवखळ नटखट हवाहवासा

चंचल तजेला नवानवासा 

अल्लड निरागस पांघरून 

दारी आला श्रावण श्रावण //५//

कवी : संदीप मणेरीकर 

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सासरी आई शोधायची नसते..” ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “सासरी आई शोधायची नसते..”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

सासरी आई शोधायची नसते..

कारण, आईची ऊब,

आईची माया,

आईचा ओलावा,

आईपरि गोडवा,

फक्त आईत असतो..

 

आपली सगळी नाटकं..

आपले फालतूचे हट्ट..

आपल्या रागाचा पारा..

आपल्या मुड स्वींगचा मारा..

फक्त आई झेलणार सारा..

 

सासरी ना, ती आई शोधायची नसते..

ती आई स्वतःत उतरवायची असते.

आग्रहाचे दोन घास आपण सर्वांना भरवायचे,

सर्वांच्या सेवेस आईपरि तत्पर रहायचे..

 

पन्नाशीतल्या किंवा साठीतल्या सासूची आपणच आई व्हायचं..

त्यांना आरामात कसं ठेवता येईल यासाठी झटायचं..

त्यांनी सांभाळली ना सर्वांची वेळापत्रकं इथवर, आता, आपण सांभाळायचं..

नसते त्यांना शुद्ध स्वतःच्या खाण्यापिण्याची..

थोडं चिडायचंही हक्काने, कारण त्याशिवाय आई पूर्ण होत नाही ..

 

जगासमोर खुप कठोर असणार्‍या सासर्‍यांनाही असतो एक हळवा कोपरा..

आई होऊन त्यांची,

बोलतं करायचं असतं त्यांना..

असते त्यांना काळजी घरातल्या प्रत्येकाची,

आपणच तर द्यायची असते ना त्यांना निवृत्ती…!

 

आपली आई असतेच की माहेरी,

पण त्या दोघांची आई गेलेली असते देवाघरी..

त्यांना त्या मायेची अन् आधाराची गरज आपल्यापेक्षा जास्त असते..

म्हणून सासरी आई शोधायची नसते, ती आई स्वतःत उतरवायची असते..

प्रस्तुती : सौ.शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मला अश्रु देशील का ?” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मला अश्रु देशील का ?” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

शनिवारी दुपारीच बंड्याचा फोन आला. “उद्या सकाळी वृध्दाश्रमाला भेट द्यायला येता का ?”

“ओके “! मी ही तयार होतोच. नाहीतरी बरेच दिवसांपासून वृद्धाश्रम बघायचं होतं.

सकाळी लवकर उठून बंड्याबरोबर निघालो. वाटेत बंड्याने चिवडा, मिठाई, पत्ते असे बरेच काही घेतले. आत शिरताच तिथली मंडळी खूष झाली. ” हाय हिरो ! ” हाय चिकण्या”!! अशा हाका सुरू झाल्या. सगळे वृद्ध आजी आजोबा आपले वय विसरुन बंड्याला हाका मारीत होते. बंड्याही त्यांच्याशी हसत उत्तरं देत होता. हातातील सर्व वस्तू ऑफिसमध्ये जमा करून फक्त एक छोटा मिठाईचा बॉक्स हातात घेऊन कोपऱ्यातल्या खोलीत शिरला.

त्या खोलीत व्हीलचेअरवर एक वृद्धा बसली होती. पंचाहत्तर एक वय असेल तिचे, पण चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेचे तेज काही लपत नव्हते. डोळ्यातही वेगळीच चमक होती.

” ओय बुढी, कैसी हो ?” बंड्याने तिला पाहताच आरोळी ठोकली.

” नालायका आहेस कुठे ? तुझ्या मैत्रिणीला विसरलास की काय “? तिने खणखणीत आवाजात उत्तर दिले आणि हात पसरले.

बंड्या हसत हसत तिच्या मिठीत शिरला. माझी ओळख करून देताच तिने माझ्याकडे पाहून विनयाने हात जोडले. मी खाली वाकून पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच नको नको म्हणत तिने व्हीलचेअर मागे घेतली.

” ही माझी मैत्रीण. थोडी म्हातारी दिसतेय, पण लय खोडकर. एकमेकांना शिव्या दिल्याशिवाय दिवस जात नाही आमचा. मेल्यावर तिची सर्व इस्टेट माझ्या नावावर करणार आहे, म्हणून सहन करतोय तिला,” असे बोलून बंड्या हसला.

” काही मिळणार नाही तुला माझ्याकडून. मरणावर टपलाय माझ्या. डायबिटीस आहे हे माहीत असूनही गोड मिठाई आणतोस नेहमी. माझी इस्टेट तुझ्या नाही तर तुझ्या नातवाच्या नावावर करणार आहे मी”, तिने जोरात उत्तर दिले.

आश्चर्यचकित झालेला माझा चेहरा पाहून दोघेही हसू लागले. मग ती सांगू लागली, “मी जयमाला. पेशाने शिक्षिका, विद्यार्थ्यातून चांगले नागरिक घडवायची जबाबदारी माझी. एका शाळेतून प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त झाले. घरात नवरा आणि मी, मुलगा हुशार होता म्हणून बाहेर गेला आणि तिकडचीच गोडी लागली आणि तिकडचाच झाला. आज कुटुंबाबरोबर सुखात आहे. मुलगी लग्न होऊन चांगल्या घरात गेली  पंचवीस वर्षे संसार केला, पण माझ्याइतके आयुष्य नाही लाभले तिला. पाच वर्षांपूर्वी तीही एका छोट्या आजाराचे निमित्त होऊन देवाघरी गेली. त्या गोष्टीचा धसका माझ्या नवऱ्याने घेतला आणि दोन वर्षांपूर्वी तेही गेले .

मुलाने माझ्यासाठी चोवीस तास बाई ठेवली. परदेशातून पैसे पाठवत राहिला. मलाही हे गुडघ्याचे आजारपण सुरु झाले आणि ही व्हिलचेअर माझ्या नशिबात आली. माझ्या असल्या अवस्थेमुळे कुठलीच बाई टिकत नव्हती. मुलगी गेल्यावर जावयाने पण संबंध तोडले. मुलाला इकडे यायची इच्छा नाही. खूप निराश झाले होते मी.

शेवटी मुलाने नाइलाजाने वृध्दाश्रमाचा पर्याय आणला आणि मी आनंदाने स्वीकारला. इथे आल्यावर अवती भवती सर्व असायचे, पण एकटेपणाची भावना काही कमी व्हायची नाही. तेव्हढ्यात बंड्या भेटला. तो आणि त्याचे मित्र अनाथ आणि निराधार व्यक्तींवर आपले नातेवाईक समजून अंत्यसंस्कार करतात. देवा…. ! असेही लोक असतात तर समाजात. मग हे लोक मला आपले वाटू लागले.

हा बंड्या नेहमी हसरा. याला दुःख म्हणजे काय ते माहीत नसावे, असेच वाटते. कोणाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना याचा चेहरा गंभीर, पण डोळ्यांत दुःख दिसत नाही. पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मिठाईचा तुकडा हाती दिला. मी म्हणाले, मला डायबिटीस आहे, तर म्हणाला, “असे किती वर्ष जगायचे आहे तुम्हाला ? पुरे झाले आता आयुष्याची आणि तब्बेतीची काळजी करत जगणे. मरण लवकर येऊ दे म्हणता आणि तब्बेतीची काळजी घेता, खा गप्प, तेवढीच वर्ष कमी होतील. मन मारून जगू नका, आणि मीच येणार आहे तुम्हाला पोहचवायला” . त्याचे हे प्रवचन एकून दिवसभर हसत होते.

त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले. आता फक्त प्रसन्न रहाणे, स्वतःवर हसणे एवढेच मला माहितीय.”

त्यांचे बोलणे ऐकून आम्ही हसू लागलो.

मी म्हटले ” हो. हा असाच आहे, मीही याला कधी गंभीर बघितले नाही “.

“बंड्या आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने मला एक गिफ्ट देशील ?”  तसा बंड्या हसला.

“च्यायला या वयातही तुझ्या इच्छा आहेतच का ? काय पाहिजे ग तुला ? तुझे अंत्यसंस्कार तर मीच करणार. दिवस ही करू का ?”

“नको. दिवस नको करुस, फक्त थोडे रडशील का माझ्यासाठी ? आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी रडणार नाही ही कल्पनाच काहीतरी वाटते रे ? तुला मी मित्र मानते, पण तूही रडणार नाहीस याची खात्री आहे मला. म्हणून नाइलाजाने आज तुझे अश्रू मागतेय, देशील का रे ?”

अनपेक्षित मागणी ऐकताच बंड्या हादरलाच, एका क्षणासाठी त्याचा चेहरा दुःखाने पिळवटून निघाला.  मी ही अस्वस्थ झालो.

“च्यायला! म्हातारे, काहीही मागतेस!”, असे म्हणत बंड्याने तिचे हात हातात घेतले.थोडा वेळ स्तब्ध होऊन तिच्या डोळ्यात पाहिले आणि डोळे पुसत पराभूत योद्ध्यासारखा खोलीच्या बाहेर पडला. पण डोक्यात “तुझे अश्रु मागते” हे शब्द फेर धरून नाचत होते…

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पण…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “पण…”  ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

उंदीर  दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात. पण जर तो  जिवंत असेल, तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही.

जर साप दगडाचा असेल, तर सर्व  त्याची पूजा करतात,पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात.

 जर आई-वडील फोटोत असतील, तर प्रत्येकजण पूजा करतो,पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.

फक्त हेच मला समजत नाही, की जीवनाबद्दल इतका द्वेष पण दगडांबद्दल इतकं प्रेम का आहे?

लोक विचार करतात, की मृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे. आपण जिवंत माणसांना मदत करणं पुण्य समजलो, तर जीवन किती खुषहाल होईल.एकदा विचार करून बघा.

युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं, “मरायचं सर्वांना आहे, परंतु मरावंसं कोणालाच वाटत नाही.

आजची  परिस्थिती तर फार गंभीर आहे.

“अन्न” सर्वांनाच हवंय.पण “शेती”  करावीशी कोणालाच वाटत नाही.

“पाणी” सर्वांनाच हवंय.पण “पाणी”  वाचवावे, असे कोणालाच वाटत नाही.

“सावली” सर्वांनाच हवीय.पण “झाडे” लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.

“सून” सर्वांनाच हवी आहे. पण “मुलगी” व्हावी असं कोणालाच वाटत नाही.

विचार  करावा असे प्रश्न.पण विचार करावा असं कोणालाच वाटत नाही.

हा मेसेज सर्वांना आवडतो पण forward करावा असं कोणालाच वाटत नाही.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares