एक प्रसंग… ज्याने डोळे पाणावले आणि माणुसकीचा अर्थ शिकवला
दिनांक : 13 सप्टेंबर 2026
कधी कधी एखादा प्रसंग घडतो…
शब्द थांबतात, डोळे बोलू लागतात आणि मनाच्या खोलवर कुठेतरी माणुसकीची ज्योत पेटते.
13 सप्टेंबरचा तो दिवसही असाच होता…
‘आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी‘ – शैक्षणिक आश्रयालय, वाघाडी, यवतमाळ येथील पारधी समाजाच्या मुलींनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून स्वतः मानाचे गणपती तयार केले होते.
गणपती विक्रीसाठी बिरसा मुंडा चौक, आर्णी नाका, यवतमाळ येथे स्टॉल लावण्यात आला होता.
मूर्तीला किंमत नव्हती…
होती ती फक्त शिक्षणासाठी सहयोग राशीची अपेक्षा.
स्टॉलसमोर सहा-सात चिमुकल्या पारधी मुली हातात फलक घेऊन उभ्या होत्या.
“गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी मूल्य नाही,
आमच्या शिक्षणासाठी सहयोग राशी द्या.”
“आम्ही मातीला आकार दिला,
तुम्ही आमच्या स्वप्नांना आकार द्या…”
त्या निरागस मुलींच्या हातातील फलक त्यांच्या आयुष्याचीच कहाणी सांगत होते.
तेवढ्यात जवळच तृतीयपंथीयांचा एक समूह आला.
सामान्यतः अशा वेळी टाळ्यांचा आवाज ऐकू येतो…
जगण्यासाठी मदतीची मागणी केली जाते…
पण त्या दिवशी काहीतरी वेगळे घडले.
टाळ्या वाजल्या नाहीत.
पैशांची मागणी झाली नाही.
ते त्या चिमुकल्या मुलींकडे पाहत राहिले…
कदाचित त्या फलकावरील शब्दांनी त्यांच्या मनाला स्पर्श केला असावा.
आणि अचानक…
मिना नावाच्या तृतीयपंथीय भगिनीने पुढे येत स्टॉलसमोर ठेवलेल्या सहयोग राशीच्या दानपेटीत स्वतःचे शंभर रुपये टाकले.
क्षणभर सगळे स्तब्ध झाले!
ज्यांच्या हाताकडे समाज अनेकदा मदतीसाठी पुढे येणारे हात म्हणून पाहतो,
त्याच हाताने आज एका मुलीच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला होता.
तिने त्या चिमुकल्या मुलींना आशीर्वाद दिला आणि म्हणाली—
“ तुम्ही खूप शिक्षण घ्या…
माझा फोन नंबर देते.
गरज पडल्यास मला फोन करा. ”
बस्स…
त्या चार-पाच शब्दांनी वातावरणच बदलून गेले.
मुलींच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते…
आजूबाजूला उभे असलेले लोक हा प्रसंग पाहतच राहिले…
कारण त्या क्षणी शंभर रुपयांची किंमत शंभर रुपये राहिली नव्हती.
ती झाली होती—
माणुसकीची श्रीमंती!
गणपतीच्या मूर्ती शाडूच्या मातीच्या होत्या…
पण त्या दिवशी माणुसकीचा गणपती एका हृदयात साकारला होता.
ज्या मुली म्हणत होत्या
“आम्ही मातीला आकार दिला, तुम्ही आमच्या स्वप्नांना आकार द्या…”
त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी
एका तृतीयपंथीय भगिनीने पुढे केलेला हा हात
कदाचित रकमेने छोटा असेल…
पण भावनेने तो आभाळाएवढा मोठा होता!
समाजाने अनेकदा माणसांना त्यांच्या बाह्य ओळखीवरून विभागले…
पण त्या दिवशी त्या स्टॉलवर
ना तृतीयपंथीय होता, ना पारधी मुलगी…
होती फक्त दोन माणुसकीची हृदये!
एकीकडे शिक्षणासाठी हातात फलक घेऊन उभ्या असलेल्या चिमुकल्या लेकी…
आणि दुसरीकडे त्यांच्या शिक्षणासाठी आशीर्वादाचा हात पुढे करणारी मिना…
गणरायासमोर घडलेला हा प्रसंग कदाचित योगायोग नव्हता.
कदाचित बाप्पानेच समाजाला सांगितले असावे—
“ माझ्या मूर्तीला नव्हे,
या लेकींच्या स्वप्नांना हात द्या…
कारण शिक्षणाने उजळलेले एक आयुष्य हजारो आयुष्यांना प्रकाश देऊ शकते. ”
त्या दिवशी स्टॉलवर अनेक गणपती विकले गेले असतील…
पण मिनाने दिलेले ते शंभर रुपये या संपूर्ण उपक्रमातील सर्वात अमूल्य ‘ सहयोग ’ ठरले.
कारण त्यात पैशांपेक्षा अधिक काही होते—
आशीर्वाद होता…
आपुलकी होती…
विश्वास होता…
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे—
माणुसकी होती!
मिना ताई, आपल्या त्या शंभर रुपयांना आणि त्याहूनही मोठ्या मनाला मनःपूर्वक नमन!
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे साधारणपणे 65 वर्षांपूर्वी घरात एखादी खुर्ची जेमतेम असावयाची. चाळीच्या लहान खोल्यात खुर्चीला कुठली जागा. सगळे मस्तपैकी सतरंजीवर बसणारे! .. मला आठवते आमच्या घरी खिराची नवीन खुर्ची विकत घेतली तिची किंमत 17 रुपये होती. खुर्ची घरी आणल्यानंतर अख्खा वाडा ते बघायला आला होता. नवीन धाटणीची खुर्ची.. पत्रा पाईप वगैरे.. आता कोणी लाखाचं फर्निचर घेतलं तरी कोणाकडे जात नाही. पण ती 17 रुपयाची खुर्ची खूप कौतुकाचा विषय होती आणि उपयोगाचे सुद्धा! कोणाकडे बघण्याचा कार्यक्रम असेल ते नवरदेवाला बसायला ती खुर्ची आमच्याकडून आवश्य घेऊन जायचे. वाड्यात एखादी सभा, गणपती उत्सव कार्यक्रम, अशा अनेक गोष्टींना त्या खुर्चीचा उपयोग व्हायचा. सगळ्यात खुर्चीला जपून वापरायची कित्येक वर्ष ती खुर्ची आम्ही जपून ठेवली होती कारण तिच्यासवे आमच्या दारिद्र्याच्या आठवणी या दारिद्र्याच्या वाटल्यास नव्हत्या त्या ऐश्वर्याच्या वाटल्या होत्या त्यामध्ये समाविष्ट होत्या. मग नवीन घर बांधल्यानंतर बसायला खुर्ची नाही मग नवारच्या 65 रुपयाच्या दोन खुर्च्या आणल्या मग पुढे प्लास्टिकच्या खुर्च्या वगैरे खुर्च्यानी अवतार बदलले पण एक खुर्चीचे अनेक किस्से आहेत.
आमच्या लहानपणी दररोज खुर्ची बघायला मिळायची ती शाळेमध्ये शिक्षकांची किंवा गुरुजींची खुर्ची! त्या खुर्चीवरती आम्ही हात बीत फिरवायचा स्वच्छ ठेवायचं त्याच्यावर समजा एखादी मुलगी चुकून बसली तर गुरुची विद्या मोडली… गुरुजी विद्या मोडली… असं काहीतरी आम्ही बडबडत असू आणि भयंकर काहीतरी चूक झाली आहे असं म्हणून ती मुलगी रडत असे. बाईंच्या खुर्चीवर बसल्याबद्दल तिला शिक्षाही होत असे पण एकूण त्या खुर्चीचा दबदबा कळला. ती ही खुर्ची सोपी नाही तिच्यात बसणार्या व्यक्तीला ज्ञान पाहिजे समोरच्या मुलांविषयी प्रेम पाहिजे सगळी मुलं आपली आहेत असं समजून त्या व्यक्तीने त्यांना ज्ञान दिले पाहिजे आणि ती जागा केवळ बाईंची नसून बाईंमध्ये दडलेल्या आईची असते हेही लक्षात आले. पुढे जाऊन ही खुर्ची मिळाली पण ती फक्त हजेरी घेण्या पुरती हजेरी नंतर त्या खुर्चीवर बसता येत नसे. आमचे मुख्याध्यापक अतिशय कडक…! शिक्षकाने वर्गात खुर्चीवर बसलेले त्यांना आवडत नसे त्यामुळे वर्गात उभे राहूनच शिकवायला लागे आणि आमचा विषय गणित असल्यामुळे… सातत्याने फळ्यावर लिखाण… त्यामुळे खुर्चीवर बसण्याचा योग फार क्वचित यायचा… वयस्कर झालेले शिक्षक त्यांचे पाय दुखायचे व ते थोडे मध्ये बसायचे असे शिक्षक हेरून मुख्याध्यापक त्या वर्गातील खुर्चीच काढून ठेवायचे. आम्ही याला दुष्टपणा म्हणत असू. त्यानंतर पुढच्या पिढ्या बदलत गेल्याआम्ही सिनियर झालो सुपरवायझर व मुख्याध्यापक आणि शेवटी मुख्याध्यापक…! मुख्याध्यापकाची खुर्ची छान मुलायम होती… इकडे इकडे फिरणारी पण होती… आणि लक्षात आलं की मुलायम अजिबात नाही तिच्या खाली काटे आणि वर तलवार आहे. प्रशासनाचे काटे आणि संस्थाचालकांची तलवार अशा कचाट्यात त्या खुर्चीवरचा माणूस सापडलेला असतो… पण इलाज नाही ती जबाबदारी घेतली की पार पाडावी लागते. त्या खुर्चीवर बसलो की काही पथ्य पाळावी लागतात… जबाबदारीने विधान करावे लागत… सगळ्यांना सांभाळून घ्यावे लागतं… कुणाला फेवर करून चालत नाही… मग इतर राजकारण असतंच त्या सगळ्याला तोंड देत देत… शासनाच्या फतव्यांना उत्तर देत… आलेल्या पालकांचे भेटून समाधान करीत… संस्थाचालकांच्या प्रश्नाला उत्तरे देत… मुलींच्या विकासाचा विचार करत काही कार्यक्रमाची आखणी करावी लागते. मग त्या खुर्च्यांची कधी कधी लेबल बदलतात एसएससी बोर्डाचे केंद्र संचालक अशी एक मोठी जबाबदारी त्या खुर्चीवर येऊन पडते पेपर फुटा फुटाचे दिवस कॉ पी चा सुळसुळाट धमक्या देणारे विद्यार्थी राजकीय क्षेत्रात बडी धेंड असलेले त्यांचे पालक या सगळ्यांना तोंड देत एखादी विद्यार्थी सापडला तर त्याला समजूत घालून पेपर काढून घेऊन दुसरा पेपर देऊन परत बसवायचे किंवा अन्यथा वेगळे राहून त्याला पेपर लिहायला द्यायचा का तर त्याच नुकसान होऊ नये.. सगळ्यांचा हिताचा विचार करताना ते हेडमास्तराचे मात्र हेड दुखायला लागते… आणि वाटायला लागतं की नको बाबा ही खुर्ची…!
आमच्या शाळेत एका शिक्षकाची निवड सचिव पदावर झाली म्हणजे ते संस्थेवर कार्यरत झाले आता हेडमास्तर मोठा का सचिव मोठा? शिक्षकांच्या सभेमध्ये मुख्याध्यापक आवर्जून त्यांच्यासाठी खुर्ची ठेवत असत पण एका शिक्षकाची मनस्वी इच्छा होती की त्यांनी का तिथे बसावं ते शिक्षक आहेत तर त्यानी आमच्या मध्येच बसले पाहिजे शिक्षक जमा व्हायच्या वेळेला ते येत असत आणि पटकन एका खुर्चीची घडी घालून पाठीमागच्या बाजूला आपल्या बरोबर घेऊन जात जेणेकरून त्या शिक्षकाला बाकावर बसावे लागेल पण हे लक्षात आल्यामुळे सगळे आल्यानंतर मुख्याध्यापक एक खुर्ची आधी आणवून नंतर त्यांना तिथे बसवीत. असं त्या विद्वान शिक्षकांना विचारले की आपण असल्या लहान मुलासारख्या गोष्टी का करता? त्यावर ते मला म्हणाले, ” तुमचं कसं आहे पतकी बाई तुम्ही समोरासमोर तलवार उपसून लढायला सुरुवात करतात युद्ध जिंकता येत नाहीत शत्रु ज्या बुरुजावर उभा आहे तो बुरुज खालच्या बाजूला उभा राहून हळूहळू पोखरायचा आपोआप ढासळतो…! मला त्यांच्या विचाराचा खूप वाईट वाटायचं हा माणूस इतका हुशार आहे आणि असा विचार का करत असावा पण माणसाच्या स्वभावाला औषध नाही कदाचित खुर्ची कुठेतरी मनात डसत असावी.
खुर्चीचा आणखीन एक किस्सा म्हणजे शाळा तपासायला येणारे शिक्षण अधिकारी हे बिनधास्त हेडमास्तर च्या खुर्ची वरती बसत असत आणि मुख्याध्यापक त्यांना ती खुर्ची रिकामी करून देत होते? हे किती चुकीचं होतं ना मुख्याध्यापकाच्या खुर्च्यावर बसण्याचा मान त्यांचाच आहे लोकांच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण त्यांच्या खुर्चीवर बसणं हे योग्य नाही हे समजायला कित्येक वर्ष गेली त्यानंतर साधारण 90 95 सालाच्या आसपास जे शिक्षणाधिकारी आले ते या गोष्टी करत नव्हते आणि आम्हीही मुख्याध्यापक म्हणून खुर्चीवर असलो समोर तरी उठून त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसत होतो.
हा एकमेकांना मान देण्याचा उत्तम प्रकार होता पण यासाठी खूप वर्ष जावी लागली.
संस्थाचालकांमध्ये सुद्धा असेच असते इकडची खुर्ची इकडे झाली की त्यांचे अपमान होतात सुदैवाने आमच्या संस्थे मध्ये हे कधी घडलं नाही सगळेच खूप समंजस आणि ध्येयानेकाम करणारे होते आणि सर्वांसमोर एकच विचार होताआदरणीय रमाबाई रानडेनी ज्या स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन ही शाळा सुरू केली त्या सेवा सदन शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींचा अधिकाधिक विकास झाला पाहिजे.
गॅदरिंगच्या वेळेला ही तसेच स्नेहसंमेलनाच्या वेळेला माजी शिक्षकांना बोलावलेले असते पुढे पुढे ही संख्या वाढली म्हणजे स्टेजवरच्या कार्यक्रमाचे चार लोक संस्था चालक आणि माजी शिक्षकांच्या अनेक खुर्च्या मग आम्ही ठराविक वर्षानंतर एक निर्णय घेतला की खुर्चीचा मानपान बंद समोरच्या ओळीत सर्व माजी शिक्षकांना जागा द्यायची आणि कार्यक्रम सुरू होताना प्रथम गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा त्यामुळे खुर्चीचा प्रश्न मिटला एक खुर्ची पण खूप घोळ घालते बर का
मी फक्त हे शैक्षणिक खुर्च्यांबाबत लिहिले आहे अशा खुर्चीचे किस्से यापेक्षा रंगतदार राजकारणात आहेत! राजकीय क्षेत्रात तर खुर्ची नाही मिळाली तरी शेजारच्या माणसाच्या खुर्चीवर कायमस्वरूपी हात ठेवून तिथे पुढे आपणच बसणार आहोत असा निर्देश देणारे नेते सुद्धा आहेत आणि ते बारकाईने दाखवणारा सशक्त मीडिया सुद्धा आहे त्या खुर्च्यांसंदर्भात पुन्हा एकदा आपण बोलू हे किस्से खुर्चीचे आवडले असतील तर अर्थातच पुढे पाठवा अगदी खुर्चीवर बसून पुढे पाठवा. माझी हरकत नाही.
पुण्याच्या आसपासचं गाव. कुटुंब ठिकठाक. एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन. आज्जी आधीच गेलेली. साहजीकच सुनेवर सर्व भार. आधी किरकोळ कुरबुर. मग बाचाबाची. त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं म्हणणं ‘घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका. काम करुन हातभार लावा संसाराला. ‘
पण बाबा थकलेले. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं. मुलानेही अडवलं नाही. आले पुण्यात. कुणी म्हातारा म्हणुन काम देईना आणि भूक जगू देईना. भीक मागण्या वाचून पर्याय उरला नाही.
बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकून बाबा विचारायचे, “येवु का रे बाळा घरी रहायला? ” ‘बाळ’ म्हणायचे, “मला काही त्रास नाही बाबा, पण ‘हि’ला विचारुन सांगतो. ” पण, “या बाबा घरी” असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही!
आता बाबा अट्टल भिकारी झाले.
झाले, कि त्यांना केलं गेलं?
अशीच भीक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली. बोलताना बाबा म्हणायचे, “डाॕक्टर, म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते. कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण. झुकलेलं आणि वाकलेलं. निष्प्राण वेलीसारखं.! “
बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर माझ्याही!
“नाव, पत्ता, पिनकोड सहित टाकून पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं. नाहितर वर्षानुवर्षे पडून राहतं धुळ खात पोस्टातच. तसंच आमचं आयुष्य! नाव पत्ता सग्गळं बरोबर! पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणून आम्ही इथं पडलेले. ” असं बोलून ते हसायला लागतात. त्यांचं ते कळवळणारं हसू आपल्यालाच पीळ पाडून जातं.
मी म्हणायचो, “बाबा हसताय तुम्ही. पण हे हसू खोटं आहे तुमचं. “
तर म्हणायचे. “आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं. हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसू कुठुन उसनं आणू? “
मी निरुत्तर!
“वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं. टोपलीत ठेवतं. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली. नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा? “
बाबांचं बोलणं ऐकून, मीच आतून तुटून जायचो.
“काहीतरी काम करा बाबा, ” असं सांगून मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयार नव्हते.! म्हणायचे, “आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं. किती दिवस राहिलेत आता? आज कुणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील. श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील. नाटक असतं हो सगळं आयुष्यच. प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतं इतकंच! “
इतकं असुनही, एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच. बॕटऱ्या विकण्यासाठी त्यांना मदत केली. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता. भिक मागत नाहीत.
मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता!
आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले. मला जरा बाजुला घेऊन गेले. म्हणाले, “एक गंमत सांगायचीय डाॕक्टर! सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, “हिने” तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते. पाया पडुन माफी मागायला तयार आहे. बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु. “
मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला/सासऱ्याला भिक मागायला लावली. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली.?
“डाॕक्टर काय करु? सल्ला द्या. “
साहजीकच मी बोललो, “ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली, त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही, पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु! “
बाबा म्हणाले, “डॉक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगू? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भीक मागताना! चालेल तुम्हाला? मी माझ्या माघारी, त्याला भिकारी बनवून जाईन का? अहो, चुकतात तीच पोरं असतात. माफ करतो तोच ‘बाप’ असतो. पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी, ‘क्षमा’ म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या डाॅक्टर… “
आज सगळेच वेगळे दिसत होते, कां? ते मात्र माहीत नाही – – “
आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. दार उघडून बाहेर आलो आणि समोरच गेटवर भारद्वाज पक्षी बसलेला दिसला आणि आज काहीतरी शुभ घडणार असा संकेत मिळाला. त्याला हात जोडून मी नमस्कार केला आणि फिरायला बाहेर पडलो.
मेन रोड लागल्यावर, नेहमीचे दृश्य असते, की रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात / कचरा पडलेला असतो / कागदाची खोकी पडलेली असतात. आज मात्र रस्ता एकदम चकाचक दिसत होता. काही जण कार चालवत असतात / स्कुटर चालवत असतात आणि काहीतरी खात असतात. खाऊन झाले कि कागद / प्लॅस्टिक पिशवी रस्त्यावर टाकतात. आज कुणीच कचरा फेकलेला दिसत नव्हता.
कां? ते मात्र माहीत नाही.
सिटी प्राईड च्या रस्त्यावर आलो, की तिथे, कुत्री घेऊन फिरणारे स्त्री-पुरुष नेहमीच दिसतात. रस्त्यावर कुठेही कुत्र्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे त्यांचे शी – शू करणे सुरू असते. कुत्रे फिरवणाऱ्याला मात्र त्याचे काही देणे घेणे नसते. आज पण कुत्र्याला घेऊन हिंडणारी मंडळी दिसत होती. फुटपाथवर एका ठिकाणी एका कुत्र्यानी शी केली, आणि मालकाने लगेच प्लास्टिकच्या पिशवीत शी गोळा केली. आणि आश्चर्य म्हणजे आज कुत्री फिरवणाऱ्या सगळ्यांच्याच हातात प्लास्टिकच्या पिशव्या दिसत होत्या. हा बदल कशामुळे घडला? ते मात्र समजत नव्हते.
पुढे मेन रोडला आलो. नेहमीचा देखावा म्हणजे, हॉर्नचे कर्कश आवाज, काही चौकांमध्ये सिग्नल सुरू असतात, काही ठिकाणी बंद असतात. सिग्नल पाळणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच असतात. सगळ्याच गाड्या बेफाम वेगाने धावत असतात. झेब्रा क्रॉसिंग वर रस्ता ओलांडणारे जीव मुठीत घेऊन धावत असतात. काहीजण उलटी कडून वेगाने येत असतात. काहीजण फुटपाथवर गाड्या घालत असतात.
आज मात्र सगळेच बदललेले दिसत होते. सगळे सिग्नल चक्क सुरु होते. कोणी हॉर्न वाजवत नव्हते. सिग्नल तोडून जाणारी एकही गाडी दिसत नव्हती. झेब्रा क्रॉसिंग वरून पादचारी आरामात रस्ता ओलांडत होते. सगळ्या गाड्या २० – ३० च्या वेगाने जात – येत होत्या. उलटी कडून येणारी किंवा फुटपाथ वरून जाणारी एकहि टु व्हीलर दिसली नाही. वळणारी प्रत्येक गाडी चक्क साईड इंडिकेटर देत होती.
हा बदल बघून, मी माझे फिरणे विसरलो, आणि ट्रॅफिकचा हा नवीन रंग बघण्यात रममाण झालो. काहीतरी कारणामुळे माझी तंद्री मोडली आणि मी पुढे निघालो. ट्रॅफिक मध्ये एकदमच ही सुधारणा कशामुळे झाली, ते मात्र काही समजत नव्हते.
पुढे मारुती मंदिर लागते, तिथे फुटपाथवर नेहमीच लोक कबुतरां करता धान्य टाकत असतात. त्यामुळे कबुतरांचे थवे कायम तिथे असतात. कबुतरांमुळे काही आजार पसरतात, त्यांना रस्त्यावर धान्य टाकू नका, असे बरेच वेळा पेपरमध्ये आपण वाचतो. पण त्याची दखल कुणीच घेताना दिसत नसते. आज मात्र फुटपाथ वर कोणीही धान्य टाकले नव्हते. त्यामुळे आज एकही कबूतर दिसत नव्हते. हा बदल कशामुळे? हे मात्र समजत नव्हते.
थोडं पुढे गेलं की मृत्युंजयेश्र्वर मंदिर आहे. रोज मी बाहेरून दर्शन घेतो आणि पुढे जातो.
आज मात्र मी दर्शन घेण्याकरता चक्क मंदिराच्या आत गेलो. माझ्यामधे हा बदल कशामुळे झाला याचे उत्तर मात्र नक्कीच माझ्याकडे होते.
एक म्हणजे, इतका सुंदर बदल घडवून आणल्याबद्दल मला देवाचे आभार मानायचे होते आणि आणि नंबर दोन म्हणजे असाच बदल कायम ठेव अशी मला देवाकडे प्रार्थना करायची होती.
आपले आयुष्य हे आपण कसे जगतो यापेक्षा आपण काय विचार करतो, यावरच खऱ्या अर्थाने अवलंबून असते. माणूस बाहेरच्या जगातील संकटांशी, आव्हानांशी आणि कठीण परिस्थितीशी सहज दोन हात करू शकतो;पण जेव्हा संघर्ष स्वतःच्याच विचारांशी सुरू होतो, तेव्हा ती लढाई सर्वात कठीण ठरते.
शरीरावरचे ओझे सहजासहजी ओळखून ते उतरवता येते, पण मनावर साचलेले विचारांचे ओझे मात्र अदृश्य असते. ते दिसायला साधे-सोपे वाटले, तरी माणसाला आतून हळूहळू पोकळ करत जाते. भूतकाळातील चुकांचा सतत होणारा पश्चात्ताप, भविष्याची अवाजवी भीती, इतरांशी केलेली निरर्थक तुलना आणि मनात चालणारी नकारात्मकतेची साखळी हे सर्व एकत्र येऊन विचारांचे एक भयंकर वादळ निर्माण करतात. या अतिविचारांच्या चक्रव्यूहात माणूस असा काही अडकतो की त्याला बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही.
एखाद्या पाण्याच्या पेल्याचे वजन सुरुवातीला काहीच वाटत नाही, पण तोच पेल्या जर आपण तास न् तास हातात धरून ठेवला, तर हात सुन्न पडू लागतो आणि दुखायला लागतो. पाण्याचे वजन वाढत नाही, पण आपण ते जितका जास्त वेळ धरून ठेवतो, तितका त्याचा त्रास वाढतो. आपले विचारही अगदी असेच असतात. एखादी छोटीशी चिंता किंवा वाईट विचार मनात आला तर हरकत नाही, पण तोच विचार जर आपण तासनतास, दिवसेंदिवस मनात गोंधळवत ठेवला, तर तो माणसाचा उरलासुरला आत्मविश्वास, मनाची शांतता आणि वर्तमानातील आनंद पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो.
जेव्हा विचारांचे हे ओझे अती होते, तेव्हा माणूस स्वतःच स्वतःचा सर्वात मोठा शत्रू बनतो. ”मला जमणार नाही, माझे काही खरे नाही “असे स्वतःबद्दलचेच वाईट विचार माणसाला काहीही नवीन करू देत नाहीत.
.. त्यामुळे आयुष्यात पुढे जायचे असेल, तर हे अदृश्य ओझे उतरवून ठेवायला शिकले पाहिजे. जगात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते, हे सत्य जितक्या लवकर आपण स्वीकारू, तितके मन हलके होईल. जे घडून गेले आहे तो भूतकाळ बदलता येत नाही आणि उद्या काय होणार आहे हे कोणालाच ठाऊक नाही, त्यामुळे विनाकारण उद्याची चिंता करत बसण्यापेक्षा आजच्या, या क्षणाच्या आनंदात जगायला हवे.
अनेकदा मनात साचलेले विचार कागदावर उतरवून काढल्याने किंवा आपल्या एखाद्या जवळच्या, विश्वासू माणसाशी मोकळेपणाने बोलल्यानेही मनावरचा मोठा भार हलका होतो. आपले विचार ही एक धारदार तलवार आहे;तिचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करायचा की स्वतःलाच जखमी करण्यासाठी, हे संपूर्णपणे आपल्या हातात असते.
… म्हणूनच विचारांना तुमच्यावर राज्य करू देऊ नका, तर तुम्ही तुमच्या विचारांचे मालक बना. मन मोकळे ठेवा, अवाजवी विचारांचे ओझे फेकून द्या आणि जगण्याचा खरा आनंद लुटा.
(उनो हा पत्त्यांसारखा – playing cards – बैठा खेळ आहे. फरक इतकाच की बदाम, इस्पिक वगैरे यांच्याऐवजी यात वेगवेगळ्या रंगाचे पत्ते असतात व त्यांवर छापलेल्या सूचनांनुसार खेळायचे असते. ज्याच्या हातातली सर्व पाने सर्वप्रथम संपतात ते जिंकतो.)
मे महिना, उन्हाळ्याची सुट्टी. राजू, मनू आणि सोनू ही मावस आणि मामे भावंडं आपल्या आजोळी – मामाच्या गावाला आले होते. फुल टू धमाल चालली होती.
फरक इतकाच की आता मामा शहरात रहात होता. गाव, नदीकाठ, सूरपारंब्या या सगळ्यांच्या ऐवजी आता शहरी मॉल, मल्टीप्लेक्स आले होते आणि रात्री पत्ते कुटण्याऐवजी “उनो” खेळणे चालले होते.
कॉलेजला डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला आलेला राजू सातवीतल्या सोनूवर वैतागला होता. पुन्हा पुन्हा सांगूनही सोनू हातातली पाने नीट धरत नव्हता, सगळी पानं समोरच्यांना दिसत होती.
“नाही, मी नीटच धरतोय पानं, ” सोनू उवाच.
“नाही अरे, मला सगळी दिसत आहेत तुझी पानं, ती मावशी बघती आहे तुझी पानं. अशाने कसा जिंकणार तू? ” राजूच्या आवाजात हताशा आणि राग यांची सरमिसळ व्हायला लागली होती.
सोनू कसाही खेळला तरी त्याचा राजूला काहीच फायदा वा तोटा नव्हता. केवळ सोनूचं भलं व्हावं या निस्वार्थी वृत्तीने राजू त्याला सारख्या सूचना देत होता. पण पालथ्या घड्यावर पाणी, आणि म्हणूनच राजूची जास्तच तगमग होता होती.
सोनूला त्याची काहीच फिकीर नव्हती.
“अरे, आम्हीपण लहानपणी अशाच चुका केल्या आहेत. म्हणून तुला सांगतोय… ” राजू सांगत होता, आणि अचानक, सोबत पत्ते खेळणाऱ्या त्याच्या आईकडे तो चमकून पाहू लागला.
आजवर हे असे संवाद त्याच्याच घरात वेगवेगळ्या रूपात अनेकदा झाले होते. फरक इतकाच होता, की आत्ता यावेळी तो सोनूला सल्ला देत होता, यापूर्वी, इतके दिवस हेच डायलॉग त्याची आई त्याला ऐकवत असायची.
त्याची आई इंजिनीयर होती, त्याच्या जन्मापूर्वी चांगल्या कंपनीत नोकरी करायची ती. मग या राजूला लहानाचा मोठा करायचा म्हणून नोकरी सोडली होती तिने.
इकडे राजूचं कॉलेज लाईफ जरा जास्तच निवांत चाललं होतं, मित्रांची संगत काही फार ग्रेट नव्हती, परीक्षेत मार्क फार चांगले नव्हते, वर्गात उपस्थिती कमी असल्याबद्दल कॉलेजकडून घरी पत्रं येत होती, आणि असं काही झालं की मग आईची टकळी पुन्हा सुरू व्हायची…
“अरे, अभ्यास कर. वेळ फुकट घालवू नको. गेलेला वेळ परत येत नाही. आम्हीपण लहानपणी अशाच चुका केल्या आहेत. म्हणून सांगतीये तुला… ” आई परोपरीने सांगायची त्याला.
आणि हा राजू तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करायचा, आत्ता सोनू करत होता तसंच.
तो जेव्हा आईचं ऐकत नव्हता, तेव्हा तिला काय वाटत असेल, ते त्या क्षणी राजूला लख्ख उमगलं, त्यानं आईकडे चमकून पाहिलं, आई त्याच्याकडेच पहात होती.
काही न बोलताच राजूने मान खाली घातली.
आई स्वतःशीच हसली. सोनू “उनो”मध्ये जिंकेल का नाही, सांगता येत नव्हतं, पण राजू मात्र वेळीच सावध झाल्याने आयुष्याची बाजी मात्र नक्की जिंकणार होता.
*मदत माग मदत तयार आहे – माझा एक एकदम वेगळा अनुभव.. *
सगळ्याच संत महंतांचे आपल्या सगळ्यांकरता खूप छान छान संदेश आहेत.
श्री स्वामी समर्थ यांचं छानच बोधवाक्य आहे –
“मदत माग मदत तयार आहे”.
हे आपल्याला माहित असूनही आपण बहुतेक वेळा गरज असताना मदत मागण्यात कमीपणा समजतो किंवा आपला अहंकार आड येतो. आणि त्यामुळे चांगली संधी आपल्या हातून जाते, आणि काही वेळा आपल्याला त्रास पण सहन करावा लागतो.
जेव्हा केव्हा आपण काही अडचणीत असतो आणि मदतीची गरज असते, तेव्हा मोकळ्या मनानी मदत जरूर मागावी.
मला हे वाक्य खूप आवडतं. मला कुठली पण अडचण आली तर मी निसंकोचपणे बायकोला मदत मागतो, मुली/ जावई यांना मदत मागतो, मित्रांना मदत मागतो, आणि अगदी अनोळखी लोकांना पण मदत मागतो_ आणि त्यामुळे सगळ्या अडचणींना उत्तर सापडते.
आज माझा एक रस्त्यावरचा अनुभव सांगतो.
आपल्याला काहीतरी कारणाकरता बँकेत जावेच लागते. ऑनलाइन मुळे ते खूप कमी झाले आहे. तरी पण एखादी चक्कर केव्हातरी मारावीच लागते.
एकदा काहीतरी महत्त्वाच्या कामाकरता मला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जायचे होते.
बँक आमच्या घरापासून चालण्याच्या साधारण दहा-बारा मिनिटे अंतरावर आहे. घरून थोडं पुढे गेल्यावर चांगला चढ असलेला रस्ता आहे, नंतर कोथरूड कर्वेनगर हा रस्ता क्रॉस करायचा आणि पलीकडे बँक.
आता चढ रस्ता चढून जाणं मला जरा मुश्कील होतं आणि ट्रॅफिक चा रस्ता क्रॉस करणं पण मुश्किल होतं.
म्हणून विचार केला रिक्षा करून जावं, बँकेच्या दाराशी उतरावं, आणि काम झाल्यावर रस्ता क्रॉस करावा आणि चालत उतारावरून घरी यावं.
रिक्षेने बँकेत गेलो, काम झालं, आणि बाहेर आलो.
आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे रस्ता क्रॉस करणे. त्या स्पॉटला तीन रस्ते मिळतात ट्रॅफिकचा मोठा आडवा रस्ता आणि आणि चढ असलेला तिसरा रस्ता.
ऑटो रिक्षा, टेम्पो, कार, स्कूटर, यांची जबरदस्त वाहतूक या रस्त्यांवर असते. ह्या स्पॉटला रस्ता क्रॉस करणारे लोक फारच कमी कमी असतात कारण पलीकडच्या साईडला दुकाने /मार्केट वर नाहीत.
मी रस्ता क्रॉस करण्याकरता संधी मिळते का म्हणून डावी उजवीकडे बघत होतो पण कुठेही ट्रॅफिक मध्ये गॅप मिळत नव्हती. पाच मिनिटे झाली पण मी त्याच जागेवर उभा होतो.
अशा वेळेस बावधन चा रस्ता क्रॉस करण्याकरता असलेली म्हैस आठवली. म्हशी बरोबर रस्ता क्रॉस करणे म्हणजे एकदम सेफ. आणि जेव्हा म्हैस नसेल तेव्हा रस्ता कसा करावा याबद्दल म्हशी बरोबरच्या मुलांनी मला दिलेला संदेश पण आठवला. _(काका म्हैस नसेल तेव्हा रस्ता एकट्याने कधीही क्रॉस करायचा नाही. जेव्हा कोणी रस्ता क्रॉस करत असेल तेव्हा त्यांच्याबरोबर रस्ता क्रॉस करायचा. आणि कोणी म्हणजे कोणीही नाही, तर एखादी तरुणी रस्ता क्रॉस करत असेल तेव्हाच तिच्या बाजू बाजूनी रस्ता क्रॉस करायचा. एकदम सेफ. कारण क्रॉस करणाऱ्या तरुणी कडे बघून सगळे वाहनचालक आपली स्पीड कमी करतात). _
इथे म्हैस तर नव्हतीच, आणि रस्ता क्रॉस करणारं कोणीच नव्हतं, तरुणी भेटण्याचा चान्स तर झिरो. माझं डावीकडे बघ उजवीकडे बघ चालू होतं पण पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती.
सध्या बहुतेक चौकांमध्ये पोपटी जॅकेट घातलेले ट्रॅफिक कंट्रोलर उभे असतात. लोकांनी सिग्नल पाळावे म्हणून शिट्टी वाजवून / हात दाखवून ते ट्रॅफिक वर नियंत्रण ठेवत असतात.
मी उभा होतो तिथे माझ्याच समोर रस्त्याच्या पलीकडे कंट्रोलर उभे होते आणि त्यांचे शिट्ट्या मारणे सुरू होते. तिकडे लक्ष देणारे लोक फारच थोडे असतात, त्यामुळे ट्रॅफिक सुसाट डावी उजवीकडून सुरू होता, आणि चढ चढून येणारा आणि चढ उतरणारा ट्रॅफिक पण सुरू होता.
मला एकदम स्वामींचं वाक्य आठवलं (मदत माग मदत तयार आहे) आणि मी हात वर करून आणि मान हलवत पलीकडे उभे असलेल्या ट्रॅफिक कंट्रोलरचं लक्ष माझ्याकडे वेधण्याकरता प्रयत्न केला.
आणि त्यांना खुणा करून सुचवलं, की ट्रॅफिक मुळे बराच वेळ झाला तरी मला रस्ता क्रॉस करता येत नाहीये.
नशिबाने त्यांचं लक्ष माझ्या हातवारे करण्याकडे गेलं. आणि माझी अडचण त्यांना समजली असावी.
आणि आश्चर्य म्हणजे, लगेचच ते शिट्टी वाजवत रस्ता क्रॉस करत माझ्याकडे यायला निघाले. मला वाटलं ते रस्त्याच्या मध्यापर्यंत येतील आणि माझ्या बाजूच्या ट्रॅफिक ला हात दाखवून ट्रॅफिक थोडा स्लो करून देतील, जेणेकरून मी त्यांच्यापर्यंत पोहोचेन आणि नंतर ते पुढच्या साईडच्या ट्रॅफिकला हात दाखवून मला पुढे जायला ट्रॅफिक थोडा स्लो करून देतील.
मी वर बघून स्वामींना नमस्कार केला, आणि गंमत म्हणजे ट्रॅफिक पोलीस चक्क माझ्यापर्यंत पोहोचले, त्यांनी त्यांचा उजव्या हात माझ्याकडे केला आणि मला हात धरायला सांगितले. आणि चक्क माझा हात धरून त्यांनी पूर्ण रस्ता क्रॉस करून मला पलीकडे नेलं.
तिथेच उताराचा रस्ता सुरू होतो. त्यांनी मला खुणेनी विचारलं – तुम्हाला उतारावर जायचंय, का हा पण रस्ता क्रॉस करायचा आहे. मी त्यांना उतारा कडे जायचंय असं सांगितलं. त्यांचं लगेच ट्रॅफिकला कंट्रोल करण्याचं काम सुरू झालं.
मी वाकून त्यांना नमस्कार केला आणि धन्यवाद दिले. वर बघून स्वामींना नमस्कार केला आणि उताराच्या रस्त्याने घराकडे निघालो. _ पाच मिनिटात सुरक्षितपणे घरी पोहोचलो.
मंडळी अशाप्रकारे मदत मागितली तर स्वामींच्या कृपेने मदत मिळते आणि आपलं काम सोपं होतं, अडचण दूर होते.
या अनुभवानी मला माझ्याकरता एक छान बोधवाक्य तयार करता आलं – जेव्हा आपल्याला मदत लागेल तेव्हा निसंकोचपणे समोरच्याला मदत मागायची, आणि आपल्या समोरच्या कोणाला आपली मदत पाहिजे असेल तर ती मदत आनंदाने आणि खुल्या दिलाने आपण त्याला करायची.
संध्याकाळी शाळा, ऑफिसेस सुटल्यावर माणसं, विद्यार्थी आणि गाड्यांची गर्दीच गर्दी होते. घरी जाण्याच्या नादात जो तो घाईत. सिग्नलमुळं गाड्यांच्या रांगा लागलेल्या त्यातही काहीजण जमेल तशी गाडी पुढे घुसण्याच्या प्रयत्नात तर काही बावळट विनाकारण हॉर्न वाजवतात. चौकातल्या गर्दीत मी थांबलेलो. बाजूला पोलिस असल्यानं बऱ्याच गाड्या नाईलाजानं थांबलेल्या तरीही एकदोन गाडीवाले सिग्नल तोडून गेलेच.
पंचवीस, चोवीस, तेवीस, बावीस लाल सिग्नलचे आकडे कमी कमी होत होते. दुसऱ्या बाजूचा हिरवा सिग्नल चालू असल्यानं तिकडून येणाऱ्या गाड्यांचा वेग वाढलेला. लाल सिग्नल असताना एका सुशिक्षित??? बाईंनी स्वतःचा आणि पाठीमागे बसलेल्या मुलांचा जीव धोक्यात घालून गाडी पुढे दामटली. कहर म्हणजे त्या फोनवर बोलत गाडी चालवत होत्या. चौकाच्या मधोमध सुसाट येणाऱ्या रिक्षाच्या समोर स्कूटर आली. रिक्षा आणि स्कूटरची जोरात धडक झाली असती परंतु रिक्षावाल्यानं करकचून ब्रेक मारून कशीबाशी रिक्षा थांबवली. अवघ्या दोन तीन सेकंदाच्या फरकानं स्कूटर पुढे गेल्यानं धडक टळली. हा प्रकार पाहून पोलिस आणि इतर गाडीवाले जोरात ओरडले पण फोनच्या नादात असलेल्या बाईंना ‘नक्की काय झालंय’ याची जाणीवच नव्हती. मुलं घाबरली पण बाईं मात्र ढिम्म उलट तिथं थांबावं लागल्यानं चिडलेल्या बाई हुज्जत घालायला लागल्या. रिक्षावाला भडकला.
“ओ बाई, एवढी कसली घाई, फुकट मेला असता. ”
“नीट बोला”
“काय नीट बोला. तुमच्यामुळे जीव गेला असता. थोडक्यात वाचलो. स्वतःचा नाही किमान पोरांचा तरी विचार करायचं ना”
“काही झालं नाही मग कशाला उगीच.. ”बाई अजूनही तोऱ्यातच बोलत होत्या.
“शिकलेल्या वाटता आणि असं वागता. गाडी चालवताना फोन वापरू नये एवढी साधी गोष्ट कळत नाही. ”
“अंताक्षरी खेळत नव्हते. महत्वाचा फोन होता. ”
“अहो, मग गाडी कडेला घेऊन बोलायचं. पंधरा वीस सेकंदासाठी जीव धोक्यात घालायची गरज नव्हती. हे सिग्नल काय टाइमपास म्हणून लावलेले नाहीत. चला चौकीत!! ”पोलिसांच्या बोलण्यानं बाई वरमल्या.
“सॉरी!! सॉरी!! ”म्हणत बाईंनी हात जोडले आणि सुसाट निघून गेल्या.
“सुधारणार नाही. बाईला जन्माची घाई दिसते. ”म्हणत रिक्षावालासुद्धा निघून गेला आणि गर्दी पांगली.
—-
प्रसंग काल्पनिक असला तरी वाहतुकीचे नियम पाळणं अनेकांना कमीपणाचं वाटतं. नो एंट्री तून गाडी चालवणं, सिग्नल तोडणं, गर्दीच्या ठिकाणी वेगात गाडी चालवणं, गाडी चालवताना फोनवर बोलणं, वाट्टेल तिथं आणि तशी गाडी उभी करणं याबद्दल कुणालाच काही वाटत नाही उलट कोणी समजावला गेला तर अंगावर धावून येतात. बेफिकीरपणे गाडी चालवून स्वतःबरोबर दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात त्याबद्दल ना खंत ना खेद. ट्राफिक बाबतीत लोकं फार निर्लज्ज झालेत हेच फार काळजी करण्यासारखं आहे.
आज सकाळचीच ही घटना आहे. उद्याची सगळी तयारी झाली होती. सकाळी लवकर जाऊन बाप्पांची मूर्ती पण घेऊन आलो होतो.
माझ्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी सकाळी टेबलवर चार वर्तमानपत्रे आलेली होती. माझे वर्तमानपत्रांचे पारायण सुरू होते, अधून मधून फेसबुक आणि वॉट्सअप कडे पण भटकंती सुरू होती. आणि गरमागरम चहा पण घेत होतो.
अचानक स्वयंपाक घरातून मस्त गोडसर असा सुंदर वास यायला लागला. बायकोला आवाज दिला आणि विचारलं – आज काय स्पेशल आहे? सुंदर गोड वास येतोय.
बायको – अहो उद्यापासून गणपती उत्सव सुरू होतोय. रोजच्या संध्याकाळच्या प्रसादाकरता पंचखाद्य करते आहे.
मी सहजच मनात म्हटलं – गणपती बाप्पा तुम्हाला गोड आवडतं म्हणून प्रसादाकरता सुंदर पंचखाद्य तयार होतय, आणि रोजच्या सकाळच्या प्रसादाकरता मोदक, शिरा असे गोड पदार्थ असणारच आहेत.
आपल्या दारावर जसा टकटक आवाज येतो, तसाच काहीतरी आवाज देवघरामधून येतोय असा मला भास झाला. माझ्या काही लक्षात येईना. मी इकडे तिकडे बघत होतो, तेवढ्यात देवघरातून कुणीतरी बोलतय असं वाटलं, म्हणून देवघराकडे गेलो, आणि माझी शंका खरी ठरली. तिथूनच बोलण्याचा आवाज येत होता.
देवघरा मधून : मी गणपती बाप्पा बोलतोय
मी चांगलाच गडबडलो. मी स्वतःला दोन-तीन ठिकाणी चिमटे काढून बघितले. सगळ्याच ठिकाणी चिमटे जाणवत होते, म्हणजे मी शुद्धीवर नक्कीच होतो. म्हणजे देवघरातली आज आणलेली गणपती बाप्पांची मूर्तीच बोलत असणार. मी वाकून नमस्कार केला.
देवघरातून : सुखी राहा. तुझा अंदाज बरोबर आहे. मीच गणपती बाप्पा बोलतोय.
मी पुन्हा वाकून नमस्कार केला.
गणपती बाप्पा : तुला कोणी सांगितलं की मला गोड आवडतं म्हणून
मी : तसं सांगितलं कोणीच नाही. पण फोटोमध्ये तुमच्या समोर मोदकांचं आणि गोड पदार्थांची ताटे असतात, सगळ्या गणपतीच्या देवळांमध्ये उत्सवाच्या वेळेस आणि रोजच गोड पदार्थांचा प्रसाद असतो, बऱ्याच पौराणिक कथांमध्ये पण तसा उल्लेख आहे. आम्ही आपलं तेच खरे मानून सुरू ठेवतो. आमचं काही चुकत असेल तर सांगा
गणपती बाप्पा: तुम्ही प्रसाद म्हणून मोदकाचे ताट माझ्यासमोर ठेवता, पण पूजा झाल्यानंतर किंवा आरती झाल्यानंतर मी खाल्ल्यामुळे काही मोदक कमी झाले आहेत कां? किंवा लाडू कमी झाले आहेत, शिरा कमी झाला आहे, असं कधी बघितलं आहे कां?
मी : नाही, तसं दिसलं कधीच नाही. आणि कुणी तसा विचार केला असेल असे पण वाटत नाही. सगळेच जण देवासमोर नैवेद्य दाखवतात, आणि आरती संपली की लगेच त्याचे वाटप आणि खाण्यास सुरूवात होते. तुम्ही खाल्लाय का नाही, हा विचारच कोणाच्या मनात येत नसावा. तुम्हाला गोड खरोखरच आवडत नाही का!
गणपती बाप्पा : आवडत नाहीच, असं नाही, पण मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं जास्त आवडतात. माणसं म्हणजे स्त्री – पुरुष – मुलं – मुली असे सगळेच त्यामध्ये आले. गोड माणसे म्हणजे काय ते लक्षात आलं ना!
मी : अर्थ समजेल असं लक्षात येत नाहीये
गणपती बाप्पा : गोड माणसं म्हणजे नेहमी गोड बोलणारी माणसं मला आवडतात. नुसतं वरवर गोड बोलणारी माणसं घराघरात आणि समाजात सगळ्याच थरांमध्ये आहेत. आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावल्या जात असेल, तिला कमी लेखण्याचा प्रयत्न आपल्या बोलण्यात असेल, बोलण्यात अहंभाव म्हणजे मी आहे म्हणून सगळे आहे – असा भाव असेल, तर या बोलण्याला गोड बोलणे म्हणत नाहीत. गोड बोलणं हे मनापासून असलं पाहिजे.
आपापसात गोडी निर्माण करणारी माणसं मला आवडतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्याकडून होईल तेवढी मदत इतरांना करणारी माणसं सभोवार गोडी निर्माण करत असतात, ती मला आवडतात.
गोड स्वभावाची माणसं मला आवडतात. यांचा स्वभाव स्वच्छ असतो, मनामधे घमंड नसते, मनात कपट नसतं. मनात कुणाला फसवणे किंवा कोणाला फसवून आपला फायदा करणे हा विचार नसतो. कुणाला त्रास देणे, मारहाण करणे, अशी यांची विचारसरणी नसते.
मला गोड हसणारी माणसे आवडतात. काही माणसांचे चेहेरे कायम एरंडेल तेल प्यायल्या सारखे असतात. मी त्यांना आतून सुचवत असतो, कि काळजी माझ्यावर सोडा, थोडे मोकळे व्हा, पण कुणाचं माझ्या सांगण्याकडे लक्षच नसत. खोटे हसणारी माणसे पण भरपूर आहेत. पण अशा लोकांच्या हसण्यात खळखळणारा गोडवा नसतो कारण त्यांच्या मनात गोडवा नसतो.
सर्वांगाने गोड असणारी माणसं मला आवडतात. समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला देव बघता आला, तर तो तुमच्या मनाचा गोडवा, आणि ती तुमची खरी उंची.
माझ्या करता प्रसाद गोड ठेवला काय, किंवा तिखट ठेवला काय, किंवा आंबट ठेवला काय, मला काहीच फरक पडत नसतो, कारण मी यामधलं काहीच खाणार नसतो. तुम्हीच तो प्रसाद संपवणार असता. उत्तम तब्येतीकरता खरंतर गोड तिखट कडू आंबट खारट तुरट अशा सगळ्याच चवी थोड्या थोड्या प्रमाणात पोटात जाणे जरुरी असते. म्हणून नेहेमी अशा विविध चवींचे प्रसाद असावेत.
दुसरा विचार म्हणजे चतुर्थीला तुम्ही आपापल्या घरी माझी स्थापना करता आणि दीड दिवसांनी / ५ दिवसांनी / अनंत चतुर्दशीला माझे विसर्जन करता. विसर्जन का करता हे मात्र मला समजत नाही, माझी तर राहण्याची इच्छा असते. सगळेजण विसर्जन करताना “गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या” गर्जना करत करत विसर्जन करतात. तुमच्या ‘लवकर या’ ह्याला प्रतिसाद म्हणून बऱ्याच वेळा तुमच्याकडे लवकर जावं अशी माझी इच्छा होते, पण येता येत नाही कारण पुढच्या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातली चतुर्थी उजाडते तेव्हाच तुम्हाला माझ्या येण्याचे वेध लागतात.
विसर्जन करताना बरेच जण “गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला” अशा गर्जना करतात. खरं तर मला गावाला जायचंच नसतं कारण मलाच चैन पडणार नसते. असो,
माझी किंवा कुठल्याही देवतेची स्थापना तुमच्या घरात उत्सवाच्या स्वरूपात कायमस्वरूपी असावी असे मला वाटते, कारण त्यात तुमचाच फायदा आहे.
आता बघा, घरात दोघेजण असले तरी त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असतात, संवाद नसतो. घरात चार जण असले, तर तोंडे चार दिशेला आणि संवाद शून्य. अशा घरपणाला काय अर्थ आहे. गणपतीच्या दिवसात घरातली सगळी मंडळी आरतीच्या निमित्ताने एकत्र येतात, जवळपासचे नातेवाईक / मित्रमंडळी पण मुद्दाम घरी येतात, मनोभावे देवाची पूजा होते, आरती होते, पौष्टिक पदार्थांच्या प्रसादाची देवाणघेवाण होते, एकमेकांची चौकशी/ विचारपूस होते. आणि त्यावेळेस सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती मला निख्खळ आनंद दिसत असतो. आणि यालाच घराला घरपण आहे असे म्हणतात. किती मोठा प्लस पॉईंट आहे हा तुमच्याकरता.
तुम्ही घरामध्ये वर्षभर म्हणजे कायमस्वरूपी गणपतीची स्थापना ठेवली, तरी, मी घरात आहे म्हणून तुम्हाला वेगळे असे काहीच करावे लागणार नाही. तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल, तर नेहेमीप्रमाणे तुम्ही घराला कुलूप लावून जाऊ शकता. मला घरातून बाहेर जाण्याकरता किंवा आत येण्याकरता घराचे दार उघडे पाहिजे असं काहीच नाही. रोज आरती / पूजा / फुले / प्रसाद पाहिजेच असे पण काही बंधन नाही. मी उत्सवाच्या स्वरूपात कायम घरात असलो, कि, घरातल्या सगळ्यांच्या सोयीने ठराविक वेळेला सगळेजण रोज एकत्र येतील, महिन्यातून एक दिवस / पंधरा दिवसातून एक दिवस मित्रमंडळी, गावातले नातेवाईक एकत्र येऊ शकतील. संवाद होईल, गप्पा होतील. सगळेजण मोबाईल, टीव्ही बंद करून पूजा / आरती करतील, एकमेकांची विचारपूस करतील. सगळ्यांना आवडेल असं काहीतरी प्रसाद म्हणून एकत्र बसून खाणे होईल. आणि याच बांधिलकीनी तुमच्या घराला कायमस्वरूपी घरपण येणार आहे. घराला घरपण आलं की तुमच्या मध्ये आपोआपच गोडी निर्माण होईल. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं आवडतात. ट्यूब पेटते आहे का?
मी : बाप्पा, असा विचार माझ्या तर कधी डोक्यात आलाच नाही. मी तर नक्की यापुढे असेच करणार आणि यावर थोडं लिहून ते ओळखीच्यांना पण कळवणार हे नक्की
गणपती बाप्पा : तथास्तु
मी एकदम तंद्रीतून जागा झाल्यासारखा जागा झालो. गणपती बाप्पा ने सांगितलेले सर्व विचार माझ्या डोळ्यासमोरून जायला लागले.
मी माझे गणपती बाप्पा बरोबरचे हे बोलणे बायकोला / मुलींना सांगितले, काही मित्रांना फोन करून सांगितले. पण घरातले गणपती बाप्पा बोलले आणि ते पण चक्क माझ्याशी, ही विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट असल्यामुळे कोण विश्वास ठेवणार! तुमचाही कदाचित विश्वास बसणार नाही.
असो, आपल्या घरातल्या सगळ्यांनी गोड व्हावे हे तर नक्कीच सगळ्यांना पटण्यासारखे आहे. बरं गोड माणसं सगळ्यांनाच आवडतात हे सत्य आहेच. आणि जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला हे पण आपण जाणतोच. आणि याकरता करायचे काय आहे? तर घरामध्ये बाराही महिने गणपतीची स्थापना! आणि ती कशी! तर, घरातल्या सगळ्यांनी कायम गोड बोलून, गोड वागून, गोड हसून.