मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कुटुंबात एकट्याला सुख घेण्याचा अधिकारच नसतो” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “कुटुंबात एकट्याला सुख घेण्याचा अधिकारच नसतो” ☆ सुश्री शीला पतकी 

आज एक खूप छान वाक्य ऐकलं “कुटुंबात एकट्याला सुख घेण्याचा अधिकारच नसतो”

वाक्य दिवसभर मनात घोळत होतं. सगळ्या कृती चालल्या होत्या पण डोक्यात कुठेतरी वाक्य आणि त्याचे अर्थ लावले जात होते. ह्या एका वाक्याने कुटुंबाची व्याख्याच केली होती…. कुटुंब म्हणजे सगळीच सुखदुःख सगळ्या घटकांनी वाटून घ्यायची… सर्वांनी आनंद घ्यायचा.. सर्वांनी दुःख भोगायची… सर्वांनी कष्ट करायचे… सर्वांनी एकमेकाची काळजी करायची….. सर्वांनी एकमेकांवर प्रेम करायचं…. ! कितीतरी गोष्टी एका वाक्यात दडलेल्या होत्या…. किती खरं आहे ना… !

कुटुंब म्हटल्यावर त्यात सगळे घटक आले मग त्यातला एखादाच घटक ऐश्वर्य बघतोय सुख घेतोय आणि बाकीचे दुःखाच्या वाटेवर हे शक्यच नसतं….. त्यावरून एक प्रसंग आठवला…. अगदी लहानपणीचा! .. आम्ही जिथे राहत होतो त्या वाड्यात खाली दुकान होतं दुकानातून दुपारी एक पैशाचे चुरमुरे एक पैशाचे डाळ आणली. शेंगा घरातल्याच होत्या त्याला तिखट मीठ मसाला लावला साधारण दोन वाटीचा चिवडा तयार झाला. आम्ही चार भावंड म्हणजे मोठे दोन होते पण ते आमच्यापेक्षा खूप मोठे होते. वाटावाटी आमच्या चौघात चालायची. घराला एक छोटी गॅलरी होती तिथे बसून पातेल्यातच ते चुरमुरे खायला सुरुवात केली. आईला हे कळलं तीने चांगलीच कान उघाडणी केली. “वाटून खाण्यात सुख असत हे असं चोरून खाण्यात नव्हे यानंतर हे पुन्हा घडता कामा नये जे खाल ते सगळेजण वाटून खा. वाटून खाण्यातला आनंद उपभोगा” त्या अडाणी बाईला जीवनाचा खरा आनंद कसा घ्यायचा हे ठाऊक झालं होतं. कारण आपल्या गरिबीतही चतकोर भाकरी दुसऱ्याला द्यावी ही वडिलांची शिकवण होती.

कुटुंबात चांगला संस्कार असल्यामुळे वडिलांची जुनी गिरणी बंद पडली तरी आम्ही सगळे मिळून कष्टाला तयार होतो. मोठी बहिण कॉलेजात होती ती एका ठिकाणी तीस-पस्तीस रुपये मिळत अशा ठिकाणी नोकरी करत होती. दोन नंबरची बहीण एका शाळेत 25 रुपयात काम करत होती. मी शिकवण्या करत होते पंधरा-वीस रुपये मिळायचे. धाकटा भाऊ ग्रंथालयात काम करायचा दहा रुपये पगार होता. सगळ्यांनी मिळून कमवल्यामुळे पैशाची किंमत कळाली होती. घर चालवण्यासाठी आपण कुटुंबाला मदत करतो हा अभिमान वाटत होता. मी शाळेत नोकरीला लागले तेव्हा मला साडेतीनशे रुपये पगार होता. साधारण जून महिन्यात पाऊस पडायला सुरुवात व्हायची त्यावेळेस सेवासदन शाळेसमोर असलेल्या बेकरी मधून सगळ्या भावंडांसाठी पट्टीची खारी घेऊन जाताना खूप आनंद वाटायचा. एक रुपया मध्ये पाव किलो खारी येत होती. शाळा सुटल्यावर पावसाळी वातावरण असायचं. 6 पर्यंत घरी पोहोचायचं. सगळेच घरी आलेले असायचे आणि आई सगळ्यांना मस्त गरम आल्याचा चहा करायची पेटवलेल्या स्टोव्ह भोवती आम्ही मस्त गोल करून बसायचो मग त्या विशिष्ट चहाच्या भांड्यात चहा उकळायचा तो वास… दूध टाकल्यानंतर येणारा वास.. स्टोव्हचा तो घssssर् असा येणारा आवाज… कप बशीची किणकिण.. खारीचा पुडा सोडल्यावर येणारा खमंग वास आणि सगळ्यांनी मिळून चहात बुडवून खाल्लेली ती खारी. जगातल्या एका सगळ्यात मोठ्या सुखाचा अनुभव आम्हाला मिळत होता.. कारण आम्ही सगळी भावंड आणि आई वडील एकत्र होतो ते कुटुंब होतं आमचं! कोणी आजारी पडला कि काळजी घेणं… आजारी माणसाजवळ सातत्याने कोणीतरी बसणं… त्याला खाऊ घालणं…. डॉक्टरांकडे जाऊन औषध आणणं. खरं तर त्याचं गांभीर्य कळत नव्हतं पण ही सगळी काम आम्ही प्रेमाने करत होतो इतके मात्र नक्की.

कुणी पास झाला की वडील मुलींसाठी गजरा घेऊन यायचे तेच त्याचं मोठं बक्षीस गजऱ्याचा सुगंधात कुटुंबाचा प्रेम ओवलेल असायचं. सगळ्या घरभर त्याचा घमघमाट असायचा. मग जरा सवडीने त्याच्यासाठी वडील काहीतरी भेटवस्तू घेऊन द्यायचे. दिवाळीचे कपडे सगळ्यांना एकसारखे. वह्या पुस्तकांची खरेदी सगळ्यांची मिळून त्यातही काटकसरीने केलेल्या रद्दीच्या वह्या… सगळ्यांनाच नवी पुस्तके शक्य नसायची जुनी पुस्तकं वाइंडिंग करून घ्यायचे पण एखाद्याला एखाद पुस्तक नवीन मिळालं की त्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध मात्र सगळ्या भावंडांनी पुन्हा पुन्हा घ्यायचा त्या सुगंधाच सुख काही अलौकिक होतं.

कुटुंबात आई आजारी पडल्याचे मला आठवतच नाही काय जादू होती ठाऊक नाही पण त्या माऊलीने कधीही अंथरूण धरलं नाही सगळ्यांच्या सुखासाठी ती अविरत राबली! आमच्या परीक्षांच्या आधी अभ्यासाला उठवत राहिली. आम्ही जागत राहिलो तर आम्हाला मध्ये चहा करून देत राहिली. मोठ्या बहिणी ही काळजी घ्यायच्या. केंद्राच्या परीक्षांना भावंड सोडवायला यायची.. दोन पेपर असतील तर मधल्या वेळचा डबा घेऊन यायचे किती छोट्या छोट्या गोष्टीतनं सुख मिळाला ना? .. आज माझ्या शेजारी राहणाऱ्या मुलींना मी म्हटलं अग काहीतरी खाऊन जा तर त्या म्हणतात नाही आम्ही ऑर्डर केले ते आम्हाला कॉलेजच्या मिळेल धन्य वाटते. मला एक मिळालेले चॉकलेट मी आणि माझा भाऊ अर्ध वाटून घेत असू हे सगळं माझ्याच घरात होत असं नाही तर हे असं अनेक घरात असायचीच.

कुटुंबाच्या कर्त्याबद्दल आदर होता. धाक होता, जाणीव होती. आईच्या कष्टाची कदर होती, तिच्या नुसत्या डोळ्यात धाक असायचा, तिने कधी शब्दांचा वापर केला नाही. आपली मुलं गुणी निघावीत यासाठी प्रत्येक आई बाप आपल्या सुखाचा त्याग करत होते त्यामुळे नकळत मुलं ही एकमेकांसाठी त्याग करायला शिकली. बहिण भावाच्या वेळा कोणी नडू दिल्या नाहीत ज्याला ज्याची गरज त्या त्या ठिकाणी मनुष्यबळासह जमेल तेवढी आर्थिक मदत एकमेकांना करीत गेलो.

आज सकाळच्या त्या त्या एका वाक्याने मला पुन्हा एकदा जाणीव दिली. किती सत्य होतं नाही का कुटुंबातल्या एकाला सुख घेण्याचा अधिकार नसतोच! सुख हे वाटून घ्यायचं असतं तर त्याची लज्जत वाढते टिकते. ती जाणीव खूप वर्धिष्णु आहे. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं त्या सुखाची किंमत कळत जाते. उत्तम शिक्षण मिळावं म्हणून कोणीतरी केलेल्या त्याग, कोणाच्या लग्नासाठी पैसा गोळा करायचा म्हणून केलेले अफाट कष्ट या अनेक गोष्टी आज खूप समाधान देऊन जातात त्या कुटुंबात वाटून घेतलेल्या सुखाचे परिवर्तन आज समाधानात झाले आहे…… आणि आजची कुटुंब व्यवस्था पाहिली की मन चिंतीत होतं. खूप पैसा आहे कोणाची कुणावर जबाबदारी नाही सगळे स्वतंत्र घटक! तात्कालीक सुख खूप आहेत पण स्मरणात राहील असं समाधान यांना मिळेल की नाही शंका आहे आज त्या वाक्यानं पुन्हा एकदा कुटुंबात कुटुंबासाठी त्याग केलेल्या व्यक्तींची जाणीव झाली आणि मनापासून पटलं कुटुंबात सुख घेण्याचा अधिकार एकट्याला नसतोच….. ! तुम्हालाही असंच वाटतं ना मंडळी.. ! !

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाऊस आख्यान… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ पाऊस आख्यान… ☆ श्री मंगेश मधुकर

जुलै महिना म्हणजे पाऊस, पाऊस आणि पाऊस तरी यंदाचा पहिला आठवडा कोरडा गेला म्हणूनच रेनकोट न्यायचा कंटाळा केला. छत्रीसुद्धा घेतली नाही. नेमकं त्याच दिवशी वरुणराजा अचानक प्रकट झाला. ऑफिसमधून निघालो तेव्हा जोर नव्हता पण थोड्याच वेळात मुसळधार सुरू झाला. गाडी लावून आडोशाला उभा राहिलो. तिथं एक वयस्कर काका पावसाचे थेंब हातावर झेलत गुणगुणत होते. पावसाचा जोर वाढलेला. काका छान मूडमध्ये तर मी वैतागलेला. एकमेकांकडे पाहत औपचारिक हसलो. काहीक्षण असेच शांततेत गेले.

“मस्त पाऊस पडतोय ना” माझ्याकडं पाहत काका म्हणाले.

“हो ना. दुपारपर्यंत कोरडं होतं आणि आता बघा. ”

“पाऊससुद्धा माणसांसारखाच लहरी झालाय. ”

“खरंय! ! ”

“माणसांच्या संगतीनं पाऊस बिघडला की पावसाच्या नादानं माणसं हे समजत नाही”काका.

“निसर्ग अजूनही तसचं भरभरून देतोय. माणसं मात्र बदलली. ”

“मला पाऊस आवडतो. तुम्हांला? ”काकांनी विचारलं पण चांगलं मत नसल्यानं गप्प बसलो.

“उत्तर दिलं नाही म्हणजे पावसाशी वाकडं दिसतेय. आम्हां गावाकडच्यांना पावसाचं फार कौतुक. तिकडच्या पावसाची बातच न्यारी. तो पाऊसच वेगळा. ” काका उत्साहानं म्हणाले.

“ओ काहीही काय! ! माणसांची झालीय तेवढी बास. निसर्गाची वाटणी नको. गावाकडला, शहरी असं काही नसतं. पाऊस हा एकच. ”

काका गप्पांच्या मूडमध्ये तर मला कधी एकदा पाऊस थांबतोय आणि घरी पोचतो असं झालेलं.

“पाऊस एकच असला तरी प्रतिसाद वेगळा असतो. आता हेच बघा ना. पाऊस आला की गावाकडं आनंदीआनंद. नाचणं, भिजणं आणि इथं….. ”

“शहरात पावसाळा म्हणजे डोक्याला ताप. कधीही, कसाही पाऊस येतो आणि पार वाट लावतो. ” 

“चालायचचं. काही दिवस सहन करायचं. एवढा काय बाऊ करायचा. पावसाची मजा तुम्हां लोकांना लुटता येत नाही हेच खरं! ! ”

“मजा, आनंद यागोष्टी बोलायला ठीक. पूर्वी पाऊस म्हटलं की भिजणं, भजी आणि चहा आठवायचं. आता डोळ्यासमोर येतं ते ट्राफिक जॅम, खड्डे आणि तुंबलेलं पाणी. सुखरूप घरी पोहचू की नाही याची चिंता सतावत असते. ”

“त्यात पावसाची चूक नाही. तो अजूनही तसाच पडतो. जे काही प्रॉब्लेम्स आहेत माणसांनीच केलेत. शहरं बकाल अन पब्लिक बेहाल”

“100% करेक्ट. म्हणूनच डोकं शांत नसतं. काही ना काही चालूच. ”

“टेंशन्स, काळज्या यागोष्टी आयुष्यभर असणार. परिस्थिती आणि माणसांच्या वागण्याचा त्रास करून घ्यायचा नाही. पाऊस कसं सगळं धुवून स्वच्छ करतो तसंच आपणही करायचं. पाण्यासारखं वाहतं रहायचं. ”

“पाऊस फारच लाडका दिसतोय. ”

“हो. पाऊस म्हणजे रोमान्स. भुरभुरत्या रेशमी केसांची सुंदर तरुणी… ”काकांनी डोळे मिचकावले.

“ते पूर्वी होतं. आताचा पाऊस रामसे बंधूंच्या सिनेमातल्या भूतांसारखा आक्राळ विक्राळ असतो. ”

“पाऊस म्हणजे रिमझिम बरसती धारा. निसर्गाची मुक्त उधळण. जगण्याशी जोडला असल्यानं फार महत्वाचा. त्याच्या येण्यानं काळी आई तृप्त होते मग पेरणीची लगबग. आहाहा! ! ” काका आठवणीत हरवले.

“पाऊस म्हणजे रस्त्यावरचे तलाव, बंद पडलेल्या गाड्या. जीव मुठीत घेऊन जाणारे लोक. ”

“पाऊस म्हणजे नयनरम्य हिरवाई, मन प्रफुल्लित करणारं धुंद वातावरण”काका स्वप्नांच्या दुनियेत आणि मी वास्तवात.

“पाऊस अनुभवायचा तर गावाकडच्या मोकळ्याढाकळ्या वातावरणातच. ”

“पण शहरात परिस्थिती उलटी. पावसाळा म्हणजे डोकेदुखी. गेल्या काही वर्षांपासून तर नको इतका पडतोय. पूर येणं. माणसं, घर वाहून जाणं हे ठरलेलं. तात्पुरतं वाईट वाटतं. भावनांचे कड वाहतात, पेपरला बातम्या, फोटो, चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज, मान्यवरांच्या भेटीगाठी, कोरडी आश्वासानं. दोन दिवसांचा खेळ. पुढं काहीच होत नाही. दरवर्षीचे तेच रडगाणं. ”मी शहरवासीयांची व्यथा मांडली.

“पाऊस म्हणजे खळाळतं पाणी, धबधबे…. ”काकांचं पाऊस आख्यान सुरूच.

“पाऊस म्हणजे गर्दी, तुंबलेलं पाणी, लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी, चिडलेले,

वैतागलेले, असहाय्य गाडीवाले. आता पावसात माणसं, गाड्या वाहत असल्यानं कागदाच्या नावेचं कौतुक राहिलं नाही. ”

“एकूणच वैतागलेले दिसता”

“कशावरून? ? ”

“अंदाज. तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत. स्वतःला थोडं मोकळं सोडा. नेहमीच अडजेस्टमेंट करायला पाहिजे असं नाही. ”

“गावाविषयी फारच प्रेम दिसतयं. ”मी विषय बदलला.

“असणारच ना. सगळा जन्म तिथंच गेला. पोरं शहरात आली म्हणून इकडं यावं लागलं तरी गावाला येणं जाणं आहेच. पाऊस सुरू झालाय आता मुक्काम तिकडचं हलवायचा. ”

“नशीबवान आहात. आम्हांला हा पर्याय नाही. फारतर एक-दोन दिवसाची पावसाळी सहल. बाकी तेच ते. ”

“मुद्दाम पावसात शेवटचं कधी भिजला होता. ”काकांचा अनपेक्षित प्रश्न.

“आठवत नाही. फार वर्ष झाली असतील. असं का विचारलं. ”

“चला भिजू या. ”

“काहीही काय! ! नको. “

“आहे तो क्षण मजा करा. उद्याचं कोणाला माहीत? कसलाही विचार न करता भिजण्याचा आनंद घ्या. छान वाटेल. मोबाइल करता तसं स्वतःला रिचार्ज करा ”काकांच्या बोलण्यावर मी विचारात पडलो.

“अहो, एवढा कसला विचार करताय. चला” काकांनी हाताला धरून मला पावसात नेलं. गार गार थेंबांनी अंग शहारलं पण मस्त वाटत होतं. खूप खूप दिवसांनी हा निर्भेळ आनंद अनुभवत होतो. फार भन्नाट फिलिंग. रुटीनच्या चक्रात साध्या गोष्टी करून मिळणारा आनंद घेण्याचं विसरूनच गेलो. उद्यासाठी आज काळजीत घालवतो. पावसाळा आला की माझी कुरकुर सुरू व्हायची पण आजच्या अनुभवानं दृष्टिकोण बदलला. चक्क भिजण्याचा आनंद घेत होतो. सोबतचे काका वय विसरून गाणं म्हणत भिजत होते. नकळत मी सुद्धा गुणगुणायला लागलो “रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन…… भिगे आज इस मौंसम में…”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विडा… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ विडा… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

लहानपणीच्या अनेक रंगीबेरंगी आठवणींपैकी ही एक..

आमच्या एकत्र कुटुंबातली एखादी पूजा किंवा सण – समारंभ…

आदले दिवशी संध्याकाळी

आई भाजी आणण्यासाठी बाजारात निघालेली..

तिच्या मागोमाग तिचा पदर धरून मी… तिचं शेपूट…

भोक-यांच्या दुकानासमोरचा रस्ता..

भाजीवाल्या आपापली भाजीची डालगी घेऊन बसलेल्या..

त्यातल्याच एका आजीबाईंसमोर आई उकिडवी बसलेली..

मुळची तपकिरी रंगाची टोपली पोपटी दिसत असलेली..

टोपलीत विड्याची पानं वक्राकार रचलेली.. सुरेख… नक्षीदार…!!

“शेकडा घ्यायचीत.. कशी देणार?”

पानाचं देठ तोडत.. कोवळेपणाचा अंदाज घेत आईचा प्रश्न..

घासाघीस करत एकदाचा भाव ठरायचा..

नि मोजून शंभर पानं केळ्याच्या सोपट्याने बांधून आमच्या पिशवीत पडायची..

त्यातल्याच एका पानात पांढराशुभ्र ओलसर चुन्याचा गोळा बांधलेला असायचा..

बहुधा पानांवर हा चुना “कॉम्प्लिमेंटरी” असावा..

दुसरे दिवशी सकाळी, “विडे लावा गं पोरींनो” थोरल्या काकूची हाक यायची..

घरातल्या मोठ्या बायका स्वयंपाकाला लागलेल्या असताना विड्याचं काम आम्हां बहिणींकडे असायचं..

पानं स्वच्छ धुवून पुसायची. त्यांची देठं काढायची. एका स्वच्छ पाटावर एकावर एक अशा दोन-दोन पानांच्या ओळी करायच्या.

मग वरच्या पानावर थोडासा चुना, त्यावर कॅडबरीसारख्या दिसणा-या काताची किंचितशी पूड, सुपारी नि त्यावर ओलं खोबरं…

“चुना नि कात बेतानं घाला गं.. नाहीतर तोंडं भाजायची” मधली काकू काकडी चोचवत सांगायची..

हसत-खिदळत, गप्पा-गोष्टी करत

विडे जन्माला यायचे नि चांदीच्या तारेत नाही तर सुई-दो-याने ओवले जायचे..

“अगं सांगायची विसरले.. पूजेसाठीची पानं काढून ठेवलीत ना गं?” आईचा जीव टांगणीला लागलेला..

“हो गं, काकू.. चांगली दहा पानं काढून ठेवलीयत…” थोरली बहीण आक्का आईचा जीव भांड्यात पाडायची..

पूजेसमोर विड्याची पानं, त्यावरची सुपारी, हळकुंडं, बदाम, खारका.. यानं पूजेला सौंदर्य प्राप्त व्हायचं..

पक्वान्नाच्या जड जेवणानंतर विडे वाटपाचं काम करून एक विडा स्वत:च्या तोंडात जायचा..

खरं तर विडा फारसा न आवडणारा.. पण जिभेला नि ओठांना लालचुटुक करायची किमया त्यात असल्याने तो हवाहवासा वाटे.. (त्या काळात लिपस्टिक नसल्याने विड्याचं आकर्षण मोठ्ठं!)

विडा खरं तर मला न झेपणारा.. सारं तोंड सोलवटून निघायचं.. दोन दिवस काही खाता यायचं नाही.. पण विड्यानं तोंड रंगवण्याचा मोह काही सुटायचा नाही..

एखादे दिवशी या विडेबांधणीत थोरली काकू सामील व्हायची नि आम्हाला विड्याचे वेगवेगळे प्रकार शिकवायची..

‘गोविद विडा’ त्यातलाच एक..

पाच पानांचा तो गुबगुबीत विडा, त्याला टोचलेली लवंग नि त्यावर लावलेला चंदेरी चांदीचा वर्ख…!!

विड्याचं अतिशय देखणं रूप!! पुन्हा पुन्हा करायला नि पहायला लावणारं..!!!

वर्षातून कधीतरीच करायला नि खायला मिळणा-या या विड्यांबद्दल नि विड्याच्या पानांबद्दल उगीचच आकर्षण वाटायचं..

म्हणूनच आमच्या गोपाळकाकाच्या शेतात जेव्हा विड्याच्या पानांचा वेल पाहिला, तेव्हा खुळावल्यासारखंच झालं होतं..!!

आमच्याबरोबरच आमचं जगही मोठं होत होतं..

अफजलखानाने शिवाजी महाराजांना संपवण्याचा “विडा उचलला” हे इतिहासात वाचून एवढ्या मोठ्या अफजलखानाने इवलुसा विडा का उचलला असेल, तो उचलताना अफझलखान कसा दिसत असेल? असल्या प्रश्नांनी डोक्याचा पार भुगा करून टाकला..

विड्याच्या झाडाला ‘नागवेल’ म्हणतात, या माहितीची भर पडली.. यांनाच खाऊची पानं म्हणतात, हे समजलं, तेव्हा मॅडसारखं हसलो..

खैराचं लाकूड उकळवून त्यापासून कात तयार करतात, हे भूगोलात समजलं. तेव्हा ती प्रक्रिया पहायची उत्सुकता मनात निर्माण झाली..

नि पानामुळे नव्हे, तर कात नि चुन्याच्या रासायनिक प्रक्रियेमुळे तोंड रंगतं.. या वैज्ञानिक सत्यामुळे तर विड्याचं रंगणं बेरंगी होऊन गेलं..

असेच एकदा अचानक पाहुणे आलेले..

चुलतभावाने बाहेरून “विडे” आणले..

कोनाच्या आकाराच्या या विड्यांना “पान” म्हणतात.. हे बहुमोल ज्ञान मिळालं..

गुलकंद, बडीशेपेच्या गोळ्या, तोंड गारेगार करणारा कसलासा पदार्थ असणा-या या हायफाय पानानं आमच्या घरगुती पानाला नामोहरम केलं…!!

“पानपट्टी” हे तसं बदनाम ठिकाण.. मुलींनीच काय, पण चांगल्या मुलांनीही दूर रहावं असं..

पण इथलं पान मात्रं मान्यता पावलेलं..

वाढत्या वयाबरोबर चॉकलेट पान, फायर पान, बनारसी पान… कसल्या कसल्या पानांनी सामान्यज्ञानात भर घातली.

“खईके पान बनारसवाला”… या गाण्यानं बनारसी पान विश्वविख्यात झालं..

तारुण्याच्या मलमली काळात “कळीदार कपुरी पान”, “पान खाये सैंय्या हमार..” किंवा “नटले तुमच्यासाठी.. सजणा विडा रंगला ओठी”… असल्या गाण्यांनी विड्याचं रेशमी, नाजुक भावविश्वातलं स्थान अधोरेखित केलं…!!

चांगल्या घरातल्या बायकांची तोंडं विड्यानं रंगलेली नसतात…

असं असलं तरी त्याच महिलांना बाळंतपणात विड्याची सक्ती.. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे…

नि स्त्रीच्या शक्तीरुपाचं प्रतीक असणा-या देवीला “तांबूल” अपरिहार्य…!!

अशी ही विड्याची कितीही रूपे असली तरी,

बालहातांनी गप्पागोष्टीत रमत बनवलेलं आणि खाल्ल्यानंतर जिभा बाहेर काढून 

“तुझा विडा जास्त रंगला, की माझा विडा जास्त रंगला”…

म्हणत…

अवघ्या बालपणाला रंगांत चिंब भिजवणारं विड्याचं ते “बालगोविंद” रूप सर्वांत लडिवाळ…!!

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “परमेश्वराची फिजिओथेरपी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “परमेश्वराची फिजिओथेरपी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज तुम्हाला एक सत्यकथा सांगणार आहे ऐका…. 

ती सोसायटीत नवीनच राहायला आली होती. येता जाता बोलून सगळ्यांशी तीची मैत्री झाली. काही दिवसातच कळलं की ती तथाकथीत सुधारणावादी मताची आहे. अध्यात्म, पूजा मंत्र, स्तोत्र काही न.. करणारी… सडेतोड बोलणारी आहे.

तिच्याशी गप्पा तशाच व्हायच्या. हळदी कुंकवाला बोलावलं तर साडी नेसून येऊन जायची पण नंतर तिच्या कॉमेंट्स सुरूच असायच्या…. 

“तुम्हाला कंटाळा कसा येत नाही हे सगळं करत बसायला? तासंतास कस ग बसता त्या पोथ्या परत परत वाचायला? तीच तीच स्तोत्र म्हणून काय मिळतं तुम्हाला ?… नवीन काहीतरी जरा वाचा….”

आईने दिलेला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा तीने डब्यात ठेवून दिले होते. हे तिनेच आम्हाला सांगितले.

पहिले काही दिवस यावरून गरमागरम चर्चा व्हायची. ती त्याला ठामपणे उत्तर द्यायची. काही दिवसांनी लक्षात आलं त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये… मग मात्र आम्ही ठरवलं आता यावर बोलायचं नाही. मैत्रीण म्हणून ती छान आहे ना मग झालं …..

असू दे… आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतं त्याप्रमाणे तो वागत असतो. अस सुरू होत.. बरीच वर्षे झाल्यानंतर सगळ्यांना तिची सवय पण झाली..

नंतर एके दिवशी तिच्यावर एक वेगळाच प्रसंग ओढवला.. 

ती सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आहे हे जाणवले. बोलणं अस्पष्ट यायला लागलं. नवऱ्याने प्रकरण गंभीर आहे हे ओळखलं. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं. मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. अगदी माइल्ड होता.. आणि लगेचच ऍडमिट केल्याने फार फायदा झाला.

हळूहळू सुधारणा होईल डॉक्टरांनी सांगितले. तरी बरेच दिवस ती दवाखान्यात होती. नंतर बरी झाली पण उच्चार इतके स्पष्ट येत नव्हते.

तिला डिस्चार्ज मिळणार होता त्या दिवशी डॉक्टरांनी औषधं कशी घ्यायची खबरदारी काय घ्यायची हे नीट समजावले आणि सहज म्हणाले…

“अजून एक तुम्हाला सांगू का ? घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे त्याचा परिणाम होतो. प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा.. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम म्हणालात तर अजूनच उत्तम…”

डॉक्टरांचे ते बोलणं ऐकून ती थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली. डॉक्टर असं काही सांगतील असे तिला वाटलेच नव्हते. 

“हो हो” असं त्यांना म्हणाली.

घरी आल्यानंतर चार दिवसांनी तिच्या मनात काय आले कोण जाणे ? डॉक्टरांनी स्वतः सांगितले आहे तर हा उपाय पण करावा असे तिला वाटले. 

फोन करून तिने मला हे सांगितले.

“तुला हे कसं सांगू असं मला वाटत होतं…”

तिला म्हटलं,

“अग तुला बरं व्हायचं आहे. आता बाकी काही बोलु नकोस. माझ्याकडे सज्जनगडावर रामदासीबुवांनी म्हटलेली रामरक्षा ऑडिओ स्वरूपात आहे. ती तुला पाठवते. ती तू ऐक. कुठल्याही दुकानात तुला रामरक्षेचे पुस्तक अगदी पाच दहा रुपयात मिळेल. ते आणून घे आणि बघून म्हण….”

तिचा गळा दाटून आला होता…. “नीता”..

एवढेच ती म्हणाली “राहू दे उगीच अपराधी भाव मनात ठेवू नकोस. मात्र शांतपणे, श्रद्धेने, मनोभावे म्हणत रहा. तुझा विश्वास नाही हे माहित आहे. तरी बरं होण्यासाठी तरी कर.. हा फिजीओथेरपीचा एक प्रकार आहे असं समज… थोडे दिवस करून तर बघ मग आपण निवांत बोलू, मी तिला म्हणाले.

काही दिवसांनी तिने मला भेटायला बोलावले,

“हे बघ” ती म्हणाली.

बघीतल तर चक्क…

छोट्याशा देवघरात बाळकृष्ण अन्नपूर्णा ठेवले होते. शेजारी समई मंद तेवत होती. समोर दोन निरांजन तबकात होती. उदबत्तीचा मंद सुगंध येत होता. फुलं वाहिली होती. शेजारीच रामाचा फोटो होता. त्याला मोगऱ्याचा गजरा घातला होता. मी बघतच राहिले.

ती म्हणाली

“काय झालं माहित नाही… पण ऑनलाइन हे सगळं मागवलं अंतरंगातूनच काहीतरी वाटलं असं करावं.. खरंच ग… खूप शांत समाधानी वाटतं आहे. तुम्ही हे का करत होता हे आजारी पडल्यानंतर मला कळलं. इथे समोर बसून रामरक्षा म्हणताना काही तरी भारल्यासारखं वेगळच वाटत होतं. मला ते तुला शब्दात सांगता येणार नाही.”

“राहू दे गं… तु ते अनुभवलसं बरी झालीस हे महत्त्वाचं. आता तू पण हा आनंद घे.”

तिला पसायदान, मनाचे श्लोक आणि हरीपाठ अशी पुस्तकं दिली. तिचे डोळे भरून वाहयलाच लागले होते….. असु दे होत कधी असंही…

ती पूर्ण बरी झाली याच श्रेय डॉक्टरांनाच आहे. मात्र त्या अवघड वेळी तिला रामरायाने मानसिक आधार दिला… पूजा, जप, स्तोत्र पठण यासाठी तर करायचे असतात. प्रयत्न, कष्ट आपण करायचे असतात पण त्याचा हात हातात असू द्यायचा. तो सांभाळतो.. कोणीतरी एका अदृश्य शक्ती आहे तिच्यावर विश्वास ठेवायचा. 

जमेल तशी साधना करायची. श्रद्धेने भक्ती करायची.त्यानी मन खंबीर बनतं. दोघांचा मेळ जमला की मग शरीरही बरं होण्यासाठी साथ देतं. डॉक्टर तर तीला म्हणाले होते,

“काहीही येत नसेल तर नुसती बाराखडी तरी म्हणा.”

नाहीतरी श्रीकृष्णांनी तेच तर सांगितले आहे .

अगा बावन्न वर्णा परता l

कोण मंत्रु आहे पांडूसुता ll

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परमेश्वराचे दर्शन… लेख क्र. ६ – खारीचा वाटा… ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ खारीचा वाटा… लेख क्र. ६ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

शक्य असेल तेव्हा रोज मुलांना गोष्ट सांगायला मला आवडतं. आज अशीच एका गरीब पण प्रामाणिक मुलाची गोष्ट आज मी वर्गात सांगितली. आजारी वडील, घरकाम करणारी आई, एक छोटी बहिण असे कुटुंब. आईला मदत म्हणून हा मुलगा पेपरची आणि दुधाची लाईन टाकतो. पहाटे पेपर टाकत असताना त्याला पैशाची बॅग मिळते. तो ती मालकाला देऊन देतो. अशी गोष्ट होती.

गोष्ट सांगून झाल्यावर मी मुलांशी गप्पा मारायला सुरुवात केली. माझ्या वर्गातली बरीच मुलं आर्थिकदृष्ट्या खूप गरीब होती. त्यांना आई-वडिलांचे कष्ट कळावेत म्हणून आणि गरीब बसूनही त्या मुलाचा प्रामाणिकपणा आपल्या मुलांना समजावा म्हणून मी ही गोष्ट मुलांना सांगितली होती.

“तुम्ही आईला मदत म्हणून काय काय करता? ” असा प्रश्न विचारल्यावर, बऱ्याच मुलांनी छोटी-मोठी कामे करून आईला घरकामात मदत करतो असं सांगितलं.

सगळ्यात शेवटी ऋजुता (नाव बदललेले) माझ्या अगदी जवळ आली आणि म्हणाली, “बाई, माझा मोठा भाऊ पेपर टाकतो आणि मी शेजारच्यांच्या छोट्या बाळाला सांभाळते. त्याचे हजार रुपये मिळतात. शिवाय आईला घरातील इतर छोट्या कामात, भांडी घासायला, केर काढायला मदत करते, ” घरात आपण देत असलेल्या खारीच्या वाट्याबद्दल सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तिचे काम सर्व वर्गाच्या समोर सांगून, सगळ्यांना टाळ्या वाजवून, तिचे अभिनंदन करायला सांगितलं. छोटसं बक्षीस देऊन तिचं कौतुकही केलं.

पाठीवर पडलेल्या त्या कौतुकाच्या थापेने दिवसभर ती एका वेगळ्याच धुंदीत वावरत होती. प्राथमिक शाळेतली मुलं ही. खेळाबागडायच्या या वयात केवढी ही समज! अकाली प्रौढ झाल्यासारखी वाटतात.

अशी जाणीव आणि संवेदनशीलता मोठेपणीही त्यांच्यात राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ४९/२ – ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ४९/२  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

कोनाडा – – 

(जीजीच्या सहवासात आंबे खाण्याचा आनंद मुक्त असायचा. भरपूर, केव्हांही, कधीही आणि आमच्या डोळयात माखलेला आनंद पाहणे हा तिचा आनंद होता.) – इथून पुढे —- 

आता वाटतं, आम्ही तिला एकटीला टाकून जायचो. कशी राहत असेल ती एकटी? आमच्याशिवाय किती सुनी सुनी झाली असेल ती!

कधी सांगायची, “अग! त्या दिवशी वेणू आली होती. या एवढ्या मोठ्या करपाल्या कोलंब्या घेऊन. पाठीसच पडली. “घेच गं म्हातारे! तुला द्यायच्या म्हणून कुणालाच दिल्या नाहीत. “

“पण कुणासाठी घेऊ बाई? माझी नात नाही खायला. ती आली की आण पुन्हा नक्की. आता दे त्या चित्रेबाईला. “.. पण बिंबाला किती आवडतात या तळलेल्या कोलंब्या, म्हणून तिचा जीव हळहळायचा.

रविवार असला की, पाट्यावर नारळ वाटून ती त्याचं दूध काढायची आणि नहाण्यापूर्वी ती केसांना छान लावून द्यायची. त्यावेळी मिक्सर नव्हते. केसांना शांपू लावणे अथवा बाजारात मिळणारे केसांचे साबण लावणे तिला अजिबात मान्य नसायचे. सगळ्या नातींचे केस दाट आणि काळेभोर. आता या सगळ्याची पावती जीजीलाच देते पण त्यावेळी तिचा रागच यायचा. तिची ही साग्रसंगीत औषधं लावण्याचा आम्हाला कंटाळा यायचा म्हणून आम्ही तिच्याशी वाद घालायचो, भांडायचेही. पण ती ऐकून घ्यायची आणि तिला जे करायचे तेच करायची. कधी चिडून दातओठ खायचीही,

म्हणायची, “कार्टीला अक्कल नाही. चांगलं कळत नाही. दळभद्री कुठली. “

तिची गंमत वाटायची. एव्हढं आयुष्य तिनं उन्हात काढलं. सोळाव्या वर्षी विधवा झाली. पदरात चार महिन्याचं मुल. त्यावेळचा सामाजिक काळही चांगला नव्हता. विधवा बाईला खूप पीडा. तिला तिच्या सासरच्या माणसांनीही खूप त्रास दिला. कधी ती सांगायची,

“मला जीवनाचा कंटाळा आला होता. मी जनाला घरीच पाळण्यात ठेवले आणि तळं गाठलं. आता जीवच द्यायचा. तळ्याजवळच्या शंकराच्या देवळात घंटा वाजत होत्या. पाण्यात खूप कमळं फुलली होती. का कोण जाणे! मला एकदम वाटलं, पाळण्याच्या दांड्यात माझ्या बाळाचा पाय अडकलाय, माझं बाळ रडतंय्, त्याच्याजवळ कुणीच नाही आणि मी झपाट्याने घरी धावत आले.. बाळ पाळण्यात शांत झोपला होता.

गुटगुटीत, गोरागोमटा, भव्य कपाळ, काळंभोर जावळ. मी त्याला छातीशी कवटाळलं आणि ठरवलं याला मी वाढवेन, मोठा करेन, चणे दाणे खाईन, खूप कष्ट करेन. “

.. कष्टच केले तिने. आयुष्यभर, तेव्हांही, नंतरही, या ना त्या कारणाने, अथक, कंटाळा न करता.

पप्पा एव्हढाले कोहळे आणायचे ते किसायचे त्याचा रस काढायचा. पातेल्यात साखरेच्या पाकात शिजवून वड्या करायच्या. टोपलीभर कमळाचे देठ आणायचे, ते गोल कापायचे. तिखट मीठ, जीरपूड लावून वाळवायचेआणि तळून खायचे. त्याला कमळाची भिशी म्हणत. ही भिशी करणं अपार कटकटीचं होतं. गवारीच्या शेंगा ताकात भिजवून नंतर वाळवायच्या. बरण्या भरुन लोणची, मुरंबे करायची. दिवाळीच्या दिवसात, सुगंधी उटणे ती घरी बनवायची. अनारशाचे ओले तांदुळ जात्यावर दळायची. आम्हाला म्हणायची, “येग! जात्याला हात लाव. माझे हात दुखतात. तुझ्या आईलाही भरपूर कामं असतात. “

पण आम्ही तिला कधीतरीच मदत करायचो. खरं म्हणजे हे ती सर्व आमच्यासाठीच करत होती.

आता तिच्या हातचे जाळीदार कुरकुरीत सोनेरी अनारसे आठवले की वाटतं, ती गोडी अवीट होती आणि आता कायमची दुरावली.

पपांची आणि जीजीची भांडणं व्हायचीच. कधीकधी तर दोघेही मागे हटायचे नाहीत. आपला मुलगा आपल्याला बोलतो याचं तिला खूप दु:खं होत असलं पाहिजे आणि आम्हीही तिची बाजू उचलून धरायचे नाही. मग ती पिळवटून म्हणायची,

“जाते रे बाबा, मी आता देवळात बसते तिथे जाऊन. आता या घरात माझी गरज नाही ऊरली. “

आणि ती खरंच जायची कुठेतरी. भांडण संपायचं पण घरातलं वातावरण गढुळ व्हायचं. जीजीला आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. ती जाणार तरी कुठे होती?

त्यादिवशी दिवसभर शाळेत उदास वाटायचं. मन हळहळायचं. उगीच बोलतात पपा तिला. पपांची तत्वं कठोर. न पटणारं काहीही ते कधीच करायचे नाहीत.

जीजीनं तरी कशाला अट्टाहास करावा. जाऊ द्यावं ना. काय करायचं आता आपण?

पण शाळेतून घरी आल्यावर, मधल्या खोलीत जीजी पांघरुण घेऊन झोपलेली असायची.

रात्री सगळे झोपले की मी हळुच तिच्या जवळ जायची. ती जागीच असायची मग डोळ्यात पाणी आणून मला जवळ घेत म्हणायची,

“मला एखादी तरी मुलगी हवी होती. मुलीची माया वेगळी असते!! “

खरं सांगू तेव्हां तिच्या जखमा आम्हाला दिसल्याच नाहीत.

त्याही वेळी तिने मला लपेटून घेत म्हटलं होतं..

“तू जेवलीस ना? फडताळ्यात तुझ्यासाठी तळलेली सुरमई ठेवली होती. आईनं तुला वाढली कां.? “

किती विलक्षण प्रेमाचं नातं हे! याची जात कुठली? याचा रंग कुठला? या ओबडधोबडपणातही गुलाबपाण्याचा स्पर्श होता. जीवनातली ती शीतलता होती.

 ती आजारी पडायची. इतकी आजारी पडायची की आम्हाला वाटायचं आता ती यातून वाचणार नाही. पपा तिचे हात पाय दाबायचे आणि त्यांच्या टपोर्‍या डोळ्यांतून अश्रु गळायचे.

एका मे महिन्यात आमची काश्मीरची सहल ठरली होती. आणि नेमकी जीजी आजारी पडली. खूपच आजारी होती ती. आता सहल कॅन्सलच पण ती डाॅक्टरना सांगत होती,

“डाॅक्टर, या वेळेस कसंही करुन मला बरं करा नाहीतर माझ्या नातींचा हिरमोड होईल. त्यांची काश्मीर सहल सुखरुप पार पडू देत. मग माझं काही होऊ देत. “

डाॅक्टर हसायचे. त्यांना जीजीची चमत्कारिक प्रकृती माहीत होती. ते म्हणायचे,

“आजी तुम्ही आज आजारी आहात. पण उद्या ओकांच्या घरी जास्वंदीची फुलं द्यायला जाल. “

जीजी मला म्हणाली होती. “हे बघ! माझं काही बरं वाईट झालं तरी तुम्ही सहलीला जाच बरं! माझं काय मेलं महत्व? मी म्हातारी. कधीतरी मरणारच. पण तुम्ही जा.

इतके पैसे भरलेत, हौस केलीय्. जाच बरं!

लोक काय म्हणतील याचा विचार नका करु? “

 …. पण ती जगतच राहिली. प्रत्येकवेळी तिच्या जगण्याला कारणच मिळायचं जणु.

आजारपणात ती देवाला विनवायची,

“बाबारे! या निशाचं एव्हढं बाळंतपण होऊ दे! पहिल्या खेपेस तिचं ऑपरेशन झालं. आतां काय होतंय् कोण जाणे! सारं सुखरूप होऊदे रे बाबा! तिला धडधाकट पाहू दे मग ने मला. “

पपांना पहिला हार्ट ॲटॅक आला तेव्हांही ती अशीच आजारी होती. गादीत पडल्या पडल्याच पुटपुटायची,

” माझा जना असा गादीवर. माझं काही झालं तर हा उठेल, खांदा देईल मग नंतर याला काही झालं तर? नको आधी माझ्या जनाला बरं कर मग मला ने”.

जीजीच्या आयुष्याची दोरी अशी वाढतच गेली. ती इतकी लांबली की तिच्या आयुष्यातली एक शोकांतिका टळली नाही.

पपा गेले. ती राह्यली.

देवळातला घंटानाद आणि तळ्यातल्या कमळांना साक्षी ठेवून तिनं तिच्या बाळाला वाढवायचं व्रत घेतलं होतं. ते व्रत तिने आयुष्यभर पाळलं.

ती आम्हाला अनेक गोष्टी वारंवार सांगायची. त्यातलीच एक गोष्ट ही होती.

“जना लहान असताना त्याला नेहमी एक स्वप्न पडायचं. आपली आई सोडून गेली. मग तो स्वप्नातून जागा व्हायचा. माझ्या कुशीत शिरुन म्हणायचा, “आई तू मला सोडून कधीही जाऊ नकोस. ” मग ती म्हणायची”नाही रे बाबा! मी तुला अगदी जन्मभर पुरेन! घाबरू नकोस. “

जणुं जीजीचे शब्द खरे ठरले की पपांना दिलेलं वचन तिने पाळलं?

पण आमचे पपा गेले आणि आम्ही दु:खात बुडालो. पपा आमचे सर्वकाही होते. वडील. मार्गदर्शक. मित्र.

आम्हां सगळ्यांना शोकाकुल बघून ती कळवळली. तिनं आम्हां सार्‍यांना जवळ घेतलं.

“बाबांनो! वडीलांच्या मृत्युचे दु:ख नका करु. पिकलं पान गळणार. मुलांच्या आधी बापानं जावं हाच जगाचा नियम. माझा बाबा गेला. मी मागे उरले, उलटं झालं. माझ्या मरणाचं दु:ख बाबाला सहन झालं असतं का? माझ्यात दु:ख सोसण्याची ताकद आहे. त्याला नसतं सोसलं म्हणून मी राहिले. “

 

९७वर्षाची होती ती! पण हिंडती फिरती होती. मी माहेरी येणार असले की तिची फार धावपळ असायची. माझ्यासाठी माझ्या आवडीचे खाद्यपदार्थ करण्याचा तिचा केव्हढा आटापिटा असायचा.

पहाटे दारात रिक्षा थांबली तर लगबगीने दार उघडायला तीच यायची. दारातच विळखा घालायची, पापे घ्यायची. इतकी कृश झाली होती! नजरही अंधुकली होती.

पण आम्हाला ती डोळ्यांच्या पलीकडे बघू शकत होती.

जातांना निरोप घेताना तिला म्हणावं,

“येते हं जीजी. “

“नीट जा हं! परत कधी येशील? “

मनात यायचं परत येईन तेव्हां ही असेल का?

ती म्हणायची, “आता देवानं मला न्यावं ग! कधी मरेन मी? “

तिचा हा प्रश्न किती केवीलवाणा असायचा.

ती गेली.

त्यादिवशी मला दार उघडायला ती नव्हती.

दाराला लटकलेलं तिच्या अस्थींचं गाठोडं पाहिलं अन् प्रवासात धरून ठेवलेला बांध तुटला.

जाणवलं.

आयुष्यातला एक निस्सीम प्रेमाचा कोनाडा

रिकामा झाला!! अशी आभाळा एव्हढी माया आता कोण करेल?

(२०२२ साली मी जीजीचं आत्मवृत्तपर पुस्तक, ”जीजी” प्रकाशित केलं. तिचं ऋण तर कधीच फेडू शकणार नाही पण पुस्तकरुपात मी तिचं अस्तित्व आमच्यात टिकवण्याचा फक्त प्रयत्न केला.)

 – भाग ४९/२ समाप्त –

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… – कोनाडा भाग – ४९/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… कोनाडा – भाग – ४९/१ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

कोनाडा – – 

जीजीने आम्हाला हे अनेकवेळा सांगितलं असेल!

“तुमची आई गरोदर असायची तेव्हां, मी घरात नाही असे पाहून गल्लीतल्या कोपर्‍यावरची ती आजी तुमच्या आईकडे गुळ आणि बिब्बा मागायला यायची. म्हणूनच तुमच्या आईला प्रत्येक वेळी मुलगीच झाली. मुलगा झालाच नाही. “

हे सांगताना जीजीचा सावळा, ओघळलेला चेहरा, काहीसा उदास, कसातरीच व्हायचा.

तिच्या गालावरचा चामखीळही त्यावेळी अधिक लोंबल्यासारखा वाटायचा. मग मी हळूहळू जीजीच्या मांडीवर जायचे आणि तिला विचारायचे,

“तुला आम्ही नको होतो का? आम्ही सार्‍या मुलीच झालो म्हणून तुला वाईट वाटतं कां? उगीच जन्माला आलो आम्ही. “

मग मात्र ती चिडायची.

“चल!! अभद्र कार्टी कुठली? तू तर माझ्या जनाचा मुलगाच आहेस हो! “

जीजी आणि आम्ही तिच्या पाच नाती.

तिच्याशी आमचं विलक्षण जमायचं. जन्म आईने दिला पण संगोपन जीजीनेच केलं. तिच्याच खांद्यावर आम्ही वाढलो. आपल्या एकुलत्या एक मुलाला मुलगा झाला नाही, त्याचा वंश बुडाला, भविष्यात त्याचं नाव लावायला कुणी नाही म्हणून तिला सदा दु:ख वाटायचं पण आम्ही अभ्यास करावा, खूप मार्क्स मिळवावेत, मोठं व्हावं आणि अशा रीतीने तिच्या विद्वान मुलाचं नाव वाढवावं असंही तिला वाटायचं.

परीक्षेचा निकाल असला की आम्ही शाळेतून परत येईपर्यंत ती पायरीवर बसलेली असायची. वरचा नंबर आलेला असला की तिला तिच्या वयाचंही भान

रहायचं नाही. ती उड्याच मारायची.

“माझा बाबा, माझा हुश्शार बाबा. ” म्हणत आमचे पटापट मुके घ्यायची. इतकी आनंदी व्हायची आणि दिवसभर स्वत:शी हसत बसायची.

आणि जर का आमचा नंबर घसरलेला असला की लगेच म्हणायची,

“जाऊदे! त्या बाई जरा पक्षपातीच आहेत. तुला मुद्दामच कमी मार्क्स दिले असतील. त्यांची मुलगी आहे ना तुझ्या वर्गात? तिला पुढे आणण्यासाठी तुला ढकलली असेल मागे. तू काही वाईट वाटून घेऊ नकोस.. “

अशी जीजी! आभाळागत माया तिची.

ती बोलायची ते सारं बरोबरच असायचं असं नव्हे पण या सर्वामागे असायचं ते तिचं निरागस निर्मळ प्रेम!

आईनं आम्हाला शिस्त लावली, चांगले संस्कार केले, पपांनी आम्हाला जीवनाकडे पाहण्याची अभ्यासात्मक दृष्टी दिली पण जीजीने आम्हाला आधार दिला. त्या कोमल बालपणी, कुठल्याही भयावह क्षणी आम्हाला शिरावसं वाटलं ते जीजीच्या सुरकुतलेल्या कुशीत. तिच्या लुगड्याचा वास आणि तिच्या हाताच्या थोपटण्याने आमची उदासीनता त्या त्या वेळी दूर झाली.

तसं आमचं स्वतंत्र कुटुंब. फारसे नातेवाईक नाहीत. आई, पपा, जीजी आणि आम्ही पाच बहिणी हेच आमचं सिमीत विश्व आणि आमच्या कुटुंबावर जीजीचा तसा पहिल्यापासून प्रभाव.

कळत नकळत ती सगळ्यांना तिचं ऐकायला लावायची. पपांचं व्यक्तीमत्व इतकं जबरदस्त, हट्टी पण अनेक वेळा त्यांनाही तिच्यापुढे नमावं लागायचं. तशी देवधर्म करणारी ती नव्हती. उलट तिनं वयाच्या सोळाव्या वर्षापासून इतकं जग पाहिलं आणि इतके कटु अनुभव घेतले की देवाविषयी ती फार भोळी नव्हती पण घरातून बाहेर जाताना मात्र देवाला नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही हा तिचा शिरस्ता होता. त्यासाठी ती आम्हाला पायरीवरुन परतायला लावायची.

“नमस्कार केलास? आधी कर. आणि मग जा. “

पपांनी मात्र तिचा हा नियम कधी पाळला नाही पण पपा बाहेर पडले की बापूडवाणी होऊन दिवाणखान्यातल्या खिडकी जवळच्या शंकराच्या फोटोजवळ पाच मिनीटं हात जोडून काहीतरी पुटपुटत उभी रहायची.

ती जशी प्रेमळ, तशी त्रासदायकही होती. तिचं कुणी ऐकलं नाही की ती त्या गोष्टीचा इतका पिच्छा पुरवायची की शेवटी कंटाळून तिचं ऐकावंच लागायचं.

एकदा आठवतंय्.. दिवस पावसाळ्याचे होते पण म्हणावा तसा पाऊस अजन कोसळत नव्हता. त्या दिवशी तर चक्क उन पडलं होतं. आभाळ अगदी मोकळं, निरभ्र होतं. तरीही घरातून निघताना जीजी म्हणाली,

“छत्री घे. “

“काय तरी काय? इतक्या कडक उन्हात मी छत्री घेतली तर माझ्या मैत्रीणी मला हंसतील आणि मी छत्री कुठेतरी विसरेनही. “

पण गंमत झाली. संध्याकाळी वातावरण एकदम बदललं. आकाश काळंकुट्ट झालं. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट, वादळी वारा आणि मुसळधार पाऊस. ओली झालेली मी कशीबशी बसमधून टेंभी नाक्यावर उतरले तर बस स्टाॅपवर जीजी डोक्यावर एक आणि हातात एक छत्री घेऊन उभी!!

ते चित्र कायम माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या दिवसाची तिची ती काळजीभरली प्रेममय नजर मनात कोरली गेली आहे.

“अग!! तू कशाला आलीस इतक्या पावसात? “

“कार्टे तुला सकाळी छत्री घेऊन जायला सांगितलं तर ऐकलं नाहीस. हट्टी, द्वाड.

किती भिजली आहेस! न्युमोनिया झाला तर? परीक्षा जवळ आली आहे. “

रस्ताभर ती बोलत होती.

घरात शिरल्याबरोबर स्वत:च्या पदरानेच तिनं माझं डोकं खसाखसा पुसलं. गरम पाण्यातून चमचाभर ब्रांडीही पाजली. कितीतरी वेळ नुसती अस्वस्थ होती.

लहानपणी मला वरचेवर सर्दी, खोकला ताप यायचा. डांग्या खोकल्याने मी दोन महिने आजारी होते. कितीतरी औषधे, इंजेक्शने झाली पण खोकला काही थांबायचा नाही एक दिवस कंटाळून मी जीजीला म्हटलं,

“जीजी आता तूच मला बरं कर. तू दिलेलं कितीही कडू औषध मी पीईन पण हा खोकला थांबव. नाहीतर मी मरुन जाईन. “

तिच्या अंत:करणातला मायेचा झरा, तिच्या डोळ्यातून ठिबकला. एरवी मला सतत ‘कार्टी भामटी’ म्हणणारी… तिनं मला पदरात वेढून घेतलं.

“असं बोलू नकोरे बाबा! संध्याकाळच्या वेळी कसलं हे अभद्र बोलणं. मी कशी मरु देईन तुला? “

अन् तिने माझे मटामट मुके घेतले.

मग ती सकाळीच घराबाहेर पडली. कुठे गेली कोण जाणे! पण परत आली तेव्हा तिच्या हातात हिरवीगार अढुळशाची पानं होती.

तिनं ती स्वच्छ धुवून पाट्यावर वाटली आणि त्याचा रस काढला.

आणि तो कडू रस, “अच्च्युताय नम:

गोविंदाय नम:”असं म्हणत माझ्या घशात उतरवला. लागोपाठ सात दिवस या धन्वंतरीची ट्रीटमेंट मी याच पद्धतीने घेतली आणि खरोखरच माझा तो जीवघेणा खोकला बरा झाला.

तिची श्रद्धा, तिची मेहनत आणि तिच्या ममतेपुढे तो रोग नमला. तिला इतकी आयुर्वेद उपचारपद्धती कशी माहीत होती, ते गुपीतच होतं पण तिने केलेले लेप, गुट्या, चाटणे, काढे यांच्यामुळे आमच्या व्याधी झटकन् बर्‍या व्हायच्या.

जीजी सार्‍यांसाठी झटायची. तिला आमच्यापैकी कुणाचंही काही करताना कधीही कंटाळा आला नाही. तिच्या मनात आमच्याबद्दल अत्यंत माया होती. ओलावा होता.

जीजीची तिसरी नात छुंदा. आमच्या सर्वांपेक्षा हुशार, अत्यंत अभ्यासू. जीजीला तिचा फार अभिमान.

“हा माझा अर्जुन हो! “असं सगळ्यांना सांगायची.

पण जीजीची ही नात फार रडकी आणि खेंगट. शाळेत जाताना रडायची. म्युनिसीपालिटीची बारा नंबरची शाळा तिला आवडायची नाही पण घराजवळची शाळा म्हणून आमचं सर्वांचं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं. आम्ही कुणीच शाळेत जाताना त्रास दिला नाही पण छुंदाने खूप त्रास दिला. जीजी रोज तिच्याबरोबर शाळेत जायची. शाळा सुटेपर्यंत पायरीवर बसून रहायची. ना भूक ना तहान. छुंदा वर्गातून बाहेर येऊन खात्री करुन घ्यायची, जीजी पायरीवर असल्याची. छुंदा पाचवीत जाईपर्यंत ही जोडगोळी शाळेत जायची. छुंदा वर्गात अन् जीजी पायरीवर.

पुढेपुढे छुंदाच्या वर्गबाईंनाही जीजीची सवय झाली. ही एवढी म्हातारी बाई नातीसाठी ५—६तास पायरीवर बसून राहते याचं त्यांनाही प्रचंड कुतुहल वाटायचं. कधी कधी तर बाईंना काही काम असलं तर त्या जीजीलाच वर्ग सांभाळायला सांगायच्या. वर्गातल्या सार्‍यांचीच ती आजी झाली होती.

पुढे छुंदा उच्च श्रेणीत केमिकल इंजिनिअर झाली. आजही ती म्हणते. “जीजी नसती तर मी शिकले असते का?? “

इंजीनीअरींगचं डिग्री-सर्टीफिकेट जीजीच्या हातात देत ती म्हणाली होती… 

“खरं म्हणजे ही डिग्री तुलाच दिली पाहिजे. “

त्याक्षणी तिच्या चेहर्‍यावरचा आनंद, डोळ्यातलं पाणी अतुलनीय होतं.

मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही महिनाभर ग्रँटरोडला आजोबांकडे रहायला जायचो. जीजी आणि पपा फक्त घरी. पपा तर दिवसभर बाहेरच असायचे. म्हणजे जीजी एकटीच घरात. कधीकधी पपाही आमच्याबरोबर असायचे. म्हणजे जीजी अगदी एकटीच. रात्री आमच्या नात्यातला एक काका तिच्या सोबत असायचा.

पण ती आम्ही परत घरी यायची वाट बघायची. ती आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या घालून ठेवायची. त्यावेळी ठाण्याजवळ जंगलात रहाणार्‍या कातकरी आदीवासी बायका आमच्या घरी आंबे घेऊन यायच्या. प्रत्येक आंबेवालीशी हुज्जत घालून निवडून तीआंबे विकत घ्यायची. त्यांनाही सांगायची,

“आता माझ्या नाती येतील. त्यांना आंबे लागतील. त्या येईपर्यंत पिकलेल्या आंब्यांची अढी तयार होईल. “

तिचं सारं विश्वच आमच्यात सामावलेलं होतं.

आम्ही परत आलो की, माळ्यावर ढीगभर पसरलेले आंबे पाहून आनंदून जायचो.

तसे आजोबांकडेही आम्ही आंबे खात असू पण आजोबांकडे सगळं शिस्तीत, नियमात, वेळेत. जीजीच्या सहवासात आंबे खाण्याचा आनंद मुक्त असायचा. भरपूर, केव्हांही, कधीही आणि आमच्या डोळयात माखलेला आनंद पाहणे हा तिचा आनंद होता.

– क्रमशः भाग ४९ / १..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नमाज .. प्रार्थना ..  प्रेयर !! – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “नमाज .. प्रार्थना ..  प्रेयर !!” – भाग – २  ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(…. कित्येक जण आई बापाला आंबा समजून, गोड रस आणि गर खरवडून काढून खातात आणि पूर्ण खाऊन झाल्यानंतर त्यांना कोय म्हणून उकिरड्यावर फेकून देतात…! खरंतर ही कोय नसते…. ते बीज असतं…!!! हे बीज पुन्हा जमिनीत रुजवायचं असतं… प्रेमाचं खत घालून, मायेनं प्रेमाची धार सोडायची असते… दारात मग उमलतात आई बापाचे अंकुर, पुढे विशाल वृक्ष होऊन, हेच आई बाप आयुष्यभर आशीर्वाद देत राहतात… सावली होऊन…!

…… जे इतरांना समजलं नाही ते याला कसं समजलं असेल…???) – इथून पुढे– 

‘तुला कसं सुचलं हे? सांग ना, सांग की… ‘ त्याचा खांदा गदागदा हलवत मी त्याला म्हणालो.

नमाजसाठी जोडतात तसे पुन्हा हात जोडत, आकाशाकडे पाहत शांतपणे तो म्हणाला, ‘इन्शाअल्लाह, तुमी साकळी बंद झाली नाय पाहिजे म्हनला होतात, मी कायीच नाई केलं, मी फक्त आईपर्यंत साकळी ओढत आणली… साकळी तुटू नाही दिली सर, मैने अपनी जबान रक्खी सर..! ‘

‘येड्या, मला वाटलं साखळीची ही गोष्ट त्यावेळी तुला समजलीच नाही… तुझा चेहरा त्यावेळी शून्य होता… निर्विकार होता…! ’ 

‘बस क्या सर… मय वेल्डिंगवाला बंदा हू, लोखंड बिखंड से खेलना यही हमारा काम है…. पयले मैं तुमकू साकळी कैसा चाहिये समजा नय… पन बाद मे मेरकू पता चला तुमकू लोखंड का साकळी नय चाहिये… तुमकू रिश्तो का साकळी चाहिये… फिर देक आपुन ने ये बना दिया…. जो तुमको मांगता है वैसा…. ‘

तो त्या आईकडे बघत म्हणाला!

‘नात्यांना वेल्डिंग करणारी अशी माणसं निर्माण झाली तर नाती तुटणार नाहीत… किंवा नात्यांना जोडणारा असा एक वेल्डर आज आपल्या प्रत्येकाच्या घरात हवाय…! ‘

‘वेड्या लोखंडाचं काम करता करता, तू स्वतःच आज सोन्याचा दागिना झालास ‘ मी बोललो.

यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी होतं? ….. की आभाळात??

मला समजलं नाही, कारण आज तोच “आभाळ” झाला होता…!

… आभाळ होऊनही नजर खाली जमिनीकडे होती.

पोरं अशी नारळाच्या झाडागत खऱ्या अर्थाने उंच होतात, तेव्हा “मूळ” म्हणून जमिनीत रुतलेल्या बापाचे हात, केव्हाच आभाळाला टेकलेले असतात…!

मी त्याला घट्ट मिठी मारली… दोघांच्याही डोळ्यात पूर… एरव्ही पुराचे पाणी अडवायचे असते… पण आम्ही दोघांनीही यावेळी बांध घातलाच नाही…! या वेळचा पूर चांगला होता…!

आधीची काहीही पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे शेजारी उभी असलेली “अम्मी” गोंधळून एकदा त्याच्याकडे, एकदा माझ्याकडे पाहत होती. मी अम्मीला “अम्मी सलाम आलेकुम” म्हणालो, वालेकुम अस्सलाम बेटा, असं उत्तर येईल असं मला वाटलं…

ती म्हणाली, ‘आशीर्वाद बाळा’ माझं नाव xxx xxx आहे… ‘

शुद्ध मराठी नाव आणि आडनाव ऐकून मी त्याच्याकडे विचित्र नजरेने पहात गोंधळून पाहिलं…

‘अरे ही तर… ‘

पुढे मला बोलू न देता, तो हसत म्हणाला, ‘ माँ का धरम कहा होता है सर? माँ तो माँ होती है… माँ होना यही उसका धरम है… आप उसको अम्मी बुलावो, आई बुलावो, अव्वा बुलावो, भगवान बुलावो, या फिर अल्लाह बुलावो….! ’ 

‘माँ तो माँ होती है… माँ का धरम कहा होता है स्सर? … यावर माझ्याकडे शब्द नव्हते…!

डिग्रीचा कागद फ्रेम करून, भिंतीला चिटकवून, “सुशिक्षित” असल्याचा मी बुरखा पांघरतो…

आणि अडाणी तो… माणुसकी जपत… त्याच्याही नकळत सुसंस्कारित “माणूस” होऊन जातो….

…. इथं जिंकलं कोण? हरलं कोण??

माझे डोळे भरून आले… नमाजसाठी जोडतात तसे माझे हात आपोआप जुळले… नजर आकाशाकडे गेली…

नमाज साठी जुळलेल्या माझ्या हातांकडे पाहून आश्चर्याने म्हणाला, ‘सर आप नमाज…? ‘

‘बाळा, मस्जिद मध्ये जाऊन जेव्हा हात जुळतात, बोटं एकत्र येतात, तेव्हा “नमाज” अदा होते…. ‘

‘मंदिरात जाऊन जेव्हा हात जुळतात, बोटं एकत्र येतात, तेव्हा “प्रार्थना” केली जाते…. ‘

‘चर्च मध्ये जाऊन जेव्हा हात जुळतात, बोटं एकत्र येतात, तेव्हा “Prayer” होते… ‘

‘पण समाजात, तळात- गाळात, जाऊन जेव्हा तुझे हात जुळतात, बोटं एकत्र येतात आणि तू कोणाला तरी मदत करतोस, त्यावेळी ती “सेवा” होते….! ‘अशा प्रकारची “सेवा” करताना आपोआप नमाज, प्रार्थना आणि प्रेअर एकत्रच होऊन जाते… मग तो कोणत्या का जाती-धर्माचा असेना बाळा…!!! ‘

‘या अल्लाह, ’ म्हणत, त्याचे हात देवापुढे जोडले जातात, तसे प्रार्थना करण्यासाठी यावेळी जुळले….!

आणि माऊली म्हणत तो माझ्या पायाशी झुकला…. माऊली म्हणतच मीही त्याला मिठी मारली…!!!

 रस्त्यातच मला विठ्ठल भेटला….! आता गाड्यांचे कर्कश्य हॉर्न मला टाळ मृदुंगाप्रमाणे मधुर भासू लागले…

रस्त्यावरची माणसं मला वारकरी वेशात दिसू लागले… वारीला न जाताही, प्रत्यक्ष पांडुरंगाने याच्या रूपात आज मला दर्शन दिले…

विठ्ठला इथेच दर्शन दिलेस, इथेच झाली वारी…

आता सांग मी कशाला येऊ पंढरपुरी…???

– – इथे मला सांगायला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो, या तरुणाला आपण आपल्या सेंटरमध्ये *”प्रॉडक्शन मॅनेजर” ही महत्त्वाची पोस्ट दिली आहे. कच्चामाल आणण्यापासून ते प्रॉडक्शन होईपर्यंत, त्याची क्वालिटी राखणे हि संपूर्ण जबाबदारी याची आहे.

आमच्या प्रॉडक्ट मध्ये जर काही चांगले आढळले तर, त्याचे श्रेय माझ्या या मुलाचे आहे…

काहीही वाईट आढळले तर सर्वस्वी मी जबाबदार आहे…!!!

तर आता आणखी काय लिहू माऊली?

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने बिबवेवाडी येथील प्रशिक्षण व रोजगार केंद्र सुरू आहे. या केंद्रामार्फत 50 अंध, अपंग, वृद्ध लोकांना रोजगाराची संधी मिळाली आहे.

पूर्वी भीक मागणाऱ्या सर्व मुलांच्या शिक्षणाची सोय झाली आहे. इतकी वर्षे अजय कटारिया साहेब मदत करत होते, सध्या ते आपल्यातून निघून गेले. एक पोकळी निर्माण झाली, परंतु तरीही सरांचे चिरंजीव, चिराग कटारिया, यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे… पोकळी भरून काढली आहे… सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य मिळाले आहे.

रस्त्यावरील वैद्यकीय सेवा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे, अंगात असलेले कला कौशल्य शोधून त्यांना व्यवसाय टाकून देणे, या सर्व बाबी सुरू आहेत.

अमोल शेरेकर या माझ्या सहकाऱ्याने (जे स्वतंत्रपणे दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी लढा देतात) यांच्या माध्यमातून माझ्याकडे असलेल्या अनेक दिव्यांग लोकांना बॅटरीवर चालणारी दुचाकी मिळाली आहे.

 माझ्या या दिव्यांग बांधवांचा त्रास कमी केल्याबद्दल अमोल तुम्हाला नमस्कार!

अमोल यांच्याच माध्यमातून आपण रस्त्याकडेला पडून असलेल्या बांधवांना, तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या अत्यंत गरीब रुग्णांना, अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून अन्नदान करत आहोत.

सांगण्यासारखं अजून बरंच काही आहे….! खूप कमीत कमी लिहायचं म्हणतो…

…. पण, सासरहून बऱ्याच दिवसांनी आलेली मुलगी, माहेरी आल्यावर, आई-बाबा, दादा आणि ताई, वहिनी सोबत बोलताना थांबत नाही…. माझी सुद्धा अवस्था तशीच होते…!

माझं हे लांबलेलं बडबड गीत, इतरांच्या आयुष्याचं जीवन गाणं आहे…

पण, आई-बाबा, दादा, ताई, वहिनी… तुम्हा सर्वांमुळेच तर मी हे करू शकलो… मग तुम्हाला नको सांगू तर कोणाला सांगू….?

तुमच्या शिवाय माझं दुसरं आहेच कोण….???

 

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 

 – समाप्त –  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नमाज .. प्रार्थना ..  प्रेयर !! – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “नमाज .. प्रार्थना ..  प्रेयर !!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ही घटना असेल साधारण पाच सहा वर्षांपूर्वीची ! 

त्या दिवशी मंगळवार होता मला चांगलं आठवतंय… कारण या दिवशी मी सकाळच्या वेळी सेंट अँथनी चर्च कॅम्प येथे असतो. 

 तिथे असताना, रस्त्यावर भिक्षेकऱ्यांमध्ये तपासताना, एका सुटाबुटातल्या माणसाने कार थांबवून मला “ऑर्डर दिली”, आमच्या बिल्डिंगच्या बाहेर एक माणूस निपचित पडलाय, बहुतेक मेलेला असेल, भिकारी वाटतो तो मला, बघून घ्या एकदा…! 

तो कार मधून सुसाट निघून गेला, बिचाऱ्याच्या महत्त्वाच्या मीटिंग असतील. 

घराबाहेर एक माणूस “मेला” असेल, पण त्याने काय फरक पडतो ?  मीटिंग महत्त्वाची…! 

असो,

ज्याला प्रतिष्ठा नसते, अशा व्यक्तीसाठी तो “गेल्यावर”… मेला हाच शब्द वापरतात… 

बाकी कालकथीत, कालवश, पैगंबरवासी, दिगंबरवासी, कैलासवासी, देवाघरी… असे शब्द फक्त प्रतिष्ठा असणाऱ्यांनाच मिळतात. 

माझ्याही भीक मागणाऱ्या लोकांना, गेल्यावर तरी प्रतिष्ठा मिळेल का ? यासाठी जगताना त्यांनी काय करायला हवं ? हा किडा तेव्हापासून डोक्यात वळवळतो आहेच…

असो, मी रस्त्यावर निपचित पडलेल्या या तरुणाला पाहिले, तो जिवंत होता, त्यानंतर लगेच त्याला ऍडमिट केले, जवळपास पाच लाख रुपये खर्च आला, तो आपणच सर्वांनी मिळून भागवला. (मी एकट्याने नाही…)

पूर्ण बरा झाल्यानंतर समजले, याला सर्व काही काम येतं, स्वयंपाक, वेल्डिंग, फॅब्रिकेटिंग, पेंटिंग, वायरिंग, अजूनही बरंच काही…! 

डिस्चार्जच्या दिवशी मी त्याला भेटायला गेलो, त्यावेळी डोळ्यात कृतज्ञता होती… पाया पडून, हाताचे चुंबन घेऊन, मध्येच आकाशाकडे बघत अल्लाहकडे तो माझ्यासाठी काहीतरी मागत होता…

कृतज्ञता कशी व्यक्त करावी, हे त्याचं त्याला समजत नव्हतं…! 

‘ भाई घर मे कौन है?’ मी सहज विचारलं.

 ‘कोई नही सर अकेला हूँ…’

‘कोई तो होगा ना भाई…’ 

‘न्नहि स्सर… कोई न्नही’ प्रत्येक शब्दावर दाब देत तो म्हणाला. राम कहो या रहीम कहो, उन्ही की भरोसे जिंदा हूँ..’

‘ठीक है, इतना कुछ क्वालिटी तुम्हारे पास है, तो कुछ काम करो, मांगने के लिये रस्ते पे मत आना’

असं म्हणून मी तिथून निघालो. तो परत मागे आला, नमाज पढण्यासाठी जसे हात जुळतात, तसेच जुळवत तो म्हणाला, ‘ मै आपके एहसान कैसे चुकाऊ सर…?’ 

वैयक्तिक माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला, मला एका भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, मी पुढे भिक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे…. 

मी सुद्धा त्याकाळी त्यांना विचारले होते, ‘तुमच्या उपकारातून मी कसा उतराई होऊ…?’

ते म्हणाले होते, ‘मला काहीही परत करू नकोस बाळा,  जे काही तुला द्यायचे आहे, ते समोरच्या अडलेल्याला दे… आणि त्याला सुद्धा हेच सांग की तुझी पात्रता निर्माण झाल्यानंतर, तू पुढे ही मदत  पुढच्या नडलेल्याला दे…  साखळी चालू राहू देत… साखळी बंद नाही झाली पाहिजे….!’ 

…… अर्थातच मी त्याला सुद्धा सांगितले, ‘ बाळा कोणीतरी माझ्यावर उपकार केले होते, मी त्याची परतफेड म्हणून तुला मदत केली…  आता ही मदत मला परत न करता, तू पुढे एखाद्या अडल्या नडल्या व्यक्तीसाठी कर, म्हणजे एक साखळी तयार होईल…  साखळी बंद नाही झाली पाहिजे….!’ 

.. त्याच्या चेहऱ्यावर भला मोठा शून्य होता… त्याला काय आणि किती समजले मला माहित नाही…! 

मी तिथून निघून गेलो, नमाजासाठी जोडलेले हात घेऊन तो तसाच शून्यात बघत होता…! 

पुढे जवळपास दोन वर्षे त्याचा माझा संपर्क झाला नाही, एकदा अचानक एका गॅरेजमध्ये काम करताना मला तो दिसला, त्याला काम करताना पाहून मला आनंद झाला. मी गाडीवरून उतरून त्याला मिठी मारली, पुन्हा तो अहसान वगैरेच्या गोष्टी करू लागला आणि पुन्हा मी त्याला सांगितले, कोणालातरी पुढे मदत कर रे… साखळी चालू राहिली पायजे भावा… 

…. पुन्हा तो शून्यात…. त्याला काय आणि किती कळलं साखळीविषयी मलाच समजलं नाही…. 

नमाजासाठी जोडलेला हात मात्र पुन्हा तसाच…! 

यानंतर पुन्हा त्या गॅरेजवर गेलो, परंतु तो दिसला नाही…! परत भीक मागायला सुरुवात केली असेल, असं समजून मी निराश झालो. 

पुढे कधीतरी कॅम्प भागात मला तो ओझरता दिसला, यावेळी त्याच्यासोबत एक आजी होती… 

मी त्याला गाठलं, ‘भाई कहा थे तुम?’

‘सर, दुसरा अच्छा जॉब मिल गया, वो छोड दिया…’ तो हसत म्हणाला 

‘बढीया यार….ये साथ में कौन है?’ मी आजीकडे पाहत विचारले. 

‘ये मेरी “आई” है सर…’

“आई”‘…? मी बुचकळ्यात पडलो 

…… या जगात माझे कोणीही नाही, हे खूप पूर्वी त्याने मला ठासून सांगितले होते…  तो माझ्याशी त्यावेळी खोटं बोलला होता… मला वाईट वाटलं.

‘भाई तुने मुझे बोला था, तेरा इस दुनिया मे कोई नही है, फिर ये अम्मी बीच मे कहा से आ गयी?’  मी जरा रागाने विचारलं. ‘झूठ बोला उस वक्त तुमने’ त्याने हातात घेतलेला माझा हात मी झटकून बोललो…. माझी नाराजी त्याला स्पष्ट दिसली. 

तो हसला, आणि प्रथमच मराठीत बोलला, ‘ सर, तसं काय नाय ओ … एका दिवशी ही आई मला रस्त्यावर मेल्यागत पडलेली दिसली… मला मी आठवलो… मी पण असाच रस्त्यावर पडलो होतो…. परत सर तुम्ही सुद्धा आठवला…. मला तुम्ही ऍडमिट केलं होतं… मग मी पण तिलाससून ला ऍडमिट केलं. ती बरी झाली…. बरी झाल्यावर मी म्हणलं, मावशी आता कुटं सोडू तुला ?

मावशी म्हणाली,  ‘मी आता कुटं जावू ? मला ना मूल… ना बाळ… जिथून आनलं होतंस, तिथंच सोड मला रस्त्यावर बाळा…’ … मला पण “अम्मी” नाही… पण, असती तर मी तिला रस्त्यावर सोडलं असतं का ???’

मंग मी तिला “आई” म्हणून डायरेक दत्तकच घेतलं ना सर… सरळ माझ्या झोपडीत घेऊन आलो, हां, आपल्याकडे हयगय नाय… उसकू बोला, अब तेरेको मय बच्चा हय, खाने का…. मस्त रयनेका… टेन्शन मेरे उप्पर छोडनेका… आता दिवसभर मी गॅरेजवर काम करतो, भाजी विकायचा मी तिला व्यवसाय टाकून दिला आहे, ती दिवसभर भाजी विकते, संध्याकाळी आम्ही मायलेकरं एकत्र भेटतो, सुखदुःख वाटून घेतो आणि जेवण करून मस्त झोपून जातो, टेन्शन कायकु लेनेका…??? “

त्याच्या बोलण्यात, वागण्यात कोणताही बडेजाव नव्हता… आपण काहीतरी विशेष केलं आहे हा भाव नव्हता….!

“आई” म्हणून डायरेक् दत्तकच घेतलं ना सर….!  त्याच्या या वाक्यांनी मी किती वेळा रडलो असेल, याचं मोजमापच नाही… ‘ येड्या तु किती मोठा झालास आता तुला कसं सांगू…? ‘ 

लोक स्वतःच्या सख्ख्या आई बापाला रस्त्यावर आणून बिनधास्त सोडून निघून जातात, अशा दुनियेमध्ये कोणीतरी एक जण आई दत्तक घेतो…! 

…. कित्येक जण आई बापाला आंबा समजून, गोड रस आणि गर खरवडून काढून खातात आणि पूर्ण खाऊन झाल्यानंतर त्यांना कोय म्हणून उकिरड्यावर  फेकून देतात…!  खरंतर ही कोय नसते…. ते बीज असतं…!!!  हे बीज पुन्हा जमिनीत रुजवायचं  असतं… प्रेमाचं खत घालून, मायेनं प्रेमाची धार सोडायची असते… दारात मग उमलतात आई बापाचे अंकुर, पुढे विशाल वृक्ष होऊन, हेच आई बाप आयुष्यभर आशीर्वाद देत राहतात… सावली होऊन…! 

…… जे इतरांना समजलं नाही ते याला कसं समजलं असेल…???

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ SURPRISE : Young Generation ची नवीन पद्धत… ☆ सुश्री संध्या बेडेकर☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

SURPRISE: Young Generation ची नवीन पद्धत… ☆ सुश्री संध्या बेडेकर 

आज सकाळी सकाळी फोन वाजला. आजकाल अवेळी फोन वाजला की आधी जीव घाबरतो. नको नको ते विचार मनात येतात. एकतर मुलं आपल्या जवळ नाहीत. आता सासर माहेरचे सर्व सत्तरी पार झालेले. काही ना काही प्रत्येकाचे सुरूच असते. खरच ती म्हण आहे ना, ’ जगी सर्व सुखी असा कोण आहे ?’ अगदी बरोबर आहे. प्रत्येकाकडे काही ना काही इश्युज् आहेतच म्हणजे असतातच. कधी तब्येतीचा तर कधी पैशाचा. किंवा इतर काही. काहीच नसेल तर ज्येष्ठांची कल्पनाशक्ति अफाट असते, काही तरी शोधून काढतातच. आयुष्य म्हंटल की सुख आणि दुःख या दोघांशी जवळच नातं असतं. त्यांचा लपाछपीचा डाव चालूच असतो. . . त्यामुळे फोन घेईपर्यंत जीव वर खाली होतो. बरं सकाळची वेळ म्हणजे बऱ्यापैकी शांतता असते, त्यात ती फोनची रिंग कर्कश्य वाटते. भरभर धावणे काय ? आता तर भरभर चालणेही जमतं नाही. बरे असो. मी फोन घेतला.

ताईची सून अनिताचा फोन होता.

मी म्हटलं ••• “ काय ग !! सर्व ठीक ना. सकाळी सकाळी फोन कसा काय केला. ? “

अनिता म्हणाली, “ मावशी घाबरू नका. सर्व उत्तम आहे. “

अनिताने तिचा प्लान सांगितला. मला या नवीन मुलींचे कौतुकच वाटते. SURPRISE ही नवीन जनरेशन ची एक ओळख / सवयच झाली आहे. काही तरी छान प्लान कराचयचे आणि surprise द्यायचे.

ताईकडे तीन जनरेशन्स एकत्र राहतात. ताई, भाऊजी, ताईंच्या सासूबाई सौ. निर्मलाताई वय वर्षे ७५. आणि आजोबा. . आणि ही तिसरी यंग जनरेशन अजय आणि अनिता.

ताईचा आणि तिच्या सासूबाईंचा दोघींचा वाढदिवस एकाच महिन्यात असतो. या महिन्यात आजींची पंचाहत्तरी आणि ताईने पंचावन्न पूर्ण केले. कार्यालयात आजींची पंचाहत्तरी अगदी जोरदार थाटामाटात साजरी झाली. नातेवाईकांच्या उपस्थितीत समारंभ आठवणीत रहाण्यासारखा झाला. आजीबाई अगदी खुश होत्या. आजीचे पाय दुखतात म्हणून अनिताने त्यांना एक छान walking stick आणून दिली. तिच्या मदतीने आता त्या आत्मविश्वासाने चालतात. पडायची भिती वाटत नाही. काल अनिताला आजी आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगताना रंगून गेल्या होत्या. त्यांचे लग्नाआधीचे घर, शाळा, तेथे असलेले गणपतीचे मंदिर अनेक गोष्टी. त्यांची जीवाभावाची मैत्रीण उज्ज्वला आता आपल्या मुलाकडे रहायला गेली. त्यामुळे त्यांची भेट होत नाही. त्यांच्या आठवणींबद्दल भरभरून बोलत होत्या. ‘ आता या पायांमुळे मला बाहेर जाता येत नाही ‘. असंही त्यांच्या बोलण्यात आलं. मग अनिताने मनातल्या मनात एक प्लान ठरविला.

आज सकाळीच चहा घेताना अनिता म्हणाली, “ आज रविवार, तेंव्हा मला सुट्टी आहे. आजोबा, बाबा, आज आम्ही तिघी – मी आई आणि आजी – बाहेर जाणार आहोत. आज आमचा *Fun day out * आहे.

बाकी तुमच्या सर्वांचा स्वयंपाक घरात असेलच. आम्ही बाहेर फिरणार आणि जेवूनच घरी परतणार. चालेल ना ? ‘ 

अनिताने मावशींना सांगून आमरस, बटाटा भाजी, पुलाव, कोशिंबीर, चटणी, कुरड्या पापड असा सर्व स्वयंपाक करून घेतला. बाबा, आजोबा किती वाजता जेवणार?? हे विचारून मावशींना वेळेवर गरम पूऱ्या तळून द्यायची सूचना पण दिली.

अनिताला देशमुखांकडे येऊन जेमतेम वर्षच झाले आहे. आज अनिताने घरचा ताबा आपल्याच हातात घेतला की काय ? असंच सर्वांना वाटत होतं. सर्व आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. सर्वांच्या नजरेत कौतुक होते. आज अनिताचे वेगळेच रूप सर्वांसमोर होते.

Anyways everyone is happy.

अजय म्हणाला, “ अगं!! केवढा पुलाव केला आहेस ? दोन दिवसांचा स्वयंपाक केला की काय ? “

अनिता म्हणाली, “ अरे संपेल की. ”

अनिता, आई आणि आजी दहा वाजताच घराबाहेर पडल्या. आज अनिताचे ऐकायचे, असे सर्वांनी ठरवूनच टाकले होते.

अनिताच्या म्हणण्यानुसार आजींनी काठापदराची निळ्या रंगाची नवीन साडी नेसली. आईंनी पण सूचनेनुसार निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला. अनिताचा नेहमी प्रमाणेच जिन्स टॉप, अर्थातच निळा, असा पेहराव होता. अजयने लगेच तिघींचा फोटो काढला. सौंदर्याचे देशमुख घराण्यात वरदानच आहे.

अजयच्या निळ्या रंगाच्या नवीन कारने तिघी बाहेर निघाल्या.

आजोबा गमतीने म्हणाले, ” अरे व्वा अजय!! गम्मतच आहे रे. चला मी पण आज निळ्या रंगाचा कुर्ता घालतो.

अनिताने आजींना आपल्याबरोबर समोर बसविले. म्हणाली, ” आजी आजका दिन आपके लिये. आज का दिन आपके नाम. हुकम करो आजी, आपका हुकुम सर आंखों पर. कुठे कुठे जायचंय?? चला तुमचे जुने घर बघुया. ”

अनिताने कार जुन्या घराच्या दिशेने वळवली.

आजी म्हणाल्या, ” अग आता तिथले सर्व बदलले असेल. ”

तरी जुने घर, आजींची शाळा, गणपतीचे मंदिर. . आजी पूर्ण वेळ जून्या आठवणी सांगण्यात रंगल्या होत्या. अशा अनेक जागी फिरल्यानंतर तिघी वैशालीमध्ये कॉफी प्यायला आल्या. तेथें आजी आणि आजोबा लग्न झाल्यावर येत असत असं आजींनीच बोलताना सांगितले होते.

आई आणि आजी दोघी खूप खुश होत्या. आजचा दिवस वेगळाच उजाडला होता. आता एक वाजायला आला होता. तेथे कॉफी घेतल्यावर अनिताने कार अन्नपूर्णा हॉटेलसमोर उभी केली. आता अनिताच्या सरप्राइज प्लानचा दुसरा भाग होणार होता.

. . थोड्या वेळातच मावशी आईंच्या दोन सख्यांना आणि उज्वलाआजींना घेऊन तेथे पोहचल्या. हा आनंदी धक्का दोघी पचवतच होत्या तर, अनिताची आई, बहिण, वहिनी तेथे दोन‌ eggless cake घेऊन पोहचल्या. सर्व निळ्या रंगातच होत्या हे सांगायला नकोच…निळ्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांना जणू काही उधाणच आलं होतं. आजींचा आणि आईंचा दोघींचा आवडता रंग म्हणून आज निळाच निळा चोहीकडे.

आजींना आनंदाश्रू आवरत नव्हते. असा वाढदिवस त्यांच्या कल्पनेच्या परे होता. तोही नातसुनेने प्लान केलेला. . म्हणजे दुधात साखरच काय, अगदी मलाई, साय सर्वच भरभरून.

अनिताच्या सासूबाई आणि आई कौतुकाने समाधानाने अनिताकडे बघत होत्या. नजरेनेच धन्यवाद म्हणत होत्या. देवाचे आभार मानत होत्या.

गम्मत म्हणजे त्याच वेळेस तेथे अजयने बेल वाजली म्हणून दार उघडले तर समोर अनिताचे बाबा, भाऊ आणि काका हजर होते. आज सर्वांना सरप्राइजच सरप्राइज होतं. इथे पण आणि तिथे पण. सर्वांनी अनपेक्षित गेटटूगेदर मस्त enjoy केलं. इथे पण आणि तिथे पण.

अन्नपूर्णा मध्ये मस्त गप्पा टप्पा झाल्या. आई आजी दोघींनी केक कापले. शेजारच्या टेबलावर बसलेल्या दोन मुलींनी पण आजींना आईंना * Happy Birthday Aaji, काकू* असं म्हणत wish केलं. केक खाल्ला. जेवण झाल. फोटो, selfie झाली. आजी आणि उज्वलाआजीचे फोटो, आईंचे त्यांच्या सख्यांबरोबर फोटो, असे अनेक combination मध्ये फोटो काढले व लगेच सर्वांना forward केले.

सर्व देशमुखांच्या घरी आले. सर्वांनी केक खाल्ला. कॉफी झाली. गप्पा झाल्या. आजी भरभरून आजच्या outing चे वर्णन करत होत्या. मधून मधून डोळे पुसत होत्या. अनिता उज्वला आजींना घरी पोहचवून आली.

– – आयुष्यभर लक्षात राहील असा हा दिवस उगवला आणि मावळला.

मी घरी पोचल्यावर आजच्या दिवसभराचे आकलन करत होते. अनिताचे तर खूप कौतुक आहेच.

खरंतर हॉटेलमध्ये जाणे ही एक सर्वसाधारण घटना, पण जेंव्हा त्यात आपुलकीचा ओलावा असतो, तेव्हा तोच प्रसंग अविस्मरणीय ठरतो.

. . . . आज अनेक अदृष्य सकारात्मक घटना घडल्या. देशमुख परिवारात अनिताने आपले विशेष स्थान मिळविले. घरचे सर्व आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी निश्चिंत झाले. सर्वांचे आपापसातील संबंध मजबूत झाले. अनिताने आपल्या लहान बहिणीसमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. माहेर सासर दोघांचा मान ठेवला. असा व्यवहार, संवाद आपुलकी म्हणजे सुखाची गुंतवणूक असते.

– – – मातीतील ओलावा जसा झाडांची मुळे पकडून ठेवतो, तसंच शब्दातील गोडवा, व्यवहारातील आपलेपणा, माणसातील नातं जपून ठेवतो. अशाने नातं बहरत फुलत. नातं घट्ट असलं तर इतर न आवडणाऱ्या लहान सहान गोष्टींकडे आपोआपच दुर्लक्ष होतं … खरं तर सुखी संसाराचा मार्ग अगदी सरळ सोपा असतो. फक्त दुसऱ्यांच्या भावना समजायला थोडी समजदारी असावी लागते.

– — – A family doesn’t need to be perfect. It just needs to be United.

आज अनिताच्या गोड वागणुकीने तिने सर्वांची मने जिंकून घेतली. आजी अनिताचा पाठीवर हात ठेवत म्हणाल्या, •••

आजचे SURPRISE एकदम मस्त. Thank you, v much.

© सुश्री संध्या बेडेकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares