☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
(“पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली… ) इथून पुढे —–
सैनिक पुढे म्हणाला, ” मी म्हणालो, ” त्यांचा गोळीबार चालूच राहील… वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही… मी हे उरलेले तीस फुट अंतर जिवावर उदार होऊन जातो, म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्याच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या खंदक (बंकर) कडे पळत जातो आणि हातबाॅम्ब (ग्रेनेड) टाकून तो उध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या.”
मी हातात हातबाॅम्ब (ग्रेनेड) घेऊन शत्रूच्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहिले व म्हणाला ‘ तू वेडा आहेस का..? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत…. आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण (कव्हरिंग) दे,’– आणि उत्तराची वाट न पाहता, जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकरच्या दिशेने पळत सुटला.”
“ पाकिस्तानी हेवी मशीनगन (H.M.G.) च्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीनगनमधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”
“ सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर. मी त्यांचे डोके हातात धरले, त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला. “
“ मी आपल्या वरिष्ठांना, तुमच्या गावी त्याचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी मला देण्याची विनंती केली. परंतु सर., मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगिरीवर मला पाठविण्यात आले.”
“कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतिम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहिली असती. ते मी करू शकलो नाही. पण मला ही फूलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर. ” आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला.
शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मूक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभीर्याने पाहिले आणि सैनिकानेही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले.
शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहित नाही. आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, “ माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सदरा विकत घेतला होता. पण तो आला नाही. आणि आली… त्याच्या वीरमृत्यूची बातमी…”
“आता तो सदरा कोण घालेल ? … जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तेथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा याठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती. परंतू आता मला माहित आहे की हा सदरा कुणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या.”
त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्विकारले.
त्या कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते “ जय हिंद ।”
आत्ता हे जाणण्याची वेळ आली आहे …..
कारगिल हिरोचे नाव: कॅप्टन विक्रम बत्रा.
हिरोच्या वडिलांचे नाव: गिरधारी लाल बत्रा.
हिरोच्या आईचे नाव: कमल कांता.
माझ्या प्रिय मित्रांनो, हे लोक आमचे वास्तविक नायक आहेत.
या बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवू या.
Celebrate the Real Activists and not Just Celebrities.
हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे.
जयहिंद.
संग्राहक : विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 1 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
( ही घटना साधारण २२ वर्षांपूर्वीची आहे याची कृपया नोंद घ्यावी. )
जवळपास एक वर्ष उलटले आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आले. पत्र लिहिणाऱ्याने स्वत:चा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून करून दिला होता …..
पत्रात ते लिहितात, की त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीरमरण आले होते, आणि त्याचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच, म्हणजेच ०७/०७/२००० रोजी येत आहे, आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्याला जेथे विरमरण आले ती जागा त्यांना व त्याच्या पत्नीला बघायची इच्छा आहे. जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता.
हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही, परंतू या वीरमाता- वीरपित्याच्या भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व भेटीचा खर्च या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला.
या शूरवीराच्या हुतात्मादिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीरमाता- वीरपित्याला त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला जेथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले. तेथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थ कडक सलामी दिली.
तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खूप फुलं होती. त्याने शिक्षकांच्या पायांवर डोके ठेवले आणि फुलं वाहिली. त्याने आपले डोळे पुसले आणि नंतर तो इतरांसारखाच सावधान उभा राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला.
शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले… “ तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात… तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली ..? तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असतात आणि मी त्या सॅल्युटला प्रतिसाद दिला असता..! ”
“नाही सर. येथे मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणजे येथे प्रत्येकजण ड्यूटीवर सज्ज आहे आणि मागील एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत.”
“मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमध्ये होतो , त्याच डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता, आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता. आणि फक्त हेच नाही….. ” तो काही क्षण बोलायचं थांबला …..
शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले, “ मला सांगा… जे काही मनात असेल ते कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा… मी रडणार नाही…..”
“ मला माहित आहे तुम्ही रडणार नाही सर… पण मीही रडायला नको ना ….” तो सैनिक पुढे म्हणाला….
“ त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीनगनने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते. आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटांच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसा घेत कसेबसे उभे राहिलो. पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती. त्यांना बहुधा आमच्या हाता- पायांचा किंवा पाठीवरील सामानाचा थोडाफार भाग दिसत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते. अजून ब्रिगेडच्या इतर सैनिकांची कुमक येण्यास विलंब होत होता. काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते.. !! मग …. ” त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला.
” पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली…
क्रमशः…
संग्राहक : विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर☆
कोरोना आला, आणि स्वयंपाकघर हे केवढं कला दालन आहे हे कळलं.
एवढ्याशा ओट्याच्या मंचावर किती मैफिली रंगतात. कढया,पातेल्या,झारे,पळ्या,शेगडी,तेल,डाळी,पीठं मुके नाहीत. ते बोलतात ,पण त्याची रूचिर भाषा आपण इतके वर्ष ऐकली नाही. कारण त्या रंगदेवतेकडे, स्त्रीकडे आपण दुर्लक्ष केलं. राजाचा मुकूट प्रधान घालत नाही आणि प्रधानाचा मुकूट राजा ! तसं हात, भांडी, ओटा पुसायचे फडकेही वेगळे असतात. स्वच्छता हेच ध्येय पण भूमिका वेगवेगळ्या !
पट्टीचा गायकीवर हुकूमत असलेला गायक जसा जरा असंबद्ध होत नाही. तसं कितीही मोठी तान घेऊनही, भांडी पुसायचं फडकं ती हात पुसायला वापरत नाही. साधी बाटल्यांची बुचंही अदलाबदल करायला घाबरतात तिच्या प्रेमापोटी ! उकळत्या दूधाचं भांडं पकडीत पकडून, दुसऱ्या हातानं साय अडवून, दूध कपाबाहेर न सांडता चहा नितळ ठेवण्याएवढी मोठी कला नाही. आपल्याला चहा पुन्हा गाळावा लागेल नि ओटा पुन्हा एकदा पुसावा लागेल. एकाच वेळी दुधाला उतू जाऊ न देणं नि लेकराला धडपडू न देणं, ही विश्वाला थक्क करणारी सर्कस वा कसरत तीच करते. पाणी प्रमाणात झेपेल एवढा घोट घेतला तर तहान भागवतं नाहीतर ठसका लागतो. तसा गॅसही ! तो गरजेप्रमाणे कमी जास्त ठेवावा लागतो. त्याच्या ज्वालेचं प्रमाण बटणावर नसतं. अन्नपूर्णेच्या प्रतिभेवर असतं.
प्रत्येक गोष्ट ती खाऊन पहात नाही. रंग,वास यावरून तिला अंदाज येतो. अंदाज हा माझा पुरुषी अहंकार. अंदाज नसतो, खात्रीच असते ती. आमचा असतो तो अंदाज आणि त्याना असते ती खात्री. अंदाज आणि खात्री यात दडलेली बाई आपण पहात नाही, तेवढा वेळ या कलामंदिरात रहात नाही.
नेहमी लागणाऱ्या वस्तू मंचावर नि कधीतरी लागणाऱ्या उंचावर, हे तिचं शहाणं नि व्यवहार्य व्यवस्थापन असतं.
ती स्टूलही आणून ठेवते, नि हाक मारते, “अहो,एवढं काढून द्याल का?” आज्ञा आणि विनंतीतलं अंतर म्हणजे माया. ते ती जपते, पण हातातला पेपर नि त्यातल्या उठाठेवीत ही मायेची ठेव विसरत आपण कुरकुरतो. ती कुरकूर तिच्या तरल संवेदनांना कळते. आपल्याला फक्त पापडाची कुरकुर कळते. स्वयंपाकघर ही खोली किती खोल आहे ते ज्याला कधीच कळत नाही, तो पुरुष.
सर्वात लहान खोली स्वयंपाकाची, त्याहून लहान देवाची.
एक विश्वाचा स्वयंपाक करते तर दुसरीचं विश्वच स्वयंपाक!
दिवाणखाना मात्र मोठा….परक्यांसाठी. आपल्यांसाठीचा विचार आपण घर बांधतानाही करत नाही. म्हणून नंतर तिला स्मरत नाही !
बेल दिवाणखान्यात वाजते, पण ती फोडणीच्या आवाजातही ऐकू जाते ती याच स्त्रीला. कारण ती पूर्ण घर आतून आपलं मानते. सारखं करणं या शब्दात * सारखं म्हणजे सतत वा सारखं म्हणजे नीट करणं.* पण तीच सगळं सतत नीट करत असते. नुसतं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता जाता ती दरवाज्यावरचा टॉवेल सारखा करते, गादीवरचा पलंगपोस सारखा करते.
पसरणं नि आवरणं, ही क्रियापदं नाहीत, कृती नाही. तर ती वृत्ती आहे –पहिली आपली, दुसरी तिची !
आपण पसरायचं, तिनं आवरायचं !
तिच्या दमण्याचा आवाज कधी ऐकणार आपण? लक्षात ठेवा, असं मुलांचं वेळापत्रक, होमवर्क, नवऱ्याचे कपडे, गोळ्या आणि गाड्यांच्या वेळाही लक्षात ठेवणारं स्वयंपाकघर घराबाहेर पडतं , तेव्हा खरं लॉकडाऊन होतं !
” बाहेर ऊन, तर घरात चूल ” , ही फक्त घामाची वेगवेगळी कारणं !
ठेच लागली तरी डोक्यावरची घागर, आणि ” कमरेवरचं भविष्य ” जी खाली ठेऊ शकत नाही, तिच्याहून मोठी विवेकाची नि सहनशीलतेची कला कुणाला जमणार?
—-ती थांबेल, तेव्हा पृथ्वीच नाही, त्रैलोक्य लॉकडाऊन होईल !
संग्राहिका : बिल्वा अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम. हा शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.
“ साहेब, जरा काम होतं.”
“ पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?”
“ नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.”
“ अरे व्वा ! या आत या.”
आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता. मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून. मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.
“ किती मार्क मिळाले मुलाला ?”
“ बासट टक्के.”
“ अरे वा !” त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं. हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाली आहे की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खूष दिसत होता.
“ साहेब मी जाम खूश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !”
“ अच्छा, म्हणून पेढे वगैरे !”
शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, “ साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.”
मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, “ साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. तो म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको सगल्य्यांना वाट ! हे नुसते पेढे नाय साहेब, हा माझा आनंद
आहे !”
मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.
आतून मोठ्यांदा विचारलं, “ शिवराम, मुलाचं नाव काय?”
“ विशाल.” बाहेरून आवाज आला.
मी पाकिटावर लिहिलं – प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात रहा – तुझ्या बाबांसारखा !
“ शिवराम हे घ्या.”
“ साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.”
“ हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातून.”
शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.
“ चहा वगैरे घेणार का ?”
“ नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून…”
“ घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !” मी हसत म्हटलं.
माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.
हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले.
आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय म्हणे.
आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय “ आनंद लांबणीवर टाकणारे !”
‘ माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत हे आधी मान्य करू या.
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?
आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?
पाऊस पडतोय ? सोप्पं आहे- मस्त चिंब भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?
माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
खरं तर एका हाताच्या बंद मुठीत ‘आनंद’ आणि दुस-या हाताच्या बंद मुठीत ‘समाधान’ सामावलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातं
आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.