मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मदत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “मदत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो… की ती आपल्याकडून करवून घेतली जाते?

दोन्ही प्रश्नाचे उत्तर’ हो’ असेच असेल, नाही का? तर मदतीच्या कृतीबाबतचा एक किस्सा असा.

अध्यात्मिकचा कोर्स करत असताना एकदा आम्हाला सांगितले की आता पुढची 15 मिनिटं या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या. वेळ सुरू झाला आणि आम्ही बाहेर पडलो.

आमची मदत घेण्यासाठी कोणी दिसते का, शोधू लागलो. रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालत होत्या. आमच्यापैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयाने म्हणाला, “आजी कुठे जायचे तुम्हाला? थोडे अंतर मी पिशवी घेतो, ” त्याच्या या बोलण्यावर आजी संशयाने बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, “बाजूला हो…. आला मोठा मदत करणारा! “… एक प्रयत्न तर फसला..

वेळ आता दहाच मिनिटं उरला होता. पुन्हा शोधाशोध सुरू. रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. आम्ही तिकडे धावलो. शेजारीच वडापावचा गाडा होता. तिला म्हणालो, “चल. तुला वडापाव खायला देतो. ” त्यावर ती आमच्याकडे संशयाने पाहू लागली. “नको नको, ” म्हणत दूर पळून गेली.

आता पाच मिनिटे राहिली. शेवटी वडे तळणाऱ्या बाईंना आमच्या टास्कबद्दल सांगितले आणि “तुम्हाला काही मदत करू का? ” असे विचारले. त्यावर तिनेही नकार दिला. “माझे वडे बिघडवून ठेवाल, ” असे म्हणाली. वेळ संपला आणि कुणालाही मदत न करता आम्ही परत आलो.

आल्यावर सरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले, ” आता तुमच्या लक्षात आले असेल. मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते. कुणीही मदत करू शकत नाही. मदत तीच व्यक्ती करते, ज्याची परमेश्वराने निवड केलेली असते. त्यामुळे इथून पुढे आयुष्यात जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली तर “मी केली” असे म्हणू नका. ती परमेश्वराने केलेली असते. पण कृतीचे माध्यम म्हणून तुम्हाला निवडले आहे, हे विसरू नका. आणि त्याच्या इच्छेशिवाय हे शक्य नाही, हे ध्यानात ठेवा.

ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृतीवेळी मला आठवत राहिली. आणि आपण फक्त माध्यम आहोत, हे सतत जाणवत राहिले. यामुळे ‘अहंकाराचा वारा’ काही प्रमाणात का असेना थोडा दूर राहिला, हे मात्र नक्की.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रंग पाण्याचे… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर ☆

सौ. रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रंग पाण्याचे… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

‘पाणी’ शब्द हा असे प्रवाही

वळवू तिकडे वळतो हा..

जशी भावना मनात असते

रूप बदलते कसे पहा..!

*

नयनामध्ये येता ‘पाणी’

अश्रू तयाला म्हणती,

कधी सुखाचे, कधी दुःखाचे,

अशी तयांची महती..!

*

चटकदार तो पदार्थ दिसता,

तोंडाला या ‘पाणी’ सुटते,

खाता खाता ठसका लागून

डोळ्यांतून मग ‘पाणी’ येते..!

*

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,

म्हणती अविरत भरते ‘पाणी’..

ताकदीहूनी वित्त खर्चिता

डोक्यावरूनी जाते ‘पाणी’..!

*

‘वळणाचे ‘पाणी’ वळणावरती’

म्हण मराठी एक असे,

‘बारा गांवचे ‘पाणी’ प्यालाय’

चतुराई यातुनी दिसे..!

*

लाथ मारूनी ‘पाणी’ काढणे,

लक्षण हे तर कर्तृत्वाचे,

मेहनतीवर ‘पाणी’ पडणे

चीज न होणे कष्टाचे..!

*

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,

‘पाण्या’त पाहणे गुण खोटा..

‘पाणी’दार ते नेत्र सांगती,

विद्वत्तेचा गुण मोठा..!

*

शिवरायांनी कितीक वेळा,

शत्रूला त्या ‘पाणी’ पाजले..

नामोहरम करून, अपुले

मराठमोळे ‘पाणी’दाविले..!

*

टपोर मोती दवबिंदूचे

चमचम ‘पाणी’ पानावरती,

क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,

अळवावरचे अलगद ‘पाणी’..!

*

कळी कोवळी कुणी कुस्करी,

काळजाचे त्या ‘पाणी’ होते..

ओंजळीतूनी ‘पाणी’ सुटता,

कन्यादानाचे पुण्य लाभते..!

*

मायबाप हे आम्हां घडविती,

रक्ताचे ते ‘पाणी’ करूनी..

विनम्र होऊन त्यांच्या ठायी

नकळत दोन्ही जुळती ‘पाणि’

*

आभाळातून पडता ‘पाणी’

तुडुंब, दुथडी नद्या वाहती,

दुष्काळाचे सावट पडतां

सारे ‘पाणी पाणी’ करती..!

*

अंतीम समयी मुखात ‘पाणी’

वेळ जाणवे निघण्याची..

पितरांना मग ‘पाणी’ देऊनी,

स्मृती जागते आप्तांची..!

*

मनामनांतील भावनांचे,

‘पाण्या’मध्ये मिसळा रंग..

प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,

चेहऱ्यावरती उठे तरंग..!

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “घटस्फोट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “घटस्फोट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील हसून म्हणाले…

“घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला.

कोर्टानं तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिलीये,

आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील.

आता खूश ना?”

ती हलकेसे स्मित करून म्हणाली..

“हो… खूश आहे… आता मला कुणाकडून काही नकोय.”

वकील कागद गोळा करू लागला…

आणि कविता आई–वडिलांसोबत बाहेर पडली.

कोपऱ्यात निर्वाण—तिचा नवरा—सगळं शांतपणे पाहत उभा होता.

कवितानं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही.

गाडीचं दार बंद झालं…

आणि नातंही.

पहिला महिना—

माहेरी सगळे फार प्रेमानं वागले.

कविताला वाटलं—

“हेच तर स्वातंत्र्य… हाच तर शांतपणा!”

 

दुसरा महिना—

घरच्यांचा सूर थोडा बदलू लागला.

भाऊ कधी रागानं बोलायचा,

वहिनी टोमणे मारायची—

“मोठी झालीस, थोडी जबाबदारी घे ना…”

भाचेही म्हणू लागले—

“आत्त्या, किती दिवस राहणार इथे?”

 

तिसरा महिना—

घरातलं वातावरण बदलू लागलं.

जिथं आधी प्रेम होतं, तिथं आता भार वाटू लागला.

कविता शांत राहायची… पण मनात दुख वाढत राहायचं.

 

चौथा महिना—

तिच्या प्रत्येक गोष्टीवर नजरा ठेवायला लागले.

बाहेर पडली की शेजारच्यांची खुसफुस—

“तिचा घटस्फोट झालाय… आता माहेरीच राहणार?”

 

कविताच्या आत काहीतरी तुटत होतं.

तिला पहिल्यांदा जाणवलं—

सासरी नातं कठीण होतं, पण ते तिचं स्वतःचं घर होतं. माहेरी ती ना पाहुणी, ना घरची—फक्त एक ओझं.

 

एक रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली—

“पैसे मिळाले… स्वातंत्र्य मिळालं…

पण इज्जत? आपुलकी? आणि घर?”

ती स्वतःशी कुजबुजली—

“चूक केली…

फैसला घेताना मी फक्त दु:ख पाहिलं, पण परिणाम पाहिलेच नाही…”

तिला कळलं—

तुटलेल्या नात्यानंतर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते,

पण समाज आधी तिला जज करतो.

आणि माहेर…

“माहेर आहे, पण अधिकार काहीच नाही.”

“माझं खरं घर मी माझ्या अहंकारानं सोडून आले…”

डोळ्यात पाणी आलं.

निर्णयाची किंमत आता समजत होती.

चार महिने पूर्ण झाले…

कवितेला रोज एकच प्रश्न सतावू लागला—

“मी काय गमावलं…?

फक्त राग आणि टोमण्यांमध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला…?”

 

ती आकाशाकडे बघत बसायची…

निर्वाणच्या आठवणी मागून धावत यायच्या.

त्याच्या सवयी, छोटी भांडणं, आणि सर्वात जास्त—

त्याचं साथ देणं.

 

एका रात्री मन पूर्ण तुटलं.

तिनं फोन उचलला… नंबर लावला.

कॉल लागला—

“हॅलो?” — निर्वाण.

कविता थरथरत्या आवाजात—

“निर्वाण… आपण… आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का?

मला तुझी फार आठवण येते…

मला तुझ्यासोबत राहायचंय…”

दोन्ही बाजूला काही क्षण शांतता…

निर्वाण हळूच म्हणाला—

“मीही तुझ्याविना राहू शकत नाही…

 चूक दोघांची होती, सुधारायला दोघांनीच सोबत चालायचंय.

तू ‘हो’ म्हणालीस…

तर मी आत्ताच निघतो.”

कवितेच्या गालावरून आसवं वाहू लागली

“हो… मी तयार आहे.”

रात्रीचे 12 वाजले होते.

 

निर्वाण कार घेऊन निघाला.

थंडी, सुनसान रस्ता…

पण मनात एकच आवाज—

‘तिला परत घरी आणायचं आहे.’

सलग 5 तास ड्राइव्ह केलं.

ना थांबला, ना दमला.

सकाळी 5 वाजता

तो कवितेच्या माहेरच्या दारात उभा होता.

कविता बाहेर आली—

घाबरलेली, लाजलेली… पण दिलासा मिळालेला चेहरा.

आई–वडिलांनी दार उघडलं.

निर्वाणनं नम्रपणे प्रणाम केला.

कवितेने  बॅग उचलली.

ना बोलणं, ना वाद—

दोघांना कळलं, हा निर्णय मनातून घेतलेला आहे.

कार सुरू झाली…

आणि कविता परत तिच्या घराकडे—खऱ्या घराकडे—निघाली.

मित्रांनो…

नाती मोडत नाहीत.

फक्त कधी कधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची असतो.

योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल—

संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं…

 

रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्याइतका योग्य असतो का?

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “धावा…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “धावा…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“शकुनी थांबवला नाही… कारण कृष्णाचा धावाच झाला नाही. ”

— महाभारताचं सत्य आणि आयुष्याचा धडा

महाभारतात शकुनी हा फक्त एक व्यक्तिरेखा नव्हता…

तो बुद्धीचा चुकीचा वापर, सूड, धोका आणि अंतर्मनातील विष याचं प्रतीक होता.

त्याचा डाव, त्याची योजना, त्याची फसवणूक — हे सगळं चालत होतं; कारण कोणीही त्याला थांबवण्यासाठी धावा केला नव्हता.

प्रश्न नेहमी विचारला जातो:

श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते… मग शकुनीला थांबवलं का नाही?

उत्तर महाभारताच्या मूळ तत्त्वात आहे:

 देव हस्तक्षेप तेव्हाच करतात, जेव्हा तू धावा करतोस.

तू न बोलता देव तुझ्या कर्मात अडकत नाही.

द्रौपदीने धावा केला– म्हणून कृष्ण प्रकट झाले.

द्रौपदीने हात सोडले.

सारे मार्ग संपले.

मनातला अहंकार, “मी सांभाळेन”, “मी एकटी लढेन” – हे सर्व कोसळलं.

आणि जेव्हा तिने आतून हाक मारली —

“कृष्णा! ”

तेव्हा कृष्ण प्रकट झाले.

देहाने नव्हे, पण उपस्थितीने.

यातून महाभारत सांगतं:

धावा हा बाहेरचा आवाज नाही, तो आतला स्वीकार आहे — “मी एकटी/एकटा नाही. ”

पांडवांनी धावा केला नाही… म्हणून शकुनीचा डाव सुरू राहिला.

युधिष्ठिर जुगारात अडकत गेले,

भीम रागात अडकला,

अर्जुन गोंधळात,

नकुल–सहदेव शांततेत…

कोणी म्हणालं नाही —

“कृष्णा, आम्हाला थांबव. ”

श्रीकृष्ण सभेत होते.

सर्व जाणत होते.

शकुनी खोटं खेळतोय,

धृतराष्ट्र अंध आहे,

दुर्योधन चिडतोय —

हे कृष्णांना माहीत होतं.

पण देवाने हस्तक्षेप का केला नाही?

कारण —

जितका पापाचा डाव होता, त्याहून मोठं होतं माणसांचं मौन.

देव माणसाच्या स्वेच्छेमध्ये हस्तक्षेप करत नाहीत.

जोपर्यंत तू म्हणत नाहीस:

“कृष्णा, मला सांभाळ. ”

तोपर्यंत कृष्ण अधिकाराने येत नाहीत.

कृष्ण सर्वत्र होते… पण बोलावलं नाही, म्हणून हस्तक्षेप झाला नाही.

ही आयुष्याची सर्वांत मोठी शिकवण आहे:

 देवाला बोलावलं की देव येतो.

देवाला विसरलास की शकुनी जिंकतो.

इथे “देव” म्हणजे काय?

तुझं जागृत भान

तुझा विवेक

तुझी अंतर्ज्ञान

तुझी योग्यतेची जाणीव

तुझ्यातला प्रकाश

ज्या क्षणी तू त्याला बोलावतोस,

त्या क्षणी तुला बळ मिळतं —

निर्णयाचं, धैर्याचं, स्पष्टतेचं.

शिकवण — योग्य वेळी धावा करा

आयुष्यात कधी तुम्हाला कोणीतरी फसवतं,

कुठे चुकीचं ओढलं जातं,

कुठे शंका, भीती, गोंधळ येतो,

कुठे तर्क हरतो,

कुठे सत्य डोळ्यासमोर असूनही हात थरथरतात…

त्या क्षणी शकुनीची ऊर्जा काम करते.

तेव्हा महाभारत सांगतं:

“कृष्णाला बोलाव.

शकुनीचं जाळं कोसळेल. ”

धावा म्हणजे काय?

मनातला एक आतला surrendered क्षण:

“हे कृष्णा, मी इथं अडकले/अडलो आहे…

मला मार्ग दाखव. ”

आणि मग जे घडतं ते चमत्कारच असतं.

देव प्रकट कधी होतात?

 मन शांत झालं की.

अहंकार खाली आला की.

 सत्य स्वीकारलं की.

आतली हाक प्रामाणिक झाली की.

देव दाराबाहेर थांबलेले नसतात…

देव अंतर्मनातच बसलेले असतात.

फक्त तू बोललास की ते उठतात.

जीवनातील महान तत्त्व

महाभारत म्हणतं:

“जोपर्यंत तू देवाला आतून बोलवत नाहीस,

तोपर्यंत देव तुझ्या आयुष्यात प्रकट होत नाही. ”

आणि हेच सत्य प्रत्येक संकटात लागू आहे.

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ UPI चा संकटकाळ… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ UPI चा संकटकाळ… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

जिथे जाल तिथे QR कोड तुमचे बँक खाते रिकामं करण्यासाठी तयार असतो.

भाजीवाले, रिक्षावाले, पान टपऱ्या, आलिशान दुकानं — सगळे फक्त एका स्कॅनवर तुमच्या पैशांपासून दूर आहेत. कोणताही संकोच नाही, कोणतीही जाणीव नाही. फक्त दोन टॅप, आणि काम संपलं.

“पूर्वी असं नव्हतं…”

पैशांना वजन असायचं. तुम्ही ते हातात धरायचात. दहा रुपयांच्या नोटेचा स्पर्श, एखादी कुरकुरीत ₹५०० ची नोट खर्च करताना होणारी घालमेल. पाकीट उघडून खर्च करण्याआधी दोनदा विचार करायची ती क्रिया. तो ‘फ्रिक्शन’ म्हणजे शहाणपणा होता. तो तुम्हाला थोडा थांबवत होता, विचारायला लावत होता —  “खरंच याची गरज आहे का?”

“UPI ने तो फ्रिक्शन काढून टाकला.” आणि त्यासोबत आपल्या मेंदूमधील एक महत्त्वाचा भावनिक सर्किटही. वर्तनशास्त्रज्ञ याला “pain of paying” म्हणतात — “खर्च करताना होणारी ती हलकीशी मानसिक घालमेल, जी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवते. रोख रक्कम देताना ती होती. UPI ने ती गायब केली.”

हे सगळं मला गेल्या आठवड्यात समजलं, जेव्हा मी माझे मासिक खर्च तपासत होतो. आकडे पाहून अक्षरशः धक्का बसला.

फूड डिलिव्हरीवरचा खर्च दुप्पट झाला होता. यादृच्छिक व्यवहार, विसरलेली सदस्यता शुल्कं, अनियोजित खर्च — हे सगळं शांतपणे होत होतं, आणि मी निष्काळजीपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. सोयीने मला सुस्तावून टाकलं होतं. मी झोपेत चालणाऱ्यासारखा खर्च करत होतो.

बाबांनी नेहमीप्रमाणे आधीच सांगितलं होतं. ते अजूनही नोटा बाळगतात. महिन्यातून एक किंवा दोनदा रोख रक्कम काढतात. त्यांना वाटतं, त्यामुळे वास्तवाशी नातं टिकून राहतं.

 सुरुवातीला मी ते जुनाट म्हणून झटकून टाकलं. पण आता त्यांचं म्हणणं कळतं.

‘मर्यादेत एक शिस्त असते. स्पर्श करता येणाऱ्या पैशात स्पष्टता असते.’

“UPI च्या सुलभतेमुळे आपल्याला भास होतो की आपण सगळं परवडवू शकतो. पण तुम्ही पैसे जाताना पाहत नाही. पश्चात्तापही 9होत नाही.”

आणि खरं तर, पश्चात्ताप शत्रू नाही — तो एक प्रतिक्रिया आहे. एक आठवण आहे. त्याशिवाय खर्चाचं परिणामांशी नातं तुटतं.

आणि जेव्हा पैसा अनभिज्ञतेने खर्च होतो, तेव्हा जीवनसुद्धा दिशा हरवू लागतं.

सोय ही एका किमतीवर येते. आणि ती किंमत म्हणजे जाणीव.

कॅशलेस म्हणजे कायमच भान ठेवूनच होतो असं नाही.

एकदा हरवलेली जागरूकता पुन्हा मिळवणं महागडं असतं.

हा लेख तंत्रज्ञानाला दोष देण्यासाठी नाही.

हा केवळ आठवण करून देण्यासाठी आहे — की व्यवहाराची गती, विचाराच्या गतीपेक्षा जास्त वेगाने जाऊ नये.

UPI राहणारच आहे. पण तसाच विचार पण राहायला हवा. संयम राहायला हवा. आणि तो लहानसा आतला आवाज, जो पूर्वी कुजबुजायचा — पुन्हा विचार कर.

कारण खरी अडचण पाकिटात नाही, तर खर्च आणि जाणिवा यांच्यामधल्या त्या शांततेत आहे.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचं आता वय झालंय… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आईचं आता वय झालंय… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आई,

ठाऊक आहे का तुला ?

 

चिक्‍कार वेळ बेल वाजवल्यावर

बंद दरवाजाआड तुझी

चाचपडत येणारी पावले

थकलेल्या आवाजात म्हणतात,

‘आले रे…’,

 

तेव्हा अपराधी जीव

श्‍वास रोखून पडतो भांड्यात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

खिडकीत बसून अंधाऱ्या उजेडात

सुईत दोरा ओवण्याचा तुझा वाढता

खटाटोप पाहून येतात कढ,

कातर कातर होत जाते मन

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

डाव्या कुशीवर कोपराच्या उशीवर

एकार्त झोपलेल्या तुझा,

मंद श्‍वासोच्छ्वास निरखताना,

किती धडधडते हृदयात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

‘‘काही झालेलं नाही रे मला,

तू झोप…होईन मी बरी!’’

असा तुझाच रुग्णाईत दिलासा

ऐकण्यासाठी ओठंगून उभ्या असलेल्या

माझ्या तथाकथित निरोगी मनाला

पडत जातात कित्येक घरे

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

तिन्हीसांज टळून गेल्यानंतर

खोलीतला दिवा न लावता

बाहेर टक लावून बघत बसतेस

अज्ञातात काहीतरी,

तेव्हा गलबलते ह्रदयात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

आजही ह्या वयात खरकटे तोंड पुसताना,

तुझ्या वृद्ध पदराचा घुरट वास

घेताना मी होत जातो लहान,

आठवते मज माझेच भूत…

खिडकीच्या गजांतून पाय काढून

तुझी चाकरमानी वाट पाहात

बसणारे माझे बालपण…आठवते

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

अजूनही आहे मनगटावर मौजूद

तू दिलेला कालथ्याचा डाग…

शेजारच्या डोंगरेकाकूकडे

आशाळभूत खाऊ मागितल्याची

शिक्षा म्हणून दिलेले ते

माझ्याच दुर्दम्य लोचटपणाचे प्रमाणपत्र

आताशा धुकट झाले आहे,

निबर कातडीवर, पण तरीही-

सहज जाते नजर त्या डागावर

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

दोस्तांबरोबर रंगवलेली बाटलीभर

मध्यरात्र उतरते क्षणार्धात

वास्तवाच्या विहिरीत

करकरणाऱ्या रहाटासारखी…

तुझ्या एकटेपणाची सावली

हालत राहाते रात्रदिव्याच्या

मंद उजेडात भिंतीवर…

तेव्हा, कोसळून पडतो मी पुन:पुन्हा

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

थकलेल्या देहाने वावरत असतेस

खोल्याखोल्यांतून, पुटपुटत असतेस

काहीतरी देव्हाऱ्याकडे पाहात

उसासून, तेव्हा

तुझ्या डोळ्यांत साकळलेले

संध्याकाळचे गडद रंग

किती उदास वाटतात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

मटार निवडताना बोटांवर चढलेली

हिरवीजर्द जीजिविषु अळी

तुझ्या अंधुक डोळ्यांना होते दिसेनाशी,

हे पाहून हळवे व्हायला होते

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

‘‘मला मेलीला कशाला हव्यात

साड्या आणखी?’ असे म्हणत

जुन्या पैठणीवर फिरणारा तुझा

सुरकुतलेला जीर्णशीर्ण हात

पाहून थरथरते काळीज

दरवेळी, हे ठाऊक आहे तुला?

 

एखाद्या संध्याकाळी ‘‘येताना

पाच रुपयांची फुलं घेऊन ये रे,

‘त्याच्या’ बोडख्यावर घालायला!’’

असे त्राग्याने म्हणतेस, तेव्हा

उगवणाऱ्या उद्याचाही

वाटतो आधार

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

थकलेल्या तुझा शरीराचा

कंटाळलेला वावर करतो उदास

सर्वंकष तरीही-

मनात येते की

प्राक्‍तनाचे गणित नाही जुळले,

पण तुझ्या पदराखाली झाकलेले

सुरक्षित बालपण दृढमूल आहे, अजूनही !

 

आई …

अजून तू मला हवी आहेस.

कवी:अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शांतपणाने केवळ अलिप्त व्हा!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे  ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “शांतपणाने केवळ अलिप्त व्हा!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ताज्या फुलांचे आपल्याला कोण कौतुक असते. आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो.

फुले घेताना ती ‘माझी’ असतात. पण देवाला वाहिली की ‘त्याची’ होतात… किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त होतो… ‘ज्याचे होते त्याला दिले’… फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.

काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो… त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.

अगदी तसेच, आपली दु:खे ‘त्याच्या’ चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे…

त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही… आतापर्यंत जी ‘माझी’ दु:खे होती. ती आता ‘त्याची’ झाली. त्यांचा कसला विचार करायचा… आणि कालची दु:खे तर, आज निर्माल्य झाली. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो.

शिळ्या फुलांप्रमाणे, मग ती सडायला लागतात. आणि मग मनाला पोखरायला लागतात… म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे.

आज पेरण्यासाठी आपण आनंद आणूया. धान्याची पेरणी करताना, जशी जमिनीची मशागत करतात, तशी मनाची साफ-सफाई करूया आणि तिथे आनंद पेरूया. तो शतपटीने उगवून येतो. त्याची जोपासना करू. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच…

दु:ख सोडून द्यावे,… निर्माल्य बनून जाते.

आनंद पेरत जावा,… समाधान बनून राहते.

पारखून घेतले तर कोणीच आपले नसते. समजून घेतले तर कोणीच परके नसते.

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात.

दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अमूल्य देणग्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆

सौ. उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अमूल्य देणग्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆

  1. टायर चालताना घासले जातात, पण पायाचे तळवे आयुष्यभर धावत राहूनही नवीनच राहतात.
  2. शरीर ७५% पाण्याने बनलेले आहे, तरीही लाखो रोमछिद्रं असूनसुद्धा एक थेंबही गळत नाही.
  3. कोणतीही वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही, पण हे शरीर स्वतःचा तोल राखते.
  4. कोणतीही बॅटरी चार्जिंगशिवाय चालत नाही, पण हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड धडकत राहते.
  5. कोणताही पंप कायम चालू राहू शकत नाही, पण रक्त आयुष्यभर अखंड शरीरभर वाहत राहते.
  6. जगातील सर्वात महागडे कॅमेरेही मर्यादित आहेत, पण डोळे हजारो मेगापिक्सेल गुणवत्तेत प्रत्येक दृश्य टिपू शकतात.
  7. कोणतीही प्रयोगशाळा सर्व चवी तपासू शकत नाही, पण जीभ कोणत्याही उपकरणाशिवाय हजारो चवी ओळखू शकते.
  8. सर्वात प्रगत सेन्सरही मर्यादित असतात, पण त्वचेला अगदी हलकीशी संवेदनादेखील जाणवू शकते.
  9. कोणतेही यंत्र सर्व आवाज निर्माण करू शकत नाही, पण कंठातून हजारो फ्रिक्वेन्सीचे स्वर निर्माण होऊ शकतात.
  10. कोणतेही उपकरण सर्व आवाजांचे पूर्ण अर्थ लावू शकत नाही, पण कान प्रत्येक आवाज ओळखून त्याचा अर्थ समजतात.

ईश्वराने आपल्याला दिलेल्या या अमूल्य देणग्यांसाठी त्याचे आभार माना. त्याच्याबद्दल तक्रार करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ एकावर एक फ्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

सौ. वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एकावर एक फ्री…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या..

जर आपण ‘राग’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘ॲसिडिटी’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘ईर्ष्या’ विकत घेतली,

तर आपल्याला ‘डोकेदुखी’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘द्वेष’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘अल्सर’ फुकट मिळतो.

*

जर आपण ‘ताणतणाव’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘रक्तदाब (BP)’ फुकट मिळतो.

जर आपण ‘विश्वास’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘मैत्री’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘व्यायाम’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘निरोगी आयुष्य’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘शांती’ विकत घेतली,

तर आपल्याला ‘समृद्धी’ फुकट मिळते.

*

जर आपण ‘प्रामाणिकपणा’ विकत घेतला,

तर आपल्याला ‘झोप’ फुकट मिळते.

*

आता हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की,

आपण काय विकत घेतलं पाहिजे…

ते आपणचं ठरवायचं आहे.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

आमच्या नवरा-बायकोत कधी कधी भांडण व्हायचं. भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार, अशी शक्यता निर्माण झाली की, माझी आजी आम्हा दोघांना मायेने जवळ घ्यायची. समोर बसवायची. आमचे दोघांचेही हात हातात घेऊन बोलायची..

ती म्हणायची, “ लेकरांनो, असं करून कसं चालंल..? अजून लै लांब जायचंय तुम्हाला.. बाळांनो, दोघं बी विस्तू झाला तर विझायचं कसं? कुणीतरी एकाने पटकन पाणी व्हावं आणि विस्तवावर सांडून जावं.. म्हणजे आग लागणार न्हाय.. अन् जर एकदा का आग लागली तर मग सगळं जळून राख हुईल.. ”

तिच्या या वाक्याने आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं. आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा.

आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायची. आजोबांच्या आठवणीत हरवून जायची. वादळातल्या, पावसातल्या आणि उन्हाने करपलेल्या पण त्यातून ही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की, डोळे पुन्हा पदराने पुसत हळूच म्हणायची, “ आता या म्हातारीला घोटभर चहा मिळेल का बाबांनो? ” त्यावर घरातले सगळे हसायचे.

आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची. आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या ओंजळीत ठेवतोय, असा भास मला नेहमी व्हायचा.. आणि आजही होतो..

आता माझी आजी नाहीय. ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची. पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंतकरणाला देऊन गेली.

अधूनमधून होतात आमची भांडणे… पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तु विझवलेला असतो. तिच्या जवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं..

तुम्हाला एक खरं सांगू..?

हे ओंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत. पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाहीय. त्यामुळे आता आजी आजोबा मुके झालेत. परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाहीय. त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाहीयत. आज ते पिकलेलं पान, जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालो आहोत.

आणखी एक… घरातलं लहान बाळ रडायला लागलं, कि आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची. आता बाळ रडत नाही… कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळे झालो आहोत आणि आजीची मांडी रिकामी झालीय. त्या म्हाताऱ्यानी, नव्हे नव्हे त्या महान – ताऱ्यांनी आता हताश होऊन बोलणं बंद केलं आहे. परतीच्या प्रवासाचं तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलेलं आहे. घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिव चिव करत वरच्या छताकडे एकटक नजर लावून ती पडलेली आहेत.

ज्येष्ठ नागरिक संघात नाही मन रमले रे त्यांचे. त्यांना नातवंडे हवी असतात. पण नातवंडे मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झालीयत. आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुकी झाली आहे. त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं पण बोलताच आलं नाही. कारण ऐकायला कुणी नाही.

नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा असं मनाला वाटत आहे. परंतु, भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान आंधळा झालेला असताना मला आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा हुंदका वाढवत आहेत. त्या ओळी अशा…

‘जरी या वर्तमानाला

कळे ना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या

पिढ्यांशी बोलतो आम्ही’

मला नम्रपणे इतकंच सांगायचं आहे की, “भट साहेब, तुम्ही म्हणाला, अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या. पण कान गमावून बसल्या. ठार…ठार…ठार.. बहिऱ्या झाल्या. फाईव्ह जीच्या आणि रिल्सच्या धूमधडाक्यात आजीच्या ओव्या मुक्या झाल्या.. मुक्या झालेल्या ओवीत आजोबांचे अभंग पुसले गेले. शेवटचा श्वास घेऊन आजी-आजोबा निघून जातील. पिकलेली पाने गळून पडतील आणि या पिढीला व्हॉटसअपच्या स्टेटससाठी एक जिव्हाळ्याचा विषय मिळेल. आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही. परिणामी सगळी राख झालेली असेल.

बस.. इतकाच हुंदका होता अडकून राहिलेला! तो फक्त बाहेर काढला..

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares