मराठी साहित्य – विविधा ☆ खानदेशी  पाहुणचार! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ खानदेशी  पाहुणचार! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

दरवर्षी हा थंडीचा सिझन संपता-संपता येणाऱ्या उन्हाळ्यात मला शिरपूरची आठवण येते. साधारणपणे चाळीस वर्षे झाली आम्हाला शिरपूर सोडून, पण तिथे राहिलेले एक-दीड वर्ष अजूनही मनाच्या कोपऱ्यात  आहे. पश्चिम महाराष्ट्रात राहणारे आम्ही बदलीच्या निमित्ताने खानदेशात शिरपूर येथे गेलो. एकदम नवखा भाग, बरोबर दोन लहान मुले आणि आपल्या गावापासून खूप लांब त्यामुळे मनात टेन्शन होतेच! पण बघूया, जसं होईल तसं, म्हणून सामानासह शिरपूरला गेलो.

सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेला मोठ्ठा ब्रिटिश कालीन बंगला आम्हाला राहायला होता. घरात सहा-सात खोल्या, वर कौलारू छप्पर, मोठ्या खिडक्या आणि दोन-तीन घराबाहेर जाता  येणारी दारे ! प्रथमदर्शनीच मन एकदम प्रसन्न झाले.बंगल्याच्या भोवतीच्या जागेत मोठे लिंबोणीचं झाड, गाडी लावायला गॅरेज, बसायला प्रशस्त अंगण आणि काय पाहिजे! हा दवाखाना गावापासून थोडा लांब एका टेकाडावर होता. दवाखान्याभोवती डॉक्टरांचा बंगला आणि कंपाउंडर, नर्स, क्लार्क वगैरे लोकांची घरे होती.  त्यामुळे हा परिसर खास आपल्यासाठी होता ! आम्ही आल्याबरोबर सकाळी आसपासची सर्व मंडळी हजर झाली. कोणी चहाची, तर कोणी नाश्त्याची व्यवस्था केली. नंतर जेवणाची व्यवस्थाही झाली. घरातील सामान लावायला चार हात पुढे आले, त्यामुळे दोन छोट्या मुलांबरोबर सामान लावण्याच्या माझ्या कसरती ला मदत झाली. लवकरच आम्ही तिथे रुळून गेलो.

एक दीड वर्षाचा कालावधी पण मला खानदेशी जीवनाचा त्यानिमित्ताने झालेला परिचय यात लिहावासा वाटतोय! आम्ही तिथे गेलो तेव्हा प्रथम जानेवारी ची थंडी होती. सकाळी खूप गारठा असे आणि नंतर दिवसभर ऊन तापत असे, इतक्या गरम आणि विषम हवामानाची आम्हाला सवय नव्हती, पण थोड्याच दिवसात तेथील रुटीन चालू झाले. सगळेजण मला आणि ह्यांना ताई, दादा म्हणत असत, बोलणे गोड आणि वागणूकही मान, आदर दाखवणारी!

रोज सकाळी लिंबोणी खालचा कचरा काढायला शिपाई आला की त्याच्या झाडू च्या आवाजाने जाग येई. अंगणात सडा मारून रांगोळी काढणे इतकेच काम असे! नंतर येणारी लता, भिल्ल समाजाची होती. सतरा-अठरा वर्षांची ती मुलगी स्वभावाने गोड आणि कामसू  होती.  ताई,ताई करून ती घराचा आणि मुलीचा ताबा घेत असे.केरवारा, भांडी करता करता मला सगळ्या गावाची माहिती देत असे.

माझी छोटी मुलगी जेमतेम तीन महिन्याची होती, त्यामुळे तिला आंघोळ घालण्यासाठी  लताची आई येत असे. गॅस नसल्यामुळे एका वातीच्या  आणि पंपाच्या स्टोव्हवरच स्वयंपाक करावा लागत असे. दवाखान्यातील एक शिपाई  भाजीपाला किंवा इतर सामान आणून देत असे, तर दुसरा एक  शिक्षित होता, तो माझ्यासाठी लायब्ररीची पुस्तके बदलून आणत असे, असं राजेशाही आयुष्य चालू होतं आमचं!

त्यावेळी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी लाईट जाणं हे नेहमीच असे. लहान मुलांना त्याचा खूपच त्रास होई.उकाडा खूप! लाईट नाही,पंखा नाही, त्यामुळे तिकडच्या लोकांप्रमाणे आम्ही विणलेली बाज खरेदी केली होती, ती अंगणात टाकून त्यावर संध्याकाळी गप्पा मारत बसायचे. तिथल्या बायकांना आपल्याकडील पदार्थ, राहणीमान याविषयी मी सांगत असे, तर त्यांच्याकडून तिकडचे पदार्थ शिकत असे. दादर चे पापड, मूग, मठाचे(मटकीचे) सांडगे तोडणे, कलिंगड, खरबुजाच्या बिया भाजून खाणे अशा बऱ्याच गोष्टी मला तिथे कळल्या! बऱ्याच घरातून संध्याकाळी फक्त खिचडी बनवली जाई. त्या सर्वांना आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी मी रोज संध्याकाळी पण पोळ्या, भाकरी करते याचे आश्चर्य वाटे! दवाखान्यातल्या सिस्टर खूप चांगल्या होत्या, उन्हाळी पदार्थ करताना त्या मला मुद्दाम बोलवत, आणि गव्हाचा शिजवलेला चीक  खाऊ घालत!

सगळीच माणसे सरळ आणि प्रेमळ मनाची होती.

तो दवाखाना विशेष करून बाळंतिणीचा होता. त्यामुळे रोज जवळपास एक दोन तरी डिलिव्हरी असायच्याच! खाण्यापिण्याची सुबत्ता असल्याने एकंदर तब्येती छानच असायच्या! एकदा तर एका बाईचं अकरा पौड वजनाचे बाळ डिलिव्हरी झाल्या झाल्या दुपट्यात गुंडाळून आणून सिस्टरनी  मला आणून दाखवले.ते पाहून मीच आश्चर्यचकित झाले!

खाण्यापिण्याच्या बाबतीत शिरपूर एकदम छान होते. छान दूध, तूप, खव्याचे पदार्थ मिळायचे. कलिंगडं, खरबूज यासारखी फळफळावळ मुबलक प्रमाणात असायची. शिरपूरच्या जवळून तापी नदी वाहते. त्यामुळे सर्व भाग सुपिक होता. शिरपूर जवळ’ प्रकाशे’ नावाचे तीर्थक्षेत्र आहे. तिथे तापी आणि गोमती नद्यांचा संगम  आहे.’प्रती काशी’

म्हणतात त्या तीर्थक्षेत्राला!

गव्हाची  शेती खुपच असल्याने उत्तम प्रतीचा गहू मिळत असे. शिरपूर मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना जवळ असल्याने तिथल्या भाषेवर हिंदी आणि गुजराथी भाषांचा प्रभाव दिसून येई. आणि अहिराणी भाषा ही तेथील आदिवासींची खास बोली! ती आम्हाला फारच थोडी समजत असे. शैक्षणिक दृष्ट्या हा भाग थोडा मागास असला तरी काळाबरोबर हळूहळू सुधारणा  होत आहेत. येथील सर्वांना सिनेमाचे वेड भारी होते. गावात तीन सिनेमा टाॅकीज होती, दर आठवड्याला पिक्चर बदलत असे. आम्हाला सिनेमाची फारशी आवड नव्हती आणि आमची मुले लहान म्हणून आम्ही कधीच सिनेमाला जात नसू. पूर्ण वर्षभरात सिनेमा न बघणारे आम्हीच! माझी कामवाली सखी-लता, प्रत्येक पिक्चर बघून यायची आणि मला स्टोरी सांगत काम करायची! तीच माझी करमणूक होती. शिरपूर लांब असल्यामुळे नातेवाईक ही फारसे येऊ शकत नसत. पण शिरपूर चे तो काळ खूप आनंदात गेला तो तिथल्या लोकांमुळे! शिरपूर ची खास तूरीची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी आणि कढी विसरणार नाही. दादरचे पापड, सांडग्यांचे कालवण, डाल बाटी, तर्हेतर्हेची लोणची, खास खव्याचे मोठे मोठे पेढे आणि आमरस-पुरणपोळी हे पक्वान्न अजून आठवते!तिथले तीनही ऋतू अनुभवले!उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा! आणि पुन्हा आपल्या गावाकडे परतलो, पण अजूनही शिरपूर चा खास पाहुणचार आम्ही विसरलो नाही. बहिणाबाईंच्या लोक गीतातून  दिसणारे खास खान्देशी समाज जीवन, तेथील प्रेमळ आदरातिथ्य आणि  तेथील मातीची ओढ हे सगळं दृश्य रूप होऊन डोळ्यासमोर आले! इतक्या वर्षांनंतरही शिरपूर चे ते थोड्या काळाचे वास्तव्य मनाच्या कोपऱ्यात तिथल्या साजूक, रवाळ तुपासारखे स्निग्धता राखून ठेवलं आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-4 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-4 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

पुण्यापासून जवळच केडगाव आहे. तिथली नारायण महाराजांची सोन्याची दत्तमूर्ती Bank of Maharashtra मधे असते आणि वर्षातून एकदा दर्शनासाठी बाहेर काढली जाते. महाराजांचं सोन्याचं सिंहासन होतं. संन्यस्त असून हे ऐश्र्वर्य असल्याने नारायण महाराज उगाचच गैरसमजाच्या धुक्यात होते. पण त्यांच्या कार्यामागचा अर्थ वडिलांनी समजाऊन सांगितलेला… सहज शेअर करावासा वाटतो.

तसे घरातून माझ्यावर सर्वधर्मसमभावाचे संस्कार झालेले. म्हणजे घरी पारंपरिक सणवार, पूजाअर्चा, स्तोत्रपठण आणि गीतापाठांतर असेच वातावरण असले तरी मशीद आणि चर्चची ओळख आवर्जून करून दिली होती वडिलांनी. सगळ्याच लोकांना आणि चक्क मार्क्सवादी लोकांनाही आमचं घर “आपलं” वाटायचं कारण साऱ्या विचारांचा स्वीकार व्हायचा.

तरीही धर्म हा विषय समाजजीवनावर परिणाम करतोच. केडगावात तेच होत होतं. मिशनरी लोक गरीब लोकांना फक्त खायला द्यायचे आणि धर्मांतर करायचे. पंडिता रमाबाईंचं मिशनही कडेगावातच आहे. अर्थात तिथे आश्रयाला येणाऱ्या स्त्रियांवर धर्मांतराची सक्ती नसे… पण स्वतः रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

पुन्हा दयानंदांच्या वेळचाच मुद्दा इथेही लक्षात घ्यायला पाहिजे. एक विचार केवळ धाकानं किंवा पैशानं का नष्ट करायचा? शिवाय राजकीय विषयही होताच हा. ब्रिटिशांचा धर्म स्वीकारला की त्यांची गुलामी बोचणारच नाही. मग देशाचं आर्थिक शोषण, आत्मविश्वास संपणं सगळं आलंच….यासाठी भुकेमुळं होणारं धर्मपरिवर्तन थांबवणं गरजेचं होतं. हिंदुस्थानच्या धार्मिक बाबीत ढवळाढवळ करणार नाही अशी राणीची पॉलिसी होती. म्हणून नारायण महाराजांनी एकशेआठ सत्यनारायण रोज करण्याची पद्धत सुरू केली. त्यासाठी खास रेल्वेच्या वॅगन मधून तुळशी यायच्या. प्रसाद म्हणून मोठे वाडगे भरून प्रसाद सगळ्यांना द्यायचे. गोरगरीबांना साजूक तुपाचा उत्तम शिरा पोट भरून दिला जायचा. एकच माणूस पुन्हा आला तरी त्याला पुन्हा दिला जायचा. या एका गोष्टीमुळे भुकेपोटी होणारं धर्मपरिवर्तन थांबलं. आपलं कार्य संपल्यावर सगळं ऐश्र्वर्य सोडून एका वस्त्रानिशी अवघ्या बत्तीसाव्या वर्षी नारायण महाराज केडगावहून निघून गेले आणि बंगलोर इथे राहून शेवटी त्यांनी देह ठेवला.

“नामस्मरण करून आनंदात राहावे” हा त्यांचा एकमेव उपदेश आहे.

नामस्मरण करावं हे ठीक आहे.. पण आनंदात राहावे हे तितकेच महत्त्वाचे आहे ना.. आनंदी राहण्यासाठी मनाला केवढी शिस्त हवी! एवढ्यातेवढ्याने रागवायचे नाही, कुणाचा हेवा करायचा नाही, कशाचा लोभ धरायचा नाही, निंदेला घाबरायचं नाही, समाधानी राहायचं तर आनंदात राहता येईल. थोडक्यात इतका स्वत:चा विकास विवेकानं करता आला तरच आनंद मिळणार. हा एवढा अर्थ भरला आहे या छोट्या वाक्यात.

श्रावणात घरोघरी सत्यनारायण पूजा सुरू झाल्या की मला केडगावच्या नारायण महाराजांची आठवण येते.

 

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशाशी जडले नाते – श्री जयंत नारळीकर ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

 ☆ विविधा ☆ आकाशाशी जडले नाते – श्री जयंत नारळीकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

नाशिक येथे भरणार्‍या ९४व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माननीय वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची निवड झाली त्या निमीत्ताने…. अर्थात् माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या व्यक्तीने एका प्रचंड बुद्धीमान व्यक्तीविषयी काही भाष्य करणे हे निव्वळ धाडसाचे…. नारळीकर हे मूळचे पारगावचे. तेथे ऐकलेल्या गोष्टीनुसार असे की, नारळीकरांच्या परसांत आंब्याची झाडे होती. आणि या आंब्याच्या झाडांना नारळा एवढे आंबे लागायचे, म्हणून त्यांचे नाव “नारळीकर” असे पडले.

डाॅ.जयंत नारळीकर यांची आत्मकथा “चार नगरातले माझे विश्व”

बनारस, केंब्रीज, मुंबई आणि पुणे….प्रत्येक संक्रमणाच्यावेळी, त्यांना आपण एक धाडस करतो असे वाटायचे. बनारसच्या शांत, सुखासीन जीवनपद्धतीला रामराम ठोकून परदेशात पदार्पण करताना आपण आपल्या माणसांपासून दूर एकटे आहोत ही जाणीव त्यांना व्यथित करायची… केंब्रीज सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला तेव्हां, “कशाला हे धाडस करता?”

हे विचारणारे अनेकजण भेटले. पण तेव्हांसुद्धा, देशबांधवांकरिता काहीतरी सकारात्मक आपल्या हातून घडावे हा विचार प्रेरक ठरला. एक प्रख्यात सुसंस्थापित संशोधनाची जागा सोडून दुसर्‍या नगरात, शून्यातून, आयुका ही नवीन संस्था निर्माण करण्याचे आवाहन स्वीकारणे हेही धाडसाचेच होते… बी.एस.सी. पदवी प्राप्तीनंतर, प्रचंड महत्वाकांक्षा मनात ठेऊन त्यांनी केंब्रीज विद्यापीठात पदार्पण केले.

रँग्लर किताब, टायसन स्मिथ्स, अॅडम्स आणि इतर अनेक सर्वोच्च मानाचे पुरस्कार मिळवत खगोलशास्रातील सापेक्षतावाद, पूंजवाद, गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र यामधे विलक्षण संशोधनाचे टप्पे गाठत, करीअरचा आलेख सदैव उंचावर ठेवत गेल्याचा काळ म्हणजेच त्यांचे चौदा पंधरा वर्षाचे केंब्रीजमधील वास्तव्य.. एका परिषदेत इंग्लीश प्राध्यापकाने त्यांना व एका पाकिस्तानी विद्यार्थ्याला विचारले, “भारताचे विभाजन झाले, तेव्हां ज्या हिंदु मुस्लीम कत्तली झाल्या त्या भारताला किंवा पाकिस्तानला कां थांबविता आल्या नाहीत?”

नारळीकर ताबडतोब ऊत्तरले!  “विभाजन ब्रिटीशांनी घडवले! ते अस्तित्वात येत असताना,कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी ब्रिटीश सत्तेने पार पाडली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.”

पाकिस्तानी विद्यार्थ्यानेही या भाष्याला अनुमोदनच दिले. ते “ब्रिटीश” प्राध्यापक, गप्प, झाले. दोघांत भांडण लावून गंमत पाहण्याचे त्यांचे खोडसाळ धोरण त्यांच्यावरच ऊलटले.

स्वत:ला जागतिक कीर्तीच्या वैज्ञानिकांमधे आणि विज्ञानविश्वात सिद्ध केल्यानंतर स्वदेशी परतण्याच्या भूमिके बद्दल ते सांगतात, “माझ्या मनात परदेश वास्तव्याबद्दल एक ऊपरेपणाची भावना घर करत होती. सर्व छान असले तरी ही जागा माझी नाही. इथे मी पाहुणाच आहे. भारतात परतल्यावर विवीध गोष्टींसाठी करावी लागणारी धावपळ, कमी पगार, लालफीत, अधिकारशाही.. हे विचारात घेऊनसुद्धा मी आपल्या देशात, आपल्या माणसात आहे, ही भावना सगळ्यांवर मात करत होती…”

जीवनाबद्दलची कमीटमेंट त्यांना महत्वाची वाटते. ज्या देशाने त्यांना शिष्यवृत्ती देऊन यशाची वाट दाखवली, त्या देशाचं देणं द्यायला पाहिजे, हे महत्वाचं वाटतं.

स्वाक्षरी मागण्यार्‍या विद्यार्थ्यांना ते सांगतात, “इथे मी तुला स्वाक्षरी देणार नाही, पण तू मला एक पोस्टकार्ड पाठवून, विज्ञानातला तुला भेडसावणारा प्रश्न विचार. मी त्याला स्वाक्षरीसकट ऊत्तर पाठवेन.”

नंतर या प्रश्नोत्तरातूनच, “सायन्स थ्रु पोस्टकार्डस्.” असे लहानसे पुस्तक प्रकाशित झाले.

एक प्रश्न त्यांना विचारला जातो, “तुमचा देवावर विश्वास आहे का?”

प्रश्न विचारण्याला ‘हो’ किंवा ‘नाही’ असे एकशब्दी ऊत्तर अपेक्षित असते. पण तसे ऊत्तर ते देत नाहीत. कारण त्यांच्या मते देव आणि विश्वास या संकल्पनाच व्यक्तीसापेक्ष आहेत. सोपे ऊत्तर एवढेच, की एका परम शक्तीने विश्व निर्माण केले व त्याचे नियोजन करण्यासाठी वैज्ञानिक नियम ठेवले. त्या ‘परम शक्तीला देव म्हणता येईल.

वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? याबद्दलही ते सांगतात, “कुठलाही तर्क प्रत्यक्ष निरीक्षणाने, पुष्टी देऊन मिळाल्याशिवाय, बरोबर मानायचा नाही आणि त्याचे स्थान टिकवण्यासाठी, त्याच्याकडुन वेळोवेळी नवी भाकिते यावीत, ज्यांची तपासणी करुन, मूळ तर्काचे खरेखोटेपण, ठरवता येते. तर्कशुद्धी विचारसरणी यालाच म्हणतात…

मा. जयंत नारळीकर यांचे व्यक्तीमत्व अनेक पैलु असलेले बहु आयामी आहे…ते वैज्ञानिक, तत्वचिंतक आणि साहित्यिकही आहेत. तसेच कला क्रीडा संगीत जाणणारे रसिक आहेत. एक जबाबदार सुपुत्र,चांगला पती आणि आदर्श पालकही आहेत. ज्यांच्या नावातच श्रीफळ आहे, त्याने विज्ञानाच्या या कल्पवृक्षाची जोपासना केली.. नुसतेच आकाश बघणार्‍या तुम्हांआम्हाला आकाशाच्या अंतरंगात बघण्याची गोडी लावली…

भारतरत्नाच्या दिव्यत्वाच्या या प्रचीतीला माझे हात सदैव जुळतील….

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्व. इलाही जमादार …… भावपूर्ण श्रद्धांजलि ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ स्व. इलाही जमादार …… भावपूर्ण श्रद्धांजलि ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

(जन्म – 1 मार्च 1946 मृत्यु – 31 जनवरी 2021)

 

आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?

धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?

 

चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी

जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?

 

कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?

आठवणींना, श्वास म्हणालो, चुकले का हो?

 

मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे

मी त्याना, विश्वास म्हणालो, चुकले का हो?

 

निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो

प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?

 

लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली

सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?

 

चौदा वर्षे, पतीविना, राहिली उर्मिला

हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

 

घात आप्त, आघात सगे, अपघात सोयरे

ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?

 

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!

याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?

 

जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही’?

कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?

 

 – इलाही जमादार

एक ऊत्तुंग मराठी गझलकार आज आपल्यांत नाही हे स्वीकारणं खूप कठीण आहे!

एक मार्च १९४६ साली दूधगाव सांगली येथे त्यांचा जन्म झाला. गझलकार सुरेश भट यांच्यानंतर गझलकार म्हणून इलाही जमादार यांचेच नांव घेतले जाते.

पुण्यात एका लहानशा आऊट हाऊसमधे रहात.. पुस्तके आणि मांजरांच्या पसार्‍यात हा अवलिया गढलेला असायचा. खोली लहान असली तरी कवी मन फार मोठे.. प्रत्येक मित्रासाठी हे मनाचे दार ऊघडे असायचे..

गझल क्लिनीकच्या माध्यमातून ते नवोदित कवींसाठी कार्यशाळा घेत…

काठावरी ऊतरली। स्वप्ने तहानलेली।

डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा।

किंवा,

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला।

केलेत वार ज्याने तो मोगरा असावा।

अशा त्यांच्या काळीज भेदणार्‍या रचना मनात साठलेल्या आहेत….

आज ते नसले तरी हा शब्दगंध वातावरणात दरवळतच राहणार….!!

एक कलाकार, एक गझलकार म्हणून इलाही जमादार सदैव स्मरणात राहणार…

त्यांच्या स्मृतींस भावपूर्ण श्रद्धांजली….????

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्यावर बोलू काही ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ आयुष्यावर बोलू काही ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

खरच किती प्रश्न डोकावतात नाही का मनात?

नक्की आयुष्य आहे तरी काय?अनेक प्रश्नांनी भरलेल, अनेक सुखाने, दुःखाने भरलेले नाना छटांनी नटलेले. आणि गंमत म्हणजे प्रत्येक माणसाचे प्रश्न वेगळे आणि उत्तर पण वेगळी.  प्रत्येक  माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा.

कोणासाठी ते सप्तरंगी आहे तर कोणासाठी रंगहीन, नीरस. कोणासाठी ते समुद्राच्या लाटा आहेत खळखळणाऱ्या,सळसळणाऱ्या, तर कोणासाठी एखादी शांत वाहणारी नदी किंवा सुरेख संगम दोन नद्यांचा. कोणाला ते शीतल शांत चंद्राप्रमाणे भासतं , तर कोणाला सूर्याच्या प्रखर उन्हाच्या चटक्या प्रमाणे.

मला विचाराल तर, आयुष्य हे एक प्रश्न चिन्ह आहे ज्याचे उत्तर कधीच मिळत नाही, एक कोड आहे जणू, जर सुटल तर मोकळी वाट नाहीतर आपल्या वाट्याला घाटच घाट.

कधी वाटते की आयुष्य एक सोंगट्यांचा खेळ आहे. आपण फक्त आपली खेळी खेळायची, त्याच फळ काय द्यायचे ते मात्र देवानी त्याच्या हातात ठेवले आहे,थोडक्यात आपण प्यादी आहोत पटावरची, फासे तर तो टाकतो, तो सूत्रधार आहे ह्या आयुष्य रुपी नाटकाचा. आपण फक्त आपला अभिनय नीट पार पडायचा.

मला काही वेळा मात्र आयुष्य सप्तरंगी वाटतं छान सुंदर, इंद्रधनुष्याला जसे सात रंग असतात अगदी तस. मग त्यात प्रेमाचा रंग आला, आपुलकीचा आला, स्पर्धेचा, द्वेषाचा, मद, मत्सर अगदी सगळे रंग आले. हां आता ह्यातला आयुष्यरुपी कॅनव्हास वर कोणता रंग जास्त भरायचा हे मात्र आपल्या हातात आहे.

अचानक मला असे वाटले की जितकं आपलं वय,आपला अनुभव तसे भासत असेल काहो हे आयुष्य सगळ्यांना?

छोट्या मुलांना आयुष्य फुग्याप्रमाणे, किंवा फुलपाखरा प्रमाणे भासत असेल का छान हलकं हलकं आकाशात स्वच्छंद बागडणार आपल्याला हवे तसे  रंग स्वतः भरणार  ना कोणते नियम ना बंधन. स्वच्छंद बागडायचे फक्त. कोणतेच प्रश्न नाहीत , त्यामुळे तक्रार पण नाही.

थोडं मोठं झाल्यावर त्यांना ते स्वप्नं रुपी वाटत असेल का? जिथे अनेक स्वप्नं पहायची आणि ती सत्यात उतरवण्यासाठी झगडायचे. अनेक चॅलेंज घ्यायचे आणि ते पूर्ण ही करायची.

थोडक्यात नियम आणि कायदे आपलेच.

आंब्यांच्या झाडाला मोहर यावा, किंवा छान हिरवी गार पालवी यावी तस किंवा एखाद्या पाण्याचा धबधब्या सारखे स्वच्छंद सतत वाहणारं.

अजून मोठ झाल्यावर म्हणजे कदाचित तिशी ओलांडल्यावर, जेव्हा अनेक जबाबदार्‍या अंगावर येऊन पडतात  तेव्हा आयुष्य पझल गेम सारखं वाटत असेल का, किंवा डोके चालवा, सुडोकू सारखा जिथे प्रत्येक कोड सुटतच अस नाही पण तरीही आपण प्रयत्न करतोच ना. आणि बरेचदा मार्ग ही मिळतो.

आयुष्यभर सूर्यप्रकाशाचे चटके सोसल्यानंतर म्हणजेच सगळया जबाबदार्‍या संपल्या की हेच आयुष्य आपल्याला रात्रीच्या चांदण्यांसारखं शीतल शांत वाटत असेल का. ह्या  टप्प्यावर आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतीलच असं नाही,पण आता ती मिळावीत म्हणून धडपड ही नसेल. ना काही मिळवण्याची धडपड असेल ना काही गमावण्याच दुःख.

थोडक्यात काय तर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.

सहज मनाच्या कोपर्‍यातुन ?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महात्मा गांधींचा खादीचा वसा ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  विविधा ☆ महात्मा गांधींचा खादीचा वसा ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

खादी म्हणजे हातांनी विणलेले,  हातांनी तयार केलेले धागे व त्या धाग्यांपासून विणलेले कापड. (hand made, hand spun) टकळी किंवा चरख्यावर सूत कातले जाई, त्याला सूतकताई म्हणत.भारतातील खेड्यातून राहाणा-या गरीब जनतेला आर्थिक दौर्बल्यातून बाहेर काढण्यासाठी महात्मा गांधींनी 1918 मध्ये खादीची चळवळ सुरु केली. हातमागावर वस्त्र तयार करणे व विणणे या कार्यक्रमातून स्वावलंबन व स्व-शासन या दोन मूल्यांवर आधारित गुणांना त्यांनी उचलून धरले.या वस्त्रोद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कपाशीचे पीक हे भारतातील खेड्यांत उत्पन्न केले जाईल.प्रत्येक जण या उत्पादनाच्या व कताईच्या कामात गुंतून राहील.प्रत्येक स्त्री पुरुष त्यांच्या आवश्यकतेनुसार व किमान गरजेइतकेतरी सूत कातून वस्त्र उत्पादन करेल असे चळवळी चे स्वरूप व ध्येय होते. स्वातंत्र्य पूर्व काळात किंवा नंतरही भारताच्या अनेक भागात शेतकरी वर्गाला वर्षभराच्या उपजीविकेसाठी सुद्धा पुरेसं काम नव्हतं. पाऊस पाण्याच्या दुष्काळामुळे वर्षाचे जवळ जवळ सहा महिने विना काम, विना उद्योग जायचे.

सर्वसामान्य लोक  आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मानसिक दृष्ट्या हताश व निराश झाले होते. अशा वेळी वस्त्रोद्योग हा ठोस रामबाण उपाय ठरला.कुणालाही शिकता येईल, कुणालाही करता येईल असा उद्योग. जो अतिशय कमी खर्चात व किमान मुद्दल गुंतवणुकीत करता येईल असा व्यवसाय.   त्याकाळी कच्चा माल भारतातून इंग्लंडला निर्यात केला जाई आणि तिथे उत्पादित केलेले कापड भारतात आयात केले जाई. पण ते भारतातील जनतेला परवडण्यासारखे नसे. मुख्यतः भारतातील जनता काम व त्यापासून मिळणारा लाभ या दोन्ही पासून वंचित रहात असे. परदेशी मालावर अवलंबून न रहाता आपल्या देशातील कच्च्या मालापासून देशातच कापड तयार करण्याचा खादीचा व्यवसाय हा स्वावलंबनाचा पहिला धडा महात्मा गांधींनी घालून दिला.  इंग्रजांचा भारतावरील हक्क झुगारून देण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल.

खादी उत्पादनामागे एक आर्थिक विचारही आहे. तो विचार ‘ Mass Production नको Production by Masses हवे, असा होता. मोठ्या यंत्रांच्या केंद्रित अर्थ व्यवस्थेमध्ये अनेक लोक बेकार तर होतातच, शिवाय मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन त्याच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ निर्माण करावी लागते. त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात.  हे सर्व टाळण्यासाठी भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या देशात विकेंद्रित अर्थव्यवसाय फायद्याचा ठरेल.

खादीच्या चळवळीमागे आणखी एक विचार होता. त्या काळी छोट्या,  बारीकसारीक कामे करणा-यांना कमी लेखले जाई. समाजातील उच्च-नीचतेच्या दरीवरती सेतू बांधण्याचं स्वप्न या खादीच्या चळवळीतून गांधींनी पाहिलं होतं. देशातील प्रत्येकाने मग तो उच्चपदस्थ असो वा कमी, श्रीमंत असो वा गरीब,  स्त्री-पुरूष प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास सूतकताईला द्यावा व खादी निर्मितीला हातभार लावावा,  जेणेकरून गरिबांची सेवा व गरजवंताला मदत होईल. समाजातील दोन भिन्न वर्ग एका सूत्राने बांधले जातील. गांधीजींची ही खादीची चळवळ फक्त राजकीय नव्हती तर त्यामागे सामाजिक,  सांस्कृतिक व आर्थिक कारणे होती. 1934-35 साली एका व्यक्तीच्या स्वावलंबनातून सुरू केलेली ही चळवळ संपूर्णं खेडे, संपूर्ण गाव स्वावलंबी बनवण्याइतकी विस्तारित करण्यात आली. 1920 नंतर संपूर्णं देशभरात स्वयंसेवकांची असंख्य शिबिरे भरवून ही चळवळ देशव्यापी केली गेली.

परिश्रम, स्वावलंबन, परस्परांतील भेदाभेद विसरून एकत्रित काम करणे, परदेशी वस्तू, परदेशी कापड न वापरता,  आपल्या देशात तयार होणारे वस्त्र, वस्तू वापरून आपल्या गरीब बांधवांना मदत करणे, या गुणांची ओळख करून देताना विस्मरणात गेलेल्या आपल्या संस्कृतीतील  तत्वांचा पाठपुरावा महात्माजींनी केला. खादी ही विशिष्ट काळापुरती मर्यादित चळवळ न राहता तो जीवनाचा स्वभावधर्म होईल इतका पगडा तरूण मनावर बिंबवण्याचे काम या चळवळीने केले. पारतंत्र्याला झुगारून स्वदेशीच्या अभिमानाचं स्फुल्लिंग महात्मा गांधीनी मनामनात चेतवलं.

गांधीजी म्हणत, ” गांधी या नावाचा विसर पडला तरी चालेल पण गरिबांना आधार असलेल्या या चरख्याचा व त्यामागच्या विचारांचा देशाला कधी विसर न पडो.” ते पुढे म्हणत, ” समर्पणाला व त्यागाला आंतरिक व बाह्य शुद्धतेचे पाठबळ  असेल तेव्हाच ते परिणामकारक होते.  शुद्ध त्याग हा दृढ विश्वास राखून प्रसन्न चित्ताने केलेला असतो.  मत्सर, दुर्भावना किंवा शत्रूबुद्धी यांचा पुसटसा सुद्धा स्पर्श नसतो.”

खादी हा कापडाचा तुकडा नाही तर तो ताठ मानेने आयुष्य जगण्याचा मार्ग आहे हा मंत्र त्यांनी दिला.

हा मंत्र आत्मसात करून स्वतः चरख्यावर सूत कातून स्वतःची वस्रे म्हणजे हातरूमाल, साडी, ब्लाऊज, अंथरूण पांघरुण,  टॉवेल ( पंचा), झोळी,  शर्ट,  पायजमा वापरणारी माणसे अजून हा घेतलेला वसा जोपासत आहेत.

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ते सुंदर दृश्य…..!! ☆ सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

☆ विविधा ☆ ते सुंदर दृश्य…..!! ☆ सौ. सुजाता काळे ☆

त्यादिवशी संध्याकाळी नेहमी प्रमाणे 6.10 ची ट्रेन पकडली. एकाद तासात मी माझ्या डेस्टीनेशन पोहचणार होते. हा माझा नित्यक्रम. सकाळी 8.05 च्या ट्रेनने निघायचे व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर 6.10 ची ट्रेन गाठायची. स्टेशनवरून घरी तासाभरात पोहोचायचे. जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून टी. सी. कधीच आमची अडवणूक करत नसे. जिथे जागा मिळेल तिथे बसायचे.

हे गेलं 25 वर्षे सुरू आहे.

गेल्या 25 वर्षात जाता येता कित्येक माणसे पाहिली. वेगवेगळ्या धर्माची, जातीची, आचार -विचाराची, पेहरावाची, संस्कृतीची व रंगाची…..

आजही मी गडबडीत एस-4 डब्यात शिरले. मधल्या एका बर्थवर बसले. माझ्या समोरच्या बर्थवर एक जोडपे बसले होते. तिच्या मांडीवर एक 5-6 महिन्याचे बाळ होते. बाळ झोपलेले होते. त्याच्या अंगावर पांघरून घेतले होते.

त्यांच्याकडे बघून जरा आश्चर्यच वाटले.

तो गोरापान. कपड्यांच्या निवडीवरून शिकलेला वाटत होता. भाषा थोडी फार गावाची. ती थोडी काळी, म्हणजे जरा जास्तच काळी. कपाळावर भली मोठी टिकली. पुढचे दात किचिंतसे बाहेर. मुलाकडे स्वतःकडे तिचे लक्ष नसेल. केसांचा भला मोठा आंबाडा. चेह-यावर केसांच्या बटा. बाळाला थोपटत थोपटत कोणतं तरी गाणं बडबडत होती. भाषा अगदीचं गावंढळ. .. ‘ दुदु गाईच्या गोट्यामंदी, दुदु बाळाच्या वाटीमंदी….’ पण तो तिच्या या गाणं गाण्याने भयंकर चिडला होता. तिच्यापासून लांब बसला होता. त्याच्या चेह-यावरचा भाव पाहून मला थोडे विचित्र वाटले. त्याने तिला गप्प बसायची खूण केली पण तिचं पालुपद चालूच राहीले. मग त्याने न राहवून तिला बडबड करायला सुरुवात केली….. तुला केव्हांच सांगतोय गप्प बस म्हणून. कशाला एवढ्या भसाड्या आवाजात गातीस? डब्यातले लोक बघतायेत. तुझ्या बरोबर कुठं पण जायची लाज वाटते. कुठं कसं वागायचं ते कळतंच नाही. तरीच हजारदा आण्णांना म्हणालो होतो की नका लावू हिच्याशी लग्न. पण त्यांनी नाही ऐकलं. मला मरण्याची धमकी दिली. मित्राला दिलेला शब्द, लेकापेक्षा जास्त मोठा होता. लेकाचा विचारच केला नाही. ना रंग ना रूप… ना शिक्षण ना, ना वागायचं भान. उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.

शिक्षण म्हणे काय तर पाचवी पास..!! त्याची बडबड सुरु तर हिची गाणं सुरू. मी न राहवून त्याला सांगितले की ती बाळाला झोपतेय. आम्हाला काहीही त्रास होत नाही. त्याच्याशी बोलताना कळलं की तो पदवीधर आहे. चांगली नोकरी आहे. वडिलांनी जोर धरून त्याचे लग्न त्यांच्या मित्रांच्या मुलीबरोबर लावून दिले. तो म्हणाला, अहो मॅडम हिला चार चौघात घेवून जायला आवडत नाही. शिक्षणाचे राहू द्या, पण कमीत कमी दिसायला तरी बरी हवी. माझे मित्र माझ्यावर हसतात. माझी मस्करी करतात. हिला कुठे काय करावे ते कळतं नाही. त्याच्या बोलण्यात खंत होती.

मी पण नकळत कधी दोघांची तुलना करू लागले, मला कळालेच नाही. खरंच तो दिसायला देखना. गोरा, नाकी डोळी छान. शिकलेला. शिष्टाचार पाळणारा. आणि ती काळी, दात पुढे असणारी , कमी शिकलेली. गावात वाढलेली. मला तिचे एक कौतुक वाटले की तो तिला चार चौघात टोचून बोलला पण तिने तोंडातून अवाक्षर ही काढला नाही. निमूटपणे ऐकून घेत होती. प्रत्युत्तर दिले नाही. मी नकळत त्याच्या बाजूने विचार करत होते. मी पण मनाला समजावले की ही मलाही आवडली नाही. मी उगाचचं रागाने तिच्याकडे पाहिले.

एवढ्यात तिच्या मांडीवर झोपलेले तिचे बाळ रडत उठले. मी पाहिले की तिचे बाळं वडिलांसारखे सुंदर आहे. गोंडस आहे. रडण्या-या बाळाला त्याने पटकन उचलले. तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण बाळ काही शांत होईना.

त्याने उगी उगी करत चार इंग्रजी शब्द पण झाडले. माय डियर, कीप क्वायट. बेबी… बेबी… बी क्वायट… तरीही बाळ रडायचे थांबेना. तिने चार पाच वेळा बाळाला घेण्याच्या प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले. थोड्या वेळानं कंटाळून त्याने बाळ तिच्याकडे दिले.

बाळ जवळ घेताना तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. तिने बाळाला जवळ घेतले. आपला पदर त्याच्या डोक्यावर पांघरून ती दूध पाजू लागली. बाळाला दूध पाजताना तिच्या चेह-यावर मातृत्वाच जे भाव होते, जे समाधान होते ते पाहून मला माझी लाज वाटली. कारण हिच्यावर थोड्या वेळा पूर्वी तिच्या बद्दल मनात राग धरला होता.

तिच्या चेह-यावर अप्रतिम आनंद होता. आई आपल्या मुलाला अमृतपान करवते हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर दृश्य होते. याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हते. त्यावेळी ती विश्वातील सर्वात सुंदर स्त्री असते…!!

आई गोरी आहे की काळी! आई शिक्षित की अशिक्षीत! ती…. ती सुंदर आहे की असुंदर ! आई ती आईच असते….नऊ महिने त्रास सोसून, वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळयात सुंदर असते…. स्वतःच्या बाळाची भूक शमवणारी आई…!! त्यादिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य मी पाहिले….!!

 

© सुजाता काळे

पाचगणी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684

sujata.kale23@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्पर्श ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ स्पर्श ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

स्पर्श म्हणले की किती प्रकारचे स्पर्श मनाला स्पर्शून जातात नाही? प्रेमाचा, आपुलकीचा, हक्काचा, आश्वासनाचा, धीर देणारा, हवा हवासा वाटणारा, नको वाटणारा.

जेव्हा शुभमंगल होऊन हक्काचा जोडीदार येतो आणि सप्तपदी च्या वेळी  हातात हात घेतो तेव्हा जाणवतो, तो त्याच्या सोबतीचा स्पर्श.  त्याचा हळुवार लाडिक स्पर्श प्रेमात पाडतो तर प्रोत्साहित स्पर्शाने दहा हत्तींचे बळ देऊन जातो, आणि सारे अडथळे कसे चुटकी सरशी दूर करतो त्याच्या मिठीत तर स्वर्ग सुख ही ठेंगणे भासते आणि सारे सुख दुःख विरघळून जाते.

आपल्याला स्पर्शाची ओळख अगदी आईच्या गर्भात असल्या पासून होऊ लागते. किंबहुना असं ही म्हणता येईल की, आईला बाळाच्या स्पर्शाची ओळख आपलं बाळ उदरात असल्या पासून होत असते. तो अनोखा, हवा हवासा वाटणारा, आनंद देणारा स्पर्श. त्या मारलेल्या पहिल्या लाथेच्या स्पर्शाने आई सुखावून जाते, आणि मन वाट पाहू लागते की कधी एकदा आपले बाळ आपल्या कुशीत येतय आणि त्याच्या कोमल हाताने आपल्याला स्पर्श करतय.

आणि जेव्हा आपले नवजात बालक आपल्याला पहिल्यांदा स्पर्श करते तेव्हा ते तर, स्वर्ग सुख!!! मग आई आपला चेहरा  मुद्दामून त्याच्या हाता जवळ नेते जेणेकरून त्याने आपले मऊ हात फिरवावेत. त्या नवजात बालकाला कुशीत घेतल्यावर तरी अस वाटतय जणू सारे सुख आपल्या मिठीत सामावलेले आहे.

कालांतराने मुलं मोठी होतात आणि नोकरीला जाऊ लागतात तेव्हा वडीलांनी पाठीवरून फिरवलेला, हिंम्मत देणारा स्पर्श, हे सांगणारा की हो पुढे मी आहे.

आईच्या स्पर्शात तरी माया, वात्सल्य, कौतुक, विश्वास, आधार सारे काही सामावलेले असते.

वृद्धापकाळात सुखावून जातो आपल्या नातवंडांचा जादूवाला स्पर्श. जर नातवंडांनी आजीच्या गुडघ्याला तेल लावून मालीश केले तर ती सुखावलेली आजी दहा मैल चालून येते. मुलांनी किंवा मुलींनी प्रेमाने फिरवलेला पाठीवरून प्रेमाचा स्पर्श आपण एकटे नाही आहोत ह्याची जाणीव करून जाते.

स्पर्शात अनेक आजार बरे करण्याची शक्ति आहे म्हणून तर खूप महत्व आहे स्पर्श थेरपीला. मसाज केल्यानंतर जे सुख मिळते ते खूप सुखावणारे असते, आराम देणारे असते व दाह कमी करणारे असते..

असे अनेक स्पर्श आहेत जे आपल्या स्मरणात राहतात, जसे शाळेत गेल्यावर बाईंनी कौतुकाने फिरवलेला कींवा बाई ओरडल्या नंतर आपल्या मैत्रिंणीने किंवा मित्राने हळूच आपला हात हातात घेतल्यावरचा आधाराचा स्पर्श.  महाविद्यालयात नकळत झालेला पण मग तो हवाहवासा वाटणारा मोहरून टाकणारा किंवा नको असलेले तिटकारा येणारा स्पर्श. दाह कमी करणारा किंवा दाह देणारा स्पर्श.

थोडक्यात इतकंच म्हणता येईल की स्पर्शात लाख मोलांचे बळ असते, जे आजारी माणसाला निरोगी बनवतो, निराधारा व्यक्तीला आधार देऊन जातो. एखाद्याला प्रोत्साहन तर एखाद्याचा आधार बनुन जातो. एखाद्याला प्रेम जिव्हाळा देऊन जातो. एक सुखाची झप्पी जणू.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फुंकर ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ फुंकर ☆ श्री अरविंद लिमये☆

कोणत्याही जखमेची वेदना कमी करायला एक हळूवार फुंकरही पुरेशी असते. मग ती जखम शरीरावरची असो वा मनावरची. तत्परतेने केलेली मलमपट्टी जखम लवकर भरुन येण्यासाठी आवश्यकअसते. एरवी जखम चिघळत जाते. हे चिघळणं वेदनादायीच असतं. जखम झालेल्याइतकंच जखम करणाऱ्यासाठीही. म्हणूनच जखम झालीच तर ती चिघळू न देण्याची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं.

चिघळणं म्हणजे विकोपाला जाणं. चिघळलेल्या जखमा कालांतराने बऱ्या झाल्या, तरी जखमेचा कोरला गेलेला व्रण मात्र जखमेच्या जन्मखूणेसारखा कायम रहातो.

मनावरील जखमा बऱ्या झाल्यानंतरचे हे असे व्रण मात्र जखम बरी झाली तरी त्या जखमेच्या वेदनेसारखे दीर्घकाळ ठसठसतच रहातात. नात्यातलं आपलेपण मग हळूहळू विरु लागतं

नाती रक्ताची असोत, वा जुळलेली किंवा जोडलेली असोत, वा निखळ मैत्रीची असोत ती अलवारपणे जपणं महत्त्वाचं. जपणं म्हणजे जखमा होऊ न देणं आणि झाल्याच तर त्या चिघळू न देणं. यासाठी गरज असते ती परस्पर सामंजस्याची.

व्यक्ति तितक्या प्रकृती हे मुलभूत तत्त्व हाच कोणत्याही नात्याचा पाया असायला हवा. मग परस्पर सामंजस्य आपसूकच आकार घेईल, आणि नात्यानाही सुबक आकार येत जाईल.

परस्पर सामंजस्य म्हणजे वेगळं कांही नसतंच.  दुसऱ्यालाही आपल्यासारखंच मन असतं आणि मतही हे कधीच न विसरणं म्हणजेच परस्पर सामंजस्य. कधीकधी असूही शकतो दुसऱ्याचा दृष्टीकोन आपल्यापेक्षा पूर्णत: वेगळा तरीही कदाचित तोच बरोबरसुध्दा हे मनोमन एकदा स्विकारलं की मतभेद कायम राहिले तरी मनभेदाला तिथे थारा नसेल.  मनभेद नसले तर मनावर नकळत ओरखडे ओढलेच जाणार नाहीत.  दुखावलेपणाच्या जखमाच नसतील तर मग त्या चिघळण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. तरीही नकळत,  अनवधानाने दुखावलं गेलंच कुणी कधी, तरीही त्या दु:खावर फक्त आपुलकीच्या स्पर्शाची एक हळूवार फुंकरही दु:ख नाहीसं व्हायला पुरेशी ठरेल.

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ऊंच माझा झोका ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ ऊंच माझा झोका ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

सरस्वती आमच्या साक्षरता वर्गात रोज यायची.

ऊंच, सडसडीत, अनवाणी, विस्कटलेले केस, ठिकठिकाणी जोड लावून शिवलेलं मळकट लुगडं. पण डोळ्यात विलक्षण चमक. काम करून करून घट्टे पडलेले हात पण ओंजळीत ओली स्वप्नं!!

तांबापुरा झोपडपट्टीत राहण्यार्‍या, मोलमजुरी करणार्‍या महिलांना, कित्येकवेळा आमच्या वर्गात येण्यासाठी, विनवण्या कराव्या लागायच्या.. शिकाल तर वाचाल.. हे जीव तोडून पटवून द्यावं लागायचं..

त्यांची न येण्याची कारणंही खूप होती. दारु पिण्यार्‍या नवर्‍याचा धाक, मारझोड. वस्तीतल्याच लोकांकडून मिळणारे टोमणे… संशय… एक ना अनेक.

पण सरस्वती मात्र या सगळ्यांवर मात करून, धावत पळत आमच्या क्लासला यायची…. पाटीवर छान अक्षरं गिरवायची… धडे वाचायची.. कविता म्हणायची.

समजलं नाही तर प्रश्न विचारायची… तिची जिद्द पाहून मीही थक्क व्हायचे…  लहान असतानाच एका बिजवराशी तिचं लग्न लावलं गेलं… सुख म्हणजे काय असतं हे कधी कळलंच नाही… ना माहेरी ना सासरी.. जीवन म्हणजे नुसता चिखल….

एक दिवस ती मला म्हणाली, “ताई मला यातून सुटायचंय्.. मला माझ्या जगण्याचा अधिकार मिळवायचाय्… मला तर एक चांगलं आयुष्य जगायचच आहे आणि जमेल तेव्हढं माझ्यासारख्यांनाही मला बरोबर घेऊन चालायच्ंय्….”

आमच्या साक्षरता वर्गातून तिच्या स्वप्नांना एक पायरी मिळाली फक्त.. पण तिचा प्रवास खूप लांबचा होता. खाचखळग्यांचा दगड गोट्यांचा होता… पण तिची पावलं घट्टं होती… मधून मधून ती मला भेटायला यायची…

ग्राम पंचायतची निवडणुक तिने लढवली… ती जिंकली… सरपंच झाली. महिला सरपंचाचा मान तिला मिळाला… तिने हे सरपंचपद नाकारावं म्हणून तिला अनेक धमक्यांना सामोरं जावं लागलं… पण ती ढळली नाही…. तिने अत्याचारित महिलांसाठी अल्पबचत गट तयार केले… बँकांकडून सहाय्य मिळवलं…  अनेकांच्या गुणांचं संकलन करून या माध्यमातून तिने त्यांना सक्षम बनवण्याचा विडा ऊचलला… अंगणवाडीतही तिचा महत्वपूर्ण सहभाग  होता…

बघता बघता सरस्वतीच्या स्वप्नांचा आलेख ऊंच ऊंच होत गेला…. आता ती सरस्वती बाई झाली होती…

ती एका गळीत समाजाची आधारभूत बनली होती…. “माय” माऊली संबोधली जाऊ लागली….. मी टीव्ही लावला…. ऊंच माझा झोका या कार्यक्रमात तिचा सत्कार होणार होता…. पुरस्कार चिह्न हातात घेऊन आपलं मनोगत व्यक्त करणार्‍या  सरस्वतीच्या डोळ्यात आजही तीच चमक होती….. मी ऐकत नव्हतेच एक ऊंच गेलेला झोका पाहत होते…. फक्त…. पाहता पाहता डोळे भरले… या झोक्याला मी फक्त एक हलका धक्का दिला होता……!!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१९/०१/२०२१

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares