मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – तारामावशीचा निरोप घेताना हातून कांहीतरी निसटून गेल्याची भावना मनात होती. भिडेकाकांचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र मनातली ती अस्वस्थता बऱ्याच अंशी कमी झाली. इथे येताना मनात असणारे कांही प्रश्न अनुत्तरीतच राहिलेले होते हे खरे, तरीही खूप काही गवसल्याची भावना मनात भरून राहिलेली होती!)

भिडेकाकांनी सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम अगदी सहज योगायोगाने घडलेला वाटावा असाच होता. तरीही ती मूर्ती मला भेट म्हणून देण्यासाठी विकत घ्यायची प्रेरणा तारामावशीला मिळणं, तिने ती पुढे आमची भेटच होऊ न शकल्याने तीन वर्षे स्वतःकडे सांभाळून ठेवणं, त्यानंतर माझ्या आईचं कांही कारणांनी मुंबईला जाणं, तिथल्या अल्पवास्तव्यातही तिला उभ्या उभ्या कां होईना तारामावशीला भेटून यावंसं वाटणं, त्याच भेटीत मावशीने ती मूर्ती ट्रंकेतून काढून मला देण्यासाठी आईकडे आठवणीने देणं, आणि ती देण्यासाठीच केवळ आईने परतीच्या प्रवासात थेट कोल्हापूरला न जाता आवर्जून सांगलीला उतरून माझ्याकडे येणं, नेमक्या त्याआधी अशीच एखादी मूर्ती पुण्याला नवीन जागी रुजू होण्यासाठी निघण्यापूर्वी विकत घेण्यासाठी मी गेलो असता अनेक ठिकाणी शोध घेऊनही मला मनासारखी मूर्ती न मिळणं आणि त्याच अस्वस्थतेत घरी आल्यानंतर आईने बॅग उघडून त्यातली ही मूर्ती माझ्याकडे सोपवणं या सगळ्या घटनाक्रमातल्या असंख्य धाग्यांची घट्ट वीण ही केवळ योगायोगाने गुंफली जाणं शक्यच नाही हे मला नव्यानं जाणवलं. त्याचा थांग लावण्यासाठी आवर्जून आटापिटा करूनही फारसं कांही हाताला लागलं नसलं तरीही ते जाणून घ्यायचा बंद दरवाजा थोडातरी किलकिला झाल्याचं समाधान भिडेकाकांकडून समजलेल्या घटनांमुळे मला मिळालं होतंच. रिकाम्या देव्हाऱ्यात प्रतिष्ठापित केलेल्या त्याच मूर्तीला नमस्कार करून मी बँकेत जाण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा हेच सगळे विचार मनात होते. तोपर्यंतच्या प्रतिकूल परिस्थितीतल्या अकोल्यातल्या माझ्या अधांतरी वास्तव्यातल्या निराधार मनाला या अनुभवांमधून ध्वनित होणारा ‘त्या’चा ‘मी आहे’ हा आश्वासक दिलासा मिळाला आणि डोक्यावरचं सगळं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तसा मी निश्चिंत झालो!

मी अकोल्यात पाऊल ठेवल्यापासूनच्या सहजासहजी अंगवळणी पडूच न शकणाऱ्या पूर्णत: प्रतिकूल परिस्थितीतही त्या त्या वेळी मला आधार देऊन गेलेले कितीतरी सकारात्मक क्षण होतेच की. याचा अर्थ मी इथे ‘त्या’च्या निगराणीखालीच तर होतो, या विचाराचा स्पर्श मनाला उभारी देणाराच नव्हता फक्त तर तो लवकरच घडणाऱ्या सकारात्मक घडामोडींचं सूतोवाचच करत असावा असंच नंतर घडलेल्या उत्साहवर्धक घटनांनंतर मला वाटत राहिलं होतं. कारण मी त्यादिवशी बॅंकेत पोचल्यानंतर अतिशय वेगाने आणि अनपेक्षितपणे अशा कांही घटना घडत गेल्या कीं त्यातून जाणवलेला अनपेक्षित सुखद धक्का अचंबित व्हावं असाच होता!

बॅंक तीच, जबाबदाऱ्या, दडपणं, गर्दी सगळं तेच.. क्षणाचीही उसंत न देणारं हे सगळं तसंच असूनही तो दिवस मात्र नेहमीपेक्षा वेगळाच ठरला तो मी ब्रॅंचमधे पोचताच आलेल्या एका फोनमुळे. फोन क्रिमिनल लाॅयरच्या आॅफिसमधून आलेला आणि शक्य असेल तर तातडीने भेटून जायला सांगणारा होता. या फोनची खरंतर मी वाट पहायची नाही असंच ठरवलं होतं. क्रिमिनल केसेस् फाईल करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे मी वकिलांच्या सूचनाबरहुकूम काळजीपूर्वक पूर्ण करून त्यांच्याकडे सुपूर्द केली होती त्याला आठच दिवस तर झाले होते. ‘फायनल ड्राफ्ट तयार झाला कीं मी आपण होऊन तुम्हाला निरोप देईन” असं त्या वकिलांनी मला सांगितलं होतं. तरीही हे तातडीने होण्याची निकड मी त्यांना बोलून दाखवली होती ती त्यात अडकलेल्या बॅंकेच्या मोठ्या रकमेचा विचार करून. आणि तसंही हेच निस्तरण्यासाठी मला अकोल्याला पाठवलं असल्यामुळे ते प्राधान्यक्रमाने पूर्ण करणं माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचंही होतं. तरीही आजवरच्या अनुभवांनुसार मी डायरीत फाॅलोअपसाठीचं डायरायझेशन केलं होतं ते पंधरा दिवसांनंतरचं. आणि आश्चर्य म्हणजे हे क्रिमिनल लॉयर अतिशय व्यस्त असूनही या केसचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी माझ्या पाठपुराव्याची वाट न पहाता आठ दिवसातच सगळं प्राथमिक काम पूर्ण करून दिलं होतं!

माझ्या समोरच्या त्या महत्त्वाच्या तातडीच्या कामाची माझ्यापुरती सांगता झाली ती आरोपपत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या सगळ्या दस्तावेज व पुराव्यांच्या कागदपत्रांवर मॅनेजर म्हणून सही करून मी स्वत: ती फाईल आमच्या क्रिमिनल लाॅयरकडे सुपूर्त केली तेव्हा!

तोवरच्या माझ्या बँकिंग करिअरमधे मला सामोरं जावी लागलेली अशी अनेक आव्हानं होती हे खरं पण त्यांचं असं दडपण कधीच जाणवलेलं नव्हतं. वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळे ती आव्हानं सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध कामाची अपेक्षा करणारी असूनही सुसह्यच नव्हे तर आनंददायीही असायची. इथं मात्र माझ्यासमोरचं हे आव्हान केवळ माझ्यासाठीच नव्हे तर या ब्रॅंचच्या रिजनल आणि झोनल ऑफिससाठीही टांगती तलवारच होती. त्यामुळे त्यातला एक अंक मनासारखा पूर्ण होण्याचं समाधान त्या क्षणापुरतं कां होईना माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं! ‘त्या क्षणापुरतं’ असं म्हणायचं कारण मला त्या समाधानात तरंगत राहून चालणारच नव्हतं. कारण थकीत कर्जांची इतरही अनेक खाती पिंजून काढण्याच्या जिकिरीच्या कामावर लक्ष केंद्रीत करणं माझ्यासाठी आता तितकंच महत्त्वाचं होतं!

या सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय काळजीपूर्वक काटेकोर नियमांनुसार पूर्ण करत असताना मिळणाऱ्या समाधानावर, बेजबाबदारपणे काम करणाऱ्या इतरांच्या चुकांची ही धुणी आपल्याला धुवावी लागतायत या विचाराचं सावट असायचंच. अर्थात हा असा अनुभव मी प्रथमच घेत असल्यामुळे ते सहाजिकच होतं. म्हणूनच अपवादात्मक असला तरी हा अनुभव निदान त्याला सामोरं जाताना तरी माझ्यासाठी क्लेशकारकच ठरला होता!

या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी अकोल्यातल्या कडक उन्हाइतकेच चटके देणाऱ्या अशा अनुभवांमुळे मन उद्विग्न असतानाच अकल्पितपणे उल्हसित करणारा गारवा स्पर्शून गेला तो बाहेरच्या उन्हाला शांतवण्यासाठीच आल्यासारख्या बरसू लागलेल्या वळवाच्या पाऊसधारांमुळे! अकोल्यात गेल्यापासून हा असा गारवा अल्पकाळ का असेना मी प्रथमच अनुभवत होतो आणि म्हणूनच मनातलं मळभ नकळत विरून गेलं. गंमत म्हणजे हा पाऊस या सगळ्या अडचणीतून मला अतिशय सन्मानपूर्वक अलगद बाहेर काढू पहाणाऱ्या, माझ्या मनातली काहिली शांतवू पहाणाऱ्या अशा हाकेच्या अंतरावर वाट पहात उभ्या असणाऱ्या एका अनपेक्षित घटनेचं शुभसूचनच करत होता जसाकांही.. , पण त्याक्षणी मला त्याची कल्पना नव्हती एवढंच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रावण…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ श्रावण… ☆ सौ शालिनी जोशी ☆

श्रावण म्हणजे सण आणि उत्सवांचा राजा. सृष्टीही नटलेली असते. म्हणून श्रावणाचे वर्णन गीतकार ‘हासरा नाचरा श्रावण’ असे करतात. प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व. सोमवार- शिवपूजन, मंगळवार- मंगळागौर, बुधवार -बुध पूजन, गुरुवार – ब्रहस्पती पूजन, शुक्रवार जिवंतिका (जिवती), शनिवार -अश्वत्थ, मारुती पूजन.

नागपंचमी – श्रावण शुद्ध पंचमी. भारतीय संस्कृती निसर्ग प्रधान. वृक्ष प्राणी इत्यादी निसर्गाच्या विविध रूपाना देव मानणारी. देव देवता नागरूपाने प्रगट होतात असे मानणारी. म्हणूनच शंकराने आपल्या गळ्यात तर गणपतीने आपल्या कमरेला नागाला स्थान दिले. तर विष्णु शेषशाही झाला. संपूर्ण पृथ्वी शेषाने आपल्या पुस्तकावर तोलली आहे असे मानले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी वासुकी सर्पाचा दोरीसारखा उपयोग केला गेला. इतका नागकुळाचा देवांशी संबंध. जिथे देवांची व मानवी शक्ती अपुरी पडते, तेथे अशा अमानवी शक्ती योजल्या जातात.

व्यवहारिक दृष्टीने शेतीचे नुकसान करणारे उंदीर हे नागाचे खाद्य. म्हणून नाग हा शेतकऱ्यांचा मित्र झाला. श्रावणाच्या सुरुवातीला पाऊस थोडा कमी झालेला असतो. सर्वत्र हिरवगार झालेले असते. त्यामुळे नाग आपल्या शरीराचे उष्णता कायम ठेवण्यासाठी उन्हात येऊ लागतात. त्यांच्याविषयी भीती व त्यांची उपयुक्तता जाणून नागाची पूजा सुरू झाली. मग मोठ्या दगडी किंवा धातूच्या नाग प्रतिमांची पूजा देवळात, तर घरोघरी मातीच्या नागांची पूजा करतात. त्याला दुर्वा, लाह्या व दूध वाहतात. नाग कधीच दूध पीत नाहीत. पण ती प्रथा पडली. अनवधानाने देखील नागाची हत्या होऊ नये. म्हणून या दिवशी उकरत नाहीत. घरात चिरत व भाजत नाहीत. कणकेचे पुरण घालून केलेले दिंड नैवेद्याला करतात. ते उकडलेले असतात.

लोककथा मधून नागाला स्त्रियांचा भाऊ मानले आहे. या सणाला स्त्रिया माहेरी येतात. एकत्र जमून गाणी म्हणतात. खेळ खेळतात. नवीन वस्त्र घालतात. मेहंदी काढतात. झोपाळ्याचा आनंद लुटतात. म्हणून स्त्रियांसाठी हा महत्त्वाचा सण. या दिवशी यमुनेचे पाणी दूषित करणाऱ्या कालिया नागाला श्रीकृष्णाने दूर पाठवले. साऱ्या मानव जातीचा मित्र असणाऱ्या नागाबद्दल कृतजंता व्यक्त करायचा हा दिवस असला तरी गारुडी त्याचा गैरफायदा घेतात. दात काढलेले नाग घरोघरी फिरवून पैसे गोळा करतात. बत्तिसशिराळ्याला जिवंत नागाच्या पूजेची प्रथा होती. यापेक्षा प्रतिमापूजन श्रेष्ठ. नागाना त्यांचे त्यांचे अधिवासात राहू द्यावे. हल्ली सर्पमित्र गावात वावरणाऱ्या नागांना सहजपणे पकडून जंगलात सोडतात.

नागपंचमी म्हटली की ग. दि. मांचे गीत आठवते ‘फांद्यावरी बांधिले व मुलीने हिंदोळे। पंचमीचा सण आला डोळे माझे ओले।’. राजस्थान, गुजरात, केरळ, तामिळनाडू मध्येही नाग पूजेची प्रथा आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सासूची एकसष्टी ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😅 सासूची एक-सष्टी ! 💃 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“अगं काय हे सुनबाई ? निदान आज तरी माझ्या चहात साखर घालायलाचीस ! आज काय आहे विसरलीस वाटतं ?”

“माझी अजून तुमच्या सारखी साठी थोडीच झाल्ये विसरायला ?”

“नाही नां, मग ?”

“आई, आज तुमचा एक्सष्टावा वाढदिवस आहे, हे माझ्या चांगलं लक्षात आहे आणि म्हणून तर रोजच्या अर्ध्या कप चहा ऐवजी तुम्हांला आज चांगला पाऊण कप चहा दिला आहे ! अर्ध्या कप चहावर पाव फ्री ! एंजॉय युअर बर्थ डे !”

“अगं पण सुनबाई मला तर पाव कुठेच दिसत नाही या चहा बरोबर !”

“आई, मला असं म्हणायचंय की रोजच्या अर्धा कप चहावर पाव कप चहा फ्री !”

“पण त्या पाव कप एक्सट्रा चहा ऐवजी, थोडी साखर घातली असतीस आज चहात, तर तुझे हात काय मोडणार होते का गं ?”

“अजिबात नाही आई, पण तुमच्या हाय डायबेटीसमुळे मी तुम्हांला रोज इन्शुलीनच इंजेकशन देते, हे विसरलात वाटतं ?”

“मी बरी विसरेन ! माझ्या सासूबाई होत्या, तेंव्हा मला येता जाता टोचून, टोचून बोलायच्या आणि आज माझी सून मला तोंडाने नाही पण इंजेकशनच्या सुईने रोज टोचत्ये ! काय माझं मेलीच नशीब ! मला कोणाला टोचून बोलायचं भाग्यच मिळाल नाही या जन्मात !”

“पण तुम्ही मला अधून मधून जे तीरकस बोलता, ते आणखी काय वेगळं असतं का हॊ आई ?”

“ते जाऊ दे, मला सांग निदान आज तरी माझ्या चहात थोडीशी एक दोन चमचे साखर का नाही घातलीस ?

तेवढ्याने का होईना, पण माझ्या आजच्या स्पेशल डेची सुरवात गोड झाली असती !”

” ए sss क दो sss न चमचे साखर मी तुमच्या कपात घालायची आणि विलासचा ओरडा खायचा?”

“अगं त्याला कसं कळेल तू माझ्या चहात साखर घातल्येस ते ? ती तर विरघळून जाणार नां कपात !”

“ते जरी खरं असलं, तरी माझ्या मनांत ते कसं राहील आई ? आपल्या बायकांची जीभ पोटात कमी आणि ओठात जास्त ठेवते, हे मी का तुम्हांला सांगायला हवं ?”

“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे सुनबाई ? माझ्या पोटात काही रहात नाही म्हणून ?”

“मी तुमच्या पोटात असं कुठे म्हटलं ? एकंदरीत बायकांच्या बाबतीत एक जनरल स्टेटमेंट केलं इतकंच !”

“पुरे झालं तुझं पोटात आणि ओठात ! मला सांग आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय सरप्राईज देणार आहात तुम्ही सगळे ?”

“बघा, स्वतःच म्हणता सरप्राईज आणि वर विचारता पण कसलं सरप्राईज म्हणून ?”

“अगं सांग गपचूप तू मला ते सरप्राईज. ते मिळाल्यावर मी चकित झाल्याचा अभिनय नक्की करीन, तू अजिबात काळजी करू नकोस !”

“बघा हं, नाहीतर मला तोंडघाशी पाडालं. “

“तू काळजीच करू नकोस सुनबाई, कसा मस्त अभिनय करते बघ संध्याकाळी ! हां आता सांग काय सरप्राईज आहे ते !”

“आजच्या तुमच्या एकसष्टीच्या निमित्त, या वर्षीच्या तुमच्या बर्थडे केकवर ६१ मेणबत्या लावायचं आम्ही ठरवलंय आणि तो केक दरवर्षी सारखा शुगरलेस नसणार ! काय, कसं वाटलं आमचं सरप्राईज ?”

“चुलीत घाला त्या सरप्राईजला !”

“म्हणजे काय आई, आवडलं नाही का सरप्राईज ?”

“अगं त्यातली एकच गोष्ट बरी आहे म्हणायची !”

“कोणती ?”

“या वेळचा केक शुगरलेस नसणार आहे, ती !”

“मग झालं तर !”

“अगं हॊ, पण त्या केकवरच्या ६१ मेणबत्या फुकर मारून विझवता विझवता माझा म्हातारीचा जीव जाईल त्याच काय ?”

“अहो आई तुम्हीं अजिबात काळजी करू नका त्याची, आम्ही सगळे तुम्हांला मदत करू नां त्या मेणबत्या विझवायला !”

“नकोच ती भानगड सुनबाई ! त्या पेक्षा तुम्हीं या वर्षी माझी ‘तुला’ करा !”

“हां हां, ही आयडिया पण युनिक आहे, पण कशानं करायची तुमची तुला ?”

“अगं सोप्प आहे, ६१ किलो वजनाची मिठाई सगळ्या सोसायटीत वाटून टाका, म्हणजे झालं !”

“बरं बरं, मी असं करते तुमचा चहा नाष्टा झाला की जरा बाहेर जाऊन येते !”

“कशाला ?”

“आपल्या घराच्या आसपास कुठे लाकडाची वखार आहे का बघून येते !”

“लाकडाची वखार ? सुनबाई काय विचार काय आहे तुझा ?”

“आई, तुमच्या जे डोक्यात आहे ते माझ्या मनांत पण नाही !”

“मग लाकडाची…… “

“अहो आई, आता तुमची ‘तुला’ करायची म्हणजे तेवढा मोठा वजन काटा हवा नां ?”

“हॊ बरोबर. “

“मग तो लाकडाच्या वखारी शिवाय दुसरीकडे मिळेल का ?”

“नाही !”

“म्हणून तर लाकडाची वखार शोधायला बाहेर पडीन म्हणते. आता तुमची ‘तुला’ करायची म्हणजे त्या वजन काट्याच्या एका पारड्यात तुम्हीं बसणार आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्या वजना इतकी मिठाई तोलायची बरोबर नां ?”

“हॊ बरोबर !”

“पण मग ते कसं जमणार आई ?”

“का, न जमायला काय झालं?”

“अहो आई, तुमचं वजन आहे ८५ किलोच्या आसपास आणि मिठाई तोलायची ६१ किलो ! हे गणित काही जुळणार नाही बघा !”

“सुनबाई, कळली बरं तुझी अक्कल ! आता एक कामं कर. “

“कोणतं?”

“माझ्या बाबुला म्हणजे तुझ्या नवऱ्याला फोन कर आणि त्याला सांग या वेळचा माझ्या बर्थडेचा केक पण शुगरलेसच आण आणि…..

“आणि काय आई ?”

“त्या केकवर वर एकही मेणबत्ती नको म्हणावं !”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मेपटं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ मेपटं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

हे नाव तुमच्या ओळखीच आहे का?  नागपंचमीच्या सणादिवशी मला त्याची नेमकी आठवण होते.  पुन्हा ते हातात घेऊन गावभर हुंडराव असं वाटतंय. पंचमी दिवशी आमच्या गावातल्या प्रत्येक पोरांच्या हातात ते दिसणारच. कुणाच्या मेपट्याचा बार मोठा निघतोय याची चढाओढ लागायची पोरांच्यात. म्हणून पोरं मेपट्यांचे बार टाकत गावभर हुंडरत फिरायची .

आता मेपटं म्हणजे काय ते सांगतो. आमच्या गावातले कसबी लोहार ही मेपटी तयार करण्यात तरबेज होते. ते पंचमीच्या अगोदरचे पंधरा दिवस याच कामात गढून गेलेले असायचे. जाड पत्र्याची एक पोकळ नळी तयार करायची. ती बुडा कडून तोंडाकडे निमूळती होत गेलेली असायची. ती चांगली पॅकबंद असायची. नळीतून मधून कुठूनही हवा बाहेर जाऊनये म्हणून तिला तिच्या जोडावर टाकनखारलाऊन सीलबंद करायची. माग त्या नळीच्या मापाने तिच्यात मागेपुढे करता येईल अशी एक दणकट सळी घ्यायची तिची लांबी पोकळ नळी पेक्षा बोटभर कमी अशा बेतान लाकडी मूठ बसवायची ती मूठ बसवलेली सळी दट्याच काम करायची.

आमच्या गावाशेजारच्या डोंगरात कारीच्या जाळ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आसाच्या त्यांना कारं लगडलेले असायची. ती पंचमीच्या दोन दिवस आधीच पोरं तोडून आणायची. तयार झालेल मेपटं घ्यायचं त्यांच्या मागच्या रुंद भागात कार ठोकून गच्च बसवायचं मग ते मूठ बसवलेल्या सळीनं पुढे ढकलायच.  ते नळीच्या पुढच्या निमुळत्या जागेत अधीकच घट्ट बसायचं मग पुन्हा मागच्या बाजून दुसरं काय ठोकून बसवायचं आणि त्याला मुठ बसवलेल्या सळीन पुढं ढकलायच.  मागच्या वाढत जाणा-या हवेच्या दाबान पुढचं कार मोठा आवाज करत पिस्तूलच्या गोळी सारखं पुढं जायचं.  असलं हे मेपटं म्हणजे पोरांची ठासणीची बंदूकच बनायची. पोरं ती घिऊन मिजास करत  गल्लीभर फिरायची. आज कालौघात ते लुप्त झालेल आहे. पण आमच्या स्मरणात त्याचं ते कौतुक कायमच नोंदलं गेलं आहे. असं होत आमचं पंचमीच्या खेळातलं मेपटं.

आमच्या गावा शिवाय ते इतरत्र कुठेही दिसलं नाही.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “उपवास…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “उपवास…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

आज श्रावणी सोमवार…

उपवास…

काल रात्री बायकोचा आणि माझा झालेला संवाद आठवला…

ऊद्या श्रावणी सोमवार… ऊपवास आहे…. काय करु…

साबुदाण्याची खिचडी, सोबत ताक किंवा दही.

भगर आणि आमटी. भगर साधी का फोडणीची करू.

नाहीतर बटाट्याचा किस, रताळ्याची खीर.

का केळी, सफरचंद या फळांसोबत राजगीरा लाडू, वडी, थोडे खजूर असं चालेल……

थोडे बटाट्याचे पापड, आणि साबुदाण्याच्या कूर्डयी तळते लागणार असतील तर……

काय ते सांगा. साबुदाणा भिजत घालायला लागेल.

मी बराचवेळ विचार करून… लगेचच ऊत्तर दिलं.

काहीही कर…

चालेल… 

मी रात्री ऊपवास सोडतांना ऊपवास करेन. तेव्हा मात्र ऊपवास सोडण्याचा आग्रह करु नकोस……

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संवाद मुका झाला ☆ डॉ. शैलजा करोडे  ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 विविधा 🌸

☆ संवाद मुका झाला ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून माझी निवड झाली होती. डोंबिवलीलाच माझा मावसभाऊ राहातहोता.

” ईश्वरभाऊ चार तारखेला साहित्य संमेलनात येत आहे काव्यवाचनासाठी ” ” अग माई, माझ्याकडे  अवश्य ये. जेवणही सोबतच करू. वर्किंग डे (working day) असल्याने तुझी वहिनी घरी नसेल, पण मी घरीच आहे. मी असं करतो, तुला संमेलन स्थळी न्यायलाच येतो. तुझा कार्यक्रम संपला कि येऊ आपण घरी “.

” ओ. के. भाऊ ” मी फोन ठेवला. मी संमेलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच माझा भाऊ तिथे हजर होता. माझं काव्यवाचन झालं व आम्ही डोंबिवलीतील माझ्या भावाच्या घराकडे निघालो.

हसत खेळत आमची जेवणं झाली तसेच गप्पाही. मामा, मावशी, अगदी जवळचे लांबचे सगळ्या नातेवाईकांविषयी गप्पा झाल्या ” कोण आता कोठे आहे? काय करतंय? सगळी कुशलता, कोणाच्या समस्या गप्पांमधून कळत होत्या. आजकाल एवढा मनमोकळा संवाद माझा कोणाशीच झाला नव्हता. नोकरी, घरकाम, जवाबदार्‍या पार पाडण्यातच वेळ जात होता. कितीतरी दिवसातून आज मनमोकळ्या गप्पा होत होत्या, संवाद साधला जात होता. कारण भाऊही सेवानिवृत्त झाला होता व मी सुद्धा.

” काय करावं माई, मनमोकळं बोलायलाही कोणी हवं असतं ग. आता तर आम्ही दोघंच. मुले त्यांच्या व्यापात, मुलगी सासरी, तर मुलगा नोकरीच्या गावाला. पूर्वी नोकरी व जवाबदार्‍यात वेळ नव्हता. जुजबी संवाद पत्नी व मुलांशी व्हायचा. त्यांना काय हवं, काय नको, ते पुरविलं, पण मनमोकळं, मनसोक्त, स्वच्छंदीपणे आम्ही काही जगू शकलो नाही. निलीमाची नोकरी, मुलांच्या शाळा, इतर अॅक्टिव्हीटीज (activities) मध्ये ते व्यस्त.

अनेकदा मनांतील गोष्टी मनांतच राहिल्या ” मी हळूवारपणे त्याच्या हाताच्या तळव्यावर माझा हात ठेवला. त्या स्पर्शातच त्याला खूप काही जाणवलं, तो मंदसा हसला.

” चल माई, आपण चहा घेऊया का अर्धा अर्धा कप “.

” होय, घेऊया की. मी बनविते चहा “

“ ए, नाही हं, मलाही बनविता येतो छानपैकी चहा “

सायंकाळी त्याचा निरोप घेऊन मी परतीच्या प्रवासाला लागले, अंतःर्मुख होऊनच. खरंच आज प्रत्येक घराची हीच कहाणी आहे. विभक्त कुटुंबपध्दती राजा राणीचा संसार, चौकोनी कुटुंब, अर्थार्जनासाठी धाव धाव धावायचं, मुलांना पाळणाघरात ठेवायचं, त्यामुळे मुलेही दुर्मुखलेली, आईबाबा कामावर, शाळेतून मुलांनी यायचं, स्वतःच घराचं कुलूप काढायचं, आईने केलेला स्वयंपाक स्वतःच वाढून घ्यायचा. होमवर्क करायचा. ही आजची जीवनपध्दती.

शाळा सुटल्यावर मस्तपैकी हुंदडत यायचं, घरात आजी आजोबा आहेत, ” आलाग बाई माझा बाळ ” म्हणत स्वागत व्हावं, लाडे लाडे त्यांच्या गळ्यात पडावं, आजीने कपडे बदलून द्यावे, जेवण गरम करून वाढावं “मुलांची ही स्वप्ने, स्वप्नेच राहातात कारण घरात आजी आजोबा नसतात. त्यांची रवानगी वृृध्दाश्रमात झालेली असते. वृृध्दाश्रमात ते कुटुंब सुखाला तरसतात तर इकडे नातवंडे दुर्मुखलेली राहातात.

पूर्वीच्याकाळी लग्न समारंभही चार /पाच दिवस चालायचे. चार मांड्यांची हळद, सात मांड्यांची हळद राहायची. सगळे नातेवाईक गणगोत जमायचे, सगळ्यांच्या भेटीगाठी व्हायच्या, मनं मोकळी व्हायची व सर्वात महत्वाचे प्रेमभावना वाढीस लागायची.

आजची लग्ने चार तासात उरकावी लागतात. कारण तासांनीच मॅरेज हाॅल भाड्याने मिळतात. सगळं काही आज रेडीमेड मिळतं. अगदी आगत स्वागताला माणसे देखिल. पूर्वीच्या लग्नांमध्ये अगदी रुखवताच्या सामानापासून, लाडू, वडे, कुरडई, पापड सगळी कामे समूहातून केली जात होती. हळद, बिदाई, मेहंदी, बांगड्या (चूडा) समारंभासाठी आळीतील सगळ्या स्त्रिया एकत्रित होत असत. आज मात्र तसे नाही. ” केव्हा एकदाचे लग्न लागते व आॅफीस गाठता येईल” हीच सगळ्यांची धावपळ. या धावपळीत मुक्तपणे संवाद होऊच शकत नाही. सगळी च औपचारीकता.

लग्नसमारंभाला न येऊ शकलेली माणसे whats app वरून शुभाशिर्वाद देऊन मोकळी होतात व न येऊ शकल्यामुळे माफी मागितली कि झाले काम.

दुपारच्या वेळी गृहिणी निवांत बसली आहे व चार मैत्रिणी आल्यात असे होतच नाही आजकाल. कारण प्रत्येकजण दुपारच्या मालिका पाहाण्यात गर्क.

किंवा whats app वर बिझी. मग कसा झडणार हो संवाद.?

दुपारी किंवा रात्री सगळा परीवार एकत्रितपणे जेवायला बसलाय असेही घडत नाही दिवसा नोकरी व्यवसाय व मुलांच्या शाळांमुळे ते शक्य होत नाही, पण रात्री ते ही जमत नाही. पतीराजांना महत्वाची मिटींग असते. कधी फाॅरेन डेलिगेटस् आलेलै असतात मम्मीच्याही कधी पार्टीज असतात. मुले मित्रांसमवेत मौजमजा करतात. मग एकमेकांमध्ये संवाद होणार तरी कसा?

पार्टी, मित्रता, whats app, face book, twitter, यावरून संवाद तर झडतो, पण ऐनवेळी, अडी अडचणीत ही माणसे उपयोगाला येतात काय हो? मुळीच नाही. कारण त्यात प्रेम,  आपुलकी, जिव्हाळा कोठून आणणार हो? तो तर अंतःप्रेरणेतून यायला हवा.

“कालाय तस्मै नमः” आजचे बदलते युग, बदल हा होणारच. तो अपेक्षितही आहे. पण यारोबरच प्रेम, जिव्हाळाही जपावा. कुटुंबातही स्वतःसाठी तर आपण जगतोच, इतरांसाठीही जगावं त्यांच्या समस्या, अडी अडचणींवर मार्ग काढावा. संवाद आपोआपच बोलका होईल. मुका तरी राहणार नाही. पशु पक्षीही आपसात बोलतात, आनंदगाणी गातात, मग आपण का नाही? बघा, विचार करा, उत्तर तुम्हांला गवसेल. कृती तुम्हांला आनंद देईल “ 

जयहिंद, जय महाराष्ट्र

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): इतिहास आणि वर्तमान” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): इतिहास आणि वर्तमान ” ☆ श्री जगदीश काबरे ☆

’AI मुळे मनुष्यबळ घटना असा ॲमेझॉनच्या मुख्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना इशारा दिलेला आहे. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे कंपनीच्या मनुष्यबळात मोठी घट होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नवीन कृत्रिम तंत्रज्ञान शिकून घ्यावे असा इशारासुद्धा त्यांनी दिला. ’ नुकतीच ही बातमी वर्तमानपत्रात आपण वाचली असेलच. ही बातमी वाचल्यावर अनेक संगणक कर्मचाऱ्यांचे धावे दणाणले. यानिमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास आणि वर्तमान जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि AI नेमके कसे कार्य करते हेही समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

21व्या शतकाच्या सुरुवातीला तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग एवढा वाढला आहे की त्याने सर्व क्षेत्रांत क्रांती घडवून आणली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिगत्ता (Artificial Intelligence – AI) हे सर्वात क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण क्षेत्र ठरले आहे. यंत्राने मानवासारखा विचार करणे, शिकणे, निर्णय घेणे आणि संवाद साधणे यामध्ये आश्चर्यकारकरीत्या अचूकता व स्वायतता निर्माण झाली आहे. AI नवा दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान शोधण्यासाठी कार्यरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशी प्रणाली जी संगणक, रोबोट किंवा अन्य यांत्रिक प्रणालीला मानवाच्या बुद्धिमत्तेसारखे वर्तन करण्याची क्षमता देईल, यामध्ये मशीन लर्निंग (Machine Learning), डीप लर्निंग (Deep Learning), न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग (NLP), रोबोटिक्स, आणि इतर अनेक प्रगतीशील तंत्रज्ञानांचा समावेश होतो, AI ही एक अशी प्रणाली असते जी स्वतः शिकते, समस्येचे विश्लेषण करते, निर्णय घेते आणि समस्यांचे निराकरण करते. या AI चा इतिहास खूपच रंजक आहे

अँलन ट्युरिंग यांनी AI ची सुरुवात मागच्या शतकातील 40-50 च्या दशकात केली. तेव्हा अँलन ट्युरिंग यांनी ‘यंत्र विचार करू शकते काय? ‘ असा प्रश्न विचारला होता. त्यांनी ट्युरिंग चाचणीची कल्पना माडली, जी नंतर मानवी बुद्धिमत्तेच्या मानकावर आधारित तपासणी म्हणून वापरली गेली. त्यावेळी संगणकांमध्ये न्यूरॉन नेटववर्स किंवा मोठ्या डेटा प्रोरोरिंग क्षमतेची कल्पना आली नव्हती, परंतु ट्युरिंग यांनी संगणकाद्वारे विचार शिकण्याची शक्यता मांडली होती.

1956 मध्ये जॉन मॅकार्थी, मार्विन मिनस्की आणि ॲलन नोवेल यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI’ या संकल्पनेला जन्म दिला. त्यांनी डार्टमाऊथ कार्यशाळा आयोजित केली, या कार्यशाळेमध्ये AI ला एक स्वतंत्र शाखा महणून परिभाषित करण्यात आले. येथे संगणक तज्ञांनी कल्पना केली की, संगणक मानवासारखा विचार करू शकतो. या काळात AI संशोधनाची लाट सुरू झाली आणि विविध अल्गोरिदम व प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने काम सुरू झाले,

1980 च्या दशकात संगणकीय शक्तीच्या कमतरतेमुळे आणि न्यूरल नेटवर्क्स आणि अल्गोरिदमच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असलेल्या जटिलतेमुळे AI मध्ये मंदी आली. या काळात Al शीतझोपेची संकल्पना प्रचलित झाली. जेव्हा काही मोठ्या AI प्रकल्पांमध्ये अपयश आले, तेव्हा या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाली. त्याचचरोबर काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक प्रमाणावर माणूस-मशीन संवादाची आवश्यकता होती.

1990 च्या दशकात AI च्या क्षेत्रात दुसरी लाट तज्ञ प्रणालीच्या उगमामुळे आली. या प्रणाली विशेष ज्ञानावर आधारित असत. त्या एका विशिष्ट क्षेत्रात तज्ज्ञांप्रमाणे निर्णय घेत होत्या. MYCIN ही एक अशी प्रणाली होती जी वैद्यकीय निदान करण्यात तज्ज्ञासारखी काम करत होती, पण त्या काळात ही प्रणाली फक्त विशिष्ट क्षेत्रातील माहितीवर आधारित होती म्हणून ती जास्त लवचिक नव्हती.

1990 च्या दशकातच मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या नवनवीन तंत्रज्ञानामुळे AI मध्ये नवे वळण आले. या तंत्रज्ञानामुळे डेटा व अल्गोरिदमवर आधारित निर्णय घेण्याची क्षमता Al प्रणालींमध्ये वाढवली. 2012 नंतर सखोल तटस्थ नेटवर्कचा वापर वाढला आणि संगणकांनी अनुत्पादक कामे, आवाज ओळख, चेहरा ओळख, भाषांतर यांसारख्या जटील कार्याचा नवा स्तर गाठला.

Al ची मुख्य तांत्रिक पायाभूत तत्त्वे अशी आहेत…

विदा (Data): AI प्रणालींच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असलेली मुख्य गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर विदा उपलब्ध असणे. AI ला शिकवण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी विविध प्रकारे संकलित केलेली विदा आवश्यक आहे. Mining चे महत्व खूप वाढले आहे. यामुळे Al ला त्याच्या सर्व कार्यांमध्ये योग्य विदा मिळवणे सोपे झाले आहे.

AI चे काम सुरळीत व्हावे म्हणून सर्वात आधी आपल्याला भरपूर विदा लागते. उदाहरणार्थ, जर आपण एका संगणकाला ‘फळ ओळखा’ शिकवायचं असेल, तर आपण त्याला वेगवेगळ्या सफरचंद, केळी, संत्री यांचे फोटो (आणि योग्य लेबले–म्हणजे“हे सफरचंद आहे) दाखवतो. पण कच्च्या डेटामध्ये चुकीची, अर्धवट किंवा अचूक नसलेली माहिती असू शकते. त्यामुळे आपण ती स्वच्छ करतो. म्हणजे असे की हरवलेली माहिती भरून काढणे, चित्रांना एकाच आकारात बदलणे, किंवा आकड्यांना मानक स्वरूपात आणणे, इ. मग मशीनला योग्य माहितीवर लक्ष केंद्रित करता यावं म्हणून त्या वस्तूची वैशिष्ट्ये स्पष्ट करतो. उदाहरणार्थ, फळांच्या ओळखीकरिता रंग, आकार, वजन, पोत अशी वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरतात. त्यासाठी एक निश्चित मॉडेल ठरवावे लागते. हे मॉडेल म्हणजे एक गणिती संरचना असते जी डेटा पाहून नियम (पॅटर्न) शिकते. कोणते मॉडेल वापरायचे आहे हे समस्या कशा स्वरूपाची आहे त्यावर अवलंबून असतं. हे मशीन लर्निंगमधलं “शिकवण्याचं” खरं काम आहे. मशीन आपल्याला दिलेल्या डेटावरून काय काय नियम असू शकतात ते शिकतं. उदाहरणार्थ, मशीन अनेक सफरचंदांचे फोटो पाहून शिकते की, “जर लालसर व गोलसर असेल तर बहुधा सफरचंद. ” शिकताना मशीन “पॅटर्न” शोधते आणि स्वतःच काही नियम बदलते. मग मॉडेल योग्य प्रकारे शिकले की नाही ते तपासण्यासाठी नवीन डेटा वापरून पाहते. ते अचूक अंदाज लावतं का हे पाहीले जाते. चुकीचे अंदाज लागत असतील तर पुन्हा प्रशिक्षण किंवा सुधारणा केली जाते. शेवटी हे तयार मॉडेल प्रत्यक्ष वापरासाठी दिलं जातं. उदाहरणार्थ, तुम्ही मोबाईलमधील ‘फेस अनलॉक’ वापरता तेव्हा मशीन लर्निंग मॉडेल तुमचं चेहरा ओळखतं. कारण आधी ते अशाच डेटावर शिकलेलं आहे.

गणनशक्ती (Computing Power): AI चे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करण्याची क्षमता राखणाऱ्या मशीनवर आधारित आहे. प्रचंड डेटावर आधारित मशीन लर्निंग, डीप लर्निंगचे मॉडेल्स तयार करण्यासाठी GPU (Graphics Processing Units) आणि TPU (Tensor Processing Units) सारख्या उच्च कार्यक्षमतेच्या चिप्सचा वापर केला जातो. यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेतील वेग वाढला आहे.

अल्गोरिदम (Algorithms): मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगचे कार्य खूप प्रभावी अल्गोरिदमवर आधारित आहे. बॅकप्रॉपगेशन, यादृच्छिक जंगल, सपोर्ट वेक्टर मशीन (SVM) —हा एक प्रकारचा पर्यवेक्षित शिक्षण अल्गोरिथम आहे, जो मशीन लर्निंगमध्ये वर्गीकरण सोडवण्यासाठी वापरला जातो, रीइन्फोर्समेंट लर्निंग या प्रकारच्या अल्गोरिदमने AI ची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. मशीन लर्निंग हे म्हणजे एकप्रकारे विदेपासून अनुभव घेणं आहे. माणूस जसा अनुभवातून शिकतो तसे मशीन विदा पाहून नियम शिकते, आणि नंतर त्याचा वापर करून निर्णय घेते. त्यामुळे, जितकी जास्त विदा आणि चांगली प्रणाली, तितकं मशीन लर्निंग प्रभावी ठरतं.

मानवी संशोधन व सहकार्य: मुक्त स्त्रोत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आणि विविध शास्त्रज्ञांचा सहकार्यामुळे AI मध्ये प्रगती होऊ शकली आहे. Python, TensorFlow, PyTorch सारख्या मुक्त स्त्रोत चौकटीच्या मदतीने AI शोध आणखी वेगवान झाले आहेत.

आता आपण पाहूया आधुनिक AI चा वापर कुठे आणि कसा होतो तसेच त्याचे परिणाम काय होत होतील?

भाषाविज्ञान (Natural Language Processing): भाषांतर, भाषेचे स्वरूप ओळखणे, पाठ वाचन, संवाद साधणे या सर्व कार्यासाठी AI चा वापर सुरू झाला आहे. गुगल ट्रान्सलेटर, चॅटGPT सारखे चॅटबॉट्स ही त्याची आपल्याला परिचित असलेली उदाहरणे आहेत. AI ला विविध भाषांमधील भाषांतर करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी शिकवले गेले आहे.

दृश्य विश्लेषण (Computer Vision): चेहरा ओळखणे, वस्तू ओळखणे, दृश्य माध्यमातील विश्लेषण करण्यासाठी AI वापरला जाते. स्वयंचलित वाहने (Autonomous Vehicles), आणि चेहरा ओळख प्रणाली यासाठी AI प्रणाली उपयोगात आणल्या जातात.

आरोग्य व औद्योगिक क्षेत्र: AI च्या मदतीने आरोग्य क्षेत्रात रोग निदान, वैद्यकीय प्रतिमा विश्लेषण, टेलिमेडिसिन आणि औद्योगिक क्षेत्रात स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादन प्रक्रियांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. भारतात ई-संजीवनीसारख्या प्लॅटफॉर्मवर AI चा वापर केला जातो.

भारत सरकारच्या ‘सगळ्यांसाठी Al’ धोरणामुळे देशात AI चा वापर विविध क्षेत्रांत होऊ लागला आहे. नीती आयोगच्या Al रोड मॅपवर आधारित कृषी तंत्रज्ञानामध्ये, शिक्षण व आरोग्य क्षेत्रांमध्ये AI च्या मदतीने प्रगती साधता येते. भारत सरकारने “भाषिनी” प्रकल्पाची घोषणा केली आहे. त्याद्वारे विविध भारतीय भाषांमध्ये AI आचारित भाषांतर केले जाईल.

असे असले तरी याचा काही लोक गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे AI ने नैतिक, कायदेशीर व सामाजिक आव्हाने निर्माण केलेली आहेत. AI मुळे काही गोष्टींचा धोका आहे. उदा. गोपनीयता, डेटा संरक्षण, विना मानवी हस्तक्षेप निर्णय घेणे. अन्यथा सामाजिक शोषण होण्याची शक्यता असते. बेरोजगारी व डिजिटल दरी (Digital Divide) वाढू शकते आणि यामुळे AI मुळे सामाजिक फटका बसू शकतो. असे असले तरी AI चा भविष्यातील वापर, कृषी, ओद्योगिक, आरोग्य व शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होईल. तथापि, Al च्या नैतिक व सामाजिकदृष्ट्या योग्य वापरासाठी एक नियामक चौकट तयार करणे गरजेचे ठरणार आहे.

थोडक्यात काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता जगभरातील विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणत आहे. भारतासारख्या विकसनशील देशात AI च्या मदतीने सामाजिक, आर्थिक प्रगती आणि जीवनमान सुधारणे शक्य होईल, मात्र, या नव-तंत्रज्ञानाचा वापर विवेक व जबाबदारीने होणे आवश्यक आहे, त्यासाठी सरकार, उद्योग आणि संशोधक या सर्वांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा  ☆ “आपला धर्म आणि संस्कृती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ “आपला धर्म आणि संस्कृती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

आपली खाद्यसंस्कृती हा माझा लेख तुम्ही वाचला आहेत. खाद्य बरोबर संस्कृती हा शब्द मी वापरला आहे.

संस्कृती म्हणजे काय तर..

आपल्या श्रद्धा, मूल्य, ज्ञान रीतीरीवाज, यांनी परिपूर्ण अशी आपली जगण्याची पद्धत.

 ती अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर निर्माण होते. त्याचा सर्वांगीण विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे.

तदनुसार ऋतुमान आणि शरीर शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी हे पदार्थ ठरवले आहेत. दैनंदिन आहारात बदल करून ते पदार्थ केले जातात. ते त्या वेळी आपल्या पोटात जाणे हे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे.

” आरोग्यम् धनसंपदा “

हे कितीतरी वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलेल आहे. निरामय आरोग्यासाठी हा आहार आहे.

आपल्या धर्मात अनेक सणंवारं, व्रतवैकल्य, नेम, प्रथा आहेत. आपला धर्म हा मानसिक, शारीरिक आणि आरोग्य शास्त्र जपणारा असा आहे. त्याची एक चौकट पूर्वजांनी घालून दिलेली आहे.

गंमत अशी आहे की ती चौकट त्रासदायक न वाटता आनंदी कशी होईल याचाही विचार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे लक्षात येते की त्या दिवशी का होईना आपण दुःख बाजूला ठेऊन सण साजरा करतो.

म्हणूनच इतकी शतकें झाली तरी आपला घर्म अबाधित आहे.. आता तर उलट इतरांना त्यापासून प्रेरणा मिळत आहे.

काही सण आपण आपल्या कुटुंबात साजरे करतो शिवाय सार्वजनिक पण करतो. त्यातून एक प्रकारचे समाज प्रबोधन होत आहे. एक लक्षात ठेवायचे की त्यातला मूळ गाभा, त्याचा अर्थ समजून घेऊन आपण विवेकानी सण साजरे केले पाहिजेत.

गाय, वासरू, बैल, नाग, गरुड, यांची पूजा करून आपण सर्वांचा मान राखतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञ असतो. तो कृतीतून व्यक्त करतो.

वनस्पती शास्त्राचा अभ्यास पूर्वजांनी केलेला होता. त्यामुळे दाराशी तुळस लावली जाते. वडाच्या झाडाची पूजा केली जाते. बेलाचे पान देवाला वाहिले जाते. त्यांचे उपयोगी गुण आपल्याला माहीतच आहेत. यातूनच वृक्ष संवर्धन होते. वृक्ष जोपासले जात आहेत.

हळदी कुंकू हे कुटुंब, नातेवाईक आणि त्याच्याबरोबरच समाज एकत्र बांधून ठेवण्यासाठी केलेली सुंदर प्रथा आहे. त्यामुळे आपापसात माया, प्रेम व स्नेहबंध निर्माण होतात. आसपासच्या लोकांच्या ओळखी होतात. वेळप्रसंगी मदतीला हेच लोक धावून येतात. आपला एकोपा वाढवण्यासाठी ही प्रथा आपण चालू ठेऊ. सध्याच्या परिस्थितीत याची फार गरज आहे.

श्लोक, आरत्या, प्रार्थना यामुळे पाठांतराची सवय होते. टाळ आणि घंटा आरती करताना वाजवली तर त्याचा नाद जोश निर्माण करतो. वातावरणात सकारात्मक लहरी उमटतात. घरात अल्हाददायक असे वातावरण तयार होते. ती ऊर्जा आणि शक्ती खरोखर जाणवते.

सहजपणे आपण म्हणतो

” किती छान वाटले आज “

तीच ही अंतरंगाला जाणवणारी शक्ती…

आरती झाली की प्रसाद येतो. प्रसाद आणि नैवेद्य या संकल्पनेमुळे संयम बाळगायला हवा हे लहानपणापासून आपोआप शिकले जाते. आरती नंतर प्रसाद मिळणार हे माहीत असते. त्यामुळे समोर लाडू, पेढे असले तरी लहान मुलं त्याला हात लावत नाहीत.

हेच नकळत होणारे संस्कार आहेत.

खरंतर खूप गोष्टींबद्दल लिहिता येईल. पण लेख मोठा होईल म्हणून लिहीत नाही.

तुम्ही सुज्ञ आहात.. तुमचा तुम्ही विचार करून समजून घेताल हे मला माहित आहे.

असा हा पावित्र्य, मांगल्य जपणारा आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आपण होईल तितका जतन करू.

त्याचे महत्त्व पुढच्या पिढीला सांगू.

☆

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या… – भाग – ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या… – भाग – ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

पहिल्या दोनही लेखानंतर एका वाचकाने प्रश्न उपस्थित केला.

भक्ती, श्रद्धा, विश्वास, शरणागती या सर्वांना काहीच स्थान नाही का? तुम्ही फक्त ज्ञानमार्गाचा विचार केला आहे असे दिसते. पण भक्ती आणि कर्म मार्गाने सुद्धा काही वेळा आपोआप साक्षात्कार झाल्या प्रमाणे प्रमेये उलगडतात.

मुळात प्रश्न असा आहे आपल्याला सत्य हवे आहे की समाधान. भक्ती श्रद्धा विश्वास शरणागती या सर्व मार्गाने समाधान नक्की मिळू शकते.

ईश्वरी भक्तीच्या मार्गाने गेल्यानंतर समाधान मिळवणे हा वेगळा विषय आहे. आपला सध्या मुख्य चर्चेचा विषय आहे की आपल्याला सत्य हवे आहे की समाधान? वरील सर्व मार्ग हे समाधान मिळवण्याचे आत्मशांती मिळवण्याचे. मानसिक संतुलन मिळवण्याचे मार्ग आहेत. मला रामनामाच्या जपाने समाधान मिळते.

शांती मिळते. परंतु मुस्लिम किंवा ख्रिश्चन माणसाला रामनामाच्या जपाने या गोष्टी प्राप्त होतील का?

मी भक्ती मार्गाने जायचे ठरवले तर भक्ती कुणाची करायची म्हणजे समाधान मिळेल? याचे उत्तर मी लहानपणापासून ज्या ईश्वर मार्गावर श्रद्धा ठेवली आहे किंवा श्रद्धा ठेवण्यास मला शिकवले आहे त्याच मार्गाने गेल्यास मला समाधान मिळते. माझे सर्व प्रश्न सुटले आहेत असे सुद्धा मला वाटते. पण ते वाटणे हे खरे आहे का ते भासमान आहे? भासमान सत्य हे ब्रह्म मार्गामध्ये अपेक्षित नाही. चार प्रज्ञा ज्या दुसऱ्या लेखांत वर्णन केल्या आहेत त्या चारही प्रज्ञांच्या सहाय्याने जे उत्तर येते त्याला सत्य म्हणजेच आपली वाटचाल सत्याच्या मार्गाने चालू आहे याची खात्री किंवा याचा पुरावा असे म्हणू शकतो. आता तुम्ही असेही विचाराल की या चारही प्रज्ञा एकाच व्यक्तीच्या ठाई असू शकतील का?

नसतीलही. म्हणूनच जेव्हा एक शास्त्रीय तत्व किंवा गणित किंवा शोध लावला जातो तेव्हा जगातील त्या विषयातील सर्वाधिक ज्ञान असलेले शास्त्रज्ञ साधारणपणे 200 ते 300 असे शास्त्रज्ञ असतात त्यांच्या समुदायापुढे तुम्हाला तुमचे निष्कर्ष मांडायचे असतात. त्यांची उत्तरे समाधानकारक रीतीने म्हणजेच योग्य शास्त्रीय कसोटीवर सिद्ध करून द्यावी लागतात. हे सर्व शास्त्रज्ञ मिळून जे प्रश्न उपस्थित करतात ते चारही प्रज्ञां मधून आलेले प्रश्न असतात. त्यांची उत्तरे जर शास्त्रीय निकषावर योग्य ठरली तर मग ते तत्व किंवा गणित किंवा शोध हा चारही प्रज्ञांच्या निकषावर खरा उतरला आहे असे म्हणता येते. म्हणजेच ब्रह्म मार्गावरचे ते पुढचे पाऊल ठरते. अशा प्रकारची कसोटी लावण्याची तयारी ज्यांची असते त्यांनाच ब्रह्म मार्गावरचे प्रवासी म्हणता येईल. भक्ती, विश्वास, समर्पण या मार्गावर कसोटीला उतरवण्याची पद्धत नसते. शेवटी सत्य हे अनंतावर आहे. म्हणजेच ते कधीही सापडण्यासारखे नाही. जर कोणी मला अंतिम सत्य सापडले आहे असा दावा करत असेल तर तो दावा खोटा किंवा त्याला सापडलेले अंतिम सत्य हे भासमानच असणार हे उघड आहे. सत्य मार्ग आणि समाधान मार्ग हे दोन्ही भिन्न आहेत. मला माझ्या मनाचे समाधान होणे महत्त्वाचे आहे. मला माझ्या मनाची शांती महत्त्वाची आहे. मला आत्मसाक्षात्कार महत्त्वाचा आहे. .

त्यासाठी मला सत्य माहित असणे आवश्यक नाहीच. प्रभू रामचंद्रांनी लहानपणी चंद्र मागितला असताना त्यांना चांदीच्या आरशासारख्या पत्र्यावर चंद्राची प्रतिमा दाखवली आणि त्यांना चंद्र मिळाल्याचा आनंद झाला अशी एक कथा सांगितली जाते. याचाच अर्थ असा की मनाचे समाधान पाहिजे असेल तर भासमान सत्याने सुद्धा ते मिळू शकते. ईश्वराचे दर्शन झाले आणि माझ्या मनातले सगळे प्रश्न संपले असे म्हटले जाते. पण श्रीकृष्णाच्या सहवासात सुद्धा अर्जुनाचे प्रश्न संपले नाही १८ अध्याय सांगून सुद्धा अर्जुनाचे प्रश्न सुटले आहेत असे म्हटले जात नाही. फक्त लढण्यासाठी आवश्यक ते तत्व किंवा आपले कृत्य चुकीचे नाही याचे समाधान त्याला मिळाले. त्यानंतरही त्याला प्रश्न पडले असतील आणि त्यांनी ते श्रीकृष्णांना विचारलेही असतील. भक्ती, समर्पण, श्रद्धा, विश्वास, शरणागती हे सगळे मार्ग हे स्वतःच्या मनातील विचार थांबवण्याचे किंवा प्रश्न संपवण्याचे मार्ग आहेत. माझी श्रद्धा आहे म्हणजे मी प्रश्न विचारायचे नाहीत. माझा पूर्ण विश्वास आहे म्हणजे प्रश्न विचारायचे नाहीत. मी पूर्ण शरणागती किंवा समर्पण केले आहे म्हणजे प्रश्न विचारण्याचा संबंधच येत नाही. या सर्व मार्गांचा संबंध हा सत्यान्वेशी नाही. यात काही चुकीचे नाही. आपल्याला जे समजले आहे तेच आणि तेवढेच सत्य आहे असे समजल्यानंतर पुढे जाण्याचा प्रश्नच येत नाही. एकदा सत्याचे म्हणजेच ब्रह्माचे अनंतत्व स्वीकारले की आपण संपूर्ण समाधानी होऊ शकत नाही. एका विशिष्ट मार्गाने गेल्यानंतर सत्य सापडल्याचे समाधान मिळते ही गोष्ट महत्त्वाची. समाधान मिळवण्यासाठी हे सर्व मार्ग आहेत हे माझ्या वैयक्तिक सुखासाठी किंवा एका विशिष्ट समूहाच्या वैयक्तिक सुखासाठी असू शकतील. हे समाधान मिळवणे किंवा मानसिक शांतता मिळवणे मनातील कोलाहल संपवणे हे सुद्धा महत्त्वाचे नाही असे नाहीच. फक्त त्या मार्गाने गेल्यानंतर सत्य सापडत नाही समाधान मिळते एवढेच.

वाळवंटात मला दूरवर पाणी दिसले मी भरभर चालत पळत धडपडत त्या जागेपर्यंत पोहोचलो परंतु मला पाणी दिसले नाही. मृगजळ म्हणजे काय ते का दिसते ते कसे दिसते हे संशोधनाने वेगवेगळ्या निष्कर्षातून आणि वेग वेगळ्या प्रयोगातून सिद्ध होऊन समजले आहे.

परंतु समजा मला हे माहीत नाही. अशा परिस्थितीत तिथे गेल्यानंतर एखादी व्यक्ती तिथे असेल आणि त्याला मी म्हटले की मी लांबून इथे पाणी पाहिले होते पण येथे पाणी तर दिसत नाही कुठे गेले?

तेव्हा ती व्यक्ती काही गोष्टी अशाही सांगू शकेल तुझ्या मागील जन्मीचे पाप म्हणून ते पाणी गायब झाले आहे. परंतु तू मी सांगतो त्या पूजा अर्चा कर आणि सांगतो त्या मार्गाने जा म्हणजे तुझ्या गतजन्मीची पापे नष्ट होऊन तुला पाणी मिळेल. त्या माणसाने सांगितलेल्या पद्धतीने व मार्गाने मी गेल्यानंतर मला पाण्याची टाकी दिसली. तेथे अनेक माणसांची गर्दी ही दिसली त्यांनी असेच सांगितले की त्या साधू पुरुषाने सांगितलेल्या मार्गाने गेल्यानंतर हमखास पाणी मिळते. आमच्या मागील जन्मीची पापे त्याने धुवून, त्यांनी सांगितलेले जप केले त्यांनी सांगितलेल्या मार्गाच्या पूजाअर्चा केल्या, त्यानंतर आम्हाला हे पाणी मिळाले.

त्यात सत्य काय आहे? त्या जागी खरंच पाणी होते आणि ते गायब झाले होते? त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मृगजळ आहे हे माहीत असल्याने तो तिथे बसला आणि त्याने त्याचे तत्त्वज्ञान तुमच्यागळी उतरवले. त्याने माहित असलेला किंवा त्याने स्वतः भरून ठेवलेला एखादा छोटासा पाण्याचा साठा तुम्हाला दाखवला. तुम्ही त्याचे भक्त झालात.

अशा वेगवेगळ्या मृगजळाच्या जागा हेरून एका ठिकाणी साधू एका ठिकाणी मौलवी एका ठिकाणी पादरी अशा व्यक्ती बसल्या असतील आणि त्यांनी त्यांचे त्यांचे शिष्यगण तयार केले असतील. हे सर्व भासमान सत्याचे भक्त. मी सांगितलेल्या मार्गाने आल्यानंतर तुम्हाला हे पाणी मिळाले माझ्याच मार्गाने पुढे सत्यसागर अर्थात अंतिम सत्य तुम्हाला गवसणार आहे. मी त्या सत्य सागरात न्हाऊन आलो आहे. असे सांगून त्याने लोकांना अधिक भजनी लावले. त्या माणसाच्या मृत्यूनंतरही त्याचे फोटो लावून त्याच्या भक्तांनी टाळकुटत त्याचीच महती गाणे चालूच ठेवले. तरी त्यांना सत्य सापडण्याची शक्यता किंवा सत्याच्या मार्गा वरून एक पाऊल सुद्धा पुढे जाता येणार नाही हे नक्की.

मला काय हवं आहे? सत्यमार्ग की समाधान मार्ग? सत्य मार्गावर फक्त प्रश्न व प्रयत्न त्या प्रयत्नानंतर मिळणाऱ्या यशावर पुन्हा निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरासाठी पुन्हा प्रयत्न असा हा न संपणारा अनंताचा मार्ग आहे.

शेवटी सत्य हे ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजेच अनंताच्या ठिकाणी आहे आणि जग हे मिथ्या आहे. त्यामुळे मिळणारे समाधान शांती हे सर्व मिथ्या आहे भासमान आहे. म्हणजेच ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या. 

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मीनाच्या घरून बाहेर पडलो तेव्हा मी खूप अस्वस्थ होतो. तारामावशीला भेटायला ठाण्याला जायचं हे आता ठरलंच होतं, पण ‘तिला पॅरॅलिसिसचा माईल्ड अॅटॅक आलाय’ हे मीनाचं वाक्य मनात जसं कांही रूतून बसलं होतं.)

प्रथम ऐकलं तेव्हा त्यातलं गांभीर्य जाणवलं नव्हतं पण रिकाम्या मनात जेव्हा तेच वाक्य ठाण मांडून बसलं तेव्हा मात्र नकारात्मक विचारांनी मन भरून गेलं. मीना आणि तिचा नवरा मावशीच्या आजारपणातलं गांभीर्य जाणीवपूर्वक कमी करत होते कां? सुरुवातीपेक्षा मावशीच्या तब्येतीत सुधारणा जाणवल्यामुळेही असेल कदाचित किंवा मला आत्तापासूनच विनाकारण दडपण नको असंही त्यांना वाटलं असेल, पण ती दोघं परस्परांचा अंदाज घेऊन मोजक्या शब्दांत सगळं व्यक्त करत होते असंच आता वाटत राहिलं. त्यामुळे ठाण्याला जाण्यासाठी मी लोकलमधे चढलो तरी त्या गर्दीतही मी एकटाच होतो. सोबत होती ती फक्त मावशीच्या संदर्भातल्या विचारांचीच.

माझ्याजवळच्या सविस्तर पत्त्यामुळे तिच्या धाकट्या मुलीचा फ्लॅट शोधायला त्रास जाणवलाच नाही. दारावरची बेल वाजवताना मात्र मनात चलबिचल होतीच. सारखं वाटत होतं नेहमीसारखं हसतमुखानं पुढे येत तारामावशीनंच दार उघडावं. माझं हसतमुखाने स्वागत झालं खरं पण ते मावशीनं नव्हतं केलं. दार उघडणाऱ्या तिच्या धाकट्या लेकीनं केलं होतं.

” ये. बैस. तुझीच वाट पहात होते. घर सापडायला त्रास नाही ना झाला? ”

मी सोफ्यावर टेकत असतानाच तिने विचारलं.

” अजिबातच नाही. तुझ्या ताईनं व्यवस्थित पत्ता आणि जवळपासच्या खुणाही लिहून दिल्या होत्या. त्यामुळे सापडलं लगेच. “

” मी आलेच. पाणी घेऊन येते… ” ती लगबगीने आत निघाली. जाताजाताच थांबली…

” तू असं कर. इकडं आत आईजवळच बैस. ये. ती केव्हापासून वाट पहातेय तुझी.. “

” कसं काय? तिला काय माहित? ” मी आश्चर्याने विचारलं.

” अरे, ताईचा फोन आला होता तू येतोयस म्हणून. अंथरूण धरल्यापासून खूप कंटाळलीय अरे ती. म्हणून मग सांगितलं तिला तू येतोस म्हणून. मुद्दाम तुला भेटायला येतोय म्हटलं तेव्हा तर खूश झाली ऐकून. “

“आणि काका कुठे आहेत? बाहेर गेलेत कां? “

” हो. आमचा चहा झाला सगळ्यांचा आणि पाय मोकळे करून येतो म्हणाले. ताईचा फोन आला तेव्हा ते आंघोळीला गेले होते. आणि नंतर आईच्या गडबडीत त्यांना तू येणारायस हे सांगायचं राहूनच गेलं. त्यामुळे तुझं येणं त्यांच्यासाठी मात्र सरप्राईजच असणाराय. खूप आनंद होईल त्यांनाही. ये, इथं या समोरच्या बेडरुममधे आहे बघ आई. तू बैस तिच्याजवळ.. मी पाणी घेऊन येते.. “

इथवर सगळं अगदी मनासारखंच घडलं होतं. आता चांगला तास दीडतास मावशीशी मनसोक्त गप्पा मारायला मिळणार होत्या. मुख्य म्हणजे तिने पाठवलेली दत्ताची मूर्ती मला कशी अचानक, योग्यवेळी मिळाली ते सगळं तिला सविस्तर सांगायचं होतं. तिला ती मूर्ती माझ्यासाठी कधी आणि कां घ्यावीशी वाटली, मुख्य म्हणजे अशी मूर्तीच कां, त्याऐवजी दुसरं कांही कां नाही? .. हे जाणून घ्यायचं होतं. मनातलं हे सगळं मोकळेपणाने बोलून तिला यामागची प्रेरणा नेमकी कशी झाली हे समजून घ्यायचं होतं. या सगळ्यामागचा कार्यकारणभाव जाणून घ्यायचा होता मला खूप दिवसांपासून.. आणि आज तो योग अगदी एका क्षणाच्या अंतरावर उभा होता!!

याच भारावल्या अवस्थेत मी झरकन् आत गेलो. मावशी काॅटवर डोळे मिटून झोपलेली होती. तिला हाक मारून उठवायचं माझ्या अगदी जीवावर आलं. मी तिथे काॅटजवळच्याच एका खुर्चीवर टेकलो. तेवढ्यांत पाण्याचं तांब्याभांडं घेऊन तिची मुलगी आली. तिने ते तांब्याभांडं माझ्या हातात देत जवळचा छोटा टी पाॅय पटकन् माझ्यासमोर आणून ठेवला. ती हळूच तिच्या आईजवळ गेली.

” झोपू दे तिला. नको डिस्टर्ब करू. ” मी म्हंटलं.

“कंटाळा आला कीं अशीच गुंगीत पडून असते. जागीच असेल… ” असं म्हणत तिने अलगद तिच्या कपाळावर हळूवारपणे थोपटलं. मावशीने अलगद डोळे उघडले. प्रश्नार्थक नजरेने आपल्या लेकीकडे पहात राहिली.

” बघितलंस कां कोण आलंय? ” तिने हळूवारपणे विचारलं. मी उठून तिच्याजवळ गेलो. मला पहाताच तिची हताश, निश्चल नजर आनंदाश्चर्याने भरून गेली.

” ओळखलंस कां मला..? ” मी अधिरतेने विचारलं. तिच्या केविलवाण्या चेहऱ्यावर अंधुकसं हसू तरंगत राहिलं. ती जीवाच्या कराराने अंथरूणावर उठून बसायची धडपड करू लागली.

” आईs.. , नाहीss नको. अजून बसता येणार नाहीय तुला, हो कीं नाही..? हे बघ, तोच इथं बसतोय तुझ्याजवळ. बोलतोय तुझ्याशी… ” म्हणत ती बाजूला झाली. ” तू.. तू इथं बैस तिच्याजवळ. बोल तिच्याशी… “

मी तिच्याजवळ टेकलो. तिचा निस्तेज, कृश हात हळूच हातात घेऊन तिला थोपटत राहिलो. ती अनिमिष नजरेने माझ्याकडे पहात राहिली.

” मी.. मी.. मुद्दाम तुला भेटायला.. तुझ्याशी गप्पा मारायला आलोय मावशी… ” मी म्हणालो. ते तिच्यापर्यंत नेमकं पोचल्यासारखं ती कसनुसं हसली. ओळखीचा ओझरता स्पर्श तिच्या नजरेत तरळून गेला. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कांहीशा थरथरल्या. आपला उजवा हात कष्टपूर्वक पुढे करीत तिने माझा हात अलगद हातात घेतला आणि अचानक तिचे भरून आलेले डोळे पाझरु लागले.

“अ.. अ.. ळ.. ख.. लं.. तू.. तू.. ”

भरभरून बरंच कांही बोलण्याच्या असोशीने ती कासावीस होत राहिली. पण तिच्या बोबड्या, केविलवाण्या अगतिकतेत ते सगळं व्यक्त न होताच विरून गेलं.

” एs.. तू आतच येतोस कां थोडा वेळ? तुझं खाणं होईपर्यंत बाबा येतीलच. ते आले कीं चहा करते… “

खरंतर मावशीची केविलवाणी अवस्था बघून कांही खाण्यापिण्याची भावना नाहीशीच झाली होती. मला जे हवं ते हातून निसटूनच गेलंय हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं. आता जे कांही खाणं, बसणं, बोलणं असेल ते सगळं उपचारापुरतंच होत रहाणार होतं हेही नाईलाजाने मी स्वीकारलं न् आत जाण्यासाठी उठू लागणार एवढ्यांत बाहेरून आलेल्या काकांनी आत डोकावून पाहिलं आणि मला बघताच थबकले.

” अरे… तू? असा अचानक..? ” ते आश्चर्याने म्हणाले. त्यांना झालेला आनंद मला थोडी उभारी देऊन गेला. मग खाणं, गप्पा, चहा यात विषय एकच होता तो म्हणजे तारामावशी आणि तिचं अचानक उद्भवलेलं आजारपण!

” ही आजारी आहे हे तुला कसं समजलं? नाही म्हणजे तू मुद्दाम धावपळ करून आवर्जून तिला भेटायला आलायस म्हणून विचारलं रे… ” ते सहजच म्हणाले.

“खरं सांगू कां? मी तिलाच भेटायला मुंबईला आलो होतो. ती आजारी आहे हे मी आल्यानंतर मला समजलं… “

ते अविश्वासाने माझ्याकडे पहातच राहिले.

” तिची ही अगतिक अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतंय. तिच्याशी न बोलताच परत जाणं हे खूप क्लेशकारक आहे माझ्यासाठी… ” माझा आवाज भरून आला तसा मी आवंढा गिळला. आता मन मोकळं केल्याशिवाय मलाच चैन पडणं शक्य नव्हतं आणि त्यासाठी भिडेकाका हीच एकमेव योग्य व्यक्ती आहे असं मला वाटलं. मी त्यांना विश्वासात घेऊन माझ्या येण्याचं नेमकं प्रयोजन उत्स्फूर्तपणे सांगून टाकलं.

” पण आता मावशीकडून या कशाचं नेमकं उत्तर मला मिळणं शक्यच नाही. अर्थात तिच्या या आकस्मिक आजारपणामुळे आपणा सर्वांनाच झालेल्या दुःखापुढे माझं हे दुःख कांहीच नाहीय. तरीही काहीतरी हरवल्याची रूखरूख मात्र माझ्या मनात रहाणारंच. “

ऐकून काकाही कांहीसे अस्वस्थ झाले..

” थांब, मी बोलतो तिच्याशी. सांगतो तिला सगळं. ती जे, जसं सांगेल, मला समजेल नक्कीच.. ” असं म्हणत ते उठलेच. आत गेले. पाठोपाठ मी. तिच्याजवळ बसून तिला समजेल अशा पद्धतीने ते सगळं तिला सांगत, विचारत राहिले. ऐकता ऐकता मावशीने माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत एक वेगळीच चमक होती. मग खूणेनेच तिने मला जवळ बोलावलं. मनात साठलेलं सगळं ती असोशीने मला सांगायचा, व्यक्त करायचा प्रयत्न करत राहिली. तिचं ते विचित्र आवाजातलं सांगणं शब्दरूप घेईनाच. तिची कासावीशी माझ्याच सहनशक्तीच्या पलीकडची होती. मी शांतपणे, तिला कळतील अशा खूणा करीत सगळं मला समजल्याचं तिला खोटंच सांगून टाकलं. ऐकून तिचेही डोळे समाधानानं हसले. काका आश्चर्याने माझ्याकडे पहातच राहिले.

“काका, तिच्याकडून सगळं जाणून घ्यायचा अट्टाहास आता नको करायला. तिला त्रास होतोय त्याचा खूप.. ” मी म्हटलं. त्यांनाही ते पटलं. मी त्या तिघांचा निरोप घेतला. काकांना नमस्कार करून जायला वळलो तेवढ्यांत काकांनी हाक मारून मला थांबवलं.

” तुझं पूर्ण समाधान होईल का नाही माहित नाही पण मला जे माहित आहे तेवढं तरी मी नक्कीच सांगू शकतो. ” ते म्हणाले. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पहातच राहिलो. ते आता काय बोलणार याची उत्सुकता होतीच.

“तीन वर्षापूर्वींची गोष्ट आहे. आम्ही संगमेश्वरला नेहमीप्रमाणे यात्रेला गेलो होतो. तिथे दर्शन घेऊन गर्दीतून कशीबशी वाट काढत घरी परतत असताना हिने मला थांबवलं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका हातगाडीकडे निर्देश करीत तिने मला बोलावलं. स्वत: लगबगीने पुढे गेली. त्या गाडीवर विकायला ठेवलेल्या खेळणी, देवांचे फोटो, मूर्ती यांच्या गर्दीत तिला नेमकी ती दत्तमूर्ती कशी दिसली ते तीच जाणे.

‘ किती छान आहे ना ही मूर्ती? मला घ्यायचीय. ‘ ती म्हणाली. मला तिचा थोडा रागच आला.

“अगं कशाला? घरी देव कमी आहेत का आपल्या? त्यात आणि ही मूर्ती ठेवणारायस कुठं? ” मी म्हणालो.

‘मला माझ्यासाठी नकोच आहे. अरविंदासाठी घ्यायचीय. माझ्या आजारपणात आपण त्याच्या घरी राहिलो होतो तेव्हा बघितलंयत ना तुम्ही? रोजच्या धावपळीतही नियमित गुरुचरित्र वाचन असायचं त्याचं. त्याला खूप दिवसापासून कांहीतरी द्यायचं मनात आहे हो माझ्या. योग येईल तेव्हा तेही देईन. पण ही मूर्ती पाहिली आणि त्याची आठवण झाली बघा. त्याला नक्की आवडेल ही. घेऊया? .. ‘ ती म्हणाली. तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर त्या मूर्तीकडे पहाण्याची माझी नजरच बदलली. अतिशय तजेलदार रंगांनी रंगवलेली, धातूची ती छोटीशी सुबक मूर्ती मलाही खूप आवडली. जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा तुला ती द्यायची असं ठरवून घेतलेली ती मूर्ती पुढं जवळजवळ तीन वर्षं तिने जपून ठेवलेली होती. नुकतीच तुझी आई मुंबईत असताना आवर्जून आम्हाला भेटायला आली, तेव्हा हिने आठवणीने ती तुझ्या आईकडे तुला देण्यासाठी दिली होती. तिला हीच मूर्ती कां घ्यावीशी वाटली याचं नेमकं उत्तर तिच्याकडेही नसेल कदाचित. ही सगळी त्या परमेश्वराचीच इच्छा म्हणायचं. त्यातून तुला जे समाधान मिळालं ते अतिशय मोलाचं आहेच. पण आज तू इथं येऊन तुझ्याही नकळत जे समाधान आम्हा दोघांना दिलंयस तेही तितकंच आनंददायी आहे आमच्यासाठी!”

“मी..? मी कसलं समाधान दिलंय? “

“तुला हवं ते योग्य वेळी तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दत्त महाराजांनी तुझ्या मावशीची निवड केली होती हे तू आलास म्हणूनच आम्हाला समजलं ना? यापेक्षा तिच्या न् माझ्यासाठी अधिक अपूर्वाईचं दुसरं काय असणार? ” ते मनापासून म्हणाले.

मघाशी निघतानाची माझ्या मनात निर्माण झालेली कांहीतरी निसटून गेल्याची भावना माझ्याही नकळत विरून गेली होती. कितीतरी प्रश्न मनात अजूनही अनुत्तरीत असतानासुद्धा अतिशय मोलाचं असं खूप कांही गवसल्याची भावनाच माझ्या मनात भरून राहिलेली होती…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares