मराठी साहित्य – विविधा ☆ “सगळ्याच पातळ्यांवर आपण तळ गाठणार आहोत का?” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “सगळ्याच पातळ्यांवर आपण तळ गाठणार आहोत का?” ☆ सुश्री शीला पतकी 

काळ बदलतोय.. काळ बदलतोय.. काळाची गती वाढली आहे… काळाबरोबर आपण चालल पाहिजे.. ही सगळी वाक्य मागची पिढी ऐकते आहे आणि वाटतंय ह्या काळाच्या वेगाबरोबर आपल्याला धावता येणार नाही पण प्रयत्न तर करायलाच पाहिजे आणि ते करताना या काळाची चाहूल घेतो की चाललय काय? .. तर सर्वच क्षेत्रांमध्ये खाली येणे सुरू आहे….!

कौटुंबिक क्षेत्रात तेच घडले आहे संवाद उरला नाही माणसं एकत्र राहत नाहीत म्हणजे एकत्र असलेली चार माणसही (भली मोठी कुटुंब एकत्र असलेली संपली आहे त्याचा उल्लेख मी करत नाही)एकमेकांशी बोलत नाहीत प्रत्येकाजवळ घराच्या कुलपाची चावी आहे ज्याच्या त्याच्या सवडीने घरामध्ये जो तो प्रवेश करतो घरातला रांधण कमी आणि बाहेरून मागवणं खूप झाले आहे आणि तेच मुलांना आवडते त्याचे धोके अनेकदा दिसतय पण आधुनिकतेची झापडं लावलेल्या आपल्याला ती दिसत नाहीत. अनेक मोठ्या नावावरती घरी येणारे अन्न हे वाईट टाकावू पदार्थापासून बनवणल्याचे लक्षात आले आहे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले प्रत्येक धोके माध्यमाने दाखवले आहेत. घरची वाळवणं, साठवणं, हे तर संपलेच आहे पण आरोग्य त्याचे काय? आरोग्य चांगले राहावे म्हणून वर्कआउट करणे व्यायाम करणे गाजर काकडी बीट खाणे, फ्रुट्स खाणे, कमीत कमी जेवण घेणे हे सर्व चालू आहे पण ही फॅशन आहे पुरेसा योग्य आहार नसल्यामुळे टिकाऊ पिढी तयार नाही हे अर्थात माझे मत आहे…!!!!

कपड्यांच्या बाबतीतही तेच आहे. फाटक्या कपड्यांना ऐश्वर्य आले आहे. कमी कपड्यांना सौंदर्य म्हटले जात….. आणी खूप खूप काही..!

मनोरंजनाच्या बाबतीत तेच आहे चित्रपटांना कथा नाहीत, उद्दिष्ट नाही, प्रबोधन नाही, गाण्यांना अर्थ नाही, संगीत कर्कश्य आहे, आवाजातली मधुरता असूनही वापरली जात नाही. काही मराठी नाटकं सोडली तर अनेक ठिकाणी चांगले विषय नाहीत चित्रपटांचे तेच आहे पण अगदी छोट्या प्रमाणावरती नवनवीन प्रयोग मात्र चांगले केले जातात उदा. अभिवाचन, एखाद्या कवीच्या कवितांचे गायन वाचन हे कार्यक्रम दर्जेदार आहेतच पण त्याबरोबर स्टँड अप कॉमेडी नावाखाली जे काही अचकट विचकट चालले आहे ते न बघवणारे न ऐकवणारे आहे. एका कार्यक्रमाचे नाव पहिले ‘हलकट ‘हेच जर कार्यक्रमाचे नावाचे तर किती अवघड आहे ना? कॉमेडी करणारा मुलगा सरळ म्हणाला…. अगदी स्टेजवरून पब्लिकमध्ये संवाद साधताना व ब्रेकप बद्दल बोलतोय आणि मुलीला म्हणतो पाळीच्या वेळेला येऊन सांग आणि अख्खे थेटर त्याच्यावर हसतय… फार वाईट वाटलं. तरुण हे सादर करत असतील आणि तरुणांनाही आवडत असेल तर मग आपण कुठे जाणार आहोत? विनोदाबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की विनोद अश्लील किंवा वाईट नसतो त्याचे नातेवाईक वाईट असतात म्हणजेच चिल्लर विनोद पण आता त्याच नातेवाईकान सुळसुळाट माजवला आहे! चांगल्या उत्तम मराठी वाहिनी वरचे शो हे अश्लीलते कडे जाणारे आहेत लोकांना बोलवून त्यांची खेचाखेची करणारे आहेत. हास्य जत्रा नावाच्या कार्यक्रमात परवा खूप वाईट विनोद झाला जरा बरा वाटणारा कार्यक्रम होता पण… उघडे बाबांना बघायला नागडे जाऊ… या वाक्याने कार्यक्रमाचा स्तर खाली येऊ लागला हे लक्षात आले.

शिक्षण शिक्षण क्षेत्रात असेच आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. रिझर्वेशन मुळे येणाऱ्या प्रमुखाला कदाचित व्यवस्थापनाचे ज्ञान नसते आणि मग शाळा आणि त्याचे व्यवस्थापन ढासळायला सुरुवात होते शिक्षक चांगलेच असतात काम करून घेणार हुशार हवा चांगल्या अभ्यासू मुख्याध्यापकाच्या अभावी काही शाळा गळती लागल्यासारख्या झाल्या आहेत. ग्रामीण भागातून मात्र हे चित्र खूप चांगले आहे तिथे अनेक उत्तम प्रयोग करणारे शिक्षक आढळतात तेवढे समाधान वाटते.

बाकी सरकारी कामकाज राजकारण याबाबत काय आणि किती बोलावे? धाकटे शहाणे झाले आणि फुकट्याच राजकारण आले. अशी अवस्था आहे भ्रष्टाचारात तर न्यायालय सुद्धा मागे नाही मग न्याय कोणाकडे मागावा पक्ष बदलू लबाडांच्या टोळ्या तयार झाल्यात आणि त्या नवनविन नावाने सरकारं तयार करीत आहेत आणि पाच वर्ष काय तर एकमेकांना अश्लील शब्दात शिव्या देणे वाटेल ते बोलणे म्हणजे मला एकाने विचारले आपल्या वेळेला माझा आदर्श नेता हा निबंध होता आता कुणावर लिहावे? मी म्हणलं नाही आता असा निबंध येतच नाही ते काय वेडे आहेत का? असले निबंध द्यायला…. अशी मजा आहे मी मुख्यमंत्री झालो तर या निबंधाचे पहिल वाक्य असेल अनेकांची युती केलेली माझे सरकार मी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करेन आहे की नाही गंमत! … वर्तमानपत्र किंवा मीडिया, माध्यम आपली जबाबदारी विसरून कोणाच्यातरी खुंट्याला बांधले गेले आहेत मग त्याचीच भलावण करतात नागरिकांचे प्रश्न मांडणे हे त्यांच्या गावीही नाही नकारात्मक बातम्या… सकारात्मक घडते पण दिसत नाही कारण त्याला प्रसिद्धी नाही. ते म्हणतात ना खोट्याला हजार पाय आहेत आणि सत्य पांगळे करून टाकले आहे तशी गत झाली आहे…. देशभक्ती हा विषय शाळेत नाही आता उदाहरण तरी कोणाचे द्यावेत आम्ही शाळेत शिकत असताना देशभक्तीपर कविता असे थोरांची चरित्र असत. बाबू गेनू देशासाठी कसा मेला.. नंदुरबारचा शिरीष कुमारचा धडा अंगात स्फुरण देऊन गेला. “पुर्खोंसे चला आई यही हमारी परीपाठी है प्राण दिया है मगर नही दि कभी देश की माटी है! “या सारखी गाणी आता मुलांच्या ओठावर नाहीत हे दुर्दैव आहे हे सारे पाहून वाटते आपण तळ गाठायला चाललोत का? तुम्हाला काय वाटतय…?

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अपेक्षा… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

सौ. ज्योती विलास जोशी

? विविधा ?

☆ अपेक्षा… ☆ सौ. ज्योती विलास जोशी 

अपेक्षाभंग झाला की विनोद घडतो, अपेक्षाभंग आश्चर्यही घडवतो आणि हाच अपेक्षाभंग दुःखाचं मूळ आहे. अपेक्षा छोटीशी, खूप मोठी, किमान, वाजवी अशा अनेक प्रकारची.. किती वेगवेगळी रूप आहेत अपेक्षेची. अपेक्षांच माध्यम विचारच आहेत त्या विचारांची पोत सुधारली पाहिजे. जेणेकरून मन शांत, सुरक्षित भयरहित आणि निरोगी राहील. नाहीतर मात्र अपेक्षा ही मनशांतीच्या वाटेवरची अडसरच ठरते…..

अपेक्षा करायच्याच नाहीत का मग? लहान असताना हीच अपेक्षा रडण्याचे शस्त्र वापरून पूर्ण करून घेता येते. छोटी अपेक्षा बघता बघता विशाल रूप धारण करते…. हटवादी होऊ लागते… आणि मग त्याखाली सुखाचे क्षण, कृतज्ञता, जिव्हाळा, नाती, परिपक्वता सृजनशीलता गाडले जातात. या अपेक्षांना जेव्हा तडा जातो तेव्हा दुःख शेजारी येऊन बसतं. अपेक्षा भंगाचा डोंगर म्हणजेच हे दुःख… त्यामुळं सतत मनात येणारे नकारात्मक विचार मनावर इतके हावी व्हायला लागतात की सकारात्मक विचारांना शोधण्याचा विचारही मन करू शकत नाही. मनपाखरू खट्टू होतं, आजारी पडतं… शरीर नियंत्रित करणार्या ह्या मनातील बिघाड शरीरावर प्रतिबिंबित होतो पर्यायाने शरीरही थकतं.

हीच अपेक्षा अहंकाराचं देखील मूळ आहे. कधी एखाद्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली, कधी आपली दुसऱ्याकडून असलेली अशी ही अपेक्षा! ह्या अपेक्षांना मात्र एक मर्यादा हवी… फुग्याला त्याच्या क्षमते बाहेर फुगवलं तर तो जसा फुटतो तसा या वाजवी अपेक्षांचा फुगा फुटला तर नैराश्याची हवा आसमंत व्यापते. अपेक्षांच्या ओझ्याखाली मन दबलं जाऊ लागतं आणि प्रश्नाचे उत्तर न सापडल्याने चिडचिड वाढते.

अपेक्षा करणं हा मनुष्य स्वभाव धर्म आहे.

आई वडिलांची मुलाकडून, सासूची सुनेकडून, गुरुची शिष्याकडून अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या अपेक्षांना हक्काची एक झालर आहे. त्या गृहीत धरल्या जातात. आपण आपल्या बद्दल ठेवलेल्या अपेक्षांशी जर मैत्री केली तर नकळतच अपेक्षा आणि आपलं मन यांच्या सुसंवाद सुरू होतो आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनातल्या भावभावनांचं व्यवस्थापन करायचा जणू अपेक्षा चंग बांधते.

नात्यात एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, थोडी जास्त जवळीक असण्याची झालेली सवय त्यामुळे आपल्याला आपलंसं केल्याची आपली भावना सुंदर असते पण परिस्थिती नेहमी तशी राहत नाही. अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षा हे या नात्यातला अडसर ठरते.

आपल्या दुसऱ्यांच्या बद्दल असणाऱ्या अपेक्षांबाबत मात्र स्थितप्रज्ञ राहिलेलं बरं! जिथं आपलं मन ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला इथे प्रयत्न करावे लागतात तिथे दुसऱ्या बद्दलच्या अपेक्षांवर आपला अंकुश असू शकत नाही त्यामुळे याबाबतीत अलिप्ततेचे धोरण शहाणपणाचं…..

शेवटी अपेक्षाभंग हे दुःखाचे मूळच! नाही का?

©  सौ ज्योती विलास जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोरे पत्र… ☆ सौ शालिनी जोशी☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ कोरे पत्र… ☆ सौ शालिनी जोशी

चांगदेव पासष्टी वाचली. चांगदेवानी संत ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठवले. त्याचे उत्तर म्हणून संत ज्ञानेश्वरानी त्याच कागदावर ६५ ओव्या लिहून चांगदेवाना पाठविल्या. ६५ ओव्यात केलेला आत्मबोध म्हणून चांगदेव पासष्टी. यावरून पत्र या प्रकाराविषयी मनात कुतुहून निर्माण झाले. पत्र म्हटलं की एक ठराविक साचा डोळ्यासमोर येतो. सुरुवातीला मायना, मध्ये मजकूर व शेवट समारोपाचे शब्द व लिहिणाऱ्याचे नाव किंवा सही. पण येथे तर कोरे पत्र. मला वाटते भारताच्या इतिहासातले हे एकमेव कोरे पत्र असावे. आणि त्याच कागदावर त्याला संत ज्ञानेश्वर उत्तरही पाठवतात. ये हृदयीचे ते हृदय घातले असा हा उपदेश. ‘तत् त्वं असि’. जगातले अक्षर वाङ्मय ठरला. येथे चांगदेवानी कोरे पत्र पाठवून आपली योग्यता सिद्ध केली आहे. कोरेपण म्हणजे रितेपण, स्वच्छपणा, निरहंकारता आणि ज्ञानग्रहण क्षमता. हा पत्रातील नि:शब्द भाव संत ज्ञानेश्वरानी ओळखला आणि म्हणून त्यावर ज्ञानाची अक्षरे उठली.

दुसरे पत्र डोळ्यासमोर येते ते रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवलेले पत्र. श्रीकृष्णाच्या रूपागुणाचे, सामर्थ्याचे, कर्तुत्वाचे वर्णन करणारे आणि श्रीकृष्णांबरोबर विवाहाची तीव्र इच्छा व्यक्त करणारे प्रेमपत्रच हे. रुक्मिणीने सात श्लोकात लिहून एका ब्राह्मण सेवकाबरोबर पाठवूण दिले आणि त्वरीत उत्तराची अपेक्षा ही व्यक्त केली. कारण घरातल्यांनी शिशुपाला बरोबर लग्न ठरवले होते. गडबड सुरू होती. ‘कुठून व कसे माझे हरण करा’ हे कळवणारे मोठ्या चातुर्यांना दिलेले उत्कट श्रीकृष्ण प्रेम व्यक्त करणारे हे पत्र. इतके की श्रीकृष्ण उत्तराच्या फंदात न पडता लगेच सैन्य घेऊन कौडिण्यपूरला निघाले. मोठे युद्ध करून रुक्मिणीचे हरण केले. पुढे विवाह झाला. असे हे कौंडिंण्यपूरहून द्वारकेपर्यंत आलेले पत्र.

आणखी आठवतो तो समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यामधील पत्रव्यवहार. गुरुशिष्यांमधील हा पत्र व्यवहार. ‘ निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ अशी सुरुवात असलेल्या पंधरा ओव्यातील हे पत्र. हे मराठी पत्र साहित्याचे भूषण असेच आहे. शिवाजी महाराजांचा यथार्थ गौरव त्यात समर्थ करतात. राजकर्तव्य, परमार्थ उपदेश आणि हे राज्य ‘श्रीं’ चे आहे ही जाणीवही दिली आहे. स्वराज्याची प्रेरणा दिली.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १६८१ मध्ये संभाजी राजांना हृदय पिळवटून टाकणारे ओवीबद्ध पत्र समर्थांनी लिहिले. ‘उग्र स्थिती सांडावी, सौम्य स्थिती धरावी’, अशा शब्दात शिवरायांकडून प्राप्त झालेल्या श्रेष्ठ वारशाची त्यांना आठवण करून दिली. संभाजी महाराजांच्या वर्तनाने स्वराज्याला हादरा बसणार की काय या घोर चिंतेने व्याकुळ झालेल्या विरागी संताचे ते पत्र. त्यावरून त्यावेळच्या खरा इतिहास कळतो.

अशाप्रकारे पत्र हा एक वाङ्मय प्रकार आहे. त्यात वैविध्य आहे मुख्यत: याचे दोन प्रकार दिसतात, औपचारिक व अनौपचारिक. औपचारिक म्हणजे संस्थात्मक, कार्यालयीन कामकाजाविषयी, ठराविक पद्धतीने लिहिलेली आणि अनौपचारिक ही घरगुती, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, जवळच्या संबंधितांना लिहिलेली. अनौपचारिक पत्रे प्रेम आणि भावना व्यक्त करतात. पत्र हे संदेश कळविण्याचं एकमेव साधन त्यांकाळी होते.

इंग्रजांच्या काळात भारतात पत्र वाटण्याची पोस्टाची सुनियोजित पद्धत सुरू झाली. तीच सध्या ही प्रचलित आहे. यापूर्वी माणसांबरोबर तर कधी घोडेस्वारांबरोबर लखोट्यात घालून पत्रे पाठविली जात. पक्षांबरोबर पत्रे पाठवल्याचे उल्लेखही आढळतात. हे सर्व त्रासाचे होते. पण आता वाहनांच्या सोयीमुळे पोस्टाचे पत्र वाटण्याचे काम सुलभ झाले आहे. खेडोपाड्यापर्यंत पत्राद्वारे संपर्क साधता येतो.

अनौपचारिक पत्राला विषयाचे बंधन नाही. लिहिणारा आणि वाचणारा दोघांचे हृदय त्यात ओतलेले असते. त्यामुळे कधी आनंद तर कधी दुःख. हळूहळू या पत्राना साहित्याचे रूप आले. साने गुरुजींची श्यामची पत्रे, सुधेस पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. कवी अनिल व कुसुमावती देशपांडे यांच्यामधील पत्र व्यवहारांचे संकलन झाले. नेहरूंचे इंदिरेस पत्रे प्रसिद्ध आहेत. विनोबांची पत्रे पुस्तक आहे. तसेच रवींद्रनाथ टागोर, चिपळूणकर, कर्वे, आंबेडकर, लक्ष्मीबाई टिळक इत्यादी मोठ मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या पत्रांचे खंड प्रसिद्ध झाले आहेत. वर्तमानपत्रातही वाचकांची पत्रे’ असे एक सदर असते. एकंदरीत पत्र लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पत्रात उमटते. पु. ल. देशपांडे यांची बोलकी पत्रे अपूर्वाई व पुर्वरंग मध्ये आहेत.

आता e mail, whatsapp यामुळे पारंपरिक पत्र पद्धत लोप पावल्यात जमा झाली आहे. पत्रांना दोन-चार ओळीचे स्वरूप आले. भावभावनांचे काम emojis करतात. मुले ‘आईचे पत्र हरवले. ते मला सापडले’ असा खेळ खेळत तोही काळाच्या पडद्याआड गेला. पत्र ज्या वर लिहितात ती पोस्टाची कार्डे, आंतर्देशीय, पाकिटे ही ही पुराण वस्तू म्हणून म्युझियममध्ये बघावी लागतील. ‘हाय पत्रा तुझी कहाणी! ‘

 ©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पहाट – भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग पहाट – भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

… (काहीवेळा नागराजाचं दर्शन मिळत असे. पण कोणत्याही प्राणीमात्राचं भय नव्हतं.

जिओ और जीने दो

चं साम्राज्य मुक्तपणे

नांदत होत. येथे ना त्यांना भय ना माणसाला!) …

आजूबाजूला साखर कारखाने असले तरी, बरीच गुऱ्हाळ गूळ करण्यात पटाईत.

गुऱ्हाळाच्या बाजूने जाताना त्याचं एक प्रकाराचा विशिष्ट वास येत होता. त्यांचं काम सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत चालत होत. येणारा जाणारा उसाचा रस पिऊन तृप्त पणे ढेकर देत जातं होता. जाताना गरम गूळ व काकवी पण घेउन जातं असे. त्याला कोणताही मज्जाव नव्हताच.

तस दिस कासराभर वर सरकलेला. सुरव्या डोक्यावर आलेला. राबणारे हात पाय, मर्गळलेल्या अवस्थेत. अंगावर घामाच्या धारा, अंग काळ मेचकूट झालेलं. अंगावर अर्धी चड्डी आणि मांजरपाटाचे खोळ उर्फ बदामशर्ट कपडे पण रापलेले. कळकट झालेले.

सगळे राबणारे कष्टकरी, शेतकरीआपापल्या पाणवठ्यावर आली यथेच्छ मनसोक्त गार पाण्यात अंघोळ केली. अंग घासणीला चपटा दगड होताच. कोणी विहिरीत कोणी ओढ्यावर, कोणी शेतातील पंपावर. असं सगळे चांलेले.

अंघोळ होताच त्यांची पावलं तरतर आपापल्या पालाकडे वळली. त्यांच्या अंगात तर तरी आलेली. पोटात भूख लागलेली. केव्हा एकदा भाकर खाईन असं झालेलं.

कष्टकऱ्यांनी घरून आणलेली शिदोरी सोडलेली. काही जणांच्या बायका डोईवरून बुट्टीत जेवण बांधून आणलेलं. त्या पण आपल्या धन्यासोबत जेवण करत असतं. राबणारी गडी जेवण करून सुस्त होत. वाम कुक्षी साठी तिथंच झाडाखाली आडवे होत असतं.

काहीजण चंची सोडून सुपारीचे खांड तोंडात टाकीत, पानाचं देठ खुडून त्याला अंगठ्यानं चुना लावून तोंडाखाली दाबत असतं. त्यावर तंबाकूची चिमठ पण अलगद ओठा आड करत असतं. घटकाभर विश्रांती झाली की, परत ताजेतवाने होत अन कामाला लागतं असतं.

कोण भांगलण, कोण कोळपणी, कोण पाणी पाजण, अशी सगळी काम करत. इकडे त्यांच्या बायका पण जनावरांना चारायला सोडून घरात हातभार लावत असतं. काही बायका मळ्यातील माळवं तोडून आपली टोपली भरून घेत असतं. घरात थोडी ठेवून उरलेले माळवं बाजारात विकत असतं.

दिवस मावळत होता, तश्या सावल्या ही जरा लांबलचक पडत होत्या. दिवस मावळायला आला.

मावळतीला सप्तरंगाची उधळण चालू होतीच. हवेत गारठा जाणवू लागतं होताच.. पिवळा, नारंगी, निळा, केशरी, सूर्य एकदम मोठा लाल भडक दिसतं होता.

कातरवेळ, सांज वेळ जवळ येत होती. सूर्य मावळला. पक्ष्यांची गडबड चालू झाली. आपापल्या घराकडे परतण्यांची घाई सुरु होतीच. चित्र विचित्र आवाज असमंतात निघत होते. मध्येच पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची माळ शिस्तबद्ध पण जरा वेगाने मावळतीकडे जातं होती. जणू शुभ्र फुलांचा हार घेउन रान देवतेला घालण्यासाठी निघाले होते. मध्येच खंड्या उच्च स्वरात निनादत होता. सुतार पक्ष्याची टकटक थांबलेली. एव्हाना सायंकाळ होऊन थंडी वाढलेली. तश्यातच कातरवेळ साधत काही तरुणाई अंधाराचा फायदा घेत, अडोश्याला गप्पा मारत दिल जमाई चालली होती. गुपचूप कारभार चालू होता.

तारांगण सजल होत. वट वाघूळ परत आडव्या तिडव्या रेषा काढत झाडात गप्प होत होती. घुबडाचा विशिष्ट आवाज भय कम्पित करत होता.

टिट्वीच्या केकटण्याने शांतता भन्ग करीत होत्या.

बरीच मंडळी आपल्या पांदीच्या रस्त्याने घर जवळ करीत होती. दोन्हीही कडच्या उंच झाडीत रातकीड्यांची सनई चालू होती. रस्त्याने जाणारी जनावरे त्यांच्या गळ्यातील वाजणारे घुंगुराचे आवाज लायबद्ध ध्वनीने रस्ता मोकळा करून देत होता. थंडीने आता धुक्याची चादर घातली होती. मोरांच्या केका परत साद देत होत्याच. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज गावची वेस आल्याचे साक्ष्य देत होता. गावात सगळीकडे दिवाबत्ती केल्याने धुसर लाल प्रकाश धुक्यात दिसतं होता. घरातील छपरातून धुराचे लोट चुली पेटल्याची खात्री होती. धूर आणि धुके यामुळे हवेत कुंद पणा जाणवत होताच.

जनावर आपापल्या जागी दावणीत गेली. मालकांनी त्यांना दोरखंडनी बांधलं.

पुढ्यात कडवळ ची वैरण टाकून दिली. काहीजण चरवीत पाणी घेउन धारा काढत बसलं. समोर पेंड ठेवली. आणि म्हसराच्या पाठीवर थाप मारून काचळ पाण्यानी धुवून घेतलं. दुधाची कासंडी भरताना चूळ चुळ आवाज घुमत होता. धारा काढून, घरी दूध ठेऊन, उरलेले दूध डेअरीत घालण्यासाठी मोर्चा वळवला. दूध घालून झाल्यावर चौकातल्या वडाच्या पारावर जोतो येऊन बसकण मारत होताच. गावातील अबाल वृद्ध आधीच येऊन बसलेली.

तस वडाचे झाड हे जणू त्यांना आधारवडच होता. वडाच झाड हे कित्येक वर्षांपासून त्यांचा आणि त्यांच्या सुख दुःखाचा सोबती होता. कित्येक गावच्या डोई ह्या वडानी पाहिल्या होत्या.

बरीच मंडळी जमली होती. त्यांच्या शिळोप्याच्या गप्पा टप्पा चालू होत्या. लहान मुले पण इकडून तिकडे हुंदडत होती. वडाच्या परंब्या धरून मूलं त्याला लोम्बकाळत होती.

कष्ट करून कामानी दमलेले हात चिलीम पेटवून आस्वाद घेत होती. चिलीम एका हातातून दुसऱ्या हातात फिरत होती.

कोण चंची सोडून पान तंबाकुची देवाण घेवाण करीत होती. कोण तंबाकूंचा बार भरून अंतराळी बोलत होता. वडाच्या झाडाला ही गम्मत नवी नव्हती. त्यालापण हा विरंगुळा वाटतं होता. त्यांच्या गप्पा तो कित्येक वर्षे ऐकत होताच.

एव्हाना थंडीची लाट वाढली होती. प्रत्येकजण आपल्या मनातील दुःख ओकत होता. हे सार पुराण पुरुष वड ऐकत होता. त्यालाही त्या गोष्टीची सवय झाली होती. वेळ होईल तस प्रत्येकाने आपापली घर जवळ केली. घरात आल्यावर दरवाजे पण बंद केले.

वड एकटाच थंडीत स्तब्ध राहिला होता. धुक्याची शालं त्यांनी पण पांघरली होती. त्यालाही एकटा राहायची सवय झालेली. उन्ह पाऊस, थंडी वारा, धुके, दिवस रात्री आणि चांदणं ह्याची त्यानं कधीच तक्रार केली नव्हती. गावच्या कित्येक पिढ्या त्यांनी बघितल्या पण पुराण पुरुषाने सगळ्यांना आश्रय दिला. आश्रय देण्यात तो धन्यता मानत होता. कित्येक पक्ष्यांची घरटी त्यानं अंगा खांद्यावर खेळवली. साप माकडासारखे प्राणी अंतकरणाने जवळ केले. तो पुराण पुरुष एकमेव सर्व घटनाचा साक्षीदार होता! आहे!!  आणि राहील!!! 

 – समाप्त –

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पहाट – भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग पहाट – भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

नीरव शांतता! होय, पहाटेची नीरव शांतता! ज्यात रव नाही, आवाज नाही, सगळे कसे स्तब्ध. आकाशात धूसर चंद्रबिंब, अंधुक चांदणे, हवेत बोचरी थंडी. गर्द सर्द धुके. शुभ्र दुलई लपेटून घेतलेली अवनी. रात किड्यांची किरकिर. अधून मधून, दवबिंदूंचा सडा चोहीकडे पसरलेला. हिरवीगार गवत पाती, त्यावर दवबिंदू चिकटलेले.

चंद्रकिरणात मोत्यांचे दाणे होऊन चमकतं होते. ते जसं काही आपल्या तोऱ्यात ऐटीत मिरवत होते. अगदी अमूल्य दागिन्यांच्या कोंदणात बसलेला वाटतं होता.

अजुनी रातकिड्याचे साम्राज्य होतच. सोबत रात पक्ष्यांची फडफड चालूच होती. थंडगार वाऱ्याची झुळूक, अंगावर काटा आणणारी होती. ओढ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज, एखाद्या सौभाग्यवतीच्या चूड्यागत किणकिणत होता. झाडावर, वेलीवर चमकणारे काजवे. कुठे कुठे फुलू पाहणाऱ्या कुंद कळ्या उमलत होत्या. पश्चिमेला लककणारा शुभ्र शुक्रतारा, त्याचं लोभस व्यक्तिमत्व, हिऱ्याच्या खड्यागत पाजळणारे शुभ्र दुधाळ रेषा! टप्पोऱ्या मोगऱ्या सारखा शुक्रतारा, समवेत गगनातील असंख्य तारका,

चमचमणाऱ्या चंद्रकळा साडीगत आकाशाच रुपड सजलेलं होत. नखशिकांत शांत श्रान्त अवनीचे रूप, मुके पण बोलके होते.

गर्द झाडी पलीकडे डोंगर रांगा. आकाशात दिसणारी नक्षत्रे जणू स्वर्गच पृथेवर अवंतरला आहे की काय, असं वाटणारे विहंगम दृश्य, जें डोळ्यातपण सामावत नव्हते.

उगवतीचे साक्ष देणारे, काही बदलणारे, आकाशी, किंचित जांभळा, केशरी, किंचित तांबूस छटानी उघडत असताना, किरमिजी रंग मध्येच पारवा रंगानी उजळीत होता. तर पाण्यात बर्फ वितळल्यासारखा शुक्रतारा अस्पष्ट होत लुप्त पावत होता. मध्येच पक्ष्यांचा थोडा आवाज, हालचाल. चिमण्यांचा चिवचिवाट, इतर पक्ष्यांची वर्दळ वाढत होतीच.

कडेला प्राजक्ताचा सडा लक्ष वेधून घेत होता. त्याचा चोहीकडे सुगंध पसरला होता. बाजुलाच शुभ्र तगर उमलू पहात होती. त्याच्या अर्धोन्मिलीत पाकळ्यांवर फुलंपाखरांचे गुंजारावं चालू होते. जास्वंद लाल भडक रंगात उमलला होता. मध्येच वटवाघूळ आपले अस्तित्व दाखवत आडवी तिडवी गवसणी घालत बाजूच्या झाडावर लुप्त होत होता. रानफूलं टवटवीत बहरली होतीच. वेलीवर विविध रंगाची फुलं चित्त वेधून घेत होती.

ओढ्याच्या कडेला मोरांच्या केका साद घालत होत्या. त्याचे ऐटीत मान वर करून चालायचे पदललित्यपूर्ण होत.

निळसर मान, डोके, डोक्यावर तुरा, मोरपीसांचा रंग तर अप्रतिम! कोणत्याही कारखान्यात तयार नं होणारा रंग!!  मध्येच भारद्वज पक्षी हा विचारमग्न वाटतं होता. त्याची शोधक नजर काहीतरी शोधत होती. उगवतीला झुंजू मुंजू झालं असेल नसेल, तसे चिमण्यांचा चिवचिवाट जास्त वाढला होता. शुभ्र बगळे एका रांगेत मिरवणूक काढीत, शिस्तीत एकाच वेगात मार्गक्रमण करीत होते.

तांबड फुटलं तसं घराचे आळसावलेले दरवाजे उघडू लागले. घराघरात दिवे लागले आणि छपरातून धूर बाहेर पडू लागला. काही ललना सडा समार्जन साठी बाहेर आल्या. पलीकडे मंदिरातून घंटेचा किणकिणाट ऐकू येऊ लागला. छपरातून येणारा धूर आणि दाट धुके एकत्र मिसळून हवा कुंद करीत होत्या.

नमाजाची बांग आणि कोंबड्याची बांग एकत्र ऐकू येत होती. त्यातच परव्याची घुटर घूम, चिमण्याचा चिवचिवाट, घंटानाद ह्याचा सरगम. पृथेला जाग आल्याची नांदी होती. त्यात शुभ्र धुक्याची चादर आणि बोचरी थंडी जाणवत होतीच.

सोनेरी किरणांची वरात, सहस्त्रकर रश्मीनें बाहेर पडत होती. काही कवडसे धारण करीत, अवनीला अलिंगन देत. तिच्या मस्तकाचे चुंबन घेत. लालिमा पसरली होती. त्यातच गाई, म्हशीचे हंबरणे, त्यांच्या गळ्यातील घुंगरूचे आवाज येत होते.

पांणंदीकडे जाणारी वाट, त्या वाटेवर वर्दळ वाढली होती. काही धुसर आकृत्या, शेतीकडे जाणारे काही शेतकरी पण त्यात दिसतं होते. धुक्यात भिजलेल्या पाऊल वाटा, बैल गाडीचे चाकूर पडलेली वाट. परत तोच तो भारद्वाज परत पांणंदीच्या कडेला तांबडे डोळे लाल् सर पंख घेउन उभा होता. कदाचित शुभ दर्शन देण्यासाठी अवतरला होता. पांदीच्या दोहो बाजूनी शेंड एकमेकांना गच्च मिठीत घेउन बसलेली. गुंतलेली. ते कमी म्हणून काय, त्यातच अनेक लता वेलींनीआपला संसार उभा केलेला होता शेंडच्या आधाराने. त्या वेलीवर पांढरी आणि लाल चुटुकदार पाने पाहुन डोळ्यास समाधान देत होते.

शिवाय अनेक रंगीं बेरंगी फुलं पाखराची गर्दी झालेली. रंग लुब्ध पाखरे रुंजी घालण्यात गुंग होती. त्यांना मधुरसाची चटक जाणवत होतीच. मध्येच कुठं तरी फडया निवडुंग आपल्या ताठ मानेने काट्यासह अस्तित्व दाखवत होता. बाभळीची झाडे त्यात भरीस भर म्हणून शोभून दिसतं होती. आपला कणखर मजबूत बांधा त्यांना प्रिय असावा. पिवळ्या जर्द फुलांची आरास आणि लोंबणाऱ्या लांब शेंगा असंख्य काटेरी जाळ विणलेला हा प्राणी अगदी तटस्थपणे दिमाखात उभा होता, अगदी पुराण पुरुषा सारखा! त्याच्या अंगावर असलेल्या अनेक गाठी मुळे प्रांजळं वाटतं होता. त्याच्या गाठीतून झिरपणारा चिकट स्त्राव, त्यावर फिरणाऱ्या शिस्तबद्ध काळ्या मुंग्या!

तशी ही पायावाट तुडवून तुडवून मळवाट झालेली. धुरळा आणि दहिवर ह्यांनी चिकट झालेली होती.

मध्येच आम्र वृक्षावर कुहू कुहू अशी साद येत होती. आंब्याला आलेला मोहर त्यातून निघणारा सुगंध जाणवत होता. लहान लहान कैऱ्या लांब देठावर बसून हेलकावे घेत होत्या. नजर पण खेचून घेत होत्या. सोबत राघू मैनेची जोडी त्यांच्याच दिमाखात! हिरव्या कैऱ्यावर चोच मारत मिठू मिठूची भाषा आळवीत होता. लाल लांब बाकदार चोच पोपटी अंगरखा घातलेली जोडी सालसपणे आपल काम चोखपणे करत होती.

जवळच्या विहिरीवर येणारा मोटेचा आवाज, पाटात पडणारे पाणी सळसळत जातं होत. बैलाच्या घुंगरांचा आवाज आणि मोटकऱ्याची गाणी शांतता भग्न करीत होती.

विहिरीच्या कडेला भिंतीतून फुटलेला पिंपळ विहिरीवर छत्र धरण्यासाठी अवतरला असावा. त्याच्या फांद्यावर लोंबकळणारी असंख्य सुगरणीची घरटी, अधोमुखी होती. घरट्यात असणारे चिमुकले जीव खाली वर करत आपल्या आईची वाट बघत होते. काहीतरी खायला मिळेल अशा आशेने धडपड करीत होते.

पाटातील पाण्यात बगळे चोच मारून खाद्य आराधना करण्यात त्यांचा थवा मशगुल. अवचित मोरांची फडफड आणि केका घुमत होत्या.

सकाळ होऊन एक कासरा भर सुरव्या वर आलेला.

तसं थंडीच्या हवेत ऊबदारपणा जाणवू लागला. पांदीच्या वाटेवरील वर्दळ वाढू लागली. मळ्यात चाललेली काम झोपडीतून येणारा धूर त्याची साक्ष देत होता.

वाड्या वस्तीवर जाग आली. तशी गावात अन गावकुसा बाहेर वर्दळ वाढली. एव्हाना सुरव्या देवाने धरतीवर लाल मळवट भरला होता. धुक्याची चादर कमी होऊन, हवेत ऊबदारपणा जाणवत होताच. लोक उन्हात येऊन बसू लागले. थंडीत उब हवी होती. पांणंदी कडे वर्दळ वाढत होती. थंडी आणि धुक्याने मातीत ओलावा धरला होता. धुके ओसरले होते. पाणंदीत बैलगाडी, जनावरे ओढ्या कडे चरायला जातं होती. मध्येच शेळ्या, मेंढरं आणि सोबत कुत्रा असं तांडा धनगर हाकीत होता. मेंढया मध्येच तांडा सोडून हिरव्या चार्यावर लुब्ध होत होत्या. त्यांना परत हाकून धनगर वाट तुडवत होता. त्याच्या हातात लांब काठी, आणि खांद्यावर घोंगड त्यावर पुढ माग अडकवलेली शिदोरी होती.

वरच्या अंगाला शेतमळा फुलला होता. गव्हाच रान हिरवगार होत. त्याला लागून मका, कणसं टरारून फुगली होती. कोबीचे गड्डे वर येऊ बघत होते.

 त्याला लागून पिवळा धमक झेंडू उठून दिसतं होता. एकूण नजारा मन पवित्र करीत होता. बाजूला अखंड वाहणारा गोड्या पाण्याचा ओढा वहात होता. त्याच पाणी झुळझूळ वाहत होतच. पाण्यात काही पक्षी विहार करत, आपले खाद्य शोधत होते. ओढ्याच्या दोन्ही बाजूला गच्च हिरवी गार झाडी, त्यात ह्यो लपलेला ओढा. दाट हिरव्या गार झाडीत पक्ष्यांची अनेक घरटी नांदत होतीच.

मनमोहक मोर लांडोर सुखनैव बांगडतं होते. अवचित उतरणारे त्यांचा समूह लक्ष वेधत होता. खंड्या ओढ्या कडेला बसून एखादी मासोळी अबदार चोचित पकडून खाद्य संस्कृती जोपसत होता. अधून मधून लाव्हा व तित्तर उडत जातं होते अन गप्प होत होते.

ओढ्याच्या दोन्हीही कडेला असणारी हिरवीगार शेती. त्यातील घरे सुद्धा टूमदार वाटतं होती. मका, गहू, हळद, मिरची, आणि ऊस त्यात सर्व प्रकारच्या भाज्या व काही ठिकाणी फुलांचे ताटवे इत्यादीनी डोळ्यात स्वर्गीय सुख आनंद भोगणारा बळीराजा, त्यात त्यांना मिळालेले निसर्गाचे वरदान.

अधून मधून कुठतरी झाडाखाली चालेलल मोराचे नृत्य. हे निसर्ग वैभव सुख त्यांना कायमच मिळत होत. एवढंच नव्हे तर सर्प आणि सर्पिण ह्यांचं गळ्यात गळा घातलेलं शृंगार नृत्य पण त्यांच्या नशिबी होत. विविध पक्ष्यांचे आवाज ओढ्यातील पाण्याचा आवाज यांची जुगुलबंद ध्वनी नेहमीचीच. त्यात त्यांना अप्रूप असं काही वाटतं नव्हतं! दोन्हीही बाजूला ओढ्यात धुनी भांडी घासली जातं होती. तेथील बायकांचा राबता पण नेहमीचा. मध्येच कोणी बाल चमू येऊन पाण्यात मनसोक्तपणे जल क्रीडा करीत होता.

त्यांचं बालपण असं जपलं जातं होत. घरातील झाडून सारी जनावरे येथेच येऊन पाणी पीत होती. चरत होती. दुभतं देत होती. दही दुधाचा महापूर ओसंडून वाहत होता. मूळबाल खाऊन राबून धष्ट पुष्ट होत होती.

ओढ्याचा उतरणीला शेळ्या मेंढया यांचा मुक्त संचार. मुबलक खाद्य मीळत होत. 

चुकून एखाद सलिंद्र बाहेर पडत होत. काहीवेळा नागराजच दर्शन मिळत असे. पण कोणत्याही प्राणी मात्राचं भय नव्हतं.

जिओ और जीने दो ‘ चं साम्राज्य मुक्तपणे नांदत होत. येथे ना त्यांना भय ना माणसाला!

क्रमशः… 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-२ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-२ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

डोईचा पदर आला खांद्यावरी…  

संत जनाबाईंच्या अभंगात विठ्ठलाचे वर्णन आहेच. पण त्यासोबतच स्त्री चं वागणं, जगणं, तिची अगतिकता याचं खूप छान वर्णन आहे. त्यात स्त्रीच्या मुक्तीसाठी असलेल्या रचना तर आपल्याला अंतर्मुख करून जातात.

डोईचा पदर आला खांद्यावरी ” हा अभंग हे त्यावरचं उत्तम उदाहरण आहे.

आपल्या विपुल रचनेत “नामयाची दासी जनी ” ही नाममुद्रा धारण करणारी जनाबाई सर्व वारकरी स्त्री संतांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ती महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा विशेषतः स्त्रीजीवनाचा एक भाग कायमचा बळकावून बसली आहे. विठ्ठलाने सगुणरूपाने तिच्याबरोबर दळणकांडण धुणीभांडी, झाडलोट, शेणगोठा ही ग्रामीण कष्टकरी स्त्रीची नित्य कामे करीत राहणे, तिच्या फाटक्या गोधडीत झोपणे, तिच्यासोबत ताककण्या खाणे, तिची वेणीफणी करणे या प्रकारच्या वर्णनाच्या शेकडो ओव्या आजही ग्रामीण स्त्रीच्या मुखी गुंजत आहेत. महत्वाचे म्हणजे ही वर्णने जनाबाईंच्या अभंगांतूनही आली आहेत.

“तुळशीचे वनी जनी उकलिते वेणी

हाती घेऊनिया लोणी सेवा करी चक्रपाणी “

किंवा

“जनी बैसली न्हायाला पाणी नाही विसणाला

हाती घेऊनी घागरी देव निघाले तातडी”

ही लोकपरंपरेतील जात्यावरची एक ओवी. इथे आशय आणि रचनेत सारखेपणा आढळतो.

गोदाकाठच्या गंगाखेड येथील दमा आणि करूंड या शूद्र भगवतभक्त दांपत्यांची जनी ही नवसाची लेक. पांडुरंगाच्या दृष्टांतानुसार ती पाच वर्षांची होताच तिला दामा शिंप्याच्या स्वाधीन केले गेले. पुढे त्यांचा लेक नामा म्हणजेच संत नामदेव महाराज जे मोठे विठ्ठल भक्त झाले. त्याची दासी म्हणवून घेत जनाई जगली. जनाईचा जन्ममृत्यू काळ याबद्दल नेमके संदर्भ उपलब्ध नाहीत. परंतु नामदेवांच्या बारशाला प्रत्यक्ष पांडुरंग रुक्मिणी बाळंतविडा घेऊन आल्याचे ती वर्णन करते. म्हणजे नामदेव महाराजांपेक्षा ती खचितच पाच सात वर्षांनी तरी मोठी असावी. पुढे इ. स. १३५० मध्ये संत नामदेव महाराजांसोबतच ती पायरीच्या चिऱ्यात अंतर्धान पावली अशी लोकश्रद्धा आहे.

“पंढरी पंढरी, विठुरायाची नगरी ” म्हणून साद घालणाऱ्या ग्रामीण स्त्रीला पंढरपूर, विठ्ठल, रखुमाई, संतजन हा सर्व गोतावळा आपला जीवीचा माहेरचा जिव्हाळा वाटतो.

 ” रुक्मिणी कालविते, निरशा दुधामधी केळं

देवाला आवडतं जनाचं ताक शिळं “

अशा ओवीतून विठ्ठल आणि जनाबाई यांच्या नात्याचे सूचन होते.

 ” आषाढीला मी नाही गेले, कर्तिकीला गं जाईन

देव पंढरीचा गं विठू, विटे उभा मी पाहीन

गोपाळपूरा जाया जनाईला गं झालं ऊन

देवा या विठ्ठलानं, यानं लाविलं गं चिंचबन “

किंवा

” इठ्ठलाच्या गं देवळात मी होईन पारवा

देवाच्या नावाचा मी गं वेचीन सरवा “

अशा ओव्यांबरोबर जनाबाईच्या निमित्ताने, उपेक्षित श्रमकरी स्त्री आपल्या मानसविश्वात विठ्ठलाबरोबरच एक वेगळा प्रपंच थाटून त्यात रंगून बसली असावी असे वाटते. अनेक स्त्रियांच्या मनात घर करून राहणारी जनाई वास्तवात मात्र बेघर होती. तिचं वास्तव जीवन अत्यंत खडतर आणि उपेक्षित होतं.

दामाशेटकडे आल्यानंतर लगेचच तिचे आईबाप गेले. ही घटनाही जनाईच्या अभंगातून येते.

” माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला

मी तुझे गा लेकरू, नको मजसी अव्हेरू “

जनाईला संत नामदेव महाराजां बद्दल असलेला आदर आणि भक्तिभाव तिने परोपरीने वर्णन केलाच आहे. तेवढीच ज्ञानदेवां विषयी असलेली ओढ तिने व्यक्त केली आहे. ते तिच्या अभंगांमधून जाणवते.

दासी शब्दाविषयी बोलायचे तर जनी किंवा नागी (नामदेवांची पुतणी) तिचाही उल्लेख दासी असाच आहे. दासीचा अर्थ शिष्या असा घ्यायला हरकत नाही. कारण खुद्द ज्ञानेश्वरांनी ” म्हणे निवृत्तीदासु ” म्हणत आपले शिष्यत्व विनम्रभावे अधोरेखित केलेले आहे.

विठ्ठलाच्या लेकुरवाळेपणाचे खूप सुरेख वर्णन जनाबाई करतात.

” विठु माझा लेकुरवाळा

संगे गोपाळांचा मेळा ॥*

निवृत्ती हा खांद्यावरी

चोखा जीवा बरोबरी

बंका कडियेवरी

नामा करांगुली ही घरी ॥

 *

जनी म्हणे गोपाळा

करी भक्तांचा सोहळा ॥

जनाई संत नामदेवांच्या घरी त्यांची शिष्या म्हणून राहत असे.

” दळिता कांडिता तुज गाईन अनंता ”

म्हणणारी जनाई आपल्याला कळते.

जनाईला तिच्या प्रत्येक कार्यात विठ्ठलाने मदत केली. तोही अभंग फारच सुरेख आहे.

” माळ पदक विठ्ठल

विसरला भक्ताघरी

झाली पदकाची चोरी

आला आळ जनीवरी “

जनाईने आधीच शूद्र त्यात स्त्री म्हणून उपेक्षा होणे यात अस्वाभाविक काहीच नाही असे लिहीले आहे. पुढे संतसहवासाने तिला जो थोडाफार आधार मिळाला त्यात ती धन्यता मानते.

“स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास

साधुसंती ऐसे मज केले”

“विदुर सात्विक माझिये कुळीचा “ असा ती उल्लेख करतेच. तसेच चोखामेळा, रोहिदास यांच्या विषयी तिला अभिमान वाटतो. संत आणि देव ती एकरूप मानते. जनाईचे देवाशी एवढे एकरूपत्व आहे की,

” देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते,

देवाविण नाही रिते ॥

याचा साक्षात अनुभव ती घेते.

 जनाबाईला संतांनी आधार दिला असला तरी, जनसामान्यांनी तिच्या चारित्र्यावर आक्षेप घेतले असणारच. म्हणून अखेर निर्धाराने तिला सांगावेसे वाटते,

 ” डोईचा पदर आला खांद्यावरी

भरल्या बाजारी जाईन मी ॥

 *

हाती घेईन टाळ खांद्यावर विना

आता मज मना कोण करी ॥

पंढरीच्या वाटे मांडियले पाल

मनगटावर तेल घाला तुम्ही ॥

जनी म्हणे देवा मी झाले वेसवा

रिघाले केशवा घर तुझे ॥

अशावेळी असं म्हणणारी जनाबाई ही मीराबाईचीच सखी वाटते.

जननिंदेच्या भयापासून स्वतःला मुक्त करणारी जनाई! देहाची सुरक्षितता आणि त्यासाठी पाळावी लागणारी जनमर्यादा तिने कधीच कस्पटासमान मानली. ती जीवन्मुक्तच होती.

स्त्री ही विवाहित असली काय, अविवाहित, किंवा विधवा असली काय? देहसंबद्ध असे तिचे चारित्र्य, लोकनिर्बंध, लोकसमज, आणि लोकेच्छा हा एकूणच स्त्री जीवनाला एक मोठा अडसर होता, आहे आणि राहणार आहे. याच्या आधारे स्त्रीला समाज जीवनातून उठवू शकतो. हे लोकापवादाचे दडपण स्त्रीमनावर सतत टांगते असते. ते एक शस्त्र असते. सीता द्रौपदीसह अनेक स्त्रिया याच मापदंडाने दंडिल्या गेल्या आहेत. स्त्री संतांचेही तेच झाले. मुख्य म्हणजे त्यांचे संतत्व सिद्ध होईपर्यंतच्या वाटचालीचे काय? नंतर याच समाजाने त्यांचा उदोउदो केला. म्हणूनच जनाई म्हणते – – – –

” स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास “!!!

अतिशय परखड पण मौलिक काव्यरचना करणारी संत जनाबाई म्हणूनच मला आवडते. भारतीय संत साहित्यात ” स्त्री मुक्तीच्या साहित्याची “ भर घालणारी ही संत स्त्री, तिचे काव्य, अभंग आणि विचारधन आजच्या काळालाही लागू आहेत.

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काव्यवेडे सावरकर – भाग-२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ काव्यवेडे सावरकर – भाग-२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

(करुण रसाला अनुकूल अशा अक्रूर वृत्तातील गीत, सागराच्या काठी बसून आपल्या हृदयाची व्यथा सांगताना त्यालाच पुन्हा परत घेऊन जाण्याची विनंती करताहेत. पण हा मूळ स्वभावच नाही, त्यामुळे त्यालाही ते धमक्या देतात, ‘अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ‘ आपल्या सर्वांच्या परिचयाचे अमर गीत म्हणजे ‘ जयोस्तुते ‘!)…

५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा झाली हे कळल्यानंतर त्यांनी महाकाव्याचा संकल्प केला व रोज दहा ते पंधरा कविता करण्याचे ठरविले. गुरु गोविंद सिंग यांच्यावर २०० आर्या लिहिल्या. महाकाव्याच्या लक्षणात दोन गोष्टी येतात. त्याची काव्यवस्तू व त्याची पद्यरचना!  सावरकरांच्या काव्यातील भावना, कल्पना इतक्या उदात्त आहेत की त्याची अभिव्यक्ती तितक्याच सुंदर पद्य रचनेतून झाली पाहिजे. महान आत्म्याच्या वस्तीसाठी कलेवरही तसेच महान हवे नं!  

प्रथम ‘सप्तर्षी ‘ या महाकव्याला सुरुवात केली. आकाशात सप्तर्षी पाहण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद झाला. व तिथे जाण्याची इच्छा झाली. यातून या काव्याचा जन्म झाला. नंतर तिथे अनुष्ठूप छंदात ‘ कमला ‘ हे दीर्घ काव्य लिहिण्याची इच्छा झाली. ऐन तारुण्यात ते मायदेशाला व संसाराला पारखे झाले. बंदिवासाची आपत्ती आली. त्यामुळे या दीर्घ काव्यात ते स्वतःचे प्रतिबिंब पाहत असतील तर त्यात नवल नाही. या काव्यात तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कमलेच्या नाजूक भावभावनांचे पापुद्रे अगदी अलगद उलगडले आहेत. स्त्री मनाचे आकलन व उकल सुंदर केली आहे.

अंदमानात प्रथम सावरकर कविता

भिंतीवर काट्यांने लिहीत व ती पाठ करून ठेवत. त्यांची खोली बदलली व तिथै येणारा कैदी महाराष्ट्रीयन असेल तर तो भिंतीवरची कविता पाठ करी. पण तुरुंगाधिकाऱ्यांना ते काय लिहितात हे न कळल्याने त्यांचे हातही पायाप्रमाणे बेडीने बांधले जाऊ लागले. मग ते कविता रचून मनात पाठ करू लागले. वीस वर्षे पोर्तुगीजांशी टक्कर दिलेल्या पेशवाईच्या काळावर काव्य लिहिण्याच्या त्यांच्या संकल्पाचा परिणाम म्हणजेच ‘ गोमंतक ‘ हे दीर्घकाव्य!  कोकणच्या राजकारणी घडामोडी विषद करण्याचा हा काव्य प्रयत्न! इतिहासाच्या पृष्ठभूमीवर कल्पनेच्या कुंचल्याने कवीने काढलेले एक चित्र आहे. या काव्याचा पूर्वार्ध निर्यमक रचना असल्याने बंदिवासात ती लक्षात ठेवणे, पाठ करणे अशक्य झाले त्यामुळे ती रचना, अंदमानातून बाहेर आल्यावर शेवटी रत्नागिरीच्या तुरुंगात कागद पेन्सिल मिळाल्यावर त्यांनी पूर्ण केली. या महाकाव्याचा उत्तरार्ध त्यांनी २० मात्रांच्या निर्यमक ‘वैनायक’ या नव्या स्वनिर्मित वृत्तात रचला.

तुरुंगात खितपत पडलेल्या एका वीर युवकाचे विरहोद्गार त्यांनी ‘विरहोच्छ्वास ‘ या काव्यात गुंफले. अक्रूर या वृत्तातील हे विरह शोकाचे उच्छ्वास मनाची पकड घेतात. विरहात आठवणऱ्या पूर्वस्मृती, म्हणजे प्रत्येक उच्छ्वास हे स्वतंत्र भावगीत आहे. अशा चाळीस भावगीतांची सुरेख गुंफण केली आहे.

एक करुणामय व एक क्रूर अशा दोन प्रकारच्या गूढ शक्ती जगात वावरत असतात हे सांगण्यासाठी त्यांनी, घटाघटा रक्त पिणाऱ्या पण पिलांना पाजणाऱ्या व्याघ्री वरून ‘मूर्ती दुजी ती ‘ ही काव्यरचना केली. अंदमानातील प्रसंगावर आधारलेल्या चांदोबा व सायंघंटा या कविता आहेत. चांदोबा दिसल्यावर बालपण, मामाचा वाडा, भावंडे या साऱ्या स्मृती दाटून येतात. दिवसाचे काम संपल्यावर कोठडीत बंद करण्यापूर्वी सायंकाळची घंटा वाजे, त्यावेळी एक दिवस संपला, ही जाणीव होई. ही कल्पना सायंघटा मधे आहे. तसेच एक दिवस मायभूमीची विजय घंटा वाजेल हा आशावाद आहे.

रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यावेळी ‘आकांक्षा ‘ नावाची अतिशय उच्च दर्जाची रूपकात्मक हृद्य रचना लिहून टागोरांना पाठविली. या कवितेत एक गोष्ट आहे. गरुडाच्या जोडप्याला शापामुळे कावळ्यांच्या संगतीत रहावे लागते. पण त्यांची मुलगी एकदा गरुड व साप यांच्यामधील युद्ध पाहते, त्यात गरुड जिंकतो. तो मला हवा हा हट्ट धरते. गरुड प्राप्तीची आकांक्षा सोडत नाही. इतकी यशाची खात्री हवी.

त्यांच्या ‘बेडी’, ‘कोठडी ‘, ‘जगन्नाथाचा रथोत्सव ‘, ‘ निद्रे ‘, ‘मरणोन्मुख शय्येवर ‘ या कविता अध्यात्मिक बैठकीच्या आहेत. अंदमानातून सुटल्यावर आधी अलीपूर नंतर रत्नागिरी तुरुंग शेवटी येरवडा तुरुंगात ठेवले होते. हिंदुस्थानात आल्यावर अंदमानात रचलेल्या काव्याचे जे तुकडे तुकडे आठवतील ते गोळा केले त्यांच्या कविता व कैद्यांनी पाठ केलेल्या कविता घेऊन त्यांनी काव्यसंग्रह पूर्ण केले. कमला व गोमंतक हे १९२३ ला प्रकाशित झाले तर रानफुले हा काव्यसंग्रह १९३४ ला प्रकाशित झाला. शेवटी रत्नागिरीत स्थानबद्ध केल्यावर त्यांनी निबंध, नाटके अशा गद्य लेखनास प्रारंभ केला. नाटकातून त्यांनी काही पद्य रचना केल्या. ‘ स्वदेशी ‘, ‘हिंदू एकता ‘, ‘अस्पृश्यता निवारण ‘, ‘ हिंदुध्वज ‘, ‘सशस्त्रता ‘या काव्यातून राष्ट्र ऊध्दारासाठीची कळकळ, तळमळ लक्षात येते. याशिवाय आर्या वृत्तातील

‘गोदावकिली ‘ मोरोपंती विशेषांनी सजली आहे, ‘बालविधवा दुःस्थिती ‘, ‘टिळक स्तवन ‘ या ही आर्या वृत्तात आहेत. ‘महाराष्ट्र भाटाचे विजय गीत ‘, ‘नाशिक येथील गोदातटाकी ‘, लेडी ऑफ लेक ‘(भाषांतर) या कवितांतून निरनिराळ्या वृत्तांचा वापर केला आहे. शिवाजी महाराजांच्या आरतीत परिलिना वृत्ताचा वापर केल्यामुळे कविता रचनेच्या दृष्टीने सौंदर्य प्रधान झाली आहे. ‘ शिववीर ‘ या गीतात परिलिना ची लय थोडी शिथिल केली आहे त्यामुळे या स्त्री गीताला शोभणारी रचना निर्माण झाली आहे. ‘अनंताची आरती’ आसावरी रागातील असून ‘हिंदू नृसिंह’ मधे भूपती रागाचा सुंदर उपयोग केला आहे. ‘ अटकेवर जरी पटका ‘ हे विजय गीत असल्याने त्याच्या आवेशाला साजेल अशा फटक्याच्या हरिभागिनी वृत्तात आहे.

प्रकाशित परंतु जप्त, प्रकाशित परंतु नाटकातून विखुरलेल्या, काही विस्मृतीत गेलेल्या, अनेक झडत्यांच्या वेळी हरवलेल्या, तुकड्यांवर लिहून पडलेल्या, जप्त होतील म्हणून प्रकाशित न केलेल्या अशा अनेक सावरकर रचित कविता आहेत.

साहित्याचार्य, वेदांततीर्थ, बाळशास्त्री हरदास म्हणतात, “आधुनिक भारताच्या महान वैतालिकात (राजदरबारातील कवी) सावरकरांचे स्थान व्यासांचे आहे, शुकाचे नाही कारण दिव्यत्वाकडे जाणाऱ्या प्राकृतिक ओघाची परागतिक वंचनेपासून मुक्तता करणे तिचे स्वरूप आहे. “

सावरकर रुपातील या अलौकिक बुद्धिमत्तेस शतशः प्रणाम!!!

– समाप्त –

(संदर्भ- वा. गो. मायदेव संपादित ‘सावरकरांची कविता ‘)

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-१ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-१ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

संत साहित्य हा भक्तिमार्गीयांचा शाब्द आविष्कार आहे. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक फार मोठा कालखंड भक्तिमार्गाने दुमदुमला होता. या काळात विविध धर्मपंथ, संप्रदाय होते एवढेच नाही तर उपास्यदेवताही विविध होत्या आणि उपासना मार्गही विविध होते. परंतु त्यांचे प्राणतत्व एकच होते. ते म्हणजे भक्तिभाव!

या परंपरेत दक्षिणोत्तर किंवा पूर्वपश्चिम भारताचा विचार केला तरी महाराष्ट्रात स्थापित असलेला वारकरी संप्रदाय हा खूप महत्वाचा ठरतो. इथल्या संतांची भूमिकाही महत्त्वाची आहे. सर्व भक्तिसंप्रदायांच्या या पसाऱ्यात महाराष्ट्राचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र हा भारताच्या मध्यावर आहे. भाषिकदृष्ट्या आर्यभाषिक प्रदेशांच्या सीमा आणि द्रविड भाषिक प्रदेशांच्या सीमा असलेले शेजारी चारही बाजुंनी आहेत. त्यामुळे उत्तर – दक्षिण, आर्य – द्रविड सर्वांना सामावून घेण्याचे सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र प्राचीन काळापासून करीत आला आहे. व्यापक अर्थाने महाराष्ट्र हे भारतीय संस्कृतीचे संगमतीर्थ आहे असे म्हणावेसे वाटते..

स्थूलमानाने इसवी सनाचे बारावे ते सतरावे शतक हा पाच ते सहा शतकांचा काळ भक्तिमार्गाचा कालखंड मानता येईल. स्वातंत्र्योत्तर काळात काही साहित्यप्रकारांनी जो “आवाज” दिला, तेच काम भक्तीचळवळिंनी मध्ययुगातच केले. समाजातल्या प्रस्थापितांनी धर्मक्षेत्रात जे मापदंड निर्माण केले होते ते भक्तीमार्ग यांनी झुगारून दिले. कृत्रिमता, पाखंड उघडे पाडले. न्यूनगंडातून उपेक्षितांची मुक्ती केली, त्यांचा आत्मविश्वास जागवला. आत्मप्रतिष्ठेचा मार्ग प्रशस्त केला.

वरील हेतू सिद्धीस नेण्यासाठी संत साहित्य निर्माण करावे लागले नाही, तर ते निर्माण झाले. अखिल भारतात काश्मिर ते कन्याकुमारी आणि बंगाल ते आसाम इथपर्यंत अनेक संत झाले. त्यातही स्त्रीसंतांनी सुद्धा साहित्यात खूपच मोलाची भर घातली आहे. विस्तार भयास्तव इथे सगळी नावे घेता येणार नाहीत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर जात, पात, धर्म, स्त्री, पुरुष हा भेदभाव न करता ” आम्ही आनंदे नाचू गाऊ ” म्हणणाऱ्या संतांमधे स्त्री संत अनेक झाल्या.

मुक्ताई!  ज्या कुलकर्णी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून यज्ञोपवित संस्कार करण्यास नकार दिला. निवृत्तीनाथ त्यावेळी दहा वर्षांचे तर मुक्ताई फक्त चार वर्षांची. दादाच तिचे पालक आणि गुरू झाले. त्यात मुक्ताई, तिचा विवाह हे तर दूरदूरपर्यंत शक्य नव्हतं.

पण त्यामुळे मुक्ताईचे साहित्य, तिचे अभंग कम अस्सल ठरत नाहीत. त्यांची काव्यरचना ही अतिशय मौलिक आहे. त्यातही “ज्ञानदेव तुकाराम ” या मध्यमपदलोपी समासात जी वारकरी संत मंडळी आहे, त्या स्त्री संतांमधे संत मुक्ताई, संत जनाबाईचे नाव महत्वाचे आहे. निर्मळा, नागी, कान्होपात्रा, बहिणाबाई, सोयराबाई, लिंबाई, विठाबाई अशा आणखी अनेक स्त्रीसंत आहेत.

मुक्ताबाईंना अतिशय अल्प आयुष्य मिळालं. संन्याशाची मुलं म्हणून आतिशय विचित्र आयुष्य या चारही भावंडांच्या वाट्याला आलं. त्यात मुक्ताई सर्वात धाकटी असूनही सर्वांची आई झाली. समाजातली मिळणारी वागणूक बघून एक दिवस ज्ञानेश्वर महाराज अतिशय दुःखी झाले, आणि झोपडीची ताटी (दरवाजा) बंद करून घेतली. सर्व भावंडांनी त्यांना बाहेर येण्याची विनंती केली. मात्र मुक्ताईने आपल्या अभंगांमधून त्यांचे मन वळवले. तेच अभंग पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले.

चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ॥

शब्दशस्त्रे व्हावे क्लेष । संती मानावा उपदेश ॥

विश्वपट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

*

संत तोची जाणा जगी । दया क्षमा ज्याचे अंगी ॥

लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥

मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

चिमुकल्या बहिणीने केलेली ही विनवणी माऊलींना टाळता आली नाही, आणि ते बाहेर आले. संत कसा असावा याचं अतिशय सुंदर विवेचन यात आहे.

याशिवायही मुक्ताईच्या अनेक अभंग रचना प्रसिद्ध आहेत.

तशीच कान्होपात्रा. ती कोण होती? काय? यावर विवेचन नको. ती फक्त विठ्ठलभक्त होती. स्त्रीसंत होती.

*

नको देवराया अंत अता पाहू

प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ॥

*

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले

मजलागी जाहले तैसे देवा ॥

*

मोकलोनी आस जाहले उदास

घेई कान्होपात्रेस हृदयात “

*

हा तिचा अभंग सर्वश्रृत आहे.

संत बहिणाबाई. सांसारिक सुख तिला फारसं लाभलं नाही. जरठ नवऱ्याशी संसार करावा लागला. त्यांचाही अभंग बघा.

विरक्तीचे मूळ । प्रपंचाचा त्याग

पाहताचि एक । गृह शैल ॥

स्त्री ही मोक्षमार्गातली धोंड आहे ही आजवरची धारणा आहे पण घर हा परमार्थ मार्गातला स्त्रीच्या दृष्टिने फार मोठा असल्याचे ती बोलून दाखवते. अशा अनेक स्त्री संत आहेत. त्यांचं साहित्यही विपुल आहे. मात्र त्यात संत जनाबाई यांचं स्थान वेगळं आणि मोठं आहे.

ते पुढील भागात बघूया!!

क्रमशः… 

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काव्यवेडे सावरकर – भाग-१  ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ काव्यवेडे सावरकर – भाग-१  ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

२८ मे हा विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती दिन! या दिवशी कांही लिहावं असं मनात आलं. पण कशावर लिहायचं? एक कवी म्हणून की एक क्रांतिकारी? एक नाटककार की वक्ता की समाज सुधारक? कुटुंबाच्या हाल अपेष्टा बघून द्रवणारा भावनाप्रधान माणूस की अंदमानात कोणत्या परिस्थितीत कवित्व जागं ठेवलं यावर लिहायचं? कां इतर कैद्यांचं प्रबोधन केलं यावर की स्थानबद्ध तेत असतानाही स्वातंत्र्यसंग्रामाला बळ देणारा म्हणून कां एक द्रष्टा राजकारणी कां एक डावलला गेलेला महानायक? जेवढं लिहावं तेवढं थोडं आहे. मी आज फक्त त्यांच्या कवितांच्या दालना मधून एक फेरफटका मारणार आहे.

वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी ‘सवाई माधवरावांचा पोवाडा’ रचला तर १६ व्या वर्षी चाफेकर व रानडे यांच्यावरही बारा चौकी, १९२ चरणांचा मोठा पोवाडेवजा फटका लिहिला. २१ व्या वर्षी

सिंहगडाचा पोवाडा तर २३ व्या वर्षी सुप्रसिद्ध बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा रचला. पोवाड्याचा हेतू वीर रसात्मक प्रसंग निवडून लोकांना स्फुरण देणे हा आहे. त्यामुळे काहीजण पोवाड्यांना वीर काव्य असेही म्हणतात. सावरकरांच्या पोवाड्यात वीररस आहेच परंतु विदग्ध कवीला शोभणारे अलंकार जास्त आहेत. सूर्याजी म्हणतो, ‘जाऊ इच्छिता काय, धरुनी आल्या दोराला, अहो षंढ, तो दोर मघाची लढूनिया मेला’ असे रूपक अलंकार प्रचुर काव्य त्यांच्या पोवाड्यातून आढळते. तानाजीच्या समाधी विषयी सांगताना ते म्हणतात, ‘ मग त्या गडाची भूमी ठेवी, तानाजीस उदरी, तेव्हापासूनि रत्नाकर बहु तिचा द्वेष करी’. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. त्यांनी १८९८ मधे रचलेला ‘स्वदेशीचा फटका’ चांगलाच गाजला.

सावरकरांना टिळक व परांजपे यांच्या प्रयत्नामुळे विलायतेला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि १९०६ साली जून मध्ये त्यांनी हिंदुस्थानचा किनारा सोडला. त्या रात्री जहाजावर त्यांनी ‘ तारकास पाहून ‘ ही कल्पना रम्य कविता केली. ‘आकाशातले तारे म्हणजे नंदनवनीच्या काजव्यांचे थवे की मायेच्या सुनील शालूवरचे लकलकणारे टिकले ‘, अशा कल्पनांवरून कवीचे कोवळेपण जाणवते. या कवितेत सागर व चांदणीचे प्रेम वर्णन केले आहे. शृंगाराचे वर्णन करताना त्यात अतिव पावित्र्य राखले आहे.

विलायतेला गेल्यावर त्यांनी जव्हारवरुन संस्थानचे अधिपती श्रीमंत राजे कृष्ण शहा यांचा गौरव करणारी पत्रात्मक कविता पाठविली. विलायतेतील साडेचार वर्षांच्या वास्तव्यात अभ्यासाबरोबरच त्यांनी ग्रंथ लेखनही केले.

सावरकरांच्या कवितेत उत्कट काव्यागुणांनीं ओथंबलेली भावगीते फारशी आढळत नाहीत. कारण त्यांचे विचार तर्कशील असल्याने भावनेने रंगता रंगता ते तार्किक प्रवचनाच्या प्रांतात कधी शिरतात हे त्यांनाच कळत नाही. ‘प्रियकर हिंदुस्थान’ मध्ये कवी म्हणतो, “तुझ्या जलाही अनंत पितरा दिले तिलांजलिदान, पुण्यभूमी तू! पितृभूमी तू! तू आमुचा अभिमान! ” तसेच ‘स्वतंत्रते चे स्तोत्र ‘, ‘ हिंद सुंदरी ती ‘ अशा विषयातून देशप्रेम दाखविणारी गीते लिहिली आहेत. मुलाच्या निधनानंतर ‘ प्रभाकरास ‘ ही कविता कोमलता, वात्सल्य, असहाय्यता अशा भावभावनांनी परिपूर्ण आहे. ‘तनुवेल ‘ हे उत्कट प्रेमगीत आहे. आर्या वृत्तात लिहिलेली ‘ बालविधवा – दुःस्थिती – कथन ‘ ही कविता म्हणजे त्या स्त्रियांची वकिली थाटात मांडलेली कैफियत आहे.

दोन्ही भावांना भारतात अटक झाली हे कळल्यावर वहिनींना उद्देशून पत्रात्मक कविता ‘सांत्वन ‘ लिहिली. या कवितेत तळमळ, जिव्हाळा ओतप्रोत भरला आहे कारण ही छांदस प्रकारातील ओवीबद्ध शिथिल रचना आहे.

१९०९ साली सावरकर बॅरिस्टरची परीक्षा पास झाले. राजद्रोह न करण्याच्या अटीवर त्यांना सनद मिळणार होती पण त्यास त्यांनी नकार दिला. लवकरच ते राजद्रोहाच्या आरोपावरून पकडले गेले व त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. ब्रिटिश कोर्टाने नंतर त्यांना हिंदुस्थानात धाडण्याचा आदेश दिला पण हिंदुस्थानात गेल्यानंतर आपल्याला अंदमानलाच धाडले जाईल ही भीती होती म्हणून त्यांनी ‘माझे मृत्युपत्र’ ही वसंततिलका वृत्तातील कविता गुप्तपणे आपल्या वहिनी कडे पाठविली. मृत्युपत्रातील त्यांची संपत्ती व तिची केलेली वाटणी आवर्जून वाचावी. भारतात येताना त्यांनी सुटण्याचा धाडसी प्रयत्न केला पण पकडले गेले. आता भारतात गेल्यानंतर आपला अमानुष छळ होणार याची खात्री असल्याने वज्रवृत्तीचे कवच निर्माण करणाऱ्या ‘ आत्मबल ‘ या काव्यात कवी म्हणतो ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला ‘ हे असे अचलधारणा प्रकट करणारे गीत लिहिले.

हिंदुस्तानात खटला चालल्यावर त्यांना आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा झाली. त्यावेळेसच हत्येस चिथावणी या आरोपावरून दुसरा खटला भरला गेला. त्यावेळी त्यांना खात्री होती की आता फाशी होणार. त्यावेळी ‘ पहिला हप्ता ‘ ही देशभक्तीपर कविता लिहिली. मायभूला म्हणतात, “ऋण ते फेडाया | हप्ता पहिला तप्त स्थंडिली देह अर्पितो हा.” अंदमनातील बंदिस्त जीवनाने आयुष्याचा बराच भाग व्यापल्याने त्या अनुभवातून बऱ्याच कविता निर्माण झाल्या आहेत. ‘ पायातील बेडी ‘ हे मनःशल्य असले तरी ती एखाद्या दागिन्याप्रमाणे घासून, पुसून घालावी लागे. नाहीतर ती गंजल्याने जास्तच टोचू लागे. हा विरोधाभास पाहून ते म्हणतात, ” फोडूनि, तोडूनी जी जाळावी, तीच कशी उजळावी आपण, आपुलीची रे बेडी, हौस तुझी ही वेडी ” केंव्हाही मृत्यूच्या स्वाधीन व्हावे लागेल, अशावेळी मृत्यूचा स्वीकार सुखाने करण्याची मनाची तयारी करताना म्हणतात, ” ये मृत्यो! ये तू ये! यावयाप्रती निघालाच असशील जरी ये तरी सुखे, कोमेजुनी जावया भिवोत ही फुले, ही द्राक्षे रसरशीत सुकुनि जावया, भ्यावे ते कां म्हणूनी तुजसि परी मी? ” अशाच ‘ जा झुंज ‘, मला देवाचे दर्शन घेऊ द्या ‘ या ही भावगीताचे नमुने म्हणून सांगता येतील. पण या सर्व कवितांवर राज्य करणारी कविता किंवा भावगीत म्हणजे, ‘ सागरा प्राण तळमळला ‘! आपण आपल्या प्रतिभेचे देणे देशप्रेमाच्या आविष्कारात वेचले पाहिजे, अशी सावरकरांची तळमळ होती. करुण रसाला अनुकूल अशा अक्रूर वृत्तातील गीत, सागराच्या काठी बसून आपल्या हृदयाची व्यथा सांगताना त्यालाच पुन्हा परत घेऊन जाण्याची विनंती करताहेत. पण हा मूळ स्वभावच नाही, त्यामुळे त्यालाही ते धमक्या देतात, ‘अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ‘ आपल्या सर्वांच्या परिचयाचे अमर गीत म्हणजे ‘ जयोस्तुते ‘!

क्रमशः… 

(संदर्भ- वा. गो. मायदेव संपादित ‘सावरकरांची कविता ‘)

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझी जिथे घरगुती जेवणाची सोय झालेली होती ते घर आणि त्या घराशी जुळलेले माझे भावबंध हा माझ्या शेगावला जाण्याच्या उत्कट इच्छेच्या पूर्तीसाठी गजानन महाराजांनीच योजनापूर्वक निवडलेला अल्पकाळासाठीचा एक थांबा होता याची त्या क्षणी तरी मला कल्पनाही नव्हती!)

माझी अचानक अहमदनगरला बदली झाल्यानंतर योग्यवेळी आलेलं ते एक वळण होतं. हे वळण माझ्या ऋणानुबंधांचाच एक भाग होतं हे माझ्या अकल्पितपणे लक्षात आलं ती खूप नंतरची गोष्ट.

अचानक उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीत त्या काकूंनी गरजूंसाठी घरगुती जेवणाचे डबे द्यायला सुरुवात करून घराचा डोलारा हिमतीने सांभाळलेला होता ती त्यांची मुले लहान असतानाच त्यांचं सौभाग्य हरवलं होतं तेव्हाची गोष्ट! आता मुलं हाताशी आली होती, घरखर्चापुरतं कमवत होती, आईला आता दगदग करू नको, आराम कर म्हणत होती, तरीही सुरुवातीपासून जोडलेल्या चार दोन घरी जेवणाचे डबे देणं त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. खरंतर ते कुटुंब कष्टातून वर येत होतं तेव्हाही घराचं घरपण टिकावं म्हणून काकूंनी घरी येऊन जेवणारे मेंबर्स कधीच स्विकारले नव्हते आणि आजतागायत तेच धोरण त्यांनी अवलंबलं होतं. त्यांनी स्वत:च ठरवून घेतलेल्या या नियमाला मी मात्र अपवाद ठरलो होतो. याला निमित्त ठरले होते ते आमच्या ब्रॅंचमधले श्री. कुलकर्णी. त्यांच्या शेजारचंच हे कुटुंब. केवळ या कुलकर्णींनी केलेल्या विनंतीला मान देऊन काकूंनी माझी जेवणाची सोय करायचं मान्य केलं होतं हे नंतर गप्पांच्या ओघात काकूंकडूनच मला समजलं.

काकू स्वयंपाक खूप रुचकर करायच्या. अगत्यानं, प्रेमानं वाढायच्या. ते घर भेटलं नसतं तर मला सगळं निभावणं खरंच खूप अवघड गेलं असतं.

अहमदनगरमधलं माझं रुटीन असं मार्गी लागलं तेव्हा इथली उर्वरित तीन वर्षे सुरळीत जाणं फारसं जिकीरीचं नसेल असं मला वाटलं खरं पण त्याच दरम्यान पडद्यामागे अशा कांही घटना घडत होत्या की त्या माझा इथला अन्नाचा शेर संपवण्याला लगेचच निमित्तही ठरल्या!

इथे येऊन मला फार तर चार महिनेच झाले असतील. मी त्या दिवशी नेहमीप्रमाणे काकूंकडे जेवण करून ब्रॅंचला जाण्याऐवजी, सकाळीच कांही महत्त्वाच्या कस्टमर्स व्हिजिट्स असल्याने उशीरा जेवायला जायचं ठरवून तसा निरोपही काकूंकडे देऊन आलो, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की हा माझा इथला अखेरचा दिवस असणार आहे. कारण त्यादिवशीच्याच इनवर्ड मेलमधे माझी तातडीने अकोला ब्रॅंचला बदली झाल्याची ऑर्डर होती! हे सगळंच अकल्पित, अनाकलनीय आणि चक्रावून टाकणारं होतं! हे सगळं कां? .. कशासाठी? .. हे प्रश्न त्या क्षणी तरी निरूत्तरीतच होते. पुढे त्याचं जे कारण समजलं तेही तसं अकस्मात निर्माण झालेलं असंच होतं. ऍडव्हर्स ऑडिट रिपोर्टमुळे अकोल्याच्या मॅनेजरची रातोरात गच्छंती झालेली होती आणि तातडीची गरज म्हणून मग तिथं कुणाला तरी पाठवायलाच हवं, म्हणून माझं हे पोस्टींग. ‘.. पण मीच कां? ‘ याला समाधानकारक उत्तर नव्हतं. ही गजानन महाराजांनी सुरू केलेली माझ्या परीक्षेची सुरूवात असावी अशी पुसटशी शंकाही तेव्हा मनात यायचं कांही कारण नव्हतं. पण लौकरच त्याची प्रचिती मात्र येणार होती आणि आश्चर्य म्हणजे याचं सूतोवाच व्हायला निमित्त ठरणार होत्या या काकूच!

खरंतर इथलं रुटीन नुकतंच सुरळीत सुरू झालं तेव्हा मला आता निदान महिन्यातून एका वीकेंडला तरी सांगलीला घरी जाता येईल हाच विचार मनात येऊन मी त्यातच समाधान मानलं होतं. आणि आता मी कधी विचारही करू शकणार नाही अशा अकोल्यासारख्या दूरच्या ब्रॅंचमधे झालेली माझी ही अशी बदली यांचा मेळ बसवायचा कसा?

माझ्यापुरता विचार करायचा तर ही बदली अकाली आणि अन्यायकारकच नव्हती फक्त तर माझ्या दैनंदिन अडचणी प्रचंड प्रमाणात वाढवणारीही ठरणार होती. ही ट्रान्स्फर आॅर्डर वाचली त्याक्षणी तरी मला ती पनिशमेंटच वाटली होती. तोवरच्या माझ्या २८ वर्षांच्या बॅंकिंग करिअरमधे सतत होत आलेलं माझं कौतुक आणि मिळत गेलेलं यश यांना परस्पर छेद देणारी अशीच ही शिक्षा आहे या विचाराने मी अस्वस्थ होतो. आता कुठल्याही क्षणी झोनल ऑफिसचा तातडीनं रिलीव्ह होण्याचा फोन येईल हा विचार मनात आला आणि आठवण झाली ते मी रोज जेवायला जात होतो त्या काकूंची. मग घाईघाईनेच ब्रँच-रूटीनची व्यवस्थित घडी बसवून दुपारी एक-दीडच्या सुमारास त्यांच्या घरी जेवायला जाण्यासाठी मी ब्रॅंचमधून बाहेर पडलो. त्यांना माझी बदली झालीय हे सांगायला तर हवंच या विचाराचंच दडपण वाटत राहिलं. ते घर आणि तिथली माणसं यांनी माझ्या नेमक्या गरजेच्या वेळी मला कसलेही आढेवेढे न घेता केलेली मदत माझ्यासाठी खूप मोलाची होती. अतिशय अतूट असे हे ऋणानुबंधच आहेत अशीच माझी भावना होती. आता इथून कायमचं निघून जावं लागणाराय हे नाईलाजाने मी स्वीकारलं, तरी तसं काकूंना सांगणं मला खूप जड जाणार होतं. आज रात्री जेवायला येऊ तेव्हा सांगूया कां असंही एकदा वाटलं पण आजच अचानक रिलीव्ह व्हायला लागलं तर? .. हा विचार मनात आला आणि मी नाईलाजाने त्यांना हे आत्ताच सांगून टाकायचं असं ठरवलं. हे सगळे उलट सुलट विचार मनात घेऊनच मी बेल वाजवली. जेवणासाठी पानं घेऊन काकू माझीच वाट पहात होत्या.

“आज खूप उशीर केलात? ” आमच्या दोघांचीही पानं वाढता वाढता त्यांनी विचारलं.

“हो ना. तुम्ही जेवला नाहीत अजून? “

“तुमचीच वाट पहात होते. ” त्या म्हणाल्या.

भूक लागली होती तरी जेवणात माझं लक्षच नव्हतं. जे सांगायचं त्यासाठी मी शब्द जुळवत राहिलो.

” काकू ” मी क्षणभर घुटमळलो. “.. माझी बदली झालीय.. “

त्यांनी अविश्वासाने चमकून माझ्याकडे पाहिलं.

“बदली? अशी मधेच? “

त्यांना झालेला विषाद त्यांच्या शब्दांत झिरपलेला होता.

“कुठं झाली म्हणायची? “

“अकोल्याला. “

“अकोला? कुठलं अकोला? म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातलं, जवळचंच ना? “

“नगर जवळचं म्हणजे? “

“इथं आपल्या नगर जिल्ह्यांत एक खेडंगाव आहे ना अकोला नावाचं. तिथंच ना? “

“छे छे.. नाही. तिथं आमच्या बँकेची ब्रॅंच नाहीये. माझी बदली झालेलं हे अकोला नागपूर जिल्ह्यात आहे. “

” हां. ते कां? माहितीय. ते गजानन महाराजांच्या शेगाव जवळचं. ” त्या म्हणाल्या.

अपेक्षितपणे त्यांचे हे शब्द कानावर पडताच मी चमकून त्यांच्याकडे पहातच राहिलो.

“कां हो? काय झालं? “

“अ..? नाही.. कांही नाही. मला.. मला.. हे माहित नव्हतं. शेगाव अकोल्यापासून जवळ आहे कां? ” मी उत्सुकतेने विचारलं.

“हो तर. अगदी जवळ. एस. टी. ने फार फार तर तासाभराचं अंतर. “

मी थक्क होऊन ऐकतच राहिलो. या क्षणापर्यंत मला अडचणीची, नकोशी वाटणारी ही बदली महाराजांनीच घडवून आणलेली आहे असा विचार मनाला स्पर्शून गेला आणि मी शहारलो. ताई गेल्यानंतरच्या अस्वस्थतेत मी अतिशय तळमळीने गजानन महाराजांना मनोमन केलेली प्रार्थना आठवली आणि मन भरून आलं. आपली बदली ही आपत्ती नाही तर इष्टापत्ती आहे हा विचार मनात आला आणि शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याचा अचानक आलेला हा योग मनाला उभारी देऊन गेला. त्याच मनोवस्थेत मी काकूंचा निरोप घेतला. जाण्यासाठी वळणार तेवढ्यांत त्यांनी मला थांबवलं.

” नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन, महाराजांचे आशीर्वाद घेऊन मगच रूजू व्हा. सगळं छान होईल. ” त्या म्हणाल्या.

मी हेच तर ठरवलं होतं. काकूंच्या तोंडून जणूकांही गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असंच वाटलं आणि मी निश्चिंत झालो!

पण…? हे वाटतं तेवढं सोपं नसणाराय, यानंतर येणारा प्रत्येक क्षण माझी कसोटी पहाणारच ठरणार आहे याची पुसटशीही कल्पना मात्र मला नव्हती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares